नांगी गळू लागलेले फुलपाखरू

नांगी गळू लागलेले फुलपाखरू

लेखक - संजीव खांडेकर

'संकल्प' या सुमारे २८ वर्षांपूर्वी संपादित केलेल्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढायची आहे, नव्याने संपादकीय लिहून देता येईल काय, व ते दोन दिवसांत लिहून हवे आहे, अशी विचारणा आल्यानंतर मी या पुस्तकाकडे पुन्हा वळलो.

तीसेक वर्षांपूर्वीचे जग; सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जग आज अस्तित्वात नाही. तीस वर्षांपूर्वीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे, ती शोधण्याची साधने, व ती वापरण्याचे सामर्थ्य या सर्वच बाबींचे, स्वरूप कमालीचे बदलते आहे. लांबून सारखेच दिसणारे जग किंवा बदललेले पृष्ठभागावरचे जग आणि त्याच्या आत सामावलेले कळीचे जग आत जुने राहिले नाही.

तरीही 'संकल्प'मधील (त्या वेळच्या) तरुणांनी सांगितलेली आत्मकथने त्यांच्या नितळ व उत्कट आविष्कारशैलीमुळे आजही वाचनीय तर आहेतच, परंतु मनस्वी आणि मोहक आहेत. बऱ्याचदा एखाद्या स्वप्नवत जगात किंवा भूतकाळातील अवशेषांच्या ढिगाऱ्यात, इतिहासाच्या पसाऱ्यात, पानझडीने झाकलेल्या जंगलातील एखाद्या वळणावळणाच्या वाटेवर पसरलेल्या किंवा हरवलेल्या जंजाळात जाऊन येण्याचा अनुभव ही आत्मकथने आजही निश्चित देतात.

अठ्ठावीस वर्षांपूर्वी या संकलनाविषयी संपादकीय लिहिताना मी जो हेतू मनाशी बाळगला होता तो त्या लिखाणात विशद केला आहेच. त्या वेळी मी परिवर्तनाच्या चळवळीत झेप घेण्याच्या क्षणाची 'नैतिक पूर्वमनस्कता' तपासावी, समजून घ्यावी हा हेतू ठेवून या आत्मकथनाकडे पाहतो आहे, असे म्हणालो होतो. 'नैतिक पूर्वमनस्कता - किंवा मॉरल प्रिऑक्यूपेशन' ही संकल्पना जेवढी तात्त्विक (Philosophical) आहे तेवढीच मानसशास्त्रीय आहे. एका अर्थाने फ्रॉईडच्या स्वप्नविश्लेषणाच्या सिद्धान्ताजवळ, त्याच्या 'अनकॉन्शस' किंवा 'दबलेल्या इच्छारूपा'जवळ जाणारा हा शब्द आहे. या इच्छारूपाचा शोध घेताना दीनानाथ मनोहर लिहितात, 'सोमनाथला गप्पा मारताना अनिल थत्ते मला म्हणाला होता, "दीनानाथ, तुला असं नाही वाटत की जे या स्पर्धेच्या जीवनात अयशस्वी ठरतात, मागे पडतात, असे तरुण समाजकार्याकडे, चळवळीकडे वळतात?" प्रस्थापित व्यवस्थेत यशस्वी होऊनही परिवर्तनाच्या संघर्षात स्वेच्छेने आलेल्या व्यक्तींची नावे सांगून मी त्याचे म्हणणे खोडायचा प्रयत्न केला होता. पण माझ्या मनात विचार आला होता, हे काहीसं खरं काही व्यक्तींच्या बाबतीत खरंही नाही का? पण या स्पर्धेत अयशस्वी होणाऱ्या व्यक्ती केवळ मर्यादित कुवतीमुळे अयशस्वी होतात का? की तथाकथित 'यशस्वी' होण्यातील निरर्थकता त्यांना जाणवलेली असते? या व्यवस्थेत प्रस्थापित होण्याची, पहिला नंबर मिळवण्याची, स्थान मिळवण्याची, घोडदौड करण्याची त्यांना इच्छाच नसते. ही इच्छा नष्ट होणे ही व्यक्तीला परिवर्तन-चळवळीकडे नेणारी पाऊलवाट असते काय?

चळवळीत येण्याची कारणं शोधावयास लागलो की मला प्रश्न पडतो, की अशी काय परिस्थिती होती, अशा काय घटना घडल्या, कुठली व्यक्ती अशी प्रभावी ठरली की ज्यामुळे स्वतःबद्दल असमाधानाचा सल उत्पन्न झाला, वाढत राहिला?'

अशी कितीतरी आत्मशोधांची प्रश्नोत्तरे, दिवास्वप्नांच्या फॅन्टसी राज्यातून गाळलेली माणके, किंवा स्वतःच्या 'मी'पणाचा प्रवास 'विशेषेन पश्यते' अशा पद्धतीने पाहून स्वतःला व (प्रसिद्ध मनोविश्लेषणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक लाकाँ यांनी स्पष्ट केलेला) द अदर (The Other) या सभोवतालाला परीक्षानळीत घालून केलेली निरीक्षणे व चिंतने या सर्व आत्मनिवेदनांतून वाचकांना सापडू शकतील.

फ्रेडरिक जेमसन या तत्त्वचिंतकांनी 'राजकीय सुप्त इच्छारूप' (Political unconsciousness) अशी संकल्पना मांडली आहे. ही संकल्पना खूपच जटिल, गुंतागुंतीची, परंतु मानवी समाजाच्या ऊर्ध्वगामी व्यवहाराच्या केंद्रस्थानातील जडणघडणीचा मागोवा घेणारी, आणि मानवी संस्कृतीच्या व्यामिश्र प्रवासाचे राजकीय विश्लेषण करण्यासाठी एक उपयुक्त साधन म्हणून वापरली जाते. मुख्यतः फ्रॉईड व लाकाँ अशा दोन चिंतकांनी मांडलेला गृहीतकांचा विचार व सिद्धांतांचा वापर जेमसन याने (Political unconsciousness) या आपल्या कल्पनेत केला आहे.

फ्रॉईडने व्यक्तीची जाणीव (consciousness) विदित करताना जाणिवेचे मुख्यत्वे तीन भाग केले, पहिला 'इड' व दुसरा 'इगो' म्हणजेच 'मी'. 'मी'चा तो भाग, जो असे मानतो की 'मी म्हणजे मी' आहे (I am me), तिसरा 'सुपर इगो' म्हणजे अंतरात्म्याचा असा भाग की ज्याच्यामुळे माणसाला लाज वाटते, शरम उत्पन्न होते, असमाधान आणि अपराधीपण वाटत राहते. त्यामुळे आपोआपच व्यक्तीच्या (अमर्याद) इच्छांना एक लगाम लागतो. आणि 'इड' म्हणजे असा स्वतःचाच एक भाग की जेथे साऱ्या दमन केलेल्या, 'झिप' केलेल्या, दाबलेल्या इच्छांचा साठा, एखाद्या तळघरातील बंद कुलुपात ठेवलेल्या वस्तूंसारखा पडून आहे, क्वचित उघडण्याची वाट पाहतो आहे. परंतु व्यक्तीच्या दैनंदिन व्यवहारातील जाणिवेला मात्र अशा तळघराचा पत्ताच असत नाही. फ्रॉईडच्या म्हणण्यानुसार अशा सुप्त इच्छा मुख्यत्वेकरून मूलभूत, जैवऊर्मीविषयक आणि लैंगिक तुष्टता मिळवण्यासाठी उत्पन्न झालेल्या असतात. या इच्छाभांडाराचे दुसरे नाव म्हणजे 'लिबिडो'. प्रामुख्याने लैंगिक सुख-समाधानासाठी जरी या इच्छांची निर्मिती झालेली असली तरीही त्यांचे अन्य, म्हणजे पैसा, यश, नाव, प्रतिष्ठा, सत्ता, अशा विविध कारण रूपांत सतत परिवर्तन होत असते, व अशा रूपांतरक्रियेत ती ती व्यक्ती आपल्या जाणिवेच्या साहाय्याने स्वतःचे आयुष्य किंवा जगण्याची शक्ती, जीवनोत्सुकता खर्च करत असते. मात्र जाणिवेला माहीत नसलेल्या तरीही जाणिवेला हादरवून टाकण्याची शक्ती असलेल्या दाबलेल्या इच्छांचा सुप्त साठा त्या व्यक्तीच्या जीवनात अंतर्बाह्य स्फोट घडवून आणत असतो. 'लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का?' या जुन्या भावगीतातील लपवलेली भावमानसातील 'प्रीती' ज्याप्रमाणे स्वतःच्या नकळत अत्तराची कुपी कुठेतरी कोपऱ्यात लवंडावी, व घरभर सुगंध यावा तशी, मानवी मनाच्या तळघरातील बंद पेटाऱ्यातून नकळत बाहेर पडून जाणिवेच्या दैनंदिन राज्यात रोज नवनवे चमत्कार घडवत असते. या चमत्कारांना 'फ्रॉईडन स्लिप' असे म्हणतात. 'स्वप्न-अवस्थेत, जागृत अथवा निद्रावस्थेत अशा 'स्लिप्स' त्या व्यक्तीच्या मनोव्यापाराचे इंगित उलगडण्यास मदत करतात असा फ्रॉईडचा विश्वास होता, व त्यामुळेच तो स्वप्नांना सुप्त इच्छांच्या प्रवासाचा राजमार्ग मानत असे, आणि त्यांच्या शिडीवरून खाली उतरून व्यक्तीच्या अंतर्मनातील गूढ हालचालींचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असे.

जरी फ्रॉईडने 'सुप्त इच्छारूपी तळघरांचा वापर व्यक्तीच्या मनोव्यापारांची कवाडे उघडण्यासाठी केला असला तरीही एका मार्क्सवादी दृष्टिकोनानुसार, आर्थिक व्यवस्थेच्या पायावर सांस्कृतिक व्यवस्थेची इमारत बांधली जात असल्यामुळे, या दोन व्यवस्थांचे परस्परसंबंध 'राजकीय सुप्त इच्छारूपां'चा वेध घेऊन तपासता येतील काय, असा प्रश्न जेमसन विचारतात. माझ्या विवेचनात मी 'नैतिक पूर्वमनस्कते'चा उल्लेख, याच सुप्त शक्तींचा वेध घेण्यासाठी केला होता.

'संकल्प'मधील तरुण कार्यकर्त्यांची कथने जर सांस्कृतिक अवस्थेचा एक भाग मानली (ज्याप्रमाणे 'संकल्प' ज्या काळात प्रसिद्ध झाले त्या काळात दलित आत्मकथनांना साहित्य मानून, त्यांच्या उत्खनन-प्रयत्नातून हाती आलेल्या सामग्रीचा अभ्यास केला गेला) तर त्यांना cultural texts प्रमाणे, म्हणजे ज्याप्रमाणे आपण साहित्य किंवा सिनेमाकडे पाहतो त्याप्रमाणे पाहिले तर, त्यांच्या पायाखालील सुप्त इच्छारूपाला खणून काढता येईल असे मला वाटते. 'To read the hidden, coded manifestations of economic and political base that has shaped them, political unconscious can serve as a tool.' म्हणजेच या सर्व कथनांच्या माध्यमातून हाती येणारे, त्या कथनांतील 'फ्रॉईडिअन स्लिप्स'चा अंदाज घेऊन मिळवलेले धागेदोरे त्या वेळच्या तरुणांच्या आजच्या स्थितिविषयक आज त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकांबद्दल काही उपयुक्त दिशा देऊ शकतील काय, असा नवा विचार माझ्या मनाशी आहे. किंवा तत्कालीन समाजमनाच्या सुप्त जाणिवेमध्ये कोणते रसायन दडले होते याची माहिती मिळू शकेल काय, असाही प्रश्न आहे (विश्वास काकडे किंवा रझिया पटेल यांची मनोगते या दृष्टीने बघितली जाऊ शकतात.)

अॅडम रॉबर्ट्स नावाच्या लेखकाने फ्रॉईडिअन स्वप्नविश्लेषणाचे सूत्र सांगताना 'The Return of the Jedi' या फिल्मचा उदाहरण म्हणून उपयोग केला आहे. या फिल्ममध्ये जाबा नावाचा एक प्रचंड गोगलगायीसारखा दिसणारा राक्षसी प्राणी आहे. त्याने लिआ नावाच्या सुंदर राजकन्येला कैद केलेले असते. कैदेतील राजकन्या अर्धनग्न अवस्थेत, बिकिनी घालून, साखळदंडांमध्ये जखडलेली असते. आता सर्वसाधारणपणे या राजकन्येची जाबा नावाच्या राक्षसापासून सुटका व्हावी अशी अपेक्षा आपण व्यक्त करू. परंतु फ्रॉईडिअन अभ्यासक या दृश्यांकडे वेगळ्याच म्हणजे लैंगिक परिमाणातून पाहतात आणि साऱ्या कथेचा (कथनांचा) अर्थ बदलून जातो; त्यांच्या दृष्टिकोनातून एक प्रचंड लिंगसदृश्य आकाराचा, चिकट किडा त्या जवळपास नग्नच असलेल्या सुंदर तरुणीवर आक्रमक (आरोहण) करत आहे, आणि अखेर ती अर्धनग्न ललना त्या लिंगसदृश्य कीटकाचे पुढे आलेले तोंड दाबून, कण्हत, लाटेसारखे हेलकावे देत संपवते, असे वर्णन करून, त्या मुलीला वाचवणे वा तिची सुटका करणे हा उद्देश नसून, त्या मुलीची संभोगेच्छा हाच मुख्य अर्थ आहे असे वेगळे आणि न दिसलेले विश्लेषण मग पुढे येते. स्लावोय झिझेक या वादग्रस्त विचारवंताने अशा अनेक घटना, कथा, लाकाँ व फ्रॉईड यांचे सिद्धान्त वापरून नव्या स्वरूपात मांडल्या आहेत. विशेषतः हिचकॉक आणि डेव्हिड लिंच या दोन दिग्दर्शकांची त्यांनी उकललेली कामे या संदर्भात वाचायलाच हवीत.

मनोगते किंवा साहित्य, नाटक वा सिनेमा, कविता किंवा नृत्य, आणि संगीतदेखील त्या समाजाच्या अंतर्मनाचीच स्पंदने असतात, त्यांचे विश्लेषण आणि पृथक्करण करण्यासाठी साधने निर्माण करणे हे त्या त्या समाजामधील त्या त्या वेळेतील विचारवंतांचे काम असते. बदलाच्या प्रक्रियेत अशा साधनांची भूमिका महत्त्वाची ठरते.

ग्यॉर्जी ल्यूकाचने आपल्या 'History and Class Consciousness' या पुस्तकात समाज आणि (सामाजिक) इतिहास यांची सम्यक दृष्टी असलेला आणि समाजातील चांगल्या वाईटाची संगती लावू शकणारा विचार मांडण्यासाठी मार्क्सच्या 'एलिअनेशन' (परात्म भाव) या संकल्पनेचा विचार मुळाशी घेऊन Reification (वस्तुजन्य रूपांतरीकरण?) अशी नव्या संकल्पनेची निर्मिती केली आहे. या शब्दाचा अर्थ असा की, 'एखाद्या माणसाचे किंवा एखाद्या प्रक्रियेचे, किंवा एकाद्या अमूर्त संकल्पनेचे होणारे (केलेले) वस्तूत रूपांतर.' - अनेक विचारवंत या क्रियेला 'thingification' असे म्हणतात - वस्तुजन्य रूपांतर. कार्ल मार्क्स आपल्या विवेचनात या रूपांतराबद्दल विस्ताराने लिहितात. ते म्हणतात, 'भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये मानवी प्रयत्न, माणसाचे सामर्थ्य आणि त्याची सर्जकता गळून जाते, किंवा तिचा ताबा कोणा एका भलत्याच यंत्रणेकडे जातो. माणूस राबवला जातो. आणि त्याची सर्जकता त्याच्या हातातून निसटून जणू स्वतंत्र शक्ती असल्यासारखी भांडवली यंत्रणेच्या जोखडातून प्रगटते.' अशा होणाऱ्या बदलातून त्या समाजाची व तेथील माणसांची हानी कशी झाली याचाच प्रत्यय येतो. उदाहरणार्थ, अलीकडे 'मार्केट फोर्सेस' असा शब्द सर्रास आयुष्यातील प्रत्येक समाज हतबल होतो, आणि जणू गुरुत्वाकर्षण किंवा जडत्व हे जसे नैसर्गिक नियम आणि शक्ती आहेत, तसा मार्केट फोर्स हा एखादा नैसर्गिक नियम आहे आणि त्यामुळे त्याला अधीन राहून जगण्याची सक्ती नकळत केली जाते.

'संकल्प'नंतरच्या काळात, गेल्या पंधरा-वीस वर्षांत विशेषतः माणसाची वस्तू बनवण्याचे काम फारच वेगाने आणि धडाक्याने सुरू झाले आहे. वस्तूला क्रय मूल्य असणे, आणि म्हणून माणसासकट सर्वच वस्तू क्रय-विक्रयासाठी उपलब्ध आहेत असे मानून ज्या वेळी समाजात व्यवहारात होतात त्या वेळी तो समाज एकसंध ‌व एकसेंद्रिय (organic), एकात्म म्हणून काम करण्यास दुबळा ठरतो. माणसापेक्षा वस्तू व तिची खरेदी किंवा विक्री महत्त्वाची ठरते. समाजपुरुषाच्या सर्जकतेलाच ग्रहण लागते; आणि खरेदी-विक्री पैशात होत असल्याने पैसा साऱ्या समाजव्यवस्थेचा कब्जा घेतो. चळवळ असो वा कविता, चित्र असो वा सिनेमा, सारेच काही पैशात तोलले जाऊन पैशाभवती फिरू लागते. गेल्या अठ्ठावीस वर्षांतील या मनोगतांमधून प्रगटलेल्या चळवळींचे, त्यातील माणसांचे काय बदलले, कसे बदलले, कुणी बदलले व केव्हा किंवा कोठे कोठे बदलले, वस्तुजन्य रूपांतरीकरणाच्या कोणत्या टप्प्यावर आपण उभे आहोत, याचा विचार या मनोगतांमुळे जरी रुजवता आला तरी बरेच काही केल्याचे समाधान प्रकाशकांना मिळू शकेल.

सद्य काळ हा कमोडिटीच्या विजयाचा, वस्तूंच्या राज्याभिषेकाचा आहे. पार्टी किंवा पार्टीचा कार्यकर्ता दोन्हीही तराजूमध्येच मोजले जातात, निवडणुकांच्या तोंडावर त्यांचे सौदे होतात, आदी परिस्थितीचा तपशील देण्याची गरज नाही. पी. साईनाथ यांनी अलीकडेच लिहिलेल्या 'पेड न्यूज'वरील लेखातून वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, पत्रकार आदी मंडळी या 'वस्तू विजय विलासा'त कशी मशगूल आहेत याचे प्रत्यंतर आले आहे.

नव्या भांडवली व्यवस्थेमध्ये नकळत माणूस फक्त व्यवस्थेने पुरवलेल्या, विकलेल्या वस्तूंनाच सार्थक मानून जगतो. समाजहितापेक्षा, अधिक मोठ्या टी.व्ही. स्क्रीनचा, किंवा नव्या Ipad चा, त्या वस्तू मिळवण्याच्या आणि त्या मिळाल्या तर धन्य व न मिळाल्या तर हताश होण्याच्या, वस्तूंनाच निसर्ग मानून त्याभवती जीवन बेतण्याच्या क्रियेत माणूस निःसत्त्व बनून जगू लागतो. या 'वस्तू विजय विलासा'चा जलवा इतका शक्तिशाली आहे की अलीकडे गावोगावी वाढलेल्या बकाल सांस्कृतिक त्याचे प्रतिबिंब जागोजाग पहावयास मिळते. भाषेचा व संस्कृतीचा ऱ्हास, पर्यावरण आणि सोयर समाजाचा नाश, भ्रष्ट आणि जाहिरातीत मांडण्यात येणारी भडक, सवंग, स्वस्त आणि कर्कश कला व संगीत, अचेतन सर्जकता, षंढ जाणिवा आणि 'सुप्त व्यक्तिगत इच्छांचा' स्फोट असे विदीर्ण समाजजीवन आज आपल्याला अनुभवायला येत नाही काय?

कला (मग ते साहित्य असो वा सिनेमा, नृत्य किंवा चित्रकला, संगीत अथवा शिल्पकला) अशा समाजाला तारू शकेल काय? शेकडो विचारवंतांनी आणि समाजशास्त्रज्ञांनी या प्रश्नाचे उत्तर 'होय' असे दिले आहे. पुन्हा जेमसन यांचेच वचन अधोरेखित करायचे झाल्यास, It is vital that art is able to 'resist the power of reification in consumer society and reinvent that catagory of totality which is systematically undermined by existential fragmentation on all levels of life and social organisation today.' यातला power of resistance हा शब्द महत्त्वाचा. कलेमध्ये असलेली, 'सुप्त इच्छारूप' म्हणून वसलेली विरोधनीती महत्त्वाची. अडोरनोने १९४० च्या सुमारास “The Culture Industry” शीर्षकाचा निबंध लिहून भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये कलेचे कसे वस्तूत - क्रयवस्तूमध्ये रूपांतर झाले आहे हे मांडले होते. लेट कॅपिटॅलिझम, किंवा आताच्या भांडवली व्यवस्थेत या रूपांतराने कसे टोक गाठले आहे याचे दर्शन आंतरराष्ट्रीय लिलाव कंपन्यांनी मांडलेल्या कलेच्या बाजारावरून सहज येऊ शकते. कलेच्या प्रत्येक घटकाचे वस्तूकरण करत असताना नव्या व्यवस्थेने लोकशाही संकल्पनेचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून, समाजातील सर्व घटकांना या क्रय वस्तू रूपांतरकरणामध्येच सहभागी करून घेतले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जवळपास प्रत्येक वाहिनीवर चालणारे 'महागायक' किंवा तत्सम कार्यक्रम. एस. एम. एस. पाठवून, ते पाठवण्यासाठी जात, पात, भाषा, प्रांत या सर्व गोष्टींचा उपयोग करून (जेवढे जास्त एस. एम. एस. तेवढा त्या वाहिनीला व त्या त्या मोबाईल कंपनीला अधिक नफा), जास्तीत जास्त एस. एम. एस. ज्याला मिळतील तो विजयी, अशी लोकप्रियतेच्या आधारावर उपयोजिलेली एक नवी आणि उथळ सौंदर्यव्यवस्था - Esthetics निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे कलेच्या गाभ्यात असलेली विरोधवृत्तीची सुप्त इच्छाशक्ती नष्ट होऊन, व्यक्ती पातळीवर दाबली गेलेली सुखलोलुपतेची सुप्त इच्छा अधिक मोकाट कशी सोडता येईल, व त्या मोकाट इच्छेच्या पूर्ततेसाठी नवनवीन उत्पादने बाजारात आणून कशी विकता येतील याचाच विचार केला जातो.

मी स्वतः कलेला समाजपरिवर्तनाच्या चळवळीपासून वेगळे मानत नाही. दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत व त्या वेगळ्या करणे तात्त्विक दृष्ट्या शक्य नाही. या दोन्हींची मुस्कटदाबी गेल्या काही वर्षांत कशी झाली हे समजून घेताना त्यांच्या बाजारीकरणाचा हिशेब मांडणे शक्य व्हावे.

आधुनिक कला, किंवा आधुनिकतेचा जन्मच मुळी गेल्या शतकाच्या सुरुवातीपासून, त्याआधी किंवा त्या वेळेपर्यंत प्रचलित असलेल्या कलेला विरोध करण्यातून झाला. Classical Modernism was an Oppositional Art. ती एका नव्या व्यावसायिक समाजामध्ये, बिझनेस सोसायटीमध्ये, स्कॅन्डलस पद्धतीने मध्यमवर्गाला घाबरवून सोडणारी, कुरूप, उच्छृंखल, लैंगिक-लोलुप किंवा धक्कादायक म्हणून उदयाला आली; स्थिरावली. मध्यमवर्गात अशा नवकलेची चेष्टाच केली जात असे, व आपल्याकडे पुलंपासून अगदी भले भले म्हणणाऱ्यांनी नवसाहित्याची उडवलेली थट्टा नवीन नाही. एका बाजूला सनातनी, प्रतिगामी, पुरातनवाद्यांनी, संस्कृती-रक्षकांनी आणि दुसऱ्या बाजूला शासन व त्यांचे पोलिस अशा त्यांच्या हस्तकांनी या नवकलेला अटकाव करण्याचे, तिचे दमन करण्याचे, आणि तिच्याकडे गंभीर गोष्ट म्हणून न पाहता काही वेळा विनोद तर काही वेळा विकृती म्हणून पाहण्याचे ठरवले होते. त्यामुळे परिवर्तनाच्या चळवळींशी समांतर जाणाराच हा मार्ग होता.

परंतु गेल्या काही वर्षांत असे काय बरे घडले असावे की विचित्र वाटणारा पिकासो किंवा हुसेन, चित्रे, कोलटकर किंवा त्याही आधीचे मर्ढेकर, तेंडुलकर किंवा ढसाळ असे सगळेच सद्य समाजाला विघातक वाटेनासे झाले? इतकेच नव्हे तर यातील बहुतेक सगळे 'क्लासिक' किंवा 'लोकमान्य व राजमान्य' कला-सौंदर्य-व्यवस्थेत चपखलपणे सामावले गेले! दुसरीकडे समकालीन कलाप्रांतात विरोध व्हावा वा धक्का बसावा असे काही घडताना आपल्याला दिसत नाही. जे जे म्हणून असभ्य होते, धक्कादायक किंवा वाळीत टाकलेले होते - मग पंक असो, रॉक असो, किंवा लैंगिक मुक्ताविष्काराचे दर्शन असो - सारेच काही आता समाजात सहज गिळून विनासायास पचवले जाते. इतकेच नव्हे, असे काही असलेच तर ते विक्रीच्या दृष्टीने (कमर्शियली) यशस्वी तर होतेच; परंतु शासनाच्या वा अन्य अकादमीच्या पुरस्कारालाही प्राप्त होते. जाहिरातक्षेत्राने तर आधुनिकांच्या काळात जे जे वावगे म्हणून हिणवले जाते ते ते आपले मानून सबंध आधुनिकतेचेच एक प्रॉडक्ट किंवा क्रयजन्य उत्पादन करून टाकले आहे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे वुडस्टॉक फेम जीन्स पॅन्ट्स आणि चे गव्हेराचे चित्र छापलेल्या चड्ड्या, निकर्स आणि ब्रेसियर्ससुद्धा विक्रीला उपलब्ध आहेत. विरोधाला क्रयवस्तू करून तिची विक्री करण्याच्या या 'मार्केट फोर्स'च्या ताकदीला काय म्हणणार?

जे जे म्हणून व्यवस्थेला आव्हान देणारे होते त्याचीच व्यवस्था - Canon बनवून - ते पाठ्य पुस्तकापासून रस्त्यावरील दुतर्फा होर्डिंग्जवर रंगवून त्यातील सुप्त विरोध इच्छारूपाला पिळून पिळून रिकामे करण्यात ही व्यवस्था यशस्वी झाली आहे. त्यामुळे अनेकदा भेटतात ती कलाकुसरीची टरफले आणि चळवळींची फोलपटे. अशा फोलपटांच्या भल्यामोठ्या एन. जी. ओ. राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या साम्राज्यासारख्या पसरताना आज दिसतात, सुप्त विरोध-इच्छेचे रूपांतर सुप्त व्यक्तिगत लोलुपतेत करून, त्या इच्छांना खतपाणी घालून त्यांना फळवण्यात सृजनशील तरुण, कलावंत आणि कार्यकर्ते आज रममाण झाले आहेत, हे सत्य नाही काय? आधुनिकतेचे सौंदर्यशास्त्र, व्यवस्था आणि विद्या(पीठ) झाले आहे, आणि तीच व्यवस्था किंवा सौंदर्याची मीमांसा आहे असे अनेक नव्या पिढीतील कवी, चित्रकार आणि संगीतकार मंडळींना वाटते, हे दुर्दैव आहे. बंडखोरीचे प्रस्थापितांत कसे व केव्हा रूपांतर झाले हेच न समजल्यामुळे समाज-परिवर्तनाच्या अनेक चळवळींनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे भरवून, कॉर्पोरेट ऑफिसेसच्या धर्तीवर इमारती सजवून, व्यवस्थापकीय शिक्षणातील भंपक जार्गन्स वापरून आपल्या चळवळींची एक लांब-रुंद कॉर्पोरेशन केली आहे.

उपभोगाची नवनवीन उत्पादने, नियोजनबद्ध तुटवडे आणि पुरवठे, फॅशन आणि बदलणाऱ्या सवयींचा सतत मारा, जाहिरात, टी.व्ही., नवमाध्यमे यांनी व्यापलेला जाणिवेचा पसारा, खेडी आणि शहरांमधले शिथिल झालेले ताण, प्रत्येक वापराचे एक रेखीव-आखीव कोष्टक, standardisation, शरीराच्या प्रत्येक स्नायूपासून तो केवढा व कसा मिळवण्यासाठी वापरावयाचे कार्यक्रम, औषधे, खाद्यपदार्थ यांचा 'शास्त्रीय' संशोधनांनी सिद्ध केलेला, किंवा प्रायोजित संशोधनातून सिद्ध झालेला कार्यक्रम, माहिती व तंत्रज्ञानाने बदललेले विश्व, नव्या व्हर्च्युअल विश्वात खुले केलेले 'फ्रॉईडिअन इड'चे, दबलेल्या इच्छांचे दालन, अशा नव्या जगाची वाटचाल नकळत सिव्हिलायझेशनकडून डीसिव्हिलायझेशनकडे झाली, व एका अतिहिंसक वासनेने भारलेल्या समाजसमूहाची निर्मिती झाली, तर आश्चर्य वाटायला नको. स्लावोय झिझेक यांचा 'इन द डेझर्ट ऑफ रिअल' हा निबंध या संदर्भात मुद्दाम वाचला पाहिजे. 'रिअल'चा पसारा आणि पिसारा समजून घेण्यास तो उपयुक्त आहे.

गेल्या काही वर्षांत चळवळींच्या - ज्यांना बहुतांशी एन जी ओ असे सर्वमान्य सर्वनामाने संबोधले जाते, अशा - संस्थांच्या कारभारात अंतर्बाह्य स्वरूपाचे व कामावर दूरगामी परिणाम करणारे बदल झाले आहेत. त्यांतील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे या संस्थांना होणारा वित्तपुरवठा. परदेशी वित्तपुरवठा करणाऱ्या शासकीय-निमशासकीय व संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून काम करणाऱ्या - येथील संस्था पूर्वीही होत्या; परंतु गेल्या काही वर्षांत विशेषतः भारताने अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर अशा संस्थांचे, परदेशस्थ व्यक्तींचे व शासकीय यंत्रणांचे धोरण व कार्य हळूहळू परंतु गुणात्मक व संख्यात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर बदलू लागले.

'संकल्प' काळातील कार्यकर्त्यांच्या ध्यानीमनीही येणार नाही एवढा पैसा आणि त्यापाठोपाठ येणारे आंतरराष्ट्रीय 'लॉबी' राजकारण गावागावातील संस्थांच्या अंगणात किंवा कार्यकर्त्यांच्या घरांघरांत खेळू लागले.

भारतातील वाढणारा मध्यमवर्ग, नव्या तरुण पिढीचा - उत्तर-आधुनिक (?) किंवा उत्तर-कारखानदारी - असा नवा वर्ग, वाढता दहशतवाद, विशेषतः मुस्लिम दहशतवाद, नव्या रशियाचे तेल व त्यातून उभ्या राहिलेल्या माफिया संघटना, जुन्या सोव्हिएट्समधले विविध मूलवादी राजकारणाचे प्रश्न, वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला कुप्रसिद्ध ११/९ चा हल्ला, पाठोपाठ भडकलेली आखाती युद्धे, आर्थिक दृष्ट्या प्रबळतेकडे सरकणारा बदलता चीन, नवा भारत (हिंदुस्थान!), पाकिस्तानचे नवे राजकीय-भौगोलिक महत्त्व… अशा असंख्य नव्या संदर्भांच्या चौकटीत परदेशी पैशाचे आपल्या देशात स्वयंसेवी संस्थांसाठी अवतरलेले गंगाजळी योग तपासावे लागतील. हा मोठा व जटिल अभ्यासाचा विषय आहे. प्रस्तुत निवेदनात त्याच्यासाठी फारशी जागा नसल्याने, केवळ काही उल्लेख करून हा प्रश्न संपवतो.

बहुतांश नव्या चळवळी/स्वयंसेवी संस्था आणि देशातील त्या त्या भागातील उद्योग, उद्योगपती, व्यावसायिक, राजकीय नेते, परदेशी वित्तीय संस्था, आणि आता नव्याने उदयाला आलेला पोलिस आणि न्यायदेवता अशा दोन्ही खुर्च्यांत स्वतःचा मुखवटा पाहणारा व चोवीस तास बातम्या देणारा, प्रसंगी बातम्या तयार करणारा, वृत्तवाहिन्यांचा एकमेकांबरोबर प्रचंड स्पर्धात्मक तणावात वावरणारा संपादक व वार्ताहरांचा नवा मीडिया वर्ग - अशा सर्वांचे हितसंबंधी जाळे आज तयार झाले आहे. या जाळ्याच्या माध्यमातून शासनाची कोंडी करून (प्रसंगी, स्वेच्छेने बाजूला होणाऱ्या शासनाला) हद्दपार करून नव्या भांडवली लोकशाही अर्थव्यवस्थेत चळवळींचे, विचारांचे, वेध, बोध आणि जागर संमेलनांचे छोटे व मोठे कंत्राटदार निर्माण झाले आहेत. अशा कंत्राटदारांची आत्मकथने आणि समाजाच्या अन्य दैनंदिन कामकाजात जागोजाग घुसलेल्या रस्त्यापासून गोल वसूल करण्यापर्यंत व ब्रिज बांधण्यापासून बीजसंवर्धन करण्यापर्यंत कामाचे जाळे विणलेल्या कंत्राटदारांचे आत्मकथन गुणात्मकदृष्ट्या फारसे वेगळे नसावे. एका ठिकाणी काही कोटींची तर दुसऱ्या ठिकाणी काही हजार कोटींची उलाढाल असा संख्यात्मक फरक सोडल्यास पटावरील बरीचशी प्यादी सारखीच दिसतात. काही महिन्यांपूर्वी 'एल आर बी' मध्ये मार्गारेट अॅटवूडच्या 'द इयर ऑफ फ्लड'संबंधी लिहिताना जेमसन एके ठिकाणी लिहितात,
'Here we are more clearly able to perceive the breakdown of modern capitalist society into various private contractors to whom social needs are outsourced, and behind them is the enormous corporations that have replaced all the traditional forms of government.'

अलीकडे मराठवाड्यातील प्रसिद्ध पर्यावरण-कार्यकर्ते व लेखक अतुल देऊळगावकर यांच्याशी बोलताना त्यांनी मराठवाड्यातील तालुक्या-तालुक्यात सुळसुळाट झालेला, मुंबई किंवा दिल्ली अशा मेट्रो शहरांत मुख्य कार्यालये असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी पगारी (किंवा परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह असे तद्दन मार्केटिंग कंपन्यांचे गणित वापरून) शिक्षण/पाणी/सफाई/वैद्यकीय 'सत्याग्रही', सहयोगिनी साथी नेमून (जशी गावोगाव औषधी कंपन्या/खत कंपन्या किंवा चहा कॉफी, बिस्किट कंपन्या आपले विक्रेते नेमून आपापली मालाची बंडले विकतात तशी) आपापल्या क्षेत्रात करावयाची कामे (जे मुख्यतः शासकीय/परदेशी पैशातून निर्माण झालेले कार्यक्रम असतात) कंत्राटी पद्धतीने करवून घेतात. त्यांचे रिपोर्ट्स व्यावसायिक पी. आर. कंपन्या लिहून देतात, व ते सुळसुळीत किंवा गुळगुळीत कागदांवर छापून जगभर वितरित केले जातात. [ते रिपोर्ट्स म्हणजे आपण मिळवलेल्या अमाप पैशाच्या पापक्षालनाचे तीर्थ व प्रसाद आहेत असे मानून बलाढ्या कॉर्पोरेट्स वा संबंधित व्यक्ती आणखी पैसे उधळतात व आपापल्या कामात पुन्हा मग्न होतात.]

अशा कामातून 'सुप्त विरोधशक्ती वा इच्छा' आपोआपच स्वीकारार्ह स्वरूपात किंवा स्लावेज झायझेक म्हणतात त्याप्रमाणे 'Resistance is Surrender' अशा स्वरूपात बदलल्या जातात. (झिझेक यांचे मूळ विधान व लेख बराच स्फोटक व वादग्रस्त आहे, येथे फक्त विधानापुरताच अर्थ घ्यावा.) या पराभवाच्याच विरोधाचा राजकीय, विशेषतः राजकीय इतिहासाच्या पार्श्वभूमीवर व तात्त्विक चिंतनाच्या आधारे विचार करण्याची आज गरज आहे.

गेल्या तीस एक वर्षांत बरेच काही वाहून गेले आहे. 'संकल्प' ज्या वेळी प्रसिद्ध झाले त्या वेळी जनता पार्टीचा सर्कस तंबू गुंडाळला गेला होता व इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या. मात्र लोकांनी डाव्या-उजव्यांची हातात हात घालून केलेली सर्कस व विशेषतः त्यांचे ट्रॅपिजचे प्रयोग पाहिले होते. कोण कोणत्या हिंदोळ्यावर कुणाबरोबर लटकते आहे, कोण कुणाला मध्येच सोडून देत आहे व कोण कुणाच्या आधाराने नवी उडी घेत आहे याचे ताळतंत्र लोकांना समजत होतेही व नव्हतेही. पाठोपाठ खलिस्तान, इंदिरा हत्या, राजीव उदय व अस्त आणि त्यानंतर उगवलेली मुक्त अर्थव्यवस्थेची पहाट, त्याआधी पडलेली बर्लिनची भिंत, हंगेरी व पूर्व युरोपमधली वेल्वेट क्रांती, गोर्बाचेव्हचे ग्लासनोस्त, पेरेस्त्रोईका, इराक-कुवेत युद्ध, अशा साऱ्या जगाला नवनव्या वळणांवर व टप्प्यांवर पोचवणाऱ्या घटनांची साखळीच उलगडत जात होती. कधी नव्हे इतक्या वेगाने जगात बदल होत होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कक्षेत साऱ्या विश्वाचे गणित आल्यासारखे, आणि संपर्क व माहिती क्षेत्रातील हनुमान-उडीमुळे समाजाच्या प्रत्येक थरामध्ये व स्तरामध्ये बदल घडणे अपेक्षित होते. 'संकल्प'च्या पिढीला आमूलाग्र बदलवून, क्वचित मोडीत काढून, किंवा एका अतिपरिणामकारक मेटॅमॉर्फोसिसच्या प्रक्रियेत टाकून (- आणि ही प्रक्रिया काफ्काच्या वाङ्मयासारखी माणसाचे किड्यात रूपांतर करणारी नव्हे तर किड्यांचे माणसामध्ये, आणि अशा नव्या माणसांचे सुपर माणसामध्ये - माणूसपण विझलेल्या पेशी-समुच्चयामध्ये) या नव्या जगाने घुसळून काढले आहे. जे सत्य मानले व ज्या वाटेवर विठ्ठल भेटेल म्हणून चाललो, ती वाट वाट नव्हती, उलट जे जे त्याज्य मानले, तेच व तेवढेच सत्य आहे की काय अशा तात्त्विक, आयडिऑलॉजिकल, आणि प्रसंगी धार्मिकदेखील गोंधळाच्या वादळात 'संकल्प' पिढीचे तारू अडकले व भरकटलेही.

नव्वदीनंतर भारतीय अलिप्ततावाद जागतिक स्तरावर कालबाह्य ठरला होता, 'अमेरिका' हा शब्द जो गेली अनेक दशके डाव्या व उजव्या दोघांनाही अप्रुपाचा, प्रेम व द्वेष अशा आकर्षणाचा वाटत होता, तो 'अमेरिका' - आणि तेथील स्वतंत्र, स्वैर, मुक्त, आणि 'ओपन' वातावरणाचे वारे येथील तरुणांनी नव्हे तर आबालवृद्धांनी दीर्घ श्वसनाचे प्राणायाम धडे गिरवावेत तसे श्वासातून नसांनसांमध्ये ओढून घेतले.

या श्वासाबरोबर आत आले ते जागतिकीकरणाचे अत्यंत शक्तिमान असे वादळ. खरे म्हणजे याआधी मी पर्यावरण व हवामान-बदलाच्या राजकारणाबद्दल बोलायला हवे होते, कारण साऱ्या जगाचे सद्यःस्थितीचे स्वरूप व येणाऱ्या भविष्याचे बीजारोपण पर्यावरणाच्या राजकीय भूमिकेत दडले आहे, परंतु तो बराच व्यापक विषय असल्याने केवळ उल्लेख करून पुढे जात आहे.

स्वयंसेवी संस्था - मग ती कोणत्याही क्षेत्रात काम करणारी का असेना, जागतिकीकरणाने तिची प्राधान्ये, आवाका आणि क्षेत्र बदलले; विस्तारले. जागतिकीकरणाचे मुख्य माध्यम म्हणजे माहिती-महाजालाचे व स्वप्नवत वाटणाऱ्या संपर्क-यंत्रणेचे आणि नवनव्या जैव आणि मानवी आयुष्याची गुणवत्ता व काळ वाढवणारे, तसेच जीवनाच्या सर्व क्षेत्रांत पायाभूत बदल करणारे तंत्रज्ञान. या माध्यमामुळे नकळत साऱ्या विश्वाचा दिवस चोवीस तासांचा झाला, म्हणजेच खरोखरीच रात्रीचा दिवस करून काम होऊ लागले. मुख्य म्हणजे एका क्लिकसरशी जगाच्या एका टोकाकडील भांडवल जगाच्या दुसऱ्या टोकाकडे फिरवता व गुंतवता येऊ लागले. या गुंतवणुकीच्या अजब शक्यतेने मार्केटची अगोदरच पोसलेली ताकद हजार हत्तींच्या बळासारखी विस्तारली. फिक्शन फिक्शनच राहिले नाही, एका नव्या REAL ची, 'व्हर्च्युअल रिअल'ची निर्मिती झाली.

जोव्हान्नी अरीघी (Giovanni Arrighi) यांच्या 'द लॉंग ट्वेंटिएथ सेंच्युरी'मध्ये 'फायनान्स कॅपिटल' या शतकाच्या मुख्य आणि नव्या प्रश्नाचा ऊहापोह करण्यात आला आहे.

मॉनिटॅरिझम कशासाठी! गुंतवणूक आणि स्टॉक मार्केटचे महत्त्व का व कसे वाढते आहे? औद्योगिक उत्पादनापेक्षा (जे पाश्चात्त्य देशांतून कमी कमी होताना, व आपल्याकडेही फारसे वाढताना दिसत नाही) स्टॉक्स का महत्त्वाचे? मुख्य म्हणजे, उत्पादनाशिवाय नफा मिळतो तरी कसा? अशा नफ्याचे अतिरिक्त मूल्य कसे वाढते? स्पेक्युलेशन आणि बाजारभावांचे अंदाज येतात कुठून? कोण त्यांचे नियमन करते? प्रगत आणि नव्याने प्रगत होऊ पाहणाऱ्या समाजामध्ये जमीन आणि स्टॉक्स अशा दोन घटकांचे एवढे अमर्याद स्पेक्युलेशन - आडाखे आणि आराखडे का वाढत आहेत? राजकीय स्वातंत्र्याबरोबर मार्कटचे स्वातंत्र्य अशी नवी मागणी का पुढे येत आहे? अशासारखे अनेक प्रश्न या पुस्तकाच्या निमित्ताने पुढे आले. अरिघी यांच्या पुस्तकात, किंवा Ernest Mandel यांच्या 'लेट कॅपिटॅलिझम' या पुस्तकात आणि जेमसन यांच्या 'द कल्चरल टर्न' या पुस्तकात मुक्त अर्थव्यवस्थेत मुक्त झालेल्या व नव्या नव्या स्टॉक्सच्या शोधात भटकणाऱ्या आणि उत्पादनविरहित, उद्योगरहित - केवळ अनुमान, आडाखे व स्पेक्युलेशनच्या जोरावर, एखाद्या जादूच्या खेळासारखे भासणारे, वाढणारे, साठत जाणारे ' फायनान्स कॅपिटल', भांडवली अर्थव्यवस्थेचा सर्वात शेवटचा (Highest Stage) टप्पा मानले गेले आहे. [अशा अवस्थेत लोकशाही व्यवस्थेत खच्चीकरण होऊन साऱ्या समाजाचेच व्यापारीकरण कसे होते या संदर्भात रॉबिन ब्लॅकबर्न व अळां बडू यांचे लेखन निश्चितच वाचनीय आहे.]

भांडवली अर्थव्यवस्थेत ही सर्वश्रेष्ठ पायरी गुंतागुंतीची तर आहेच, परंतु यापूर्वी आपण अनुभवलेल्या व्यवस्थेपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. इथे कोणा एका वर्गाच्या वा बहुराष्ट्रीय कंपनीच्या किंवा त्यांच्या समुच्चयाच्या हातात दोऱ्या नाहीत. फासे आहेत, परंतु कोणते दान पडायचे ते ठरवणारे शकुनीचे हात नाहीत. एखाद्या रोगाच्या साथीचे अनेक रोगांच्या साथीमध्ये रूपांतर व्हावे, किंवा प्राणवायूच्या शोधात भटकणाऱ्या वडवानलाने एकामागोमाग एक अरण्ये, शहरे खाक करावीत, सायक्लोनसारखे प्रदेश गिळंकृत करावेत तशी, नवनव्या मार्केट्सच्या शोधात ही व्यवस्था अस्वस्थ आत्म्यासारखी हवी तशी भटकते. इथल्या परस्परविरोध शक्तींचे मॉडेल पूर्वीच्या सर्व आडाख्यांपेक्षा वेगळे व अधिक दहशतीचे आहे. या व्यवस्थेत एखादा जेता अचानक पराभूत होतो, व पराभूत अचानक जेता बनतो. त्यामुळे किंवा सामान्य माणसाच्या राजकीय सुप्त इच्छारूपाचे सर्वंकष दमन झाल्यामुळे, लिबिडनल ऊर्जेच्या स्फोटात मानवी इतिहासाच्या संस्कृतीकरणाची हजारो वर्षे सहज जळून जाऊन एका प्राचीन विध्वंसक, हिंसक आणि युद्धखोर समाजाकडे वेगाने आपली वाटचाल होते आहे, असे इशारे विचारवंत देऊ लागले आहेत. झिझेक यांचे अलीकडेच प्रकाशित झालेले 'फर्स्ट अॅज ट्रॅजिडी (९/११) अँड सेकंड अॅज अ फार्स' (economic meltdown) या संदर्भात वाचनीय आहे. थोडक्यात काय तर 'संकल्प' पिढीच्या कल्पनेबाहेरील आव्हाने आजच्या तरुण समाजासमोर उभी आहेत.

नव्या समाजाच्या प्रश्नांचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे 'स्किझोफ्रेनिया'. दलझ, देरिदा, ग्वातारी यांच्यापासून ल्योतार, बोद्रियार, जेमसन, लाकाँ, झिझेक अशा अनेक विचारवंतांनी या संदर्भात वारंवार लिहिले आहे. हा स्किझोफ्रेनिया - वैद्यकीय किंवा मानसशास्त्रीय विश्लेषणात, मानसिक आजार म्हणून ज्या अर्थाने येतो त्या अर्थाने या शब्दाचा वापर मात्र केला जात नाही. एका अर्थाने दुभंगलेले व्यक्तिमत्त्व, विक्षिप्त आणि विचित्र एकटेपणा हा जरी अर्थ अभिप्रेत असला तरीही या संकल्पनेचा विस्तार मुख्यतः लाकाँ यांच्या मांडणीवर आधारित करण्यात आला आहे. पॅरानोइया - किंवा संशयपिशाच्च अशी एक मानसिक अवस्था फ्रॉईडिअन मानसशास्त्रामध्ये आढळते. ही अवस्था म्हणजे, व्यक्तीला त्याच्या भवतीचे जग त्याच्या विरुद्ध काही कट-कारस्थान करत आहे असा भास सातत्याने होत राहतो, व त्या दडपणाखाली एका विशिष्ट प्रकारच्या भीतीचा उगम होऊन ती व्यक्ती सतत घाबरून गेल्यासारखी वागते. अवतीभवतीची प्रत्येक व्यक्ती आपल्याला छळणार, त्रास देणार असे वाटून ती विक्षिप्त वाटू लागते. स्वतःला (इगो अवस्था) निर्माण करण्याच्या प्रक्रियेत अडथळे आल्याने 'स्व'वरचा विश्वास उडाल्यामुळे अशी विकृती जन्माला येते असे लाकाँ याचे प्रतिपादन आहे - आणि या संशयपिशाच्चातून, 'स्व'च्या ढासळत्या मूल्यातून भंग पावलेली व्यक्ती मग केवळ एक व्यक्ती न राहता अशा विकृत, दुभंगलेल्या आणि सतत भवताल व सर्व नात्यागोत्याबद्दल अविश्वास असणाऱ्या, 'मी' आणि 'स्व'त्व गमावलेल्या, असुरक्षित, घाबरलेल्या समाजाचे आज आपण घटक आहोत. इतका भेदरून गेलेला आणि विघटित झालेला समाज 'संकल्प' मनोगतांच्या काळात नव्हता. परंतु अशा समाजाची निर्मिती-बीजे पडावयास, अंकुरण्यास सुरवात झाली होती याचे स्पष्ट दर्शन विश्वास काकडे यांच्या आत्मनिवेदनात आणि कुमार केतकर यांच्या सामाजिक भाष्यात पाहायला मिळते.

अशा 'स्व'चे स्खलन किंवा पतन झालेल्या, वीर्यपतनानंतर क्षीण झालेल्या लिंगासारख्या, आणि स्वतःतील ऊर्जेचा अभाव जाणवून 'थंड' झालेल्या समाजाला कशाचेच काहीही वाटेनासे होते. जेमसन यांची सुप्रसिद्ध रचना वापरायची झाल्यास ते या अवस्थेला 'Waning of the affect' असे म्हणतात - भावनेचा क्षय, नातेसंबंध, प्रेम, राग, द्वेष अशा साऱ्याच भावना या अवस्थेत नष्ट होऊ लागतात. शब्द गुळगुळीत होतात. आजच्या काळात पाठवल्या जाणाऱ्या जवळपास प्रत्येक एस. एम. एस. मध्ये 'love', 'kisses', 'hugs', 'touched', 'moved' असे शब्द त्यांच्या 'ऐतिहासिक' अर्थाशिवाय, कोरडे, सपाट, निचरा झालेल्या चिपाडासारखे, एका भल्यामोठ्या उसाच्या रसाच्या यंत्रातून बाहेर पडणाऱ्या भुसा झालेल्या खोडासारखे भसाभसा बाहेर पडतात. ते उच्चारणाऱ्याला वा ऐकणाऱ्याला त्यांचे काहीच वाटेनासे होते. नव्या पिढीतील बहुविध (Multiple) नातेसंबंध, वाढलेले one night stands एका रात्रीपुरता समागम, सहज फ्लर्टिंग (पहा : अॅडम फिलिप्सचे 'On Flirting'), 'फ्लिंग्ज', असा व्यक्तिगत जीवनातला भावनिक, लैंगिक व बांधिलकीचा दोर सध्या दिवसेंदिवस सैल होत आहे. या सर्व भावनांचे व्यावसायिक व 'कमर्शियल' क्रय वस्तू रूपांतर करण्यासाठी एका बाजूला मदर्स, फादर्स, ब्रदर्स, फ़्रेंड्स अशा सगळ्या नात्यांचे 'डे' साजरे करण्यासाठी व त्याकरता खरेदी-विक्री होण्यासाठी एका स्वतंत्र मार्केटची निर्मिती सद्य भांडवली अर्थव्यवस्थेने केकवरील 'आयसिंग'सारखी मांडली आहे. प्रेम व्यक्त करायचे तर शॉपिंग करा, कंटाळा घालवायचा तर शॉपिंग करा - Shop till you drop अशा घोषणांतून, लैंगिक सुखापासून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आध्यात्मिक भोंगळापर्यंत आणि रामदेव बाबाच्या योगसाधनेपासून डॉ. केगलच्या एक्सरसाईजपर्यंत माणसातील माणूस नष्ट करण्याची, त्याला भूतकाळापासून वेगळे काढण्याच, त्यामुळे भविष्याची कल्पना करण्याची संवेदना नष्ट करण्याची, किंवा सतत वर्तमानातच ठेवण्याची योजना सद्य व्यवस्थेच्या, भांडवलाच्या शेवटच्या अतिप्रगत टप्प्यात आखण्यात आली आहे.

कशाचेच काही न वाटणे ही सर्वात भीषण बाब आहे. मानवी इतिहासात माणसाचे एवढे नीच पतन कधीही झाले नसावे. या फॅशनेबल अलिप्ततेचे (modish detachment) आणि उपरोधिक विडंबनाचे आविष्कार समकालीन (उत्तर-आधुनिक?!) साहित्य व कलांमध्ये आपल्याला वारंवार भेटत राहतात. नव्वदीच्या सुरुवातीला प्रभू देवा याचे 'ब्रेक डान्स'वर केलेले गमतीशीर गाणे मला आठवते. (ब्रेक डान्सविषयी नृत्य आणि संगीत क्षेत्रातील जाणकारांनी उत्तर-आधुनिक आविष्कार म्हणून केलेली टिपणे निश्चित महत्त्वाची आहेत, व आपण पाहत असलेल्या दुभंगी समाजाच्या आविष्काराचे दर्शन होण्यास उपयुक्त आहेत.) ते गाणे असे होते:
“उर्वशी, उर्वशी… टेक इट इझी उर्वशी -
उंगली जैसी दुबली है।
नही चाहिये फार्मसी
जीत का मंत्र है, टेक इट इझी पॉलिसी,
चार दिन की चांदनी, ये जवानी फॅन्टसी,
उर्वशी … टेक इट इझी उर्वशी.”

विरोध तर बाजूला राहिला, परंतु, 'ठेविले अनंते तैसेची रहावे' किंवा काहीही झाले तरी Take it easy, प्रतिक्रिया नको. प्रतिसाद नको. रवांडातले मुडदेफरास असोत वा इराकमधील रोज मरणारी शेकडो माणसे असतो, बोस्निया, चेचेन्या, अफगाणिस्तान असो, किंवा आपल्या घराच्या शेजारील वाढणाऱ्या झोपडपट्टीतील नरकयातना असोत, गिरण्या पाडून उभे राहणारे मॉल्स असोत, शेतकऱ्यांच्या हजारोंनी झालेल्या आत्महत्या असोत, काहीही घडो; परंतु मातीच्या थंड गोळ्यासारखा पहुडलेला हा समाज ढिम्म हलण्याचे नाव घेत नाही.

आणि, मुख्य म्हणजे हाच ढिम्म, निराकार, निर्गुण, गुळगुळीतपणा समकालीन वा उत्तर-आधुनिक (पाश्चात्त्य उत्तर-आधुनिकतेची सुरुवात आपल्या बरीच आधी, म्हणजे साठीच्या शेवटच्या वर्षात व सत्तरीच्या दशकात झाली. आज तिची अवस्था 'सिम्युलाक्रा' किंवा 'कॉपीज', 'छबी'च्या स्वरूपात उरली आहे, असे माझे मत आहे. म्हणून मी समकालीन असा शब्द योजला आहे.) कला-साहित्याचा गाभा बनला आहे. मकरंद साठे यांची 'अच्युत आठवले...', 'ऑपरेशन यमू' किंवा हेमंत दिवटे यांचे 'थांबताच येत नाही' किंवा अशा अनेक मराठी लेखक-कवींच्या साहित्यातून वारंवार जाणवणारी फॅशनेबल संन्यस्तवृत्ती - डिटॅचमेंट (तीस वर्षांपूर्वी 'संकल्प'च्या प्रस्तावनेत मी भारतीय संन्यस्तवृत्तीचा उल्लेख केला होताच Fool ) आणि रेडीमेड, अॅज इज व्हेअर इज, सरळ जसे दिसते तसा अनुभवाचा पडताळा मांडण्याची शैली (मार्सेल द्युशाँने कलेमध्ये आणलेले रेडीमेड 'फाऊन्टन' किंवा 'पॅरिस एअर' हे तिशीच्या दशकातले प्रयोग होते. जवळपास ९० वर्षांपूर्वी त्याने केलेल्या प्रयोगाने कलाविश्वाला हादरा दिला होता. आज रेडीमेडचा स्फोट ओळखीचा झाल्याने, अंगवळणी पडल्याने कोणताच धक्का जाणवत नाही.), उपरोध, व्यंग, उपहास आणि एका BLANK आभासाची (pastiche) मांडणी, या सर्व बाबी नव कलाविष्काराच्या रचनेची लक्षणे आहेत. एका अर्थी विसाव्या शतकातील आधुनिकतेच्या निर्मितीचे, आणि आता मृत झाल्यामुळे वाढलेले वजन एखाद्या दुःस्वप्नासारखे (मार्क्सच्या भाषेत 'Weight like a nightmare on the brain of the living) अशा समकालीन तरुण लेखक-लेखिका, कलावंत, मंडळींच्या डोक्यावर नाचत असेल काय? पोथीनिष्ठ डावे (जेमसन यांच्या भाषेत Vulgar Marxist) अशा समकालीन कलावंताची समीक्षा करताना बदलल्या काळाचे, दुभंगलेल्या निष्क्रिय व कोणतीच भावभावना न उरलेल्या समाजाचे, भांडवली अर्थव्यवस्थेतल्या 'मनी कॅपिटल मनी' (MCM) या फॉर्म्युल्याने आलेल्या आडाखी अर्थरचनेचे पैलू व पदर लक्षात न घेता नुसतीच टीका करतात हे योग्य नाही. 'संकल्प' पिढीतील तरुणांना (मग ते कार्यकर्ते असोत वा चित्रकार, कवी वा पत्रकार) आधुनिकतेचे प्रेत व त्याचे सतत वाढणारे ओझे अंगावर नव्हते, तर ते सर्वच जण आधुनिकतेच्या नव्या गॅलक्सीमधील ताऱ्यांचे तेज पिऊन मोठे झाले होते. आजच्या कार्यकर्त्यांची अवस्था दुभंगलेली, 'स्व' क्षीण झाल्याची, म्हणजेच संदर्भ विसरलेल्या 'इड'मधील तळघरात दडलेल्या ऐतिहासिक राजकीय सुप्त इच्छारूपाचा ऐवज हरवलेली, म्हणून खरे तर केविलवाणी आहे.

प्रतिक्रिया किंवा खरे तर प्रतिसाद हरवलेल्या या समाजात कलानिर्मितीचा निखळ आनंद घेणे ही आज दुरापास्त गोष्ट झाली आहे. कारण व्यापार (कॉमर्स आणि बिझनेस) आणि 'फायनान्स कॅपिटल' यांच्या कठोर, क्वचित निर्दयी निकषांवर निर्माण होणाऱ्या कलेचे भवितव्य आज अवलंबून असते. माणूस एक दोन पायांचे 'कॉस्ट सेंटर' आहे, या जनावराकडून सतत 'परफॉर्मन्स' घडवायचा आहे, कारण त्यातून नफा निर्माण करायचा आहे - अशी भावना असल्याने, माणसाचा व तो करत असलेल्या कार्याचा, मग कला असो व परिवर्तनाचे स्वयंसेवी काम असो, किती फायदा किती तोटा हे गणित मांडून कामाकडे आज पाहिले जाते. म्हणूनच प्रसिद्ध क्युरेटर रॉबर्ट स्टॉर, “The function of museum is to make art worthless again. They take the work out of the market and make it part of the common wealth.” असे धाडसी उद्गार काढू शकतात. 'द इकॉनॉमिस्ट' या साप्ताहिकाच्या प्रमुख कलासमीक्षक सारा थॉर्नटन यांचे अलीकडे प्रसिद्ध झालेले ' सेवन डेज इन द आर्ट वर्ल्ड' नावाचे पुस्तक सध्या बरेच गाजते आहे. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात, 'माझ्या संशोधनानुसार महान कलाकृती सहज घडत नाहीत. त्या घडवल्या जातात. केवळ कलावंत आणि त्यांचे सहकारी एवढेच या 'घडवण्या'च्या प्रक्रियेत पुरेसे नाहीत, तर विक्रेते, दलाल, गॅलरी, क्युरेटर्स, समीक्षक, आणि कलासंग्राहक किंवा खरेदीदार असे सर्वच कलाकृतीला 'महान' ठरवण्याच्या क्रियेत सहभागी असतात. किंबहुना या सर्वांच्या आपापल्या 'हातभारा'शिवाय महान कलाकृती निर्माण होणे अशक्यच.' जे कलेचे तेच सामाजिक कामाचे. एक विशिष्ट कंपू ज्याचा उल्लेख मी चवथ्या भागात केला होता, तो परस्पर हितसंबंध व विशेषतः मार्केट हितसंबंधांच्या विणलेल्या चलाख आराखड्यातून कोणते काम व कोणता कार्यकर्ता महत्त्वाचा, महान किंवा उपयुक्त म्हणून बक्षीसपात्र ठरवतो. मग ते 'प्रमोट' करतो आणि त्याच्याशी निगडित राहून आपापले हित रक्षण करतो.

स्वाभाविकच अशा काळात जेथे सारा समाज एकीकडे दुभंगलेल्या स्किझोसारखा, व संशयाने पछाडलेल्या एकाकी माणसासारखा आहे, आणि दुसरीकडे त्याच्याकडून सतत मार्केट फोर्सेसची कात्री लावून किंवा ढोसण्या लावून, केवळ परफॉर्मन्स व तोही नफा देणारा अपेक्षित आहे, जिथे साऱ्या समाजाचेच डोळे थिजलेले आहेत आणि शरीर थंड पडले आहे, तेथे नवनवोन्मेषशाली प्रयत्नांची बाग फुलवायची कशी, हा खरा प्रश्न आहे.

'संकल्प'मधील निवेदनांच्या काळात जगाची स्पष्ट विभागणी झाली होती, मनाच्या गाभ्यात दडलेल्या अस्फुट आणि सुप्त राजकीय आकांक्षा व इच्छांना स्पर्श झाल्यावर फूत्कारत बाहेर पडणाऱ्या नागाप्रमाणे माणसे आणि सारा समाज रस्त्यावर उतरत होता. शब्दांना अर्थ आणि म्हणून धार होती, डोळे बोलत होते, स्पर्शाला भाषा होती. आज अशा भाषेचा अंगार वा वर्षाव झडून गेलेल्या निष्पर्ण वृक्षासारखा क्षीण आणि विझलेला आहे. भाषा आणि तिचे आविष्कार तुरुंगात खितपत पडल्यासारखे दीनवाणे झाले आहेत. भाषेला 'प्रोफेशनल' करण्यामध्ये 'बडवलेल्या बैलासारखे नि:सत्त्व जीवन तिच्या वाट्याला आले आहे. भाषा बंद आणि कोंदट, कॉर्पोरेट ग्लास हाऊसच्या बलाढ्य एअर कंडिशनरमध्ये फिरणाऱ्या पुनःपुन्हा फिरणाऱ्या थंड आणि मृत हवेच्या निष्प्राण झोतासारखी आज वावरताना दिसते. कार्ल मार्क्स म्हणतात, 'भाषा हीच संस्कृती असते.' म्हणजे आज आपल्या सांस्कृतिक जीवनाची काय अवस्था असेल ते वेगळे सांगायला नको.

आपल्या सांप्रत सामाजिक आणि म्हणून राजकीय स्थितीचा सर्वात भयप्रद पैलू, आणि जो तीस वर्षांपूर्वी निदान आपल्याला दृग्गोचर झाला नव्हता, आणि ज्याबद्दल ८० च्या दशकात जेमसनपासून फुकूयामापर्यंत अनेकांनी बजावले, तो म्हणजे इतिहासाचा अस्त.

इतिहास म्हणजे काय? आणि इतिहासवाद (Historicism) किंवा इतिहासप्रणाली म्हणजे काय? इतिहासवाद ही संकल्पना असे मानते की भाषे(किंवा Text)ची मीमांसा इतिहासाच्या अर्थाशिवाय, ज्या काळात ती जन्माला आली त्या भवतालच्या (context) ऐतिहासिक-राजकीय इतिहासाच्या संदर्भाशिवाय अपूर्ण आहे. वॉल्टर बेंजामिन म्हणतात, 'इतिहासाचा विचार भूतकाळ असा करणे, किंवा भूतकाळापासून वर्तमानापर्यंतच्या प्रवासाच्या टप्प्याचे वर्णन, सनावळ्या किंवा प्रसंग म्हणजे इतिहास नव्हे.' त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इतिहास हा एकसंध नसतोच; तो तुकड्या-तुकड्यांनी बनलेला, वर्तमानाच्या भिंगातून गाळला गेलेला, आणि समकालीन व्यवस्थेतही अस्तित्वात असणारा प्रवाहाचा एक तुकडा असतो. इतिहासाचे आकलन (त्यामुळे) एका भूतकालीन क्षणापासून दुसऱ्या क्षणापर्यंत घडलेल्या घटनांचे कथन केल्याने होणार नाही; तर ते आकलन सत्तासंघर्षाच्या, पिळवणुकीच्या, मानवी युद्धांच्या आणि सतत झालेल्या घर्षणाच्या तुकड्यातुकड्यांच्या असंबद्ध रचनेच्या काळाचा सातत्यपूर्ण अभ्यास केल्यानेच होऊ शकते. म्हणजेच वर्तमान ही अशी काळाची ताणलेली तार आहे, जी एका बाजूला भूतकाळात दडलेल्या संघर्षातून निर्माण झालेल्या शक्तींनी ताणली आहे, आणि दुसऱ्या बाजूला भविष्यात अपेक्षित असणाऱ्या घटनांच्या तणावांनी आणि लढायांनी भारली आहे - अर्थातच त्यामुळे ज्याला इतिहास समजतो तो भविष्याचा वेध अधिक सजगपणे व अचूक घेऊ शकतो. किंबहुना भविष्य हे वर्तमानापेक्षा इतिहासाच्या ताणतणावावरच अधिक अवलंबून असते.

म्हणून जेमसन म्हणतात, 'Always Historicize! This slogan - the one absolute and we may even say 'trans historical' imperative of all dialectical thought - will unsurprisingly turn out to be the moral of the Political Unconscious as well.'

एका शब्दात सांगायचे झाले तर पोलिटिकल अनकॉन्शस - राजकीय सुप्त इच्छा-स्वरूप, 'इड'च्या कोठारातील दारुगोळा म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून 'इतिहास' आहे. इतिहास वर्तमानाच्या प्रत्येक उद्गारात दडून आहे, अव्यक्त आहे. रिचर्ड लेवोन्टीन यांच्या 'बायॉलॉजी अ‍ॅज आयडिऑलॉजी' आणि 'ट्रिपल हेलिक्स' या प्रबंधात इतिहासाच्या या रूपाचा मागोवा जेनेटिक्स आणि डायलेक्टिक्स - परस्परविरोधाचा पडताळा देत घेतला आहे. थोडक्यात काय तर इतिहासाच्या जाणिवेचा ठसा किंवा चरा जर आपल्या जीनोमवर उमटला नसेल तर एका अर्धमानव किंवा दुर्बल आणि हताश - किंवा वर्तमानाच्या अपुऱ्या, कोंदट आणि अंधाऱ्या कोठडीत बंदिवान झालेल्या माणसाचे जीवन नशिबी येईल. भीती आहे ती इतिहास नसण्याची.

भूतकाळ पचवण्याची, इतिहास वागवण्याची, आणि इतिहास जगण्याची मानवी क्षमता दिवसेंदिवस कमी कमी होताना जाणवते. ग्राहक भांडवली व्यवस्था (Consumer Capitalism) किंवा 'लेट' - सद्य अर्थव्यवस्थेच्या रगाड्यामध्ये माणसाला फक्त आणि फक्त, सततचा वर्तमानच जगण्याची सक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. असा माणूस भविष्याचा वेध तर सोडाच, पण उद्यासाठीही जगायला दिवसेंदिवस असमर्थ ठरण्याची शक्यता असते. ज्याला केवळ वर्तमानच आहे तो कसल्या चळवळी उभारणार? कसल्या कला विकसित करणार? उद्याचे कोणते गाणे आज म्हणणार?

१९६४ च्या सुमारास अँडी वॉरहॉल या सुप्रसिद्ध दृश्य कलावंताचे 'ब्रिलो बॉक्सेस' आणि 'टोमॅटो सूप कॅन्स'चे चित्रशिल्प आणि सिल्क स्क्रीन प्रिन्ट्सचे प्रदर्शन पाहून आल्यानंतर तत्त्वचिंतक आणि 'द नेशन'मध्ये कलासमीक्षा लिहिणारे ज्येष्ठ अभ्यासक आर्थर सी डांटो यांनी त्यांचा गाजलेला 'कलेचा अंत' (The End of Art) हा निबंध लिहिला होता. 'यापुढे कला नाही, ती संपली.' त्यांना प्रश्न असा पडला की, असं काय या ब्रिलो बॉक्समध्ये आहे, की जे अगदी ब्रिलो बॉक्सबरहुकूम दिसते, ज्याला आपण कलाकृती म्हणायचं, पण खराखुरा ब्रिलो बॉक्स मात्र कलाकृती नसतो! मात्र पुढे ते लगेच म्हणतात, ज्या कुणाला पाहण्याचा दृष्टिकोन आहे, आणि ज्या कुणाला 'कलेचा (राजकीय) इतिहास' माहीत आहे त्याला वॉरहॉलचे ब्रिलो बॉक्स कला म्हणूनच भावतेच.

जेमसन यांनी हा मुद्दा विशद करताना एका नव्याच मुद्द्याची स्थापना केली आहे. [आणि नवे सामाजिक वास्तव समजून घेण्यासाठी आपण नवकलेच्या (समकालीन कला) वाटेवरून प्रवास केला तर योग्य दिशादर्शन होईल असा माझा विश्वास असल्याने, मी पुनःपुन्हा माझ्या मांडणीच्या ओघात कलेच्या ऐतिहासिक आकलनाचा परामर्श घेत घेत पुढे जातो आहे.] जेमसन यांच्या म्हणण्याप्रमाणे समकालीन किंवा उत्तर-आधुनिक (आपल्याकडे उत्तर-आधुनिकतेचा जन्म अलीकडचा आहे, जागतिकीकरणानंतर तो वाढला व आता तर उत्तर-उत्तर-आधुनिक काल सुरू आहे. म्हणून समकालीन हा शब्दच बरा.) कला, मीमांसा (समाजकारण किंवा राजकारण) सपाट आहे. तिला खोली नाही (depthlessness). म्हणजे याचा अर्थ कृपया समकालीन कला उथळ आहे असा कोणी काढू नये. ऑस्कर वाईल्डला जो उथळपणा अभिप्रेत आहे (Shallowness is Supreme Vice) तो उथळपणा इथे अभिप्रेत नाही. जेमसन यांचे 'सपाटले'पण (एका अर्थाने) त्यांच्या 'राजकीय सुप्त इच्छास्वरूपा'शी निगडित आहे. फ्रॉईड ज्या अर्थाने पृष्ठभागावरील हालचाल (Surface movement) आणि त्याखाली दडलेली 'इड'ची खोलवर कुठेतरी साठवलेली सुप्त इच्छांची उचंबळ अपेक्षितो, त्या अर्थाने या सपाट कलाविष्काराकडे पहावे लागेल. एका दुसऱ्या अर्थाने असा कला (वा राजकीय कृतीचा) आविष्कार की ज्याला इतिहासाचे संदर्भच नाहीत. त्यामुळे तो कलाकार किंवा तो पाहणारा प्रेक्षक (वाचक, श्रोता, संग्राहक) या दोहोंवर कोणताच परिणाम होत नाही. त्यांच्यात कोणताच भाषाव्यवहार होऊ शकत नाही. (Text disappears) - भाषा अदृश्य होते. अनाकलनीय नव्हे, फक्त संवादाच्या सीमेवरच ती थबकते.

उदाहरणार्थ, व्हॅन गॉफचे बूट (A pair of boots, 1886) हे चित्र आणि वॉरहॉलचे 'हिऱ्याचा चुरा पसरलेले बूट' (diamond dust shoe) हे सिल्क स्क्रीन प्रिन्ट.

व्हॅन गॉफचे बूट एका पिळलेल्या, गरीब समाजाच्या इतिहासाची कहाणी घेऊन समोर येतात. त्या चित्रात असलेले खोलीचे खेळ, शेड्स किंवा रंगथरांच्या फटकाऱ्यांमधून साकारलेले अवकाश, आणि काळाचा एक विलक्षण दुखरा क्षण पकडण्यात चित्रकाराला आलेले यश, या सर्वातून एक दीर्घ कथानक किंवा एका काळाचे कथन प्रगटते. 'The whole missing object world which was once their lived context … the heavy tread of the peasant woman, the loneliness of the field path, the hut in the clearing, the worn and broken instruments of labour in the furrows and at the hearth ...'

कितीतरी संदर्भ, जगलेल्या किंवा मेलेल्या इच्छा, दबलेल्या आकांक्षांचे अवकाश या दोन जीर्ण, फाटक्या, आणि सडून गेलेल्या बुटांच्या जोडीतून आपल्या समोर येते. आपण आपला इतिहास त्या बुटांच्या इतिहासातील क्षणांशी जोडून आजच्या वर्तमानात त्यांच्याशी बोलू लागतो. त्या बुटांच्या जोडीवरून मायेने हात फिरवण्याची इच्छा होते आपल्याला.

परंतु वॉरहॉलचे फॅशनेबल, उच्चभ्रू, आणि समाजाच्या उच्च वर्गातील ललनेचे जोडे, ज्यावर हिऱ्याचे चूर्ण उधळले आहे, ज्याचा रंग सोन्यासारखा लखलखता आहे, एखाद्या भल्याथोरल्या होर्डिंगवर पसरलेल्या, कशाशीच संबंध नसलेला, जिचा नग्नपणादेखील नग्न वाटू नये अशा जाहिरातीतील मॉडेलसारखे, हे बूट आपल्या 'गेझ' (gaze) मध्ये, आपल्या दृष्टीच्या आवाक्यात येऊनही आपण त्यांना ओळखूच शकत नाही. एक थंड प्रतिसाद, नव्हे एक पोकळ, शून्यातली नजर एवढाच आणि एवढाच त्या कटाक्षाचा अर्थ राहतो. वॉरहॉलच्या 'प्रिन्ट'मधून एका स्किझो समाजाचे, एका भावना हरवलेल्या, अवकाश नसलेल्या, पोकळ, टेबलावर ठेवलेल्या मोकळ्या आणि मृत शिंपल्यासारख्या, कोरड्या, सपाट, आणि मृत सुप्त ज्वालामुखीच्या एकाकी तोंडासारख्या, तहान व भूक हरवलेल्या, बेभान व बेलगाम, बिनभरवशाच्या व बेजबाबदार समाजमनाचे भावचित्र प्रगट होते. जेमसन लिहितात, 'Andy Warhol's 'Diamond Dust Shoes' evidently no longer speaks to us with any of the immediacy of Van Gogh's footgear; indeed, I am tempted to say that it does not really speak to us as well… We are witnessing the emergence of a new kind of superficiality in the most literal sense, perhaps the supreme formal feature of all postmodernisms.'

जेमसन यांच्या मताशी मी सहमत जरी नसलो, तरी मला हा नवीन flatness कमीपणा वाटत नाही. केवळ एक लक्षण किंवा symptom म्हणून त्याकडे पाहायला हवे. फ्लॅटनेस हा दोष आहेच, परंतु तो त्या कलावंताचा नसून तो त्या आजारी समाजाचा आहे एवढे भान आपण ठेवले पाहिजे.

'संकल्प'मधील तरुणांच्या मनोगतामध्ये वारंवार दिसत होते ते व्हॅन गॉफचे बूट. ते बूट आता त्यांच्यापाशी नाहीत. माझ्या 'लाकूडतोड्याची गोष्ट' या कवितेत लाकूडतोड्याची जीन्स जशी हरवते, व त्याला जशी नवनव्या ब्रॅन्डची नवी कोरी 'जीन्स' मिळते, तसा काहीसा प्रकार सध्या कलावंत व सामाजिक कार्यकर्त्यांच्या जीवनात घडू पाहत आहे. म्हणून ही कविता जशीच्या तशी 'संकल्प'च्या नव्या आवृत्तीच्या शेवटी संदर्भ-टिपण म्हणून छापली आहे. ती जरूर वाचावी.

***

पुनर्मुद्रित. मूळ प्रसिद्धी - 'संकल्प', २०१०, ग्रंथाली प्रकाशन

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

लेख वाचताना कष्ट घ्यावे लागले. तरीही आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख वाचताना कष्ट घ्यावे लागले. तरीही आवडला.

सहमत.

'संकल्प' काय आहे ? आणि त्याचा तथाकथीत काळ कोणता हे लेखातून स्पष्ट होण्यास वेळ लागतो. १९८० पर्यंतचा विवीध चळवळींचा काळ ते आताचा काळ या काळात झालेले अनेक क्षेत्रातील बदलांचा मागोवा नेमक्या शब्दातनं संजीव खांडेकर यांनी मांडला असे दिसते.

लेखाच्या वाचकालाही संजीव खांडेकरांएवढा नसली तरी गेल्या तीसएक वर्षातील अनेकविध क्षेत्रातील घडामोडींचा परिचय नसल्यास प्रत्येक वाक्या गणीक संजीव खांडेकरांना काय म्हणावयाच आहे ते समजून घेण्यासाठी जरासे कष्ट घ्यावे लागू शकतील असे वाटते. [ कंसातील वाक्ये ग्रे कलर करून, अपरिचीत गोष्टींची अधिक माहिती घेता यावी म्हणून अधिक दुवे आणि संदर्भ, तसेच लेखाचे धावते संक्षीप्त वाचन करता यावे म्हणून काही वाक्ये अधोरेखीत करण्याबद्दल विचार करावा. असे वाटते.]

त्यांच्या या लेखाचा आणि लाकुडतोड्याच्या बद्दलच्या कवितेचा संबंध चटकन लक्षात येत नाही पण तसा तो आहे हे लेख पूर्ण वाचल्या नंतर जाणवले. त्या विषयी स्वतंत्रपणे प्रतिसाद देईन.

काही चांगल वाचल धन्यवाद

ता.क.
* 'संकल्प' लेख संग्रहाचा बुकगंगा डॉट्कॉमवर हा दुवा आढळला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

केवळ शीर्षकाला दाद म्हणून हा प्रतिसाद. नुकताच गोडशांच्या 'नांगी असलेले फुलपाखरू'चं अभिवाचन पुण्यात 'रिंगण'मधून सादर झालं. त्यामुळे हे अधिकच आवडलं. लेखास मात्र सावकाशीनं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बोजड वाटला. दुसर्‍या वाचनात पूर्ण करेन
तुर्तास पोच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सध्या स्वस्थपणे वाचता येत नाहीये. त्यामुळॆ फक्त पोच. पण लिखाणाचा आशय पटला. कलेच्या संदर्भातील निरीक्षणॆ नेमकी. लेखातले बरेचसे संदर्भ माहीत नाहीत. त्यामुळे शांतपणे वाचायला हवा.
सहाएक वर्षांमागे worldspace radio वर ध्रुपदीये डागर यांच्यापैकी (नाव आठवत नाहीये) एकाची मुलाखत ऐकली होती. आताच्या internet च्या जमान्याबद्द्ल बोलताना ते म्हाणाअले होते. "सगळ्यांशी जोडून रहाणं, कोणापर्यंत पोहोचणं, कार्य्कम मिळवणं सोपं झालं असेल. पण रियाजासाठी आवश्यक ती मनातली शांतताच हरवली आहे" . जुन्याजाणात्यांची ही व्यथा, नविन कलाकारांची तर या शांततेशी तोंडओळखही नाही आणि मधले भांबावलेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कामचालू

१९८० च्या दशकात कार्यरत विवीधांगी चळवळीतील विवीध कार्यकर्ते जसे कि नरेंद्र दाभोलकर, रझिया पटेल, नीलम गोऱ्हे आणि इतर काही जणांच्या मनोगतावर आधारीत एक लेख संग्रह १९८२ साली 'संकल्प' नावाने एक लेख संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशीत केला त्याचे संपादन प्रस्तावना लेखन संजीव खांडेकरांनी केले होते. त्याच लेख संग्रहाची २०१० साली आवृत्ती पुन: प्रकाशित झाली त्यास "नांगी गळू लागलेले फुलपाखरू" नावाने नवी प्रस्तावना सोबत त्याच विचारांना अधोरेखीत करू पहाणारी लाकूडतोड्याची गोष्ट हि कविता सदरहू कविता 'संकल्प' या लेख संग्रहास जोडली गेली त्याची २०१४ च्या दिवाळी अंकाच्या माध्यमातून ऐसीअक्षरेने दखल घेतलेली दिसते. कविता रसग्रहण सोपे जावे म्हणून सदरहू प्रस्तावनेचा संक्षेपाचा प्रयत्न.

इ.स.१९८२ पूर्वीचे जग; सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जग आज अस्तित्वात नाही. तीस वर्षांपूर्वीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे, ती शोधण्याची साधने, व ती वापरण्याचे सामर्थ्य या सर्वच बाबींचे, स्वरूप कमालीचे बदलते आहे. लांबून सारखेच दिसणारे जग किंवा बदललेले पृष्ठभागावरचे जग आणि त्याच्या आत सामावलेले कळीचे जग आत जुने राहिले नाही.

अठ्ठावीस वर्षांपूर्वी या संकलनाविषयी संपादकीय लिहिताना मी जो हेतू मनाशी बाळगला होता तो त्या लिखाणात विशद केला आहेच. त्या वेळी मी परिवर्तनाच्या चळवळीत झेप घेण्याच्या क्षणाची 'नैतिक पूर्वमनस्कता' तपासावी, समजून घ्यावी हा हेतू ठेवून या आत्मकथनाकडे पाहतो आहे, असे म्हणालो होतो. 'नैतिक पूर्वमनस्कता - किंवा मॉरल प्रिऑक्यूपेशन' ही संकल्पना जेवढी तात्त्विक (Philosophical) आहे तेवढीच मानसशास्त्रीय आहे.....इच्छारूपाचा शोध घेताना दीनानाथ मनोहर लिहितात, 'सोमनाथला गप्पा मारताना अनिल थत्ते मला म्हणाला होता, "दीनानाथ, तुला असं नाही वाटत की जे या स्पर्धेच्या जीवनात अयशस्वी ठरतात, मागे पडतात, असे तरुण समाजकार्याकडे, चळवळीकडे वळतात?" प्रस्थापित व्यवस्थेत यशस्वी होऊनही परिवर्तनाच्या संघर्षात स्वेच्छेने आलेल्या व्यक्तींची नावे सांगून मी त्याचे म्हणणे खोडायचा प्रयत्न केला होता. पण माझ्या मनात विचार आला होता, हे काहीसं खरं काही व्यक्तींच्या बाबतीत खरंही नाही का? पण या स्पर्धेत अयशस्वी होणाऱ्या व्यक्ती केवळ मर्यादित कुवतीमुळे अयशस्वी होतात का? की तथाकथित 'यशस्वी' होण्यातील निरर्थकता त्यांना जाणवलेली असते? या व्यवस्थेत प्रस्थापित होण्याची, पहिला नंबर मिळवण्याची, स्थान मिळवण्याची, घोडदौड करण्याची त्यांना इच्छाच नसते. ही इच्छा नष्ट होणे ही व्यक्तीला परिवर्तन-चळवळीकडे नेणारी पाऊलवाट असते काय?

चळवळीत येण्याची कारणं शोधावयास लागलो की मला प्रश्न पडतो, की अशी काय परिस्थिती होती, अशा काय घटना घडल्या, कुठली व्यक्ती अशी प्रभावी ठरली की ज्यामुळे स्वतःबद्दल असमाधानाचा सल उत्पन्न झाला, वाढत राहिला?'

फ्रेडरिक जेमसन या तत्त्वचिंतकांनी 'राजकीय सुप्त इच्छारूप' (Political unconsciousness) अशी संकल्पना मांडली आहे.

......प्रामुख्याने लैंगिक सुख-समाधानासाठी जरी या इच्छांची निर्मिती झालेली असली तरीही त्यांचे अन्य, म्हणजे पैसा, यश, नाव, प्रतिष्ठा, सत्ता, अशा विविध कारण रूपांत सतत परिवर्तन होत असते, व अशा रूपांतरक्रियेत ती ती व्यक्ती आपल्या जाणिवेच्या साहाय्याने स्वतःचे आयुष्य किंवा जगण्याची शक्ती, जीवनोत्सुकता खर्च करत असते. मात्र जाणिवेला माहीत नसलेल्या तरीही जाणिवेला हादरवून टाकण्याची शक्ती असलेल्या दाबलेल्या इच्छांचा सुप्त साठा त्या व्यक्तीच्या जीवनात अंतर्बाह्य स्फोट घडवून आणत असतो.....

.....मार्क्सवादी दृष्टिकोनानुसार, आर्थिक व्यवस्थेच्या पायावर सांस्कृतिक व्यवस्थेची इमारत बांधली जात असल्यामुळे, या दोन व्यवस्थांचे परस्परसंबंध 'राजकीय सुप्त इच्छारूपां'चा वेध घेऊन तपासता येतील काय, असा प्रश्न जेमसन विचारतात. माझ्या विवेचनात मी 'नैतिक पूर्वमनस्कते'चा उल्लेख, याच सुप्त शक्तींचा वेध घेण्यासाठी केला होता.

'संकल्प'मधील तरुण कार्यकर्त्यांची कथने जर सांस्कृतिक अवस्थेचा एक भाग मानली तर त्यांना cultural texts प्रमाणे, म्हणजे ज्याप्रमाणे आपण साहित्य किंवा सिनेमाकडे पाहतो त्याप्रमाणे पाहिले तर, त्यांच्या पायाखालील सुप्त इच्छारूपाला खणून काढता येईल असे मला वाटते. ......, त्या कथनांतील 'फ्रॉईडिअन स्लिप्स'चा अंदाज घेऊन मिळवलेले धागेदोरे- त्या वेळच्या तरुणांच्या आजच्या स्थितिविषयक आज त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकांबद्दल काही उपयुक्त दिशा देऊ शकतील काय, असा नवा विचार माझ्या मनाशी आहे.......

मनोगते किंवा साहित्य, नाटक वा सिनेमा, कविता किंवा नृत्य, आणि संगीतदेखील त्या समाजाच्या अंतर्मनाचीच स्पंदने असतात, त्यांचे विश्लेषण आणि पृथक्करण करण्यासाठी साधने निर्माण करणे हे त्या त्या समाजामधील त्या त्या वेळेतील विचारवंतांचे काम असते. बदलाच्या प्रक्रियेत अशा साधनांची भूमिका महत्त्वाची ठरते.

ग्यॉर्जी ल्यूकाचने..... Reification (वस्तुजन्य रूपांतरीकरण?) अशी नव्या संकल्पनेची निर्मिती केली आहे. या शब्दाचा अर्थ असा की, 'एखाद्या माणसाचे किंवा एखाद्या प्रक्रियेचे, किंवा एकाद्या अमूर्त संकल्पनेचे होणारे (केलेले) वस्तूत रूपांतर.' - अनेक विचारवंत या क्रियेला 'thingification' असे म्हणतात - वस्तुजन्य रूपांतर. कार्ल मार्क्स आपल्या विवेचनात या रूपांतराबद्दल विस्ताराने लिहितात. ते म्हणतात, 'भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये मानवी प्रयत्न, माणसाचे सामर्थ्य आणि त्याची सर्जकता गळून जाते, किंवा तिचा ताबा कोणा एका भलत्याच यंत्रणेकडे जातो. माणूस राबवला जातो. आणि त्याची सर्जकता त्याच्या हातातून निसटून जणू स्वतंत्र शक्ती असल्यासारखी भांडवली यंत्रणेच्या जोखडातून प्रगटते.' अशा होणाऱ्या बदलातून त्या समाजाची व तेथील माणसांची हानी कशी झाली याचाच प्रत्यय येतो. उदाहरणार्थ, अलीकडे 'मार्केट फोर्सेस' असा शब्द सर्रास आयुष्यातील प्रत्येक समाज हतबल होतो, आणि जणू गुरुत्वाकर्षण किंवा जडत्व हे जसे नैसर्गिक नियम आणि शक्ती आहेत, तसा मार्केट फोर्स हा एखादा नैसर्गिक नियम आहे आणि त्यामुळे त्याला अधीन राहून जगण्याची सक्ती नकळत केली जाते.

१९८० नंतरच्या काळात, गेल्या पंधरा-वीस वर्षांत विशेषतः माणसाची वस्तू बनवण्याचे काम फारच वेगाने आणि धडाक्याने सुरू झाले आहे. वस्तूला क्रय मूल्य असणे, आणि म्हणून माणसासकट सर्वच वस्तू क्रय-विक्रयासाठी उपलब्ध आहेत असे मानून ज्या वेळी समाजात व्यवहारात होतात त्या वेळी तो समाज एकसंध ‌व एकसेंद्रिय (organic), एकात्म म्हणून काम करण्यास दुबळा ठरतो. माणसापेक्षा वस्तू व तिची खरेदी किंवा विक्री महत्त्वाची ठरते. समाजपुरुषाच्या सर्जकतेलाच ग्रहण लागते; आणि खरेदी-विक्री पैशात होत असल्याने पैसा साऱ्या समाजव्यवस्थेचा कब्जा घेतो. चळवळ असो वा कविता, चित्र असो वा सिनेमा, सारेच काही पैशात तोलले जाऊन पैशाभवती फिरू लागते. गेल्या अठ्ठावीस वर्षांतील या मनोगतांमधून प्रगटलेल्या चळवळींचे, त्यातील माणसांचे काय बदलले, कसे बदलले, कुणी बदलले व केव्हा किंवा कोठे कोठे बदलले, वस्तुजन्य रूपांतरीकरणाच्या कोणत्या टप्प्यावर आपण उभे आहोत, याचा विचार या मनोगतांमुळे जरी रुजवता आला तरी बरेच काही केल्याचे समाधान प्रकाशकांना मिळू शकेल.

सद्य काळ हा कमोडिटीच्या विजयाचा, वस्तूंच्या राज्याभिषेकाचा आहे. पार्टी किंवा पार्टीचा कार्यकर्ता दोन्हीही तराजूमध्येच मोजले जातात, निवडणुकांच्या तोंडावर त्यांचे सौदे होतात, आदी परिस्थितीचा तपशील देण्याची गरज नाही.....

नव्या भांडवली व्यवस्थेमध्ये नकळत माणूस फक्त व्यवस्थेने पुरवलेल्या, विकलेल्या वस्तूंनाच सार्थक मानून जगतो. समाजहितापेक्षा, अधिक मोठ्या टी.व्ही. स्क्रीनचा, किंवा नव्या Ipad चा, त्या वस्तू मिळवण्याच्या आणि त्या मिळाल्या तर धन्य व न मिळाल्या तर हताश होण्याच्या, वस्तूंनाच निसर्ग मानून त्याभवती जीवन बेतण्याच्या क्रियेत माणूस निःसत्त्व बनून जगू लागतो. या 'वस्तू विजय विलासा'चा जलवा इतका शक्तिशाली आहे की अलीकडे गावोगावी वाढलेल्या बकाल सांस्कृतिक त्याचे प्रतिबिंब जागोजाग पहावयास मिळते. भाषेचा व संस्कृतीचा ऱ्हास, पर्यावरण आणि सोयर समाजाचा नाश, भ्रष्ट आणि जाहिरातीत मांडण्यात येणारी भडक, सवंग, स्वस्त आणि कर्कश कला व संगीत, अचेतन सर्जकता, षंढ जाणिवा आणि 'सुप्त व्यक्तिगत इच्छांचा' स्फोट असे विदीर्ण समाजजीवन आज आपल्याला अनुभवायला येत नाही काय?

.......अडोरनोने १९४० च्या सुमारास “The Culture Industry” शीर्षकाचा निबंध लिहून भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये, कलेचे ........ क्रयवस्तूमध्ये रूपांतर झाले आहे हे मांडले होते. लेट कॅपिटॅलिझम, किंवा आताच्या भांडवली व्यवस्थेत या रूपांतराने कसे टोक गाठले आहे याचे दर्शन आंतरराष्ट्रीय लिलाव कंपन्यांनी मांडलेल्या कलेच्या बाजारावरून सहज येऊ शकते.

कलेच्या प्रत्येक घटकाचे वस्तूकरण करत असताना नव्या व्यवस्थेने लोकशाही संकल्पनेचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून, समाजातील सर्व घटकांना या क्रय वस्तू रूपांतरकरणामध्येच सहभागी करून घेतले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जवळपास प्रत्येक वाहिनीवर चालणारे 'महागायक' किंवा तत्सम कार्यक्रम. एस. एम. एस. पाठवून, ते पाठवण्यासाठी जात, पात, भाषा, प्रांत या सर्व गोष्टींचा उपयोग करून (जेवढे जास्त एस. एम. एस. तेवढा त्या वाहिनीला व त्या त्या मोबाईल कंपनीला अधिक नफा), जास्तीत जास्त एस. एम. एस. ज्याला मिळतील तो विजयी, अशी लोकप्रियतेच्या आधारावर उपयोजिलेली एक नवी आणि उथळ सौंदर्यव्यवस्था - Esthetics निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे कलेच्या गाभ्यात असलेली विरोधवृत्तीची सुप्त इच्छाशक्ती नष्ट होऊन, व्यक्ती पातळीवर दाबली गेलेली सुखलोलुपतेची सुप्त इच्छा अधिक मोकाट कशी सोडता येईल, व त्या मोकाट इच्छेच्या पूर्ततेसाठी नवनवीन उत्पादने बाजारात आणून कशी विकता येतील याचाच विचार केला जातो.

मी स्वतः कलेला समाजपरिवर्तनाच्या चळवळीपासून वेगळे मानत नाही.
दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत व त्या वेगळ्या करणे तात्त्विक दृष्ट्या शक्य नाही. या दोन्हींची मुस्कटदाबी गेल्या काही वर्षांत कशी झाली हे समजून घेताना त्यांच्या बाजारीकरणाचा हिशेब मांडणे शक्य व्हावे.

आधुनिक कला, किंवा आधुनिकतेचा जन्मच मुळी गेल्या शतकाच्या सुरुवातीपासून, त्याआधी किंवा त्या वेळेपर्यंत प्रचलित असलेल्या कलेला विरोध करण्यातून झाला. Classical Modernism was an Oppositional Art. ती एका नव्या व्यावसायिक समाजामध्ये, बिझनेस सोसायटीमध्ये, स्कॅन्डलस पद्धतीने मध्यमवर्गाला घाबरवून सोडणारी, कुरूप, उच्छृंखल, लैंगिक-लोलुप किंवा धक्कादायक म्हणून उदयाला आली; स्थिरावली. मध्यमवर्गात अशा नवकलेची चेष्टाच केली जात असे, व आपल्याकडे पुलंपासून अगदी भले भले म्हणणाऱ्यांनी नवसाहित्याची उडवलेली थट्टा नवीन नाही. एका बाजूला सनातनी, प्रतिगामी, पुरातनवाद्यांनी, संस्कृती-रक्षकांनी आणि दुसऱ्या बाजूला शासन व त्यांचे पोलिस अशा त्यांच्या हस्तकांनी या नवकलेला अटकाव करण्याचे, तिचे दमन करण्याचे, आणि तिच्याकडे गंभीर गोष्ट म्हणून न पाहता काही वेळा विनोद तर काही वेळा विकृती म्हणून पाहण्याचे ठरवले होते. त्यामुळे परिवर्तनाच्या चळवळींशी समांतर जाणाराच हा मार्ग होता.

परंतु गेल्या काही वर्षांत असे काय बरे घडले असावे की विचित्र वाटणारा पिकासो किंवा हुसेन, चित्रे, कोलटकर किंवा त्याही आधीचे मर्ढेकर, तेंडुलकर किंवा ढसाळ असे सगळेच सद्य समाजाला विघातक वाटेनासे झाले? इतकेच नव्हे तर यातील बहुतेक सगळे 'क्लासिक' किंवा 'लोकमान्य व राजमान्य' कला-सौंदर्य-व्यवस्थेत चपखलपणे सामावले गेले! दुसरीकडे समकालीन कलाप्रांतात विरोध व्हावा वा धक्का बसावा असे काही घडताना आपल्याला दिसत नाही. जे जे म्हणून असभ्य होते, धक्कादायक किंवा वाळीत टाकलेले होते - मग पंक असो, रॉक असो, किंवा लैंगिक मुक्ताविष्काराचे दर्शन असो - सारेच काही आता समाजात सहज गिळून विनासायास पचवले जाते. इतकेच नव्हे, असे काही असलेच तर ते विक्रीच्या दृष्टीने (कमर्शियली) यशस्वी तर होतेच; परंतु शासनाच्या वा अन्य अकादमीच्या पुरस्कारालाही प्राप्त होते. जाहिरातक्षेत्राने तर आधुनिकांच्या काळात जे जे वावगे म्हणून हिणवले जाते ते ते आपले मानून सबंध आधुनिकतेचेच एक प्रॉडक्ट किंवा क्रयजन्य उत्पादन करून टाकले आहे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे वुडस्टॉक फेम जीन्स पॅन्ट्स आणि चे गव्हेराचे चित्र छापलेल्या चड्ड्या, निकर्स आणि ब्रेसियर्ससुद्धा विक्रीला उपलब्ध आहेत. विरोधाला क्रयवस्तू करून तिची विक्री करण्याच्या या 'मार्केट फोर्स'च्या ताकदीला काय म्हणणार?

जे जे म्हणून व्यवस्थेला आव्हान देणारे होते त्याचीच व्यवस्था - Canon बनवून - ते पाठ्य पुस्तकापासून रस्त्यावरील दुतर्फा होर्डिंग्जवर रंगवून त्यातील सुप्त विरोध इच्छारूपाला पिळून पिळून रिकामे करण्यात ही व्यवस्था यशस्वी झाली आहे. त्यामुळे अनेकदा भेटतात ती कलाकुसरीची टरफले आणि चळवळींची फोलपटे. अशा फोलपटांच्या भल्यामोठ्या एन. जी. ओ. राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या साम्राज्यासारख्या पसरताना आज दिसतात, सुप्त विरोध-इच्छेचे रूपांतर सुप्त व्यक्तिगत लोलुपतेत करून, त्या इच्छांना खतपाणी घालून त्यांना फळवण्यात सृजनशील तरुण, कलावंत आणि कार्यकर्ते आज रममाण झाले आहेत, हे सत्य नाही काय? आधुनिकतेचे सौंदर्यशास्त्र, व्यवस्था आणि विद्या(पीठ) झाले आहे, आणि तीच व्यवस्था किंवा सौंदर्याची मीमांसा आहे असे अनेक नव्या पिढीतील कवी, चित्रकार आणि संगीतकार मंडळींना वाटते, हे दुर्दैव आहे. बंडखोरीचे प्रस्थापितांत कसे व केव्हा रूपांतर झाले हेच न समजल्यामुळे समाज-परिवर्तनाच्या अनेक चळवळींनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे भरवून, कॉर्पोरेट ऑफिसेसच्या धर्तीवर इमारती सजवून, व्यवस्थापकीय शिक्षणातील भंपक जार्गन्स वापरून आपल्या चळवळींची एक लांब-रुंद कॉर्पोरेशन केली आहे.

उपभोगाची नवनवीन उत्पादने, नियोजनबद्ध तुटवडे आणि पुरवठे, फॅशन आणि बदलणाऱ्या सवयींचा सतत मारा, जाहिरात, टी.व्ही., नवमाध्यमे यांनी व्यापलेला जाणिवेचा पसारा, खेडी आणि शहरांमधले शिथिल झालेले ताण, प्रत्येक वापराचे एक रेखीव-आखीव कोष्टक, standardisation, शरीराच्या प्रत्येक स्नायूपासून तो केवढा व कसा मिळवण्यासाठी वापरावयाचे कार्यक्रम, औषधे, खाद्यपदार्थ यांचा 'शास्त्रीय' संशोधनांनी सिद्ध केलेला, किंवा प्रायोजित संशोधनातून सिद्ध झालेला कार्यक्रम, माहिती व तंत्रज्ञानाने बदललेले विश्व, नव्या व्हर्च्युअल विश्वात खुले केलेले 'फ्रॉईडिअन इड'चे, दबलेल्या इच्छांचे दालन, अशा नव्या जगाची वाटचाल नकळत सिव्हिलायझेशनकडून डीसिव्हिलायझेशनकडे झाली, व एका अतिहिंसक वासनेने भारलेल्या समाजसमूहाची निर्मिती झाली, तर आश्चर्य वाटायला नको.....

गेल्या काही वर्षांत चळवळींच्या - ज्यांना बहुतांशी एन जी ओ असे सर्वमान्य सर्वनामाने संबोधले जाते, अशा - संस्थांच्या कारभारात अंतर्बाह्य स्वरूपाचे व कामावर दूरगामी परिणाम करणारे बदल झाले आहेत. त्यांतील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे या संस्थांना होणारा वित्तपुरवठा. परदेशी वित्तपुरवठा करणाऱ्या शासकीय-निमशासकीय व संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून काम करणाऱ्या - येथील संस्था पूर्वीही होत्या; परंतु गेल्या काही वर्षांत विशेषतः भारताने अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर अशा संस्थांचे, परदेशस्थ व्यक्तींचे व शासकीय यंत्रणांचे धोरण व कार्य हळूहळू परंतु गुणात्मक व संख्यात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर बदलू लागले.

'संकल्प' काळातील कार्यकर्त्यांच्या ध्यानीमनीही येणार नाही एवढा पैसा आणि त्यापाठोपाठ येणारे आंतरराष्ट्रीय 'लॉबी' राजकारण गावागावातील संस्थांच्या अंगणात किंवा कार्यकर्त्यांच्या घरांघरांत खेळू लागले.

भारतातील वाढणारा मध्यमवर्ग, नव्या तरुण पिढीचा - उत्तर-आधुनिक (?) किंवा उत्तर-कारखानदारी - असा नवा वर्ग, वाढता दहशतवाद, विशेषतः मुस्लिम दहशतवाद, नव्या रशियाचे तेल व त्यातून उभ्या राहिलेल्या माफिया संघटना, जुन्या सोव्हिएट्समधले विविध मूलवादी राजकारणाचे प्रश्न, वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला कुप्रसिद्ध ११/९ चा हल्ला, पाठोपाठ भडकलेली आखाती युद्धे, आर्थिक दृष्ट्या प्रबळतेकडे सरकणारा बदलता चीन, नवा भारत (हिंदुस्थान!), पाकिस्तानचे नवे राजकीय-भौगोलिक महत्त्व… अशा असंख्य नव्या संदर्भांच्या चौकटीत परदेशी पैशाचे आपल्या देशात स्वयंसेवी संस्थांसाठी अवतरलेले गंगाजळी योग तपासावे लागतील. हा मोठा व जटिल अभ्यासाचा विषय आहे.....

बहुतांश नव्या चळवळी/स्वयंसेवी संस्था आणि देशातील त्या त्या भागातील उद्योग, उद्योगपती, व्यावसायिक, राजकीय नेते, परदेशी वित्तीय संस्था, आणि आता नव्याने उदयाला आलेला पोलिस आणि न्यायदेवता अशा दोन्ही खुर्च्यांत स्वतःचा मुखवटा पाहणारा व चोवीस तास बातम्या देणारा, प्रसंगी बातम्या तयार करणारा, वृत्तवाहिन्यांचा एकमेकांबरोबर प्रचंड स्पर्धात्मक तणावात वावरणारा संपादक व वार्ताहरांचा नवा मीडिया वर्ग - अशा सर्वांचे हितसंबंधी जाळे आज तयार झाले आहे. या जाळ्याच्या माध्यमातून शासनाची कोंडी करून (प्रसंगी, स्वेच्छेने बाजूला होणाऱ्या शासनाला) हद्दपार करून नव्या भांडवली लोकशाही अर्थव्यवस्थेत चळवळींचे, विचारांचे, वेध, बोध आणि जागर संमेलनांचे छोटे व मोठे कंत्राटदार निर्माण झाले आहेत. अशा कंत्राटदारांची आत्मकथने आणि समाजाच्या अन्य दैनंदिन कामकाजात जागोजाग घुसलेल्या रस्त्यापासून गोल वसूल करण्यापर्यंत व ब्रिज बांधण्यापासून बीजसंवर्धन करण्यापर्यंत कामाचे जाळे विणलेल्या कंत्राटदारांचे आत्मकथन गुणात्मकदृष्ट्या फारसे वेगळे नसावे. एका ठिकाणी काही कोटींची तर दुसऱ्या ठिकाणी काही हजार कोटींची उलाढाल असा संख्यात्मक फरक सोडल्यास पटावरील बरीचशी प्यादी सारखीच दिसतात.....

अलीकडे मराठवाड्यातील प्रसिद्ध पर्यावरण-कार्यकर्ते व लेखक अतुल देऊळगावकर यांच्याशी बोलताना त्यांनी मराठवाड्यातील तालुक्या-तालुक्यात सुळसुळाट झालेला, मुंबई किंवा दिल्ली अशा मेट्रो शहरांत मुख्य कार्यालये असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी पगारी (किंवा परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह असे तद्दन मार्केटिंग कंपन्यांचे गणित वापरून) शिक्षण/पाणी/सफाई/वैद्यकीय 'सत्याग्रही', सहयोगिनी साथी नेमून (जशी गावोगाव औषधी कंपन्या/खत कंपन्या किंवा चहा कॉफी, बिस्किट कंपन्या आपले विक्रेते नेमून आपापली मालाची बंडले विकतात तशी) आपापल्या क्षेत्रात करावयाची कामे (जे मुख्यतः शासकीय/परदेशी पैशातून निर्माण झालेले कार्यक्रम असतात) कंत्राटी पद्धतीने करवून घेतात. त्यांचे रिपोर्ट्स व्यावसायिक पी. आर. कंपन्या लिहून देतात, व ते सुळसुळीत किंवा गुळगुळीत कागदांवर छापून जगभर वितरित केले जातात. [ते रिपोर्ट्स म्हणजे आपण मिळवलेल्या अमाप पैशाच्या पापक्षालनाचे तीर्थ व प्रसाद आहेत असे मानून बलाढ्या कॉर्पोरेट्स वा संबंधित व्यक्ती आणखी पैसे उधळतात व आपापल्या कामात पुन्हा मग्न होतात.]

अशा कामातून 'सुप्त विरोधशक्ती वा इच्छा' आपोआपच स्वीकारार्ह स्वरूपात किंवा स्लावेज झायझेक म्हणतात त्याप्रमाणे 'Resistance is Surrender' अशा स्वरूपात बदलल्या जातात. (झिझेक यांचे मूळ विधान व लेख बराच स्फोटक व वादग्रस्त आहे, येथे फक्त विधानापुरताच अर्थ घ्यावा.) या पराभवाच्याच विरोधाचा राजकीय, विशेषतः राजकीय इतिहासाच्या पार्श्वभूमीवर व तात्त्विक चिंतनाच्या आधारे विचार करण्याची आज गरज आहे.

गेल्या तीस एक वर्षांत बरेच काही वाहून गेले आहे. 'संकल्प' ज्या वेळी प्रसिद्ध झाले त्या वेळी जनता पार्टीचा सर्कस तंबू गुंडाळला गेला होता व इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या. मात्र लोकांनी डाव्या-उजव्यांची हातात हात घालून केलेली सर्कस व विशेषतः त्यांचे ट्रॅपिजचे प्रयोग पाहिले होते. कोण कोणत्या हिंदोळ्यावर कुणाबरोबर लटकते आहे, कोण कुणाला मध्येच सोडून देत आहे व कोण कुणाच्या आधाराने नवी उडी घेत आहे याचे ताळतंत्र लोकांना समजत होतेही व नव्हतेही. पाठोपाठ खलिस्तान, इंदिरा हत्या, राजीव उदय व अस्त आणि त्यानंतर उगवलेली मुक्त अर्थव्यवस्थेची पहाट, त्याआधी पडलेली बर्लिनची भिंत, हंगेरी व पूर्व युरोपमधली वेल्वेट क्रांती, गोर्बाचेव्हचे ग्लासनोस्त, पेरेस्त्रोईका, इराक-कुवेत युद्ध, अशा साऱ्या जगाला नवनव्या वळणांवर व टप्प्यांवर पोचवणाऱ्या घटनांची साखळीच उलगडत जात होती. कधी नव्हे इतक्या वेगाने जगात बदल होत होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कक्षेत साऱ्या विश्वाचे गणित आल्यासारखे, आणि संपर्क व माहिती क्षेत्रातील हनुमान-उडीमुळे समाजाच्या प्रत्येक थरामध्ये व स्तरामध्ये बदल घडणे अपेक्षित होते. 'संकल्प'च्या पिढीला आमूलाग्र बदलवून, क्वचित मोडीत काढून, किंवा एका अतिपरिणामकारक मेटॅमॉर्फोसिसच्या प्रक्रियेत टाकून........या नव्या जगाने घुसळून काढले आहे. जे सत्य मानले व ज्या वाटेवर विठ्ठल भेटेल म्हणून चाललो, ती वाट वाट नव्हती, उलट जे जे त्याज्य मानले, तेच व तेवढेच सत्य आहे की काय अशा तात्त्विक, आयडिऑलॉजिकल, आणि प्रसंगी धार्मिकदेखील गोंधळाच्या वादळात 'संकल्प' पिढीचे तारू अडकले व भरकटलेही.

नव्वदीनंतर भारतीय अलिप्ततावाद जागतिक स्तरावर कालबाह्य ठरला होता, 'अमेरिका' हा शब्द जो गेली अनेक दशके डाव्या व उजव्या दोघांनाही अप्रुपाचा, प्रेम व द्वेष अशा आकर्षणाचा वाटत होता, तो 'अमेरिका' - आणि तेथील स्वतंत्र, स्वैर, मुक्त, आणि 'ओपन' वातावरणाचे वारे येथील तरुणांनी नव्हे तर आबालवृद्धांनी दीर्घ श्वसनाचे प्राणायाम धडे गिरवावेत तसे श्वासातून नसांनसांमध्ये ओढून घेतले......या श्वासाबरोबर आत आले ते जागतिकीकरणाचे अत्यंत शक्तिमान असे वादळ........ साऱ्या जगाचे सद्यःस्थितीचे स्वरूप व येणाऱ्या भविष्याचे बीजारोपण पर्यावरणाच्या राजकीय भूमिकेत दडले आहे, ......

स्वयंसेवी संस्था - मग ती कोणत्याही क्षेत्रात काम करणारी का असेना, जागतिकीकरणाने तिची प्राधान्ये, आवाका आणि क्षेत्र बदलले; विस्तारले. जागतिकीकरणाचे मुख्य माध्यम म्हणजे माहिती-महाजालाचे व स्वप्नवत वाटणाऱ्या संपर्क-यंत्रणेचे आणि नवनव्या जैव आणि मानवी आयुष्याची गुणवत्ता व काळ वाढवणारे, तसेच जीवनाच्या सर्व क्षेत्रांत पायाभूत बदल करणारे तंत्रज्ञान...... . मुख्य म्हणजे एका क्लिकसरशी जगाच्या एका टोकाकडील भांडवल जगाच्या दुसऱ्या टोकाकडे फिरवता व गुंतवता येऊ लागले. या गुंतवणुकीच्या अजब शक्यतेने मार्केटची अगोदरच पोसलेली ताकद हजार हत्तींच्या बळासारखी विस्तारली. फिक्शन फिक्शनच राहिले नाही, एका नव्या REAL ची, 'व्हर्च्युअल रिअल'ची निर्मिती झाली......

मॉनिटॅरिझम कशासाठी! गुंतवणूक आणि स्टॉक मार्केटचे महत्त्व का व कसे वाढते आहे? औद्योगिक उत्पादनापेक्षा (जे पाश्चात्त्य देशांतून कमी कमी होताना, व आपल्याकडेही फारसे वाढताना दिसत नाही) स्टॉक्स का महत्त्वाचे? मुख्य म्हणजे, उत्पादनाशिवाय नफा मिळतो तरी कसा? अशा नफ्याचे अतिरिक्त मूल्य कसे वाढते? स्पेक्युलेशन आणि बाजारभावांचे अंदाज येतात कुठून? कोण त्यांचे नियमन करते? प्रगत आणि नव्याने प्रगत होऊ पाहणाऱ्या समाजामध्ये जमीन आणि स्टॉक्स अशा दोन घटकांचे एवढे अमर्याद स्पेक्युलेशन - आडाखे आणि आराखडे का वाढत आहेत? राजकीय स्वातंत्र्याबरोबर मार्कटचे स्वातंत्र्य अशी नवी मागणी का पुढे येत आहे? अशासारखे अनेक प्रश्न या पुस्तकाच्या निमित्ताने पुढे आले. अरिघी यांच्या पुस्तकात, किंवा Ernest Mandel यांच्या 'लेट कॅपिटॅलिझम' या पुस्तकात आणि जेमसन यांच्या 'द कल्चरल टर्न' या पुस्तकात मुक्त अर्थव्यवस्थेत मुक्त झालेल्या व नव्या नव्या स्टॉक्सच्या शोधात भटकणाऱ्या आणि उत्पादनविरहित, उद्योगरहित - केवळ अनुमान, आडाखे व स्पेक्युलेशनच्या जोरावर, एखाद्या जादूच्या खेळासारखे भासणारे, वाढणारे, साठत जाणारे ' फायनान्स कॅपिटल', भांडवली अर्थव्यवस्थेचा सर्वात शेवटचा (Highest Stage) टप्पा मानले गेले आहे. [अशा अवस्थेत लोकशाही व्यवस्थेत खच्चीकरण होऊन साऱ्या समाजाचेच व्यापारीकरण ... होते या संदर्भात रॉबिन ब्लॅकबर्न व अळां बडू यांचे लेखन निश्चितच वाचनीय आहे.]

भांडवली अर्थव्यवस्थेत ही सर्वश्रेष्ठ पायरी गुंतागुंतीची तर आहेच, परंतु यापूर्वी आपण अनुभवलेल्या व्यवस्थेपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. इथे कोणा एका वर्गाच्या वा बहुराष्ट्रीय कंपनीच्या किंवा त्यांच्या समुच्चयाच्या हातात दोऱ्या नाहीत. फासे आहेत, परंतु कोणते दान पडायचे ते ठरवणारे शकुनीचे हात नाहीत. एखाद्या रोगाच्या साथीचे अनेक रोगांच्या साथीमध्ये रूपांतर व्हावे, किंवा प्राणवायूच्या शोधात भटकणाऱ्या वडवानलाने एकामागोमाग एक अरण्ये, शहरे खाक करावीत, सायक्लोनसारखे प्रदेश गिळंकृत करावेत तशी, नवनव्या मार्केट्सच्या शोधात ही व्यवस्था अस्वस्थ आत्म्यासारखी हवी तशी भटकते. इथल्या परस्परविरोध शक्तींचे मॉडेल पूर्वीच्या सर्व आडाख्यांपेक्षा वेगळे व अधिक दहशतीचे आहे. या व्यवस्थेत एखादा जेता अचानक पराभूत होतो, व पराभूत अचानक जेता बनतो. त्यामुळे किंवा सामान्य माणसाच्या राजकीय सुप्त इच्छारूपाचे सर्वंकष दमन झाल्यामुळे, लिबिडनल ऊर्जेच्या स्फोटात मानवी इतिहासाच्या संस्कृतीकरणाची हजारो वर्षे सहज जळून जाऊन एका प्राचीन विध्वंसक, हिंसक आणि युद्धखोर समाजाकडे वेगाने आपली वाटचाल होते आहे, असे इशारे विचारवंत देऊ लागले आहेत. ....... थोडक्यात काय तर 'संकल्प' पिढीच्या कल्पनेबाहेरील आव्हाने आजच्या तरुण समाजासमोर उभी आहेत.

नव्या समाजाच्या प्रश्नांचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे 'स्किझोफ्रेनिया'. दलझ, देरिदा, ग्वातारी यांच्यापासून ल्योतार, बोद्रियार, जेमसन, लाकाँ, झिझेक अशा अनेक विचारवंतांनी या संदर्भात वारंवार लिहिले आहे. हा स्किझोफ्रेनिया - वैद्यकीय किंवा मानसशास्त्रीय विश्लेषणात, मानसिक आजार म्हणून ज्या अर्थाने येतो त्या अर्थाने या शब्दाचा वापर मात्र केला जात नाही. एका अर्थाने दुभंगलेले व्यक्तिमत्त्व, विक्षिप्त आणि विचित्र एकटेपणा हा जरी अर्थ अभिप्रेत असला तरीही या संकल्पनेचा विस्तार मुख्यतः लाकाँ यांच्या मांडणीवर आधारित करण्यात आला आहे. पॅरानोइया - किंवा संशयपिशाच्च अशी एक मानसिक अवस्था फ्रॉईडिअन मानसशास्त्रामध्ये आढळते. ही अवस्था म्हणजे, व्यक्तीला त्याच्या भवतीचे जग त्याच्या विरुद्ध काही कट-कारस्थान करत आहे असा भास सातत्याने होत राहतो, व त्या दडपणाखाली एका विशिष्ट प्रकारच्या भीतीचा उगम होऊन ती व्यक्ती सतत घाबरून गेल्यासारखी वागते. अवतीभवतीची प्रत्येक व्यक्ती आपल्याला छळणार, त्रास देणार असे वाटून ती विक्षिप्त वाटू लागते. स्वतःला (इगो अवस्था) निर्माण करण्याच्या प्रक्रियेत अडथळे आल्याने 'स्व'वरचा विश्वास उडाल्यामुळे अशी विकृती जन्माला येते असे लाकाँ याचे प्रतिपादन आहे - आणि या संशयपिशाच्चातून, 'स्व'च्या ढासळत्या मूल्यातून भंग पावलेली व्यक्ती मग केवळ एक व्यक्ती न राहता अशा विकृत, दुभंगलेल्या आणि सतत भवताल व सर्व नात्यागोत्याबद्दल अविश्वास असणाऱ्या, 'मी' आणि 'स्व'त्व गमावलेल्या, असुरक्षित, घाबरलेल्या समाजाचे आज आपण घटक आहोत. इतका भेदरून गेलेला आणि विघटित झालेला समाज 'संकल्प' मनोगतांच्या काळात नव्हता. परंतु अशा समाजाची निर्मिती-बीजे पडावयास, अंकुरण्यास सुरवात झाली होती याचे स्पष्ट दर्शन विश्वास काकडे यांच्या आत्मनिवेदनात आणि कुमार केतकर यांच्या सामाजिक भाष्यात पाहायला मिळते.

अशा 'स्व'चे स्खलन किंवा पतन झालेल्या, वीर्यपतनानंतर क्षीण झालेल्या लिंगासारख्या, आणि स्वतःतील ऊर्जेचा अभाव जाणवून 'थंड' झालेल्या समाजाला कशाचेच काहीही वाटेनासे होते. जेमसन यांची सुप्रसिद्ध रचना वापरायची झाल्यास ते या अवस्थेला 'Waning of the affect' असे म्हणतात - भावनेचा क्षय, नातेसंबंध, प्रेम, राग, द्वेष अशा साऱ्याच भावना या अवस्थेत नष्ट होऊ लागतात. शब्द गुळगुळीत होतात. आजच्या काळात पाठवल्या जाणाऱ्या जवळपास प्रत्येक एस. एम. एस. मध्ये 'love', 'kisses', 'hugs', 'touched', 'moved' असे शब्द त्यांच्या 'ऐतिहासिक' अर्थाशिवाय, कोरडे, सपाट, निचरा झालेल्या चिपाडासारखे, एका भल्यामोठ्या उसाच्या रसाच्या यंत्रातून बाहेर पडणाऱ्या भुसा झालेल्या खोडासारखे भसाभसा बाहेर पडतात. ते उच्चारणाऱ्याला वा ऐकणाऱ्याला त्यांचे काहीच वाटेनासे होते. नव्या पिढीतील बहुविध (Multiple) नातेसंबंध, वाढलेले one night stands एका रात्रीपुरता समागम, सहज फ्लर्टिंग ..........., 'फ्लिंग्ज', असा व्यक्तिगत जीवनातला भावनिक, लैंगिक व बांधिलकीचा दोर सध्या दिवसेंदिवस सैल होत आहे. या सर्व भावनांचे व्यावसायिक व 'कमर्शियल' क्रय वस्तू रूपांतर करण्यासाठी एका बाजूला मदर्स, फादर्स, ब्रदर्स, फ़्रेंड्स अशा सगळ्या नात्यांचे 'डे' साजरे करण्यासाठी व त्याकरता खरेदी-विक्री होण्यासाठी एका स्वतंत्र मार्केटची निर्मिती सद्य भांडवली अर्थव्यवस्थेने केकवरील 'आयसिंग'सारखी मांडली आहे. प्रेम व्यक्त करायचे तर शॉपिंग करा, कंटाळा घालवायचा तर शॉपिंग करा - Shop till you drop अशा घोषणांतून, लैंगिक सुखापासून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आध्यात्मिक भोंगळापर्यंत आणि रामदेव बाबाच्या योगसाधनेपासून डॉ. केगलच्या एक्सरसाईजपर्यंत माणसातील माणूस नष्ट करण्याची, त्याला भूतकाळापासून वेगळे काढण्याच, त्यामुळे भविष्याची कल्पना करण्याची संवेदना नष्ट करण्याची, किंवा सतत वर्तमानातच ठेवण्याची योजना सद्य व्यवस्थेच्या, भांडवलाच्या शेवटच्या अतिप्रगत टप्प्यात आखण्यात आली आहे.

कशाचेच काही न वाटणे ही सर्वात भीषण बाब आहे. मानवी इतिहासात माणसाचे एवढे नीच पतन कधीही झाले नसावे. या फॅशनेबल अलिप्ततेचे (modish detachment) आणि उपरोधिक विडंबनाचे आविष्कार समकालीन (उत्तर-आधुनिक?!) साहित्य व कलांमध्ये आपल्याला वारंवार भेटत राहतात. नव्वदीच्या सुरुवातीला प्रभू देवा याचे 'ब्रेक डान्स'वर केलेले गमतीशीर गाणे मला आठवते. (ब्रेक डान्सविषयी नृत्य आणि संगीत क्षेत्रातील जाणकारांनी उत्तर-आधुनिक आविष्कार म्हणून केलेली टिपणे निश्चित महत्त्वाची आहेत, व आपण पाहत असलेल्या दुभंगी समाजाच्या आविष्काराचे दर्शन होण्यास उपयुक्त आहेत.) ते गाणे असे होते:
“उर्वशी, उर्वशी… टेक इट इझी उर्वशी -
उंगली जैसी दुबली है।
नही चाहिये फार्मसी
जीत का मंत्र है, टेक इट इझी पॉलिसी,
चार दिन की चांदनी, ये जवानी फॅन्टसी
,
उर्वशी … टेक इट इझी उर्वशी.”

विरोध तर बाजूला राहिला, परंतु, 'ठेविले अनंते तैसेची रहावे' किंवा काहीही झाले तरी Take it easy, प्रतिक्रिया नको. प्रतिसाद नको. रवांडातले मुडदेफरास असोत वा इराकमधील रोज मरणारी शेकडो माणसे असतो, बोस्निया, चेचेन्या, अफगाणिस्तान असो, किंवा आपल्या घराच्या शेजारील वाढणाऱ्या झोपडपट्टीतील नरकयातना असोत, गिरण्या पाडून उभे राहणारे मॉल्स असोत, शेतकऱ्यांच्या हजारोंनी झालेल्या आत्महत्या असोत, काहीही घडो; परंतु मातीच्या थंड गोळ्यासारखा पहुडलेला हा समाज ढिम्म हलण्याचे नाव घेत नाही.

आणि, मुख्य म्हणजे हाच ढिम्म, निराकार, निर्गुण, गुळगुळीतपणा समकालीन वा उत्तर-आधुनिक (पाश्चात्त्य उत्तर-आधुनिकतेची सुरुवात आपल्या बरीच आधी, म्हणजे साठीच्या शेवटच्या वर्षात व सत्तरीच्या दशकात झाली. आज तिची अवस्था 'सिम्युलाक्रा' किंवा 'कॉपीज', 'छबी'च्या स्वरूपात उरली आहे, असे माझे मत आहे. म्हणून मी समकालीन असा शब्द योजला आहे.) कला-साहित्याचा गाभा बनला आहे. मकरंद साठे यांची 'अच्युत आठवले...', 'ऑपरेशन यमू' किंवा हेमंत दिवटे यांचे 'थांबताच येत नाही' किंवा अशा अनेक मराठी लेखक-कवींच्या साहित्यातून वारंवार जाणवणारी फॅशनेबल संन्यस्तवृत्ती - डिटॅचमेंट (तीस वर्षांपूर्वी 'संकल्प'च्या प्रस्तावनेत मी भारतीय संन्यस्तवृत्तीचा उल्लेख केला होताच Stare ) आणि रेडीमेड, अॅज इज व्हेअर इज, सरळ जसे दिसते तसा अनुभवाचा पडताळा मांडण्याची शैली (मार्सेल द्युशाँने कलेमध्ये ...... जवळपास ९० वर्षांपूर्वी त्याने केलेल्या प्रयोगाने कलाविश्वाला हादरा दिला होता. आज रेडीमेडचा स्फोट ओळखीचा झाल्याने, अंगवळणी पडल्याने कोणताच धक्का जाणवत नाही.), उपरोध, व्यंग, उपहास आणि एका BLANK आभासाची (pastiche) मांडणी, या सर्व बाबी नव कलाविष्काराच्या रचनेची लक्षणे आहेत. एका अर्थी विसाव्या शतकातील आधुनिकतेच्या निर्मितीचे, आणि आता मृत झाल्यामुळे वाढलेले वजन एखाद्या दुःस्वप्नासारखे ..... अशा समकालीन तरुण लेखक-लेखिका, कलावंत, मंडळींच्या डोक्यावर नाचत असेल काय? पोथीनिष्ठ डावे (जेमसन यांच्या भाषेत Vulgar Marxist) अशा समकालीन कलावंताची समीक्षा करताना बदलल्या काळाचे, दुभंगलेल्या निष्क्रिय व कोणतीच भावभावना न उरलेल्या समाजाचे, भांडवली अर्थव्यवस्थेतल्या 'मनी कॅपिटल मनी' (MCM) या फॉर्म्युल्याने आलेल्या आडाखी अर्थरचनेचे पैलू व पदर लक्षात न घेता नुसतीच टीका करतात हे योग्य नाही. 'संकल्प' पिढीतील तरुणांना (मग ते कार्यकर्ते असोत वा चित्रकार, कवी वा पत्रकार) आधुनिकतेचे प्रेत व त्याचे सतत वाढणारे ओझे अंगावर नव्हते, तर ते सर्वच जण आधुनिकतेच्या नव्या गॅलक्सीमधील ताऱ्यांचे तेज पिऊन मोठे झाले होते. आजच्या कार्यकर्त्यांची अवस्था दुभंगलेली, 'स्व' क्षीण झाल्याची, म्हणजेच संदर्भ विसरलेल्या 'इड'मधील तळघरात दडलेल्या ऐतिहासिक राजकीय सुप्त इच्छारूपाचा ऐवज हरवलेली, म्हणून खरे तर केविलवाणी आहे.

प्रतिक्रिया किंवा खरे तर प्रतिसाद हरवलेल्या या समाजात कलानिर्मितीचा निखळ आनंद घेणे ही आज दुरापास्त गोष्ट झाली आहे. कारण व्यापार (कॉमर्स आणि बिझनेस) आणि 'फायनान्स कॅपिटल' यांच्या कठोर, क्वचित निर्दयी निकषांवर निर्माण होणाऱ्या कलेचे भवितव्य आज अवलंबून असते. माणूस .... दोन पायांचे 'कॉस्ट सेंटर' आहे, या जनावराकडून सतत 'परफॉर्मन्स' घडवायचा आहे, कारण त्यातून नफा निर्माण करायचा आहे - अशी भावना असल्याने, माणसाचा व तो करत असलेल्या कार्याचा, मग कला असो व परिवर्तनाचे स्वयंसेवी काम असो, किती फायदा किती तोटा हे गणित मांडून कामाकडे आज पाहिले जाते. ...... 'द इकॉनॉमिस्ट' या साप्ताहिकाच्या प्रमुख कलासमीक्षक सारा थॉर्नटन यांचे अलीकडे प्रसिद्ध झालेले ' सेवन डेज इन द आर्ट वर्ल्ड' नावाचे पुस्तक सध्या बरेच गाजते आहे. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात, 'माझ्या संशोधनानुसार महान कलाकृती सहज घडत नाहीत. त्या घडवल्या जातात. केवळ कलावंत आणि त्यांचे सहकारी एवढेच या 'घडवण्या'च्या प्रक्रियेत पुरेसे नाहीत, तर विक्रेते, दलाल, गॅलरी, क्युरेटर्स, समीक्षक, आणि कलासंग्राहक किंवा खरेदीदार असे सर्वच कलाकृतीला 'महान' ठरवण्याच्या क्रियेत सहभागी असतात. किंबहुना या सर्वांच्या आपापल्या 'हातभारा'शिवाय महान कलाकृती निर्माण होणे अशक्यच.' जे कलेचे तेच सामाजिक कामाचे. एक विशिष्ट कंपू ज्याचा उल्लेख मी चवथ्या भागात केला होता, तो परस्पर हितसंबंध व विशेषतः मार्केट हितसंबंधांच्या विणलेल्या चलाख आराखड्यातून कोणते काम व कोणता कार्यकर्ता महत्त्वाचा, महान किंवा उपयुक्त म्हणून बक्षीसपात्र ठरवतो. मग ते 'प्रमोट' करतो आणि त्याच्याशी निगडित राहून आपापले हित रक्षण करतो.

स्वाभाविकच अशा काळात जेथे सारा समाज एकीकडे दुभंगलेल्या स्किझोसारखा, व संशयाने पछाडलेल्या एकाकी माणसासारखा आहे, आणि दुसरीकडे त्याच्याकडून सतत मार्केट फोर्सेसची कात्री लावून किंवा ढोसण्या लावून, केवळ परफॉर्मन्स व तोही नफा देणारा अपेक्षित आहे, जिथे साऱ्या समाजाचेच डोळे थिजलेले आहेत आणि शरीर थंड पडले आहे, तेथे नवनवोन्मेषशाली प्रयत्नांची बाग फुलवायची कशी, हा खरा प्रश्न आहे.

'संकल्प'मधील निवेदनांच्या काळात जगाची स्पष्ट विभागणी झाली होती, मनाच्या गाभ्यात दडलेल्या अस्फुट आणि सुप्त राजकीय आकांक्षा व इच्छांना स्पर्श झाल्यावर फूत्कारत बाहेर पडणाऱ्या नागाप्रमाणे माणसे आणि सारा समाज रस्त्यावर उतरत होता. शब्दांना अर्थ आणि म्हणून धार होती, डोळे बोलत होते, स्पर्शाला भाषा होती. आज अशा भाषेचा अंगार वा वर्षाव झडून गेलेल्या निष्पर्ण वृक्षासारखा क्षीण आणि विझलेला आहे. भाषा आणि तिचे आविष्कार तुरुंगात खितपत पडल्यासारखे दीनवाणे झाले आहेत. भाषेला 'प्रोफेशनल' करण्यामध्ये 'बडवलेल्या बैलासारखे नि:सत्त्व जीवन तिच्या वाट्याला आले आहे. भाषा बंद आणि कोंदट, कॉर्पोरेट ग्लास हाऊसच्या बलाढ्य एअर कंडिशनरमध्ये फिरणाऱ्या पुनःपुन्हा फिरणाऱ्या थंड आणि मृत हवेच्या निष्प्राण झोतासारखी आज वावरताना दिसते. कार्ल मार्क्स म्हणतात, 'भाषा हीच संस्कृती असते.' म्हणजे आज आपल्या सांस्कृतिक जीवनाची काय अवस्था असेल ते वेगळे सांगायला नको.

आपल्या सांप्रत सामाजिक आणि म्हणून राजकीय स्थितीचा सर्वात भयप्रद पैलू, आणि जो तीस वर्षांपूर्वी निदान आपल्याला दृग्गोचर झाला नव्हता, आणि ज्याबद्दल ८० च्या दशकात जेमसनपासून फुकूयामापर्यंत अनेकांनी बजावले, तो म्हणजे इतिहासाचा अस्त.

इतिहास म्हणजे काय? आणि इतिहासवाद (Historicism) किंवा इतिहासप्रणाली म्हणजे काय? ...... वॉल्टर बेंजामिन म्हणतात, 'इतिहासाचा विचार भूतकाळ असा करणे, किंवा भूतकाळापासून वर्तमानापर्यंतच्या प्रवासाच्या टप्प्याचे वर्णन, सनावळ्या किंवा प्रसंग म्हणजे इतिहास नव्हे.' त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इतिहास हा एकसंध नसतोच; तो तुकड्या-तुकड्यांनी बनलेला, वर्तमानाच्या भिंगातून गाळला गेलेला, आणि समकालीन व्यवस्थेतही अस्तित्वात असणारा प्रवाहाचा एक तुकडा असतो. इतिहासाचे आकलन (त्यामुळे) एका भूतकालीन क्षणापासून दुसऱ्या क्षणापर्यंत घडलेल्या घटनांचे कथन केल्याने होणार नाही; तर ते आकलन सत्तासंघर्षाच्या, पिळवणुकीच्या, मानवी युद्धांच्या आणि सतत झालेल्या घर्षणाच्या तुकड्यातुकड्यांच्या असंबद्ध रचनेच्या काळाचा सातत्यपूर्ण अभ्यास केल्यानेच होऊ शकते. म्हणजेच वर्तमान ही अशी काळाची ताणलेली तार आहे, जी एका बाजूला भूतकाळात दडलेल्या संघर्षातून निर्माण झालेल्या शक्तींनी ताणली आहे, आणि दुसऱ्या बाजूला भविष्यात अपेक्षित असणाऱ्या घटनांच्या तणावांनी आणि लढायांनी भारली आहे - अर्थातच त्यामुळे ज्याला इतिहास समजतो तो भविष्याचा वेध अधिक सजगपणे व अचूक घेऊ शकतो. किंबहुना भविष्य हे वर्तमानापेक्षा इतिहासाच्या ताणतणावावरच अधिक अवलंबून असते.
......

....... इतिहास वर्तमानाच्या प्रत्येक उद्गारात दडून आहे, अव्यक्त आहे. ....... थोडक्यात काय तर इतिहासाच्या जाणिवेचा ठसा किंवा चरा जर आपल्या जीनोमवर उमटला नसेल तर एका अर्धमानव किंवा दुर्बल आणि हताश - किंवा वर्तमानाच्या अपुऱ्या, कोंदट आणि अंधाऱ्या कोठडीत बंदिवान झालेल्या माणसाचे जीवन नशिबी येईल. भीती आहे ती इतिहास नसण्याची.

भूतकाळ पचवण्याची, इतिहास वागवण्याची, आणि इतिहास जगण्याची मानवी क्षमता दिवसेंदिवस कमी कमी होताना जाणवते. ग्राहक भांडवली व्यवस्था (Consumer Capitalism) किंवा 'लेट' - सद्य अर्थव्यवस्थेच्या रगाड्यामध्ये माणसाला फक्त आणि फक्त, सततचा वर्तमानच जगण्याची सक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. असा माणूस भविष्याचा वेध तर सोडाच, पण उद्यासाठीही जगायला दिवसेंदिवस असमर्थ ठरण्याची शक्यता असते. ज्याला केवळ वर्तमानच आहे तो कसल्या चळवळी उभारणार? कसल्या कला विकसित करणार? उद्याचे कोणते गाणे आज म्हणणार?

१९६४ च्या सुमारास ...... तत्त्वचिंतक आणि 'द नेशन'मध्ये कलासमीक्षा लिहिणारे ज्येष्ठ अभ्यासक आर्थर सी डांटो यांनी त्यांचा गाजलेला 'कलेचा अंत' (The End of Art) हा निबंध लिहिला होता. 'यापुढे कला नाही, ती संपली.' .....

जेमसन यांनी हा मुद्दा विशद करताना एका नव्याच मुद्द्याची स्थापना केली आहे. [आणि नवे सामाजिक वास्तव समजून घेण्यासाठी आपण नवकलेच्या (समकालीन कला) वाटेवरून प्रवास केला तर योग्य दिशादर्शन होईल असा माझा विश्वास असल्याने, मी पुनःपुन्हा माझ्या मांडणीच्या ओघात कलेच्या ऐतिहासिक आकलनाचा परामर्श घेत घेत पुढे जातो आहे.] जेमसन यांच्या म्हणण्याप्रमाणे समकालीन किंवा उत्तर-आधुनिक (आपल्याकडे उत्तर-आधुनिकतेचा जन्म अलीकडचा आहे, जागतिकीकरणानंतर तो वाढला व आता तर उत्तर-उत्तर-आधुनिक काल सुरू आहे. म्हणून समकालीन हा शब्दच बरा.) कला, मीमांसा (समाजकारण किंवा राजकारण) सपाट आहे. तिला खोली नाही (depthlessness). म्हणजे याचा अर्थ कृपया समकालीन कला उथळ आहे असा कोणी काढू नये. ऑस्कर वाईल्डला जो उथळपणा अभिप्रेत आहे (Shallowness is Supreme Vice) तो उथळपणा इथे अभिप्रेत नाही. जेमसन यांचे 'सपाटले'पण (एका अर्थाने) त्यांच्या 'राजकीय सुप्त इच्छास्वरूपा'शी निगडित आहे. ...... एका दुसऱ्या अर्थाने असा कला (वा राजकीय कृतीचा) आविष्कार की ज्याला इतिहासाचे संदर्भच नाहीत. त्यामुळे तो कलाकार किंवा तो पाहणारा प्रेक्षक (वाचक, श्रोता, संग्राहक) या दोहोंवर कोणताच परिणाम होत नाही. त्यांच्यात कोणताच भाषाव्यवहार होऊ शकत नाही. (Text disappears) - भाषा अदृश्य होते. अनाकलनीय नव्हे, फक्त संवादाच्या सीमेवरच ती थबकते.

उदाहरणार्थ, व्हॅन गॉफचे बूट (A pair of boots, 1886) हे चित्र आणि वॉरहॉलचे 'हिऱ्याचा चुरा पसरलेले बूट' (diamond dust shoe) हे सिल्क स्क्रीन प्रिन्ट.

व्हॅन गॉफचे बूट एका पिळलेल्या, गरीब समाजाच्या इतिहासाची कहाणी घेऊन समोर येतात. त्या चित्रात असलेले खोलीचे खेळ, शेड्स किंवा रंगथरांच्या फटकाऱ्यांमधून साकारलेले अवकाश, आणि काळाचा एक विलक्षण दुखरा क्षण पकडण्यात चित्रकाराला आलेले यश, या सर्वातून एक दीर्घ कथानक किंवा एका काळाचे कथन प्रगटते. .....

कितीतरी संदर्भ, जगलेल्या किंवा मेलेल्या इच्छा, दबलेल्या आकांक्षांचे अवकाश या दोन जीर्ण, फाटक्या, आणि सडून गेलेल्या बुटांच्या जोडीतून आपल्या समोर येते. आपण आपला इतिहास त्या बुटांच्या इतिहासातील क्षणांशी जोडून आजच्या वर्तमानात त्यांच्याशी बोलू लागतो. त्या बुटांच्या जोडीवरून मायेने हात फिरवण्याची इच्छा होते आपल्याला.

परंतु वॉरहॉलचे फॅशनेबल, उच्चभ्रू, आणि समाजाच्या उच्च वर्गातील ललनेचे जोडे, ज्यावर हिऱ्याचे चूर्ण उधळले आहे, ज्याचा रंग सोन्यासारखा लखलखता आहे, एखाद्या भल्याथोरल्या होर्डिंगवर पसरलेल्या, कशाशीच संबंध नसलेला, जिचा नग्नपणादेखील नग्न वाटू नये अशा जाहिरातीतील मॉडेलसारखे, हे बूट आपल्या 'गेझ' (gaze) मध्ये, आपल्या दृष्टीच्या आवाक्यात येऊनही आपण त्यांना ओळखूच शकत नाही. एक थंड प्रतिसाद, नव्हे एक पोकळ, शून्यातली नजर एवढाच आणि एवढाच त्या कटाक्षाचा अर्थ राहतो. वॉरहॉलच्या 'प्रिन्ट'मधून एका स्किझो समाजाचे, एका भावना हरवलेल्या, अवकाश नसलेल्या, पोकळ, टेबलावर ठेवलेल्या मोकळ्या आणि मृत शिंपल्यासारख्या, कोरड्या, सपाट, आणि मृत सुप्त ज्वालामुखीच्या एकाकी तोंडासारख्या, तहान व भूक हरवलेल्या, बेभान व बेलगाम, बिनभरवशाच्या व बेजबाबदार समाजमनाचे भावचित्र प्रगट होते. जेमसन लिहितात, 'Andy Warhol's 'Diamond Dust Shoes' evidently no longer speaks to us with any of the immediacy of Van Gogh's footgear; indeed, I am tempted to say that it does not really speak to us as well… We are witnessing the emergence of a new kind of superficiality in the most literal sense, perhaps the supreme formal feature of all postmodernisms.'
जेमसन यांच्या मताशी मी सहमत जरी नसलो, तरी मला हा नवीन flatness कमीपणा वाटत नाही. केवळ एक लक्षण किंवा symptom म्हणून त्याकडे पाहायला हवे. फ्लॅटनेस हा दोष आहेच, परंतु तो त्या कलावंताचा नसून तो त्या आजारी समाजाचा आहे एवढे भान आपण ठेवले पाहिजे.

'संकल्प'मधील तरुणांच्या मनोगतामध्ये वारंवार दिसत होते ते व्हॅन गॉफचे बूट. ते बूट आता त्यांच्यापाशी नाहीत. माझ्या 'लाकूडतोड्याची गोष्ट' या कवितेत लाकूडतोड्याची जीन्स जशी हरवते, व त्याला जशी नवनव्या ब्रॅन्डची नवी कोरी 'जीन्स' मिळते, तसा काहीसा प्रकार सध्या कलावंत व सामाजिक कार्यकर्त्यांच्या जीवनात घडू पाहत आहे. म्हणून ही कविता जशीच्या तशी 'संकल्प'च्या नव्या आवृत्तीच्या शेवटी संदर्भ-टिपण म्हणून छापली आहे. ती जरूर वाचावी

-संजीव खांडेकर यांच्या उपरोक्त लेखाचा संक्षेप करण्याचा प्रयत्न.
-
- कामचालू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

अप्रतिम, आणि महत्वपूर्ण...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0