दिवाळी अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने पुढे आलेली एक बाब म्हणजे मुद्रितशोधन. तसा प्रत्येकानेच थोड्याफार प्रमाणात या कामाला हातभार लावला असला तरी मेघना भुस्कुटे, अमुक आणि चिंतातुर जंतू यांनी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांनी ही बारीक फणी फिरवल्यामुळे ऐसीच्या दिवाळी अंकात शुद्धलेखन, भाषेचा वापर, विरामचिन्हांचा उपयोग इत्यादी बाबतीतल्या चुका अत्यंत नगण्य स्वरूपात आहेत अशी आम्हाला खात्री आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. दुर्दैवाने न राहिलेल्या चुका दिसत नाहीत, त्यामुळे त्यांना किती काम करावं लागलं याची कल्पना येत नाही.
अर्थातच मुळातल्या लेखनात कमीत कमी त्रुटी असतील तर मुद्रितशोधनाचं काम करायला वेळ कमी लागेल हे उघडच आहे. काही वेळा अनेक गोष्टी नजरचुकीने घडतात. तेव्हा लेखन करताना नुसतं भान पाळणंही मुद्रितशोधकांचा वेळ प्रचंड प्रमाणावर वाचू शकतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर बोली आणि लेखी भाषेची सरमिसळ लिहिताना सहज होऊ शकते. झाले, केले, येणे असं काही वेळा तर झालं, केलं, येणं असं काही वेळा लिहिण्याच्या ओघात लिहिलं जाऊ शकतो. लिहिताना हे लक्षात ठेवलं आणि प्रसिद्धीपूर्वी त्यातून राहिलेल्या चुका दुरुस्त केल्या तर मुद्रितशोधनाचं काम प्रचंड हलकं होऊ शकेल.
म्हणून दिवाळी अंकाच्या लेखकांसाठी एखादं 'स्टाइल गाइड' (मराठी प्रतिशब्द/अनुवाद सुचवा) तयार करावं अशी कल्पना पुढे आली. ते करण्यासाठी संपादक प्रयत्न करत आहेतच. शिवाय ऐसीच्या वाचकांकडूनच सूचना आलेल्या आवडतील.
या स्टाइल गाइडमध्ये
१. नेहमी लेखनात दिसून येणाऱ्या चुका टाळण्यासाठी काय करावं याबद्दल सूचना असाव्यात.
२. परिपूर्णतेपेक्षा उपयुक्ततेवर भर असावी. तेव्हा शक्य तितक्या मोजक्या पण महत्त्वाच्या सूचना असाव्यात.
हे गाइड तयार करताना संपादकांनी केलेल्या काही सूचनांनी मी सुरूवात करतो आहे. जसजशा नवीन सूचना येतील त्याप्रमाणे या लेखात मी त्यांची भर घालेन. सर्व संपादक त्यावर हात फिरवतील आणि ऐसीवर ज्याप्रमाणे 'मराठीमध्ये टंकनासाठी मदत' असा धागा आहे, तसाच हा उपयुक्त ठरेल.
शुद्धिचिकित्सक
- शुद्धलेखन तपासण्यासाठी फायरफॉक्स अॅडऑन पुढील दुव्यावर उपलब्ध आहे. https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/marathi-dictionary/
सर्वसाधारण संकेत
- लेखी (करावे, माझे, तुझे इ.) आणि बोली (करावं, माझं, तुझं इ.) यांत सातत्य असावं. ललित लेखनात उद्गार असल्यास त्यात बोली आणि निवेदनात लेखी इतका फरक ठीक. पण एरवी निदान एका लेखात तरी कोणतीही एकच एक शैली राखावी.
- बोलीच्या शैलीत लिहिताना शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर शीर्षबिंदू देण्यापूर्वी शीर्षबिंदूऐवजी मात्रा वापरली तरी शब्द अर्थपूर्ण राहतो का ह्याची चाचपणी केलेली चांगली. चुकीच्या शीर्षबिंद वापराची काही उदाहरणे: मस्तं, भावविश्व ऐवजी 'भावं विश्व' असे लिहिणे इ.
- पूर्णविरामाआधी आणि स्वल्पविरामाआधी रिकामी जागा (स्पेस) सोडू नये. विरामांनंतर एक जागा जरूर सोडावी.
- शब्दयोगी अव्ययं शब्दाला जोडून लिहायची असतात. ‘अदितीदेखील’ - योग्य. ‘अदिती देखील’ – अयोग्य.
- दुहेरी अवतरणचिन्हं (“...”) ही फक्त व्यक्तीचे उद्गार दर्शवायला वापरायची. विवक्षित तपशील दाखवण्यासाठी, नावाचा निर्देश करण्यासाठी, एखाद्या शब्दाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी एकेरी अवतरणचिन्हं (‘...’) वापरावा.
- अनेक गोष्टींची जंत्री दाखवताना स्वल्पविरामाचा वापर करावा. पण त्या जंत्रीतही पोटप्रकार आल्यास तिथे अर्धविराम (;) वापरावा.
- सामासिक शब्द : तत्सम शब्द स्वतंत्र लिहिताना दीर्घान्त लिहिला जातो. पण समासात प्रथमपदी आला आणि र्हस्वान्त असेल तर मात्र र्हस्वान्त लिहिला जातो. उदा : कवी योग्य. कवि अयोग्य. पण कवीराज मात्र अयोग्य. तिथे कविराज योग्य.
- '...' व उद्गारचिन्हांचा अतिरेक टाळावा.
काही विशिष्ट शब्द/अक्षर रूपांविषयी
- पाहा, वाहा, राहा (पाहणे, वाहणे, राहणे; पाहताना, वाहताना, राहताना; पाहत, वाहत, राहत) ही योग्य रूपं. मात्र आज्ञार्थासाठी पहा, रहा, वहा अशी रूपेही चालतील.
- बहुतांश मराठी शब्दांत (जसे युद्ध, वृद्ध इत्यादी) द्ध योग्य. ध्द अयोग्य.
- तत्समेतर मराठी अकारान्त शब्दांमध्ये उपान्त्य स्थळी उकार, वेलांटी असल्यास दीर्घ द्यावी. उदा. घरून, येऊन, चूळ, नीट इ. शब्दाला 'ही', 'च' असे प्रत्यय लागले असतील तर नियम लावण्यासाठी प्रत्यय काढून उरलेल्या शब्दाला लावावा आणि मग प्रत्यय परत लावावा. उदा. कुठूनही, चूकच इ.
परभाषिक शब्दांविषय़ी
- परभाषिक शब्दांसाठी मराठीत प्रमाण किंवा रुळलेला संकेत असला, तर तो वापरावा. उदा : रशिया, रशियन, पॅरिस, वगैरे
- काही परभाषिक शब्दांसाठी मराठीत पर्याय असला, तरीही परभाषिक शब्द जर मूळ लिखाणाच्या प्रकृतीला साजेसे असतील, आणि मराठी प्रतिशब्द त्या लिखाणप्रकृतीच्या मानानं बोजड वाटत असले, तर मूळ लिखाणातले परभाषिक शब्द तसेच ठेवायला हरकत नाही. उदा : कंप्यूटर-संगणक, इंटरनेट-आंतरजाल, डेटा-विदा, परस्पेक्टिव्ह-परिप्रेक्ष्य वगैरे.
तेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी वाचताना दातातल्या खड्यांसारख्या खटकत असतील त्यांविषयी सकारात्मक सूचना केल्यास आवडेल. दिवाळी अंक लेखनासाठी अंतिम स्टाइल डॉक्युमेंट तयार करताना त्याचा उपयोग होईल. धन्यवाद.