ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर

कथा नव्वदोत्तरी

ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर

लेखक - ए ए वाघमारे

सानियाने एकदाचं बेडवर अंग टाकलं. एक लांब उसासा सोडला. तेवढ्यात सेलफोनने बीप केलं. 'आता कोण?' तिने स्वाईप करून पाहिलं, राजचा मेसेज होता.

"रीच्ड?"

तिने रिप्लायमध्ये पटकन 'थम्स अप'ची स्मायली पाठवली. आणि पाठोपाठ दोन चार 'फ्लायिंग किस'. सेंटर बटन प्रेस करून स्क्रीन लॉक केली. तोच स्क्रीनवरच्या घडाळ्याकडे तिचं लक्ष गेलं.

04 :03 AM

'बाप रे! चार वाजले! खरंच? ' तिने आळसाचा हात पकडून आलेली एक लांब जांभई दिली. हात दोन्हीकडे पसरून पडून राहिली थोडा वेळ, सिलिंगमधल्या मंद निळसर बल्बकडे बघत.

'महाबळेश्वरवरून सायंकाळी निघूनही मुंबईत पोचेस्तोवर पहाटच झाली म्हणायची. व्हॅनिटी असली म्हणून काय झालं? प्रवास तो प्रवासच. रात्रीचा प्रवास अन् शूट्स कमी केल्यापासनं सवय राहिली नाही. पण त्यामुळे खरंच हेल्थ इज इम्प्रूव्हिंग. चांगला डिसिजन घेतलाय आपण हा. खूप घासलीय स्ट्रगल करताना. आता जरा स्टॅबिलिटी आलीय तर का उगाच जिवाचे हाल करून घ्या? पण जाणं आवश्यकच होतं, नाही? अशी संधी काही रोजरोज येत नाही. काही ठिकाणी स्टारडमचे नखरे करून चालत नाही. आणि मानवसारखा ग्रेट डिरेक्टर डिझर्वस रिस्पेक्ट. त्याच्यासारख्या टू टाइम अकॅडमी विनर डिरेक्टरकडून कॉल येणंच मुळी नशीबाचं. तसंही आयटेम सॉन्गज् किती दिवस करणार अन् बिजनेस टायकून्सच्या लग्न-पार्ट्यात किती नाचणार? आता ती संजना! काल आलेली मुलगी! किती ज्युनिअर आहे मला? पण तिच्यासारख्या मुलीही ऑफ-बीट फिल्म्स करू लागल्यात. यू मस्ट कोप अप विथ रेसिंग टाइम एल्स यू विल बी आउट ऑफ धिस शो बिजनेस इन नो टाईम!'

आता तिची उरलीसुरली झोपही उडाली. तिला खरोखरच काळजी वाटू लागली.

'आपण खरंच आउटडेटेड झालोय का?'

ती उठून बसली. पायातले मोजे काढून,बोळा करून कोपऱ्यात फेकून दिले. शेजारी ठेवलेल्या बाटलीतलं पाणी घटाघटा प्यायली. मग ड्रेसिंग टेबलसमोर येऊन उभी राहिली. दिवसभराचे कपडे न बदलताच तिने त्यावरच प्रवास केला होता, इतका तिला कंटाळा आलेला. कधी एकदा ते कपडे काढून फेकतोय असं तिला झालं. तिने टी-शर्ट काढला. जीन्स काढली.

तिची नजर आरशावरच खिळली.

'अजून तरी नाही झालोय आपण आउटडेट. 'मंद निळ्या प्रकाशात तिला स्वत:चाच देह खूप सुंदर दिसत होता. एखाद्या आर्टिस्टिक सेंन्शुअल फोटोशूटचा सेटअप असल्यासारखा.

'आपल्या फॅन्सनी आपल्याला कितीदातरी असं किंवा कधीतरी असंही पाहिलं असेल ना, लहान-मोठ्या पडद्यावर?' उरलेली अंतर्वस्त्रे सोडत अनावृत होत असताना तिला वाटलं. स्वत:ला त्या अवस्थेत पाहताच ती क्षणभर भांबावली.

'कपड्यांची सावली बाजूला सरली की शरीर कसं दिसतं नाही? ग्रहण सुटलेल्या पौर्णिमेच्या चंद्रासारखं. लख्ख.' ती एकटक स्वत:च्या त्या रूपाकडे बघतच राहिली. कितीतरी वेळ. नव्यानेच डोळस झालेल्या डोळ्याच्या नवलाईने.

'खरंच आपलं वय झालं आता? किती झालं असेल? खरा आकडा सांगितलाय आपण कधी कोणाला? पण काळ मात्र काही विसरत नाही. त्याची टोचणी सतत असतेच. शरीर हळूहळू स्थूल पडत चाललंय. लॅन्जरी फॅशनशो गाजवले तेव्हाचा ताठूसपणा जाणवत नाही छातीत आता. पाठीवरचे बल्जेस लपता लपत नाही. बॅकलेस टॉप घालायचा तर नो चान्स. कमरेची कर्व्हही दिसेनाशी होतेय. योगा, ऑर्गानिक डाएट, वर्कआउटस, डान्स थेरपीज- नथिंग इज वर्किंग! सर्वांगाला मेकअप असतो, आधार देणारे डिझायनर कपडे असतात म्हणून निभावून जातं. डोळ्याभोवतीची ही वर्तुळंही गडद होताहेत दिवसेंदिवस, रंगत जाणाऱ्या मेंदीसारखी. हातावर खरी मेंदी लावून घ्यायचेही दिवसही निघून जातील नाहीतर कधीतरी. राजशी आता लग्नाचं बोलायलाच हवं.'

तो आरसा तिच्यासाठी आता केवळ जसंच्या तसं प्रतिबिंब दाखवणारा एखादा साधारण आरसा उरला नव्हता तर दुनियादारीचे पडदे दूर करून पलीकडचं खरंखुरं चित्र दाखवणारी एक खिडकी बनला होता. त्या खिडकीत आता फक्त तीच होती आणि ती खिडकी फक्त तिचीच होती. या क्षणी तिला आता त्या चित्रात अजून कोणी घुसलेलं सहन झालं नसतं. राजही नाही, तिची आईही नाही, कोणीही नाही. ती आहे तोवर ती खिडकी आहे. त्या खिडकीतलं रूप आहे तोवर तिची दुनिया आहे आणि त्या दुनियेतली ती टिकून आहे.

'पण हेच आपलं मूळ रूप. दिखाव्याच्या चमचमत्या कपड्यांखाली झाकून ठेवलेलं. ही झूल अंगावरून उतरवल्याशिवाय आपल्याला आपलं दर्शन होत नाही. स्वत:पर्यंत पोचता येत नाही. स्वत:शी बोलता येत नाही. सेल्फ रिअलायझेशन वगैरे यालाच म्हणतात का?'

त्या आरसेखिडकीतल्या चित्रात दिसणारं स्वत:च प्रतिबिंब तिला स्वत:पासून खूप दूर जात असल्यासारखं वाटतं होतं. आता खिडकीतलं ते चित्रही हळूहळू विरघळू लागलं. तिला आता स्वत:च्याच प्रतिबिंबाच्या आरपार दिसत होतं. मग अचानक ते प्रतिबिंब गळालेलं, निस्तेज दिसू लागलं. हवा सोडलेल्या फुग्याप्रमाणे केविलवाणं आक्रसलं. सर्वांगावर सुरकुत्या पडू लागल्या. कोणीही न खाता वाट पाहून वाकसलेल्या एखाद्या फळासारख्या. बघता बघता तिचा चेहरा वृद्ध होत होत जख्खड झाला. स्वत:च दात गिळल्यासारखा तोंडाचा चंबू झाला. समोरचं प्रतिबिंबात आता एक जख्ख म्हातारी होती. मग अचानक ती म्हातारी कुबड येऊन कमरेतून वाकत आरशातून समोर झुकली.

सानिया दचकून मागे सरकली.

तिला दरदरून घाम फुटला. सर्वांगाला थरथर सुटली. तिने झटकन मान दुसरीकडे वळवली. आरशातल्या त्या प्रतिबिंबाकडे बघण्याची तिची हिंमत होत नव्हती. केस घामाने गच्च भिजले होते. तिने अभावितपणे केसातून हात फिरवत, हलकेच आरशाकडे एक नजर टाकत केस मागे आवळून घेतले. तोच आरशातल्या त्या नग्न कुबड्या विद्रूप म्हातारीनेही तिच्यासमोरच्या सानियाकडे पाहत तिच्यासारखेच आपलेही नावापुरतेच उरलेले पांढरे केस आवळून मागे घेतले. सानिया आता खरंच घाबरली.

तिचा श्वास लागून आला. तिने पुन्हा नजर दुसरीकडे वळवली. छातीची धडधड वाजवीपेक्षा वाढल्याचं तिला स्पष्टपणे जाणवलं. ती धपापतच दार उघडून फ्लॅटच्या टेरेसमध्ये आली. कमरेवर हात देऊन उभी राहिली. बाहेरचा पहाटवारा पोटभर प्यायल्यावर तिला जरा बरं वाटलं. मन ताळ्यावर आलं. सावकाश, काहीशा अविश्वासानेच तिने हळूच स्वत:च्या अंगावरून हात फिरवून पाहिला. सगळं जसंच्या तसं, जिथल्या तिथे होतं. मग हळूच चेहऱ्यावरून हात फिरवला, दाताने बोट चावून पाहिलं. दातही शाबूत होते. काहीही झालं नव्हतं.

आता तिच्या जिवात जीव आला, पण मग एक तीव्र ग्लानी. सुटकेची. ती तशीच जमिनीवर लवंडली. शहराच्या त्या भागातील सर्वांत उंच इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरच्या तिच्या पेंटहाउसच्या टेरेसमध्ये तिला अशा अवस्थेत पाहणारं कोणी नव्हतं.

एका क्षणी तिने टक्कन डोळे उघडले.

'पण मग ती म्हातारी कोण? ते स्वप्न नव्हते. नक्कीच नाही. मग काय होतं ते?' ती पाय पोटाशी घेत कडेवर वळली.

'ती म्हातारी म्हणजे आपणच नाही का? कालचं आज आठवत नाहीये. कालच मानवच्या फिल्मच्या स्क्रीन टेस्टसाठी गेलो होतो ना त्या जंगलात? किती विसराळू झालो ना आपण? ऑन लोकेशन टेस्ट करायची म्हणे. मानवचं काम जरा वेगळंच आहे, नाही? कसलं लोकेशन ते आणि रोल कसला तर एका जख्खड चेटकिणीचा! तीन किलोमीटर चालत जावं लागलं लोकेशनपर्यंत! गर्द झाडीमध्ये एकुलतं एक झोपडं अन् कसला जबरदस्त मेकअप करून दिलेला विक्रांतसारख्या मास्टर आर्टिस्टने! मार्वलस! चेटकिणीच्या अंगावर घालायच्या चिंध्या कुठून आणल्या होत्या त्यांनी काय माहीत? पण सगळं भलतंच ऑथेंटिक. त्या गेटअपमध्ये पाहिल्यावर धक्काच बसला होता ना? जाम घाबरले होते क्षणभर स्वत:लाच पाहून. वाटलं, आपणही इतके म्हातारे झाल्यावर काय? असंच दिसू का आपण? तेच विचार रेंगाळले असतील मनात. आणि वर स्टिरॉइडस्चा इफेक्ट. ती घेणं मात्र कमी करावं लागणाराय. बाकी काही नाही.'

मनावरचं शंकेचं जळमट विरल्यावर स्वच्छ झोप लागली तिला.

**********************

तिने स्क्रीनटेस्ट पास केलीय हे सांगून पुढची बोलणी करण्याकरिता बोलावणारा मानवचा इमेल आल्यावर सानियाला राहवलंच नाही. सगळ्या अपॉइंटमेंट्स, स्केड्युल्स रद्द करून लगोलग सातपुडयाच्या सागाच्या गर्द रानात लपलेलं ते रिसॉर्ट शोधत ती तिथे पोचली होती आणि आता तिथल्या प्रशस्त दिवाणखान्यात मानवची वाट बघत बसली होती.

इव्हनिंग वॉकला गेलेला मानव परत येऊन तिच्या शेजारी उभा राहिला, तरी सानियाचं लक्षच नव्हतं.

"ए....कुठे हरवलीयस?" मानवने तिच्या मांडीवर हात ठेवून तिला हालवत विचारलं. ती शहारल्यासारखी भानावर आली.

"क्काय? काही नाही? झाला वॉक?" ती नकळतच दोन्ही पाय जवळ घेत म्हणाली. "तुझ्या या रिसॉर्टचं हे विक्टोरियन आर्किटेक्चर, अॅम्बियंस- सिंपली अमेझिंग! आय अॅम लव्हिंग इट!" तोवर मानव कोपऱ्यातल्या बार पर्यंत गेला.

"थॅन्क्स फॉर द प्रेज! वुड यू लाईक टू हॅव अ ड्रिंक?"

"ओह, शुअर!" आज खास म्हणून घातलेली तिची आवडती ब्लू मिडी सावरत सानियाही त्याच्या पाठोपाठ बारपर्यंत आली. तिथल्या रंगीबेरंगी बॉटल्स न्याहाळू लागली. तेवढ्यात मानवच्या आवाजने पुन्हा एकदा तिची तंद्री भंगली.

"पण एक मिनिट. तू विचार करतेस तसं नाही हं ते. तुझा ब्रॅण्ड नाही मिळणार इथे."

"नो इश्यूज. अरे, इथे जंगलात हेच फार झालं. एनिथिंग गुड विल डू. युअर चॉइस प्लीज." सानिया हसत म्हणाली.

"तसं नाही. कारण हा बार वाईनचा नाहीये-" मानव शेल्फवरचे दोन ग्लास काढायला क्षणभर थांबला, "-पाण्याचा आहे. मला ठिकठिकाणचं आणि जुनं-जुनं पाणी पिण्याचा छंद आहे."

"काय?" सानियाच्या नजरेत प्रचंड अविश्वास होता.

"होय. बरोबर ऐकलंस तू. मला वेगवेगळं पाणी पिण्याचा छंद आहे, शौक म्हण हवं तर. प्रत्येक बाटलीत वेगवेगळं पाणी आहे. त्या मोठ्या बाटलीत इथल्याच मागच्या झऱ्याचचं पाणी आहे. त्या टेस्ट ट्यूबसारख्या बाटलीत महानदी समुद्राला जिथे मिळते तिथलं पाणी आहे..."

'हा सायको आहे म्हणतात ते काही खोटं नसावं. पण जिनिअस सायकोच असतात म्हणे.' सानियाच्या मनातले हे बोल मानवला कळणे शक्य नव्हते, तो बोलतच होता.

"...त्या वरच्या रांगेत हिरव्या बाटल्या दिसतायत ना? त्यात जुनं पाणी आहे. पाच वर्षं, दहा वर्षं, वीस वर्षं, चाळीस वर्षं असं. ते जतन करून ठेवणं फार जिकीरंच आहे हं." एका निळ्या बाटलीतलं पाणी ग्लासात ओतत मानव म्हणाला आणि ग्लास सानियापुढे सरकवला.

"आणि हे पाणी किती जुनं आहे?" तो ग्लास काहीशा शंकेनेच हाती घेत सानिया म्हणाली.

"हे ना? हे तसं ताजंच आहे. मागच्याच महिन्यात इस्रोतल्या माझ्या एका टेक्निशियन मित्राने मला गिफ्ट केलंय. स्पेसशिपमध्ये अॅस्ट्रॉनॉट्सच्या युरीनला रिसायकल करून बनवलेलं पाणी पुन्हा वापरतात. तेच आहे ते. इट्स स्पेशल, यू सी! स्पेसमधल्या पाण्याची चव तुला इथेच मिळतेय बघ." मानवने हळूच एक घुटका घेतला आणि ग्लासला कुरवाळलं.

सानियाने तिच्या ग्लासभोवतीचा हात झटकन बाजूला केला. तिला तिथून तसंच उठून निघून जावंसं वाटलं. पण ते बरं दिसलं नसतं.

"मग काय ठरवलयंस तू? कसला रोल आहे माझा? डिटेल्स डिस्कस करणार आहोत ना आपण आज?" सानिया कामाच्या बाबतीत खूप सिरीअस आणि प्रोफेशनल होती.

"सॉरी हं. आधी सांगितलं नाही. पण माझे जरा वेगळे प्लान्स आहेत. म्हणजे आधीपासूनच होते तसे..." मानव सोफ्यातून किंचित समोर झुकत तिच्या नजरेत नजर मिळवत म्हणाला.

"म्हणजे?"

"म्हणजे, त्या दिवशीच्या स्क्रीन टेस्ट्स आम्ही काही फीचर फिल्मसाठी घेत नव्हतो."

"मग?"

"त्या एका अॅड कॅम्पेनसाठी होत्या. माझ्या स्वत:च्या कंपनीच्या प्रॉडक्टसाठी. खरं तर तोच माझा मुख्य धंदा आहे."

"कसली कंपनी?"

"जीबीयू अर्थात गुड-बॅड-अग्ली रिहॅब इंटरनॅशनल. आम्ही सर्विस प्रोवायडर आहोत… पण जरा वेगळ्या प्रकारचे. ओन्ली वन ऑफ अवर काईंड." मानवने आपला ग्लास पुन्हा भरला.

"वेगळ्या प्रकारचे?" मानवचं सगळंच वेगळं आहे, सानियाला आता कळून चुकलं होतं.

"आम्ही लोकांना सुरक्षा देतो. सौंदर्यापासून सुरक्षा. तुझ्यासारखे ग्लॅमर वर्ल्डमधले आमचे अनेक क्लायंट्स आहेत. सतत लाईमलाईटमध्ये राहून, मेकअपच्या थराखाली त्वचेला बुडवून, सतत गुडीगुडी दिसून त्यातल्या अनेकांना सुंदरतेची अॅलर्जी होतेय. तुमचं तर एकवेळ ठीक आहे, पण आता कॉमन पब्लिकचीही संख्या वाढतेय. तुमच्यापेक्षा त्या बिचाऱ्या सामान्य लोकांची समस्या तर अधिकच गंभीर आहे. कारण तुमच्या जाहिराती-सिनेमे-सिरिअल्स चोवीस तास ते पाहतात, तुम्ही नाही. टीव्हीसारखं चकचकीत दिसण्याचा ते जिवापाड प्रयत्न करतात. पाण्यासारखा पैसा खर्च करतात. आपल्या जोडीदाराकडूनही तशीच अपेक्षा करतात. सुंदर, गोरं, अजून गोरं दिसणं हेच त्यांना आयुष्य वाटू लागतं. स्वत:ला आहे तसं अॅक्सेप्ट करायलाच लोक तयार नाहीयेत. आपण स्वत: कसे आहोत हे कधी आरशापुढे शांतचित्ताने उभं राहून कोणी कधी पाहिलंय का? तू तरी पाहिलयंस कधी स्वत:ला स्वत:च्या मूळ रूपात? वेळच कुठे आहे आपल्याला, नाही?"

सानियाला काय बोलावं ते सुचत नव्हतं.

"आपण दिसतो तितके सुंदर नाही. आपलं वय वाढत चाललंय. शरीर सुटत चाललंय, कॉस्मेटिक्सच्या साईडइफेक्ट्सनी आपण आहे त्यापेक्षा विद्रूप होताहोत ही जाणीव तर लोकांना होते; पण पुन्हा आभासी जगातलं खोट्या सौंदर्यांचं मृगजळ, सुंदरच दिसण्याबद्दलचं पीअर प्रेशर त्यांना या सेल्फ रिअलायझेशपासून मागे खेचतं. मग एक दिवशी ते ब्रेकडाउन होतात. त्यांना आमच्याकडे यावंसं वाटतं. आम्ही तर कधीही तयारच असतो सेवा करायला. पण आमचे कोर्सेस तेवढे सोपे नाहीत हं!"

"म्हणजे तुम्ही करता तरी काय?" सानियाने खऱ्या उत्सुकतेने विचारलं.

"आमचं रिहॅब इथेच थोडं दूर, दाट जंगलात आहे. आम्ही आमच्या क्लायंट्सना अनेक गोष्टींपासून दूर ठेवतो; जसं की सौंदर्य, नीटनेटकेपणा, स्वच्छता, रंगीबेरंगी कपडे, दाढी, वेणीफणी, साबणाने अंघोळ किंवा एकूणच कॉस्मेटिक्स. काही सिरिअस स्थितीत पोचलेल्या क्लायंट्सना तर कपडेसुद्धा. कधी पलंगावरच्या चादरी बदलत नाही की, कारण नसताना जळमटं काढत नाही. विरंगुळ्यासाठी आमच्याकडे प्राणी पाळता येतात. पण त्यातही देशी डुकरं, बोकड, कावळे असले ओबडधोबड प्राणीकिंवा कुत्रे वगैरे रोगट असतील तरच, पाळण्याची मुभा आहे. थोडक्यात सांगायचं तर मन प्रसन्न वगैरे होईल असं काही आम्ही काही चुकूनही करत नाही. काही दिवसांनी आमच्या क्लायंट्सना बरं वाटू लागलं - म्हणजे चांगलंचुंगलं राहण्याची त्यांची इच्छा मेली आहे अशी आमची खात्री झाली - की मग आम्ही त्यांना बाहेरच्या त्यांच्या जगात परत नेऊन सोडतो. जीवन सुंदर असतं म्हणतात. असेलही. पण सुंदरता हेच काही जीवन नाही."

"आणि मला का बोलावलयंस इथे? भरती करून घ्यायला?"

त्याने हसत खांदे उडवले.

"आमच्या या बिजनेसमुळे 'चांगलेपणा' विकणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्या, 'वेलनेस'सर्विस प्रोव्हायडर्स दुखावले आहेत. हात धुऊन आमच्या मागे लागले आहेत. आतापर्यंत वर्ड ऑफ माउथवर आमचं भागलं. आता मात्र वी नीड टू रीच आऊट टू पीपल. आम्ही एक अॅड कॅम्पेन डिझाईन करतोय आणि त्यासाठी आम्हाला तू 'ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर' म्हणून हवी आहेस."

"पण मीच का?" सानियाने त्रासिकपणे विचारलं.

"सांगतो ना! त्या दिवशी स्क्रीन टेस्टमध्ये सगळ्या मॉडेल्सपैकी खरी विद्रूप, जख्खड तूच दिसत होतीस. आणि नाही म्हटलं तरी तुझं आता जरा वय वाढलंय. सततचा मेकअप, ड्रिंक्स व स्टिरॉइडसमुळे तुझ्या 'दिसण्या'वरही जास्त इन्वेस्टमेंट करावी लागणार नाही आम्हांला. यूअर लूक्स आर सो जिनाईन. बाय द वे, आम्ही तुला वीस कोटी कॅश आणि पाच टक्के शेअर्स देऊ. पण आमची फक्त एकच अट आहे -"

"कसली?" सानियाने मनातच आकडेमोड करत नकळतच विचारलं.

"तुला आमचा इंटेन्सिव्ह कोर्स आमच्या रिहॅबमध्ये राहून पूर्ण करावा लागेल आणि त्यानंतर आम्ही तुला विद्रूप करू. त्या दिवशीसारखं, पण कायमचं. घाबरू नकोस, आमच्या प्रोसीजर्स सेफ अॅण्ड टेस्टेड आहेत. हे फक्त याचसाठी, की ज्या प्रॉडक्टची आपण जाहिरात करतोय, त्याची तुला सगळी माहिती हवी आणि तू नंतर एखाद्या कॉस्मेटिक ब्रॅण्डला एण्डॉर्स करून आमच्या विचारांशी प्रतारणा करू नयेस म्हणून."

मानव सावकाश उठला.

"मग आणू ना मी अॅग्रीमेंटचे पेपर्स? आफ्टरऑल इट्स फॉर अ कॉज डियर!"

तो हसतच आत गेला आणि सानियाने कधीचा भरून ठेवलेला तो स्पेशल पाण्याचा ग्लास शून्य मनाने तोंडाला लावला.

***

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

पहीला अर्धा भाग , तिची भीती - एकदम छान खुलवली आहे.
शेवटचा अर्धा - विचित्र व अनोखी कल्पना आहे.
एकंदर आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा अपूर्ण वाटली...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कथेने चांगली पकड घेतली होती. पण शेवट आवडला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

कथा आवडू लागली होती पण काही कच्चे दुवे कचकन दातांखाली आले आणि मजाच गेली.
उदा. मानवचा मूळ उद्योगधंदा सानियाला माहीत नसणे, स्क्रीन-टेस्ट कशासाठी आहे ते आधी न कळणे वगैरे.
पण एकूण ओघ चांगला राखला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसादाबद्दल आभार !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

राही यांच्यासारखेच म्हणतो. उत्तरार्धात कथेचा वेग अचानक (व अनैसर्गिकरित्या) वाढला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसादाबद्दल आभार !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक