संदीप देशपांडेच्या कविता

कविता

संदीप देशपांडेच्या कविता

लेखक - संदीप देशपांडे

शरीर : सेमिऑटिक्स

शरीर निसटतं शरीरातून
इंद्रियातून जाणिवा
मेंदूतून नेणिवा

मग त्यातून उडत नाहीत पक्षी
उमटत नाही नक्षी

केवळ स्ट्रक्चर्ड क्लोन
जेनेटिक झोनमध्ये
कृत्रिम बुद्धिवादाचा ऑपेरा
ऑरगॅनिक रचनेचा पसारा
पसरतो... पसरत जातो
आकारांतर्गत आकारात
अंकित आयडेंटिटी
सर्वसमावेशक स्थिती

शरीर तुटतं शरीरातून
आकृतिनिष्ठ आकारातून
मग त्यातून वाहात नाही वारं
पार्थिव सारं

केवळ इन्स्टॉल्ड सायबोर्ग
संकेताच्या भाषेतून सरकतो
डिसॉर्डर्ड अर्थापर्यंत
अर्थाअनर्थातून
रिइंटरप्रीट होत जातात संज्ञा
भौमितिक आकारातून
आकारतात आयकॉन्स
आयकॉन्सची भाषा
भाषेतील संज्ञा

आकलनाचं अंग
निसटतं... निसटत जातं
प्रॅग्मॅटिक प्रतलात
शरीर केवळ संकेत

----

शरीर... युनिसेक्स

शरीर उपजतं उपजंत
कोरं करकरीत
मुरतं... मुरत जातं
भरजरीत
एथ्निक एथ्निक
अनस्यूत सॉफ्टवेअरसहीत
बनतं... बनत जातं
एथ्निक एथ्निक

बॉडी इज मॅन्युफॅक्चर्ड
शरीर म्हणजे शब्द
चिन्हासारखं
वाचता येतं सरळ सरळ
बघता येतं सरळ सरळ
निःसंदिग्ध लावता येतात
क्रोनॉलॉजिकली अक्षरं

मायक्रोस्कोपखाली
तपासता येतात अनुभव
शब्द न्‌ शब्द — चिन्ह न्‌ चिन्ह
चिन्ह परावर्तित होतं प्रतिमेत
तुटतं... तुटत जातं
शरीरसूत्र

शरीर तसं आदिम
शरीराला हवं असतं शरीर
शरीराच्या आत असतं शरीर
स्तराप्रस्तरात
कोमेजतात जीन्स
बहरतात ऑरगॅनिक सिस्टिम्स
वर्तुळात साचते...
साचत जाते... अॅनाटॉमी

वर्तुळात हवी तिथं लावा
ठिगळं... जरीचा काठ
कातडं स्त्री
कातडं पुरुष
फ्लेक्जिबल स्क्रीन

मेटाफिजिकल अनुभव
शरीर... युनिसेक्स
उरतं... उरत जातं
डिझायनर वेअर
अंगाअंगावर... अंगभूत

---

आयटी पार्क मेटामॉर्फसिस : दंतकथा १

अपरात्री एलेव्हेटरमधून उतरताना
अधोरेखित होत जातं
स्कायस्क्रेपर्समधलं
क्युबिकल अवकाश

अवकाशाच्या तुकड्यात
डिकन्स्ट्रक्ट होत जाणारं व्हिलेज
चिरंतन सायबर एज
अविर्भूत टेक्नोक्रॅटचं मॅजिक
शिस्तबद्ध अँटिप्ले अॅक्टचं लॉजिक
व्हिलेजमध्ये कोषबद्ध होतं क्रमशः

हॉटबर्गरमध्ये अडकलेला
कलोनियल सिद्धांत
इतिहासाचा अंत
कोषावस्थेतून ब्लॅकबॉक्समध्ये
होतो रुपांतरित
कल्चर ललित
सपाट गुळगुळीत

कलोनियल संक्रमणातील रेअफिकेशन
एकेका वस्तूच्या विघटनातून
मोकळं होत जाणारं डोमेन
ऑफशोअरची सांभाळत चेन
अॅब्सर्ड नॅरेटिव्हपर्यंत सरकतं

सरकतं सॉफिस्टिकेटेड नेपथ्य
आभासात्मक वास्तवाचं कथ्य

डिबग होत होत
अचूक होत जाणारी
एकासारखी एक माणसं
क्युबिकल अवकाशातून
एलेव्हेटरमध्ये जॅम
सांकेतिक प्रोग्रॅम

तळमजल्यावर अपरात्री
एलेव्हेटरमधून बाहेर पडताना
एक जाणवलं
रक्त साकळलं की
काळंनिळं होतंच

---

रीप्लिका! रीप्लिका!

तुझ्या सूक्ष्म डिफ्यूज
होत चाललेल्या संवेदनांचं
नॅरेटिव्ह स्ट्रक्चर
संदर्भशून्य पातळीवर कोसळतं

एका प्रतिमेतून एक
एकातून एक
एकासारखे एक
रीपीटेडली रीपीट होत जाते
वास्तवाची प्रतिकृती
प्रतिकृतीतलं वास्तव

एका आकृतिबद्ध सायबरच्या
हायरारकीचं स्कल्प्चर
वेगाने निसटून जातं
स्क्रीनच्या आत
खोल फिरत राहतं
तबकड्यासारखं
इलस्ट्रेटिव अवकाशात

आधिभौतिकाचा मानसिक डेटा
साचत चाललाय
डेटाबँकमध्ये आपोआप
रीफ्रेश करतो टरमिनेटेड अनुभव
कटपेस्ट करतो पुनः पुन्हा
फ्लिप करतो रिझेम्ब्लन्स्‌

बोरडम चेहेऱ्याचं
सिन्थेटिक रंगाचं
ग्राफिक पोस्टर
प्रोड्यूस होतं
प्रोड्यूस होते अॅनालॉजी
रीप्लिका रीप्लिका

जेनिटल सृजनाच्या स्तरावर
जेनेसिसचा शोध

---

बझार.कॉम-१ - सत्संग

मधोमध केंद्रस्थानी
पद्मासन घालून
ध्यानस्थ बसलोय
वास्तवाचे रिअलटाईममध्ये
रूपांतर होताना बघत

बाह्यरेषेचा अंतर्यामी फिनोमिना
समजून घेतोय
ध्यानस्थ बसलोय
संकल्पित सत्संग
सकल मार्केट दंग

कॉर्पोरेट अंतरिक्षाला
छेद देऊन
एक्लेक्टिक सोल्यूशनच्या
रचनेचा फॉरमॅट
आध्यात्मिक चॅट
सत् चित् आनंद
आध्यात्मिक इंडस्ट्रीचा
संकल्पित सत्संग
स्ट्रॅटेजिक झिंग

बाह्य आकारापासून
रूट्सपर्यंत जाण्याचा
उर्ध्वगामी मार्गात
अतींद्रियांचा कर्कश्य कल्लोळ
सत्संग संग
हवं तसं
हवं तेव्हा
हवं तेवढं
शांत शांत

अंशाअंशाने आकारांच्या
पलीकडे जातोय
अमूर्ततेची अंतिम अवस्था
टाईम… रिअल टाईम
मधील वास्तव
चैतन्य आणि शांतीचा
आध्यात्मिक संयोग
संग योग
कंझ्यूमर्ड आस्था
आध्यात्मिक मुक्तीची
केऑटिक अवस्था

---

(असंग्रहित कविता. लेखनकाळ : १९९८-२००७)

सर्व प्रताधिकार लेखकाकडे आहेत. मजकूर पूर्णत: वा अंशत: प्रकाशित वा कुठल्याही माध्यमातून प्रसारित करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच अशा कुठल्याही प्रसारित/प्रकाशित केलेल्या मजकुरासोबत प्रस्तुत लेखाचा 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावरील दुवा (weblink) देणे आवश्यक. ते शक्य नसल्यास ' 'ऐसी अक्षरे' - दिवाळी अंक २०१५ (http://aisiakshare.com/diwali15) मधून' असे नमूद करणे बंधनकारक राहील.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वेगळीच शैली आहे. पहीली "क्लोन" संदर्भात वाटली व आवडली. आय टी मेटॅमॉर्फॉसिस वाली देखील आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0