ऐसा अमेरिकन सोक्षमोक्ष

विनोदी

ऐसा अमेरिकन सोक्षमोक्ष

लेखिका - उसंत सखू

---

हिंदू संस्कृतीमध्ये मानवयोनीत जन्माला आल्यावर एकदातरी अमेरिकेला जाऊन आल्याशिवाय (सोक्ष) मोक्ष मिळत नाही असे हौसाबाई पर्यटनकर यांनी 'सुलभ पर्यटन' या पोथीत म्हटलं आहे.

मोक्षाकांक्षी चमेलीला व्हिषाची परीक्षा पास होऊन, दहा वर्षांच्या मल्टीपल एंट्रीची लॉटरी लागली होती आणि 'ग्रहणाचे वेध' लागतात त्याप्रमाणे तिला अमेरिकावारीचे वेध लागले. व्हिसा मिळाल्याच्या ८ रिश्टर स्केलच्या आनंदप्रवण धक्क्यातून सावरेपर्यंत दहापैकी दोन वर्षं उलटून गेली होती. 'कधी जायचं बे आयडे?', असं म्हणून उच्चविद्येने स्वतःला निवांत भूषवीत बसलेल्या सुपुत्र चिंटूने भुणभुणवून तिचा मेंदू पोखरून काढला होता. फ्लोरिडीयन मैत्रिणीने 'जिवलगे कधी गं येशील तू' असे आर्त टाहो फोडत अहोरात्र स्कायपून पिडलं होतं. ऐसीची संपादकीय चांडाळचौकडी तिचा पाहुणचार घेऊन गेल्याने, दोन जण त्याची एनारायी परतफेड करण्याची उत्सुकता दाखवण्याचा क्षीण प्रयत्न करत होते. चमेलीचा पाहुणचार न घेतलेले एक निरागस डीसीकर गृहस्थसुद्धा त्यात अग्रेसर असल्याने, आमंत्रणाची गूढरम्यता वृद्धिंगत झाली होती.

चमेलीपती चंदूने, 'एक महिना सुट्टी घेऊन अमेरिकेला कोण जाणार आहे बे, पागल आहे का? मी येणार नाही' असं जाहीर केलं. (मग, कंपनीचं लुस्कान कोन भरून देईल आं?) तिने आणि चिंटूने एका एनारायी सल्ल्यानुसार फॉल सिझनच्या आमिषाला बळी पडून १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या तारखा नक्की केल्या. चमेलीच्या मैत्रिणीने, 'युटाहमधील नॅशनल पार्क बघूया तो अजून फार माणसाळलेला नाहीये' अशी गाजराची पुंगी वाजवली. यथावकाश, 'जाऊदे बे, तिथे फक्त एक दगडी कमान आहे, त्यात काय बघायचंय?', असं म्हणत गाजराची पुंगी फस्त केली. त्यामुळे चमेलीचं तिथल्या ऐसीकर टेक्साससुंदरीच्या जीवनाचा जवळून अभ्यास करायचं स्वप्न भंगलं. सुंदरीच्या धूर्त टेक्सासी काव्याने तिला आल्बनी आणि डीसीकर कुटुंबांचा सखोल अभ्यास करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. फ्लोरिडा, आल्बनी आणि डीसी वगैरे पालथे घालायचा कार्यक्रम ठरला आणि तिकिटं भारतीय चलनात काढायची की डॉलरमध्ये काढायची याचा निरर्थक आंतरराष्ट्रीय उहापोह करण्यात आला. त्यामुळे कशात काय आणि फाटक्यात पाय, अशी छिद्रान्वेषी अवस्था प्राप्त झाली.

"हे काय चंदू का येत नाहीये?" या प्रश्नाचं कौटुंबिक आणि सामाजिक दडपण असह्य होऊ लागल्यानं चमेलीने त्याला पुन्हा एकदा येण्याचा आग्रह केला. इतके दिवस दुरूनच गंमत पाहणाऱ्या चंदूला, पत्नी आणि सुपुत्र खरंच जाताहेत यावर विश्वास ठेवावा लागला. वर्कोहोलिक चंदूने सहजच कार्यालयात रजेचा अर्ज दिला आणि तो चक्क मंजूर झाल्याने तात्काळ त्याचा कंट्रोलफ्रीक मोड ऑन झाला. आता तोसुद्धा अनुभवी मंडळींशी जालीय चर्चा करून विविध ट्रॅव्हल सायटींना उगाच भेट देऊन आपलं तिकीटं न्याहाळायचं व्यसन पुरवून घेऊ लागला.

स्वस्तात तिकीट काढायला ते दोघे एका परिचित ट्रॅव्हल एजंटकडे, तिकिटांच्या तपशीलासह पोचले. आंतरराष्ट्रीय विमानांची तिकिटं काढणं किती कठीण आणि किचकट काम आहे, यावर एजंटने त्यांचं बौद्धिक घेतलं. तीच संधी साधून, चतुर चमेलीने त्याला यथेच्छ हरभऱ्याच्या झाडावर चढवलं; तर त्याला वाटलं आपली जागा हीच. तो हुरळत हरभऱ्याच्या झाडावरूनच, चित्त्याच्या चपळाईने तिकिटं काढू लागला. तिघांच्या ऑरलँडोच्या तिकिटासाठी तो घाईघाईने कधी चंदूला एकट्यालाच पॅरिसला उतरवून दुसऱ्या विमानात बसवू लागला, तर कधी चिंटूला शिताफीने हिथ्रोला उतरवून गॅटविक विमानतळावर पाठवू लागला. तिथे चिंटूला ट्रॅव्हल व्हिसा तर घ्यावा लागेलच, शिवाय ४०/५० पौंड खर्च करून बसने दुसऱ्या विमानतळावर जावे लागेल; असं म्हणून चंदूच्या काळजाचं पाणी पाणी करू लागला. कीबोर्ड आणि माऊसचा ताबा घेऊन तिकीट काढायला चंदूचे हात शिवशिवू लागले.

भयचकित चमेलीच्या कानात मेहदी हसन पाझरू लागला, "अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले... जिस तरह सूखे हुए फूल किताबों मे मिले". या विमानतळीव "झ"मेल्यात आपण तिघं कायमचे बिछडणार, या चिंतेने तिचे प्राण कंठाशी आले. तिचा काळजीग्रस्त, पडीक चेहरा पाहून एजंटाचं हृदय द्रवलं आणि त्याने शिताफीने तिघांचीही एकत्र तिकिटं काढून तिला आजन्म उपकृत केलं. इतक्यात तिथे एजंटाच्या पत्नीचं आगमन झालं. पाऊस येणार असला की चिमण्या धुलीस्नान करतात, पण ही स्त्री म्हणजे बारोमास फुललेलं मूर्तिमंत 'धूल का फूल' आहे. बऱ्याच दिवसांनी भेटल्याने तिने लाजेकाजेस्तव चमेलीची जुजबी चौकशी करून लगेच स्वतःच्या घरकामाची धुळवड सुरू केली. तीन माणसांच्या घरात इतकं काम असतं, कीसकाळी उठल्यावर एकदम बाराच वाजतात म्हणाली. घरात दशदिशांनी सतत येणाऱ्या धुळीमुळे कामं संपत नाही आणि कुठं जाणंही जमत नाही, अशी धूळ उडवीत ती गाय निघून गेली आणि श्यामरंगात वाटा बुडाल्याने ते पाखरांच्या सवे घरी परतले. तेव्हा रेडीओवर आशा गात होती. ”…पैल घंटा घुमे राऊळी... सांज ये गोकुळी सावळी सावळी…”

केंद्रसरकारी कर्मचारी असल्याने तिकीट निघाल्यावर, चमेलीला दिल्लीच्या कार्यालयातून ‘नो ऑब्जेक्शन’ मिळविण्यासाठी अतोनात फॉर्मात यावे लागले. 'तुच्छ कर्मचाऱ्यांनो, परदेशवारी करण्याएवढा पैसा तुमच्याकडे आला कुठून, आं?' असं सगळ्या फॉर्मात दरडावलं होतं. स्थानिक कार्यालयाने १५/२० दिवस चालढकल करून एकदाचे कागदी घोडे यमुनेच्या तीरी पाठवले. तुम्ही घोड्याला पाण्याजवळ नेऊ शकता, पण पाणी प्यायला मजबूर करू शकत नाही; भलेही तो कागदी घोडा का असेना. कयामत तक फुरसत असल्याने दिल्लीचा संबंधित कर्मचारी दर दोन तीन दिवसांनी लहर लागली की चमेलीला फोन करून आणखी फोटोकॉप्या मागवायचा. इतके सोपस्कार करूनही चमेली निघेपर्यंत ‘नो ऑब्जेक्शन’ येण्याची सुतराम शक्यता दिसेना. या दिरंगाईचा ताण घ्यायचा नाही, शेंडी तुटो वा पारंबी आता तर अमेरिकेला जायचेच; असा ठाम निश्चय करून ती नेहमीप्रमाणे बागडू लागली.

फक्त अडीच लक्ष रुपयांचा खुर्दा करून समग्र तिकिटे निघाल्याची दुःखद वार्ता जालावर प्रसारित करताक्षणी, दशदिशांनी सूचनांचा वर्षाव सुरू झाला. चमेलीची मैत्रीण म्हणाली, “सलवार कमीझ घालून येऊ नको.” त्यामुळे पहिल्यांदाच अमेरिकेत येते आहेस, ते कळते म्हणे. त्याने काय फरक पडतो तिला कळेना. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला तेव्हा त्याने उलटी क्याप, झेंड्याचा टी शर्ट अन्‌ ढगळ बर्मुडा हा अमेरिकन राष्ट्रीय पोशाख घातला होता की काय? मैत्रिणीच्या आग्रहाखातर तिने लीवाईस जीन्सची चुडीदारसम प्यांट घेऊन त्यात आपले अधमांग कोंबले. त्यामुळे तिला जी. एं.च्या पुस्तकातली नितंबाचे रुधिराभिसरण दाखवणारी प्यांट आठवून, लिफ्टमध्ये अडकल्यासारखे वाटू लागले. जे सवयीचे आहेत तेच सुती, सैल कपडे घालावे असे तिने ठरवले.

'द्रवपदार्थ न्यायचा विचारसुद्धा मनात आणू नका' म्हटल्यावर तिने चमचाभर अत्तरवाल्या बाटल्यासुद्धा सामानातून काढून टाकल्या. इमिग्रेशनमध्ये वाळ्याच्या अत्तराच्या चिमुकल्या बाटलीला खतरनाक अंमली पदार्थ समजून, आपली रवानगी थेट ग्वान्टानामो बे तुरुंगात होऊन तिथे आजन्म खितपत पडलोय, अशी भीतिदायक स्वप्नं तिला पडू लागली. ऐसीच्या संपादकमंडळाला, सुशेगात दिवाळी अंक काढून झाल्यावर महिनाभराने आठवलं; अरेच्च्या ते देशी पावणे सप्टेंबरमध्ये आलेच नाही वाटते, मग गेले कुठं? जौद्या, म्हणत हवापालट म्हणून सहज ते ग्वान्टानामो बे तुरुंगात आले तर काय, युरेक्का! देशी पावणे तिथे हालअपेष्टा एन्जॉय करत होते! फराळातल्या चकलीचे उरलेले दोनचार वात्तड तुकडे दाखवून त्यांनाच भेटायला आल्यासारखं करत, ऐसीची संपादक मंडळी भान हर्पून तुरुंगावर डझनभर लेख टंककुट्टणत बसले होते, अशी हॅल्युसिनेशन्स चमेलीला होऊ लागली. जर सुटका झालीच तर आपणही 'एस्केप फ्रॉम ग्वान्टानामो बे पार्ट २' सिनेमा काढूया, असे तिने ठरवले. मूळ सिनेमातल्यासारखी सेन्सॉरला फेफरं येणारी दृश्ये कशी काय चित्रित करायची, याच्या चिंतेत ती गढून गेली.

हेल्थ इन्शुरन्स नामक एक फुगवून गंभीर करण्यात आलेली समस्या होती. चंदूचं गणित पक्कं असल्याने, त्याने आजपर्यंत कित्येक इन्शुरन्स एजंटांना चक्रवाढ व्याज वगैरे तोंडावर फेकून धारातीर्थी पाडले होते. त्यामुळे मेडिकल इन्शुरन्स तो घेणार नाही हे नक्की होते. चमेलीचा भाऊ आणि दीर डॉक्टर असल्याने सर्व साधारण औषधांची शिदोरी सोबत नेण्याची सोय होती. तब्येती एरवी ठणठणीत असल्याने त्यांनी हेल्थ इन्शुरन्सला खुशाल फाट्यावर मारले.

चमेलीची मैत्रीण तिला रोज अमेरिकावारीसंबंधित प्रश्नावल्या तयार केल्या का?, म्हणून भंडावू लागली. त्यामुळे तिच्या मेंदूला प्रश्नाघात झाला. सुदैवाने आम्हाला चमेलीच्या डायरीतलं एक पान सापडलं आहे. त्यावरून तिचा स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास समजून घेता येईल.

मी काल दिवसभर भिंतीवर डोके आपटले, ५/६ टेंगळे आली; पण मी (मान)भावी प्रवास करून अमेरिकेला का जाते आहे, ते कळले नाही. अपार खिन्नता आल्याने जास्त ताण न घेता, राम जेठमलानी इंदिरा गांधींना रोज दहा प्रश्न विचारायचे ना, तसंच केलं. फक्त दहाच प्रश्न पाडले.

१. कोहं? मी कोण आहे? (रिअली? हू केअर्स?)
२. जन्माला येण्याचे प्रयोजन काय आहे? (लोकसंख्येचा विस्फोट!)
३. मी जर अजून झुमरीतल्लैया किंवा ढुंगणाजवळची गावे पाहिली नाहीत, तर सात समुद्र ओलांडून अमेरिका पहाण्याची आवश्यकता आहे का? पुणे पाहिल्यावर जगात काही पहाण्यासारखं नसतंच, असं पुलं आपली सोय व्हावी म्हणून म्हणालेच आहेत; हे लक्षात ठेव चमेली. (कशाला सुखाचा जीव दुःखात घालतेस गं?)
४. मला नक्की कुठे जायचं आहे? अमेरिकेत कीअंतराळमोहिमेला? जास्त अवघड काय आहे? (जास्त माजोरडा कोण?, सारखा हा अवघड प्रश्न आहे.)
५. भावी अमेरिकावारीबद्दल प्रश्नावल्या निर्माण करण्याची आवश्यकता पडण्याइतके अशक्य कोटीतलं कार्य माझ्याकडून होतंय आणि मला त्याची गंधवार्ताही नसावी कीकाय, अशी कुशंका माझा लहानसा मेंदू कुरतडू लागली आहे. त्याचं काय करावं? (काही प्रश्नावल्या निर्माण कराव्या.)
६. त्या असंस्कृत देशात घालण्याजोगी जीन्सची नऊवारी लुगडी, डोळ्यांची पिटपिट करायला खोट्या पापण्या आणि खोप्याचा फंकी विग कुठून घ्यायचा? (ती पाहताच बाला कलिजा खलास झाला.)
७. कोकाटे फॅडफॅड इंग्रजी वापरल्याने पदोपदी तिथल्या नागरिकांना भोवळ येईल कीचाऊस डिक्शनरी वापरून खेळ खल्लास करायचा? (चलाओ ना कोकाटे के बाण रे... जाण लेलो ना जाण रे... कही निकाल ना जाये हमरी बॉडी सें प्राण रे...)
८. विद्वान(!) यजमानाला आपल्या गावंढळ, अडाणी वागण्याने छळून; कंटाळून सोडण्याची आपली क्षमता पुरेशी टोकदार आहे कीधार लावून घ्यायची आहे?
९. आपला फडतूस पासपोर्ट, कःपदार्थ मोबाइल, अंगाभोवती गुंडाळायच्या ८/१० चिंध्या आणि परतीची तिकिटे हरवणे नीट जमणार आहे कीमुकाट्याने बावळटासारखं मायदेशी परतायचे आहे? (चंचुप्रवेश करून चंचू परत आणायची? अफसोस! बहुत नाइन्साफी है )
१०. एक आत्मा जो नामधारी देह घेऊन जाणार आहे तो तसाच परत येणार कीत्याचे इसबगोल होणार आहे? (आता कोठे धावे मन... स्टॅच्यू लिबर्टी देखलिया...)

प्रश्नावल्या वगैरे फेकून देऊन चमेलीने प्रवासाची सर्व तयारी केली आणि मुंबईकडे दुरांतो ट्रेनने प्रस्थानाची वेळ येऊन ठेपली. ट्रेन नॉनस्टॉप असून यात पँट्रीकार नसते. एसी गाडीत शिरताच चमेलीला लोणच्याचा खमंग वास येऊ लागला. आयला, गाडीत शिरताच कोण दुष्काळग्रस्त प्राणी डब्बा खायला बसलाय, जर्रा धीर नसतो लोकांना, म्हणून ती मनात चर्फडली. हळूच तिच्या लक्षात आलं की वास अगदी जवळून, म्हणजे तिच्या कुर्त्यावर सांडलेल्या लोणच्याच्या तेलाचा असून, ‘आपण हसतो लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला’ असा प्रसंग तिच्यावर ओढवला आहे. सकाळी उठून चंदूला खायला लागतं म्हणून तिने पराठे, लोणचं आणि दही घेतलं होतं. ऑटोरिक्षातून स्टेशनवर येताना, तथाकथित घट्ट झाकणाची लोणच्याची डबी खुशाल कलंडून, कुर्त्यावर तेलाचं ठिबकसिंचन करत बसली होती. चेहरा निर्विकार ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत तिने कुर्त्यावरचे लोणच्याचे डाग धुवून काढले. एका चोंबड्या सहप्रवासिनीने न राहवून, एसी गाडी आहे; त्यामुळे ओला कुर्ता बदलून दुसरा घालण्याची सूचना केली, त्यावर चमेलीने खळ्या पाडून एक स्मितहास्य तिच्याकडे फेकलं. चोंबडीची तात्काळ दातखीळ बसली. वाहे गुरु का खालसा, वाहे गुरु की फतेह!!

दुसऱ्या दिवशी पहाटे विमानात बसण्यापूर्वी त्यांच्या सामानात पुरणपोळ्या आणि मेथीच्या पराठ्यांच्या एका प्रचंड गाठोड्याची भर पडली. गाठोड्याची पूर्वसूचना मिळाल्याने अमेरिकेत मित्रगृही एक हर्षाची लहर उसळली होती. या गाठोड्यामुळे न्यूयॉर्कला उतरल्यावर अॅग्रिकल्चर इन्क्वायरीला तोंड द्यावे लागले. "ओकाय, व्हॉटज डेअ? मँगो ऑ राईस? एनी सीड्स?" त्यावर चंदूने शुद्ध इंग्रजीत सांगितले, "यु सी, वुई ह्याव ब्रॉट पुरणपोळी." चमेलीने स्वीट ब्रेड सांगून वेळ मारून नेली. अमेरिकन कर्मचाऱ्याला मराठी पाककृतीत, मराठी लोकांसारखाच काडीचाही रस नव्हता, म्हणून त्यानं इमिग्रेशन क्लीअरन्स दिला.

एअर फ्रान्सच्या विमानात हिंदू शाकाहारी म्हणून नोंद झाल्याने, खानपानसेवा सर्वप्रथम त्यांना स्पेशल मेनू सर्व्ह करत. त्यामुळे आपण व्ही. आय. पी. असल्याचे मिथ्या भास त्यांना होऊ लागले. कधी कधी त्यांना स्पेशल मेनू दिल्याचा विसर पडून पुन्हा जनरल मेनूची ऑफर व्हायची. दही, दूध, फळांचे रस, चहा, कॉफी असे सगळे एकत्र नांदत असायचे. पोटात नुसता गोपाळकाला करून सोडला होता. चमेलीला रेड वाईन आवडते म्हणून चंदू खाद्यपेयाच्या प्रत्येक फेरीत बाटल्या घेऊन साठेबाजी करू लागला. लवकरच बाटल्यांचा ढीग शून्यमंडळाला भेदू लागला. आकंठ रक्तवारुणी प्राशुनीसुद्धा स्पिरीचुअल अनुभव येईल तर शप्पथ, चमेली पुटपुटली.

भूमातेशी, काळ-वेळाशी संपर्क सुटताच अंतराळात चमेलीला आपण काय खातोय-पितोय, समोरच्या चिमुकल्या स्क्रीनवर सिनेमा बघतोय की झोपतोय, हे सगळं आभासमय वाटू लागले. म्हाताऱ्या फ्रेंच हवाईचेटकीणी अधूनमधून माईकमधून खुस्पुसून भुरळयुक्त मंत्रोच्चार करायच्या आणि देखणे हवाईदूत गोड हसून रेड वाईन द्यायचे, इतुकेच तिला स्मरत होते.

पॅरिसला उतरून आपण दुसऱ्या विमानात कधी बसलो आणि न्यू यॉर्कला कधी पोचलो ते सेमी-निद्रावस्थेत चमेलीला कळलेच नाही.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

चुरचुरीत.
या विझा-पासपोर्ट विषयावर बरेच लेख येऊन गेले आहेत तरीही प्रत्येकाचं विमान वेगळ्या रूटवर चुकतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हौसाबाई पर्यटनकर यांची 'सुलभ पर्यटन' ही पोथी, तिकीटं न्याहाळायचं व्यसन, नितंबाचे रुधिराभिसरण दाखवणारी प्यांट, स्पिरीचुअल अनुभव सगळेच खास "सखु" आहे! मस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हास्य कळ्लोल व नव्वदोत्तरीचा अमेरिकावारीचा मुक्तपीठीय 'कल्लो'ळ दोन्ही आहेत लेखात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम खुसखुशीत. तो तुरुंगाचा तर पूर्ण उताराच झकास आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0