पॉर्नोग्राफीला विरोध : अमेरिकन इतिहासाची एक झलक : भाग १

अमेरिकन स्त्रीवाद

पॉर्नोग्राफीला विरोध : अमेरिकन इतिहासाची एक झलक : भाग १

- ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख वाचण्यापूर्वी - प्रस्तुत लेख सदर विषयाची, तेव्हाच्या इतिहासाची धावती ओळख करून देण्यासाठी आहे. ज्या वाचकांना आंतरजाल उपलब्ध आहे त्यांनी अधिक माहितीसाठी गूगल, विकीपीडिया या स्रोतांचा वापर करून अधिक वाचन करावं, अशी विनंती. या लेखांकासाठी Battling Pornography या पुस्तकाचा मुख्य आधार घेतला आहे.

---

पॉर्नोग्राफी आणि इरॉटिका यांना चांगले मराठी प्रतिशब्द मला सापडले नाहीत. ते बनवण्याची, वापरात येण्याची आवश्यकता आहे.

“जी गोष्ट आपण पाहणं अपेक्षित नसतं ती पॉर्नोग्राफी.” बॉब गुच्चिओनी, मालक, पेंटहाऊस नियतकालिक. (पेंटहाऊस हे पॉर्नोग्राफिक नियतकालिक आहे.)

---

तत्कालीन सामाजिक पार्श्वभूमी -

दुसऱ्या महायुद्धामुळे अनेक अमेरिकन स्त्रिया घराबाहेर पडल्या. अमेरिकन पुरुष युद्धासाठी किंवा युद्धसामग्री बनवण्याच्या कारखान्यात (किंवा संशोधनात) जुंपले गेले तेव्हा शाळेत शिकवण्यासाठी, बँकेत हिशोब ठेवण्यासाठी, जीवनावश्यक वस्तू बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी स्त्रिया घराबाहेर पडल्या. स्त्रीमुक्तीची पहिली लाट १९२५ सालात स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाल्यामुळे सुरू झाली, पण खरी वाढली ती दुसऱ्या महायुद्धात स्त्रिया घराबाहेर पडल्यामुळे वाढली. युद्ध संपलं, पुरुष घरी आले, अमेरिकेची भरभराट सुरू झाली. एके काळी मतदानाच्या हक्कासाठी भांडणाऱ्या स्त्रियांच्या मुली युद्धानंतर ’आदर्श नारी’ बनल्या. या काळात त्यांना घरातून बाहेर काढण्याचं, खरंतर त्यांच्या गंजणाऱ्या डोक्यांना चालना देण्याचं, आणि पर्यायाने अमेरिकेत स्त्रीवादाची दुसरी लाट आणण्याचं, काम बेटी फ्रीडनच्या 'द फेमिनीन मिस्टीक'ने केलं. (१९६३ साली हे पुस्तक येईपर्यंत अमेरिकेत सिमोन दि बोव्हारच्या 'द सेकंड सेक्स'चा फार प्रभाव पडला नव्हता.)

'द फेमिनीन मिस्टिक'ची अमेरिकेत तडाखेबंद विक्री झाली. (सहा आठवडे ‘टाईम्स’च्या बेस्टसेलर यादीत, २००६ मध्ये बेटीचा मृत्यू होईस्तोवर तीस लाख प्रतींची विक्री -संदर्भ) औद्योगिक क्रांतीमुळे स्त्रियांची पारंपरिक घरकामं कमी झाली, त्यातून त्यांच्यावर असणारी आर्थिक जबाबदारी संपली, घरात बराच वेळ रिकामा मिळायला लागला. यातून स्त्रियांना 'नाव नसणारा रोग' जडला असं निदान बेटीने केलं. या रोगाची लक्षणं म्हणजे वेगवेगळे मानसिक विकार, अस्वस्थता, नैराश्य. मानसोपचारतज्ज्ञांना याचं कारण सापडत नव्हतं. स्त्रियांच्या मेंदूला पुरेसं खाद्य न मिळाल्यामुळे त्यांना वेगवेगळे त्रास होत होते.

या काळात दुसरी महत्त्वाची घटना घडली. गर्भनिरोधाच्या गोळीचा शोध. (कृत्रिमरीत्या बनवलेली ठरावीक प्रकारची संप्रेरकं या गोळीत असतात. ही गोळी रोज तोंडावाटे घेतल्यास गर्भधारणा होत नाही.) १९५७ साली अमेरिकी बाजारात ही गोळी आली, ती मासिक पाळीतल्या अडचणी कमी करण्यासाठी. पुढे चार वर्षांत, १९६१ मध्ये ही गोळी गर्भनिरोधक म्हणून घेण्यासाठीही अन्न-औषध मंत्रालयाने (FDA) मान्यता दिली. विवाहबाह्य शरीरसंबंधांमधून होणाऱ्या गर्भधारणेबद्दल सावधानता बाळगण्याची स्त्रियांना काही गरज राहिली नाही. (या गोळ्या विकत घेणं दूध विकत घेण्याइतपत सोपं नव्हतं, आजही नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्त्रियांना ही गोळी मिळते.) तोपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या मध्यमवर्गातल्या स्त्रियांना गर्भनिरोधक गोळी मिळवणं कठीण राहिलं नाही. स्त्रियांना मतदानाचा हक्क होता; स्त्रियांनी घराबाहेर पडावं, त्यांना समान वागणूक मिळण्यासाठी कायदा व्हावा म्हणून बेटी फ्रीडनसारख्या स्त्रीवादी आंदोलन करत होत्या; गर्भनिरोधक गोळीमुळे स्वत:च्या मर्जीनुसार लैंगिक संबंध ठेवण्याचंही स्वातंत्र्य मिळत होतं. स्त्रियांसाठी सगळं जग खुलं होत होतं.

१९६०चं दशक अमेरिकेत लैंगिक क्रांतीचं दशक म्हणून ओळखलं जातं. त्यापूर्वीपर्यंतं अमेरिकी लोकांवर साचेबद्ध कुटुंबसंस्था, लग्नबाह्य लैंगिक संबंध ठेवण्याला विरोध, एकपत्नी/एकपतीव्रत या सगळ्या पठडीबद्ध ख्रिश्चन धर्माचा प्रचंड पगडा होता. (तो आजही काही प्रमाणात आहे.) पण या दशकात व्यक्तीच्या खाजगी बाबतींत चर्च, न्यायसंस्था, सरकार यांनी ढवळाढवळ करू नये असं मानणारे अनेक लोक एकत्र आले. ज्याला हिप्पी चळवळ म्हणून हिणवण्यात आलं त्यांनी लैंगिकतेबद्दल असणारा चर्चचा ढोंगीपणा झुगारून दिला. लग्नाशिवाय, हव्या तितक्या व्यक्तींबरोबर शारीरिक संबंध ठेवता येण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना असावं असा आग्रह हे या बंडामागचं मुख्य कारण होतं. ही क्रांती यशस्वी होण्यात दुसऱ्या लाटेतल्या स्त्रीवाद्यांचा मोठा सहभाग होता.

लैंगिक क्रांतीचा परिणाम एवढा दूरगामी होता की त्याचे पडसाद ख्रिश्चन धार्मिकांमध्येही उमटले. १९७२ साली 'द टोटल वुमन' नावाचं पुस्तक आलं त्यात मेराबेल मॉर्गन या लेखिकेने धार्मिक, ख्रिश्चन स्त्रियांना लैंगिकतेबद्दल सल्ले दिले होते. स्त्रियांनी आपल्या नवऱ्याला आनंदी ठेवावं; त्याने बाहेरख्यालीपणा करू नये म्हणून स्त्रियांनी उत्तेजक कपडे घालून संध्याकाळी घरी त्याचं स्वागत करावं; सुगंधी मेणबत्त्या, तेलं, वेगवेगळी सौंदर्यप्रसाधनं वापरावीत, अशा प्रकारचे सल्ले त्यात होते. या पुस्तकाचाही अमेरिकेत प्रचंड प्रमाणावर खप झाला. (१९७४ सालातलं अललित प्रकारचं बेस्टसेलर पुस्तक, एकूण खप - एक कोटी - संदर्भ)

चार पावलं पुढे टाकली की तीन मागे पडतात का साडेचार, यावरून मोठा वाद होऊ शकतो; पण प्रगतीच्या जोडीला दुष्परिणाम येतातच. स्त्रियांना समान वर्तणूक मिळावी असं मानणारे सगळे जण प्रत्यक्षात तसं वागतात असं गृहीत धरता येत नाही. नव-डाव्या (New Left) चळवळीमधल्या अनेक स्त्रियांचा या बाबतीत भ्रमनिरास झाला. ('द सेकंड सेक्स' या पुस्तकामध्ये डाव्या चळवळींबद्दल, त्यातून समानता प्रस्थापित होईल याबद्दल विश्वास व्यक्त करणाऱ्या सिमोन द बोव्हारचीही या बाबतीत निराशाच झाली.) समलैंगिकांच्या चळवळीतही लेस्बियन स्त्रियांना पडती भूमिका घ्यावी लागली. तिथेही पुरुष अग्रस्थानी, बुद्धीला चालना देणारी, प्रसिद्धी मिळवणारी सगळी कामं पुरुषांच्या हातात आणि स्त्रियांनी फक्त सेक्रेटरी म्हणून मिरवावं किंवा पडद्याआड गधामजदूरी करावी अशा प्रकारची व्यवस्था तयार झाली.

लैंगिक क्रांतीच्या बाबतीत स्त्रियांची सगळ्याच बाजूने घुसमट झाली. स्त्री मुक्त आहे हे दाखवण्यासाठी तिने तिला विचारेल त्या पुरुषाबरोबर संबंध ठेवावेत अशी अपेक्षा पुरुष ठेवू लागले. शारीरिक संबंध असण्याच्या जोडीला मानसिक संबंध जोडले जाणं ज्यांना महत्त्वाचं वाटत होतं; फक्त त्यांनाच परंपरेनुसार नकाराची, लग्नाची अपेक्षा ठेवण्याची सोय होती. शरीरसंबंधांना स्त्रीने नकार दिला म्हणजे ती पारंपरिक पठडीतली आहे असं समजलं जात होते. स्त्रियांवर शरीरसंबंध ठेवण्याचं सामाजिक दडपण होतं. १९६० च्या दशकात शरीरसंबंधांतून पसरणाऱ्या रोगांचं प्रमाण वाढलं; ते १९७० च्या दशकात स्थिरावलं (आणि १९८० च्या दशकात कमी होण्यास सुरुवात झाली). (संदर्भ)

गर्भनिरोधाच्या गोळीमुळे संततिनियमनाची सगळी जबाबदारी स्त्रियांवरच आली. गोळी बाजारात येण्यापूर्वीपर्यंत निरोध वापरणे, कामपूर्तीच्या आधीच थांबणे असे उपाय करून पुरुष गर्भधारणा टाळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आता संततिनियमनाची जबाबदारी टळल्या/टाळल्यामुळे शरीरसंबंधांसाठी मानसिक नातं प्रस्थापित करण्याची आवश्यकता त्यांना राहिली नाही. स्त्रियांचं अस्तित्व फक्त शारीर पातळीवरच उरलं. मूलगामी (radical) स्त्रीवाद्यांच्या दृष्टिकोनातून हा भिन्नलिंगी (आकर्षण असणाऱ्या) पुरुषांकडून होणारा स्त्रीद्वेष होता. याशिवाय इतर व्यावहारिक अडचणीही होत्याच. मुली, स्त्रिया नियमितपणे गोळ्या घेत नसत. गोळी बाजारात येण्यापूर्वीच्या काळात (१९५०चं दशक) अमेरिकेत दर दहापैकी एक पौगंडवयीन मुलगी (वय वर्षं १५ ते १९) गर्भार राहत होती. (त्यापुढे तो दर सातत्याने कमी होत आहे. संदर्भ.) या वयात मुलीला गर्भधारणा झाली तर त्यांपैकी ९०% मुलींचं आयुष्य एकाच मार्गावरून जात असे; मुलाला जन्म देणं, बाळंतपणाच्या काळात शिक्षण सोडणं, पुढे कुठलीतरी छोटीशी नोकरी आणि दारिद्र्यरेषेच्या आसपास राहून आयुष्य काढणं. लैंगिक क्रांती झाली, पण तिचा फायदा पुरुषांनाच अधिक झाला.

१९६०-७० च्या दशकात येणाऱ्या पॉर्नोग्राफिक चित्रपटांच्या आधाराने स्त्रीवाद्यांनी स्त्रियांबाबत होणाऱ्या हिंसेचं विश्लेषण केलं. स्त्रियांना दुय्यम स्थानावर ठेवण्यासाठी पुरुष हिंसेचा वापर करत असल्याचं या विश्लेषणातून लक्षात आलं. बलात्कार, शारीरिक मारहाण, गोत्रगमन (नात्यातल्या स्त्रियांशी संभोग) आणि या सगळ्या आक्रमणांची नेहमी वाटणारी भीती हा अनेक स्त्रियांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. त्याखेरीज, रोडरोमियोंचा उपद्रव (शिट्या मारणे, असभ्य बडबड, स्त्रीला अवघड वाटेल अशा प्रकारे तिच्याकडे पाहणे इत्यादी) त्या काळात प्रचंड होता. या काळात काही स्त्रियांनी राजकीय समलैंगिकतेचा मार्ग पत्करला. जन्मतः भिन्नलिंगी संबंध ठेवण्याकडे कल असला; तरीही आपल्यावर अन्याय, अत्याचार करणाऱ्या पुरुषांची शय्यासोबत करण्याऐवजी आपल्यासारख्याच, आपल्याला समजून घेऊ शकणाऱ्या व्यक्तीशी - दुसऱ्या स्त्रीशी - संबंध ठेवणं म्हणजे राजकीय समलैंगिकता. हा मार्ग काही समलैंगिक स्त्रीवाद्यांकडून भिन्नलिंगी स्त्रीवाद्यांनी स्वीकारला.

लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अन्यायाचा सांख्यिकी अभ्यास १९७० च्या दशकात फ्लॉरेन्स रश हिने केला. फक्त माथेफिरू लोकच लहान मुलांशी संभोग करतात या गोड गैरसमजुतीला प्रथम तडा गेला. घरातलेच कोणीतरी (वडील, सावत्र वडील, काका, मामा, दादा इत्यादी) मुलांशी लैंगिक चाळे करतात हे या अभ्यासातून लक्ष्यात आलं. २०,००० सरकारी स्त्री कर्मचाऱ्यांशी केलेल्या पत्रव्यवहारातून असं लक्ष्यात आलं, की त्यांतल्या ४२% स्त्रियांना लहानपणी वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक छळाला सामोरं जावं लागलं आहे.

अशा अभ्यासातून पुन्हा एकदा हेच लक्ष्यात आलं, की एक बलात्कार झाला की फक्त पीडित स्त्री नव्हे - तर तिच्या परिसरातल्या इतर अनेक स्त्रियांनाही पुरुषी हिंसेची भीती बसते. या भीतीमुळेच सोबतीसाठी पुरुष असल्याशिवाय स्त्रिया घरातून बाहेर पडायला - कामासाठी असो वा मजेसाठी - तयार होत नव्हत्या. हिंसा हे अस्त्र पुरुषांकडून स्त्रियांच्या दमनासाठी वापरलं गेलं. थेट लैंगिक अन्याय असो वा सोबतीसाठी पुरुषांवर अवलंबून राहण्यातून होणारा छुपा अन्याय असो, दोन्ही प्रकारांनी पुरुष स्त्रियांना ताब्यात ठेवतात असं विश्लेषण स्त्रीवाद्यांनी केलं. लैंगिक सुख हा पुरुषांचा हक्क आहे, त्यांना तो मिळालाच पाहिजे, स्त्रियांनी पुरुषांसमोर या हक्कासाठी मान तुकवलीच पाहिजे आणि त्यांना हव्या त्या प्रकारे आपलं शरीर वापरू दिलं पाहिजे असा समज त्या काळात पुरुषांचा, अगदी नव-डाव्या - पुरोगामी समजल्या जाणाऱ्या - चळवळीतही होता.

पॉर्नोग्राफीचा मध्यमवर्गातला उदय -

१९७० चं दशक हे छापील पॉर्नोग्राफी आणि स्त्रीशरीराचं वस्तुकरण या दोन्ही गोष्टी वाढत्या प्रमाणात होण्याचंही होतं. १९५७ साली रॉथ विरुद्ध यू.एस. या खटल्यात न्यायालयाने सेक्स हा विषय सार्वजनिक व्यासपीठांवर चर्चा करण्यायोग्य आहे असा निर्वाळा दिला. पुढच्या दोन दशकांमध्ये जुन्या-नव्या अनेक पुस्तकांमधल्या अश्लीलतेसंदर्भात न्यायिक कज्जे झाले आणि या खटल्यांमध्ये अश्लीलतेवर होणाऱ्या कारवाईची न्यायिक बंधनं अधिक ढिली होत गेली. तोपर्यंत छापील पॉर्नोग्राफी विक्रीसाठी दुकानांमध्ये कुठेतरी कोपऱ्यात, आडबाजूला असे. न्यायिक बंधनं शिथिल झाल्यानंतर ही पॉर्नोग्राफिक नियतकालिकं दुकानांमध्ये शेतकरी, आरोग्य, खेळ या विषयांना वाहिलेल्या, लहान मुलांनाही सहज दिसतील अशा ठिकाणी विक्रीसाठी दिसायला लागली.

१९६९ मध्ये तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी पॉर्नोग्राफी आणि तिचे अमेरिकन समाजावर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी अठरा सदस्यांचं एक कमिशन बसवलं. या अभ्यासात पॉर्नोग्राफी आणि अश्लीलतेची व्याख्या, त्याची उपलब्धता, आणि संबंधित कायदे या मुद्द्यांचा समावेश होता. १९७०मध्ये या कमिशनने आपला अहवाल सादर केला. पॉर्नोग्राफीमुळे समाजाचा फायदा होतो, समलैंगिकता नॉर्मल आहे - आजार नाही, अशा प्रकारचा निर्वाळा त्या अहवालातून दिला होता. मात्र मधल्या काळात सत्तापालट होऊन रिपब्लिकन पक्षाचा रीचर्ड निक्सन अध्यक्ष झाला आणि त्याने हा अहवाल त्यातल्या शिफारसीसकट फेटाळला. यातून लगेच बरेच विवाद निर्माण झाले.

ह्यू हेफनरने १९५३ साली सुरू केलेल्या 'प्लेबॉय' या अमेरिकी नियतकालिकाला पॉर्नच्या क्षेत्रात त्या काळात स्पर्धा नव्हती. मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू पुरुषांचा मोठा वर्ग ग्राहक म्हणून उपलब्ध होता. १९७१ साली ब्रिटीश अर्धपॉर्न नियतकालिक 'पेंटहाऊस' अमेरिकेत आलं, ते 'प्लेबॉयच्या सशांची शिकार' करण्याच्या उद्दिष्टानेच. एकाच प्रकारचे दोन उद्योग एका ठिकाणी आले, की ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी वस्तूंचे भाव पडायला सुरुवात होते. याच न्यायानं या नियतकालिकांमध्ये स्त्रीशरीराचं वस्तूकरण जोमाने सुरू झालं. १९७१-७२ या दोन वर्षांत ’संपूर्ण नग्नता कोण आधी छापतंय’ अशा प्रकारची स्पर्धा सुरू झाली आणि त्यातून दोन्ही नियतकालिकांचा ग्राहकवर्गही बराच वाढला. दोनच वर्षांत, १९७४ मध्ये लॅरी फ्लिंट याने कष्टकरी वर्गातल्या पुरुषांचा शौक पूर्ण करण्यासाठी 'हसलर' (Hustler) हे नियतकालिक सुरू केलं. 'प्लेबॉय' आणि 'पेंटहाऊस'चा ग्राहकवर्ग मध्यमवर्गीय, चकचकीत जाणिवा असणारा होता. पण त्यांच्यापुढे असणारं, नग्नता दाखवताना दर्जा सांभाळण्याचं आव्हान 'हसलर'समोर नव्हतं. स्त्रीचं शरीर फक्त मांसाचे गोळे म्हणून दाखवण्यात 'हसलर'ने वेळ दवडला नाही.

१९३० पासून पुरुषी देहाचं वस्तुकरण (पण पॉर्न नाही) करणारी बीफकेक मॅगझिन्स छापली जात होती. एकीकडे स्त्रियांचं शरीर जास्तीतजास्त दाखवण्याची बिनडोक स्पर्धा सुरू असतानाच, १९६० च्या दशकात समलैंगिक पुरुषांसाठी पॉर्न नियतकालिक छापायला सुरुवात झाली. स्त्रियांचं शरीर दाखवण्या-बघण्याला उत्तेजन देणाऱ्या अमेरिकी प्रशासनाने पुरुषी देहाच्या प्रदर्शनावर मात्र आक्षेप घेतला. या आक्षेपाविरोधातली न्यायिक लढाई समलैंगिक पुरुष १९७० मध्ये जिंकले. त्यानंतर बीफकेक मॅगझिन्सचं अस्तित्व संपत गेलं. स्त्री-पुरुष शरीरांचं प्रदर्शन मांडण्याचा मान पुरुषांनीच पटकावला.

अमेरिकन कष्टकरी वर्गासाठी, खालच्या दर्जाच्या चित्रपटगृहांमध्ये (पुरुष आणि स्त्री कलाकार असणारे) पॉर्न चित्रपट येतच होते. या चित्रपटांना गोष्टबिष्ट काही नसे. सुरुवातीला फक्त लैंगिकता चाळवणारी दृश्यं आणि पुढे पडद्यावर दिसणारा भिन्नलिंगी संभोग आणि नग्न स्त्रिया इतपतच पॉर्न चित्रपटांची मर्यादा होती. संभोगाचं दृश्य संपलं की पडद्याबाहेरचं कोणीतरी तिथे टॉवेल फेकत असे आणि नटी तो टॉवेल गुंडाळत असे आणि सिनेमा संपत असे. त्या सिनेमाला, त्याच्या गोष्टीला काही आगापिछा नसे आणि म्हणून प्रतिष्ठाही नव्हती. १९७२ साली आलेल्या 'डीप थ्रोट'ने हे चित्र संपूर्णपणे बदललं.

जेरार्ड डेमियानो (उर्फ जेरी जेरार्ड) याने मध्यमवर्गात लोकप्रिय होणाऱ्या चित्रपटांमध्ये, कथानक आणि पॉर्नोग्राफी या कल्पना या चित्रपटात एकत्र मांडल्या. उदाहरणादाखल कथानक पाहा. लिंडा लव्हलेस हिला समागमातून कामतृप्ती (orgasm) मिळत नाही. म्हणून ती डॉक्टरकडे जाते. तिचं क्लायटॉरीस घशात असल्याचं निदान डॉक्टर करतो. म्हणून तिने कामतृप्तीसाठी योनीमार्गाऐवजी तोंड वापरावं हा उपाय डॉक्टर सुचवतो. चित्रपटाची कथा अतिशय सरधोपट असली, तरीही ती मांडण्याची पद्धत काहीशी विनोदी होती; संवाद चमचमीत होते; संगीत होतं; निर्मितिमूल्यं इतर, सामान्य(!) चित्रपटांशी तुल्यबळ होती. तरीही सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जेमतेम धंदा करून हा चित्रपट बंद होण्याच्या मार्गावर होता.

तेव्हा मध्यमवर्गात प्रसिद्ध असणाऱ्या 'टाईम' या साप्ताहिकाने 'डीप थ्रोट'बद्दल लेख प्रसिद्ध केला. 'टाईम'ची री ओढत सॅन फ्रान्सिको टाईम्स, न्यू यॉर्क टाईम्स अशा प्रसिद्ध आणि उच्चभ्रू दैनिकांनीही 'डीप थ्रोट'च्या समीक्षा छापल्या. चित्रपटक्षेत्रातल्या जॅक निकलसनसारख्या प्रसिद्ध लोकांनी चित्रपट पाहिला आणि 'डीप थ्रोट'ला रातोरात समाजमान्यता मिळाली. "तुम्ही डीप थ्रोट पाहिलात का?" असा प्रश्न अभिरुची बाळगण्याचं लक्षण समजलं गेलं.

स्त्रीवाद्यांनी या चित्रपटाविरोधात मोहीम उघडली. 'स्त्रीने आपल्या लैंगिकतेचा घेतलेला शोध', 'लिंडा लव्हलेस स्वतःची लैंगिकता लपवून ठेवत नाही', 'लिंडा हीच खरी मुक्त स्त्री आहे' अशा प्रकारची वाक्यं चित्रपटाची जाहिरात करताना वापरली गेली होती. 'डीप थ्रोट' हे नेहेमीचं रुचीहीन पॉर्न नाही, अशा प्रचाराला स्त्रीवाद्यांनी अजिबात धूप घातली नाही. 'मुक्त स्त्रीची लैंगिकता पुरुषांना आवडेल अशी आणि स्त्रीला खालच्या स्थानावर ठेवणारी अशी का असावी?', असा त्यांचा मुख्य आक्षेप होता. (त्या काळात लिंडा लव्हलेसने मुलाखतींमध्ये, 'डीप थ्रोट'मुळे आपण मुक्त झाल्याचं म्हटलं होतं. पुढे तिने तिच्या तत्कालीन नवऱ्यावर जबरदस्तीने या चित्रपटात काम करवून घेण्याचा आरोप केला.)

सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क या मोठ्या आणि खुल्या विचारसरणीच्या (liberal) शहरांमध्ये स्त्रीवाद्यांनी चित्रपटगृहांसमोर निदर्शनं केली. स्त्रीवाद्यांच्या निषेधाचा फायदा झाला आणि मध्यमवर्गात खप असणाऱ्या न्यू यॉर्क टाईम्स, टाईम इत्यादी माध्यमांनीही स्त्रीवाद्यांच्या लढ्याबद्दल बातम्या छापल्या आणि पॉर्न चित्रपटांबद्दल लेखन-जाहिराती छापणं थांबवलं.

हिंसेविरोधात लढा -

स्नफ ही चित्रपटांची एक विधा (genre) आहे, जिच्यात पडद्यावर प्रत्यक्षात घडलेला खून, हिंसाचार, बलात्कार अशा प्रकारची हिंसा दाखवली जाते.

१९७० च्या आसपास दक्षिण अमेरिकेतल्या देशांमध्ये पॉर्न चित्रपट बनवून ते अमेरिकेत दाखवण्याची प्रथा सुरू झाली होती. त्यातच मायकल-रॉबर्टा फिंडले या जोडप्याने अर्जेंटिनामध्ये १९७१ साली एक चित्रपट बनवला. चार्ल्स मॅन्सन या प्रसिद्ध खुन्याच्या आयुष्यावर, त्याने आणि त्याच्या गँगने घडवून आणलेल्या खुनांवर हा चित्रपट आधारित होता. हा चित्रपट फार चालला नाही. चार वर्षांनी हा चित्रपट पुन्हा डब्यातून बाहेर काढून अॅलन शॅकलटन याने त्याचा शेवट बदलला. फिंडले जोडप्याला याची काही कल्पना नव्हती. शेवटाला केलेल्या जोडकामात पुढील दृश्य घालण्यात आलं - प्रत्यक्ष चित्रपटाचं शूटींग संपल्यावर कॅमेरा सुरू राहिला असताना सेेटवरच्याच एकाने एका सहाय्यक दिग्दर्शिकेची हत्या केल्याचं चित्रीकरण झालं. तिला मारत असताना आणि मारल्यानंतरही खुन्याने तिच्याशी संभोग केला. मग तिच्या शरीराची खांडोळी केली. या सगळ्या हिंसेचं तपशीलवार चित्रण त्या शेवटामध्ये होतं. मग हा कथाभागअर्धवट सोडून देण्यात आला होता, तसंच या भागातल्या कलाकारांपैकी कुणाचीही नावं श्रेयनामावलीत नव्हती. सिनेमा संपताना शेवटी फक्त एक वाक्य पडद्यावर दाखवण्यात आलं - "हा चित्रपट फक्त दक्षिण अमेरिकेतच बनवता येऊ शकतो ... जिथे मानवी आयुष्याला काहीही किंमत नाही."

स्त्रीवाद्यांनी या दृश्यावर प्रचंड आक्षेप घेतला. न्यायालय आणि पोलीस यांच्याकरवी शेवटी अशी खात्री पटवून देण्यात आली, की ते भीषण हिंसेचं दृश्य बनावटच होतं आणि प्रत्यक्षात कोणालाही इजा झाली नाही. तरीही स्त्रियांना मांसाचे गोळे म्हणून दाखवण्याला आक्षेप घेणं स्त्रीवाद्यांनी सुरूच ठेवलं. न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि इतर अनेक शहरांमध्य स्त्रियांनी 'स्नफ' विधेचे चित्रपट दाखवणाऱ्या चित्रपटगृहांबाहेर निदर्शनं केली. 'खून म्हणजे गंमत नव्हे', 'चित्रपटगृहात जाऊ नका' अशा घोषणा देत त्यांनी लोकांना तशा अर्थाची पत्रकं वाटली. सर्वसाधारण चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी नावाजलेल्या 'घरंदाज' चित्रपटगृहांसमोर उभं राहून, निदर्शनं करून त्यांनी चित्रपटगृहाला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडलं. 'स्नफ'ला दक्षिण कॅलिफोर्नियातून गाशा गुंडाळावा लागला.

खरोखर हिंसा घडलेली असते की नाही, म्हणजे स्नफ विधेचे चित्रपट वास्तववादी असतात की नाही हा वादाचा मुद्दा आहे. पॉर्नोग्राफीच्या अभ्यासकांच्या मते खून खरे असण्याची अफवा उठवून तिचा फायदा 'स्नफ' चित्रपटांनी उचलला.

रेकॉर्ड कंपन्या -

या सामाजिक पार्श्वभूमीवर, १९७० च्या दशकात दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये ‘वाव्हॉ’ (WAVAW - Women Against Violence Against Women) ही संस्था कार्यरत झाली. त्यांचा अजेंडा त्यांच्या नावातूनच स्पष्ट होतो - स्त्रियांविरोधात झालेल्या हिंसेला विरोध करणाऱ्या स्त्रिया. त्यांची मुख्य नेती ज्युलिया लंडन हिला कामगार लढ्याचा अनुभव होता. मोठमोठ्या उद्योगांना आपलं म्हणणं ऐकायला लावायचं असेल, तर त्यांच्या ग्राहकांसमोर मांडलेल्या तक्रारीसारखं दुसरं शस्त्र नाही; याचा अनुभव तिने कामगार, शेतकरी लढ्यात घेतलेला होता. उपरोल्लेखित सामाजिक पार्श्वभूमीवर लॉस एंजेलिसच्या सनसेट बुलवार्डवर १९७६ साली एक जाहिरात झळकली. (सनसेट बुलवार्ड नावाचा रस्ता लॉस एंजेलिसमधून हॉलिवूडला जातो, अनेक तारकांचं वसतिस्थान असलेल्या बेव्हर्ली हिल्समधून तो जातो. सत्तरच्या दशकात त्या रस्त्यावर वेश्याव्यवसायही चालत असे.) त्या काळात प्रसिद्ध असणाऱ्या 'रोलिंग स्टोन' या रॉक बँडच्या नव्या अल्बमची - 'ब्लॅक अँड ब्लू'ची - ती जाहिरात होती.

ब्लॅक अँड ब्लू

वरच्या चित्रात जाहिरातीचा बिलबोर्ड दिसत आहे. मार खाऊन काळ्यानिळ्या झालेल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर कामतृप्तीचे भाव. त्याचं वर्णन "I am Black and Blue from the Rolling Stones and I am love it." (मी रोलिंग स्टोन्समुळे काळीनिळी झाले आहे आणि मला हे आवडतंय.) असं केलेलें. स्त्रियांशी केलेला हिंसकपणा, धटिंगणपणा त्यांना आवडतो असं सुचवणारं हे चित्र या अल्बमच्या जाहिरातीसाठी - सनसेट बुलवार्डच नव्हे, तर इतर अनेक ठिकाणीही - वृत्तपत्रांमधल्या जाहिरातीसाठी वापरलेलं होतं.

वाव्हॉच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. हे चित्र प्रसिद्धीसाठी वापरणं थांबवण्याची विनंती करणारं पत्र ‘वाव्हॉ’च्या कार्यकर्त्यांनी मुख्य रेकॉर्ड कंपनीला - वॉर्नर कम्युनिकेशन्सला - दिलं. वॉर्नरने या पत्राकडे साफ दुर्लक्ष केलं. तेव्हा ‘वाव्हॉ’ने एक पत्रकार परिषद बोलावून या प्रकरणावर चर्चा घडवून आणली. त्या परिषदेमुळे सनसेट बुलवार्डवरचा फलक उतरवला गेला. त्याच्या आदल्या रात्री एका स्त्रीवादीने त्यावर "This is a crime against women." (हा स्त्रियांविरोधातला गुन्हा आहे) असं त्यावर लिहिलं होतं. त्याचं चित्र -

ब्लॅक अँड ब्लू स्त्रीवादी निषेध

हा फलक उतरवला गेला, तरीही या अल्बमच्या प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची इतर चित्रं छापणं सुरू होतंच. ज्यूलिया लंडन आणि ‘वाव्हॉ’च्या इतर काही कार्यकर्त्यांनी रेकॉर्डच्या दुकानात जाऊन सर्वेक्षण केलं. रेकॉर्डच्या आवरणावरच्या चित्रांमध्ये स्त्रियांविरोधात हिंसेचा वापर केलेला असेल, तर त्याची नोंद त्यांनी केली. वॉर्नरच्या तीन उपकंपन्यापैकी, अटलांटिक, इलेक्ट्रा आणि वॉर्नर, यांपैकी वॉर्नर कम्युनिकेशन्सने सर्वात जास्त प्रमाणात स्त्रीद्वेष्टी हिंसा वापरली होती. (त्या काळात लेड झॅपलिन, क्वीन, जॉर्ज बेन्सन यांसारखे लोकप्रिय संगीतनिर्माते वॉर्नरसोबत करारबद्ध होते.) ज्यूलिया लंडन यांनी आधी वापरलेला, बहिष्काराचा मार्ग वापरायचा असं सुचवलं.

वाव्हॉला 'स्नफ' चित्रपटाविरोधात निदर्शनांचा अनुभव होता आणि त्यांचं नाव दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये लोकांना माहीत होतं. 'वाव्हॉ'ने रेकॉर्डवरच्या चित्रांबद्दल एक स्लाईड शो बनवला. स्त्रियांविरोधात होणाऱ्या वाढत्या हिंसेचे आकडे आणि स्त्रियांबाबत होणाऱ्या हिंसेचं माध्यमांमधून होणारं उदात्तीकरण असं या स्लाईडशोचं स्वरूप होतं. रहिवासी सोसायट्यांमधून जाऊन स्लाईडशो करणं आणि वॉर्नर कम्युनिकेशन्सला पत्र लिहायला दर्शकांना उद्युक्त करणं असा हा कार्यक्रम होता. (१९७६-१९७९) या पत्रांमध्ये दर्शकांनी आपला 'वाव्हॉ'शी संबंध आहे हे न लिहिता, आपलं शिक्षण, व्यवसायाचं स्वरूप यांबद्दल लिहावं, आणि वॉर्नरने आपली कॉर्पोरेट पॉलिसी बदलून स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेचं उदात्तीकरण थांबवेपर्यंत आपण यापुढे वॉर्नरच्या कोणत्याही उपकंपनीची रेकॉर्ड विकत घेणार नाही, असा मजकूर लिहावा असं सुचवलं. नुकताच स्लाईडशो पाहून प्रभावित झालेल्या लोकांना तिथेच पत्र लिहायला सांगणं हा ‘वाव्हॉ’चा चतुर डाव होता.

न्यूयॉर्क आणि अन्य शहरांमधून 'वाव्हॉ'च्या शाखा सुरू झाल्या. तिथेही हाच कार्यक्रम राबवला जाऊ लागला. यातून इलेक्ट्रा या उपकंपनीला सगळ्यात आधी हादरा बसला. इलेक्ट्रातर्फे जोनी मिचेल, कार्ली सायमन यांच्यासारख्या स्त्रीवर्गात लोकप्रिय असणाऱ्या कलावंतांच्या रेकॉर्ड्स निघत होत्या. इलेक्ट्राच्या रेकॉर्ड्समध्ये फार कमी प्रमाणात हिंसा वापरली गेली होती. इलेक्ट्रा हे ओलं लाकूड वॉर्नरच्या इतर दोन कंपन्यांमुळे जळत होतं. त्यामुळे इलेक्ट्राने 'वाव्हॉ'शी संपर्क करून आपल्याला बसणारी झळ कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला. 'वाव्हॉ'च्या मागणीनुसार त्यांनी आपली कॉर्पोरेट पॉलिसी बदलली आणि रेकॉर्ड्सचा खप वाढवण्यासाठी हिंसा वापरणार नाही असं आश्वासन दिलं.

वॉर्नर आणि अटलांटिकने बहिष्कार टाळण्यासाठी इलेक्ट्राच्या संचालकांना मध्ये घातलं. या तीन कंपन्या आणि स्त्रीवादी यांच्यात बैठक झाली. त्यात रेकॉर्ड कंपन्यांनी हतबलता दर्शवली. प्रसिद्धीसाठी, रेकॉर्डच्या आवरणावर काय चित्रं असतात यावर संगीतकारांचा हक्क असतो, आमचा नाही, असं कंत्राट आहे; अशी बोटचेपी भूमिका त्यांनी घेतली. ही बैठक अनिर्णितावस्थेत संपली. स्लाईडशो आणि पत्रांचा कार्यक्रम 'वाव्हॉ'ने सुरूच ठेवला. त्यातच लेझली लेबोविट्झ या कलाकर्तीने Record Companies Drag Their Feet नावाचं पथनाट्य लॉस एंजलिसच्या सनसेट बुलवार्डवरच घडवून आणलं. (यूट्यूबवर त्याबद्दल माहितीपट उपलब्ध आहे.) पामेला ब्रेनम नावाच्या कार्यकर्तीने वॉर्नरचा एक शेअर विकत घेतला आणि शेअरधाऱ्यांच्या बैठकीत भाषण केलं.

वॉर्नर कम्युनिकेशनच्या रेकॉर्ड्सच्या खपावर या बहिष्काराचा काही परिणाम झाला नव्हता. पण पत्रं, पथनाट्याला मिळालेली प्रसिद्धी, आणि पामेलाचं भाषण यांमुळे वॉर्नरची प्रतिमा खराब होत होती. शेअरधाऱ्यांसमोर प्रतिमा टिकवणं महत्त्वाचं होतं. म्हणून शेवटी वॉर्नरने मान तुकवायला सुरूवात केली. 'वाव्हॉ'ला आणि पत्रं लिहिणाऱ्या इतर काही ग्राहकांना वॉर्नरने आपल्या कॉर्पोरेट पॉलिसीत बदल केल्याचं कळवलं. 'वाव्हॉ'ने वॉर्नरसाठी काम करणाऱ्या दृश्यकलावंतांकडे यासंदर्भात चौकशी केली. तेव्हा हा तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असल्याचं लक्ष्यात आलं. पण त्या सुमारास हिंसक चित्रं वॉर्नरकडून येणं कमी झालं होतं. हे घडलं तेव्हा नोव्हेंबर-डिसेंबरचा सुट्ट्यांचा हंगाम होता. या काळात अमेरिकन लोक ख्रिसमसच्या निमित्ताने स्वतःसाठी आणि आप्तजनांसाठी बऱ्याच प्रमाणात खरेदी करतात. 'भेटवस्तू म्हणून हिंसा खरेदी करू नका' अशा प्रकारचं आवाहन 'वाव्हॉ'ने रेकॉर्ड्सच्या दुकानांसमोर लोकांना करायला सुरुवात केली. अखेर अडीच वर्षांच्या लढ्यानंतर वॉर्नरचे उच्चपदस्थ 'वाव्हॉ'शी चर्चा करायला तयार झाले. वॉर्नरने आपल्या कॉर्पोरेट पॉलिसीमध्ये बदल करावा; वॉर्नरने स्त्रियांविरोधात हिंसेला उत्तेजन दिलं आहे आणि प्रत्यक्ष आयुष्यात स्त्रियांना ज्या हिंसेला सामोरं जावं लागतं, त्याची जबाबदारी वॉर्नरवरही आहे असं पत्रक 'वाव्हॉ'ने काढलं. यातला नैतिक जबाबदारीचा भाग वॉर्नरने नाकारला, पण कॉर्पोरेट पॉलिसी बदलली. याबदल्यात 'वाव्हॉ' त्यांच्या कँपेनमध्ये वॉर्नरने प्रसिद्ध केलेली चित्रं वापरणार नाही असं वचन 'वाव्हॉ'ने दिलं.

अमेरिकेत अभिव्यक्तिस्वातंत्र्याला फार मोठं स्थान आहे. पहिली घटनादुरुस्ती या नावानेही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क ओळखला जातो. पण अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, म्हणून इतरांना त्रास देण्यासाठी कोणालाही उचकवणं मात्र अयोग्य आणि बेकायदेशीर आहे. स्त्रियांविरोधात हिंसेचं चित्रण केल्यामुळे पुरुष बलात्कार, खून करतात हे सिद्ध करणं 'वाव्हॉ'ला तेव्हा शक्य नव्हतं. पण अशा प्रतिमांमुळे स्त्रियांच्या मनात खरोखरच भीती बसते हे त्यांना माहीत होतं. त्यांनी 'गांधीगिरी'ची उच्च नैतिक भूमिका घेतली. आम्ही फक्त पीडित व्यक्ती नाही, आम्ही समाजाचा एक भाग आहोत, भांडवलशाहीत ग्राहक आहोत आणि आमच्याकडे ताकद आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्या भूमिकेचा आणि 'वाव्हॉ'चा या परिप्रेक्ष्यात विजय झाला.

पण अमेरिकेतल्या दुसऱ्या लाटेतल्या स्त्रीवादाने पुढे वेगळं वळण घेतलं.

***

भाग २

***

चित्रस्रोत : जालावरून साभार

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

फारच अभ्यासपुर्ण लेख आहे,आवडला गेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

लेख वाचते आहे आणि आवडला आहे पण माहितीचा भडिमार असल्याने पुन्हा जरा सावकाशीने वाचायला हवा, सध्या फक्त पोच.
अवांतर : या अंकात ऐसीवरच्या व्यवस्थापकांचे आणि अनेक सदस्यांचेही सविस्तर लेखन असल्याने आनंंद वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खच्चून माहीती आहे.लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0