र. धों. कर्वे आणि 'वंडर वूमन'

र धों कर्वे

र. धों. कर्वे आणि 'वंडर वूमन'

- अनिरुद्ध गोपाळ कुलकर्णी

- मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद - नंदन

स्त्रीवादातून जन्मलेली 'वंडर वूमन'

मार्च २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस' या चित्रपटावर फारशा समीक्षकांनी आपली पसंतीची मोहोर उमटवली नसली, तरी त्यातल्या गॅल गदोत (Gal Gadot)च्या 'वंडर वूमन' ह्या भूमिकेचा मात्र त्यास अपवाद ठरावा.

गॅल गदोत

जगभर सर्वत्रच स्त्रीवादाला उतरती कळा लागली आहे, असा दावा काही जण करतात. परंतु, जेव्हा २०१६ सालच्या सुरुवातीला किम कार्डॅशियन आणि एमिली रॅटाकोव्स्की यांनी इंटरनेटवरील आपल्या न्यूड सेल्फीजना स्त्रीवादाचाच एक आविष्कार मानावा, असं विधान केलं; तेव्हा मात्र स्त्रीवादाला खरोखर उतरती कळा लागली आहे काय, असा विचार मनात आल्यावाचून राहिला नाही.

अर्थात, नेहमीच अशी परिस्थिती नव्हती.

'द सिक्रेट हिस्टरी ऑफ वंडर वूमन', २०१४, ह्या आपल्या ठाशीव प्रबंधात्मक पुस्तकात प्रा. जिल लेपोर म्हणतात :
"...वंडर वूमन ही निव्वळ बॅडअ‍ॅस बूट्स घालून मिरवणारी अमेझॉनियन राजकन्या नव्हे. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेल्या चळवळीपासून ते आजच्या कचाट्यात सापडलेल्या स्त्रीवादापर्यंतच्या घटनासाखळीतला ती एक महत्त्वाचा निसटलेला दुवा आहे. स्त्रीवादातूनच ती जन्मली आहे."

र. धों. कर्व्यांनी भारतात आधुनिक स्त्रीवादाचा पाया घातला :

भारतातल्या स्त्रीवादाच्या परंपरेचा मागोवा घेताना, र. धों. कर्व्यांचं (१८८२-१९५३) नाव सर्वप्रथम माझ्या मनात येतं. संततिनियमन, कुटुंबनियोजन आणि लैंगिक शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर झटून काम करणारे समाजसुधारक अशी कर्व्यांची प्रतिमा आपल्या मनात असली; तरी त्यांचं सर्वात महत्त्वाचं ध्येय हे लैंगिक बाबतींत, स्त्रियांना पुरुषांइतकीच मोकळीक मिळायला हवी, हे होतं. संततिनियमन हा त्याच उद्दिष्टाचा एक भाग होता.

शिवाय कर्वे विवेकवादीही होते. ते जणू गोपाळ गणेश आगरकर (१८५६ - १८९५) यांचाच वारसा सांगत असावेत, असे कलासमीक्षक, विचारवंत आणि महाविद्यालयीन शिक्षक होते.

स्त्रियांना लैंगिक बाबतीत स्वातंत्र्य मिळावं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम केल्याचा परिणाम कर्व्यांच्या संततिनियमनाच्या कामावर झाला, असं प्रसिद्ध समीक्षक कै. म. वा. धोंड म्हणतात. सरकार आणि सुशिक्षित समाजातला एक वर्ग - अशा दोन्ही ठिकाणांहून कर्व्यांना याची झळ पोचली. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला यामुळे वैयक्तिक स्तरावर फार भोगावं लागलं. धोंडांच्या मते, कर्व्यांनी संततिनियमनाच्या कार्यावर अधिक भर द्यायला हवा होता; समाजाने एक वेळ ते स्वीकारलं असतं, पण स्त्रियांना लैंगिक बाबतीत स्वातंत्र्य देण्यास तत्कालीन भारतीय समाज राजी नव्हता.'

"....विवाहसंस्थेची अनावश्यकता, स्वैरसमागमाची इष्टता, अप्राकृतिक संभोगाविषयी उदारता इत्यादी (र. धों.) कर्वे यांची मते आजही भारतीयांना मान्य होणे कठीण. मग ४०-५० वर्षांपूर्वी या मतांबद्दल त्यांची कुचेष्टा झाली, तर ते स्वाभाविकच म्हटले पाहिजे. कामशास्त्र, संततिनियमन व गुप्तरोगप्रतिबंध यांविषयीची माहिती कर्वे यांनी तत्कालीन समाजास दिली, हे त्यांचे कार्य मोठेच म्हटले पाहिजे; परंतु संततिनियमनाचा प्रचार त्यांनी ज्या भूमिकेवरून केला, ती कामस्वातंत्र्याची भूमिका त्यांच्या कार्याला मारकच ठरली." -- (म. वा. धोंड , ‘जाळ्यातील चंद्र: समीक्षालेखसंग्रह’, १९९४/१९९८)

कर्व्यांनी संततिनियमन आणि लैंगिक स्वातंत्र्य ह्या दोन गोष्टींची सांगड घालण्याचा कायम प्रयत्न केला. गुप्तरोग आणि अवांछित गर्भधारणा, या दोन गोष्टींमुळे मुख्यतः कुणाच्याही लैंगिक स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. त्यातही अशा नको असलेल्या गर्भधारणेचा जाच हा स्त्रियांनाच सोसावा लागतो. ती टाळण्यासाठी काही उपाय सापडला, तर स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं पाऊल असेल (अशी त्यांची विचारसरणी होती).

नकोशा गर्भधारणेने जखडलेली स्त्री


'नकोशा गर्भधारणेने जखडलेली स्त्री' - सँगर्स बर्थ कंट्रोल रिव्ह्यू, १९२३ (साभारः सॉसेंजर लायब्ररी, रॅडक्लिफ इन्स्टिट्यूट, हार्वर्ड विद्यापीठ)

आपल्या वाचकांशी, विशेषतः स्त्री-वाचकांशी, याबाबतीत संवाद साधण्यासाठी कर्व्यांनी 'शारदा' नावाची एक काल्पनिक व्यक्तिरेखा निर्माण केली आणि आपल्या 'समाजस्वास्थ्य' ह्या नियतकालिकात (१९२७-१९५३) 'शारदेचे पत्र' नावाचे सदर सुरू केले.


रधोंची शारदा समाजस्वास्थ्य


'समाजस्वास्थ्य'चा जानेवारी १९५१चा अंक.

कर्व्यांची 'वंडर वूमन' शारदा हीच तर नव्हे?

शारदा आपल्या लैंगिक स्वातंत्र्याचा केवळ जाहीर उच्चारच करत नाही, तर ती त्याचा पुरेपूर आनंद भोगते. विवाहबाह्य संबंधांनाही तीची आडकाठी नाही. एकाहून अधिक पुरुष तिला आवडले, तर द्रौपदीसारखं राहायचीही तिची तयारी आहे. घरी असताना संपूर्ण नग्नावस्थेत वावरणं तिला आवडतं. कुठल्या क्रांतीबिंतीची वाट न पाहता, स्त्रियांनी आपलं लैंगिक स्वातंत्र्य उपभोगावं, असं तिचं सांगणं आहे.

मारी स्टोप्स (१८८०-१९५८, इंग्लंड) आणि मार्गरेट सँगर (१८७९-१९६६, अमेरिका) या कर्व्यांना समकालीन असलेल्या समाजसुधारकांचं कार्यही याच दिशेने चालू होतं. य. दि. फडकेंच्या 'र. धों. कर्वे' या चरित्रात (प्रकाशनवर्ष १९८१) आणि म. वा. धोंड यांच्या 'जाळ्यातील चंद्र' या संग्रहात या दोघींचा उल्लेख आहे. धोंडांच्या मते, संततिनियमनावर निराळ्या दृष्टिकोनातून लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांच्या कार्याला अधिक यश लाभलं. ("पण त्यांनी संततिनियमनाचा पुरस्कार केला तो कामस्वातंत्र्याच्या भूमिकेवरून नव्हे, तर स्त्रीदास्यविमोचन व सुखी कुटुंबसंस्था या भूमिकांवरून.")

याच लेखात धोंड म्हणतात, "कर्व्यांनी आपल्या पुस्तकाचा प्रचार 'स्त्रियांच्या स्वातंत्र्याची गुरुकिल्ली' असा केला, तर सँगर यांच्या पुस्तकाचे शीर्षक 'कुटुंबाच्या मर्यादा' (Family Limitation) असे होते. शीर्षकांतला हा फरक त्यांच्या दृष्टिकोनांतील फरकाचा निदर्शक आहे."

दुर्दैवाने, मार्गरेट सँगरच्या बाबतीत धोंडांचं म्हणणं निखालस चुकीचं आहे.

मार्गरेट सँगर, एक वंडर वूमन :

प्रा. लेपोर म्हणतात :

"राजसत्ता किंवा धर्मसत्तेला न जुमानता मातृत्वाचा अधिकार अबाधित राखणं; आपल्या शरीरावर नियंत्रण असणं हाच स्त्रीवादाचा पाया आहे, असं सँगरचं मत होतं. १९१२ साली मार्गरेट सँगरने 'व्हॉट एव्हरी गर्ल शुड नो' नावाची १२ भागांची लेखमाला लिहिली. त्यात तिने सरळ शब्दांत लैंगिक आकर्षण, हस्तमैथुन, शरीरसंबंध, गुप्तरोग, गरोदरपण आणि मुलांचा जन्म अशा विषयांवर लिहिलं. मुक्त प्रेमावर तिचा विश्वास होता; विवाहबाह्य संबंधांसकट. लग्नसंस्था हे जोखड आहे, असं तिचं मत होतं. स्त्रियांना समानता आणि लैंगिक स्वातंत्र्य मिळणं, हाच मानवतेच्या प्रगतीचा मार्ग आहे यावर तिचा ठाम विश्वास होता. १९३०च्या दशकात, जागतिक स्तरावरच्या स्त्रीवादी चळवळीत तिचं नाव अग्रहक्काने घेतलं जात असे."

'आपल्या संस्कृतीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा त्याला जीवशास्त्रीय दृष्टिकोनाचा पाया असेल आणि मार्गरेट सँगर नि:संशयपणे त्याची नायिका असेल', असं भाकीत प्रसिद्ध लेखक एच. जी. वेल्स यांनी १९३५ साली वर्तवलं होतं. (मार्गरेट सँगरशी त्यांचं अनेक वर्षं प्रेमप्रकरण चालू होतं). कर्व्यांप्रमाणे सँगरलाही अनेकदा तत्कालीन न्यायव्यवस्थेशी दोन हात करावे लागले.

हे सारं वाचल्यानंतर, कर्व्यांचा स्त्रीमुक्तीबद्दलचा दृष्टिकोन सँगरहून फारसा निराळा नाही, असं मला वाटतं. सँगरनेही आपल्या ध्येयाबद्दल किंवा ते साध्य करण्याच्या साधनांबद्दल कधी बचावात्मक पवित्रा घेतलेला दिसत नाही. वास्तविक तिच्या (आणि तिचा प्रियकर, ब्रिटिश सेक्सॉलॉजिस्ट हॅलॉक एलिस याच्या) 'इरॉटिक राईट्स ऑफ विमेन' ह्या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन कर्व्यांचा आपल्या कार्यप्रणालीवरचा विश्वास अधिक दृढ झाला असावा.

सँगरने लंडनमध्ये जवाहरलाल नेहरूंची भेट घेतली, भारतात येऊन महात्मा गांधींशीही चर्चा केली. १९३७ साली 'टाईम' आणि 'द नेशन' या नियतकालिकांत ती झळकली आणि 'लाईफ'मध्ये चार पानी फोटोस्प्रेडसह तिची कहाणी प्रसिद्ध झाली.

विल्यम मोल्टन मार्स्टन (१८९३-१९४७) या कलाकाराने डिसेंबर १९४१ मध्ये 'वंडर वूमन' ह्या व्यक्तिरेखेची निर्मिती केली. ऑलिव्ह बर्न ही त्याची प्रेयसी. ऑलिव्हची आई एथल बर्न, ही मार्गरेट सँगरची बहीण. दोघी बहिणींनी मिळून अमेरिकेतलं पहिलं-वहिलं संततिनियमन क्लिनिक सुरू केलं होतं.

'फीमेल सुपरहीरो' व्यक्तिरेखा निर्माण करण्यामागची मार्स्टनची भूमिका अशी :

"मुलांच्या सुयोग्य वाढीसाठी अत्यावश्यक असणार्‍या, मातृसुलभ प्रेम आणि कोमलता ह्या गोष्टी पुरुष सुपरहिरोत अभावानेच आढळतात. कल्पना करा, की गरिबांना मदत करणारा एखादा सुपरमॅन हा तुमच्या मुलाचा आदर्श आहे. असं असलं तरी, त्याच्या व्यक्तिरेखेत प्रेमासारख्या शाश्वत आनंददायी गोष्टीची मात्र उणीव आहे. त्याने शक्तिमान असणं किंवा उदार असणं सहज खपून जातं; पण ह्या खास पुरुषी व्यवस्थेत कोमलहृदयी, प्रेमळ, मायाळू आणि मोहक असणं हे मात्र बायकी ठरवलं जातं. 'छ्या:, हा सारा बायकी मामला आहे. पोरगी कोणाला बनायचंय इथे?', असा शेरा एखादा बालवाचक सहज मारून जातो - आणि हीच खरी ग्यानबाची मेख आहे. स्त्रीची आदिबंधात्मक (archetype) प्रतिमा ही जोवर मुळमुळीत, दुर्बळ अशी आहे; तोवर मुलींनाही अशी 'पोरगी' बनण्यात रस नसेल. पर्यायाने, आदर्श स्त्रीच्या सहृदयता, शांतताप्रियता आणि कोमलता या गुणांतही त्यांना रस राहणार नाही. स्त्रियांची अनुकरणीय, खंबीर वैशिष्ट्यंही त्यांच्या दुर्बळतेमुळे झाकोळून जातील. यावर एक सहज सुचणारा उपाय म्हणजे, अशी स्त्री-व्यक्तिरेखा निर्माण करणं, जिच्यात सुपरमॅनच्या ताकदीसोबतच एका आदर्श आणि सुंदर स्त्रीची वैशिष्ट्यंही असतील."

प्रा. लेपोर पुढे म्हणतात : "१९३७ साली एका पत्रकार परिषदेत मार्स्टनने जगावर स्त्रियांचं राज्य येईल, असं भाकीत वर्तवलं होतं आणि मार्गरेट सँगरला (हेन्री फोर्डपाठोपाठ) मानवतेच्या दृष्टीने जगातली सर्वाधिक महत्त्वाची व्यक्ती म्हणून जाहीर केलं होतं. अशा मार्स्टनला आपण ही 'फीमेल सुपरहीरो'ची व्यक्तिरेखा कोणावर बेततोय, याची पूर्ण कल्पना होती."


मार्गारेट सँगर डायफ्रॅम


नीट पाहा - मार्गरेट सँगर ट्रॅम्पोलिनवरून नव्हे, तर एका गर्भनिरोधक डायफ्रॅमवरून उड्या मारतेय!
(कलाकारः डेव्हिड लव्हिन, १९७८)

१९२० साली प्रसिद्ध झालेल्या सँगरच्या 'वूमन अँड द न्यू रेस' (Woman and the New Race) या पुस्तकामागचा विचार, हाच 'वंडर वूमन'मागचं तत्त्वज्ञानही बनला.

अ‍ॅफ्रोडायटीचं सौंदर्य, अथिनाचं शहाणपण, हर्क्युलसची ताकद आणि मर्क्युरीचा वेग लेऊन, ती अमेरिकन स्त्रियांसाठी प्रेम आणि शहाणपण ह्या दोन अजरामर भेटी घेऊन येते. दुष्ट शत्रूंची कारस्थानं धुळीस मिळवून आणि सार्‍या संकटांना हसण्यावारी नेत; कपटीपणा, विध्वंस आणि मृत्यू यांच्याविरुद्धच्या सनातन लढाईत, वंडर वूमन अमेरिकन तारुण्याचं समर्थ नेतृत्व करते.

प्रेम हीच जगातली सर्वोच्च ताकद असल्याने स्त्रियांनी जगाचं नेतृत्व केलं पाहिजे, असं सँगर आणि मार्स्टन पतीपत्नींचं (हॉलवे ही विल्यम मार्स्टनची पत्नी) मत होतं.

सँगर आणि कर्व्यांची भेट केवळ एकदाच झाली असली (सँगरच्या निमंत्रणावरून, मुंबईत १९३५ च्या नोव्हेंबरमध्ये); तरी त्यातून काही भरीव निष्पन्न झालेलं दिसत नाही. कर्व्यांना 'वंडर वूमन'बद्दल कल्पना असेल का? असलीच, तर त्यांनी ह्या कॉमिकबद्दल सँगरशी चर्चा केली असेल का?


मार्गारेट सँगर निषेध


बॉस्टन शहरातल्या अधिकार्‍यांनी भाषणावर बंदी घातल्यावर, तोंडावर पट्टी बांधून मंचावर जायच्या तयारीत असलेली मार्गरेट सँगर; (फोर्ड हॉल, बॉस्टन, इ.स.१९२९. साभारः कॉर्बिस इमेजेस)


द फोर डूम्स


वंडर वूमन आणि तिची आई, मुसक्या बांधलेल्या स्थितीत.
('द फोर डूम्स', वंडर वूमन #३३ - फेब्रुवारी १९४९. साभार: द लायब्ररी ऑफ काँग्रेस, प्रिंट्स अँड फोटोग्राफ्स डिव्हिजन)

कर्व्यांचे विचार आजच्या समाजाच्या तरी पेलवतील का?

कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली असली; तरी मला वाटतं, आजमितीसही कर्व्यांचे विचार आणि दृष्टिकोन (विवाहसंस्थेची निरर्थकता, लैंगिक स्वातंत्र्य आणि हरतर्‍हेच्या लैंगिक क्रियांबद्दल मोकळीक) आपल्या समाजाच्या पचनी पडणार नाहीत.

समलैंगिकता हा अजूनही आपल्या नागरी समाजात आणि सरकारदरबारी उघडपणे बोलण्याचा विषय नाही. इंडियन पिनल कोडच्या सेक्शन ३७७ अन्वये, अद्यापही समलैंगिक संबंध हा गुन्हा मानला जातो.

हस्तमैथुनाबद्दल एकही खुली चर्चा माझ्या पाहण्यात आलेली नाही. एरवी मराठी वृत्तपत्रं जगभरातल्या तर्‍हेतर्‍हेच्या बातम्या छापण्यासाठी आतुर असतात; पण 'द इंडिपेंडंट' ह्या ब्रिटिश वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या ह्या रिपोर्टबद्दल (बातमीचा दुवा, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ रोजी) मला अवाक्षरही आढळलं नाही. तो रिपोर्ट म्हणतो : "हस्तमैथुनाचे अनेक फायदे आहेत. वैज्ञानिकांच्या मते, यामुळे तुमची प्रजननक्षमता, रोगप्रतिकारक्षमता आणि आनंदी वृत्ती वाढू शकते."

२०१६ साली, गुरुत्वीय लहरींबद्दल मराठी वृत्तपत्रांनी पानंच्या पानं छापली. अशा 'महत्त्वाच्या' शोधाबद्दल किंवा एकंदरीतच वैज्ञानिकांबद्दल, मराठी वृत्तपत्रांचा उत्साह दुथडी भरून वाहत असतो. मात्र जीवाश्म आणि उत्क्रांतीचा अभ्यास करणारे, विज्ञानाचा इतिहास लोकांसमोर मांडणारे प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ प्रा. स्टीव्हन जे गोल्ड यांच्या 'मेल निपल्स अँड क्लिटरल रिपल्स' ह्या निबंधांसारखं ('बुली फॉर ब्राँटोसॉरसः रिफ्लेक्शन्स इन नॅचरल हिस्ट्री' ह्या पुस्तकातून, प्रकाशनवर्ष १९९१) काहीही माझ्या वाचनात आलेलं नाही.

या लेखात ते म्हणतात :

"...(अल्फ्रेड) किन्सीने आपल्या खास नेमक्या आणि फटकळ शैलीत म्हटल्याप्रमाणे : "ऑरगॅझम मिळवण्याच्या दृष्टीने, हस्तमैथुनाचं आणि आंजार-गोंजारण्याचं (petting) तंत्र हे अगदी संभोगाच्या तंत्रापेक्षाही अधिक विकसित झालेलं आहे."

...शरीररचनाशास्त्र (अ‍ॅनॉटमी), शरीरशास्त्र (फिजिऑलॉजी) आणि प्रत्यक्ष निरीक्षणं यांचं याबाबतीत एकमत आहे. असं असताना, याबाबतीत नेमका प्रश्न कुठे उद्भवतो? विशेषतः योनिलिंगाचाही (क्लिटरस) ऑरगॅझम असतो, हे मान्य करण्यात काय अडचण आहे? उदाहरणार्थ, फ्रॉईडने ह्या क्लिटरल ऑरगॅझमला बालिश का म्हणावं आणि स्त्रियांच्या परिपक्वतेचं परिमाण हे अप्राप्य अशा योनीच्या संदर्भात का ठरवावं?

पुरुषी अहंकार हे अर्थातच, यामागचं एक कारण झालं. स्त्रियांचं संभोगसुख हे पूर्णतः तुमच्या समागमक्षमतेवर अवलंबून नाही हे आपल्याला, म्हणजे एकंदरीतच पुरुषजातीला, मान्य करणं अजिबात जमत नाही - त्याला उघडउघड जीवशास्त्रीय आधार असला तरीही."

शिवाय, एका सर्वेक्षणाबाबत 'द इंडिपेंडंट'मधल्याच एका बातमीचा (१९ डिसेंबर २०१५ रोजी) उल्लेखही कुठे सापडत नाही. (बातमीचा दुवा)

त्या बातमीत म्हटलंय :
"स्त्रियांच्या दृष्टीने, ऑरगॅझम मिळवण्यासाठी हस्तमैथुन हेच सर्वात हमखास साधन आहे. एरवी, रोमँटिक म्हणून फ्रेंचांची जगभर कितीही ख्याती असली, तरी समागमाच्या वेळी ऑरगॅझमची खोटी बतावणी करण्यामध्ये फ्रेंच महिला आघाडीवर आहेत. फ्रान्स, अमेरिका, स्पेन, युनायटेड किंग्डम, इटली, कॅनडा, नेदरलँड्स आणि जर्मनी या देशांत घेतलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं; की जोडीदारासोबत समागम करताना फ्रेंच महिलांना तो परमोच्च बिंदू गाठताना सर्वाधिक अडचणी येतात. योनिप्रवेशामुळे सामान्यतः स्त्रियांना ऑरगॅझम मिळत नसला; तरी अद्यापही परंपरेच्या पगड्यामुळे, तीच पद्धत संभोगात आचरली जात असल्याने असं होतं असावं; असं तज्ज्ञांचं मत आहे."

मला खात्री आहे; 'समाजस्वास्थ्य' मासिकातल्या शारदेस या सर्वेक्षणांबद्दल, आपल्या पत्रांतून नक्कीच भरभरून लिहावंसं वाटलं असतं!

***

चित्रस्रोत : जालावरून साभार

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण लेख, पण थोडा विस्कळित वाटला.

'जाळ्यातील चंद्र'मध्ये धोंडांनी र. धों. कर्व्यांची स्त्रीमुक्तीची कल्पना अधिक व्यापक होती हे म्हटलेलं आहे. स्त्रीला पुरुषाइतकंच लैंगिक स्वातंत्र्य असावं हा विचार त्यांनी मांडला. तो अजूनही भारतात स्वीकारला जाणं कठीण आहे. याउलट सॅंगर्सने अधिक चतुरपणे कुटुंबनियोजन नवऱ्यांच्या फायद्याचं आहे असा संदेश दिला. याचा लेखात उल्लेख आलेला आहे. मात्र सॅंगर्सला प्रचंड प्रसिद्धी मिळाली कारण ती पाश्चिमात्य संस्कृतीतली, श्रीमंत व स्त्री होती. याउलट र. धों. काळाच्या आणि जगाच्या पुढे असले तरी ते भारतासारख्या समाजात होते.

हे सारं वाचल्यानंतर, कर्व्यांचा स्त्रीमुक्तीबद्दलचा दृष्टिकोन सँगरहून फारसा निराळा नाही, असं मला वाटतं.

हे सार विशेष पटलं नाही. दिशा एकच होती हे ठीक आहे, पण रधोंच्या डोळ्यासमोरचं क्षितिज जास्त व्यापक होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

When it comes women's freedom, the objectives of Margaret Sanger and Karve were no different....in fact, Karve was almost following Sanger given all his constraints....but if one considers the other hats Karve was wearing such as a rationalist/ skeptic, "रधोंच्या डोळ्यासमोरचं क्षितिज जास्त व्यापक होतं." maybe true

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखकाच्या ब्लॉगवरच्या लेखांप्रमाणेच हा लेखही - एकमेवाद्वितीय!
इतकी माहिती एखाद्या विचाराच्या अनुषंगाने मिळवणे आणि तिच्या अधारे तो विशिष्ट विचार प्रभावीपणे पोचवणे हे लेखक गेली १० वर्षे तरी करत आला आहे. त्याच मालिकेतला हा लेख या विशेषांकात शोभून दिसतो.
वंडर वूमन ते सँगर ते रधों यांच्यातला स्त्रीवादी थेट संबंध त्यांनी स्पष्टपणे मांडला आहे. आणि त्याबरोबरच स्त्रीवादाच्या 'व्याखेच्या' अधोगतीकडेही ते लक्ष वेधतात.
स्त्रीने आपले शरीर कसे वापरावे? हा सर्वस्वी तिचाच निर्णय असावा हे नवस्त्रीवाद्यांचे म्हणणे 'मिठाच्या चिमटीबरोबरच' घ्यावे लागते. स्त्रीदेहाचे व्यावसायिक प्रदर्शन आणि त्याचा 'उपभोग देण्यासाठी' वापर करून मिळवलेली समृद्धी हे या नवस्त्रीवादात योग्य समजले जात असेल ते रधों-सँगर प्रभृतींच्या प्रयत्नांना हरताळ फासण्यासारखे आहे. हा नवस्त्रीवाद एकप्रकारे पुरुषप्रधान संस्कृतीचा विजयच म्हणावा लागेल. असो.

लेखाच्या विस्कळीतपणाविषयी थोडेसे - अनिरुद्ध गोपाळदत्त कुलकर्णी यांच्या ब्लॉगवरचे लेखही असेच विस्कळीत वाटतात. याला दोन कारणे असावीत- एकतर हे लेख एकाचवेळी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत असतात. आणि दुसरे असे की या नोंदी वाचताना वाचकाने स्वतःचा विचार केला पाहिजे अशीही त्यामागे भूमिका असावी. त्यामुळे ते सगळेच ससूत्रपणे चमच्याने भरवत नसावेत.

दाताखाली कुठेही खडा न लागू देणारे भाषांतरकार नंदन यांचेही कौतुक आहे.
("...शरीररचनाशास्त्र (अ‍ॅनॉटमी), शरीरशास्त्र - या प्रा. स्टीव्हन जे गोल्ड अवतरणाचा शेवट कुठे आहे ते समजत नाही. शेवटाचे अवतरण चिन्ह द्यावे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसुनानांशी पूर्ण सहमती!
आतापर्यंत प्रकाशित झालेल्या लेखांमधील मला व्यक्तिशः सर्वात आवडलेला लेख!

लेखातील माहिती, घाट, सगळी माहिती न देता बरंच काही सांगणं आणि विचाराला उद्युक्त करणं, तटस्थ मिमांसा, चिकित्सा, दूरदूर वाटणरे धागे शेजारे ठेवून त्यांतील साधर्म्य नि भेद दाखवून वाचकाला वेगळाच आनंद देणं सगळं काही या लेखात आहे!

जियो अनिरुद्ध!

आणि हो! अनुवाद शत प्रतिशत निर्मळ आहे! सगळंच कसं जमून आलंय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Thank you Visunana and Hrishikesh...Your words move me....I am also grateful because you defend my incoherence!

I just wrote to Meghana, Nandan has done a very good job of translation...I was wondering how "‘Male Nipples and Clitoral Ripples" would enter Marathi but they have!

Stephen Jay Gould, 'Male Nipples and Clitoral Ripples’ from ‘Bully for Brontosaurus: Reflections in Natural History’, 1991:

“...As (Alfred) Kinsey had said earlier with his characteristic economy and candor: “The techniques of masturbation and of petting are more specifically calculated to effect orgasm than the techniques of coitus itself.”...
...Anatomy, physiology, and observed responses all agree. Why then do we identify an issue at all? Why, in particular, does the existence of clitoral orgasm seem so problematic? Why, for example, did Freud label clitoral orgasm as infantile and define feminine maturity as the shifting to an unattainable vaginal site?
Part of the reason, of course, must reside in simple male vanity. We (and I mean those of my sex, not the vague editorial pronoun) simply cannot abide the idea—though it flows from obvious biology—that a woman’s sexual pleasure might not arise most reliably as a direct result of our own coital efforts...”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख आवडला. स्पेशली वंडर वुमन च्या ओरिजिनबद्दल माहीतीच नव्हती.
____
"मेल निपल्स ...." निबंध चाळला. रोचक आहे. निबंधात अनेक रोचक मुद्दे आहेत त्यातील २ पुढीलप्रमाणे -

पुरुषांना स्तनाग्रे का असतात?
- फक्त २ शक्यता सुचतात. मनुष्याची उत्क्रांती hermaphrodite जीवापासून झालेली असू शकते किंवा मग काही पुरुषांना दूध येत असेल.
.
नीरीक्षण - पुरुषांना कामक्रीडेमध्ये सर्वोच्च आनंद विर्यापतनाचे वेळी होतो अर्थात अपत्यानिर्मीतीच्या शक्यतेशी आनंदाचे मूळ अतिशय घट्ट निगडीत असते. पण स्त्रियांचा या क्रियेतील सर्वोच्च आनंद हा पुरुषाच्या वीर्यापतनावर = अपत्यप्राप्तीच्या संभवतेवरती, अवलंबून नसतो निदान निगडीत नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<पण स्त्रियांचा या क्रियेतील सर्वोच्च आनंद हा पुरुषाच्या वीर्यापतनावर = अपत्यप्राप्तीच्या संभवतेवरती, अवलंबून नसतो निदान निगडीत नसतो.>...absolutely शुचि.....I feel this knowledge is critical for a happy sexual long-term relationship and is not largely known to men....many women often fake orgasm to make 'their' men happy by making weird sounds!

and another critical thing is: Sure way for women to get orgasm is clitoral and NOT vaginal....I did not know it until I was 50!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sure way for women to get orgasm is clitoral and NOT vaginal....I did not know it until I was 50!

हे स्त्रिया सांगतही नाहीत कारण वर दिलेलेच. पुरुषांचा अहंकार जपण्यासाठी. त्यांच्या समागमक्षमतेवरती स्त्रियांचे सुख अवलंबुन नसते. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण आणि का बांधावी? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण आणि का बांधावी? (स्माईल)>....I agree totally...

btw- your byline is intriguing 'शीतल देखण्या नभोदीपालाही जिथे एक दिवसाच्या पूर्णत्वाचे वरदान आहे तिथे १४ दिवसांचा क्षयही आहे.'...This is reminiscent of GA's Grecian allegory...where does this appear?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

थँक्स अनुरुद्ध जी. हे वाक्य मी लिहीले आहे कारण सध्या mourning some bereavement

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This construct will not leave me for a while...is this from a poem/story/play or a stand-alone? It's about moon and its eventual decay in 14 days but the way words have come together to achieve the effect of darkness...it reached me....sure you are mourning...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

अनिरुद्धजी हे स्टँड अलोन वाक्य आहे Smile
____

it reached me....sure you are mourning...

अगदी खरं सांगायचं तर हा जो सो कॉल्ड शोक करते आहे (सांगणार नाही कसला), त्याला सुखासुखी दुखणे म्हणतात Smile हाहाहा. पण कविमन असल्याने परत तेच - sucker of sorrow! जरा खरचटलं की तलवारीने जखम झालीये अशा अविर्भावात शोक करायचा ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<सुखासुखी दुखणे>?

Isn't every sadness like this? As Mardhekar said:

पंक्चरली जरि रात्र दिव्यांनीं,
तरी पंपतो कुणी काळोख;
हसण्याचें जरि वेड लागलें,
भुंकतात तरि अश्रू चोख.

and therefore never send to know for whom the bell tolls...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

शुचि - अर्जुन पूर्ण पुरुष होता ना म्हणे. मग त्यालाच का बाईचा रोल करायला निवडला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीतरी कहाणी आहे शापाची. आठवत नाही. शोधून सांगते.
______
Once Arjuna was invited to the palace of Indra, his father. Urvashi, one of the heavenly maidens at Indra’s palace was strongly attracted to Arjuna. Indra also noted that his son was also bewitched by Urvashi’s beauty. So Indra took it upon himself to offer Urvashi to Arjuna.

Having received Indra’s instructions, Urvashi reached Arjuna’s room one night. But Arjuna did not have any intentions of making love to Urvashi. Instead he called her the “mother” of the Kuru race. Because once Urvashi was the wife of king pururavas the ancestor of Kuru Dynasty. Urvashi felt insulted, now that a mere mortal was able to resist her. She cursed him that Arjuna will be a eunuch for the rest of his life, who could only sing and dance with other women. Later on Indra’s request, Urvashi curtailed the curse to a period of one year, which would be the thirteenth year of the Pandavas’ exile.[2]
_____
गंमत -

https://lh3.googleusercontent.com/-SJLcB-_Olpo/Tx04-lcn1gI/AAAAAAAAD-s/7a0liPkUWmY/s0/A%252520woman%252520never%252520forgets%252520the%252520men%252520she%252520could%252520have%252520had%25253B%252520a%252520man%252520%252520the%252520women%252520he%252520couldn%252527t.jpg

इथे उलटं झालेलं दिसतय, उर्वशी अप्राप्य पुरुषाला विसरु शकलेली नाही. साहजिक अहे रुपाचा गर्व असेल Wink
पण ज्याला पांचालीने वरले त्याला रंभा/अप्सरांची काय किंमत?
१- Not to say that रंभा/अप्सरा/उर्वशी were inadequate in some way. Just that द्रौपदी must be fire (आदिमाय द्रोपदी - अरुणा ढेरे (लोकसत्ता)). आणि त्यात अर्जुनाचं सॉर्ट ऑफ लव्ह मॅरेज. म्हणजे निदान पक्षी त्याच्या बाजूने तरी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख चांगला आणि माहितीपूर्ण आहे पण मलाही किंचित विस्कळीत वाटला. पण दोन पूर्णतः वेगवेगळ्या प्रतलांमधल्या व्यक्तींच्या कार्यातले साधर्म्य आणि त्यावर अजूनच वेगळ्या प्रतलांमधल्या दिग्गजांची मते वगैरेबद्दल एका लेखातून सांगायचे असेल तर असा विस्कळीतपणा येणे स्वाभाविक वाटते कारण अनेकदा वाचकांना एखाद्या गोष्टीची मुळातून कल्पना देणे अगत्याचे असते. अनुवादही झकास झाला आहे, सिध्दहस्त नंदनचे हात त्याला लागल्यावर ते अपेक्षित होतंच म्हणा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Thanks for your understanding...Rishikesh, Visunana and you have probably completed the picture...

just to add my two-bit, I go for the brevity even if I know while writing that I am getting complex...also majority of posts on my blog are NOT like this....they are just single thread narrative...this one, as you rightly describe, happened on three planes....

....but I love writing such things as I imagine all of them- Karve, Sanger, Lepore, Dhond...- in one room with me!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुची आणि ऋषिकेशशी सहमती. दोन पूर्णत: निरनिराळ्या क्षेत्रांमधल्या गोष्टी शेजारी ठेवून पाहताना असा विस्कळीतपणा येणारच. तो काही दोष नव्हे. ती आशयाची मागणीच आहे. मला रधोंच्या लेखनाची कल्पना होती, पण त्यांचा हा आंतरराष्ट्रीय रेलेवन्स (नंदन, एफ वन!) मला ठाऊक नव्हता. त्याबद्दल मी बाकी कुठेही काहीही वाचलेलं नाही.

त्यामुळे लेख भारीच. पण या अंकात कुलकर्णींनी अजून लिहायला हवं होतं. ते त्यांच्याकडून मिळवण्यात आम्ही कमी पडलो. नुकसान त्यांचं नाही, अंकाचं झालं. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Thanks Meghana. I don't think the issue suffered at all. Indeed, I learned so much and from so many.

It is a matter of delight that there is so much multi-faceted young talent writing in Marathi. I am little dazed. However, as I told you they need to read/view a lot more, both English and Marathi. If they don't, they are in danger of stagnation and shallowness. At best, we will stand on shoulders of the giants. (Kolatkar reads Mardhekar++ who reads Samarth Ramdas++, Ramdas reads Eknath++....GA reads much more than he writes)....Otherwise it is all just time-pass and about which I am perfectly OK.

Although they may get rejected, I feel, at least 25% entries on my blog, qualify to reach editors of this issue!

Three recent examples- the post dated May 30: "राणीला गरज राजाची...Dinanath Dalal@100", the post dated June 5 "Lolita and Hurricane: Butterfly (Genitalia) Effect!" and a post that is coming up "जी ए कुलकर्णी: हत्तिणीचे चित्र काढताना जेन रसेलचे चित्र निघणे हा लेखकाचा पराभव आहे"

Thanks again for encouragement and opportunity.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."