घटित समकालीन तर जाणीवही समकालीन - कथालेखक सतीश तांबे यांच्याशी संवाद

नव्वदोत्तरी मुलाखत संवाद

घटित समकालीन तर जाणीवही समकालीन

लेखक - सतीश तांबे


नव्वदोत्तर काळ आणि समकालीनता अधिक समजून घेण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या काही व्यक्तींसाठी आम्ही एक प्रश्नावली तयार केली होती. त्यांच्याशी बोली किंवा लेखी संवाद साधून त्या प्रश्नावलीची त्यांनी दिलेली उत्तरं आम्ही अंकासाठी संकलित केली आहेत.


सतीश तांबे मराठीतले आघाडीचे समकालीन कथालेखक आहेत. त्याशिवाय 'आजचा चार्वाक' आणि 'अबब हत्ती' ह्या नियतकालिकांचे ते संपादक होते.

'समकालीन' असं काही असतं का? तुमच्या मते कशाला समकालीन म्हणता यावं?

नीटसा कळला नाही हा पहिलाच प्रश्न आणि जरा भीतीच वाटली की पुढचे प्रश्नदेखील असेच चकवणारे नसतील ना? असो. कारण असं की काळाच्या ओघात मानवी जीवनात सतत फरक होत असतात, तेव्हा समकालीन असं काहीतरी असणं हे ओघानंच येतं ना. अर्थात ह्या समकालीनामध्ये काही गोष्टी ह्या गतकालीन म्हणजे पारंपरिक, तर काही काळाच्या पुढच्या, तर काही सार्वकालिक/त्रिकालाबाधित अशा असतात. थोडक्यात समकालीनांमध्ये सर्व काळांतील गोष्टींची सरमिसळ असते. त्यामुळे निखळ 'समकालीन' म्हणजे नव्यानं अवतरलेलं आणि रुळलेलं जे काही असेल ते! सर्वच समकालीन हे पुढच्या काळात पोहोचतंच असं नाही. पण त्या-त्या काळात मात्र ते तळपूदेखील शकतं. जसं की, फॅशन्स. अलबत, समकालीन असं काहीतरी असतंच असतं.

पुढची प्रश्नावली वाचल्यावर अंदाज आला की हा परीक्षेचा पेपर कलाव्यवहाराशी निगडित आहे. आता कलाव्यवहार हा मानवी जीवनाशी म्हणजे पर्यायानं समाज जीवनाशी निगडित असतो. आणि समाज म्हणजे काय तर कुटुंबांचा समूह, कुटुंब म्हणजे काय तर व्यक्तींचा समूह. तर सुरुवात व्यक्तीपासून म्हणजे थेट स्वतःपासूनच करू या. आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात जो फरक पडला आहे, त्यामध्ये आपल्यासोबत सतत काहीतरी काळाशी निगडित असं आहेच ना. तर तेच समकालीन. साहित्याच्या तुलनेत चित्रपट हे जास्त पाहिले जातात. किंबहुना चित्रपटांच्याएवढी लोकांपर्यंत पोहोचणारी कला अन्य कोणतीही नसावी. तर आयुष्यात जाणवणारे फरक आपण सगळेच जण चित्रपटांमध्ये अनुभवत असतो. त्यात भले इच्छा-आकांक्षा असतील, पण त्या समकालीनच असतात. तर आपल्या रोजच्या जगण्याशी जे घट्ट बिलगलेलं असतं ते सर्व समकालीन असतं. तेव्हा जे आधुनिक काळातील जीवनाची दखल घेतं ते सर्व समकालीन.

'नव्वदोत्तरी वास्तव किंवा संवेदना आधीच्या वास्तवाहून किंवा संवेदनांहून वेगळ्या होत्या का? त्यात जर वेगळेपणा होता तर तो कशा प्रकारचा होता? एखादी कलाकृती समोर आल्यावर ती 'नव्वदोत्तरी' आहे, हे ठरवायला ह्या वेगळेपणाचा कसा उपयोग होऊ शकेल?

समकालीनवरून थेट 'नव्वदोत्तरी' वर उडी मारली हे फारच छान आणि खरं तर सोयीचं झालं. कारण त्यामुळे निदान मी तरी थेट मराठी साहित्याच्या क्षेत्रात बागडायला मोकळा झालो. 'नव्वदोत्तरी' काय किंवा त्याआधीची 'साठोत्तरी' काय ह्या संज्ञांनी मराठी साहित्यात शिरकाव केला तो कवितांच्या आडोशानं. कविता हा असा साहित्यप्रकार आहे की ज्याला तुलनेत कमी जागा लागते. साहजिकच नवीन प्रयोगांचं सोयीस्कर व्यासपीठ असलेल्या वाङ्‌मयीन नियतकालिकांमध्ये अग्रक्रम मिळतो, तो कविता ह्याच साहित्यप्रकाराला. त्यामुळे साहित्याच्या क्षेत्रातील नवीन जाणिवा, संवेदना ह्या कवितेच्या माध्यमातून मांडल्या जात असतात. 'नव्वदोत्तरी’ ही संज्ञा कुणी व नेमकी कधी आणली त्याचा मला तरी थांग लागलेला नाही. पण माझा कयास असा आहे की 'सत्यकथा' ह्या कवितेच्या प्रस्थापित व्यासपीठावर आपल्या कवितेला स्थान मिळणार नाही आणि त्यासाठी आपण नवीन व्यासपीठं उदयाला आणणं ही काळाची गरज आहे हे जाणवल्यावर, तेव्हा रूढ असलेल्या बिरुदापासून - मर्ढेकर, पु. शि. रेगे, मुक्तिबोध, विं. दा. करंदीकर आदि कवी जिचे अग्रणी होते त्या 'नवकविता’ ज्या बिरुदापासून - फारकत घेण्यासाठी जशी 'साठोत्तरी’ ही नवी वर्गवारी उदयाला आणण्यात आली, त्याप्रमाणेच 'नव्वदोत्तरी' ही आणखी एक वर्गवारी उदायाला आणण्यात आली. जसं मॉडर्न होतं म्हणून 'पोस्टमॉडर्न’ साहित्य उदयाला आलं, तद्वतच 'साठोत्तरी’ होतं, म्हणून 'नव्वदोत्तरी' जन्माला आलं, ते तशा अर्थानं 'पोस्ट साठोत्तरी’च आहे.

ही संज्ञा मराठी साहित्यामध्ये रुजवण्याचं व्यावहारिक कारण असं होतं की आपण 'साठोत्तरी'पेक्षा वेगळी कविता लिहितो आहोत, हे अधोरेखित करणं त्याशिवाय शक्य नव्हतं. थोडक्यात काय, तर कविता प्रकाशित करण्याच्या हक्काच्या व्यासपीठांच्या अभावातून ह्या वर्गवारी जन्माला आल्या आहेत. त्यांची लक्षणं, निकष हे नंतर हुडकण्यात/ठरवण्यात आले. मात्र ते तसे ओढूनताणून नव्हते. तर काळाच्या ओघात जाणिवा/संवेदना ह्यांच्यामध्ये असे ठळक/लक्षणीय फरक होतच असतात.

साठोत्तरी आणि नव्वदोत्तरी ह्यांच्यात महत्त्वाचा वेगळेपणा हा होता की साठोत्तरी कवितेचे म्होरक्ये म्हणता येतील असे चित्र, ढसाळ, कोलटकर, मनोहर ओक, तुलसी परब, वसंत गुर्जर वगैरे कवी हे महानगरीय, खरंतर मुंबईचे होते. त्याच काळात ग्रेस, ना. धों. महानोर वगैरे कवींच्या कवितादेखील वाचकप्रिय होत होत्या. तरी 'साठोत्तरी' हे बिरुद त्यांना तितकंसं लावण्यात आलेलं दिसत नाही. 'साठोत्तरी कविते’चे आणखी एक महत्त्वाचे कवी भालचंद्र नेमाडे जरी संवेदनशील, प्रयोगशील कवी म्हणून मान्यताप्राप्त असले; तरी त्यांचा कल गद्यलेखनाकडे अधिक होता आणि 'साठोत्तरी' जाणीव म्हणून बस्तान बसवण्याच्या जाणिवेसाठी गद्यलेखनाचा अभिप्रेत नमुना म्हणून नेमाडे ह्यांच्यासारख्या क्षमतेचा हुकमी एक्का कुणीही नव्हता. परिणामी 'साठोत्तरी’ कवितेची सूत्रं महानगरी कवींकडे राहिली. मात्र कवितेच्या तुलनेत 'कोसला’ ह्या नेमाडे ह्यांच्या कादंबरीनं मराठी साहित्याचं अवघं विश्व कवेत घेतल्यासारखं झालं होतं आणि महानगरीय वातावरणात साहित्यनिर्मिती करायचा आत्मविश्वास त्यामुळे उतरणीला लागला. उलट, पांडुरंग सांगवीकरच्या ग्रामीण पार्श्वभूमीमुळे ग्रामीण भागातील मुलांचे हात लिहिण्यासाठी अधिक शिवशिवू लागले. आपल्या वाट्याला आलेल्या जीवनातून अस्सल आणि अव्वल साहित्यकृती निपजू शकते हा आत्मविश्वास त्यांना 'कोसला’नं दिला. ह्यातून स्वतःला 'नव्वदोत्तरी’ हे अभिधान योजलेली कवींची पिढी उदयाला आली.

'पांडुरंग सांगवीकर’ हे कादंबरीतील पात्र ज्याप्रमाणे गावातून शहरात आल्यावर जाणवलेल्या बदलातून समष्टीकडे, जगरहाटीकडे पाहू लागते, तद्वतच ही पिढी गावातून शहरांमध्ये स्थलांतरित झाल्यामुळे पाहू लागली होती. हे सगळे जणू जितेजागते सांगवीकरच होते. मात्र शहरं/महानगरं इथे पुढील वाटचाल करताना 'पांडुरंगाचे अवतार’ हा शिक्का त्यांना सोयीचा नव्हता. पांडुरंग शेवटी गावाकडे परतला होता. पांडुरंगाच्या अवतारात शहरं/महानगरं कायमची आपलीशी करायची होती. ती काळाची गरज होती. त्यामुळे त्यांनी पांडुरंगाचे जनक नेमाडे ह्यांच्यापासून आणि परिणामी त्यांच्या पिढीपासून फारकत घेऊन आपला सवतासुभा मांडला, ज्यातून 'न‌व्वदोत्तरी’ ही संज्ञा उदयाला आली. ह्यांच्यामध्ये महानगरी कवींचे प्रमाण साठोत्तरीच्या तुलनेत खूप कमी होते आणि सारी सूत्रं ही पांडुरंगाच्या फौजेच्या हाती गेली.

हे वेगळेपण त्यांच्या मानसिकतेतील - ह्या मुलाखतीच्या अनुषंगानं - 'संवेदने’तील म्हणूया - बदलातून जाणवणारे होते. तसं पाहिलं तर साठोत्तरी काय किंवा नव्वदोत्तरी काय, ह्या दोन्हीही वर्गवारी गावं आणि शहरं ह्यांच्यातील संबंधांच्या, संघर्षाच्या होत्या. गावं म्हणजे सुविधावंचित आणि शहरं म्हणजे सुविधासंपन्न अशा अर्थानं घेतलं तर तळागाळातील जनता आणि उच्चभ्रू जनता ह्यांच्यातील सरमिसळीच्यादेखील होत्या. मात्र ३० वर्षांच्या वाटचालीमध्ये गावं आणि शहरं ह्या दोघांच्या स्थितीमध्ये खूप फरक पडले होते. नव्वदनंतर जागतिकीकरण हातपाय पसरू लागलं होतं, ज्याचे परिणाम न केवळ महानगरं, तर थेट गावांपर्यंत पोहोचू लागलं होतं. त्यासाठी माध्यमांची वाहनंदेखील दिमतीला जय्यत तयार होतीच. गावातल्या जागरुक, नवीन पिढीला आपण जगाचे नागरिक आहोत ह्याचं भान वाढत होतं. अर्थात ह्याची प्रतिक्रिया त्यांच्या व्यवहारात उमटणंदेखील साहजिकच होतं. त्यामुळे परंपरेलादेखील नव्यानं खतपाणी देण्याची प्रवृत्तीही ह्या काळात थेट महानगरंच काय, एनआरआय लोकांमध्येदेखील उफाळून आलेली दिसते. पण हे परंपराप्रियतेला आलेलं प्रतिक्रियात्मक उधाण आणि आपण जागतिक नागरिक होणार असल्याचं नव्यानं आलेलं भान ह्या दोन्ही गोष्टी साठोत्तरीपेक्षा वेगळ्या दिशेच्या नसल्या तरी वेगळ्या पातळीवरच्या होत्या. साहित्यादी कलांमध्ये त्याचे पडसाद उमटलेले दिसतात. 'नमस्ते लंडन’ ते 'दबंग’, 'फिर भी दिल है हिंदुस्तानी’ असे अनेक चित्रपट ह्याची साक्ष देतील. (ही यादी आणखी नेमकी व लांबदेखील करता येईल पण मला ज्या विषयाची तितकीशी माहिती नाही.) तर मुद्दा काय की 'नव्वदोत्तरी’ जाणीव ही आधीच्या कालखंडापेक्षा निश्चितच वेगळी आणि अधिक भांबावून टाकणारी होती. कवितेमध्ये त्याचे पडसाद स्पष्टपणे जाणवतात. ह्या कवितेला बऱ्याचदा 'याद्यांची/विधानांची’ कविता म्हणून हिणवलं गेलं. ते एका अर्थी खरंदेखील होतं. पण झालेला बदल टिपण्यातच काव्य होतं. वातावरणातील हे परिवर्तन हे कलाकृतींचं वेगळेपण ठरवण्यासाठी पुरेसं होतं.

ही नवी संवेदना आणि वास्तव व्यक्त करण्यासाठी आधीची रुळलेली भाषा कमी पडली का? पडली असेल तर काही उदाहरणांनी ते स्पष्ट करता येईल का?

'संवेदना’ हा शब्द समोर आला की मला काहीसं बावचळायला होतं. कारण अनेक जाणकारांना विचारूनदेखील त्याचा नेमका अर्थ काही माझ्या टाळक्यात स्थिरावत नाही. मराठी तर sensitivity आणि sensibility ह्यांची गल्लत सरसकटपणे केली जाताना दिसते. संवेदना म्हणजे senses असा एक अर्थ घेता येईल. तर त्यासाठी 'जाणिवा’ हा शब्द मला माझ्या उत्तरासाठी अधिक अर्थवाही वाटतो. तर माझी अडचण समजून घेऊन पुढचं उत्तर वाचाल अशी अपेक्षा. हां, तर भाषा कमी पडली का? असा प्रश्न आहे. आता त्याचं उत्तर शोधताना डोक्यात प्रश्न असा उमटतो की भाषा म्हणजे शब्दसंपत्ती/शब्दकळा का? की भाषिक रचना? नेमकं काय म्हणता येईल? तर मला वाटतं 'अभिव्यक्ती’ असा अर्थ जास्त सुसंगत ठरेल.

मुळात भाषा काही शुद्धलेखनाच्या नियमांसारखी एका रात्रीत फतवा काढून बदलत नसते. तर काळाच्या ओघात ती नवीन वातावरणाला अनुसरून भावभावना, वस्तू-गोष्टी-पदार्थ, प्रक्रिया, घटितं ह्यांच्या अनुषंगानं बदलत असते. अगदी साधं रोजच्या व्यवहारातलं उदाहरण घ्यायचं तर 'शेअर करणे’ हा शब्दप्रयोग आपण गेली अनेक वर्षं अगदी सर्रास वापरत असतो. त्याच्या आधीदेखील माणसं एकमेकांना सुखदुःख सांगायचीच ना? अनुभवाचे बोल ऐकवायची. पण ती देवाणघेवाण, आदानप्रदान हे मर्यादित असायचं. आपापसातलं असायचं. नवीन नव्वदोत्तरी वातावरणात ह्याची scale बदलली आणि विभक्त कुटुंबव्यवस्था, निवासस्थानांच्या नवीन ढाच्यांमध्ये शेजाऱ्यापाजाऱ्यांबरोबर विरळ झालेले संबंध ह्यातून होणाऱ्या घुसमटीमुळे नवीन माध्यमांतून दूरवरच्या कोणाशीतरी मन मोकळं करायची निकड वाढीला लागली. आता ह्या संवादाची भाषा अर्थातच बदलली. पण ह्या बदलाची उदाहरणं द्यायची तर तशी पूर्वतयारी असायला हवी. खरं तर, अशी टिपणं काढणं हे अत्यंत गरजेचं काम आहे. आणि 'आपल्याकडे’ हा शब्द वापरून जे काही 'मी नाही त्यातला’ थाटाचं उणंदुणं काढलं जातं ते काही मला फारसं रुचत नाही. त्यामुळे त्या वाटेनं पडणारी विचारांची पाऊले वेळीच आवरती घेतो. मला ह्याची जाणीव होऊनदेखील मी अशी टिपणं काढत नाही, हे मला अशा वेळी हटकून खटकतं.

भाषेच्या संबंधात पुन्हा मराठी साहित्यातील 'नव्वदोत्तरी’ शब्दाचं जनकत्व असलेल्या कवितेकडे थोडंसं वळतो. 'नव्वदोत्तरी’ कवितेची अभिव्यक्ती ही जर ठसठशीत रेषा काढून बदललेली दाखवणं शक्य नसलं तरी ढोबळमानानं असं म्हणता येईल की मर्ढेकरप्रेरित नवकवितेनं भावनांच्या चपखल अभिव्यक्तीला महत्त्व देऊन वृत्त/छंद हा तांत्रिक काच भिरकावून लावल्यानंतर 'साठोत्तरीं’नं आपल्या रचना बव्हंशानं मुक्तछंदामध्ये केल्या, ज्यात लयीचं भान शाबूत होतं. 'नव्वदोत्तरी’ कवितेमध्ये लयीचं भानदेखील बऱ्याचदा विलयाला गेलेलं दिसतं आणि त्यामुळे ही कविता विधानांची होत हळूहळू गद्यप्राय झाली. त्यामध्ये झपाट्यानं होणाऱ्या बदलांची जंत्री दिलेली असल्यानं काही जण त्यांना याद्यांची कविता असंही म्हणतात.

नव्वदोत्तरी वास्तव आणि संवेदना आताच्या काळातही वैध आहेत का? की आताचं वास्तव आणि संवेदना आणखी वेगळ्या आहेत? वेगळ्या असतील तर कशा?

नव्वदोत्तरीच काय, पार त्यापूर्वीच्या संवेदनादेखील अद्याप वैध आहेत. वरच्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक काळात थेट पौराणिक काळापासून भावी काळापर्यंत बहुकालीन संवेदना एकत्र नांदत असतात आणि वास्तवदेखील आमूलाग्र बदलत नसतंच. तसं असतं तर रामायण-महाभारत आजदेखील लोकप्रिय राहिलंच नसतं. अगदी परवाचीच गोष्ट, एक मुलगा भेटला. इंग्रजीतील 'शांताराम' वाचत होता. बोलताना काहीतरी 'महाभारता'चे दाखले देऊ लागला. त्यातील बरेचसे संदर्भ मला ठाऊक नव्हते. तर मी त्याला तसं सांगितल्यावरही त्यानं मला 'महाभारत' इंग्रजीमध्ये कुणाचं वाचू असं विचारलं. तर ते त्याला आता सांगायचं आहे. जाणकार मित्रांना वगैरे विचारून. तर सांगायचा मुद्दा काय की एकविसाव्या शतकातील 'ई-काळा'तही रामायण-महाभारत वगैरेंबद्दल आपुलकी वाटते आणि त्याचा जीवनाशी असलेला संबंध जाणवतो. ते असंबद्ध वाटत नाही, हा वास्तव व संवेदना वैध असल्याचाच पुरावा आहे की! अर्थात समकालीन वास्तव आणि संवेदनांचा वरचष्मा असणार हे उघडच आहे. कारण त्याचा संबंध दररोजच्या जगण्याशी असतो.

तर पुन्हा कवितेकडे वळू या. आजदेखील वृत्त-छंद ह्यांच्या चौकटीत राहून चांगली कविता लिहिली जाते. फेसबुक आल्यापासून अशा कविता प्रकर्षानं समोर येतात. 'अक्षर' ह्या दिवाळी अंकासाठी गेली ४-५ वर्षे फेसबुकवरून कविता निवडण्याचे काम मी करतो आहे. त्यामध्ये अशा जुन्या वळणाच्या एखाद-दुसऱ्या कवितेला मी आवर्जून स्थान देतो. कारण त्या कविता चांगल्या तर असतातच, नि त्यात जी सफाई असते, कुशलता असते ती साधणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. नव्वदोत्तरी कवींमध्ये लयदेखील नाकारली जाते हा काही त्यांचा विचारपूर्वक निर्णय आहे असं बऱ्याच कवींच्या बाबतीत जाणवत नाही, तर ती त्यांची असमर्थता वाटते! तरीही अभंग/ओवी हे काव्यप्रकार मात्र अद्यापही लिहिले जात आहेत. अर्थात ह्यातून मांडलं जाणारं वास्तव बऱ्याचदा नवीन जाणिवेतून मांडलेलं समकालीन वास्तव असतं. अगदी चटकन आठवणारं ताजं उदाहरण मिलिंद पदकी ह्यांचं देता येईल. त्यांचे न्यूजर्सी येथील वास्तव्यामध्ये तेथील जीवनानुभवाविषयी लिहिलेले अभंग त्यांच्या फेसबुक वॉलवर वाचायला मिळतील, ते अवश्य वाचा. ते अभंग ह्या तद्दन देशी पारंपिरक काव्यप्रकारात समकालीन तरीही परदेशी वास्तव कसे मांडतात ते पाहिलं की ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्यांची जाणीव/संवेदना समकालीन आहे. कर्मठ दाक्षिणात्य ब्राह्मण परदेशामध्ये गल्यानंतर त्याची जी कुतरओढ होते, त्यामध्ये काव्य दिसणे ही मुळात हे घटितच समकालीन असल्यानं त्यांची जाणीव समकालीन असणे हे ओघानंच येतं.

साहित्य, दृश्यकला, संगीत, नाटक, सिनेमा वगैरे कलांचा परस्परांशी संबंध असावा का? तो कसा असायला हवा? सध्याच्या काळात तो कसा आहे?

ह्या प्रश्नात पाच कलाप्रकार आणून टाकले आहेत तुम्ही. आणि ह्यातील कशाचीच नीट उत्तरं द्यावी एवढी पुरेशी माहिती मला नाही. मात्र जीवनाचं आकलन सौंदर्यानुभवातून घडवणं हेच सर्व कलांचं सामाईक काम असल्यानं त्यांचा परस्परांबरोबर संबंध असावा; असं म्हणण्यापेक्षा तो असतोच. त्यांचे एकमेकांवर परिणामदेखील होत असतात. ह्याचं ठसठशीत उदाहरण म्हणजे एम. एफ. हुसेन ह्यांनी त्यांच्या झकपक लक्षवेधक शैलीमध्ये चित्रपट, नाटक, संगीत अशा कलाप्रकारांबरोबर दृश्यकलेचा थेट संबंध जोडायचा प्रयत्न केला होता. फार काय, मला आठवतं त्यानुसार सी. व्ही. रामन ह्यांच्यावर एक प्रदर्शन घडवून त्यांनी विज्ञानालादेखील दृश्यकलेसोबत ओढायचा प्रयत्न केला होता. कलेची माध्यमे जरी वेगळी असली तरी घाटाशिवाय कलाकृती असूच शकत नाही. त्यामुळे सध्याच्या काळात हा संबंध वाढणं हे अगदी ओघानेच येतं. चित्रपट, मालिका, वेगवेगळे रिअॅलिटी शोज पाहून आस्वादकांना कसं गुंगवून-गुंतवून ठेवावं ह्याची सूत्रं अन्य कलाप्रकारांनादेखील जमण्यासारखी आहेत.

खालील गोष्टींशी कलेचा किंवा कलाकाराचा संबंध कसा असाला हवा? सध्याच्या काळात तो कसा आहे?
- सामाजिक वास्तव
- बाजारपेठ
- विचारसरणी
- राजकारण

कलेचा जीवनाबरोबर असलेला सेंद्रिय संबंध लक्षात घेता, जीवनातील प्रत्येक क्षेत्राचा कलेबरोबर संबंध असणं हे ओघानेच येतं. त्यातही तुम्ही ज्या चार गोष्टी दिल्या आहेत त्यांचा आणि कलेचा संबंध तर खूपच जवळचा आहे. मात्र तरीही कलेमध्ये ह्यातील विशिष्ट गोष्ट असावीच असा आग्रह/अपेक्षा करणं हे मात्र साफ चूक आहे. कलेच्या दर्जाशी, गुणवत्तेशी बाह्य गोष्टींचा संबंध जोडणं हे गैरलागू आहे.

तर आता तुम्ही दिलेल्या चार गोष्टींचा धावता आढावा घेतो. सामाजिक वास्तव. मराठी साहित्यात गेली ५० वर्षे ह्यातील सामाजिक वास्तवाच्या अपेक्षेनं फारच वचक निर्माण केला आहे. ज्यानं सामाजिक पातळीवर खूप काही भोगलं आहे, त्यानंच आपल्या व्यथा ह्या कथा/कादंबरी /कविता स्वरूपात मांडाव्यात असा एकंदरीत कल दिसतो. नि एखाद्याची ल्हा-ल्हा ही 'कौटुंबिकक/वैयक्तिक' पातळीवरदेखील होऊ शकते. मुद्दा आहे ह्या आशय सामग्रीतून कथा कशी रचली जाते, हे तपासणे. मात्र नवीन पिढीचं साहित्य वाचताना पुढील काही वर्षांमध्ये हा काच नाहीसा होण्याच्या शक्यता जाणवू लागल्या आहेत. तर आता तुम्ही दिलेल्या चार गोष्टींचा धावता आढावा घेतो.

बाजारपेठ हा तसा नवीन घटक आहे. मराठीत एके काळी 'जग ही एक रंगभूमी आहे' हे वाक्य दिखाऊ खोटेपणाचं गोलमाल समर्थन करण्यासाठी वापरलं जायचं. पण गेल्या ३०+ वर्षांमध्ये 'जग हे एक मार्केट -बाजारपेठ आहे' हे आता थोड्याफार फरकानं जवळपास प्रत्येकाच्याच अनुभवास येत आहे. प्रत्येक गोष्टीकडे आता विकाऊ उत्पादन म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. 'जे जे जगी जगते तया' प्रत्येक गोष्टीला आता प्राइसटॅग चिकटलेला आहे. साहजिकच आस्वादातून पूर्णत्वाला जाणारी कलानिर्मितीची प्रक्रिया ह्याला अपवाद ठरू शकत नाही. बहुतेक कलाकारांना ह्याचं भान येऊ लागलेलं आहे. तसं पाहिलं तर आस्वादकांचा अनुनय हा प्रकार काही नवीन नाही. किंबहुना कलानिर्मिती ही प्रक्रियाच स्वान्तसुखाय नसते तर आस्वादकाला विचारात ठेवून केलेला निर्मितीव्यवहार असतो. तर आता हा आस्वादक-निगडित व्यवहार अधिकच फोकस्ड होत चालला आहे हे निश्चित. बॉलिवूडच्या चित्रपटांच्या आजच्या बजेटचा भरघोस हिस्सा 'प्रमोशन'साठी राखून ठेवलेला असतो, हे उदाहरण ह्या दृष्टीनं पुरेसं बोलकं आहे. त्यामुळे कल्पकता पणाला लावण्याला पर्याय नाही, हे विचारात घेता खरंतर ह्यात हळहळण्यासारखं काहीही नाही.

लिहिणाऱ्या माणसाकडे स्वत:ची अशी दृष्टी असते, किंबहुना समष्टीकडे पाहणारी ही दृष्टीच कलाकृती घडवण्याचं मुख्य साधन असते. तर त्याच्याकडे विचारसरणी असणं हे ओघानेच येतं. मात्र त्याचं लक्ष्य हे जीवनाचा वेध घेणं हे असल्यानं त्याची विचारसरणी प्रत्येक कलाकृतीमध्ये डोकवायलाच हवी अशी अपेक्षा बाळगणं किंवा कलाकृतीतून डोकावणारी विचारसरणी ही कलाकाराची आहे असं ठामपणे म्हणणं हे चुकीचं आहे. असे प्रश्न बऱ्याचदा उभे राहात असतात. जसं की, विजय तेंडुलकर ह्यांचं 'कन्यादान' हे नाटक आणि 'गहराई' हा चित्रपट ह्यावर जोरदार चर्चा झाली होती.

राजकारणातदेखील साधारणपणे हेच म्हणता येईल. राजकारण हे काही केवळ पक्षीय नसतं, तर तो एक प्रकारचा कल असतो - जो लेखकालादेखील असतोच. पण तो जाणवलाच पाहिजे ही अपेक्षा रास्त नाही. विचारसरणी आणि राजकारण ह्या दोघांची सांगड घातली जाऊन 'सामाजिक बांधिलकी'चा आग्रह उदयाला येतो, जो प्रचारकी साहित्य निर्माण करतो. लेखकाची बांधिलकी ही जीवनानुभव व सौंदर्यमूल्य ह्यांच्याबरोबर असते. बाकीच्या सर्व अपेक्षा ह्या फिजूल आणि लादलेल्या असतात.

ह्याच काळादरम्यान भारताबाहेरच्या कलाविष्कारांवर तिथल्या सामाजिक -राजकीय वास्तवाचा परिणाम झालेला दिसतो का? भारतातल्या पिरस्थितीशी ताडून पाहता त्याला समांतर किंवा त्याहून वेगळे परिणाम दिसतात का?

एकुणातच ह्या प्रश्नावलीची उत्तरं मी माझ्या सीमित परिघातून देतो आहे. पण मला भारतातील तर सोडूनच द्या, पण महाराष्टाबाबत - म्हणजे माझ्या भाषिक मुलुखाबाबतही - पुरेशी माहिती आहे असे वाटत नाही. तिथे मी जगभरात काय चाललं आहे त्यावर का बोलणार? परदेशातील साहित्य, चित्रपट, दृश्यकला काही वर्षांपूर्वी जितक्या परक्या, अगम्य वाटायच्या त्या तुलनेत जागतिकीकरणानंतर कमी वाटू लागल्या आहेत, एवढंच मी ह्या संदर्भात म्हणू शकेन.

ह्या काळात समाजाच्या नैतिकतेमध्ये बदल झाले का? कलाविष्कारात त्याचा का परिणाम झाला? नैतिकतेमधला किंवा त्यामुळे कलाविष्कारात झालेला हा बदल स्थानिक पातळीवर कितपत सीमित होता आणि जागतिक पातळीवर कितपत झाला?

नीतिनियमांविषयी बोलतोय का आपण? कारण तुलनेत नैतिकता ही वैयक्तिक बाब आहे. आणि ती मूल्यं, तत्त्वं अशा विरळा गोष्टींशी निगडित आहे. नैतिकतेसाठी आत्मनिरीक्षण आणि परीक्षण ह्या मूलभूत अनिवार्य गोष्टी आहेत. आणि त्या माझ्या लहानपणापासून मी जे बघत आलो आहे त्यात अभावानंच दिसतात. सत्याला सामोरं जाणं हा नैतिकतेचा पाया आहे. तर ह्यात काही ठळक फरक मला तरी जाणवलेला नाही. मात्र नीतिनियमांमध्ये खूपच फरक झालेले दिसतात. नीतिनियम काय किंवा नैतिकता काय, ज्या नीती ह्या संकल्पनेशी निगडित असे हे शब्द आहेत; ती नीती निदान आपल्या समाजात तरी स्त्री-पुरुष संबंध आणि आर्थिक व्यवहार ह्यांच्याशी संबंधित आहे. तर ह्या दोन्ही बाबतीत समाजातील समज हे काळाच्या रेट्यात बदलत चालले आहेत. जागतिकीकरण आणि इंटरनेटसारखी माध्यमं ह्यामुळे जगातील विविध संस्कृतींच्या बरोबर - विशेषत: निदान आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या अमेरिकेबरोबर - भारतीयांचा जो संपर्क वाढतो आहे त्याचा परिणाम म्हणून, विशेषत: स्त्री-पुरुष संबंधांच्या बाबतीतील नीतीनियमांमध्ये काहीशी ढिलाई येऊ लागली आहे. आणि त्याचे पडसाद कलाकृतींमध्ये उमटून त्यात काहीशी धिटाई येऊ लागली आहे. समलिंगी संबंधांसारख्या विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत घृणास्पद समजल्या जाणाऱ्या विषयात, भले कोर्टातील न्याय वेगळा असला तरी त्याविषयी उदारपणे विचार करण्याची वृत्ती वाढताना दिसत आहे. अर्थात ह्याला प्रतिक्रिया म्हणून जी आडदांड प्रवृत्तीच्या लोकांची कटुता वाढत आहे, ती जरी आड येत असली तरी एरवी विकृती समजल्या जाणाऱ्या प्रवृत्ती/कृतीकडे प्रकृती म्हणून पाहू शकणाऱ्यांची टक्केवारी वाढते आहे ही बाब खचितच आशादायक आहे. मराठी साहित्याचा विचार करता राजकारण/समाजकारण करणाऱ्या काही मुखंडांकडून जरी धाकदपटशा/धमक्या अशा त्रासदाक आगळिकी घडत असल्या तरी आस्वादकांच्या बाबतीत कर्मठता/सनातनपणा कमी होत चाललेला दिसतो. वातावरणातील व्यक्तिवाद वाढतो आहे त्याचा हा चांगला परिणाम असावा.

ह्या काळात समाजाच्या वापरायच्या भाषेत काही बदल झाले का? त्याचे सामाजिक - राजकीय - नैतिक परिणाम काय झाले?

ह्याचंदेखील उत्तर वर आलं आहे खरं तर. समाजाच्या भाषेत ह्या काळात खूपच बदल झाला आहे, जे साहजिकच आहे. भारतीय भाषांमध्ये गेल्या काही वर्षांत संवादाच्या पातळीवर राज्यभाषा, राष्ट्रभाषा हिंदी आणि जगातील एक प्रमुख भाषा इंग्रजी ह्यांची एक 'यूजर फ्रेंडली' सरमिसळ तयार होते आहे. भाषिक शुद्धतेचा आग्रह दिवसेंदिवस ढासळतो आहे आणि भाषेच्या वापराबाबत जागरुक असणाऱ्या मंडळींकडून वस्तुस्थितीचा आदर करून ह्याबाबतचा अट्टाहास कमी होतो आहे, ही बाब प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला वाव मिळण्याच्या दृष्टीनं खचितच दिलासादायक आहे. मुळात हा प्रश्नच एवढा व्यापक आहे की पुरेश्या अवधीशिवाय त्यावर सोदाहरण विस्तृत बोलणं अवघड आहे. सामाजिक-राजकीय-नैतिक परिणाम होणं हे अपरिहार्यच आहे, एवढं मोघमात बोलणं शक्य आहे.

जागतिकीकरणाच्या आजच्या 'सपाट जगा'त 'देशीवाद' ह्या संकल्पनेला काय मूल्य आहे?

ही मुलाखतभर संदिग्ध संकल्पनांनी पार पिच्छा पुरवला बुवा! आता शेवटी समोर आला 'देशीवाद'. ही तर मुळातच निसरडी संज्ञा. 'देशीवाद' आणि त्याच्या जोडीनं 'वास्तववाद', ह्या दोन तोतया संकल्पनांनी गेली ५० वर्षं मराठी साहित्यात भलताच धुमाकूळ घातला आहे. त्यातून मिळणारा संदेश एवढा सोपा आहे की तुम्ही तुमचं दैनंदिन आयुष्य - (वास्तववाद) - हा अस्मितेच्या आवेशात - (देशीवाद) लिहा, की झालंच समजा साहित्य! एक गंमत सांगतो, डॉक्टर भा. ल. पाटील नावाचे एक लेखक होते. त्यांनी 'तीन तरुणी, दोन तरुण, एक बंड' ह्या शीर्षकाची एक कादंबरी लिहिली होती. त्यामध्ये अमेरिकेतील एका घेट्टोमधील तरुणांना पात्र बनवलं होतं आणि त्या दोन तरुणींच्या तोंडी चक्क ''अय्या/इश्श''नं सुरू होणारे डायलॉग्ज आणि त्या सदृश भावभावना लादलेल्या होत्या. असा एखाद-दुसरा अपवाद सोडला तर भाषांतरित पुस्तकांखेरीज कुठेही मी 'अदेशी/विदेशी' काहीही वाचलेलं आठवत नाही. थोडक्यात काय, तर देशी वास्तवातूनच तर आशयद्रव्य निपजत असतं. तर कशाला ह्या दोन नाहक संज्ञांचा बाऊ करायचा? पण ते तत्कालीन साहित्यकारणात बहुजनांना लिहिण्याची प्रेरणा देण्यासाठी गरजेचं होतं. त्यामुळे त्याला जागतिकीकरणाच्या काळात असून असून काय मूल्य असणार? तर पुन्हा तेच व्यावहारिक की जगभरातून कितीही कलामूल्यांचा मारा झाला तरी बिथरू-बिचकू नका, देशीवादाच्या गोंडस गोलमाल नावाखाली आपलं घोडं पुढे दामटत रहा, कधीतरी ते अश्वमेधाचं ठरूदेखील शकेल. कारण जागतिकीकरणानंतर तुम्ही म्हणता तशा 'सपाट जगात' (माझ्या मते समतल जगात) काहीही घडू शकेल. 'लोकल इज ग्लोबल'सारखी घोषवाक्यं आहेतच की दिमतीला!

कलाकार आणि समीक्षक ह्यांचा संबंध कसा असायला हवा? सध्याच्या काळात तो कसा आहे?

हा शेवटचा प्रश्न 'ताजा कलम' स्वरूपाचा वाटला. कलाकार हा जीवनाचं/समष्टीचं त्याला झालेलं आकलन हे - ज्याला कलात्मक असं म्हटलं जातं - अशा लक्षवेधक स्वरूपात आस्वादकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणेच समीक्षक हा कलाकृतीचं त्याला झालेलं आकलन चिकित्सकपणे आस्वादकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. थोडक्यात, कलाकार हा समष्टी आणि आस्वादक ह्यांच्यातील दुवा असतो त्याप्रमाणेच समीक्षक हा कलाकृती आणि आस्वादक ह्यांच्यातील दुवा असतो. समीक्षक हा मुळात एक आस्वादकच असतो. पण तो विशिष्ट आस्वादक असतो. साधारण आस्वादकाचा कलाकृतीबद्दलचा अभिप्राय आवडीनिवडीपुरता मर्यादित असतो. त्याला सुस्पष्ट निकषांचा आधार असतोच असं नाही. समीक्षकाच्या बाबतीत - मग भले ती आस्वादक समीक्षा का असेना - त्यानं कलाकृतीच्या अंतरंगामध्ये शिरून बारकाव्यांसह तिची उकल करणं अभिप्रेत असतं. जो साधारण आस्वादक असतो, त्याचा कलाकृतीबरोबरचा संबंध हा वैयक्तिक स्वरूपाचा असतो. समीक्षक हा अन्य आस्वादकांसाठी अभिव्यक्त होत असतो. त्यामुळे त्याचा अभिप्राय हा व्यक्तिगत आवडीनिवडीपुरता सीमित असून चालत नाही तर सामूहिक आकलनासाठी उपुक्त ठरणारा तात्त्विक/मूल्याधिष्ठित अभिप्राय त्याच्याकडून अपेक्षित असतो.

सध्याच्या काळात हा संबंध कसा आहे, हे कोणत्या कालाच्या बाबतीत विचारलंय ते कळत नाही. म्हणून संपूर्ण मुलाखतभर ज्यानं मोठा हिस्सा व्यापला आहे, त्या मराठी साहित्याच्या संबंधात बोलतो. मराठी साहित्यात समीक्षा आता परीक्षणाच्या पातळीवर जास्त प्रमाणात दिसते. समीक्षेसाठी पुरेशी अशी हक्काची व्यासपीठं नाहीत. मराठी साहित्याच्या वाटचालीमध्ये ही मोठीच उणीव आहे. आणि माध्यमांमध्ये व सोशल माध्यमांमध्ये मतमतांतरांचा गलबला वाढतो आहे, तो बेबंद असल्यानं कलाकृतींच्या मूल्यमापानासाठी वरकरणी हितावह वाटला तरी प्रत्यक्षात घातक ठरण्याची शक्यता आहे. मात्र नजीकच्या काळात समीक्षा व्यवहाराला त्याचं योग्य स्थान मिळण्याची शक्यता जाणवत नाहीये.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

मस्त आहे मुलाखत. अतिशय प्रांजळ आणि इंट्रेष्टिंग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुलाखत प्रवाही आहे. अनेक उत्तरे आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!