कलांना माध्यमात संकुचित करण्यापासून थांबवता येईल काय?

संवाद नव्वदोत्तरी

कलांना माध्यमात संकुचित करण्यापासून थांबवता येईल काय?

हृषिकेश आर्वीकर यांच्याशी संवाद


नव्वदोत्तर काळ आणि समकालीनता अधिक समजून घेण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या काही व्यक्तींसाठी आम्ही एक प्रश्नावली तयार केली होती. त्यांच्याशी बोली किंवा लेखी संवाद साधून त्या प्रश्नावलीची त्यांनी दिलेली उत्तरं आम्ही अंकासाठी संकलित केली आहेत.

हृषिकेश आर्वीकर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कला आणि सौंदर्यशास्त्र विभागात फिल्म स्टडीज विषयावर संशोधन करत आहेत. त्यांचं काही लेखन त्यांच्या ब्लॉगवर सापडेल.

'समकालीन' असं काही असतं का? तुमच्या मते कशाला समकालीन म्हणता यावं?

अरेषात्मक (non-linear) कालघटकांचा, संरचनांचा विचार केला तरी, समकालीनता ही संकल्पना घडत्या इतिहासाच्या वाळूने बनलेली असून, भविष्याकडे बोट दाखविणारी असते, आपल्या डोळ्यासमोर उलगडत असते, आकलनकक्षेत असते. भौगोलिक रेषा ओलांडताना इतिहासाचे कौल स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, जागतिक या आणि अश्या अनेक आकारांना स्पर्शून जातात. त्यात जातीय, लैंगिक, वंश, इ. व्यवस्थांतील भिन्नतांमधून नवीन भाषा, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था निर्माण होतात. इतिहासातील कालखंडांना वेढा घालून अवकाशाला वेगळे काढून बघता-बघता नवीन चिन्हव्यवस्था निर्माण होतात. ह्या सगळ्याचे आकलन करण्याचा प्रयत्न एका कालखंडात केला तर त्यास समकालीनता (contemporaneity) असे म्हणता येऊ शकेल.

'नव्वदोत्तरी' वास्तव किंवा संवेदना आधीच्या वास्तवाहून किंवा संवेदनांहून वेगळ्या होत्या का? त्यात जर वेगळेपणा होता तर तो कशा प्रकारचा होता? एखादी कलाकृती समोर आल्यावर ती 'नव्वदोत्तरी' आहे हे ठरवायला ह्या वेगळेपणाचा कसा उपयोग होऊ शकेल?

बाबरी मशीद, चून्द्रू प्रकरण, उदारीकरण, जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ अॅन्ड ट्रेड या सगळ्या ठळक घडामोडी येणाऱ्या भविष्याची झलक दाखवत होत्या. आमच्या पिढीला उपभोगवादाची चटक तर लागली पण त्या सोबतच आधीच्या पिढीच्या नियंत्रणकक्षेत वावरण्याचे ठराविक कप्पेही आखले गेले होते. संजय श्रीवास्तव यांनी या काळातील संवेदनेला 'नैतिक उपभोगवाद' असे म्हटले आहे. एकीकडे जातीय, आंतरधार्मिक विभिन्नता आणि दुसरीकडे मध्यमवर्गाच्या हातात चलनात येणाऱ्या नवीन वस्तूंचे प्रमाणीकरण. त्यात एक जोडला जाणारा महत्वाचा दुवा तंत्रज्ञानाचा! ज्यामुळे गतिमानतेने आपल्याला भूल देऊन आपण काय, किती, कसे, केव्हा आणि का उपभोगतोय ह्या प्रश्नांपासून दूर नेलं आहे. लंबकाच्या दोलनांप्रमाणे तथाकथित आर्थिक उद्दोलन (upswing) आणि कॉर्पोरेट जगाची निम्नगामी दोलन/पतन (downswing) या दोन महत्वाच्या क्षणांमध्ये, प्रतिमांनी (image) अंतहीन परिभ्रमणे घालत माध्यमीकरणाची (mediatisation) वाट सोपी केली आहे. उत्सवासारखे देखावे वाढत जाणे, माध्यमाची किंवा ते चालवणाऱ्यांची आपलीच एक कोर आणि नक्षी, ह्याला मनोरंजन म्हणणे असे काही कंगोरे spectacle ह्या शब्दात बांधता येतील. अर्थात, ह्या मागची कारणं जितकी भारतीय संवेदनेशी निगडीत आहेत तितकीच भारतीय अर्थकारणातील पी.एस.यू चे (public sector undertakings) disinvestment आणि परदेशी गुंतवणूकीशी निगडीत आहेत. रुपर्ट मर्डोक ह्याने भारतात थ्री C नीतीचा अवलंब करून क्रिकेट, भ्रष्टाचार, गुन्हेगारीजगत ह्या टी.आर.पी. वाढवणाऱ्या घटकांवर लक्ष केंद्रित केले. वेदनवादामुळे (sensationalism) इंद्रियगोचर प्रसरण होउन नंतर भावात्मक प्रतिसाद मिळत गेले. प्रत्येक बातमीचं ब्रेकिंग न्यूज होणं, अनेक स्कॅम उघडकीस येणं, एम.एम.एस.मुळे वाढणारी प्रदर्शनवृत्ती ह्या सगळ्यातून एक जुजबी, शारीरिक, उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदवली जाते. आपण विषयाच्या गाभ्यापर्यंत पोचू शकत नाही आहोत. पण एका अर्थी, आजची ही प्रदर्शनवृत्ती आणि हा वेदनवाद हेच गांभीर्याने विचार करायचे विषय आहेत. ज्याला रॉन्सियेरने distribution of the sensible संज्ञा दिली आहे. ह्या सगळ्यात कलांना माध्यमात संकुचित करण्यापासून थांबवता येईल काय?

ही नवी संवेदना आणि वास्तव व्यक्त करण्यासाठी आधीची रुळलेली भाषा कमी पडली का? पडली असेल तर काही उदाहरणांनी ते स्पष्ट करता येईल का?

मला असे वाटत नाही की संवेदना आणि वास्तव व्यक्त करण्यासाठी भाषा अपुरी पडते. पण प्रत्येक पिढीच्या अनुभवाप्रमाणे भाषा बदलते हे निश्चित. चित्रपट आणि दूरदर्शन माध्यमाचे उदाहरण घेतले तर नव्वदोत्तरी बाजारीकरणामुळे, भारतातील NFDC चा 'नव'सिनेमा (मणि कौल, कुमार शहानी, बेनेगल इ.) संपुष्टात आला होता. मणि रत्नम आणि राम गोपाल वर्मा यांनी नवीन चित्रपटभाषेची रूपं आणि प्रलोभनं रुळवली. रत्नम यांनी एमटीव्ही म्युजिक विडीओ पद्धतीने गाणी वापरली आणि उत्तरेकडे कौल असलेल्या हिंदी चित्रपटातील "प्रांतीय" भूमिकेला इतर प्रांतांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. राम गोपाल वर्मानी चित्रपट आणि गुन्हेगारी जगात चाललेल्या छुप्या व्यवहारांवर आपल्या gangsterपटाच्या आधारे टीका केली. त्याच काळात, स्वप्नवत वाटणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीला Bollywood असे नाव दिले गेले. गुन्हेगारी टोळ्या हळूहळू तंत्रज्ञानामुळे संघटित होणे आणि चित्रपट व्यवहारातील अपारदर्शकता यावर RGV ने नेमके बोट ठेवले. इतकीच, किंबहुना त्याहूनही महत्वाची गोष्ट आहे ती NRI अर्थव्यवस्थेला जोडणाऱ्या राज-सिमरन यांच्या पंजाबी प्रेम कहाणीची! ज्यामुळे कॅनडा, युरोप, अमेरिकेत राहणाऱ्या 'diaspora'तील भारतीयांना विकला जाणारा भारत हा केवळ त्यांच्या मन:पटलावरच्या नकाशांमध्येच बनला होता. ९४-९५ च्या सुमारास, झी टी.व्ही.वर 'तारा'सारख्या मालिकेत समाजात वावरणाऱ्या तरुण, बेफिकीर, शहरी तारा आणि तिच्या मैत्रिणींचे स्त्रीजीवन दाखविले होते. नंतर २००० च्या आसपास बरजात्या यांच्या चित्रपटातील 'भारतीय' समजली जाणारी संवेदना आली. यास एकता कपूरने गुजराती कुटुंब व्यवस्थेत आणले पण त्यातील विवाहबाह्य संबंधांना प्रक्षोभकता दिली. 'नैतिक उपभोगवादा'चे एक उदाहरण म्हणून 'क्योंकी...' सारख्या मालिकेकडे बघायला हवे. मल्टीप्लेक्स येणाचा क्षणही तितकाच महत्वाचा आहे. भारतात न रुचणारे स्थापत्यशास्त्र वापरून काचेच्या इमारती बांधल्या गेल्या ज्यातून उपभोगासाठी चित्रपट आणि मॉल यांना एकत्र आणले गेले. ह्या काचेच्या इमारतींमधून आरपार बघता येतं, म्हणजे ह्या एका अर्थी वेगळी स्क्रीन निर्माण करतात - स्क्रीनिंग (चाचणी) करणारी. स्क्रीन करत कोण मॉलमध्ये येतं आहे, जातं आहे ह्यावर पाळत ठेवणारे CCTV कॅमेरेही आलेत. बायोमेट्रिक यंत्रणा ते UGC safety guidelines ह्या सगळ्यात आपण तंत्रज्ञान हीच भाषा वापरतोय. हिंसेच्या प्रतिमांचे चित्रण करणे, त्यात भूल पडून आतआत खेचले जातो आहे. आजची भाषा ही तंत्रज्ञान, भय, हिंसा यांनी मिळून तयार झालेली आहे.

नव्वदोत्तरी वास्तव आणि संवेदना आताच्या काळातही वैध आहेत का? की आताचं वास्तव आणि संवेदना आणखी वेगळ्या आहेत? वेगळ्या असतील तर कशा?

आताचं वास्तव आणि संवेदना निश्चितच वेगळ्या आहेत. इंटरनेट, गेमिंग संस्कृतीने आपल्याला एका वेगळ्या अडचणीत टाकले आहे. अतिवास्तवात राहताना आपण तथाकथित कहाण्यांमध्ये इतके रमतो की आजची संवेदना हातातून निसटत चालली आहे की काय असे वाटते. अशीच एक कहाणी आहे १०० कोटी कंपूची! ह्या कथेत वृद्ध होत चालेल्या पुरुष नटांना - डिजिटल फेरफार करून, तारा लावून सुपरहीरो करून, किंवा हे सगळे कमी पडले तर बोटोक्सने प्लास्टिक सर्जरी करून पुनरुज्जीवित केले जात आहे. तारकांची कहाणी थोडी वेगळी आहे. रागिणी M.M.S. या चित्रपटात वास्तव, अतिवास्तव, कथानकातील पात्र, माध्यमातील व्यक्तीचे स्थान या सगळ्यांची सरमिसळ झाली आहे. एरव्ही पॉर्न मध्ये काम करणारी सनी लेओन ही पहिले शांत, सोज्वळ पात्र रेखाटत असते पण हॉरर चित्रपटातील भुताने पछाडल्यावर ती आक्रमक आणि बोल्ड वागू लागते. ह्यात इंटरमिडिया व्यक्तित्व समोर येऊन उभे राहते आहे - म्हणजे एका माध्यमातील ओळख दुसऱ्यावर चिकटवली जाते आहे. स्टार सिस्टिमनंतर रिंगटोन, डायल ट्यून्स, सोशल मिडीया आणि पक्षपातीपणा करणारी प्रदर्शनपद्धती ह्या सगळ्याची जोड म्हणजे १०० कोटी कंपू आहे.

इंटरनेटवर स्क्रोल, काफिला, राउंड टेबलसारखी चर्चात्मक व्यासपीठे आहेत पण त्याच वेळी 'मुंबईतले १० नवीन हॉटेल्स' असे लेख-वजा-जाहिरातीही आहेत. ही सगळी 'बिग डाटा'ची प्रलोभने आहेत ज्यामुळे चर्चा आणि जाहिरात यात काही अंतर उरत नाही. शाहरुख खानच्या मुलाचा MMS बघावा की बघू नये, व त्यावर मतप्रदर्शन करावे का करू नये, हे एका क्लिकवर अवलंबून आहे. ही निवड करताना IP address लपवता येईल, इंटरनेट history डिलीट करता येईल पण 'नैतिक उपभोगवादा'चे रूप बदलून आपण स्वत: ला लपवण्याचा प्रयत्न केला तरी डिजिटल फिंगरप्रिंट कुठे-न-कुठे असणारच! अल्गोरिदम ठरवत आलेल्या गोष्टी आपल्यासमोर प्रकट होतात, पण आपण काय निवड करतो, हे आपल्यावर अवलंबून आहे की नाही, हे सांगता येणे अवघड आहे.

साहित्य, दृश्यकला, संगीत, नाटक, सिनेमा वगैरे कलांचा परस्परांशी संबंध असावा का? तो कसा असायला हवा? सध्याच्या काळात तो कसा आहे?

कलांचा परस्परांशी संबंध नेहेमीच होता आणि असतो. पण आज या संबंधांना अधिक प्रबळ करण्याची गरज आहे. FTII प्रकरणात वरवर वाटणारी व्यवस्थापकीय रिकामी जागा भरण्यासाठी योग्य माणूस न मिळणं, साहित्य अकादमी पारितोषिक विजेत्यांनी पारितोषिकं परत करणं ही सांकेतिक निषेधाच्या चिन्हांना मूर्त स्वरूप देण्याची गरज आहे. नवीन प्रतिमा, नवीन भाषा, नवीन पद्धतीने निषेध व्यक्त करणं ही आजची निकडीची गरज आहे. हा बॅन, तो प्रतिबंध असे रोज बदलणारे चित्र पेपर उघडला की दिसतं. 'आपण' आणि 'ते' अशी द्वैत भूमिका कितपत बरोबर आहे? आज आपण एकाच वेळेस दोन्ही कंपूमध्ये मोडले जाऊ शकतो. 'निर्भया' प्रकरणासारखी चार इतर प्रकरणं, दिल्लीत त्याच वेळी, त्याच भागात झाली. वर्षाभरातच, परदेशी मिडियातज्ञांनी ह्याला मिडीया इवेन्ट आणि सामाजिक घटना असे नाव देऊन त्यावरचे पुस्तक बाजारात आणले. त्याप्रमाणे BBC चा माहितीपटसुद्धा आला.

आपण कॉमेंट, लाइक, शेअर, सबस्क्राईब करून घडणाऱ्या काळाला क्षणार्धात भूतकाळ बनवतो. संकुचित होणारी स्क्रीन आणि आपले सारखे विचलित होणारे चित्त ह्या व्यूहातून सुटका करावयाची असेल तर रॉन्सियेरने म्हटल्याप्रमाणे, 'aesthetic unconscious' मध्ये खोलवर जाऊन जाणीवांवर ठसा उमटवणारे आणि काही काळाने छाप सोडणारे कलाविष्कार व्हायला हवेत. क्षणिक येणाऱ्या प्रतिमा, ध्वनी ह्यांना दीर्घकाळासाठी कशा प्रकारे आपल्या आयुष्याशी जोडता येईल याचा विचार करायला हवा. मग कदाचित आपल्या नवीन काळाचे गणित उलगडेल. हे एकक मिळाल्यावर नवीन कल्पना, संरचना, संगीत, आविर्भाव प्रकट होतील.

खालील गोष्टींशी कलेचा किंवा कलाकाराचा संबंध कसा असायला हवा? सध्याच्या काळात तो कसा आहे?
- सामाजिक वास्तव;
- बाजारपेठ;
- विचारसरणी;
- राजकारण.

आपल्या राजकीय, सामाजिक, वित्तीय, वैचारिक भूमिका 'उक्तीकृती' (performative) आहेत असे मला वाटते. ह्या शब्दाची काही अंगे प्रयोग, खेळ अशी असू शकतात. त्यामुळे त्यात अनेक बाजूंनी विचार करून योग्य कृती ठरवली जाऊ शकते, ती मोडली जाऊ शकते व बदललीही जाऊ शकते. अर्थात, काही विसंगतींना तोंड द्यावं लागण्याची शक्यता कायम असणार. पण ह्यातून महत्त्वाचे वादविवाद, चर्चा निर्माण होऊन कलाकाराला स्वतःबद्दल प्रश्नही पडतील, हेही ओघाने आलेच. असे तपासत राहिल्याने आपल्या भूमिकांना घनता मिळू शकेल. एकमताप्रमाणेच तीव्र मतभेद हे सामुदायिकतेचे पहिले चिन्ह असते. राजीनामे देण्यातलं सांकेतिक विरोधप्रदर्शन या पलीकडे जाऊन नवीन शिव्या, नवीन बंड करण्याचे उद्गार सुचावेत. आपल्याला हवं असलेलं पात्र — असं पात्र ज्यातून बंड करता येऊ शकेल — आपणच व्हावं.

ह्याच काळादरम्यान भारताबाहेरच्या कलाविष्कारांवर तिथल्या सामाजिक-राजकीय वास्तवाचा परिणाम झालेला दिसतो का? भारतातल्या परिस्थितीशी ताडून पाहता त्याला समांतर किंवा त्याहून वेगळे परिणाम दिसतात का़?

परिणाम झाला आहे पण तो जागतिक ते प्रादेशिक या अनुषंगाने झाला आहे.

सोविएत रशियाचे विघटन, गल्फ युद्ध, तेलाचे विलोप पावणारे साठे, नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेला काळ या जागतिक घटनांचा भारतावर निश्चितच परिणाम झाला होता. अमेरिकेच्या गल्फ युद्धानंतरच्या war against terrorism भूमिकेला इस्लामिक राष्ट्रांनी सडेतोड, आक्रमक उत्तरं दिली. पण गल्फ प्रकरणाला C.N.N. वर दाखवून त्यातल्या अमेरिकन हिंसेचे शौर्यगाथा म्हणून चित्रण केल्यानंतर बोद्रियारने 'गल्फ युद्ध घडलेच नाही' असा टीका करणारा लेख लिहिला. रात्री जेवताना थोडा वेळ युद्धाचे देखावे TV वर बघणे याची पुढच्या १० वर्षात आपल्याला सवय झाली. विस्फारलेल्या डोळ्यांनी मीडिया इवेन्टकडे बघण्यामुळे आपण कुठलीही ठोस राजकीय भूमिका घेण्यापासून परावृत्त होत आहोत. बायोमेट्रिक यंत्रणा आणि CCTV च्या जमान्यात आपण भय प्रतिमांनी वेढलेलो आहोत. 'प्रादेशिक' या संज्ञेच्या कक्षा रुंदावताहेत आणि रेखीव होत चालल्या आहेत. नवीन छोटे प्रदेश बनत आहेत. 'भारत' या काल्पनिक देशाचे नवीन आराखडे बनत आहेत, त्याचा व्यास वाढत चालला आहे. तंत्रज्ञानाने आपल्या हातावरच्या घड्याळ्याचेच, एका काळाचे छोटे युनिट करून टाकले आहे. खरंतर, याच तंत्रज्ञानाचा वापर करून कलाप्रतिमांचे भविष्य ठरवायचे असते, पण तसे करताना 'हाताचे घड्याळ म्हणजे काळ ही कल्पना नव्हे’ या संकुचित वृत्तीपासून सुटका करून घेणे अावश्यक आहे. आताच्या घडीला आपल्या स्मार्टफोनवर येणारे मांजरीचे व्हीडीओ ते नागालॅन्डमधले निर्घृण हत्या प्रकरण — या दोन्हीतले काहीच आपण टाळू शकत नाही.

ह्या काळात समाजाच्या नैतिकतेमध्ये बदल झाले का? कलाविष्कारावर त्याचा काय परिणाम झाला? नैतिकतेमधला किंवा त्यामुळे कलाविष्कारात झालेला हा बदल स्थानिक पातळीवर कितपत सीमित होता आणि जागतिक पातळीवर कितपत झाला?

१९९५ मध्ये टफ शूजच्या जाहिरातीत मिलिंद सोमण आणि मधु सप्रे यांनी नग्नावस्थेत पोजेस दिल्या होत्या. डेबोनेर, प्लेबॉयपेक्षा ही जाहिरात वेगळी अशा अर्थी होती की इथे वस्तू विकण्यासाठी bare body as commodity असा वापर केला गेला. त्यावर्षी सोमण ह्यांना अलिशा चिनॉयच्या 'मेड इन इंडिया' या म्युझिक विडीओमध्ये देशा-परदेशात फिरलेल्या राजकन्येसाठी भारतातील खास उपभोगवस्तू म्हणून प्रस्तुत केले गेले. आता सोमण जयहिंद ते एक्सपर्यंत कशाच्याही जाहिराती करतात. ९५ नंतर पुढील काही वर्षामध्ये, दीपा मेहतांचा समलैंगिक संबंधांवरचा 'फायर' हा चित्रपट हिंदू मूलतत्त्ववादी संघटनांच्या कात्रीखाली सापडला. नंतर वाराणसीला चित्रित होणारी त्यांची 'वॉटर' बंद पाडण्यात आली. मूलतत्त्ववाद्यांमुळे 'रामराज्या'कडे हळूहळू चाललेला हा भारत होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी चित्रपट श्रीलंकेत चित्रित केला. वाराणसी ही चित्रीकरणाची जागा म्हणून बघितली तर दोन उदाहरणं अजून घेता येतील. फाळके निराश होऊन १९२३ मध्ये वाराणसीला गेल्यावर त्यांनी १० अंकी आत्मचरित्रात्मक नाटक लिहिले होते. त्यावर कमल स्वरूप यांनी केलेल्या 'रंगभूमी’ या चित्रपटात फाळकेंच्या आठवणीला भावात्मक उजाळा दिला. या चित्रपटास राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात नावाजले गेले. पण पुढच्या वर्षी त्यांनी वाराणसी निवडणुकीवर केलेल्या dance for democracy ह्या माहितीपटावर मात्र बंदी घालण्यात आली. या उदाहरणांवरून एकीकडे वाढणारे commodification आणि दुसरीकडे भौगोलिक रेषांवर वाढणारा ताण यात नैतिक उपभोगवादाचे आकार परत नवीन दिशा घेत आहेत असे दिसून येते. 'भौगोलिक रेषांवर ताण' अशी संज्ञा इथे वापरण्याचे कारण असे की, जितक्या सहज ह्या रेषा आखल्या जात आहेत तितक्याच सहज त्या मिटवता येतात. राजकीय भूमिकांच्या बदलाने नवीन राज्ये तयार होतात त्यातून नवीन रेषा उमटत आहेत आणि तंत्रज्ञानाच्या भाषेने त्या रेषा सहजच ओलांडता येत आहेत. आपण ज्या आधार कार्डाच्या भरोश्यावर स्वतःला डिजिटल इंडिया आणि 'मेक इन इंडिया'मध्ये झोकावण्यासाठी तयार आहोत, तो आपला unique id नसून आपल्याला प्रमाणित करणारा साचा आहे. आज हे जागतिक पातळीचे तंत्रज्ञान आपल्याकडे आले आहे, पण अरुंद नैतिकता आणि वितळणाऱ्या भौगोलिक रेषांमधून आपण आता glocal झालो आहोत. शहर-ग्रामीण ह्या द्वैतामध्ये 'रूरबन' असणारी दिल्ली सारखी शहरे, त्यातले जुन्या इमारतींचे बाजारीकरण, जातीय भांडणतंटे यातून सतत रिचत जाणाऱ्या उक्तीकृती, ज्यात ग्लोबल आणि लोकलची सरमिसळ झाली आहे, या दोन्हीमध्ये पडणारी, 'राष्ट्रीय' ही संज्ञा पुनरुज्जीवित होते आहे.

ह्या काळात समाजाच्या वापरायच्या भाषेत काही बदल झाले का? त्याचे सामाजिक-राजकीय-नैतिक परिणाम काय झाले?

वरच्या काही उत्तरांमध्ये या प्रश्नाबद्दल काही चर्चा झाली आहे. त्यात दोन महत्वाचे मुद्दे सुटले आहेत. भाषा ही केवळ लिखित किंवा बोली भाषा नसते ती प्रतिमांची, ध्वनी-संगीताची, नाट्याची, नवीन माध्यमांचीही असते. ह्या सगळ्याच्या गोळाबेरजेतून जे व्यक्त होते व अव्यक्त राहते त्याचीही असते. पण आता 'बिग डाटा'चा प्रश्न अनेक वेळा येऊन गेला आहे, त्यात दुधारी गोष्ट अशी आहे की, बिग डाटा आपल्याला एककल्ली भूमिका घेण्यापासून परावृत्त करतो. वरवर पाहता ही चांगली गोष्ट असली तरी काय, कसे, किती, केवढे लिहावे, वाचावे हे ठरवण्याचे निकष अजून सापडलेले नाही आहेत. आपल्याला तंत्रज्ञानाचे आणि त्याच्या भाषेचे अजूनही अप्रूप वाटते.

जागतिकीकरणानंतरच्या आजच्या 'सपाट जग''त 'देशीवाद' ह्या संकल्पनेला काय मूल्य आहे?

जागतिकीकरणाच्या सपाट जगात देशीवादाला अनेक धक्के सोसावे लागले आहेत. काही अंशी देशीवादाचे विस्थापन झाले आहे. पण विस्थापनामुळे सांस्कृतिक संरक्षणाचा ठेका देशीवादी कलाकारांवर आला आहे. याच काळात नेमाडेंचं 'हिंदू' येणं महत्वाचं ठरतं. तरीही, गणेशोत्सवात जर 'उत्सव', देखावे महत्वाचे झाले तर विलास सारंगांची 'गणपती दूध पितो' या घटनेवर आधारित कथा चटकन आठवते. पण त्यासोबतच, लाउडस्पीकरवर 'गणपत चल दारूला' हेही तितकंच सहज आठवता येईल. सांस्कृतिक संरक्षकांना ही आणि अशी उत्तरं मिळत जातील. त्यामुळे पवित्र-अपवित्राचे द्वैत मोडून काढलं जाऊ शकेल. त्यांनीही कंबर कसून 'ग्लोकल' होऊन, मानववंशशास्त्राचा आधार घेऊन संस्कृतीच्या नवीन परिभाषा तयार करायला सुरुवात केली आहे. आजचे मिथक आणि त्यांचे आकलन करणे हे एका छोट्या ग्लोकल उदाहरणात दाखवता येईल — 'गेम ऑफ थ्रोन्स ' ह्या संस्कृती (इथे civilisation या अर्थी), राज्यव्यवस्था यावर आधारित मिथक कथानकाच्या एका पात्राच्या प्रतिमेचा आधार घेऊन, बंगाली लोक पोस्टर्स तयार करतात. हे GoT-style memes वापरुन 'ओस्टमी'पूजे साठी एकमेकांना बोलावतात. (पाहा : ट्विटरवर #GameOfPujo किंवा इथे पाहा.

कलाकार आणि समीक्षक ह्यांचा परस्परांशी संबंध कसा असायला हवा? सध्याच्या काळात तो कसा आहे?

मला असं वाटत नाही की या दोन वेगळ्या भूमिका आहेत. कलाकाराने समीक्षात्मक वृत्ती ठेवून आजूबाजूच्या जगात सतत प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. आपण राहतो त्या समाजाबद्दल कुतूहलही असायला हवं. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे सार त्या कलाकाराच्या अभिव्यक्तीत असावे. त्याचप्रमाणे आपल्या चष्म्यातून बघत राहणाऱ्या समीक्षकांनी हाती घेतलेल्या विषयातील घटकांशी खेळून बघावे. हे घडते आहे असे मला वाटत नाही. प्रत्येकाचे काम वाटून दिल्यासारखे आहे. अभिव्यक्ती तावून-सुलाखून आणि मोजूनमापून करूनसुद्धा विस्कळीत होत आहे. तात्त्विक आणि सैद्धांतिक लेखन हे अनिश्चित, संदिग्ध वाटते. 'बिग डाटा'मुळे तयार झालेल्या प्रश्नांपैकी हा आणखी एक प्रश्न आहे.

---

१. हे जातीय हत्याकांड आंध्र प्रदेशातल्या गुन्टूर प्रदेशात १९९१ साली घडले. त्यात २१९ लोकांवर आरोपपत्र दाखल केले गेले. हा खटला सोळा वर्ष सुरु आहे. ह्या कार्यवाहीत पहिल्यांदा गुन्हा घडलेल्या ठिकाणी विशेष कोर्ट स्थापित केले गेले.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

वाचलं परंतू समजायला कठीण विषय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. थोडा क्लिष्ट वाटला पण प्रयत्नांनी कळतो आहे. रोचक नक्की आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलाखत आवडली. त्याहून चांगली गोष्ट म्हणजे आर्वीकरांचा इंग्रजी ब्लॉग जास्त आवडला. तिथे ते बरेच सहज वाटतात. इकडे जराशी क्लिष्टता वाटते खरी, पण नेमकेपणामुळे ती येतेच, त्याला काय करणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

मुलाखतीतल्या मुद्द्यांचे आकलन होते पण भाषा थोडी कठीण वाटली. अनुवाद केल्यासारखी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0