Skip to main content

सध्या काय वाचताय?

बर्‍याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता थोडे फार त्याबद्दल सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. पण अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसर्‍यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जीवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणार्‍यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहावेत ही आशा आहे. मी सुरुवात करते:

समाज प्रबोधन पत्रिकेचा नवीन अंक काही दिवसांपूर्वीच आला. रवींद्रनाथ ठाकूरांच्या १५० व्या जयंती निमित्त त्यांच्यावर विशेषांक आहे. सगळे लेख अजून वाचले नाहीत, पण काही लेख उलीखनीय आहेत - माया पंडित व अशोक चौसाळकर यांचे ठाकूरांच्या कादंबरींवर (घरे बाइरे आणि गोरा) लेख, आणि अवनिश पाटील यांचा ठाकूरांच्या इतिहासमिमांसेवरचा. नरेंद्र जाधव ("रवींद्रनाथांची विचारधारा") आणि विलास गिते ("रवींद्रसंगीत") यांचे सो-सो वाटले. ठाकूरांचे काही लेख अनुवादितही केले आहेत.

एकूण स.प्र.प. चे अलिकडचे अंक छान दिसताहेत - फाँट, लेआऊट, कागद वगैरे चांगले सुधारले आहेत.

परवा "फ्लोरिस्टन बंगला" नावाची नरसिंह मळगी यांची कानडी कादंबारी (उमा कुलकर्णी यांनी मराठीत अनुवादित केलेली) हातात आली. "सत्य घटनेवर आधारित, सदेह नायक-विदेही स्त्री यांच्यातील अभूतपूर्व प्रेमप्रकरण, रोमांचकथा" असे मागे वर्णन आहे, पण कुलकर्णींचे मनोगत वाचून त्या कादंबरीबद्दल फारशा उत्साही वाटल्या नाहीत. पहिली दोन पाने वाचली, बघू पुढे काय होते...

अवांतर: पुढच्या वर्षी एखाद्या दिवाळी अंकात उमा कुलकर्णींची त्यांच्या अनुवाद शैलीबद्दल, निरनिराळ्या कन्नड लेखकांच्या कादंबर्‍यांवर काम करताना आलेले अनुभव, कन्नड-मराठी भाषा-संबंध वगैरेंवर विस्तृत मुलाखत वाचायची खूप इच्छा आहे..

तर मग, तुम्ही सध्या काय काय वाचताय?

हा धागा जिवंत ठेऊन बर्‍याच उत्तमोत्तम पुस्तकांचा परिओचय करून दिल्याबद्दल सर्व सहभागी सदस्यांचे आभार. वाचनाच्या सोयीसाठी या धाग्याचा दुसरा भाग सुरू केला आहे. यापुढील चर्चा त्या धाग्यावर करावी ही विनंती

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/01/2012 - 04:17

राजन खान यांचे 'बाईजात' नावाचं पुस्तक वाचायला घेतलं आहे. पहिली दहा-बारा पानं वाचल्यावर कंटाळा आला म्हणून ठेवून दिलं.

करूणा गोखले यांचं 'बाईमाणूस' मागे अपूर्ण सोडलं होतं ते पुन्हा वाचते आहे. स्त्रीवादासंदर्भात निबंध असं या पुस्तकाचं वर्णन करता येईल. स्त्रीवादासंदर्भातले समज-गैरसमज वगैरे वाचून झाले आहेत. वाचायला थोडा वेळ लागतो आहे, पण पुस्तक आवडलं आहे.

नंदन Sat, 07/01/2012 - 04:31

डिकन्सचे 'बार्नबी रज (Barnaby Rudge)' वाचून झाले. इतर कादंबर्‍यांइतकी ही कादंबरी गाजलेली नसली, तरी वाचनीय निश्चितच आहे. १७८०च्या दशकात लंडनमध्ये उसळलेल्या कॅथलिक/पोपविरोधी दंगलींची पार्श्वभूमी आणि त्याला दिलेली रहस्यमय खुनांची जोड हे साधारण कथानक.

ते संपवून बरेच दिवस वाचायच्या यादीत असणारे 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' सुरू केले आहे. पहिल्या महायुद्धात भाग घेतलेल्या १९-२० वर्षाच्या जर्मन तरूणाने आपल्या अनुभवांवर लिहिलेली ही कादंबरी. त्यातला हा काही भाग -

We feel that in our blood a contact has shot home. That is no figure of speech; it is fact. It is the front, the consciousness of the front, that makes this contact. The moment that the first shells whistle over and the air is rent with the explosions there is suddenly in our veins, in our hands, in our eyes a tense waiting, a watching, a heightening alertness, a strange sharpening of the senses. The body with one bound is in full readiness.

It often seems to me as though it were the vibrating, shuddering air that with a noiseless leap springs upon us; or as though the front itself emitted an electric current which awakened unknown nerve-centres.
Every time it is the same. We start out for the front plain soldiers, either cheerful or gloomy: then come the first gun-emplacements and every word of our speech has a new ring.

When Kat stands in front of the hut and says: "There'll be a bombardment," that is merely his own opinion; but if he says it here, then the sentence has the sharpness of a bayonet in the moonlight, it cuts clean through the thought, it thrusts nearer and speaks to this unknown thing that is awakened in us, a dark meaning--"There'll be a bombardment." Perhaps it is our inner and most secret life that shivers and falls on guard.

लतिका विवेक Mon, 19/03/2012 - 14:55

In reply to by नंदन

फारच छान पुस्तक! वाचून ३५ वर्षे होऊन गेली तरी काही प्रसंग अजूनही आठ्वतात. याच लेखकाचे Road Back, हे पुस्तक पण जरूर वाचा. दोन्ही पुस्तके मी एकापाठोपाठ वाचली.

लतिका विवेक

सागर Tue, 03/04/2012 - 14:50

In reply to by सन्जोप राव

सन्जोगरावांशी सहमत आहे

मी पण डिफो ला जाम कंटाळलो होतो.
त्यामानाने एन्जल्स अ‍ॅन्ड डेमन्स मला दा विन्ची कोड पेक्षा उजवे वाटले.
लॉस्ट सिम्बॉल अजून वाचायचे आहे
पण डिसेप्शन पॉईंट डिफो पेक्षा नक्कीच बरे आहे. तरीसुद्धा एकदाच वाचता येते.

एकूणच डॅन ब्राऊनच्या लेखनाचा दर्जा घसरत चालला आहे :(

ऋषिकेश Tue, 03/04/2012 - 15:05

In reply to by सागर

डीफो ला एक वेगळी कल्पनातरी (जरी ती प्रसंगी रटाळपणे फुलवली आहे) आहे. मित्रत्त्वाचा सल्ला, लॉस्ट सिंम्बॉल वाचूच नकोस .. नुसतं पाणी आहे..

जयदीप चिपलकट्टी Sat, 07/01/2012 - 10:09

शंभरेक वर्षांपूर्वी मॉरिस विंटरनित्झ हा एक जगप्रसिद्ध Indologist होऊन गेला. त्याने History of Indian Literature (मूळ जर्मनमध्ये) या नावाने तीन खंडांमध्ये एक ग्रंथ लिहिलेला अाहे. त्यात वेदवाङ्मय, बौद्धवाङ्मय, पुराणे, रामायण-महाभारत, संस्कृत नाटकं अाणि काव्य इत्यादींची फार रंजक चर्चा केलेली अाहे. त्यातला मी सध्या पहिला खंड (वेदवाङ्मयावरचा) वाचतो अाहे; त्यात उर्वशी-पुरुरवा ही गोष्ट, जुगारी माणसाचं गाऱ्हाणं, यमीनं यमाला seduce करण्याचा प्रयत्न करणं (हे सगळं ऋग्वेदात अाहे) यांवर फार छान चर्चा केलेली अाहे.

अशा गोष्टींमध्ये अनेकदा मूळ साहित्यापेक्षा त्यावरची चर्चा जास्त रस घेण्यासारखी असते असा माझा वैयक्तिक अनुभव अाहे. एकदोन वर्षांपूर्वी मी बाणाची 'कादंबरी' ही कादंबरी (इंग्रजी भाषांतरात) वाचली होती. इतका महाभयानक कंटाळवाणा प्रकार त्याअाधी किंवा त्यानंतर दुसरा वाचण्यात अाला नाही. (अगदी नेमाड्यांची 'हिंदू' सुद्धा नाही.) पण 'कादंबरी'वरची साहित्यचर्चा वाचायला माझी हरकत नसते.

जयदीप चिपलकट्टी Thu, 12/01/2012 - 23:31

In reply to by जयदीप चिपलकट्टी

विंटरनित्झचं पुस्तक फार रंगतदार असल्यामुळे मुद्दाम हळूहळू वाचतो अाहे. एक गोष्ट, जी पूर्वी माहिती नव्हती असं नाही पण पुन्हा प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे प्राचीन भारतीय साहित्याबद्दलच्या अनेक प्राथमिक प्रश्नांबद्दल अतोनात अनिश्चितता अाहे.

उदाहरणार्थ, महाभारतातले सर्वात जुने भाग कोणते अाणि केव्हा रचले गेले, नंतर कोणत्या भागांची त्यात केव्हा भर घातली गेली (गीतेबद्दलही तेच), भारतीय युद्धामागे काही ऐतिहासिक बीज अाहे का, या अाणि अशा प्रश्नांसंबंधी अायुष्यभर विचार करणाऱ्या संशोधकांची मतं एकमेकांशी जुळत नाहीत. त्यात पुराव्यांचं स्वरूपच असं अाहे की निश्चित काही ठरवणं पुष्कळदा शक्य दिसत नाही. उदाहरणार्थ, भारतीय युद्ध झालं होतं असं समजून खगोलशास्त्रीय पुराव्यावरून त्याचा काळ ठरवण्याचा प्रयत्न अनेकांनी (उदा. टिळकांनी) केला होता, पण अमुकतमुक श्लोकातल्या एखाद्या वाक्यांशाचा अर्थ कसा लावायचा यात इतका गोंधळ अाहे की गाडी एकतर रुतूनच बसते, नाहीतर बऱ्याच वेगवेगळ्या दिशांना नेता येते.

अर्थात कुठल्याही जुन्या इतिहासाबद्दल थोडंफार असं होणारच, पण भारतासंबंधाने हा वैताग जास्तच अाहे असं वाटतं. उदाहरणार्थ, अरिस्टॉफिनीसच्या 'मेघांचा कोरस' ह्या नाटकाचा पहिला प्रयोग इ.स. पूर्व ४२३ मध्ये झाला हे अापल्याला माहिती अाहे, अाणि याउलट कालिदास कुठल्या शतकात होऊन गेला हेही नक्की माहिती नाही.

तिरशिंगराव Sat, 07/01/2012 - 14:41

सध्या डॉ. विलास बर्डेकरांचं 'पोखिला' हे त्यांच्याच अनुभवावर आधारित पुस्तक वाचतोय! अजून संपूर्ण वाचून झाले नाही पण प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असेच आहे. त्याआधी 'शोध नव्या दिशेचा' हे संदीप वासलेकरांचे पुस्तक वाचले.तेही फारच आवडले.

अरविंद कोल्हटकर Sat, 07/01/2012 - 21:24

आमची अकरा वर्षे - लीलाबाई पटवर्धन हे पुस्तक मी फार वर्षांपूर्वी वाचले होते. कालच मला ते http://oudl.osmania.ac.in/handle/OUDL/18213 येथे डिजिटल स्वरूपात मिळाले आणि मी ते उतरवून घेतले आणि थोडेफार चाळले. पुस्तक लहानच आहे.

लीलाबाई ह्या माधवराव पटवर्धन (माधव जूलियन) ह्यांच्या पत्नी. माधवरावांचे लग्न उशीरा झाले आणि त्यानंतर ११ वर्षांनी वयाच्या चाळीशीतच ते निधन पावले. ह्या ११ वर्षांच्या सहवासाचा मनोज्ञ वृत्तान्त येथे आहे.

ओस्मानिया विद्यापीठाचा हा पुस्तकांचा डिजिटल संग्रह आहे. साहजिकच बहुसंख्य पुस्तके तेलुगु आहेत पण अन्य भाषांतीलहि - मराठीसहित - पुस्तके तेथे आहेत. पूर्ण यादी चाळल्यास एखादे हवे असलेले पुस्तक तेथे मिळेल. श्री.कृ.कोल्हटकरांचे आत्मचरित्र, श्री.म.माटेकृत प्रसिद्ध व्यक्तींच्या चरित्रातील प्रसंगांचा संग्रह अशी काही पुस्तके मला सहजच तेथे दिसली.

असे काही करण्याची सुबुद्धि मुंबई-पुणेसारखी विद्यापीठे आणि अन्य संस्थांना केव्हा होईल?

नंदन Sun, 08/01/2012 - 00:16

In reply to by अरविंद कोल्हटकर

ओस्मानिया विद्यापीठाच्या दुव्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मराठी पुस्तकांची संख्या बर्‍यापैकी आहे. पहिल्या काही पानांतच पुढील पुस्तके सापडली -

१. आगरकरांचा निबंधसंग्रह
२. महाराष्ट्र-कवि-चरित्र - लेखक दामोदर आजगावकर (प्रकाशन वर्षः १८६७)
३. बुढिया की गाय - मुल्कराज आनंद

जयदीप चिपलकट्टी Sun, 08/01/2012 - 07:27

In reply to by अरविंद कोल्हटकर

या संग्रहात खूप काही वाचण्यासारखं अाहे असं दिसतं, अाणि उस्मानिया विद्यापीठाने हे केलं ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटण्यासारखीच गोष्ट अाहे. पण तरीही थोडीफार कटकट केल्याखेरीज राहवत नाही. (अशासारख्या अनेक ठिकाणी येणारी) मुख्य अडचण अशी की देवनागरीतले शब्द रोमन लिपीत कसे लिहायचे याची conventions सगळीकडे सारखी नसल्यामुळे search engine मध्ये ठराविक पुस्तक शोधणं अवघड होतं. उदाहरणार्थ, मी अात्ताच पाहिलं त्यानुसार उस्मानियाच्या catalogue मध्ये केतकरांच्या 'महाराष्ट्रीय ज्ञानकोशा'ची entry अशी अाहे:

Mahaaraashht'ar~y Nj-aanakosh Vibhaaga 12 Vaa
Ketakar Shriidhar Vyan'kat'esha (Mahaaraashht'ar~y Nj-aanakosha Mn'd'al Limit'ed'a, 1925/00/00)

अाता हे असं स्पेलिंग केलं असेल असा अंदाज शोधणाऱ्याला कसा येईल? जर खूप प्रमाणात मराठी पुस्तकं digitize व्हायला हवी असतील तर या प्रश्नावर कुणीतरी काहीतरी तोडगा काढायला हवा, नाहीतर पुस्तकं internet वर अाहेत पण सापडत नाहीत अशी परिस्थिती उद्भवू शकेल.

रोचना Sun, 08/01/2012 - 15:29

In reply to by जयदीप चिपलकट्टी

शुद्धलेखनासारखेच मराठी शब्दांच्या रोमनीकरणाचे नियम राज्य संस्कृती मंडळाला काढता येतील कदाचित, पण ती सर्वत्र पाळली जातीलच याची खात्री नाही. भारतीय भाषांतील शब्दांना रोमन लिपीत लिहीणे हा आधीच त्रास, त्या वर वेगवेगळ्या पद्धती, शुद्धलेखनाचे दोष... त्यापेक्षा किमान शीर्षक तरी रोमन लिपीसहित नागरीत ही (किंवा ज्या भाषेतील पुस्तक आहे त्या भाषेच्या लिपीत) देणे शक्य नाही का?

विदेशी विद्यापीठांच्या वाचनालय सूची बहुतेक एकच नियम पाळतात (डायक्रिटिक्स सहित संस्कृत शब्दांसाठी प्रस्थापित पद्धतीवरून - जयदीप चिपलकट्टी ला jayadipa cipalakatti, शिवाजी ला sivaji, चांदोरकर ला camdorakara) पण तेथेही घोळ होतोच. मध्यंतरी एखादे पुस्तक शोधत असताना निरनिराळ्या स्पेलिंगचा प्रयोग करून ते शोधून काढण्याचं वेडच लागलं होतं. इथेही तेच होणार आहे असं दिसतंय!

उस्मानिया च्या रोमनीकरणात आनंदीआनंदच दिसतोय. उदा. सावरकर ला saavarkara नाही तर saavaarkara केलंय. पण तरी २४००० पुस्तकांना असे उपलब्ध करून देणे हे फारच कौतुकास्पद आहे. यादीत मराठी पुस्तकं बरीच आहेत.

दुवा दिल्याबद्दल कोल्हटकरांचे अनेक आभार! स्कॅनिंग चांगले झाले आहे का?

जयदीप चिपलकट्टी Sun, 08/01/2012 - 21:50

In reply to by रोचना

> स्कॅनिंग चांगले झाले आहे का?

स्कॅनिंग बरं अाहे. बरंच अवांतर लिहिता येईल, पण थोडक्यात अावरतो:

१. काही पुस्तकं पाण्याने खराब झालेली अाहेत, तेव्हा त्यांच्यावर तसे शेरे मारले अाहेत. एका पुस्तकावर 'DAMAGE BOOK' (sic) असं लिहिलं अाहे, तर एकावर 'THE BOOK WAS DRENCHED. TEXT FLY WITHIN THE BOOK ONLY' असं अाहे. याचा अर्थ मला कळला नाही.

२. मी सध्या तिथून download केलेली केतकरांची 'अाशावादी' ही कादंबरी चाळतो अाहे. (केतकरांच्या कादंबऱ्या हा भलताच गंमतीदार प्रकार अाहे, पण ते सध्या जाऊ दे.) त्यात अशी माहिती मिळाली की १९२७ साली मुंबईतल्या ताज हॉटेलमधल्या खोलीचा रोजचा दर १२ रुपये होता. मी internet वर पाहिलं तर अात्ता तो दहा हजाराच्या अासपास अाहे. म्हणजे दरसाल दरशेकडा अाठ टक्के वाढ झाली.

अरविंद कोल्हटकर Mon, 09/01/2012 - 02:52

In reply to by जयदीप चिपलकट्टी

'THE BOOK WAS DRENCHED' ही ह्या क्षेत्रातील पारिभाषिक संज्ञा आहे असे वाटते कारण DLI च्या पुस्तकांवरहि मी हा उल्लेख कधीकधी पाहिल्याचे स्मरते. DLI आणि OUDL ह्या partner sites आहेत असेहि वाटते. DRENCHED म्हणजे भिजलेले असा अर्थ नसावा. गूगलमध्ये शोध घेऊनहि अधिक काही कळले नाही.

अशोक पाटील Mon, 09/01/2012 - 11:13

In reply to by अरविंद कोल्हटकर

'THE BOOK WAS DRENCHED' ही ह्या क्षेत्रातील पारिभाषिक संज्ञा आहे.
+ सहमत.
याचा संबंध कॉम्प्युटर व्हायरस त्रासाशी असण्याची शक्यता आहे. जीर्ण झालेल्या पुस्तकांचे स्कॅनिंग करताना काही वेळा व्हायरसची शक्यता गृहित धरली जाते आणि मग त्यावर उपलब्ध असलेले 'हीलिंग' करताना मूळ पुस्तकातील काही मजकूर गायब होण्याचीही भीती असते. नेमके कुठले पान वा कुठला मजकूर अदृश्य झाला आहे हे काहीवेळा समजत नसते म्हणून "द बुक वॉज ड्रेन्च्ड" असा सावधानतेचा इशारा ऑनलाईन वाचकाला दिला जातो.

"Drench" ही संज्ञा मेडिसिन क्षेत्रात "Purge" या अर्थानेही वापरली जाते. अ‍ॅनिमल हजबंडरीमध्ये Drench Term सापडते. रेसच्या घोड्याला ठाकठीक ठेवण्यासाठी त्याचे वेळोवेळी "Drenching" म्हणजेच "Purging" करण्यात येते. या अनुषंगाने (ई-बुक्स प्रणाली) पुस्तकाच्याबाबतीतही Drench संकल्पना उतरली असण्याची शक्यता आहे. अर्थात या रितीने ऑनलाईन उपलब्ध होणार्‍या सर्वच पुस्तकांच्याबाबतीत अशी चेतावणी असत नाही हेही खरेच.

अशोक पाटील

सागर Tue, 03/04/2012 - 14:53

In reply to by अशोक पाटील

अशोक काका,

अगदी सुंदर माहिती. मी पण कित्येक दिवस हाच विचार करत होतो की ड्रेन्च हा शब्द ई-पुस्तकांच्या बाबतीत कशासाठी वापरला जात असेल ?
आज कळाले :)

मनापासून धन्यवाद काका

धनंजय Sat, 07/01/2012 - 21:42

श्री. ना. पेंडसे यांची कादंबरी "गारंबीचा बापू" वाचली. कादंबरी चांगलीच आहे. नरहर कुरुंदकरांनी एक उत्कृष्ट कादंबरी म्हणून हिच्याबाबत विस्ताराने चर्चा केलेली आहे.
मागच्या वर्षी मी पेंडशांची "लव्हाळी" वाचली होती. ती प्रचंड आवडली होती. "गारंबीचा बापू" देखील आवडली. (पण "लव्हाळी" अधिक आवडली होती.) कुरुंदकरांनी आवडण्यासाठी जी कारणे दिली होती, त्यापेक्षा वेगळ्या कारणांकरिता आवडली. (असे वाटले.) म्हणून आता कुरुंदकरांचे समीक्षण पुन्हा नीट वाचावे लागेल.

गारंबी या छोट्या गावात सर्व लोक "ठेवीयले जैसे तैसेची राहावे" असे गतानुगतिक जीवन जगत असतात. त्यात तेच-ते हेवेदावे आणि मनाचा छोटेपणा आलाच. त्या गावात विठोबा नावाच्या एका बावळट, नेमस्त पण प्रेमळ माणसाच्या दरिद्री घरी हा बापू जन्मला. त्याच्या आईशी व्यभिचारी संबंध ठेवणार्‍या खोताने सोयीस्कररीत्या तिचे लग्न या गरीब ब्राम्हण पाणक्याशी लावून दिले होते. बापूसाठी पारंपरिक जीवन कुठले ठरले होते? - असेच खोताच्या तुकड्यांकरिता मिंधेपणाने हरकाम्या होणे. पण तो बंडखोर असतो. दापोलीला जाऊन पैसे कमावतो. परत गारंबीला येऊन सुपारीचा व्यापार जोमाने सुरू करतो. पैशाने तो गावाचा सन्मान विकत घेऊ शकला असता. पण एक मोठा तपशील आडवा आला - त्याच्या दरिद्री अवस्थेत त्याला माया दाखवणार्‍या एका गुरव विधवेबरोबर तो बिनलग्नाचा राहू लागला.

तसे पाहिले तर कादंबरीला स्पष्ट "कथानक" नाही. बापूचे वेगवेगळ्या लोकांशी बदलणारे संबंध, त्याच्या आयुष्यातील घटनाक्रम... हाच कादंबरीचा आशय आहे.

कादंबरी उत्कृष्ट आहे, हे सांगताना कुरुंदकरांना ही एक धडपड करावी लागते - बापूच्या दिलदारपणा भावणे म्हणजे त्याच्या व्यभिचाराचे समर्थन नव्हे, हे त्यांना मुद्दामून सांगावे लागते. मला तरी हा मुद्दा नि:संदर्भ वाटतो. किंबहुना लेखकाच्या हेतूच्या विरोधात जाणारे विश्लेषण आहे. राधा गुरवीण आणि बापू यांच्यातला संबंध परस्पर आदराचा आहे. ते एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांबाबत काळजी करतात. असा हा संबंध मुळी व्यभिचार नाहीच, असे कादंबरीकाराचे मत असल्याचे मला स्पष्ट दिसते. (माझे मतही तसेच आहे, हे सांगणे नलगे.)

परंतु एक गोष्ट पुन्हापुन्हा लक्षात घेतली पाहिजे : कादंबरी १९५०च्या दशकात लिहिली गेली, कुरुंदकरांचे समीक्षण १९६०च्या दशकात लिहिले गेले, आणि "व्यभिचार" वगैरे प्रकाराबाबत माझे नैतिक विश्लेषण २०१० दशकातले आहे...

फारएण्ड Sun, 08/01/2012 - 12:59

In reply to by धनंजय

गारंबीचा बापू जास्त चांगली वाटलीच, पण लव्हाळीही आवडली होती. लव्हाळी म्हणजे बटाट्याच्या चाळीची आधीची व्हर्जन वाटली होती :)

पेंडश्यांचीच रथचक्र वाचल्यावर या दोन्ही जास्त आवडल्या होत्या. रथचक्र फारच निगेटिव्ह वाटली होती.

ऋषिकेश Mon, 09/01/2012 - 08:50

आजच साठे फायकस वाचुन संपवली (खरं तर संपूच नये असे वाटत होते पण संपली )
'साठे/फायकस' म्हटल्यावर अजुन काहि लिहायला नकोच!

सन्जोप राव Tue, 10/01/2012 - 07:15

In reply to by ऋषिकेश

'साठे फायकस' विषयी सहमत. ही धारपांच्या 'फायकसचे जग' आणि 'पारंब्यांची अखेर' (आणि मला वाटते आणखी एक) या कादंबर्‍या एकत्र करुन केलेली कादंबरी आहे. धारपांच्या उत्कृष्ट लिखाणापैकी एक.

ऋषिकेश Tue, 10/01/2012 - 09:28

In reply to by सन्जोप राव

मला मुळ तीन कादंबर्‍यांची नावे माहित नाहित. मी एकत्रीत कादंबरीच वाचली. कदाचित त्यामुळे एकसंधपणा आला आणि कथानक अजुन खुललं

'अवतार' वगैरे पाश्चात्य कथांच्या रांगेत बसणारी तितकीच ताकदीची, चित्रदर्शी, अद्भुत, रंजक आणि अविश्वनीय परिस्थिती निर्माण करूनही वाचकाला गुंतवून ठेवणारी ही कादंबरी आहे. म्हटलं तर गुढकथा, म्हटलंतर साहस कथा, काहिजण यास विज्ञान-परीकथाही म्हणतील :)

लॉरी टांगटूंगकर Mon, 09/01/2012 - 12:23

देसाइंचे मराठी रियासत चे काही भाग ई स्निप्स वर स्कॅन केलेले मिळाले,तेच वाचतोय सध्या;मराठी इतिहासाचे अभ्यासपूर्ण विवेचन केलेले आहे,पुस्तकान् मध्ये कादंबरी सारखी वर्णने नाहीयेत,भाषा थोडी जड आहे इतकेच.
मला मिळालेले भाग
भाग दुसरा १७४९ ते १७६१
भाग तिसरा १७६१ ते १७७२ (यातला २ वर्षांचा भाग मिळत नाहीये नारायणराव पेशवे कालीन )
भाग चौथा १७७४ ते १७८३
भाग पाचवा १७७५ ते १८४८

कोणाकडे पहिला भाग आणि तिसऱ्या भागाचा मिसिंग पार्ट असला तर लिंक द्यावी

घंटासूर Tue, 10/01/2012 - 09:25

In reply to by लॉरी टांगटूंगकर

येथे पहिला आणि चौथा सोडून इतर सर्व भाग आहेत.

http://www.archive.org/search.php?query=sardesai

पहिला भाग कुठेच मिळाला नाही, चौथ्या भागाची लिंक दिलीत तर बरे होईल.

सागर Tue, 03/04/2012 - 15:00

In reply to by मेघना भुस्कुटे

मी पण रियासतचा चौथा भागच शोधतो आहे
रियासतचे बाकी सर्व भाग आर्काईव्ह.ओआरजी व मेघनाने दिलेल्या दुव्यावरुन कधीच घेतलेले होते

आळश्यांचा राजा Tue, 10/01/2012 - 10:57

In reply to by नितिन थत्ते

वरवर चाळता एक अप्रतिम पुस्तक वाटतेय. सुरुवात केलीय, कधी संपेल याची गॅरंटी नाही! लिहिण्याची शैली वेगवान आणि खिळवून ठेवणारी आहे.

प्रोलोग मध्ये लेखकाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. यासंदर्भात लेखकाने एक सुरेख उदाहरण दिले आहे. नव्वदीच्या दशकापर्यंत राजपथाच्या दोन्ही बाजूला असंख्य तंबू टाकून देशभरातील विविध मंडळी आपल्या निदर्शनाचे कार्यक्रम २४ बाय ७ चालवत असत. हे तंबू कधीच रिकामे रहात नसत. एक निदर्शन संपले, आपल्या गावी गेले, की तिथे दुसरी मंडळी येत असत. नव्वदीच्या सुरुवातीला या निदर्शक मंडळींना तिथून हाकलून दिले गेले. परदेशी पाहुण्यांसमोर देशातल्या निषेधांचे हे प्रदर्शन सरकारला नकोसे वाटले. मग ही मंडळी जंतरमंतर चौकात गेली. तिथे सरकारच्या दृष्टीआड सृष्टी असली, तरी थेट जनता जनार्दनाच्याच डोळ्यांसमोर ही निदर्शने सुरु झाली. तिथूनही थोड्याच काळात या मंडळींची उचलबांगडी होऊन सध्या अगदीच डोळ्यांआड अशा एका जागी या राहुट्या पडल्या आहेत. लेखक म्हणतो, की मी जर त्या राहुट्या राजपथावरुन उठायच्या अगोदर, रोज राजपथावरुन चालत फेरफटका मारला असता, तर भारतातल्या कानाकोपर्‍यातल्या विविध प्रश्नांचा एक कॅलिडॉस्कोप डोळ्यांसमोर उलगडत गेला असता, रोज रंग बदलणारा कॅलिडॉस्कोप. हे पुस्तक तसेच आहे, असे लेखक म्हणतो. म्हणजे, केवळ समस्यांचा आलेख नव्हे, तर भारताचे - सध्याच्या भारताचे एक चित्र.

तसेच या विषयावर (म्हणजे कण्टेम्पररी इतिहासावर) लिहिणे किती निसरडे असते यावरही भाष्य केले आहे. तटस्थ भूमिका घेऊन लेखकालाही लिहिता येणे शक्य नसते, आणि वाचकालाही तटस्थपणे वाचणे शक्य नसते. याशिवाय भारताचा इतिहास १९४७ लाच कसा काय संपवला जातो, आणि फार फार तर गांधीजींच्या हत्येपर्यंत कसा काय ताणला जातो, यावरही लेखकाने इतर देशांचा दाखला देत मार्मिक भाष्य केले आहे.

पुस्तक न वाचताच दूषणे देणारा मूर्ख असतो असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. मी न वाचताच या पुस्तकाला भूषणे देणारा मूर्ख आहे!

ऋषिकेश Tue, 10/01/2012 - 12:16

In reply to by आळश्यांचा राजा

+१.. लेखन शैली खिळवून ठेवणारी आहे. माझ्याही अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी एक. हे पुस्तक विकतच घेतले आहे. त्यामुळे विषयानुरुप, उत्सुकतेनुरूप वेगवेगळी प्रकरणे वेळोवेळी वाचत असतो.

इथे लेखक बरंचसा तटस्थ असला तरी कधीकधी पाय घसरतोच हे ही नमुद करावे लागेल ;)

नितिन थत्ते Tue, 10/01/2012 - 13:54

In reply to by आळश्यांचा राजा

त्या प्रोलॉगमध्ये आणखीही एक भूमिका मांडली आहे.

एखाद्या घटनेचे/कृतीचे मूल्यमापन त्या काळी ठाऊक असणार्‍या तथ्यांवरून करायला हवे. आज ठाऊक असलेल्या माहितीवर आधारून त्यावेळी केलेल्या कृतीचे मूल्यमापन हे पात्रांसाठी अन्यायकारक असते (किंवा कधी कधी वाजवीपेक्षा जास्त फेवरेबल*).

* हा माझा विस्तार.

श्रावण मोडक Wed, 11/01/2012 - 18:51

In reply to by नितिन थत्ते

एखाद्या घटनेचे/कृतीचे मूल्यमापन त्या काळी ठाऊक असणार्‍या तथ्यांवरून करायला हवे. आज ठाऊक असलेल्या माहितीवर आधारून त्यावेळी केलेल्या कृतीचे मूल्यमापन हे पात्रांसाठी अन्यायकारक असते (किंवा कधी कधी वाजवीपेक्षा जास्त फेवरेबल*).

कंसासकट, हा शहाणपणा आहे. सार्वत्रिक दिसेल तेव्हा बरेच वाद टळतील. :)

मी Mon, 09/01/2012 - 15:47

मिलिंद बोकिलांचं शाळा वाचतोय, छान आहे, पहिल्या काही पानात मला असा प्रश्न पडला कि कादंबरी ही मध्यमवयीन सवर्ण(असे वाटते खरे) नायकाच्या भुमिकेतुन लिहिली आहे, त्या भुमिकेशी जे समरस होउ शकतिल तेच खर्‍या अर्थी कथेची मजा अनुभवू शकतिल, म्हणजे जोशीछाप मुलानां कादंबरी जास्त आवडेल पण, शिरोडकर, सुर्‍या, चित्रे किंवा इतर पात्रे ह्याच्यां भुमिकेतिल लोकांना ही कथा कशी वाटली हे वाचायला अवडेल.

अर्थात मुख्य भुमिकेशी समरस न होता देखिल कथा आवडू शकते हे सांगणे नलगे.

ऋषिकेश Mon, 09/01/2012 - 17:16

In reply to by मी

मी यांचा मुद्दा रोचक आहे. माझं शालेय जीवन या चार मित्रांपैकी एकाहीसारखं नसलं तरी ते चौघेही शालेय जीवनात कुठेनं कुठे भेटले होतेच. 'शाळा' म्हटल्यावर त्यात येणार्‍या अनेक गोष्टींना शब्दरुप हे पुस्तक देतं म्हणून ते मला भावलं. मात्र हे मत 'मुलांच्या' (मुलगे) दृष्टीकोनातून आहे. बहुतांश एकेकाळच्या मोठ्या शहरांच्या उपनगरीय विद्यार्थ्यांना किंवा गेल्या १०-१५ वर्षातील निमशहरी विद्यार्थांपैकी मुलग्यांना हे पुस्तक आवडावे.

मुलींमधे मला दोन भुमिका दिसल्या. माझ्या बर्‍याच परिचित मुलींना हे पुस्तक म्हणून आवडलं असलं तरी त्याचं 'गारूड' झालं नाहि. त्यातील अनेक प्रसंग त्याकाळीही शाळेत होत अस्तं याबद्दल त्या (या वयातही) साशंक होत्या.

काहि चांगल्या मैत्रिणींनी शालेय जीवनातील काहि गोष्टी सांगितल्यावर मुलींच्या विश्वाला केंद्रस्थानी ठेऊन / एका नायिकेच्या नजरेतून शाळा लिहिल्यास सगळे चित्रणच बदलेल असे वाटले!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/01/2012 - 22:25

In reply to by ऋषिकेश

'शाळा' पुस्तकातली शाळा आणि माझं शालेय जीवन यात फार फरक नव्हता. आमच्या वर्गात/शाळेत कादंबरीत वर्णन केलेले अनेक प्रसंग झाले आहेत, तपशीलात किंचित बदल असेल.

जंतूंच्या मताप्रमाणे 'शाळा' मलाही गोग्गोड वाटतं. मला शाळा आवडत नाही असं नाही, पण जेव्हा डोक्याला फार ताप देणारं वाचायचं नसेल तेव्हा मला 'शाळा' पुन्हा वाचायला आवडतं. मधलीच चार पानं वाचून पुन्हा पुस्तक जागेवर गेलं तरी फरक पडत नाही असं काही!
पण त्या किंवा अगदी माझ्याही शाळकरी काळातल्या मुलींच्या भावविश्वातल्या गोष्टी यापेक्षाही जास्त गोग्गोड होतील अशी भीती वाटते. त्यापेक्षा किंचित मोठ्या वयातल्या मुलींबद्दल काही लिहील्यास, शाळकरी वयात परीकथा वाचणार्‍या सर्वसाधारण मुली पुढे नोकरी नव्हे तर करीयरचा विचार करायला लागतात, इ.इ. बदलांबद्दल (चित्रपटांत तरूण मुलींची पात्र अगदीच गोग्गोड दिसतात नाहीतर अगदीच बारबाला टाईप्स) अधिक परिणामकारक आणि वाचनीय लिहीता येईल असं वाटतं.

चिंतातुर जंतू Mon, 09/01/2012 - 19:42

In reply to by मी

कादंबरी ही मध्यमवयीन सवर्ण(असे वाटते खरे) नायकाच्या भुमिकेतुन लिहिली आहे, त्या भुमिकेशी जे समरस होउ शकतिल तेच खर्‍या अर्थी कथेची मजा अनुभवू शकतिल, म्हणजे जोशीछाप मुलानां कादंबरी जास्त आवडेल पण, शिरोडकर, सुर्‍या, चित्रे किंवा इतर पात्रे ह्याच्यां भुमिकेतिल लोकांना ही कथा कशी वाटली हे वाचायला अवडेल.

अर्थात मुख्य भुमिकेशी समरस न होता देखिल कथा आवडू शकते हे सांगणे नलगे.

मुख्य भूमिकेशी समरस होता येऊनदेखील कादंबरी आवडली नाही असंही होऊ शकतं. व्यक्तिगत पार्श्वभूमी नायकाच्या पात्राशी मिळतीजुळती असूनही मला 'शाळा' कादंबरी विशेष भावली नव्हती. त्यातलं व्यक्तिचित्रण काहीसं ठोकळेबाज वाटलं होतं आणि कादंबरी जरा गोग्गोड झाली आहे असं वाटलं होतं. म्हणून मी इथे चित्रपटाच्या चांगल्यावाईट असण्याबद्दल बोलण्यापेक्षा केवळ माध्यमांतर म्हणून विचार केला होता.

मी Wed, 11/01/2012 - 12:54

In reply to by चिंतातुर जंतू

ऋषिकेश - तुमच्या मुद्द्याशी सहमत, ह्या गोष्टीच्या दुसर्‍या बाजू बघायला नक्किच आवडतील.

३_१४ विक्षिप्त अदिती - मान्य, शाळेची अनेक वर्ष एवढ्याश्या कथेत कोंबल्यामुळे मधला कंटाळवाणा भाग लेखकाने वगळला असावा असे वाटते, तसेही ह्याव्यतिरिक्त फार धाडसी असे काही अशा नायकाबाबत प्रत्यक्ष आयुष्यात घडतही नाही असे मला वाटते, आणि हो, मुलींबद्दल अजुन छान लिहीता येइल असे मला देखिल वाटते, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गोड आणि रिबेलिअस ह्या दोन टोकाच्या स्पेक्ट्रम-मधल्या मुलींविषयी फार वाचल्याचे स्मरत नाही.

चिंतातुर जंतू - बरेच दिवस शाळा वाचावी म्हणत असतानाच तुमचा चित्रपटविषयी लेख दिसला,तो वाचण्याअगोदर पुस्तक वाचायला घेतलं, चांगलच गोग्गोड आहे हो, पण अदितीप्रमाणे डोकं जड झालं कि स्मरणरंजनासाठी उत्तम आहे.

रोचना Sun, 15/01/2012 - 14:07

In reply to by चिंतातुर जंतू

कादंबरी गोग्गोड होतीच, पण अदितीने म्हटल्यासारखे सहज रात्री कामं झाल्यावर झोप येण्याआधी पडून वाचायला ठीक होती. पण "पोटात खड्डा पडला" असे काही वाक्य पुन्हा पुन्हा वाचून कंटाळ आल्याचे आठवते. कादंबरीच्या शेवटाने मला चकित केले होते - अंतही गोग्गोडच असेल असं आधी वाटलं होतं पण तसं न झाल्याने आनंद झाला होता.

अशोक पाटील Tue, 10/01/2012 - 22:22

पुस्तक हाती आल्याआल्या सहज म्हणून समोर आले ते एक पान उलटले आणि वाचू लागलो. तिथे होते उर्दूत विविध रंगांची नावे ~ उदा. जाफरानी (केशरी), कासनी (गुलाबी), प्याजी (कांद्याच्या पातीचा), कत्थई (काथ्या), ऊदा (जांभळा), तुरई (भडक पिवळा), सुर्मई (राखाडी), शफ्तालू (मरुन), उन्नाबी (तपकिरी), सन्दली (चंदनी). हरखूनच गेलो. शिवाय सब्जी, मोतिया, आस्मानी, बैंगनी ही काहीशी परिचित नावे. ही उर्दू भाषेची नजाकत आणि अशा हैद्राबादी वातावरणात वाढत चाललेली १९४०-४५ मध्येही बुरखा घालण्यास स्पष्ट नकार देणारी एक बंडखोर तरीही कवि मनाची मुस्लिम युवती....शौकत खानम....कैफी आझमीची प्रेयसी आणि नंतर पत्नी, शबानाची आई. आत्मचरित्राचे नाव "याद के रहगुजर", मराठीत "कैफी आणि मी".

डॉ.अमर्त्य सेन या पुस्तकाबद्दल म्हणतात "हे पुस्तक खूप सुंदर आहे एवढंच म्हणणं म्हणजे त्या पुस्तकाचं महत्व कमी लेखण्यासारखं आहे." तर इन्द्रकुमार गुजराल लिहितात "हातात घेतल्यावर पूर्ण वाचल्याशिवाय तुम्ही ती खाली ठेवूच शकणार नाही, अशी कहाणी". खरंय.

आपल्या आत्मकथेचा प्रारंभ हैद्राबाद येथील घरगुती वातावरणापासून सुरू करण्याचे कारणही त्याच घरी १९४० च्या दशकातील प्रख्यात शायर जाफरी, मजाज [या मजाजवर तर एक वेगळा लेख होऊ शकेल], मख्दूम, मजरूह, साहिर, जाँ निस्सर अख्तर आणि अर्थातच या सर्वांपेक्षा वेगळा असलेला कमालीचा देखणा कैफी (या पुस्तकात कैफीच्या तारुण्यातील फोटो पाहून तर त्याच्यासमोर दिलीप देव राज हे त्या काळातील नायक फिके वाटू लागतात) यांचा वावर मैफिलीच्या निमित्ताने खानम यांच्या वाड्यावर असायचा. वडिल अबकारी खात्यात इन्स्पेक्टर आणि अत्यंत पुरोगामी विचाराचे. मुलीनी इंग्रजी शिक्षण घेतलेच पाहिजे अशा त्या काळच्या बंडखोर वाटू शकणार्‍या विचाराचे ते असल्याने त्यांच्या विचाराचा प्रभाव शौकत आणि अन्य मुलांवर पडला नसला तर नवलच. मग याच वैचारिक भूमिकेतून पुरोगामी विचारांच्या कविसमवेत तिची उठबस अगदी १५ व्या वर्षापासून झाली आणि त्यात अग्रस्थानी 'कैफी'.

एक आठवड्याच्या मुशायर्‍याच्या दरम्यान शौकतचे कैफीवर आणि कैफीचे शौकतवर 'दिलोजान से मुहब्बत'. मुंबईला परतताना त्या गर्दीतही कैफीने तिला एक कविता दिली. त्यातील पहिल्या दोन ओळी

"शिगुफ्ती का लताफत का शाहकर हो तुम
फकत बहार नही हासिले-भार हो तुम"
(फुललेल्या कोमलतेचा सर्वोत्तम आविष्कार आहेस तू
फक्त बहार नाही तर सर्व ऋतूंचा, अर्क आहेस तू)

वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळेच्या प्रथेनुसार एकीकडे शौकतचेही दुसर्‍याच एका नातेवाईक मुलाशी निकाह निश्चित झाला होता तर दुसरीकडे कैफीच्या ज्येष्ठांनी त्यांचे लग्न मुंबईत मुक्रर केले होते. आणि हे दोघे तर साहित्यप्रेमाने वेडे झाले होते.

पुढे मग त्यांची ती सलग ५५ वर्षाची साथ. अप्रतिमरित्या शब्दबद्ध झाला आहे सारा प्रवास या पुस्तकात ~ "कैफी आणि मी"

अशोक पाटील

रुची Tue, 10/01/2012 - 21:43

वरील उस्मानिया विद्यापीठाच्या दुव्याबद्दल आभार. सहसा नजरेला पडणारी बरीच जुनी पुस्तके या संग्रहात दिसली आणि मी लीलाबाईंचे ‘आमची अकरा वर्षे’ वाचले. वाचायला सोपे आणि छोटे असलेले पुस्तक वाचल्यानंतर अनेक विचार मनात घोंघावत राहिले. पुस्तकाचा काळ शंभरेक वर्षापूर्वीचा असल्याने ‘सुधारक’ ही संकल्पना आता किती बदलली आहें आणि तरीदेखील समाजातील विविध घटकांचे परस्परांतील संबधांचे राजकारण किती सारखेच राहिले आहें ते प्रकर्षाने जाणवले.
पुस्तकात अनेक खासगी अनुभव सांगितले आहेत आणि त्यांच्या नात्यातले ताणतणावही प्रांजळपणे मांडले आहेत पण तरीही सर्वच गोष्टी प्रामाणिकपणे लिहिल्या आहेत की काही प्रमाणात माधव जुलियनांविषयीचे लोकांचे पूर्वग्रह दूर करण्यासाठी, त्यांच्याविषयीचे कुतूहल शमवून त्यांच्या पश्चात त्यांच्यावरची किल्मिषे दूर करण्यासाठी लिहिले आहें हा प्रश्न पडतो. फर्ग्युसन कॉलेजमधून माधवरावांना नेमके का बाहेर पडावे लागले हे बरेच अप्रत्यक्षपणे लिहिले आहें आणि ते त्याकाळच्या सभ्यतेच्या संकेतांशी सुसंगतच आहें पण तरीही एका विद्वान प्राध्यापकाला पद्द्च्युत व्हावे लागण्यासारखा कोणता ठपका त्यांच्यावर होता हे नीटसे समजले नाही. प्रत्यक्ष लीलाबाईंनीही पहिल्यांदा त्या कारणावरून लग्नास साफ नकार दिला होता पण पुढे आपला विचार बदलला. बाकी एखाद्या स्त्रीला समाजबहिष्कृत करायचे असेल तर अजूनही तिच्या चारित्र्यावरच हल्ले केले जातात पण त्याकाळी पुरुषांनाही या कारणाने आपले समाजातले स्थान घालवावे लागत होते, इतकेच नव्हे तर आपल्या उपजीवीकेलाही गमवावे लागत होते हे वाचून नवल वाटले.
लीलाबाईंचा आपल्या रुपाबद्दलचा न्यूनगंड आणि त्यांची इतरांकडून झालेली अवहेलना वाचून खिन्न वाटले. कालपरत्वे एखाद्याच्या समोर त्याच्या रुपाबद्दल काय बोलणे शिष्टसंमत आहें याचे संकेत बदलले असले तरी स्त्रीच्या आकर्षकतेवरुनच तिची किंमत करण्याची मानसिकता दुर्दैवाने अजूनही तशीच आहें.
त्या काळच्या सुधारकांत पाश्चात्य संस्कृतीचे असलेले सुप्त आकर्षणही बऱ्याच संर्दभांवरून जाणवते मग ते पेहेरावाविषयी असो, टेनिससारखे खेळ खेळण्याविषयी असो किंवा प्रेमविवाहाबद्दलच्या आकर्षणाविषयी असो. सनातनी विचारसरणीमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याची होणारी घुसमट त्याला कारणीभूत होती का हा स्वतंत्र विषय आहें.
असो. प्रतिसाद बराच लांबला पण बरेच दिवसांनी यासारखे पुस्तक वाचायला मिळले आणि त्यासाठी अरविंद कोल्हटकरांचे पुनःश्च आभार.

अरविंद कोल्हटकर Thu, 12/01/2012 - 09:46

In reply to by रुची

तरीही एका विद्वान प्राध्यापकाला पद्द्च्युत व्हावे लागण्यासारखा कोणता ठपका त्यांच्यावर होता हे नीटसे समजले नाही.>

गं.दे.खानोलकर आणि वि.द. घाटे ह्यांनीहि मा.ज्यू. ह्यांच्याविषयी लिहिलेले बरेच मी कैक वर्षांपूर्वी वाचले होते त्यावरून आठवणीने लिहितो.

डे.ए.सोसायटीतील राजकारणाने त्यांचा बळीचा बकरा केला आणि त्याला तात्कालिक कारण म्हणजे वरदा नावाच्या एका (हैदराबादहून?) आलेल्या विद्यार्थिनीबरोबर त्यांचे टेनिस खेळणे. पुण्यातील तत्कालीन सोवळ्या वातावरणाला एव्हढे पुरेसे होते.

अर्थात ते स्वत:हि विक्षिप्तच होते. अत्र्यांनी 'झेंडूची फुले'च्या प्रस्तावनेच ह्या विक्षिप्तपणाचे मजेदार वर्णन केले आहे. त्यांच्या विक्षिप्तपणामागे काही विचार बहुतेक नसावा पण 'घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्' प्रकारची प्रसिद्धीची तहान होती असे अत्र्यांचे म्हणणे.

त्यांच्या विक्षिप्तपणाचे एक छोटे उदाहरण. नुकतेच त्यांचे छंदोविचार हे विद्वत्तापूर्ण D.Litt. पदवीचे पुस्तक मी वाचले. त्यात सर्वत्र त्यांच्या भाषाशुद्धीच्या तत्त्वांना अनुसरून अनुस्वारांना फाटा दिला आहे आणि ते परसवर्णात लिहिले आहेत. डोङ्गर (डोंगर), कण्टाळा (कंटाळा), पञ्जाब (पंजाब), कोशिम्बीर (कोशिंबीर) असे शब्द आड आले की अंगावर शहारा येतो!

आळश्यांचा राजा Thu, 12/01/2012 - 15:24

In reply to by अरविंद कोल्हटकर

माधव जूलियन असे लिहिले जाते असे वाटते. माझ्या परिचयाच्या एका व्यक्तींनी याबाबत माधवरावही आग्रही असत असे सांगितले आहे. खरे खोटे माहित नाही. पण 'आमची अकरा वर्षे' मध्येही जूलियन असाच उल्लेख आहे. 'ज्यू' नाही.

अशोक पाटील Mon, 16/01/2012 - 11:38

In reply to by आळश्यांचा राजा

"याबाबत माधवरावही आग्रही असत"

'जूलियन' बरोबर आहे. त्यातही "न" चा पूर्ण उच्चार वाचकांनी करू नये म्हणून पुस्तकांवर लेखकाचे नाव 'माधव जूलियन्' असे छापले जावे अशीही त्यानी व्हीनस प्रकाशनच्या सदाशिव पाध्येना सांगितल्याचे क्षीरसागरांनी नमूद केले आहे. बाकी आपल्या लिखाणात ते "इ" आणि "ई" या स्वरांचे अवतरण अ ला वेलांटी देऊनच का करत असत हा भाषाशास्त्राच्या अभ्यासकांच्या दृष्टीने एक प्रश्नच आहे. [इथे 'ऐसी अक्षरे' वर या क्षणीदेखील 'अ' ला पहिली वेलांटी देण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे "ऐ" असे दृश्य येते तर दुसरी देताना "अई" टंकले जाते]

ग्रन्थ, साङ्गता, प्रसङ्गी, कादम्बरी, मण्डळ, मनोरञजन, सन्धि अशी आणखी काही माधवरावांच्या दृष्टीने लिखाणाची योग्य रूपे.

ज्येष्ठ व्यक्तीसाठी 'श्री.' असा सर्वमान्य आदरार्थी उल्लेख करण्याऐवजी ते 'रा.' असेच लिहित.

अशोक पाटील

मराठे Tue, 10/01/2012 - 22:58

नुकतंच 'प्लॅटफॉर्म नं. झिरो' वाचून संपवलं. रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणार्‍या आणि नुकत्याच पौगंडावस्थेत पोहोचलेल्यामुलांचं जिवन त्यातून दिसून येतं. रोजच्या रोज आपल्या नजरेला पडूनही न दिसणारी ही पोरं.
प्लॅटफॉर्म हेच त्यांचं जग, तिथलीच आणि आजूबाजूच्या वस्तीत राहणारी मुलं ही त्यांची कुटूंब, आणि रेल्वे पोलिस म्हणजे.... ह्या सर्व गुलामांना राबवून घेणारा निष्ठूर मालक. टीनएजर्स असल्यामुळे त्यांच्या समस्या अतिशय वेगळ्या आहेत. त्या फक्त चोरीमारी आणि वाईट व्यसनं येवढ्यापुरत्याच मर्यादीत नाहीत. त्यांच्या समस्यांचं रूट कॉज अ‍ॅनालिसिस करत गेलं तर वेगळंच सत्य बर्‍याचदा बाहेर पडतं.

असो, लेखिकेचं नाव विसरलो, अमिता नायर की नायडू असं काहीसं आहे. साहित्यिक दृष्ट्या अगदी फार वरच्या श्रेणीतल्या नसल्या तरी वेगळ्या विषयावरच्या ह्या कथा नक्कीच वाचनीय आहेत.

ऋषिकेश Wed, 11/01/2012 - 10:46

अरविंदराव, ओस्मानियाच्या दुव्याबद्दल आभार. तेथील 'सौ. कमलाबाई टिळक' याचा 'हृदयशारदा' हा कथासंग्रह वाचत आहे.
१९३२ मधल्या कथा असल्या,तरी हल्लीच्या मासिकांतील अनेक कौटुंबिककथांपेक्षा उजव्या आणि ठसठशीत वाटल्या.
दुव्याबद्दल पुन्हा एकवार अनेक आभार

राजेश घासकडवी Wed, 11/01/2012 - 18:15

सध्या इटालो कॅल्व्हिनोच्या प्रेमात आहे. नंदनमुळे त्याचं 'मार्कोव्हाल्डो - ऑर सीझन्स इन द सिटी' हे पुस्तक वाचलं आणि ते प्रचंड आवडलं. या माणसाला काव्यमय प्रवाही गद्य लिहिण्याची वाईट्ट खोड आहे, त्यामुळे वाचायला घेतलं की संथ पाण्यातून वहावत जात असल्याप्रमाणे वाटतं. पुढे जाण्यासाठी काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत, जमिनीवर यावंसं वाटत नाही.

ते पुस्तक आवडल्यामुळे त्याचं इन्व्हिजिबल सिटीज वाचायला घेतलं, आणि थक्क झालो. प्रत्येक परिच्छेदात एखादी सुंदर गजल लिहिल्यासारखं लेखन आहे. गुंगवून टाकणारं. वरवर बघताना कुब्लाई खानाला मार्को पोलो वेगवेगळ्या शहरांविषयी माहिती सांगतो अशी रचना आहे. प्रत्येक शहरासाठी एक पान - काही वेळा जेमतेम दोनशे शब्द. पण मधुशालाप्रमाणे शहरं ही रूपकं आहेत, दरवेळी वेगवेगळ्या गोष्टींसाठी.

अजून हे पुस्तक पूर्ण झालेलं नाही. जेमतेम शंभर पानांचं असल्यामुळे लवकर संपेल अशी भीती वाटते.

चिंतातुर जंतू Thu, 12/01/2012 - 12:59

In reply to by राजेश घासकडवी

ज्याला नोबेल न देऊन नोबेल समितीनं आपलीच पत घालवली असा इटालो कॅल्विनो! त्याच्या चोरांच्या कथा पण नक्की वाच!

रोचना Sun, 15/01/2012 - 13:29

परवा प्रा. कृ. स. अर्जुनवाडकर यांनी संपादन केलेल्या "महाराष्ट्र प्रयोग चंद्रिका" नावाच्या एका जुन्या मराठी व्याकरणाचा उल्लेख वाचला. हा तंजावरला रचला गेलेला होता. वाचनालयातच त्याची प्रत सापडली नाही, पण घरी आल्यावर सहज रोमन आणि नागरीत गुगलून पाहिलं. तर अर्जुनवाडकरांच्या लेखनाला वाहिलेले संकेतस्थळ सापडले. त्यांनी ललित मासिकात ८०च्या दशकात लिहीलेले "पंतोजी" या टोपणनावाचे मराठी शुद्धलेखनावरचे लेख तेथे वाचायला मिळाले. अतिशय ठाम मतमांडणी, आणि धारदार, चिपळूणकरी वळणाची टीका हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
स्थळावर त्यांचा पत्ता होता, मग मी डिरेक्टरीतून त्यांचा नंबर शोधून "प्रयोगचंद्रिका" त्यांच्याच कडे मिळते का हे विचारायला गेले. त्यांच्याकडे ते दुर्दैवाने नव्हते, पण "मराठी व्याकरण: वाद आणि प्रवाद" हे मिळाले. आधुनिक मराठी व्याकरणाच्या घडणीची मस्त चर्चा आहे.

जयदीप चिपलकट्टी Tue, 17/01/2012 - 07:53

In reply to by रोचना

> धारदार, चिपळूणकरी वळणाची टीका हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

अगदी मान्य. मला अनेकदा वाटतं की Fowler's 'Modern English Usage' सारखं काहीतरी मराठीत असायला हवं. (माझ्यातरी माहितीत तसं काही नाही.) चांगलं लेखन वाचण्यातच अानंद असतो असं नाही तर वाईट लेखनाची सालं काढण्यातही तो असतो.

दोनेक वर्षांपूर्वी भारतात गेलो असताना वर्तमानपत्रांमध्ये 'उलटं मराठी' लिहिण्याची चूष फार बळावलेली दिसली. उदाहरणार्थ, 'विविध विभागांनी सादर केले प्रकल्प', 'समुद्रात उड्या टाकून वाचवला जीव', 'निवडणुकीच्या तयारीत पवारांनी घातले लक्ष' असले मथळे खूप पाहायला मिळतात. सरळ 'पवारांनी लक्ष घातले' असं लिहिलं तर काय बिघडेल?

नंदन Sun, 15/01/2012 - 13:41

काफ्काची 'मेटामॉर्फॉसिस' ही छोटेखानी कादंबरी वाचली. बर्‍याच पुस्तकांची नावं ऐकून माहीत असतात, पण काही कारणाने ती वाचायचा योग येत नाही अशा मोठ्या यादीत हे पुस्तक होतं. 'मॅजिकल रिअलिझम'ची शैली म्हणा वा वाङ्मयप्रकार म्हणा, रुजवण्याचे श्रेय ज्या काही पुस्तकांना जाते, त्यातली ही मुख्य कादंबरिका. एक कनिष्ठ मध्यमवर्गीय सेल्समन एका सकाळी जागा होतो ते आपलं रुपांतर कीटकात झालं आहे ह्या जाणीवेने. इतका मोठा बदल घडूनही त्याची पहिली विवंचना ही आपली नोकरी कशी टिकवता येईल हीच असते. पुढे त्याचे आई-वडील आणि बहीण हा बदल कसा स्वीकारतात; माणूस आणि प्राणी ह्यांच्या मधल्या त्रिशंकू अवस्थेत सापडलेल्या त्या कारकुनाला आपली ओळख सापडते का हे ढोबळ कथानक झालं. पण माणसाचं यंत्रवत झालेलं जगणं, अगदी जवळच्या नात्यांतही होणारं शोषण, सर्वसामान्य मापदंडांपेक्षा किंवा बहुमतापेक्षा कोणी वेगळा असला तर त्याला मिळणारी वागणूक ह्या थीम्स फार प्रभावीपणे ह्या पुस्तकातून व्यक्त होतात.

ह्या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन कोलंबियन लेखक गॅब्रियल गार्सिया मार्खेझने लिहिलेली 'वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड' ही कादंबरी हे वाचायच्या यादीतले पुढचे पुस्तक.

रोचना Sun, 15/01/2012 - 22:29

In reply to by नंदन

बर्‍याच पुस्तकांची नावं ऐकून माहीत असतात, पण काही कारणाने ती वाचायचा योग येत नाही अशा मोठ्या यादीत हे पुस्तक होतं.

बर्‍याच लेखकां/पुस्तकांबद्दल "उत्तम! ग्रेट! वेड लावणारा! माझी आवडती लेखिका!" इत्यादी ऐकून, पुन्हा पुन्हा वाचायचा प्रयत्न करूनही जी पुस्तकं जाम वाचवत नाहीत, पूर्ण करता येत नाहीत, अशी ही अनेकांची यादी नक्कीच असेल.

दुर्दैवाने, मार्केज ची "एकांताचे शंभर वर्ष" कादंबरी माझ्या या यादीत आहे. मला मॅजिक रियलिझम आवडते, एकेकाळी रश्दी माझा आवडता लेखक होता, मार्केज च्या शैलीबद्दल, लॅटिन अमेरिकेच्या संस्कृतीत त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल बरेच काही वाचून, खूप उत्साहाने प्रयत्न केले, पण काय की कादंबरीने मनात जमच नाही घेतला. फक्त भयंकर दमदार सुरुवातीचे वाक्य कायमचे डोक्यात बसले - "Many years later, as he faced the firing squad, General Aureliano Buendia was to remember that distant afternoon when his father took him to discover ice." त्यांचे दुसरे एखादे पुस्तक वाचून मग ही वाचायला हवी होती, कदाचित? मी "लीफ स्टॉर्म" हा कथा संग्रह वाचला होता, तो आवडला होता. परत कधीतरी पुन्हा प्रयत्न करीन.

ओर्हान पामुक च्या "माय नेम इज रेड" ची तीच अवस्था (मेघना पेठेंच्या नातिचरामि ची देखील, पण "हंस अकेला" इतका आवडला होता, की कादंबरीला अजून एक चान्स द्यायचाय).

नंदन Mon, 16/01/2012 - 00:50

In reply to by रोचना

'नातिचरामि'च्या अपेक्षाभंगाबद्दल सहमत आहे. कथांपेक्षा वेगळा फॉर्म म्हणून की काय, पण एकंदरीत मामला कुछ जम्या नहीं. 'माय नेम इज रेड' मात्र आवडली होती. काही भाग थोडा संथ असला तरी. दोन संस्कृतींमधला/परस्परविरोधी गोष्टींमधला संघर्ष, 'क्वालिया'ची संकल्पना ह्या त्यातल्या थीम्स रोचक आहेत. पण पहिल्या वाचनात बरंच काही राहून गेल्यासारखं वाटत राहिलं, हेही खरं.
(किंचित अवांतर - जॉन अपडाईकने 'माय नेम इज रेड'बद्दल लिहिलेला एक लेख.)

'सॉलिट्यूड...'वाचायला नुकतीच सुरुवात केली आहे. एकंदरीत मॅजिकल रिअ‍ॅलिझम वाचताना काफ्का -> मार्खेझ -> लॉरा एस्किवेल (लाईक वॉटर फॉर चॉकलेट) -> राहिलेला मुराकामी हा कालक्रम पाळायचे ठरवले आहे. [हजारो ख्वाहिशें ऐसी :)...]

पिवळा डांबिस Tue, 17/01/2012 - 22:56

सध्या मराठीत 'द्रोहपर्व' वाचतोय....
अजेय झणकर याची ही कादंबरी अखेर पेशवाईतल्या कालखंडावर आहे. मुख्य कथानक कॅप्ट्न स्टुअर्ट (इष्टूर फाकडा) आणि वडगावची लढाई यावर केंन्द्रित आहे. लिखाण चांगलं आहे. लिखाणाची स्टाईल गोनीदा आणि इनामदार यांच्या स्टाईलचं हायब्रीड केल्यासारखी जाणवते...

इंग्रजीत 'द हॉर्स दॅट लीप्स थ्रू द क्लाऊडस' हे एरिक टॅमलिखित प्रवासवर्णन वाचतोय...
भन्नाट आहे! हेलसिंकीहून निघून सिल्क रूटवाटे पूर्वीच्या सोवियेत युनियनच्या अजरबैजान, तुर्कमेनिस्तान, किरगिजिस्तान या वाटेवरून पश्चिम चीन, इनर मंगोलिया करत चायनापर्यंतचा प्रवास आहे. हा प्रदेश, तिथले लोक, संस्कॄती, युगुर लोकांचा लढा, चीनचे आणि पाश्चात्य सत्तांचे डावपेच यांचं सुरेख चित्रण आहे. आणि या प्रवासालाही एक विशिष्ट ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी आहे.
मोठं, जवळजवळ ५०० पानांचं पुस्तक आहे आत्ताशी अर्धं पूर्ण केलंय...

नगरीनिरंजन Mon, 16/01/2012 - 11:20

खूप चांगल्या चांगल्या पुस्तकांची माहिती मिळाली आणि लोकांचं किती अफाट वाचन असतं हे पाहून थक्क झालो.
मी स्वतः काहीबाही वाचतोय पण त्याला काही दिशा अन विचार नाही. मिळेल ते खाणार्‍या चिंपांझीसारखा मी मिश्राहारी आहे.
मराठीत नुकतंच राजन खान यांचं रस-अनौरस वाचलं पण आवडलं नाही , अरूण साधूंचं ग्लानिर्भवति वाचून अस्वस्थ झालो, निवडक जयवंत दळवी वाचलं.
इंग्रजीत "Asimov's Science Fiction Magazine 30th Anniversary Anthology", अन्तोन चेखोव्हच्या अनुवादित कथा वाचल्या.
सध्या मिचिओ काकु यांचं "Physics of the Future: How Science Will Shape Human Destiny and Our Daily Lives by the Year 2100" वाचतोय. या पुस्तकाचा परिचय आणि त्यावरची माझी मतं स्वतंत्रपणे लिहायचा विचार करतोय.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 17/01/2012 - 08:20

In reply to by नगरीनिरंजन

खूप चांगल्या चांगल्या पुस्तकांची माहिती मिळाली आणि लोकांचं किती अफाट वाचन असतं हे पाहून थक्क झालो.
मी स्वतः काहीबाही वाचतोय पण त्याला काही दिशा अन विचार नाही. मिळेल ते खाणार्‍या चिंपांझीसारखा मी मिश्राहारी आहे.

माझंही असंच.

निरंजन, काकुचं हे पुस्तक आवडलं असेल तर 'Physics of impossible' ही वाचा.

मराठीत नुकतंच राजन खान यांचं रस-अनौरस वाचलं पण आवडलं नाही

मी 'बाईजात'ची पहिली दोन प्रकरणं वाचून वैतागून बाजूला ठेवलं. मला ते न आवडण्याचं कारण अतिरंजित वर्णनं हे आहे. प्रत्यक्षात हे होतच नाही असं मी म्हणणार नाही. पण बलात्कार हा स्त्रियांवर होणारा अत्याचार आहे याबद्दल किती लिहीणार. Never be afraid to state the obvious हे ठीक आहे, पण त्याचा किती कीस काढायचा!
तुमचं काय मत पडलं?

मी नरहर कुरूंदकरांचं 'जागर' वाचते आहे. स्वतःला समाजवादी म्हणवणार्‍या कुरूंदकरांची भांडवलशाहीबद्दलची मतं वाचून फारच आश्चर्य वाटलं. अर्थशास्त्र शिकण्याची सुरूवात म्हणूनही तो निबंध उत्तम आहे. शिक्षण, आरक्षण संदर्भातले त्यांचे निबंधही रोचक आहेत.

नगरीनिरंजन Tue, 17/01/2012 - 16:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'Physics of impossible' नक्कीच वाचेन.
Physics of Future सुरुवातीला ठीक वाटलं, पण नंतर तोचतोचपणा आल्यासारखा वाटतोय. हॉलीवुडचे साय-फाय चित्रपट ज्यांना खूप आवडतात आणि जे गॅजेटप्रेमी आहेत त्यांना ते पुस्तक आवडेल. मला नंतर नंतर कंटाळा आला. शिवाय मला असे जाणवले की लेखकाचा दृष्टीकोन फक्त अमेरिकेपुरताच सीमित आहे. एक-दोन ठिकाणी 'Our nation' असा उल्लेख आला आहे आणि एका प्रकरणात चीन आणि भारतातल्या मध्यमवर्गाच्या, हॉलीवुडचे चित्रपट पाहून पर्यावरणाच्या दृष्टीने अतिमहागडी अमेरिकन जीवनपद्धती अंगिकारण्याच्या आकर्षणाचा, भविष्यातील एक मोठा प्रश्न म्हणून उल्लेख आला आहे. २१०० सालातल्या एका दिवसाची कल्पना करताना लेखक फक्त न्यूयॉर्कमधलाच दिवस कल्पितो आणि सहजपणे जगातली काही शहरे पाण्याखाली गेली असतील असे म्हणतो.

रस-अनौरस मध्ये लेखकाला नक्की काय सांगायचंय ते नीटसं कळलं नाही. मुख्य पात्राच्या विक्षिप्त वागण्याचे कारण नीट कळत नाही, त्याचे प्रतिभावान असणे ठसत नाही, त्याच्या जवळचे असे का वागतात ते कळत नाही. बराच विचार केल्यावरही अनुवंशिकता आणि संस्कार यांच्यातला संघर्ष लेखकाला मांडायचा होता की अनुवंशिकता आणि संस्कार या दोहोंतला फोलपणा दाखवायचा होता हे कळले नाही.

बाकी असिमॉव्ह्ज ३० यिअर अ‍ॅन्थॉलॉजीमधल्या कथा खूपच छान आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 17/01/2012 - 23:02

In reply to by नगरीनिरंजन

शिवाय मला असे जाणवले की लेखकाचा दृष्टीकोन फक्त अमेरिकेपुरताच सीमित आहे. एक-दोन ठिकाणी 'Our nation' असा उल्लेख आला आहे

असा दृष्टीकोन अनेक अमेरिकन लेखक, चित्रपट दिग्दर्शक, आणि टूर गाईड्सचाही दिसतो. "अमेरिकेबाहेर जग नाही असं अमेरिकनांना वाटतं," हे अशा लेखनामुळे आणखीनच पटतं. अर्थात बाहेरचं जग माहित असणारेही अनेक लोकं भेटतात. जगाचा त्राता न्यूयॉर्कचा महापौर आहे अशा प्रकारचा संदेश 'फ्युच्यूरामा'तूनही मिळतो. पण ती एकूणच पॅरडी असल्यामुळे ते मजेशीर वाटतं.

भौतिकशास्त्रातल्या संकल्पना समजून घेण्यासाठीही मला 'Physics of impossible' आवडलं. जॉर्ज गॅमॉचं 'मि.टाँपकिन्स इन वंडरलँड' अशाच प्रकारचं आहे, पण त्यातली साय-फाय फॅण्टसी वेगळी आहे. फॅण्टसी मला फारशी आवडत नाही पण विज्ञान सर्वांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी फॅण्टसीचा आधार घेतला असेल तर रोचक वाटतं.

असिमॉव्हबद्दल एवढी रेकमेंडेशन्स ऐकलेली आहेत, आता वाचलंच पाहिजे.

विरोचन Tue, 17/01/2012 - 15:15

कालच वाचायला सुरवात केली. पुस्तकाच्या प्रस्तावनेतील ओळ लिहितो : 'आत्मसन्मानार्थ लिहिली जातात, असे दळवींचे मत होते. खरेखुरे आत्मचरित्र लिहिण्याचे धैर्य नसेल तर भल्या माणसाने आत्मचरित्र लिहू नये',असे हि ते म्हणत असत.

बाकी पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावरच लिहीन.

रोचना Sat, 21/01/2012 - 08:31

"भाऊ पाध्येंच्या श्रेष्ठ कथा" वाचायला घेतले. आत्ताच्या आत्ता त्यांची सगळी पुस्तकं वाचून काढावीत असं वाटतंय. पण कथा इतक्या अस्वस्थ करतात की एका वेळेला एकापेक्षा जास्त सलग वाचताही येत नाही अशी विचित्र परिस्थिती आहे!
मग त्याला अँटिडोट म्हणून घरातल्या एका लहान मुलासाठी घेतलेले "बोक्या सातबंडे, भाग १" वाचून काढला.

ऋषिकेश Tue, 24/01/2012 - 17:08

कविता महाजन यांने 'ग्राफिटी वॉल' वाचतोय. बरचसं होत आलंय.. विविध विषयांना स्पर्शुन जाणारे लेखन आहे. एकेक लेख स्वतंत्र म्हणून उत्तम आहे.. विचार करायला लावणारे अनेक लेख आहेत. (सारे लेख एकामागून एक वाचताना मात्र पुनरुक्ती जाणवते)
बाकी पुर्ण वाचल्यावर अभिप्राय लिहितो

सागर Tue, 24/01/2012 - 23:59

मी जेम्स हॅडली चेसचे 'गोल्डफिश हॅव नो हायडिंग प्लेस' ही कादंबरी वाचतो आहे.
७५ पाने वाचून झाली आहेत, एकदम भन्नाट आहे ही कादंबरी... जेम्स हॅडली चेस वाचताना आजपर्यंत माझा कधीच अपेक्षाभंग झाला नाही.
थरारकथांचा बादशहाच आहे तो जणू... :)
१-२ दिवसांत हे पुस्तक संपेल.
त्यानंतर मग नरहर कुरुंदकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराज जीवनरहस्य' हे छोटेसे पुस्तक वाचणार आहे. आकार छोटा पण आवाका मोठा असा या पुस्तकाचा महिमा आहे :) (फक्त ६० पानी आहे)

अदिति Wed, 25/01/2012 - 15:27

प्रदीर्घ प्रतिसादांमुळे फारच मजा आली. इथे उल्लेख झालेल्या पुस्तकांपैकी एकही पुस्तक मी वाचलेले नाही (अगदी शाळा सुद्धा) हे लक्षात आल्यावर मला गंमत वाटली. त्यातली अनेक पुस्तके वाचायची तीव्र इच्छा झाली खरी पण सध्या हाती घेतलेली पुस्तके आधी पूर्ण करीन म्हणतेय. मला सध्या डोक्याला ताप देणारे काही नको वाटते. त्यामुळे वैचारिक पुस्तके सध्या वाचत नाही. अलिकडे मी अ‍ॅलिस्टर मॅक्लीनची दोन तीन पुस्तके वाचली. मला अ‍ॅलिस्टर मॅक्लीन आवडतो. विशेषकरून सभोवतालच्या संपूर्ण विरोधात असलेल्या परिस्थितीशी मिळेल त्या मार्गाने झगडणारा नायक ही त्याची थीम बरेचदा अतिशय प्रभावशाली असते. तो नायक बरेचदा जेम्स बाँडसारखी साहसे करतो हा भाग अलाहिदा. त्याची बरीच पुस्तके जहाजांवर घडतात आणि नौकानयनशास्त्र आणि खलाशी यांच्याशी संबंधित तपशील त्यात येतात हे अजून एक आकर्षण.
याशिवाय जीन वेब्स्टरची डॅडी लाँग लेग्ज आणि डियर एनिमी ही पुस्तके लागोपाठ वाचली. त्यानंतर अ‍ॅगाथा ख्रिस्तीचं द मिरर क्रॅक्ड वाचलं. मिरर क्रॅक्ड बद्दल मी खूप कौतुक ऐकलं होतं आणि प्रत्यक्षात ते पुस्तक त्या कौतुकापेक्षा काकणभर सरसच आहे असं मला आढळून आलं.
सध्या मी लॉर्ड एड्वेअर डाइज वाचतेय. याशिवाय बरीच पुस्तकं यादीत आहेतच पण त्यांच्याबद्दल ती जशी वाचून होतील तसं लिहीन.

दिपक Wed, 01/02/2012 - 15:08

ह्या ठिकाणी बरीचशी मराठी पुस्तके txt स्वरुपात मिळाली. रणजीत देसाई, जी ए कुलकर्णी, पु.ल., व्यंकटेश माडगूळकर ह्यांचीही १-२ पुस्तके दिसली.

ऋषिकेश Wed, 01/02/2012 - 17:00

'भारतीय विवाह संस्थेचा इतिहास' काहितरी संदर्भ हवा होता म्हणून वाचायला घेतले आणि पुन्हा (बहुदा तीसर्‍यांदा) पूर्णच वाचत आहे :)

अदिति Thu, 02/02/2012 - 11:44

२००९ -२०१० अशी जवळपास दोन वर्षे दर शनिवारी सकाळी पुणे आकाशवाणीवरून अरविंद व्यं. गोखले लिखित 'मंडालेचा राजबंदी' या पुस्तकाचे अभिवाचन प्रसारित केले जात होते.शक्यतो त्याचे भाग मी न चुकता ऐकले होते तेव्हापासूनच हे पुस्तक एकदा वाचलेच पाहिजे हे डोक्यात होतं. परवा ग्रंथालयात हे समोर दिसले आणि लगेच उचलले. पुस्तक अप्रतिम आहे हे वेगळे सांगायला नकोच.
शाळेत असताना वर्षानुवर्षे भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा तोच तोच इतिहास पुन्हा पुन्हा उगाळला होता. त्यातही महात्मा गांधींच्या सत्याग्रहांवर भर जास्त असे. पुस्तकात सुरुवातीला एखाद्या धड्यात काँग्रेसची स्थापना, जहाल - मवाळ वाद, लाल - बाल - पाल , राष्ट्रीय अधिवेशने इ. भाग उरकून टाकल जाई. मग लोकमान्य टिळकांवर उदंड उपकार केल्याच्या थाटात त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणत, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचे प्रसिद्ध वचन, त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली दोनदा ब्रह्मदेशात मंडाले इथे शिक्षा झाली अशी माहिती दिलेली असे. बास संपले टिळकांचे कर्तृत्व. मग तिथून पुढे गांधी एके गांधी पुराण सुरू व्हायचे.चीड येते ती यासाठी की टिळक वारले ते १९२० साली. स्वातंत्र्य मिळाले १९४७ साली. मग १८५७ ते १९२० या कालखंडासाठी दोनपाच प्रकरणे आणि १९२० ते १९४७ या काळासाठी मात्र धो धो पाने अशी असमान विभागणी का?
असो, तर मंडालेचा राजबंदी या पुस्तकातून टिळकांचे द्रष्टेपण तर दिसतेच पण त्यांचे तर्कशुद्ध आणि बिनतोड युक्तिवादही दिसतात. जहाल पक्षाच्या पायात खोडा घालून त्यांना तोंडघशी पाडायची मवाळ पक्षाची खटपटही दिसते आणि जहाल पक्षाची मते ऐकून ब्रिटिश सरकार संतापले तर जे काही हाती लागले आहे तेही गमावून आपले सरकार दरबारी असलेले वजन पारच नाहीसे होईल की काय अशी मवाळ पक्षाच्या पोटातली भितीही दिसते. ब्रिटिश सरकारचा रडीचा डाव दिसतो आणि टिळकांचे उत्कृष्ठ वकिली डोकेही दिसते. टिळकांवर चालवण्यात आलेल्या खटल्यांमधील टिळकांची प्रत्यक्ष न्यायलयातील भाषणे तर प्रत्यक्षच वाचण्यासारखी आहेत.
पुणे आकाशवाणीवरील निवेदकांपैकी मंगेश वाघमारे यांची शैली मला विशेष आवडते. त्यांच्या खास शैलीत ही सगळी न्यायालयातली भाषणे ऐकायला फार मजा येत असे.
एकूणच हे पुस्तक विलक्षण तेजस्वी आहे. आणि पूर्णपणे ऐतिहासिक पुस्तक आहे. त्याची कादंबरी केलेली नाही ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे.
हे पुस्तक वाचावे अशी शिफारस मी नक्की करेन.

ऋषिकेश Thu, 02/02/2012 - 14:46

In reply to by अदिति

+१
अदितीने या छान पुस्तकाबद्दल इतके नेमके लिहिले आहे की केवळ +१ म्हणतो. पुस्तक वाचाच!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 03/02/2012 - 02:06

In reply to by ऋषिकेश

या संदर्भात 'लोकमान्य ते महात्मा' हे दोन खंड वाचनीय आहे. पहिला खंड टिळकांबद्दल आहे, दुसरा गांधींबद्दल. पुस्तक अतिशय मेहेनतीने, संशोधन करून नेटक्या पद्धतीने मांडलेलं आहे. त्या काळातल्या नाटकांपासून सामाजिक संदर्भांपर्यंत आणि टिळकांचे समकालीन इतर महत्त्वपूर्ण लोक ते मवाळ पक्ष यांच्यापर्यंत सगळ्यांची माहिती आणि भाष्य आहे.

शाळेतली इतिहासाची पुस्तकं रटून परीक्षेत ती ओकून झाल्यावर अवांतर वाचनात अशी पुस्तकं का "लावली" जात नाहीत?

चेतन सुभाष गुगळे Sat, 04/02/2012 - 19:33

जनांचा प्रवाहो चालिला
विनय हर्डिकर
संजय प्रकाशन, पुणे.
१९७८

विषयः- १९७५ साली आणिबाणी जाहीर झाल्यावर ज्या अनेक चळवळी / उठाव / सत्याग्रह झाले व त्यातून जे अनेक लोक तुरूंगात गेले त्यांच्या तुरूंगातील वास्तव्याचे बारकाव्यांसह सविस्तर वर्णन या पुस्तकात आहे. २२० पृष्ठांपैकी अद्याप ८० वाचून झाली आहेत. एवढ्यावर पुस्तकाला चांगले म्हणता येईल अशी परिस्थिती आहे.

रोचना Mon, 13/02/2012 - 15:20

नेमाडेंची "हिंदू" वाचायला घेतली.

बरेच दिवस श्रीलाल शुक्ल यांच्या "मकान" कादंबरीच्या शोधात होते. अचानक परवा हातात आली! क्यू तोडून तिला पुढे आणण्यात आली आहे. इथे कोणी शुक्ल यांचे चाहते आहेत का? (राग दरबारी, विश्रामपुर का संत, पेहला पडाव?)

ऋषिकेश Mon, 13/02/2012 - 16:29

In reply to by रोचना

अनेक हिंदी पुस्तकांचा उल्लेख गेल्या काहि आठवड्यात अनेक व्यक्तींकडून वेगवेगळ्या चर्चेतून होतो आहे. 'एखादी भाषा येत असुनही त्यातील साहित्य वाचणे होऊ नये यापेक्षा दुर्दैव ते कोणते' अश्या भावनेतून हिंदी साहित्य न वाचल्याबद्दल आता मला रुखरुख - टोचणी वाटु लागली आहे

सुरवात म्हणून चुकीचे पुस्तक निवडल्याने हिंदी पुस्तके वाचायचा कंटाळा येऊ नये म्हणून सुरवात अर्थातच रंजनात्मक साहित्याने करायचा मानस आहे. अनेक पुस्तके चांगली असतील मात्र माझ्यासारख्या हिंदी वाचनाची सुरवात करणार्‍याला कोणते पुस्तक सुचवाल?

अर्थात प्रश्न केवळ रोचना यांच्यापुरता सिमीत नाही हिंदी वाचन करणार्‍या सार्‍यांकडून सुचवण्या याव्यात

रोचना Tue, 14/02/2012 - 08:11

In reply to by ऋषिकेश

माझे हिंदी वाचन अगदीच लिमिटेड आहे; काही निवडक लेखकच वाचले आहेत. मी शुक्लांची राग दरबारी एका मित्राच्या सल्ल्यावरून वाचली, आणि ती "जगातल्या सर्वोत्कृष्ट विनोदी कादंबर्‍यांमधली एक" आहे, हे त्याचे वर्णन पटले. त्यांची शैली मला खूप आवडते. पण हलके-फुलके, रंजक साहित्य म्हणायचे झाले तर दोन नावं आहेत - सुरेन्द्र मोहन पाठक, आणि इब्न-ए-सफी. सफींची भाषा हिंदी-उर्दू पट्ट्यात उर्दू कडे जास्त झुकते, पण नागरी लिपीत वाचले तर हिंदी वाचकाला समजण्यासारखी आहे.
अगदीच पल्प नको असेल, तर लघुकथांमध्ये निर्मल वर्मा किंवा उदय प्रकाश यांच्या कथा आहेत. मोहन राकेश, भिष्म साहनी; शिवानी; ममता कालिया... प्रेमचंद वगैरे तर क्लासिक आहेतच. मला अलका सरावगी ही समकालीन लेखिका खूप आवडते.

चिंतातुर जंतू Tue, 14/02/2012 - 13:12

In reply to by रोचना

माझं हिंदी वाचन किरकोळच आहे. 'राग दरबारी' मूळ हिंदीतून वाचली होती आणि प्रचंड आवडली होती. जुन्या पिढीतले मोहन राकेश आणि नव्या पिढीतले उदय प्रकाशही आवडतात.

रोचना Wed, 15/02/2012 - 14:51

In reply to by चिंतातुर जंतू

राग दरबारीचा अजून एक पंखा! मी अधून-मधून पुन्हा पुस्तक उघडून काही पानं वाचून हसून घेते. रडू पण येतं म्हणा, कारण ग्रामीण भारताच्या वास्तव्याचे इतके कडू गोड वर्णन, आणि ते ही इतक्या सहज बोचर्‍या विनोदात केलेले माझ्या तरी वाचण्यात नाही. त्यावर झालेले टीवी सीरियल आता आठवत नाही, पण पुस्तक वाचल्यानंतर ते पुन्हा बघावंसं खूप वाटलं होतं.

@ऋ, कोणीतरी संपूर्ण राग दरबारी कादंबरी येथे टाकली आहे.
आणि इथे अनेक नावाजलेल्या लघुकथा वाचता येतील.

ऋषिकेश Wed, 15/02/2012 - 15:49

In reply to by रोचना

अनेक आभार!
पुस्तके विकत घ्यायच्या आधी जालावरच शोधणार होतो. तुम्ही काम कमी केलेत.. धन्यवाद! :)

ऋषिकेश Tue, 21/08/2012 - 10:31

In reply to by रोचना

(बहुदा मी नुसताच बोलतोय हिंदी वाचायला सुरवात करत नाहीच्चे हे ओळ्खून) नंदनच्या भेटीत त्याने रागदरबारी भेट म्हणून दिली. इतकी उत्तम भेट अन्यथा मिळाली नसेल!
काय पुस्तक आहे! सुरवातीला हिंदी वाचनाची सवय नसल्याने हळूई वाचावे लागले. नंतर सवय झाल्यावर पुस्तक संपेल या भितीने हळूच वाचले :) चवी चवीने वाक्यावाक्याला दाद द्यावी असे हे पुस्तक आहे!

राग-दरबारी फॅन क्लबमध्ये अजून एकाचा समावेश कराच! :)

रोचना Wed, 22/08/2012 - 13:46

In reply to by ऋषिकेश

ऋ, पुस्तक आवडलं हे ऐकून बरं वाटलं! आतिवास यांच्या ब्लॉग वर चर्चा झाली होती, ती सुद्धा कदाचित तुला वाचायला आवडेल..

Ashutosh Sun, 19/02/2012 - 21:04

त्याचं असं झालं की काही महिन्यांपुर्वी बंगाली आणि मराठे यांच्या वरनं विषय निघाला आणि माझ्या बंगाली मैत्रिणीनं ती लहानपणी लोरी ऐकतीय त्यचा अर्थ सांगितला. अर्थात, तिनं ती गाऊन ही दाखवली, लोरी. पण मला इथं आता आठवत नाही. (कुणाला माहिती असेल प्लीज द्या.) आशय असा की सारं शांत झालयं. बोर्गीं येतील लौकर झोप. बुलबुलनं आमचं धान्य खाल्लय. आता, आम्ही बोर्गींचा टॅक्स कसा भरणार इत्यादी. संताजी-धनाजींची भिती वाटायची हे तर आतापावेतो मी ऐकतच आलोय. त्यात, बंगाली मैत्रिणीनं ही भर घातली. त्यवा पासनं, ती सांगत राहीली की मला ती सदाशिवाच्या गोष्टींचं पुस्तक देणाराय. शेवटाला, मला तिनं सरदिन्दु बंदोपाध्याय यांचं ‘बॅंड ऑफ़ सोल्जर्स: अ इअर ऑन द रोड विथ शिवाजी’ (इंग्रजी भाषांतर: श्रीजता गुहा, पफ़िन बुक्स, २००५) हे पुस्तक भेट दिलं. परवा रात्री वाचायला सुरु केलंय आणि आज रात्री संपेल असं वाटतय. सोपी भाषा, पटपट घडणार्य घटना यातुन सदाशिवाच्या प्रवासात रंगुन जायला होतं. मराठीत भाषांतर कोण केलयं याचं?

जाता जाता,इतिहासावरनं आठवलं, नंदा खरे यांचे, ‘बखर अंतकाळाची’ हे पुस्तक असच मॅड करणारं गुंगवुन टाकणारं. वाचावच असं. भाषेचे प्रयोग इथं तर आहेतच. शिवाय, इतिहासाकडे पहाण्याची चिकित्सक दृष्टी. याला काय म्हणायचं: ऐतिहासिक लेखन? कादंबरी? ललित? की आणखी काय? धुसर होणार्या सीमा.काही दिवसापुर्वी वाचलं.

मूळ बंगाली अंगाई गीतः

छेले घुमालो पाडा़ झुलालो
बोर्गी एलो देशे
बुल्बुलिते धान खेयेछे
खाजना देबो किशे?
धान पुडा़लो पान पुडा़लो
खाजना देबो की?
आर कॉटा दिन शोबुर कोरो
रोशुन बुनेछी

मराठीत सरळसरळ भाषांतरः

मुलं झोपली चाळ झोपली
बोर्गी आले रे आले
बुलबुलनं धान्य खाउन टाकलं
खंडणी कशी देऊ?
धान्य नाही, चारा नाही,
खंडणी काय देऊ
अजून थोडेच दिवस वाट बघ जरा
लसूण पेरलंय

बंगालच्या पश्चिम भागात "बोर्गी" म्हणजे १८व्या शतकातले मराठे बारगीर. पूर्वेकडील याच अंगाई गीतात "बोर्गी" चे "गोर्की" होतं. "गोर्की" त्या भागातील एका खतरनाक भरतीच्या लाटेचं नाव आहे. भाताच्या शेतात भरून (मराठा घोडेस्वार लुटारूंसारखेच) नुक्सान करत असत.

जाता जाता,इतिहासावरनं आठवलं, नंदा खरे यांचे, ‘बखर अंतकाळाची’ हे पुस्तक असच मॅड करणारं गुंगवुन टाकणारं. वाचावच असं. भाषेचे प्रयोग इथं तर आहेतच. शिवाय, इतिहासाकडे पहाण्याची चिकित्सक दृष्टी. याला काय म्हणायचं: ऐतिहासिक लेखन? कादंबरी? ललित? की आणखी काय? धुसर होणार्या सीमा.काही दिवसापुर्वी वाचलं.

मला बखर अंतकाळाची पेक्षा "अंताजीची बखर" जास्त आवडली. मॅड करणारी ऐतिहासिक कादंबरी आहेच, आणि अगदी सूक्ष्म, मार्मिक ऐतिहासिक चिकित्सा आणि टीका त्यात असली तरी कथानकात कादंबरीचे रूप कायम राहते. सीक्वेल मध्ये टीका-चिकित्सा त्याच दर्ज्याची असली तरी कादंबरीचे "नॉवेलिस्टिक" स्वरूप थोडे तेवढे भक्कम राहिले नाही असे वाटले.

Ashutosh Mon, 20/02/2012 - 18:04

In reply to by रोचना

रोचना, फ़ारच छान! आभारीय, तुम्ही ही अंगाई दिली त्याबद्दल. अंगाई निव्वळ ‘अंगाई’ राहात नाही. म्हणजे, पारंपारिक अर्थाने, ‘लहान’ मुलांसाठीचं गाणं असं. ती राजकिय ताण पण दाखवते, नाही? मराठ्यांना ते लुटारु म्हणत असावेत. (मी वाचतोय त्या सदाशिवच्या गोष्टींत पण अशा मराठेपणाचे संदर्भ येतात.)

बुलबुल धान्य खाईल? मी चिमण्या आल्या दाणे घेऊन गेल्या असं ऐकत आलोय.

नंदा खरेंचे ‘अंताजीची बखर’ मला मिळालेलं नाही. आता परत विचार करताना वाटते की, बखर अंतकाळाची मधे खरे कथनाच्या अंगाने इतिहास-कथनाला मुरगळतात. ते करताना भाषेचे विशिष्ट रुप वापरतात. त्यामधे शैलीचे काही ठिकाणी प्रयोग करतात. पण, आपण फ़िक्शन वाचतोय याचं दणकट भान ते पुस्तक देत नाही. त्याअर्थाने, कथन फ़िक्शनचा मोठा पट मांडत नाही. कदाचित, त्यांचे ते ध्येय नसावे. तरीही, मला त्यांचं लेखन फ़ार आवडलय. पहिला भाग मी मिळवायचा प्रयत्न करेन.

माझ्या डोळ्यासमोर आता, ‘ट्रोटर-नामा’ ही एलन सेलींची कादंबरी येते. अॅनग्लो-इंडियनाचा आठ पिढ्यांचा इतिहास ते समर्थपणे फ़िक्शनलाइज करतात.

चिंतातुर जंतू Mon, 20/02/2012 - 23:12

In reply to by Ashutosh

>>मराठ्यांना ते लुटारु म्हणत असावेत.

मराठ्यांची स्थानिकांशी वागणूक तशी होती. 'अंताजीची बखर'मध्ये हा काळ आणि बंगालस्वारी यांची प्रत्ययकारी वर्णनं आहेत.

'अंताजीची बखर' कित्येक वर्षं अनुपलब्ध होतं. गेल्या वर्षी 'बखर अंतकाळाची' प्रकाशित झालं त्यानंतर जवळजवळ लगेचच 'अंताजीची बखर' नव्या आवृत्तीत पुनर्प्रकाशित झालं. दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक 'मनोविकास प्रकाशन' आहेत.

रोचना Mon, 20/02/2012 - 23:55

In reply to by Ashutosh

फिक्शन चा पट अंतकाळाच्या ऐतिहासिक घतनांनी, आणि त्यांच्या गांभीर्याने मांडू दिला नाही, असा काहीसे खर्‍यांचे मनोगतच पुस्तकाच्या सुरुवातीला आहे. पेशवाईच्या अंतकाळाबद्दल, तिच्या जागी आलेल्या नवीन साम्राज्यवादाबद्द्ल खर्‍यांची टीका मार्मिक आणि हृदयस्पर्शी आहे. पण ही टीका उघड-उघड आहे, पहिल्या पानांपासूनच आहे. "अंताजी"ची एक खूबी आहे, की खुद्द खर्‍यांची ऐतिहासिक टीका अंताजी पात्राद्वारे अगदी अलगद, टप्प्या-टप्प्यातून उलगडते. शेवटच्या प्रकरणातली बंगालच्या सिराज नवाब आणि क्लाइव्ह यांच्यातल्या लढ्याचे गभीर महत्त्व त्याला अगदी शेवटी उमगते. त्याचे वर्णन खर्‍यांनी खरोखर खूप संयम पाळून, शिस्तीत मांडलंय. ऐतिहासिक चिकित्सा, आणि अंताजीच्या काल्पनिक पात्राच्या कथेला दोन्हीला ते एकदम फिट्ट बसतं.

शैलीबद्दल तर वादच नाही.

मला सीली का कोण जाणे फारसा आवडत नाही. ट्रॉटरनामा फार गाजला, पण मला त्याचं "एवरेस्ट होटेल" जास्त आवडलं होतं.

Ashutosh Wed, 22/02/2012 - 22:05

In reply to by रोचना

दोन कारणांसाठी मला ट्रॉटर-नामा आवडते. एक, रुप म्हणुन ‘नामा’चा वापर ती गोष्ट कथन करण्यासाठी वापरते. यामधे, बर्याच ठिकाणी ती अगदी खोलात जाऊन एंग्लो इंडियन्संची पाळे मुळे खणते. एका बाजुला शैली म्हणुन हे सारे छान वाटते. पण, माहितीच्या पातळीवर ती मला होल्ड करत नाही. एक कारण असे असावे की अंग्लो इंडियन्सच्या इतिहासाशी एका टप्यानंतर मी स्वतःला कनेक्ट करु शकत नाही. ते, खर्यांच्या पुस्तकात होते. दुसरे म्हणजे, सेलीची इतिहासाच्या सामग्रीवर किती छान पकड आहे हे मला फ़ार भारी वाटते. बर्याच जणांना इतिहास माहिती असतो पण ते मटेरिअल फ़िक्शन करताना किती विविधतेने वापरू शकतो हे ट्रॉटर-नामा कडे पाहिल्यावर अचंबित व्हायला होते. एका बाजुला कादंबरीत ते साधनसामग्री योग्य वेळी वापरतात त्यांचबरोबर खुबीने शैलीगत त्याचा वापर करतात. फ़िक्शनीकरणाच्या या बाबीकडे खर्यांचे दुर्लक्ष झालेले दिसते. ऐतिहासिक सामग्रीचा वापर सेली अनेक आवाजी करतात. अंग्लो-इंडियन्सच्या वेगवेगळ्या पिढींना छेदत जातात. अशावेळी दोन किंवा तीन पिढ्या आपसात आपसुकपणे बोलतात. असे, खर्यांच्या कथनात होताना दिसत नाही. वेळो-वेळी ते प्रथमपुरुषी निवेदक वापरतात जो अनेक आवाज देऊ शकत नाही; त्यांना कथन करत असला तरी.
किती फ़िक्शनीक असतो नाही हा पास्ट!

आणि, ‘क्रिएटिव पास्टस’ हे प्राची देशपांडे यांचे पुस्तक कसे विसरु शकेन मी. एकदम छान आहे ते.

मच्छिंद्र ऐनापुरे Sun, 19/02/2012 - 22:44

चंद्रकुमार नलगेंचं 'पंढरीची वाट' कथासंग्रह वाचतोय. बराय. मात्र लवकर संपण्याचे चिन्हे दिसेनात. बदलून दुसरे ( वाचनालयातून) आणावं म्हणतोय.

चैतन्य गौरान्गप्रभु Mon, 20/02/2012 - 23:48

डॉक्टर एस एल भैरप्पांच्या पर्व कादंबरिचा मराठी अनुवाद (उमा विरूपाक्ष कुलकर्णी यांनी केलेला) वाचतो आहे. वाचता वाचता किती वेळा अंगावर रोमांच उभे झाले आहेत. शिवाय नुकतेच रेषाटन नावाचे शि द फडणीस यांचे आत्मचरित्र साहित्य संमेलनातून आणले. ते ही संपवले आहे. एक पुस्तक सहज लिहलेलं असुन त्या काळातल्या किती गोष्टी, घटना, संदर्भ स्पष्ट करतं, ते त्यातून दिसतं.
आज महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर 'ईम्मॉर्टल्स ऑफ मेहुल्ला' हे पुस्तक वाचायला घेतलं आहे. जस्ट सुरू केलंय. खुपच उत्कृष्ट वाटत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत संपवेन असं दिसतंय.

मणिकर्णिका Thu, 23/02/2012 - 00:16

विलास सारंग यांचा ’सोलेदाद’ हा कथासंग्रह आणि ’एन्कीच्या राज्यात’ ही कादंबरी वाचली.
’सोलेदाद’ उत्तम कथासंग्रह आहे. निदान मलातरी त्यातल्या ’सोलेदाद’ आणि ’घड्याळातला कोळी’ ह्या कथा महान वाटल्या.
’एन्कीचं राज्य’ म्हणजे आजचा इराक, ज्याच्यापाठी हजारो वर्षाच्या सुमेरियन संस्कृतीचा समृद्ध इतिहास आहे. ’एन्की’ हा सुमेरियन लोकांचा देव.
’एन्कीच्या राज्यात’ आवडलंही आणि नाहीसुद्धा. एन्की वाचताना मला आठवली ती गौरी. ती एक विशिष्ठ प्रकार सर्वात जास्त करते. ग्रीसची झाडं आणली, ती इथे आणून लावली, इकडली झाडं उपटली, ती फ़लाण्या देशात जाऊन लावली. आणि गंमतीचा भाग असा की ती सग्ळी जगतातच असं नव्हे तर फ़ोफ़ावतात. एखाद्या मातीतून समुळ उपटल्यावर दुसरया देशात जाऊन रुजण्याचा प्रयत्न करताना आपलं मूळ तिथे नव्हतंच मुळी अशी स्वत:ची समजूत कशी काढता येईल? हा अनैसर्गिक प्रकार आहे. ’एन्की’ मधला प्रमोद सुदैवाने ते करत नाही. सगळ्यामधून बेस्ट तेच घेण्याच्या नादामध्ये आपण कुठल्याही गोष्टीशी आपण उघडपणे प्रामाणिक राहू शकत नाही आणि मनात आतात कुठेतरी प्रामाणिक असलोच तरी ते स्वत:शी मान्य करता येत नाही, मग सुरु होते कुतरओढ. हे सर्व काही ’एन्कीच्या राज्यात’ मध्ये छानच आलं आहे. आणि दुसरया संस्कृतीबद्दल आपल्याला कितीही ओढ वाटली तरी त्याच्याशी आपलं रिलेशन हे दुसरयाने आपल्याला सांगितलेल्या त्याच्या स्वत:च्या अनुभवांसारखं असतं. कळतं सगळं पण भिडत नाही. ते सगळं सगळं आलंय पण तरीही काहीतरी मिसिंग आहे. म्हणजे आपण जगाकडे एखाद्या आयसोलेटेड मेम्ब्रेन मधून बघतोय असं काहीतरी ती कादंबरी वाचताना जाणवत राहिलं समहाऊ. कादंबरी १९८३ मध्ये प्रसिद्ध झालीये तो काळ विचारात घेता इंटीमेट प्रसंग तर खूपच ऑकवर्ड आहेत. त्यामुळे मारीया-प्रोटॅगनिस्ट प्रमोद यांच्यामधलं नातं धूसरच राहिलंय. ते तसं राहणं अपेक्षितच होतं की कसं हे नाही ठाऊक पण ते वाटलं खरं तसं. सलवा-प्रमोद भेटीचं प्रयोजनही नाही कळलं.
ऑल इन ऑल, नक्की वाचावं असं पुस्तक. मला रेकमेंड केलं गेलेलं होतं, वाचून वेळ सत्कारणी लागल्यासारखं वाटलं.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 23/02/2012 - 00:24

द. दि. पुंडे यांचं 'भयंकर सुंदर मराठी भाषा' वाचते आहे. दोन-तीन पानांचे छोटे छोटे बरेच लेख आहेत. पुस्तकही बांध्याने बारीकच आहे. मजेशीर आहे. भाषेतल्या वेगवेगळ्या गंमतींचा आधी विचार केलेला नसतो, पण सांगितल्यावर एकदम मजा वाटते. एकीकडे चिवड्याचे बकाणे भरताना, ट्रेडमिलवर धावताना किंवा व्हॅक्यूम क्लीनर वापरतानाही पुस्तक वाचता येईल.

'न'वी बाजू Fri, 24/02/2012 - 02:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एकीकडे चिवड्याचे बकाणे भरताना, ट्रेडमिलवर धावताना किंवा व्हॅक्यूम क्लीनर वापरतानाही पुस्तक वाचता येईल.

चिवड्याचे बकाणे भरताना ठीकच आहे, पण ट्रेडमिलवर धावताना किंवा व्हॅक्यूम क्लीनर वापरताना पुस्तक वाचणे ही थोडी कसरत वाटते. म्हणजे साधारणतः, पोटावरून हात फिरवत असताना डोके थापटण्याच्या तोडीची.

असो. एकेका(/की)ची आवड, आणि एकेका(/की)ची कौशल्ये. (मराठीतः 'स्किलसेट'.)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/02/2012 - 02:53

In reply to by 'न'वी बाजू

ट्रेडमिलवर धावताना टीव्ही पहाता येतो तर फार विचार करायला लागत नाही असं पुस्तक वाचणं कठीण नसावं; मी जाहिराती, माहितीपत्रकं वगैरे वाचली आहेत. व्हॅक्यूम क्लीनर कॉर्डलेस असेल तरीही एकीकडे पुस्तक वाचताना फार त्रास होऊ नये. या पुस्तकात तसेही २-३ पानांचेच निबंध आहेत, पाच मिनीटांत एक वाचून होतो. अस्वच्छ कोपरेही लगेच साफ करता येतात.

तसंही साधारणतः स्त्रियांना वाहन चालवताना दुकानं पहायला जमतं, व्हॅक्यूम क्लीनर किंवा ट्रेडमिलवर स्वतःला चालवताना पुस्तक वाचन जमायला फार त्रास होऊ नये.

नंदन Fri, 24/02/2012 - 04:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ट्रेडमिलवर धावताना टीव्ही पहाता येतो तर फार विचार करायला लागत नाही असं पुस्तक वाचणं कठीण नसावं

कदाचित म्हणूनच अशा पुस्तकांना 'रन ऑफ द मिल' म्हणत असावेत :)

ऋषिकेश Mon, 27/02/2012 - 10:05

बरेच दिवस वाचेन म्हणत होतो ते "मुंबई दिनांकः" वाचायला सुरवात केली आहे
अरूण साधुंची शैली हळूहळू खोलवर भिनत जाते याचा पुनःप्रत्यय घेतो आहे

चिमा Mon, 27/02/2012 - 21:40

१. भैरप्पांची मंद्र वाचत आहे.
२. बाबा भांड यांचं भारतीय बालकथा.
३. दुर्गा भागवत यांचे अस्वल.
४. ओर्‍हान पामुक चे स्नो नुकतेच वाचून पूर्ण केले.
५. उदय प्रकाश यांचे "ईश्वर की आंख" नावाचे जाडे पुस्तक आणले आहे. मंद्र संपली की ते वाचणार.

अनंत ढवळे Mon, 27/02/2012 - 22:24

अशात एफ स्कॉट फिटजेरल्डची अप्रतिम कादंबरी 'द ग्रेट ग्याट्सबी' वाचली. द ग्रेट अमेरीकन नॉवल नावाने ओळखल्या जाणार्‍या कादंबर्‍यांपैकी एक असलेली ही कादंबरी रोअरिंग ट्वेंटीज मधल्या म्हणजे विसाव्या दशकातल्या संपत्ती आणि प्रतिष्ठेसाठी हपापलेल्या अमेरीकन समाजाचे यथार्थ चित्रण आहे.

फिटजेरल्डची अप्रतिम भाषाशैली दर्शविणारे या कादंबरीतले हे एक उदाहरण -

Though all he said, even through his appalling sentimentality, I was reminded of something - an elusive rhythm, a fragment of words, that I had heard somewhere a long time ago. For a moment a phrase tried to take shape in my mouth and my lips parted like a dumb man’s, as though there was more struggling upon them than a wisp of startled air. But they made no sound and what I had almost remembered was uncommunicable forever..

धनंजय Tue, 28/02/2012 - 02:56

In reply to by अनंत ढवळे

त्या काळातल्या त्या समाजातल्या वेशीवर भटकणार्‍यांबाबत "द ब्यूटिफुल अँड द डॅम्ड" हीसुद्धा आवडेल. (फित्झजेराल्डचीच आहे ही सुद्धा)

मच्छिंद्र ऐनापुरे Tue, 28/02/2012 - 00:13

कन्नड सहित्यिक भैराप्पा यांचे उमा कुलकर्णी यांनी अनुवाद केलेली 'वंशवृक्ष' नुकतीच वाचायला घेतलीय... सुरुवात तर चाम्गली आहे.

रुची Wed, 29/02/2012 - 01:50

'आमची अकरा वर्षे', 'पण लक्षात कोण घेतो' आणि 'स्मॄतीचित्रे' अशी तीन सलग पुस्तके वाचल्यानंतर वेगळा ट्रॅक पकडणे गरजेचे होते. कालपासून बेकेटचे 'फर्स्ट लव्ह अँड अदर नॉव्हेलाज' वाचायला घेतले आहे. मूळ इंग्रजीत लिहिणारया लेखकाने, फ्रेंचमधे लिहिलेले आणि नंतर इंग्रजीत अनुवाद केलेले पुस्तक वाचताना वाक्यावाक्याशी थबकते आहे. छोटेसेच असलेले पुस्तक पण एकदा त्यात डुबकी मारली की डुंबत रहावे असे वाटत रहाते.

ऋषिकेश Wed, 29/02/2012 - 08:50

'मुबंई दिनांक' अपेक्षेपेक्षा अधिक चटकन संपले.. अतिशय छान कादंबरी.. पात्रांच्या संवादाच्या निमित्ताने -माध्यमातून समाजकारण, आदर्शवादी विचार, व्यावहारिक शहाणपण, वैयक्तीक ओढ-स्वार्थीपणा आदींवरचे अरूण साधूंचे लाऊड थिंकिंग तर लाजवाब!
शिवाय पत्रकार, गिरगी कामगारांचा लिडर, स्मगलरचा डावा हात, असाच एक पिचलेला मुंबईकर आणि मुख्यमंत्री या इतक्या मोठ्या स्पेक्ट्रमला एका दिवसाच्या छोट्या कॅनवासवर अरूणसाधु ज्या ताकदीने हाताळातात त्याला तोड नाही!

आता 'ब्रेड विनर' या कादंबरीचे भाषांतर वाचायला घेतलेय

आतिवास Thu, 01/03/2012 - 19:46

रोचना, शुक्लांची 'रागदरबारी' तुम्ही दिलेल्या धाग्यावर मिळाली पण त्यात व्हायरस होता त्यामुळे उतरवून घेतली नाही.
योगायोगाने आज दिल्ली पुस्तक मेळ्यात ती कादंबरी दिसली आणि विकत घेतली. राजकमल प्रकाशनाने नुकतीच म्हणजे २०१२ मध्ये तिसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. पुस्तकाची किंमत २५०/- रुपये आहे. info@rajkamalprakashan.com वर अधिक माहितीसाठी लिहावे.

मी शुक्लांच हे पहिलच पुस्तक वाचतेय .. इथल्या शिफारशीमुळे ते घेतलय. मला आवडाव ...बघू!!

रोचना Thu, 01/03/2012 - 23:16

अय्यो, वायरस बद्दल नव्हतं माहित! सॉरी. पण तुम्हाला त्याची प्रत मिळाली हे छानच झालं; माझ्याकडे राजकमलचीच प्रत आहे, पण जुनी आहे. वाचल्यावर कादंबरीबद्दल विचार जरूर कळवा!

ऋषिकेश Fri, 02/03/2012 - 09:15

'ब्रेडविनर' अगदिच पटकन संपलं.. हे छोटंसं पुस्तक.. त्याचा जीवही तितपतच आहे. अफणागिस्तानात घरात पुरूष नसणार्‍या मुलींना मुलांसारखं दिसून कसं घर चालवावं लागत होतं याची हृद्य कथा आहे. अपर्णा वेलणकरांचं भाषांतर मात्र जेमतेम वाटलं

आता लायब्ररीतून धाडस करून 'पिंगळावेळ' आणली आहे.. (माझ्याच दुर्दैवाने) जी.एं.शी माझी फारशी मैत्री जमु शकलेली नाहि.. त्यांचं मुळातलं एक पुस्तक व कॉन्रॅड रिक्टरचं भाषांतरं यातील कथांचं पुस्तक ठिक वाटल्याचं आठवतंय (ते खूप पूर्वी वाचलं होतं.) आणि कॉन्रॅड रिक्टरच्या पुस्तकांची भाषांतरं मूळ पुस्तकांपेक्षा खूपच डावी आणि वाटली.

असो. आता पिंगळावेळ अनेकांच्या शिफारसीवरून हातात घेतो आहे.. जीए (आतातरी) आवडावेत अश्या इच्छेने व अपेक्षेने वाचणार आहे.. बघु!

रुची Fri, 02/03/2012 - 14:24

In reply to by ऋषिकेश

'ब्रेडविनर' अगदिच पटकन संपलं.. हे छोटंसं पुस्तक.. त्याचा जीवही तितपतच आहे. अफणागिस्तानात घरात पुरूष नसणार्‍या मुलींना मुलांसारखं दिसून कसं घर चालवावं लागत होतं याची हृद्य कथा आहे.>>
ऋषिकेश, याच विषयावर बारन नावाचा एक अतिशय सुंदर इराणी सिनेमा काही वर्षांपूर्वी पाहिला होता ते आठवले. पाहिला नसल्यास अवश्य पहा. पुस्तकाविषयी कुतुहल वाटले होते पण भाषांतर जेमतेम आहे हे कळल्याने विरस झाला.

अर्धवट Sun, 11/03/2012 - 22:28

In reply to by रुची

येस.. काय मस्त आठवण काढलीत, 'बरान' म्हणजे पर्शियन भाषेत 'स्त्री'
अत्यंत हळूवार आणि अंतर्मुख करणारा चित्रपट आहे हा. माझिद माझ्दी हा इराणी दिग्दर्शक आहे.. मी कुठेतरी लिहिलं होतं परीक्षण पण आता शोधायचा कंटाळा आलाय. माझ्दीचेच, 'चिल्ड्रन ऑफ हेवन' 'कलर ऑफ पॅरेडाइज' 'बरान' 'द फादर' हे माझे ऑल टाईम फेवरीट्ट्ट्ट्ट्ट्ट आहेत.

बाबा बर्वे Fri, 02/03/2012 - 13:15

गुलज़ार लिखित दिग्दर्शित इजाज़त (१९८७) या चित्रपटाची पटकथा (गुलज़ारच्या हिंदीत "मंज़रनामा")असलेले इजाज़त हे पुस्तक सध्याच वाचून संपवले.

चित्रपटांच्या पटकथा (त्यात हिंदी आणि ते देखिल गुलज़ारचे) हा माझ्यासाठी तसा नविनच वाचन प्रांत, पण एका अत्यंत निवांत क्षणी हे पुस्तक हातात पडले आणि संपूर्ण वाचून झाल्यावरच हातातून खाली ठेवले.

हिंदी वाचनाची सवय नसताना देखिल अतिशय आनंददायी असा अनुभव होता. संपूर्ण चित्रपट फ्रेम बाय फ्रेम डोळ्यापुढे उभा राहतो. पुस्तक वाचनानंतर चित्रपट पुन्हा एकदा बघण्याची गम्मत तर काही औरच ...!

(इजाज़त चित्रपटाच्या कथेबद्दल लिहिण्याचे इथे काहीच प्रयोजन नाही तथैव त्याविषयी काहीच लिहिलेले नाही पण ज्यांना हा चित्रपट आवडला होता त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे .. ज्यांनी गुलज़ार ऐकला, पाहिला, अनुभवला ... त्यांनी तो वाचावादेखिल असे वाटले म्हणून हा लेखन-उद्योग.)

( सध्या गुलज़ार लिखित "लिबास" ह्या पुस्तकाच्या शोधात आहे .. अनेक नावाजलेल्या दुकानात मला हे पुस्तक मिळालेले नाही .. ह्या पुस्तकाच्या उपलब्धतेविषयी काही माहिती मिळाल्यास अवश्य कळवावी )

सागर Fri, 02/03/2012 - 15:17

कालच मी इंटरनेटवर अवघ्या ११० पानांची "दलित कुसुम" ही कादंबरी सलग वाचून संपवली

त्याकाळी अवघी १२ आणे किंमत असलेली 'दलित कुसुम' ही कादंबरी मूळ बंगालीत "श्री. बाबू नारायण दास मौलिक" यांनी लिहिलेली होती. तिचा "श्रीकार्तिकप्रसाद" यांनी केलेला हिंदी अनुवाद वापरुन "कै. रा.रा.अनंत केशव चितळे" आणि "नारायण रामचंद्र गोखले" यांनी तिला मराठीत आणली. १९०२ साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी नशिबाचे फेरे कसे फिरतात आणि मानवी इच्छा माणसाकडून काय काय करवून घेतात हे अतिशय प्रभावीपणे दाखवते. मुळात ही कादंबरी लिहिली गेली त्याकाळची मराठी मला खूप आवडते म्हणूनही असेल, पण मला ही छोटीशी कादंबरी आवडली. तुम्हाला वाचायची असेल तर पुढे दुवा दिलाच आहे

दलित कुसुम ही कादंबरी ऑनलाईन इथे क्लिक करुन वाचता येईल

येत्या रविवारपासून मी एक छानसे पुस्तक नक्की वाचायला घेणार आहे. पुस्तक ठरवले की इथे देईनच

ऋषिकेश Wed, 07/03/2012 - 09:49

पिंगळावेळ वाचुन झाले.
पुस्तक आवडले खरे.. मात्र तितपतच! म्हणजे एक कथा वाचल्यावर दमून जायला व्हायचे की लगेच दुसरी कथा वाचाविशी वाटत नसे..

बहुतेक माझी बौद्धिक पातळी आणि/किंवा आवड उंचावायला बरेच परिश्रम करावे लागतीलसे दिसतेय! ;) किंवा सागर म्हणतो तसे तसंही असेल, जीए आवडायला वेळ लागतोच!..

पण जीएं.चं गारूड माझ्या मनावर काहि होत नाहि हेच खरं दिसतंय :(

मेघना भुस्कुटे Wed, 07/03/2012 - 09:59

मो. के. दामलेकृत मराठी व्याकरण वाचतेय. धाप लागतेय. :(
अवांतरः मराठी व्याकरणासाठी ज्यांच्याकडे जाण्यावाचून पर्याय नसतो ते मोरेश्वर दामले आणि केशवसुत सख्खे भाऊ आहेत, हे मला नव्यानेच कळले. एकूण घराण्याचाच प्रॉब्लेम होता म्हणायचा. ;-)

रोचना Mon, 12/03/2012 - 11:58

बंगाली वाचन सुधारण्यासाठी थोडी सोपी, पण बर्‍यापैकी रोचक पुस्तकाच्या शोधात असताना परवा एका मैत्रिणीकडून शीर्षेन्दु मुखोपाध्याय यांचे "गोसांई बागानेर भूत" हे शाळकरी मुलांसाठी लिहीलेले पुस्तक मिळाले. पुस्तक मस्तच आहे. रानकरवंदाच्या दाट जंगलात गणितात वाइट नापास झालेल्या, आणि घरी शिक्षा झालेल्या मुलाला एक भूत भेटतो. त्याच रानात राहून आसपासच्या गावात हैदोस घालणार्‍या डाकूशी मुलाचे आजोबा आणि दरोगा झुंज देतात. पूर्ण पुस्तक अजून वाचून झालं नाही, कारण वाचनाचा वेग तसा स्लोच आहे, पण गोष्ट मस्त आहे. आत्ताच भुताने अदृश्य होऊन वर्गात गणिताचा एक कठिण प्रॉब्लेम सोडविला आहे....
वाघावरून फिरणारा डाकू, किंचित न्यूनगंड असलेला भूत, बोरांनी भरलेलं जंगल, शक्तिवर्धक चूर्ण आणि पाचक तयार करणारे मुलाचे वैद्य आजोबा, साध्या बेरीजात कच्चे असलेले गणिताचे मास्तर... पात्रं मजेशीर आहेत.

वाचता वाचता एकदम आठवलं की अनेक वर्षांपूर्वी याच पुस्तकाचा मृणालिनी गडकरींनी केलेला मराठी अनुवाद मी साहित्य अकादमी कडून घेतला होता. पुन्हा ते पुस्तक ही शोधून काढले, आणि मधून मधून ते ही चाळतीये. अनुवाद चांगला आहे, मूळ कथेतील हलका-फुलका विनोद त्यात फार छान उतरलाय.

मेघना भुस्कुटे Mon, 12/03/2012 - 12:22

'पक पक पकाक' या 'गोसांई बागानेर भूत'वर तर आधारित नव्हता? दोन्हीच्या कथानकांत खूप साम्य जाणवते आहे.

रोचना Mon, 12/03/2012 - 12:38

In reply to by मेघना भुस्कुटे

मी नाही पाहिलेला सिनेमा - चांगला होता का? गुगलून पाहिलं, पण या सारांशावरून तरी गोष्टी निराळ्याच आहेत असं वाटतं. पण नाना पाटेकर ला भुताच्या भूमिकेत बघायलाच हवं!

अशोक पाटील Mon, 12/03/2012 - 18:26

"ब्रश मायलेज" ~ लेखक रवी परांजपे. रुढार्थाने पाहिलं तर ही एका चित्रकाराचे कला आत्मकथन, पण वाचताना जणू काही एक वेधक कादंबरीच वाचत आहोत असा पानोपानी भास होत जातो. याचे श्रेय चित्रकार रवी परांजपे यांच्या कुंचल्याला द्यावे की त्यांच्या जबरदस्त लेखनशैलीला हा प्रश्न वाचकाला पडतो इतके त्यांच्या चित्रकलेसारखेच देखणे पुस्तक झाले आहे.

तीन महिन्याच्या आतच 'ब्रश....' ची पहिली आवृत्ती संपावी यातच या पुस्तकाची महती दिसून येते.
राजहंसची निर्मितीही तितकीच दर्जेदार आणि देखणी अशी आहे.

रोचना Sun, 18/03/2012 - 14:20

धारप यांचे साठे फायकस वाचले. आवडले वगैरे, पण एक प्रश्न पडला - कंपनी साठ्यांचे इतके वर्ष सतत लाड का करत होती? कसलं मस्त रिटायरमेंट पॅकेज!

काही कामास्तव अश्विनी तांबे यांचे Codes of Misconduct: Regulating Prostitution in Late Colonial Bombay वाचायला घेतलंय.

पण नेमाडेंची हिंदू अजून अर्धीच वाचून झालीय. कादंबरी एकाच वेळेला तासंतास वाचण्यासारखी नाही, खूप ब्रेक घ्यायला लागतात!

जयदीप चिपलकट्टी Wed, 04/04/2012 - 07:57

In reply to by रोचना

> पण नेमाडेंची हिंदू अजून अर्धीच वाचून झालीय. कादंबरी एकाच वेळेला तासंतास वाचण्यासारखी नाही, खूप ब्रेक घ्यायला लागतात!

ती लिहितांना नेमाड्यांनी फार सढळ हाताने ब्रेक घेतले, तेव्हा वाचताना ते घेण्यात काहीच गैर नाही. मी ती मागच्या वर्षी (महत्प्रयासाने) वाचून संपवली, अाणि माझं एकूण मत काही बरं झालं नाही. माझा असा कयास अाहे की 'पॉप्युलर'ने तिचं संपादन असं काहीच केलेलं नसावं. नेमाड्यांच्या नावाला दबून जाऊन त्यांनी जसं बाड अाणून टाकलं तसंच्या तसं ते छापलेलं असावंसं वाटतं.

रोचना Thu, 05/04/2012 - 14:07

In reply to by जयदीप चिपलकट्टी

अरेरे, माझं मत बरंचसं चांगलं तयार होतंय!! विषय जिव्हाळ्याचा आणि नेमाडेंची शैली आवडती. पुस्तकातले अगदी तपशीलवार लेखन, अगदी उतू जाईस्तोवर वर्णनाची शैली विचारपूर्वक आहे, कादंबरीच्या मूळ मुद्द्याला, आशयाला धरून आहे असं वाटतं. फक्त त्याची इंटेन्सिटी एकाच वाचनात पेलणं मला शक्य होत नाही, खाली ठेवून बराच वेळ चघळत बसावं लागतं. म्हणून (माझे तरी) नियमित ब्रेक - पण "शीर्षकातली "अडगळ" कादंबरीत ही आहे" हा अभिप्राय बर्‍याच जणांकडून ऐकलाय.

जयदीप चिपलकट्टी Tue, 03/04/2012 - 07:03

टी. एस. एलियटची 'Four Quartets' ही कविता खूप पूर्वी वाचली होती. ती पुन्हा एकदा काही कारणाने समोर अाली, तसा पूर्वीच्या वाचनात अालेला एक विचित्र अनुभव पुन्हा अाला. त्यातल्या काही अोळी अशा अाहेत:

I do not know much about gods; but I think that the river
Is a strong brown god - sullen, untamed and intractable,
……

…. …..the brown god is almost forgotten
By the dwellers in cities - ever, however, implacable.
Keeping his seasons and rages, destroyer, reminder
Of what men choose to forget….

दुर्दैव असं की नदीसाठी 'चुकीचं' लिंग वापरल्यामुळे माझ्यासाठी ह्या कवितेचा सगळा परिणाम नासून गेलेला अाहे. अर्थात माझ्या मातृभाषेत नदी स्त्रीलिंगी अाहे हे एलियटला माहित असायचं कारण नाही, अाणि असलं तरी कविता करताना त्यानं अशा गोष्टींचा विचार करायला हवा असं कोणी म्हणणार नाही. पण हे कळूनदेखील रसभंग व्हायचा रहात नाही. (अाता एलियटच्या मनात नदी नसून 'नद' अाहे अशी एक पळवाट काढता येईल…)

रोचना Tue, 03/04/2012 - 14:06

In reply to by जयदीप चिपलकट्टी

कविता "ब्रह्मपुत्र" मनात ठेवून वाचली तर? "Is a strong brown god - sullen, untamed and intractable" हे या नदीचे चांगलेच वर्णन होईल...

प्रसाद Tue, 03/04/2012 - 12:40

सध्या मी “दोन डोळे शेजारी” चंद्रकांत खोतांचे पुस्तक वाचतोय (पूर्ण होत आलंय). स्वामी विवेकानंदांच्या गुरुवर रामकृष्ण परमहन्सांवर पुस्तक आहे. रामकृष्ण परमहन्सांच्या पत्नी सारदामाता एकामागून एक प्रसंग सांगताहेत, कोणत्याही क्रमाने असा लेखनप्रकार आहे.
धार्मिक म्हणून नव्हे तर स्वामी विवेकानंदांचे गुरु कसे असतील ह्या उत्कंठेपायी हे पुस्तक वाचायला घेतले. लिखाणाची शैली उत्तम आहे. प्रसंग जरी क्रमाने येत नाहीत तरीही लिखाणात कुठेही विस्कळीतपणा जाणवत नाही.

सागर Tue, 03/04/2012 - 15:43

जालापासून थोडा दूर होतो त्यामुळे थोडे वाचन झाले.

१. कैद्याचा खजिना - भा.रा.भागवत ( अलक्झांद्रे ड्युमासच्या 'द काऊंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो' या कादंबरीवरुन केलेला मराठीतला हा अनुवाद. )
भा.रां.नी केलेला अनुवाद म्हणजे अफलातूनच आहे. (जरी किशोर / कुमार वयोगटाला पुढे ठेवून केलेला असला तरी)
या अनुवादामुळे मला मूळ पुस्तक वाचायची इच्छा झाली त्यामुळे फ्लिपकार्टवर शोध घेतला. तर पार ६० रुपयांपासून अनेक प्रती उपलब्ध असल्याचे दिसले.
पण संक्षिप्त केलेली आवृत्ती मला घ्यायची नसल्यामुळे यातले मूळ पुस्तक कसे शोधावे हा प्रश्न होता तो प्रश्न फ्लिपकार्ट वर उपलब्ध असलेल्या प्रत्येक पुस्तकाच्या माहितीने सोडवला. प्रत्येक पुस्तकात पाने किती आहेत ही माहिती दिलेली असल्यामुळे त्यावरुन योग्य पुस्तक शोधता आले. मी द काऊंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो ची ही प्रत घेतली आहे. रु. २५०/- ला

इंटरनेटवर हे पुस्तक पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहे पण १२०० पेक्षा जास्त पाने संगणकावर वाचणे अवघडच आहे म्हणून हे पुस्तक विकत घेऊनच वाचणे योग्य वाटले.

२. संजय सोनवणींचे महार कोण होते? हा संशोधन ग्रंथ - वाचून झालाय त्यावर परिक्षण लवकरच लिहिन.
३. स्टुपिड - सुहास शिरवळकर (या पुस्तकात २ कथा आहेत (१. स्टुपिड २. दि गेसिंग मॅन)
४. मास्टर प्लॅन - - सुहास शिरवळकर ( या पुस्तकात २ कथा आहेत १. मास्टर प्लॅन २. कदाचित)
५. एक असतो बिल्डर - डॉ. सुधीर निरगुडकर (शब्दांकन - शोभा बोंद्रे) - छान वाटले. रसिक वर रिव्ह्यू वाचा

रांगेतः
१. दि काऊंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (इंग्रजी) - अलेक्झांद्रे ड्युमास
२. दी बिग स्लीप - रेमंड चॅन्डलर (इंग्रजी) - हे पुस्तक भारतात फ्लिपकार्टवर येथून घेता येईल व विदेशात अ‍ॅमेझॉनवर येथून घेता येईल. अ‍ॅमेझॉनवर या कादंबरीचे रिव्यूज् खूप चांगले आहेत. ते आधी वाचा. विषय आवडीचा असेल तर अवश्य घ्या ;)
३. हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ - भालचंद्र नेमाडे

अशोक पाटील Wed, 04/04/2012 - 08:18

In reply to by सागर

सागर ~

कोल्हापूरातील भगवान महावीर प्रतिष्ठान, जैन समाज, यांच्यातर्फे महावीर जयंतीनिमित्ताने गेले चार दिवस विविध कार्यक्रम करवीरवासीयांसाठी सादर करण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे कालचे श्री.संजय सोनवणी यांचे 'वेदपूर्व काळातील जैन संस्कृती'. जबरदस्त अभ्यास आहे संजयजींचा जवळपास दोन तासाच्या भाषणात त्यानी जैन संस्कृतीच्या उगमापासून ते विसाव्या शतकापर्यंतचा आढावा इतक्या प्रभावीपणे सादर केला की कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भद्दारकरत्न स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांच्यासह उपस्थित असलेले जैन शोध संस्थानाचे अभ्यासक यानी त्यांचे भरभरून कौतुक केले.

मी आणि संजय सोनवणी सुमारे पाच तास एकत्र होतो (कार्यक्रमापूर्वी), खूप मस्त गप्पा झाल्या आणि त्यावेळी त्यानी मला आपली खालील पुस्तके सप्रेम भेट दिली.

१. यशवंतराव होळकर
२....महार कोण होते [तुझ्या परीक्षणाची वाट पाहतो]
३. संस्कृत भाषेचे गौडबंगाल [हे पुस्तक जैन परंपरेचे एक गाढे अभ्यासक श्री.महावीर सांगलीकर यानी लिहिले असून तेही कालच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यानी मला याची भेट दिली. खूप अभ्यासू वाटले मला. त्याना आवर्जुन 'ऐसी अक्षरे' चे सदस्यत्व घेण्याची विनंती मी केली आहे. इथे आले की, या संदर्भात विशेष चर्चा घडतील असा मला विश्वास वाटतो.]

अशोक पाटील

सागर Wed, 04/04/2012 - 11:40

In reply to by अशोक पाटील

सविस्तर माहितीबद्दल मनापासून धन्यवाद अशोक काका. तुमच्या प्रतिसादातला उत्साहच सांगतो आहे कि कालची संध्याकाळ तुमची खूप छान गेली आहे
माझी खात्री आहे की तुमचे ते ५ तास खूप बौद्धिक आनंदात गेले असतील :)

तुम्हाला मिळालेली पुस्तके वाचून कशी वाटली ते अवश्य सांगा. मी अगोदरच ही पुस्तके वाचली आहेत, त्या अनुषंगाने चर्चा करायला नक्की आवडेल
सोनवणींचा वैदिक काळाचा जबरदस्त अभ्यास आहेच. ऋग्वेद, श्रुती,स्मृती, पुराणे यांच्यात काय आहे आणि काय नाही? याचे सखोल ज्ञान त्यांना आहे.

'वेदपूर्व काळातील जैन संस्कृती' हा एक वेगळाच विषय आहे. अशोक काका माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला शक्य असेल तर कालच्या संध्याकाळचा सविस्तर वृत्तांत एका वेगळ्या लेखाद्वारे लिहा. त्या अनुषंगाने तुमची मतेही वाचायला आवडतील :)

महार कोण होते वर परिक्षण तयार आहे. पण अजून काही दिवसांनी (बहुतेक शुक्रवारी किंवा रविवारी प्रसिद्ध करेन)

ऋषिकेश Mon, 09/04/2012 - 14:26

अजित हरिसिंघानी यांचं 'बाईकवरचं बिर्‍हाड' वाचतोय (अनुवाद सुजाता देशमुख)
आवडतंय. आंतरजालीय लिखाणासारख्या शैलीतलं पुस्तक आहे. पु़ए ते जम्मु व्हाया लेह असा बाईकवरून केलेला प्रवास थरारक वगैरे नसला तरी रोचक आहे. लेखकाची सुक्ष्म निरिक्षणशक्ती, प्रसंग, खुमासदार वाक्ये यांनी पुस्तक वाचनीय झालं आहे.

पुस्तकाचं मलपृष्ठ म्हणतं:
प्रसिध्द गिर्यारोहक सर एडमंड हिलरींना कुणीतरी एकदा विचारलं, की जीव एवढा धोक्यात घालून तो हिमालय चढायचाच कशासाठी? त्यावरं त्यांचं उत्तर होतं, ''कारण तो तिथे आहे म्हणून!''
कोणत्याही प्रकारच्या वेडया साहसाला त्यामुळेच 'का' हा प्रश्न कधी कुणी शहाण्या माणसानं विचारू नये.
नाहीतर अशी पुस्तकंच जन्माला येणार नाहीत.

रोचना Thu, 14/06/2012 - 15:11

हल्ली कामाबाहेरची पुस्तकं काय, ऐसीअक्षरे वरचे लेखन ही वाचायला निवांत वेळ मिळत नाही :-(

म्हणून अलिकडे दोन "छोट्या" पण अगदी भारदस्त कादंबर्‍या वाचायला घेतल्या:

१) हमीद दलवाई - इंधन. माझ्या सर्वात आवडत्या मराठी कादंबर्‍यांमध्ये बसणारी. भयानक आवडली!

२) पु. शि. रेगे - सावित्री - अजून प्रोसेस करतीये... या कादंबरीवर समीक्षक लेखन बरेच असावे असे वाटते. एखादा संदर्भ कोण देऊ शकेल का?

ऋषिकेश Thu, 14/06/2012 - 15:49

In reply to by रोचना

इंधन विषयी वाचायला आवडेल. कशावर आहे कादंबरी? काय आवडले वगैरे
वेळ काढून थोडकयत लिहाच ही विनंती. इथे प्रतिसादातही चालेलच किंवा वेगळा धागा काढलात तर उत्तम

अवांतरः सध्या काय वाचताय-२ काढाय्ला हवं का?

अशोक पाटील Fri, 15/06/2012 - 18:52

In reply to by रोचना

रोचना...

अगदी तुमच्यासारखीच माझी अवस्था झाल्याने (त्यातही 'आजोबा' होण्याच्या मार्गावर असल्याने चित्तही...चांगल्या अर्थाने.....थार्‍यावर नाही) निवांतपणे जालीय दुनियेतील घडामोडीकडे दिले पाहिजे तितके लक्ष जात नाही. पण असो. आज 'सावित्री' च्या निमित्ताने (हा एकच धागा नेहमी नजरेखाली ठेवतो मी) तुम्ही व्यक्त केलेली अपेक्षा वाचनात आली.

"सावित्री" तर इतकी छोटेखानी पत्ररुपी कादंबरी की ती एकाच बैठकीत वाचून झाली की मग उरते आपल्याजवळ तीबद्दल वारंवार विचार करीत राहणे. फार थोड्या कादंबर्‍या असतील मराठीत की जिचा आवाका पाचपन्नास पानांचाही नाही तरीही तिच्यावर वर्षानुवर्षे रसिक आणि समीक्षक प्रेमाने आदराने लिहित आले आहेत.

संदर्भासाठी तुम्ही द.भि.कुलकर्णी यांच्या "कादंबरी : स्वरुप व समीक्षा" या ग्रंथाला हात लावावा अशी मी मुद्दाम शिफारस करीत आहे. अर्थात फक्त 'सावित्री' वर या ग्रंथामध्ये चर्चा नसून अगदी फडके, उद्धव शेळके, पाध्ये, ज्योत्स्ना देवधर पासून ते लोकप्रिय म्हटल्या गेलेल्या रणजित देसाई, पेंडसे, नेमाडे आदी अनेकांच्या कादंबर्‍यावरील समीक्षा कुलकर्णी यानी अत्यंत समर्थपणे केली आहे (निदान मला तसे वाटते). सावित्री बद्दल द.भि. म्हणतात रेग्यांवर असलेला जे. कृष्णमूर्तींच्या तत्त्वविचारांचा ठसा जाणवला की 'सावित्री'ही आकळेल. त्या दृष्टीकोणातून तुम्हीही तिच्याकडे पाहाल तर बरेचसे कथीत न केलेले कळेल.

("इंधन" बद्दल सहमत.....दलवाईंची ही कादंबरी तुम्हाला इतकी आवडली म्हणजे त्याच मार्गाने यादवांची 'गोतावळा', मनोहर शहाणे यांची 'पुत्र" आणि तल्हारांची "माणूस" यानाही तुम्ही तुमच्या कपाटात मानाचे स्थान दिले असणार.)

अशोक पाटील

जयदीप चिपलकट्टी Wed, 20/06/2012 - 06:10

मार्टिन एमिसची 'मनी (money)' ही कादंबरी पुन्हा वाचली. पुस्तकाचा नायक जॉन सेल्फ हा बॅडमिंटनच्या शटलकॉकसारखा लंडन अाणि न्यूयॉर्क या दोन शहरांत येजा करत असतो. तो एक सिनेमा बनवण्याच्या प्रयत्नात असतो, पण फसवला जातो अाणि त्याच्याकडचे पैसे कसे लुबाडले जातात इत्यादि मुख्य कथाभाग अाहे, पण त्यात शिरत नाही.

जॉन एकदा लंडनमध्ये असताना एका काहीशा चमत्कारिक वागणाऱ्या माणसाशी त्याची अोळख होते, कालांतराने त्याला कळतं की हा माणूस लेखक अाहे अाणि त्याचं नाव मार्टिन एमिस. अशा प्रकारचं self-insertion (म्हणजे लेखकाने स्वत:च्या कादंबरीत पात्र म्हणून येणं) अनेक कादंबऱ्यांत अाढळतं (उदा. 'व्यासां'च्या महाभारतात).

कादंबरीच्या शेवटी मार्टिन अाणि जॉन एक बुद्धिबळाचा डाव खेळतात. (ज्यांना पटावरच्या घरांचा उल्लेख कसा करतात हे माहीत नसेल त्यांनी इथे पाहा.) या डावातली पटावरची शेवटची स्थिती फार मजेदार अाहे, ती अशी:

c4 वर पांढरं प्यादं अाणि c5 वर काळं प्यादं, पांढरा राजा b5 वर अाणि काळा राजा d4 वर. (पटावर बाकी कुठलेही मोहरे नाहीत.)

यात पांढरा राजा काळ्या प्याद्याला खाऊ पाहतो अाहे, अाणि काळा राजा पांढऱ्या प्याद्याला खाऊ पाहतो अाहे. पण प्रत्येक राजाचा स्वत:च्या प्याद्याला पाठिंबा अाहे. अशा रचनेला बुद्धिबळाच्या परिभाषेत zugzwang (compulsion to move) असं म्हणतात. त्यातली खुबी अशी की ज्या कुणाची खेळी असेल त्याची हार ठरलेली असते. (कारण त्याच्या राजाला अापल्या प्याद्यामागचा पाठिंबा काढून घ्यावा लागतो अाणि मग त्यानंतरच्या खेळीला ते प्यादं खाल्लं जातं. कालांतराने दुसऱ्या प्यादाचं वजिरीकरण होतं.) प्रत्यक्ष कादंबरीत कोण जिंकतं - मार्टिन की जॉन - याचा तर्क वाचकांवरच सोडतो.

ऋषिकेश Wed, 20/06/2012 - 09:28

नंदनदेवाच्या कृपेने सध्या 'राग दरबारी' चा आस्वाद घेत आहोत. भन्नाट उपहास (साधी माणसं ज्याला खवचट पणा म्हणतात ;) ) त्याने नटलेले हे पुस्तक म्हणजे नमुनेदार आहे. सध्या रोज रात्री घरी त्याच्या एका प्रकरणाचे अभिवाचनही चालले आहे. सगळ्या कुटुंबाला धो धो हसायला लावायचा हमखास उपाय पुलं नंतर बरेच दिवसांनी सापडला आहे! :)

राजेश घासकडवी Tue, 26/06/2012 - 10:43

गेली बरीच वर्षं आमच्या कपाटात हे पुस्तक आहे. बऱ्याच वेळा हातात घेऊन ११-१२०० पानाच्या वजनांनी दडपून, काहीतरी लाइट वाचूया म्हणून सोडून दिलं होतं. एकदोनदा मनाचा हिय्या करून तीसचाळीस पानं वाचलीही होती. पण त्यात पहिली पार्टीच चालू होती, लोकांच्या हळू हळू ओळखी होत होत्या. त्यामुळे कंटाळून सोडून दिली होती. येवेळी मात्र शेंडी तुटो वा पारंबी म्हणून वाचायलाच घेतली. पहिली साठ सत्तर पानं वाचून झाल्यावर मग थोडी गंमत यायला लागली. या गड्याला थोर म्हणतात ते उगीच नाही हे पटायला लागलं.

याला तीन आठवडे झाले. मी आता पुस्तकाच्या मध्यावर आहे. गेली शंभरेक पानं थोडं कंटाळवाणं वाटलं. आता पुन्हा युद्ध सुरू होतं आहे. त्यामुळे आता कादंबरी आणखीनच रंगेल अशी आशा आहे. अजून दोन तीन आठवड्यांनी पूर्ण मत देईन.

पण तुमच्यापैकी कोणी हा ठोकळा काही पानं वाचून सोडून दिला असेल तर पुन्हा वाचायला घेण्याची सूचना करतो.

श्रावण मोडक Tue, 26/06/2012 - 11:49

In reply to by राजेश घासकडवी

या पुस्तकाची पानांची संख्याच दडपून टाकते. त्यामुळं मीही ते असंच बाजूला ठेवलं होतं. नंतर वाचणं होत नाही म्हणून चक्क कुणाला तरी दिलं. आता माझ्याकडं पुस्तक नाही. तुमचा पूर्ण प्रतिसाद येऊ दे. नंतर पाहू.
या पुस्तकाप्रमाणेच पानांची संख्या पाहून दडपून गेलो ते (माझ्या माहितीतलं आणि अनुभवातलं) आणखी एक पुस्तक - गॉन विथ द विंड!

जयदीप चिपलकट्टी Wed, 22/08/2012 - 15:11

In reply to by राजेश घासकडवी

अभिजात रशियन कादंबऱ्यांतला एक वैताग म्हणजे पात्रांची संख्या बरीच मोठी असते, अाणि नावं (अापल्यासाठी) अाडनिडी असतात. म्हणजे समजा कादंबरीच्या नायकाने पान क्र. ४२६ वर 'मित्या! किती दिवसांनी भेटतो अाहेस रे!' अशा शब्दांत दिमित्री ग्रिगॉर्येविचचं उत्साहाने स्वागत केलं, तर हा इसम कोण अाणि त्याचा उल्लेख अाधी कुठे अाला होता हे बघण्यासाठी मागची पानं धुंडाळावी लागतात. यावर एक सोपा उपाय सुचतो तो म्हणजे पात्रांची यादी अाणि प्रत्येकाचा उल्लेख पहिल्यांदा कुठे येतो याची सूची (index) कादंबरीला जोडणं. पण का कोण जाणे, असं काही कुणी केल्याचं पाहण्यात नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 22/08/2012 - 20:45

In reply to by जयदीप चिपलकट्टी

खालच्याच एका प्रतिसादात 'लोकमान्य ते महात्मा' याचा उल्लेख केला आहे. ही कादंबरी नाही, इतिहास आहे. भरपूर लोकांचे उल्लेख, त्यांची मतं, लिखाण यांच्याबद्दल लिहीलेल आहे आणि बरीचशी नावं मराठी आहेत. तरीही वीसेक नावं वगळता मला सतत विसरायला होतं. नशीबाने या पुस्तकाच्या शेवटी व्यक्तिंची सूची आहे.

बॅटमॅन Mon, 18/03/2013 - 03:37

In reply to by राजेश घासकडवी

जुणा धागा वर आणतोय.

वॉर्‍ अँड पीसची ५९४ पानी संक्षिप्त व्हर्जन अर्नेस्ट जे. सिमन्स या समीक्षकाने सिद्ध केलेली आहे. त्यात तत्वज्ञानविषयक लै मोठे उतारे अर्ध्या पानात मावतील इतके संक्षिप्त करून लिहिल्यामुळे निव्वळ कथाभाग मस्त वाचला जातो. मॉड बंधूंनी केलेले भाषांतर टॉलस्टॉयला विशेष आवडले होते त्या भाषांतराची ही संक्षिप्त व्हर्जन आहे. लै वर्षे झाली वाचून, पण अजून मनातून हटायला काही तयार नाही. या कादंबरीमुळे रशियन लेखकांच्या आणि रशियाच्या प्रेमात पडलो. त्या प्रेमप्रकरणात काही पुस्तके वाचली, पण बरीच अजून बाकी आहेत.

बाकी कादंबरीबद्दल काय बोलावे???? १८१२ च्या नेपोलिऑनिक आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अख्खा रशिया, त्यातही रशियन अ‍ॅरिस्टोक्रसी अशी इतक्या जवळून भिडते की काय सांगू!!! मोठी पात्रसंख्या हा अडसर आजिबात नाही. वाचनाच्या ओघात ते हळू हळू लगेच कळत जाते. क्लासिक्सची हीच खासियत वाटते, मग ते महाभारत असो नैतर इलियड नैतर वॉर अँड पीस. प्रिन्स अँड्र्यू बोल्कोन्स्की, नताशा रोस्टोव्हा, पिएअर बेझुखोव, प्रिन्सेस मेरी, हेलेन आणि आनातोली कुरागिन, ही पात्रे लै भारी. पण रोस्टोव्ह कुटुंब इतके आवडते की बस्स. पिअर बेझुखोव आणि नताशा रोस्टोव्ह, निकोलस रोस्टोव्ह आणि प्रिन्सेस मेरी बोल्कोन्स्की यांमधील प्रेम फुलताना फार छान दाखवलेय. पिअर बेझुखोव्हबद्दल कादंबरीभर कणव जाणवत होती आणि मनोमन स्वतःला प्रिन्स अँड्र्यू किंवा निकोलस रोस्टोव्ह मानत होतो, पण नंतर तर लक्षात आले, आपल्या मनातला पियर बेझुखोव इतका उत्तम दाखवणे अजून कुणाला जमले नसते. मीही कादंबरीभर कुणी निखिल बेलाकोवस्की होऊनच जणू फिरत होतो. पहिले प्रेम असल्याने मला वॉर अँड पीस फार म्हंजे अतिशयच फार आवडते.

नेपोलियनचा तर सरळ सरळ उपहासच केलाय. कुटुझॉव सर्वात भारी जनरल दाखवलाय. पण शेवटी सगळेजण नियतीच्या हातातले बाहुलेच असतात हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. तो कितपत जमला याबद्दल आज इतक्या वर्षांनी पुन्हा विचार करताना थोडे साशंक व्हायला होतेय. हा कदाचित संक्षिप्त व्हर्जन वाचल्याचा परिणामही असेल. पण पहिल्यांदा वाचताक्षणी हे काही डोक्यात नव्हते. ती पार्लरमधली संभाषणे, ते फ्लर्टिंग, ती तात्विक चर्चा, पियर बेझुखोवची स्वतःशीच चाललेली चर्चा, प्लॅटन कराटेव सारख्या कैद्याचे साधेसोपे तत्वज्ञान, आणि सगळ्यात मुख्य म्हंजे विविध नातेसंबंधांच्या अनेक पदरांचे इतके सुरेख, सूक्ष्म अन मार्मिक चित्रण या सगळ्याच्या मोहात पडलो होतो- अजूनही तसाच आहे :) सोनियाला निकोलस आवडत असतो, पण काउंटेस रोस्टोव्हामुळे तिला ते शक्य होत नाही आणि ती शेवटी त्याला एक पत्र लिहिते तो प्रसंग असो, किंवा प्रिन्सेस मेरीला प्रपोज करतेक्षणीचे निकोलस रोस्टोव्हचे उद्गार असोत, टॉलस्टॉयच्या वर्णनशैलीला तोडच नाही.

युद्धामुळे स्थलांतर करतानाचे लोकांचे झालेले हाल असोत किंवा बाकी काही, टॉलस्टॉयने सर्व विश्व उच्छिष्ट केलेय असे जाणवत राहते. पण हालांचे वर्णन वाचूनही डोस्टोएवस्कीच्या क्राईम अँड पनिशमेंटसारखा मनावर चरा उठत नाही. वेदनासुद्धा काहीतरी धीरोदात्त वगैरे होतात एकदम. सर्व कसे एकदम ग्रँड होते.

अवांतर: ही कादंबरी वाचल्यामुळे चायकोव्हस्कीचे १८१२ ओव्हर्चर पहिल्यांदा ऐकले, तेव्हा त्या संगीतामागचा भाव हळुवारपणे उमगायला आजिबातच अडचण पडली नाही. पहिल्या ५-७ मिनिटांत आक्रमणपूर्व अमन-चैन, आक्रमणामुळे उडालेली प्रचंड खळबळ, रक्तपात, एकूणच करुणा जाणवत राहते. नंतर एका पिपाणीसदृश्य वाद्यातून हळुवार येणारी ट्यून तिच्या नजाकतीसाठी अवश्य ऐकावी. जरा वेळ हे कवतिक झाले की मग लगेच "रशिया स्ट्राईक्स बॅक" हे जाणवून देणारी ती "ग्रँड फिनाले". व्ही फॉर वँडेटा या पिच्चरमध्ये बाँब फुटतानाचे संगीत म्हंजे हेच. ते ऐकताना तर एकदम रशियामय होऊन जायला होते. [लेनिनग्राडमध्ये केलेला या ऑर्केस्ट्राचा एक कार्यक्रम तूनळीवर पाहिला, वरिजिनल स्कोरमध्ये सांगितल्याप्रमाणे खर्‍या तोफा वापरल्या आहेत. नैतर अन्य स्कोरमध्ये तोफा नस्तात.]

त्यामुळे की वॉर अँड पीस आणि चायकोव्हस्कीचे ओव्हर्चर ही अतूट जोडी मनात आता फिट्ट बसलेली आहे.

नंदन Thu, 04/04/2013 - 15:09

In reply to by बॅटमॅन

ओळख. कादंबरीचा प्रचंड पट, त्यातले बारकावे, स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेससारख्या एका दृष्टीने काळाच्या पुढच्या तंत्राचा केलेला वापर, इतिहास आणि इतिहासलेखनाबद्दलचं चिंतन, युद्धातल्या सामूहिक, बिनचेहर्‍याच्या काहीशा बथ्थड हिंसेबरोबरच; तावडीत सापडलेल्या एखाद्या सामान्य व्यक्तीचा जीव घेणारी सूक्ष्मतर, तेंडुलकरांच्या 'शांतता...'सारख्या अस्वस्थ करणार्‍या हिंसेचं प्रभावी चित्रण (वेरेश्चागिनचा बळी, (घसा खाकरत) अनुवाद); स्वप्नं आणि त्यांची सूचकता (टॉलस्टॉयच्याच अ‍ॅना कॅरेनिनातल्या स्वप्नांच्या योजकतेबद्दल एक वाचनीय लेख ); रशियन उमराव वर्गावरील फ्रेंचच्या ओसरत्या प्रभावाचे भाषिक चित्रण इ. अनेक कारणांसाठी हे पुस्तक (खुद्द टॉलस्टॉयनेही ही कादंबरी नाही, अशी भूमिका घेतली होती) - शक्य झाल्यास, अ-संक्षिप्त रुपात, वाचण्यासारखे आहे.

टॉलस्टॉयने सर्व विश्व उच्छिष्ट केलेय असे जाणवत राहते. पण हालांचे वर्णन वाचूनही डोस्टोएवस्कीच्या क्राईम अँड पनिशमेंटसारखा मनावर चरा उठत नाही. वेदनासुद्धा काहीतरी धीरोदात्त वगैरे होतात एकदम

अगदी, अगदी. 'जे पिंडी ते ब्रह्मांडी' ह्या म्हणीचे दोन भाग केले तर फार फार ढोबळपणे ह्या दोन लेखकांचे ते वर्ण्यविषय म्हणता येतील. मात्र 'क्राईम अँड पनिशमेंट' हा 'एक तरी ओवी अनुभवावी' सारखा मामला आहे. त्याबद्दल काही लिहू नये.

बॅटमॅन Thu, 04/04/2013 - 16:04

In reply to by नंदन

दिलेल्या लिंक्स आवडल्या. वेरेश्चागिनच्या बळीचे वर्णन अंमळ विसरलो होतो, लिंक वाचून ते पुन्हा जागृत झाले. स्वप्नांच्या सूचकतेबद्दलचा लेखही आवडला. फ्रेंचचा प्रभाव ओसरता किंवा कसा ते वॉर अँड पीसमध्ये इतके कळत नाही कमीतकमी संक्षिप्त आवृत्तीवरून तरी. अ‍ॅरिस्टोक्रॅट फ्रेंचचा वापर तर करतातच. अ-संक्षिप्त कादंबरी आता पुन्हा वाचायला सुरुवात नक्की करेन.

स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेसचा वापर केलाय तो विशेषतः पियर बेझुखोव आणि प्रिन्स अँड्र्यू बोल्कोन्स्की यांच्या आत्मचिंतनात, बरोबर?

बाकी क्राईम अँड पनिशमेंट हा निव्वळ अनुभूतीचा मामला असल्याशी लैच्च वेळा सहमत. तो रास्कोलनिकोव्ह पीटर्सबर्गच्या रस्त्यांवरून फिरत असतानाचे चित्रण विशेषतः इतके प्रत्ययकारी आहे की पुन्हा ते मुळातून वाचलेच पाहिजे.

अवांतरः नोट्स फ्रॉम अ डेड हाऊस ही डोस्टोयेव्हस्कीची कादंबरीही मस्त आहे. बायकोचा खून केल्याच्या खोट्या आरोपाखाली १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झालेला अलेक्झांडर गोर्यांचिकोव्ह तुरुंगातील सर्वांशी कसा जुळवून घेतो त्याचे चित्रण फार भारी. अकिम अकिमोविच चे पात्र मनात विशेष घर करून राहते.