कावळ्यांची शाळा
“ओकांना कावळे आवडते दिसतायत....”!
… खरे आहे. पुण्यातल्या ओंकारेश्वराच्या आसपास नदीपार जवळून पास होताना जाता जाता नुकतेच आईच्या अंत्यविधीसाठी जमलो असताना निर्माण झालेले दृष्य सहज डोळ्यासमोर तरळले. कावळ्याच्या पिंडाला स्पर्षाच्या विधी संदर्भात गमती-जमती जमलेल्यांचे शेरे-उपशेरे ऐकायला, पहाताला मिळाल्या त्यावरून काही सुचले ते सादर.
-----
“वाटलं नव्हतं यांना देखील इतका वेळ लागेल म्हणून!... अध्यात्मिक व्यक्तिमत्व, शांत मृत्यू असून ही पिंडाला काक स्पर्ष करायला फार नखरे करताना पाहून, मामासाहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. काहीं जमलेल्यांना, ‘हे थेर कराचेच का कशाला?’ असे वाटत होते.
“म्हातारा फार खट होता, जाताजाता ही काहीना काही तरी खुस्पटे काढून जाणार!... ज्यांना साधेसुधेपणा जन्मभर जमला नाही... आता गेल्यावर ती सवड सुटतेय का?, जवळच्या नातलगांच्या विचारांच्या सुरळ्या, पुर्वाठवणीतून उमाळून येत होत्या!
“काय पांडित्य होते हो!... गोड आवाजातील भजने ऐकून मन तृप्त होईं” त्यांच्या भजन मंडळी पैकी एकांचे मत पडले.
“बुवांचा चेहरा आठवत एकांच्या आठवणी जाग्या झाल्या. “सफेद फेटा, भव्य कपाळावर उभे गंध, कमरेला कसलेली शाल... अहो त्यांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते... भागवतावर त्यांच्या सारखे प्रवचनकार मिळणे कठीण”... नकारार्थी मान हलवत डोळ्यातील अश्रू वाट काढत होते.
“सरका सरका” म्हणत आणखी एकांचे जमलेले नातलग पुढे येत आपल्या व्यक्तिच्या पिंडांची स्थापना करायला जमलेल्यातून वाट काढत गेले अन पहाता पहात कावळे त्यावर तुटून पडताना पाहून त्यांच्या नातलगांच्या चेहऱ्यावर समाधान तरळले. “चला सुटलो बुवा”, मोठा मुलगा मनात म्हणाला, “आता वाटण्यात मी बापाचा सेवेत काही केले पडू दिले असे अक्का म्हणणार नाही” असे वाटून.
“कसे असतात पहा एक एकेकांचे आत्मे!... अतृप्त असावेत असे मला वाटायचे!... मुलीच्या खर्चिक स्वभावचे ते कौतुक करत. तुझ्या नाकर्तेपणामुळे मला तिचे लाड पुरवायला लागतात”... जावईबापूंचा पुर्वानुभव मनात बोलत होता. “मानलं बुवा सासरे बुवांना, बेट्याच्या पिंडाला कसा पटकन कावळा शिवला ते”...
“काय यै, आजकाल मरण पण हजारात खर्चाला पडून जातं हो...”
“नाहीतर काय... एक एक सोपस्कार करता करता दम लागतो हो...!”
“ते आज काल ज्ञान प्रबोधिनीवाले झटपट दिवस करायला लागलेत म्हणून जरा बर झालयं”... जाणारा जातो पण उरलेल्यांना त्यांच्यासाठी हजारात पैसे ओतावे लागल्याचे नुकतेच अनुभवलेल्यांच्या ओठांवर नकळत बोल आले...
“आपल्या आळीतले ते बाबूरावांचे माहितै ना... अहो ते हो... चाऱ धामला मुला-मुलींनी कौतुकाने पर्यटनाला पाठवले होते? पण रेल्वेच्या अपघाताच्या बातमीतून कळले ते गेले.
“काय हो, लगेच सरकार ने 3 लाखाची रक्कम दिली. तेच आता त्यांच्या पत्नीला उपचारांना कामी आले हो...” होकार भरत मित्राच्या बातमीला त्यांनी दुजोरा दिला.
“मरावे परी कीर्ती रुपे उरावे” म्हणायचे, आता मरावे परी पैसे देऊन जावे असे म्हणायला सुरवात करावी असे वाटते!”
“अहो मनात आले, चला असाच काही अंत झाला तर नुकसान भरपाईतून आपल्या अपरोक्ष नातेवाईकांचा अंत्यसंस्काराचा खर्चही सरकारी...! “काही तरी बडबडून नकोस रे नतद्रष्ट लेकाच्या, मित्रान त्याला दटावले!..”.
--------
कावळे काव काव करत विजेच्या खांबांवर, आसपासच्या घरांवर, जुन्या झाडांच्या फांद्यांच्या आधाराने गर्दी करून नव्या नव्या लोकांच्या हातांनी ठेवल्या जाणाऱ्या पिंडांची बारीक नजरेनी पहाणी करून कोणाला वगळायचे अन् कोणाच्या पिंडांना नाही ते अचुक ठरवत इकडून तिकडे भिरभिरत होते. एक सीनियर काक शेजारच्या काकाला बघत म्हणाला, “का रे, त्या म्हातारबुवाच्या पिंडाला का टोच मारून आलास? शेजारच्या फांदीवरून आपले बस्तान बसवत एक काक पचकला, “समझता नहीं साला!... त्याच्या पिंडाची बारी नंतर होती... आधी त्या खीरवाले पिंडाच्याकडे न जाता, हे यडं तिसरीकडे गेलं...”
“आजकालच्या कावळ्यांना झालय काय... कळत नाही! एकदा कुणीही जायचं नाही, फिरकायचे पण नाही म्हणून सक्त ताकीद करून पण एकाचे काय डोके फिरले काय की!... तर म्हणतो कसा? अरे यानी जन्मभर कावळ्यांच्या स्पर्षांची चेष्टा केलीन! म्हणून आता पिंडाला आम्ही कसे शिवतो दाखवायचे होते मला! ...”
मागची वाहने माझ्या वाहनाला, ‘चल चल, हिरवा दिवा केंव्हा लागलाय थांबलायस का’? असे सुचवत जोरजोरात साद घालू लागले. मी वाहन जोरात पिटाळले... काव काव रव माझ्या मनांत घोंघावत होता...!
प्रतिक्रिया
हाहाहा खुसखुशीत!
हाहाहा खुसखुशीत!