विषय (कादंबरीचा)

विषय (कादंबरीचा)

लेखक - अवधूत डोंगरे

रावीसाठी

विषय काय गोष्टीचा / कादंबरीचा, असं विचारतात लोक. उत्तर देता येत नाही. काही जण उगीच वेळ काढायला हा प्रश्न विचारतात हे कळतं. पण काही लोक प्रामाणिकपणंसुद्धा विचारतात, असं वाटतं. म्हणून उत्तराच्या नावाखाली कायतरी शब्द तोंडातून बाहेर पडतात.

पण लिहिताना, शब्द कायतरी पद्धतीनं नाहीत, तर मोजूनमापून बाहेर पडतात. त्यामुळं, ह्या कादंबरीचा विषय काय, या प्रश्नाचं उत्तर लिहून देण्याचा प्रयत्न करणंच माझ्यासारख्याला थोडं शक्य आहे. त्यातल्या त्यात.

एक अगदी खरं उत्तर सांगतो, ते असं: ह्या कादंबरीचा विषय असा नाही ओ थोडक्यात सांगता येणार.

विषय असा धडपणं कळला असता, सांगता आला असता, तर त्या विषयात डिग्रीच नसती काय घेतली. उच्च-अत्युच्च डिग्री. किंवा विषय बोर्डावर लावून त्यावर व्याख्यान नसतं का हाणलं. पण तसं जमत नसल्यामुळंच की काय विषय सांगायला सुरुवात केल्यावरसुद्धा काही गोष्टीच डोक्यात आल्या, त्या ह्या गोष्टी. यातूनच ह्या कादंबरीच्या विषयाचा काहीएक अंदाज येऊ शकतो.

एक

हे पाहा, एक मोठं हॉटेल आहे. ‘हॉटेल नाही म्हणत रे बावळटा ह्याला’. बरं बरं, हे एक मोठं रेस्टॉरंट आहे. ‘रेस्टॉरंटचा उच्चार रेस्तरां असा आहे रे भाड्या’. बरं बरं, हे महाराष्ट्रातल्या एका मोठेखानी शहरातलं रेस्तरां आहे. आता हे रेस्तरां-रेस्तरां असं करत राहिलं तर आपल्याला अरुण हेअर कटिंग सलूनमधले वस्तरा मारणारे लोक डोक्यात येतात, त्यामुळं अशा नाश्त्याचे पदार्थ विकणाऱ्या दुकानाला कोणी रेस्तरां म्हणण्याचा आग्रह केला, तरी आपल्याला त्याला हॉटेल असं म्हणणंच बरं वाटतं. तर हे असं पन्नासेक टेबलांचं हॉटेल आहे. तिथं विविध प्रकारचे पदार्थ मिळतात- दक्षिण भारतातले जास्त. शिवाय बटाटावडा, मिसळ, असंही आहे. चांगले, उत्तम, दर्जेदार, रुचकर पदार्थ. इथं खायला येणारे लोक एका वेळी तिथं आल्यावर दर डोई किमान दीडशे रुपये खर्च करतात, अशी सरासरी आपल्याला काढता येते. जास्तीत जास्त पाचशेच्या वर कितीही रुपये खर्च होऊ शकतात. म्हणूनच तर ह्या हॉटेलच्या रुचाई ह्या मुख्य नावासोबत तुमची जीभ, तुमचा खिसा, आमचे पदार्थ, या की, बसा अशी टॅगलाइन आहे.

आपण इथं आता ह्या हॉटेलबद्दल बोलत असतानाच आपल्याला हॉटेल-रेस्टॉरंट-रेस्तरां असे शब्द बदलण्याच्या ज्या सूचना आल्या, त्या श्रीयुत नेने यांच्याकडून आल्या. श्रीयुत नेने आणि श्रीमती नेने नॅनो नावाची छोटेखानी चारचाकी गाडी घेऊन रोज सकाळी साडेसात वाजता समोरच्या टेकडीजवळ जातात. गाडी गेटबाहेर पार्क करून टेकडीवर चालतात, मग परत घामेजलेल्या अवस्थेत गाडी घेऊन ह्या हॉटेलात येतात साडेआठ वाजता. इथं कधी इडली-सांबार, कधी चीझ-चिली डोसा, कधी कट डोसा, कधी आप्पे, असे पदार्थ खातात आणि दर डोई एक कप कॉफी पितात. आणि मग घरी जातात दहा वाजता.

तसेच ते दोघं आजही ह्या हॉटेलात बसून हिरव्या चटणीत बुडवून मस्त आप्पे खातायंत. शेजारच्या पंख्याचा वारा त्यांच्या अंगावरून नेहमीप्रमाणं फिरतोय. आपण ह्या हॉटेलबद्दल बोलत असताना, आत गेलेल्या नेने यांनी आपल्याला उच्चाराबद्दल जी सूचना केली, अगदी तशीच सूचना त्यांनी आत गेल्यावर त्यांच्या बायकोला केली. आपल्याच बायकोला ते भाड्या अशी शिवी घालत नाहीत, त्यामुळं शिवी सोडून त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं की, ‘इट्स नॉट पॅरिस, इट्स पारी, पारी.’ नेने यांचा मुलगा वर्षभरापूर्वी ऑस्ट्रियाला नोकरीवर गेला, तेव्हापासून नेने शब्दांच्या उच्चारांबाबत एकदम जागरूक झालेले आहेत. त्याचंपण खरंतर एक कारण आहे. नेने हे बाहेर बोलत नसले, तरी आपल्याला ते इथं नोंदवणं भाग आहे. मुलाला ऑस्ट्रियाला जायची ऑफर आली, तेव्हा त्यानं घरी त्याबद्दल सांगितलं. तेव्हा नेने यांनी उत्साहानं फोन करून आपल्या सगळ्या नातेवाइकांना सांगितलं की, ‘वरद ऑस्ट्रेलियाला जातोय बरं का. इतकं-इतकं पॅकेज आहे. तीन वर्षांसाठी,’ वगैरे. शिवाय फेसबुकवरही नेने यांनी पोस्ट टाकली, ‘माय सन... फ्लाइंग टू ऑस्ट्रेलिया..’ एवढं झाल्यावर त्यांच्या मुलानंच त्यांना सांगितलं की, तो ऑस्ट्रियाला चाललाय, ऑस्ट्रेलियाला नाही. यावर चपापलेले नेने नुसतं ओह् असं चीत्कारते झाले, आणि ऑस्ट्रिया नि ऑस्ट्रेलियातली गफलत फक्त स्पेलिंगमुळं असल्याचं त्यांनी फेकून दिलं. मग त्यांना ऑस्ट्रियाचं लक्षात आलं. हिटलरनं दुसऱ्या महायुद्धात पहिल्यांदा चढाई केली ती ऑस्ट्रियावर, हा संदर्भ त्यांना कुठंतरी सापडला, मग ‘ओह्, युरोप’ असं ते म्हणाले. यावर परत मुलगा म्हणाला, ‘इट्स नॉट युरोप, इट्स यूरप यूरप’.

तेव्हापासून नेने उच्चाराबद्दल आणि स्पेलिंगांबद्दल अतिशय जागरूक नि हळवे झालेले आहेत. नायतर सालं त्यांना इतक्या वर्षांच्या सर्व्हिसमधे असली समस्या समोर आली नव्हती. पण आता अलीकडं विविध शब्दांच्या उच्चारांवरून नेने नवराबायकोंचा नाश्ता होतो. आता आजचा नाश्ता पॅरिसवरून झाला. आता नेने बाहेर येऊन आपल्याला त्यांच्यावर टेहळणी केल्याबद्दल आणखी शिव्या देण्याआधी आपण इथून सटकू. यावर तुम्ही म्हणाल, सालं ह्या गोष्टीत झालं काय? तर पॅरिस ह्या फ्रान्सच्या राजधानीच्या शहराच्या नावाचा मूळ उच्चार पारी आहे, ह्या विषयावर नेने यांचा एक दिवसाचा नाश्ता झाला, एवढंच या गोष्टीत झालं. अजून काय सांगणार ओ नेन्यांच्या नाष्ट्याबद्दल?

दोन

आडनावावरून लोक जात ओळखतात, नि त्यावरूनच निष्कर्ष काढतात हे तंतोतंत माहीत असल्यामुळं म्हणा आणि एकूण सामाजिक बचावाला गरजेचं म्हणून म्हणा, पण ह्या समोरच्या टेकडीशेजारच्या वाडीत राहणारे मूळचे खिलारे कुटुंबीय त्यांचं आडनाव गेल्या काही पिढ्या ‘भोसले’ असं लावतायंत. ह्या भोसले कुटुंबातला उगवता पुरुष असलेल्या राजेशनं नुकतीच पीएसआयची परीक्षा पास होऊन आपल्या घरच्यांना अभिमान वाटावा अशी कामगिरी बजावलेली आहे. पोलीस सब-इन्स्पेक्टर होऊन आता राजेश भोसले राज्य सरकारच्या सेवेत दाखल होईल आणि ह्या व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी झटेल, अशी आशा त्याच्या शेजारी राहणारे दिनकरराव कांबळे यांनी वाडीतर्फे झालेल्या राजेशच्या सत्कार समारंभात त्या ठिकाणी व्यक्त केली.

सुरुवातीच्या दोन वर्षांसाठी राजेशला गडचिरोली जिल्ह्यात सर्व्हिस करावी लागेल. नंतर पुन्हा इकडच्या साइडला बदली मिळू शकेल. राज्यातला सगळ्यांत मागास जिल्हा असलेल्या गडचिरोलीमध्ये काम करण्याचं आव्हान स्वीकारण्यासाठी राजेश सज्ज आहे. केंद्र सरकार नि राज्य सरकारच्या सेवेत जाण्यासाठी गेली चार वर्षं त्यानं जे काही क्लास केले, जेवढी केवढी व्याख्यानं ऐकली, त्यांतून आता राजेशला देशाबद्दल पुरेसा जिव्हाळा वाटायला लागलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला बांधील राहात, प्रशासकीय चौकटीत देशाची सेवा करण्याची जबाबदारी राजेश पार पाडेल, असा विश्वास त्याच्यासकट त्याच्या घरच्यांनाही आहे. राजेशमध्ये ऊर्जा नि उत्साह पूर्वीपासूनच होता. त्याला आता यशाची फळं आल्यामुळं वाडीतल्या मुलांनी त्याचा आदर्श ठेवण्याची गरज आहे, असं मार्गदर्शनही दिनकरराव कांबळे यांनी त्या ठिकाणी समारंभात केलं होतं.

राजेशच्या आईला तर इतकं भरून आलंय, की काय विचारू नका. पोरानं नाव काढलं. राजेशचे वडील रिक्षा चालवतात. म्हणजे त्यांना चालवावीच लागते. मोठा भाऊ एका कॉल सेंटरमधे काम करतो. म्हणजे त्याला करावंच लागतं. म्हणूनच राजेशला स्पर्धा परीक्षा देता आल्या नि त्यानं नाव काढलं. तशी काय आता राजेशच्या घरची परिस्थिती आधीएवढी बिकट राहिलेली नाही. भावाच्या पगारानं घर चांगलंच सावरलं. शिवाय भावाचं वर्षभरापूर्वी लग्न झाल्यामुळं एक सून घरात आली नि त्या सुनेमुळं घरच्या कामातपण आणखी वाटेकरी आलाय. पण आधीचे कष्ट आठवून राजेशच्या वडिलांपेक्षा त्याच्या आईला जास्त भरून आलंय. डोळ्यांत पाणीपण भरून आलंय. आता त्या सगळ्या मिठाळ पाण्यानं रस्सा एकदम कडकडीत होणारे आजचा. काय बोलता, काकी, काय बेत आज? कोंबडी. अरे वा वा. राजेशची आई घरातच असते. तिला असावंच लागतं. पण घरच्यांच्या कष्टांचं राजेशनं चीज केलेलं आहे, अशी प्रशस्ती दिनकरराव कांबळे यांनी त्या ठिकाणी बोलताना दिली होती.

राजेशनं आत्ता पी.एस.आय.ची पोस्ट काढली असली, तरी कदाचित तो पुढच्या पदांच्यासाठीची परीक्षाही देईल असं दिसतंय. कदाचित क्लास-वन ऑफिसरची पोस्टपण निघू शकते. म्हणजे तेवढी त्याची ताकद आहे. किमान उप-जिल्हाधिकारी पदासाठी तरी प्रयत्न करायला हरकत नाही. एखादा अटेम्प्ट द्यायचा, असं राजेशनं ठरवल्याचं कळतं. याबद्दल दिनकरराव कांबळे यांना काही माहिती नसल्यामुळं त्यांनी त्याबद्दल त्या ठिकाणी काहीच म्हटलं नाही.

राजेशची होऊ घातलेली बायको राणी जाधव हिचं एकूण काय म्हणणं आहे ते कादंबरीत पुढं आलेलं आहे. लव्ह मॅरेज नाहीये राजेशचं. घरच्यांनी मुलगी बघून ठेवलेली आहे. पीएसआय झाला नि पुढच्या वर्षभरातच राजेशचं लग्न झालं. आणि राणी त्याच्या आयुष्यात आली. राणीचं नाव फारच मस्त आहे, असं राजेशचं मत आहे. राणीचं मत काय आहे?

तीन

राज्यघटना मसुदा समितीचं अध्यक्षपद बाबासाहेबांकडं होतं असलं, तरी त्यांना अनेक ताणतणावांना तोंड देत घटना लिहावी लागली होती, आणि म्हणूनच १९४९ साली घटनेसंबंधीच्या वादविवादादरम्यान बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, ‘२६ जानेवारी १९५० रोजी आम्हाला राजकीय समता लाभेल, पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात असमानता राहील आणि जर ही विसंगती आपण लवकरात लवकर नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, तर ज्यांना या विषमतेची झळ पोचलेली आहे ते लोक घटना समितीनं अत्यंत परिश्रमपूर्वक उभारलेला हा राजकीय लोकशाहीचा मनोरा उद्ध्वस्त करून टाकल्यावाचून राहणार नाहीत.’ हा तपशील कादंबरी लेखकाचा नाही, तर श्रीधर हासुरे याचा आहे. सध्याची भारतीय राजकीय व्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या पातळीला पोचलेली आहे, असं त्याला वाटतं. श्रीधरला पुस्तकांची एवढी आवड आहे की तो मिळेल ते वाचत सुटतो. बहुजन समाज पार्टीचा फुलटायमर कार्यकर्ता म्हणून दोन वर्षं काम केलं होतं. पाच वर्षांपूर्वी ते सोडलं. त्यानंतर वयानुसार सेट्ल होण्याची गरज वाढली नि डी.एड. करून श्रीधर प्राथमिक शिक्षक झाला. त्यामुळं मग लग्नपण झालं.

चळवळी खलास झाल्यात नि सगळं अंधारून आलंय, असं श्रीधरचं मत आहे. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी श्रीधरला असं वाटत असेल तर पन्नासाव्या वर्षी काय वाटेल आणि पंच्याहत्तराव्या वर्षी काय वाटेल? सांगता येत नाही. बरं, वर्षभरापूर्वी त्याला मुलगा झाला, त्यामुळं आता ह्या अंधारून आलेल्या जगात तो कुटुंब सांभाळतो. पण त्याला सारखं अस्वस्थ वाटत असतं. त्यामुळं मग त्याच्या तीनचार मित्रांच्या सोबतीनं त्यानं आता एक अनियतकालिक स्वरूपात निघणारं प्रकाशन सुरू केलंय. जातप्रश्नावर खल करण्याच्या उद्देशानं हे अनियतकालिक पत्र निघत असतं. हजारेक प्रती काढल्या जातात. आपलं रोजचं काम बौद्धिक नाहीये, शिवाय सगळं अंधारून आलेलं आहे, या काळात करण्यासारखं काय? या प्रश्नावरचं श्रीधरचं उत्तर, अनियतकालिक स्वरूपातला अंक काढत राहणं, हे आहे. आणि आपलं वाचन सुरू ठेवणं. मग त्यात आपल्याकडच्या कॉम्रेड शरद् पाटलांपासून ते इटलीच्या अन्तोनिओ ग्राम्सीपर्यंत काय मिळेल ते वाचायचा श्रीधरचा खटाटोप सुरू असतो.

यातूनच त्याची अंधारून आल्याची भावना वाढत जाते. पण एकट्या श्रीधरला तसं वाटत असलं तरी त्याच्या अनेक मित्रांना तसं वाटत नाही, त्यामुळं गोष्टी घडत राहतात. शिवाय त्याचे मित्र सार्वजनिक व्यासपीठांवर जितक्या आत्मविश्वासानं बोलू शकतात, तितका आत्मविश्वास त्या मित्रांपेक्षा जास्त पुस्तकं वाचूनही श्रीधरकडं नाही. तसं त्यानं वक्तृत्व स्पर्धांमधे चांगली दणदणीत बक्षिसं खेचलेली आहेत, पण तेव्हा त्याला अंधारून आल्यासारखं वाटायचं नाही. आता तसं वाटतं, म्हणून प्रश्न.

ह्या वरच्या टेकडीला लागून रस्ता पुढं एका उपनगरात जातो, तिथं एका पाच हजार रुपये भाड्याच्या घरात श्रीधर राहतो. पुस्तकं, बायको, मुलगा यांच्या सान्निध्यात श्रीधर अंधारून आलेल्या जगातून वाट काढतोय. या वाटेत त्याला डॉ. आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांची सोबत वाटते. आणि आपलं रोजचं काम बौद्धिक नाहीये, अशी खंतही त्याला रोज वाटत असते. यावरचा उतारा म्हणूनच की काय, श्रीधरकडे कुठल्याही गोष्टीचा पुस्तकातला संदर्भ सतत जागा असतो. उदाहरणार्थ, बलात्कार होणाऱ्या दलित स्त्रियांच्या संख्येची सरासरी रोज चार पूर्णांक तीन अशी आहे नि कसल्या बाता मारता तुमच्या महिला राष्ट्रपती झाल्याच्या, असा आकडेवारी युक्तिवाद श्रीधर २०१३ साली करू शकतो. श्रीधर अनेक व्याख्यानांना जातो, अनेक पुस्तकं वाचतो, दिवसानंतर रात्र येऊन पुन्हा दिवस येतो त्याची वाट पाहत राहतो.

श्रीधरला एक खूप लांबची चुलत बहीण आहे, सायली नावाची. श्रीधर जसा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता राहिलाय, तशी सायलीसुद्धा एका राजकीय पक्षाची कार्यकर्ती राहिलीय, अजूनही ती त्या पक्षाची कार्यकर्ती आहे. पण तिच्या पक्षावर बंदी घालण्यात आली असल्यामुळं आणि सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करून टप्प्याटप्प्यानं साम्यवादी समाज स्थापन करणं हे त्या पक्षाचं ध्येय असल्यामुळं सायली उघडपणं काम करू शकत नाही. पण ती तरीही त्या पक्षाची कार्यकर्ती आहे. तिचं म्हणणं पुढं एका स्वतंत्र प्रकरणात आलं असल्यामुळं त्याबद्दल इथं नको. आणि सायलीशी श्रीधरचा तसा फारसा संबंधही येत नाही. दोघंही चळवळ नावाच्या एका अस्पष्ट गोष्टीशी जवळीक ठेवून असले आणि लांबचं का होईना पण त्यांचं नातं असलं, तरी त्यांचा एकमेकांशी फारसा संबंध येत नाही. असं कसं?

कसं तर असं- सायलीचं ज्या मुलाशी अजून लग्न व्हायचं आहे, पण ज्याच्यासोबत ती किमान दोन वर्षं सोबत राहिलेली आहे नि अजून आयुष्यभरही राहील, असा एक मुलगा आहे. त्याचं नाव अजय. तो सध्या तुरुंगात आहे. सायली ज्या पक्षाचं काम करते त्याच पक्षाचं काम अजय करायचा. आणि त्या कामातूनच तो जंगलात जाऊन आला. त्यातूनच मग त्याला पोलिसांनी अटकपण केली आणि सध्या तो आतच आहे. जंगलात कुठं, कशाला, असा प्रश्न काही वाचकांना असू शकेल. तर त्याबद्दल पुढं येईलच. सध्या सांगण्यासारखं एवढंच की, सायली नि अजय यांचा ज्या पक्षाशी संबंध होता, त्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) या पक्षाची सशस्त्र मुळं देशाच्या मध्यभागी असलेल्या बस्तरच्या जंगलात रुजलेली आहेत. तिथपासून हा परिसर अनेक ठिकाणी पसरत जातो. बस्तर आलं छत्तीसगढ राज्यात, पण त्याशेजारच्या ओडिशा, महाराष्ट्र या राज्यांमधेही जंगल पसरलेलं आहेच. जंगलाला नाव माणसांनी ठेवलेलं, पण झाडं-प्राणी-नद्या-वेली तर इकडेतिकडे आपसूक आहेतच. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागापर्यंत यांच्या पक्षाची सशस्त्र मुळं दिसतात, तिथं अजय जाऊन आल्याचा आरोप आहे. आणि त्यासंदर्भात अनेक सनसनाटी बातम्या वाचकांनी वाचल्या असतील. ह्या सनसनाटीपणाचा असाही एक परिणाम झाला की श्रीधरचा जो काही थोडा संबंध अजयशी नि सायलीशी होता, तो त्यानं पूर्णच बंद करून टाकला. म्हणजे अजयशी तर श्रीधरची काही काळ मैत्री व्हायला आलेली, पण ते सगळंच थांबलं. श्रीधरचं हे असं होतंच. कुणाची नाती या चळवळींमधे एकदम जुळून जातात, तर कोणाची कशी एकदम तुटून जातात, त्याचा अंदाज कोण बांधू शकेल काय?

चार

विजयेंद्रराजे जाधव याच्या आडनावावरून त्याची स्पष्ट जात कोणी ओळखू शकलं नाही, तरी त्याच्या नावावरून जात ओळखू शकतात. आणि त्याला त्यात काही कमीपणा वाटतच नाही, त्यामुळं प्रश्न नाही. उलट आपल्या जातीचा अभिमान बाळगत विजयेंद्रराजे ऊर्फ विजय मनगटात सोन्याचं दणदणीत कडं घालतो नि फेसबुक प्रोफाइलवर छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्यासोबत आपल्या फोटोंचा कोलाज करून कव्हर फोटो सजवतो. विजय साधारण दर दोन महिन्यांकाठी एक पुस्तिका किंवा एक लेख वाचतो, असं म्हणता येईल. जातीबद्दल विजय एकदम जागरूक आहे. एखाद्या पुस्तिकेतून त्याला आपल्या जातीनं आत्तापर्यंत किती पराक्रम गाजवलेत याचा तपशील मिळतो आणि त्याची जी कुठली जात आहे मराठा का कायतरी तिच्या वरची मानली जाणारी जी कुठली जात आहे ब्राह्मण का कायतरी त्या जातीला निर्वंश करण्याची गरज किती तातडीची आहे, हेही त्याला अशा पुस्तिकांमधून पटत जातं. हळूहळू या पुस्तिकांपेक्षाही काही छोट्या मोठ्या रेकॉर्डिंग केलेल्या क्लिप आणि फेसबुक, ब्लॉग या माध्यमातून विजयेंद्रला खुराक मिळतो आहे.

ज्या टेकडीचा उल्लेख वरती आलाय, त्या टेकडीवर एक मॉल उभा राहिला असून, ज्या जमिनीवर तो उभा राहिलाय ती जमीन विजयेंद्रराजे जाधवच्या वडिलांची आहे. जाधव कुटुंबाची एकूण जमीन किती आहे याची मोजदाद करणं, आपल्या आवाक्याबाहेरचं काम आहे. विजयेंद्रराजे जाधवचे एक चुलते एका राजकीय पक्षाचे नगरसेवक आहेत. विजयनं आयुष्यात लग्नाशिवाय आणखी काय करावं, हा तसा फार चिंतेचा प्रश्नच नाहीये. सध्याचं सांगायचं, तर तो सरकारी सेवेत उच्च पदी जाण्यासाठी गरजेच्या असलेल्या परीक्षांसाठी एका क्लासला जातोय. त्याचं एम.ए. झालेलं आहे चार वर्षांपूर्वी. आता हा सरकारी सेवेत उच्च पदी जाण्यासाठी अभ्यास सुरू आहे. दरम्यान काही छोट्यामोठ्या कोर्सलाही विजयेंद्रराजे अॅडमिशन टाकत असतो. पत्रकारिता, स्पोकन इंग्लिश, अशा कुठल्याही कोर्सला त्याच्या नावाची नोंद सापडू शकेल. त्याचा गेल्या महिन्याच्या तीन तारखेला वाढदिवस झाला तेव्हा पहिल्यांदाच त्यांच्या एरियातल्या एका कॉर्नरवर अनेक फ्लेक्सांमधे विजयेंद्रराजे जाधव यांना एकोणतिसाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फ्लेक्स लागला. ही एक महत्त्वाची घटना सांगता येईल. आता ही महत्त्वाची घटना त्या ठिकाणी दर वर्षी घडेल, अशी आशा बाळगून या ठिकाणी दादांचे आभार मानून थांबू.

पाच

ग्रीक राज्यं नि पर्शियन राज्यं (आताचा इराण) यांच्यात अडीच हजार वर्षांपूर्वी झालेल्या कुठल्यातरी लढाईवर बेतलेला एक प्रचंड हिंसक चित्रपट थ्री-डीसाठीच्या खास गॉगलमधून बघून प्रेक्षक टेकडीवरच्या आयमॅक्स मल्टिप्लेक्समधून बाहेर पडले. डोक्यात तलवार खुपसलेय, आरपार बोटी एकमेकांवर आदळून माणसं खचाखच मरतायंत. एका गोऱ्या बाईचा आणि एका आडदांड पुरुषाचा एकमेकांवर कुरघोडी करणारा सेक्स-सीन रंगलाय. रक्ताचे शिंतोडे अंगावर उडतायंत, अशा थरारक अनुभवानं माखून प्रेक्षक बाहेर पडले. एअरकंडिशण्ड वातावरणात कंडिशण्ड होऊन बाहेर पडलेल्या प्रेक्षकांच्या मनात काय होतं तेच कळत नव्हतं. सगळे हसत-खेळत होते, कोणी पोरी आपले कपडे ठीकठाक करत होत्या, कोणी पोरगे आळस देत होते, कोणी जोड्या कोल्ड्रिंक पीत होत्या, कोणी फॅमिल्या गाडीत बसत होत्या, कोणी मोबाइलवर कायतरी पाहत होते, कोणी दुसऱ्यांकडं पाहत होते. आणि विशेष म्हणजे तिन्ही मितींमधून रक्ताचा एवढा पाऊस पडूनही कोणाच्या अंगावर त्याचं नामोनिशाणही नव्हतं. एवढ्या त्या गोऱ्यागोमट्या बाईनं नि दाढीनं आणखी क्रूर दिसणाऱ्या त्या गोऱ्या बाप्यानं जो जोरदार एकमेकांना खालीवर आपटत सेक्स केला, त्याचंही काहीच नामोनिशाण प्रेक्षकांच्या अंगावर दिसत नव्हतं. अगदी जाणीवपूर्वक जवळ जाऊन पाहिलं तरी काहीच थेंब कुठं पडलेला नाही, ना रक्ताचा, ना पाण्याचा, ना कसला.

अनेक जातिधर्मांची माणसं या प्रेक्षकांमधे होती. तिकिटाची किंमत अडीचशे रुपये होती. आणि पिक्चर थ्रीडी होता.

त्यात एक डायलॉग होता. ग्रीक लोक कायतरी असे भांडत असतात पर्शियनांच्या चढाई मोहिमेबद्दल बोलताना, त्या वेळी त्यांचा नेता म्हणतो, ‘जरा शांत बसा, ही काय रस्त्यावरची गोंधळगर्दी नाहीये, ही लोकशाही आहे’.

वरचा पिक्चर पाहून मल्टिप्लेक्स बाहेर पडलेले प्रेक्षक एका स्वायत्त, सेक्युलर, समाजवादी, लोकशाही प्रजासत्ताक देशातल्या रस्त्यावरूनच आपापल्या घरी जाणार होते. प्रेक्षक एका पातळीच्या वरचे, पण विविध आर्थिक स्तरांमधले होते, ते प्रवासही वेगवेगळ्या वाहनांमधून करणार होते. पण सगळ्यांसाठी रस्ता सारखाच होता, एवढं एक डांबरी वास्तव समोर कुणालाही दिसेलच.

सहा

नेने ज्या हॉटेलात नाश्ता करून घरी जातात तिथंच नाश्ता करून बाहेर पडलेला आणि नेन्यांच्याच कॉलनीत राहणारा विरांग रस्त्यात आपल्याला भेटला आणि तुम्ही त्याला श्रीधरबद्दल काही सांगितलंत- जातिपातीबद्दलचं, तर तो तुच्छ हसेल. आणि म्हणेल, ‘एवढं कुठं काय आहे आता जातीपातीचं?’ विरांग सव्वीस वर्षांचा आहे, तरी त्याच्या घरच्यांकडून अजून पैसे कमावण्याचा ताण आलेला नाहीये. आणि आपण घातलेत ते कपडे, आपण खाल्लं ते अन्न, आपण घातल्यात त्या स्लिपर, आपण चालवतो ती दोन चाकांची गाडी, आपण घालतो तो गॉगल, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ज्या मोठमोठ्या मल्टिप्लेक्सांमधे पाहिले जातात ती ठिकाणं, हे सगळं त्याच्यापर्यंत कसं पोचतं, याबद्दल विरांगच्या मनात काही शंका येताना कधीच दिसत नाहीत. तो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट पाहतो, आंतरराष्ट्रीय चित्रपट, सॉरी- फिल्म, बनवण्याबद्दल बोलतोही. पण म्हणजे काय?

उदाहरणार्थ, परवाच तो त्या बुटक्या दगडी सुंदर इमारतीत एक जर्मन चित्रपट पाहून शनिवारी संध्याकाळी बाहेर पडला. चित्रपटाचं नाव होतं - टिन ड्रम. अॅडॉल्फ हिटलर नावाचा एक मनुष्य जर्मनी नावाच्या एका युरोपीय देशात सत्तेवर आला, त्या दरम्यानचा काळ या चित्रपटात आहे. या काळाची सुरुवात होत असण्याच्या वेळी जन्माला आलेला एक ऑस्कर नावाचा मुलगा लहान असताना हातात ड्रम घेऊन घरात फिरत असतो. घरातल्या मोठ्यांचा बालिशपणा बघून म्हणा किंवा एकूणच मोठं होण्याचा कंटाळा जरा लवकर येऊन म्हणा, हा पोरगा त्याच्या घरातल्या तळमजल्याच्या जिन्याजवळ जातो. अगदी निग्रहानं तो ठरवतो की, मोठं व्हायचं नाई म्हणजे नाई म्हणजे नाई. आणि टाकतो उडी त्या जिन्यावरून खाली. नि मग हॉस्पिटल, धावपळ. तेव्हापासून ऑस्कर तेरा वर्षांचाच राहतो. हिटलरच्या नेतृत्त्वाखाली जर्मनी दुसऱ्या महायुद्धात धुळीस मिळते तोपर्यंत ऑस्कर तेवढाच राहतो. म्हणजे त्याचं वय वाढतं एकीकडे लोकांच्या दृष्टीनं, पण तो राहतो तेवढ्याच उंचीचा, तेवढ्याच्या तेवढा. असं त्या चित्रपटाबद्दल धावतं सांगता येईल. अजून खूप आहे त्यात. किंवा ज्या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे त्यात अजून खूप आहे.

पण या चित्रपटानंतर तुम्ही विरांगला विचारलंत की, काय रे, कसा होता पिक्चर? तर, तो म्हणेल, ‘इंटरेस्टिंग होती फिल्म, पाहा तू’. हेच उत्तर विरांग प्रत्येक फिल्म पाहिल्यावर देतो. आणि मग त्याला विचारलंत की, काय रे कुठल्यातरी कादंबरीवर आहे काय तो चित्रपट? तर, तो म्हणेल, ‘हो’. (आणि मूळ लेखकाचं नावही मूळ उच्चारासह म्हणून दाखवेल). एका ठरावीक ठिकाणी ठरावीक काळ जात राहिलं की काही गोष्टी कानावर पडतात ना, तसंच विरांगचं होतं. पण कादंबरी वाचल्येस का, असा प्रश्न काही त्याला विचारण्यात अर्थ नाही. कारण, साडेतीनशे-चारशे पानांची कादंबरी कोण वाचेल! तरी, एक वेळ नोबेल पुरस्कार मिळालेल्या मूळच्या युरोपातल्या लेखकाची कादंबरी तो किमान विकत तरी घेईल, पण एवढं वाचायचं म्हणजे वैताग साला. आणि विरांग ज्या वर्तुळात वावरतो, तिथं वावरण्याचा फायदा असा की, असं काय वाचलं नाही तरी त्यात काय असेल त्याचा साधारण अंदाज येतोच, आणि मग त्यावर बोलतासुद्धा येतं. शिवाय फेसबुकवर त्या लेखकाच्या नावाचं किंवा त्या कादंबरीच्या नावाचं काही पान असेल तर ते लाइक करून टाकायचं, मग झालंच. आणखी बोलायला सोईचं. झालं मग, बोलणाऱ्याची माती खपते नि न बोलणाऱ्याचं सोनंपण खपत नाही, ही म्हण तर तुम्हांला माहीतच असेल. चला आता, इथं ह्या आवारात असल्या म्हणीबिणी बोलायच्या नसतात.

विरांगशी काही बोलणं अवघड आहे. उदाहरणार्थ, एक बुटकी, काळसर मुलगी एका ठिकाणी कठड्यावर बसून एका इंग्रजी वर्तमानपत्रातली बातमी जरा मोठ्यानं वाचण्याचा प्रयत्न करत होती. अकरावी-बारावीतली पोरगी होती. तिचं नाव स्मिता असं आहे नि ती गडचिरोलीतल्या तिच्या गावापासून सुरुवात करत नंतर आलापल्लीहून शिकत शिकत आता ह्या शहरात शिकायला आलेय. तर ती ह्या कठड्यावर बसून चुकीच्या पद्धतीनं बातमी वाचायचा प्रयत्न करतेय, हे थोडंफार इंग्रजी येणाऱ्या कोणालाही कळू शकतं, वाटू शकतं. विरांगलाही ते कळलंच. ‘कशाला हे लोक असं करतात’, असा त्याचा प्रश्न होता. हा प्रश्न तो थेट त्या मुलीला विचारणार नाही, त्यामुळं तुम्ही विचारा तिला. कळलं ना, का ती असं करतेय ते? आता हे विरांगला सांगायचा प्रयत्न करा, ‘आधीच परिस्थिती वेगवेगळी असते. पैसा, कपडे. त्यात इथली मराठी भाषा वेगळी पडते, त्यामुळं आजूबाजूच्या लोकांमुळं आत्मविश्वास जातो आणि त्यात इंग्रजी तर एवढी सगळीकडून आपटते, त्यामुळं आणखी आत्मविश्वास खलास. म्हणून ती मुलगी इंग्रजी शिकायचा प्रयत्न करतेय.’

‘ह्या! कॉन्फिडन्स कशाला जायला पायजे भाषेमुळे?’ असा प्रश्न विरांग विचारेल. यावर काही उत्तर द्यायची तुमची इच्छा आहे का? असेल तर पाहा तुम्ही देत असाल तर. आपली तर काय इच्छा नाही. कारण एकदा आपण तसा प्रयत्न केला, त्यावर तो आत्मविश्वासानं काय म्हणाला माहितेय काय, हे - ‘कॉन्फिडन्स काय भाषेमुळे येतो की काय. ह्या!’

ती मुलगी वाचत होती तो इंग्रजी पेपर बोगस होता, ती मुलगी कदाचित एका लिमिटपलीकडे इंग्रजी शिकूही शकणार नाही, किंवा कदाचित ती शिकेलही. तिच्या जगण्याच्या ज्या शक्यता असतील त्या असू देत. पण आत्ता ज्या करुण परिस्थितीत ती समोर भाषेशी सामना करतेय, त्याकडं पाहून आपल्याला काय वाटायला पाहिजे? असा प्रश्न विरांगला पडत नाही. म्हणजे अगदी आपण बोलून दाखवला तरी त्या प्रश्नाला तो स्वीकारतच नाही.
एकूण जगणं निरर्थक आहे, करियर वगैरे भंकस आहे, अशा काही बेसिक गोष्टीच अजून त्याला इंटरेस्टिंग वाटतात आणि ठरलेल्या कट्ट्यांवर तो त्याच्या तिथं तिथं ठरलेल्या मित्रांसोबत ह्या गोष्टी बोलतो. कुठल्याही गोष्टीसाठी मुद्दाम प्रयत्न करणारं कोणी दिसलं, की त्याच्याबद्दल विरांग ‘ह्या’ असा उद्गार काढतो. पण आपण सकाळी ब्रशनं दात घासतो, किंवा कधी कधी फॅशन म्हणून दात न घासता, तसेच घराबाहेर पडतो, बाइक चालवत दहा-पंधरा किलोमीटर रोज फिरतो, खातो, आधीच्या एका मैत्रिणीला घेऊन त्या समोरच्या टेकडीवर जातो, सिग्रेट पितो, फिल्म पाहतो, नाटकं पाहतो, त्याबद्दल बोलतो, हे सगळं मुद्दाम प्रयत्न करणंच आहे, असं वाटून तो थोडा शांत होत नाही. किंवा गोंधळतही नाही. सगळी उत्तरं मिळाल्यासारखा तो ‘ह्या’ मात्र करतो. शेवटची भेट झाली तेव्हा तो एका हिंदी चित्रपटासाठी कोणत्यातरी त्याच्या आधीपासूनच ओळखीच्या असलेल्या दिग्दर्शकाला असिस्ट करत होता.

सात

विरांग ज्या लोकांकडून एखाद्या कादंबरीबद्दलचे किंवा एखाद्या चित्रपटाबद्दलचे तपशील उचलतो त्यातल्या बेचाळीस वर्षांच्या एका इसमाचं नाव अयन असं आहे. अयन एकदमच उच्चशिक्षित वगैरे आहे. इंजीनियरच आहे, पण खूप प्रतिष्ठित संस्थांमधे तो शिकलेला आहे आणि कुठंतरी बाहेरपण त्यानं कुठलंतरी अजून वरचं शिक्षण घेतलंय. विरांगसारखे लोक त्याचे फेसबुकवर मित्र आहेत, शिवाय प्रत्यक्षातही कुठल्या ना कुठल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटाला ते भेटतातच. तेव्हा मग अयननं तो चित्रपट ज्या कादंबरीवर बेतलेला आहे ती कादंबरी खरोखरच वाचलेली असते, त्यामुळं बोलणं होतंच. मग तो तपशील अनेकांना मिळतो. अयनकडून असा तपशील अनेक गोष्टींबद्दलचा अनेकांना मिळतो. चित्रांबद्दल, चित्रपटांबद्दल, साहित्याबद्दल, युरोपापासून मराठीपर्यंत अनेक गोष्टींमधे अयन रस घेतो. आणि शहात्तर हजार रुपये महिना पगार मिळत असल्यामुळं हा रस निवांत पिणं त्याला शक्यही होतं. आणि ते तो सुंदरपणे करत असतो. मराठी नि इंग्रजीशिवाय जर्मन भाषाही त्याला येते. तरीही भाषेचा नि माणसाच्या आत्मविश्वासाचा तसा संबंध नसतो, हे त्याला माहितेय. पण परिस्थिती वेगवेगळी असते, हे अगदी त्याला स्पष्ट माहीत असल्यामुळं स्मिता त्या ठिकाणी कठड्यावर इंग्रजी बातमी वाचताना दिसली, तरी त्यावर तो ‘ह्या’ करत नाही. आणि आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टीनं पाहिलं तर चांगलं यशस्वी करियर घडवलेलं असूनही त्यात पोटापाण्यापलीकडे फारसा अर्थ नसतो, हेही त्याला माहितेय. शिवाय पुढे जाण्यासाठी कायतरी करावं, असंही त्याला वाटत नाही. कारण गोलगोल फिरणाऱ्या पृथ्वीवर पुढं जाऊन जाऊन कुठं जायचंय. त्यामुळं एखादं चित्र, चित्रपट, किंवा साहित्य सोडून दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी आता तो मुद्दाम असा प्रयत्न करत नाही. आणि तसे पुढं जाण्याचे प्रयत्न करणारे त्याच्या कंपनीतले लोक पाहिले की त्याला प्रचंड कंटाळा येतो. आता हल्ली तसा कमी येतो, पण सुरुवातीला तर जोरदार कंटाळा यायचा.

पण आपल्या कंपनीतले लोक आणि त्या कठड्यावर बसलेली स्मिता यांची परिस्थिती वेगवेगळी आहे, याची जाणीव असल्यामुळं अयन ‘ह्या’ करत नाही. तो समजून घ्यायचा प्रयत्नतरी करेल. किमान ह्या स्मिताच्या बाबतीत तरी तो समजून घेण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक वेळी काय तसंच तो वागेल असं नाही. कधीकधी त्याला कंटाळा आला तर तो दुर्लक्ष करेल. पण ‘ह्या’ करणार नाही. अयननं खूप वाचलंय आत्तापर्यंत, त्यामुळं त्याला काही गोष्टींचा अंदाज येतो आणि तरीही बऱ्याच गोष्टी आपल्या अंदाजापलीकडच्या राहतातच, याचाही अंदाज त्याला आहे. त्यामुळं त्याला कधीकधी कंटाळा येतो, हे खरंय. पण आपल्याला येतो तेव्हाच सगळ्यांना कंटाळा यायला पायजे, असला काय त्याचा आग्रह नसतो.

बरं, अयनबद्दल बोलताना त्या टेकडीबद्दल बोलायलाच हवं. टेकडीवर असलेल्या मल्टिप्लेक्सामधे तो कधीतरी चांगला चित्रपट लागला, तर पाहायला जातो, एवढाच त्याचा नि टेकडीचा संबंध नाहीये. टेकडीवर तो दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी जातोच जातो. टेकडीचा काही भाग अजूनही त्याच्यासारख्या माणसाला जावं वाटावं असा आहे. म्हणजे तिथून सूर्य दर संध्याकाळी रटाळपणे किंवा सुंदरपणे खाली जाताना दिसतो. ही जागा अशीच राहावी, असं अनेकांप्रमाणे अयनलाही वाटतं. पण आपल्याला वाटतं तसंच थोडी ना प्रत्येक वेळी होतं. आता ह्या जागेचंही अयनला वाटतं तसंच होईल अशी शक्यता जवळपास झिरो आहे.

आठ

स्मितानं सायन्स साइड घेतलेली आहे नि ती आता बारावीत जाईल. तिची मॅथ्स-वनची जी वही आहे, त्या वहीच्या पहिल्याच पानावर अशा ओळी सापडतात-

जिंदगी मे दुख है सहने के लिए
लेकीन झुँझना है सुख के लिए

स्केचपेनानं इकडंतिकडं कसली फुलं काढ, चांदण्या काढ, असं करून वहीतलं ह्या ओळी असलेलं पान स्मितानं सजवलंय.

स्मिताची मूळ भाषा माडिया, शिवाय तिला मराठी नि हिंदी येतातच. हिंदी जरा जास्त जवळची. आणि आता तिला इंग्रजी शिकणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम वाटतंय नि त्यासाठी ती वाट्टेल तसे उभे-आडवे प्रयत्न प्रचंड कष्टानं करतेय. जगात पुढं जाण्यासाठी माडियाचा काही उपयोगच नाही आणि आधी तिला वाटायचं मराठी गरजेची आहे, तर तिचाही तसा काही उपयोग नाही, असं आता तिला वाटायला लागलंय. आणि इंग्रजी कळण्याच्या बाबतीत आता ती बऱ्यापैकी प्रगती करून राहिलेय. पहिल्यांदा ती ह्या शहरात आल्यावर हादरली. आधी कधी ती गडचिरोलीच्या पलीकडे आली नव्हती. गडचिरोलीत काय, शहरातल्या शहरात बसचा प्रवास असली भानगडच नाही, म्हणजे वडाप रिक्षाच फक्त आतल्याआतल्या प्रवासासाठी. तीसुद्धा इंदिरा चौकातून नगरपालिका कॉम्प्लेक्सपर्यंत. त्यामुळं आतल्याआत बसचा प्रवास नाहीच. शहराबाहेर जायचं असेल तर एस्टी. त्यामुळं स्मिताला तशी काय बसची रोजची सवय नव्हती. अशा कित्येक सवयी तिला नव्हत्या, त्या ती आता हळूहळू लावून घेतेय. रोजचा दिवस इंग्रजीसाठीचे प्रयत्न, इथल्या अनेक सवयींसाठीचे प्रयत्न करणं यातच जातो. आणि तरीही ती एका डायरीत तिचे अनुभव लिहून काढण्यासाठी वेळ काढतेच. तिला तिच्या मूळच्या परिसराबद्दल काय वाटतं, तिथल्या लोकांबद्दल काय वाटतं, याविषयी लिहायला आवडतं. पण ही डायरी अतिशय खाजगी आहे. तिच्या जवळच्या मैत्रिणी असलेल्या दोन-चार जणींनाही ही डायरी तिनं दाखवलेली नाही. कधीतरी ह्या डायरीच्या मदतीनं आणखी काही लिहिता येईल, असं तिच्या डोक्यात असावं. स्मिता ज्या भागात जन्माला आली, त्या भागात बाहेरचे लोक येऊन जातात नि कायतरी लिहितात, आणि ते वरवरचं असतं, असं स्मिताला वाटतं. त्यामुळं तिला तिच्या भागाबद्दल डायरीत का होईना लिहायला आवडतं.

स्मिताच्या मूळच्या गावाचं नाव पिट्टेकसा असं आहे. पिट्टे म्हणजे पक्षी आणि कसा म्हणजे डोह. पिट्टे नावाचा कायतरी एक माणूस पण होता. तो नदीकाठी पक्ष्यांची वगैरे शिकार करायला जायचा. मासेपण पकडायचा. असाच एकदा मासे पकडायला गेला आणि नदीत बुडून मेला, म्हणून त्या गावाचं नाव पिट्टेकसा पडलं, अशी एक कहाणी आहे. स्मिताला हे सगळंच लिहून ठेवावं वाटतं. ते ती लिहून ठेवेल तेव्हा ठेवेल. आत्ता आपण एक खरोखरची घडलेली घटना पाहूया.

स्मिता तिच्या दोन मैत्रिणींसोबत पहिल्यांदा-पहिल्यांदाच त्या टेकडीवरच्या मॉलमधे फिरायला जात होती. फक्त काय आहे आतमधे ते पाहायला. बाकी काहीच विकत घेण्याची आत्ता तिची ऐपत नाही. पण आतून जरा फेरफटका मारायला त्या आत जात होत्या. स्मिता तशी पुढं होती असं नाही, पण तिला तिथल्या सिक्युरिटीवाल्यानं अडवलं. किधर? विचारलं. स्मिता बिथरली. तिच्या मैत्रिंणींनापण अडवलं. पण स्मिता पुढं होती, त्यामुळं सिक्युरिटीवाला पहिला तिच्याकडं पाहून विचारायला लागला. स्मिता बिथरली. एवढे लोक सहज आतबाहेर जातायंत-येतायंत नि तिलाच अडवलं. तिचा कॉन्फिडन्स बिथरला. तिच्या मैत्रिणींचाही कॉन्फिडन्स बिथरला. स्मिता परत हॉस्टेलला आली. प्रसंग बाका होता. ती तिथं काही बोलली नाही म्हणून आणखी अपमान झाला नाही. काही बोलण्यासारखं नव्हतं. काहीही बोलायला जमतही नव्हतं. बोलणाऱ्याची मातीही खपते नि न बोलणाऱ्याचं सोनंही खपत नाही, ही म्हण तर तुम्हांला माहीतच असेल.

नऊ

उदयेंद्रराजे ऊर्फ उदय आणि नंदकिशोर ऊर्फ नंदू दोघंही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दर वर्षी जातात. त्या टेकडीवरच्या मल्टिप्लेक्सामधे लागणाऱ्या शोंना ते जातातच जातात. चित्रपट पाहातात पाहायचे तेवढे आणि मुख्य हेतू आणखी एक पार पडतो तो आंतरराष्ट्रीय पोरी पाहायचा. विजयेंद्रराजेएवढा उदय श्रीमंत नाहीये. साधारण साठ हजार रुपयांची एक बाइक त्यानं तीन वर्षांच्या नोकरीनंतर घेतली. याशिवाय स्वतःचा खर्च करून थोडेफार पैसे साठतील इतपत नोकरी करतो उदय. त्याच्या बापजाद्यांची एवढी अतोनात जमीन नाहीये. आहे, पण विजयेंद्रएवढी नाही. त्यामुळंच उदयला त्या भुरट्या कंपनीत नोकरी करावी लागते. नंदू ऊर्फ नंदकिशोर एका भुरट्या कॉलेजात असिस्टंट प्रोफेसर आहे. आणि दर वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी उदय नि नंदकिशोर या आंतरराष्ट्रीय महोत्सवात आलेत. इथं त्यांनी एका मराठी फिल्मला जाऊन बसायचं ठरवलं नि तसे जाऊन बसले.

मराठीतल्याच एका नाटककाराच्या एकूण साहित्यावर आधारित फिल्म होती ती. उदयला हा नाटककार कोण ते माहीत नव्हतं आणि फिल्मही कंटाळवाणी वाटली. नंदकिशोर झोपून गेला. उदयला फिल्म कंटाळवाणी वाटूनही तो झोपला नाही, कारण त्याच्या शेजारी एक ऑस्ट्रेलियन फिट्ट तरुण पोरगी होती. तिच्याशी त्याचं बोलणं झालं. आपल्या भारतीय लोकांशी इंग्रजी बोलण्यासाठी जेवढा कॉन्फिडन्स लागतो त्यापेक्षा खूपच कमी मूळच्या इंग्रजांशी बोलताना लागतो, असा उदयचा आधीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचा अनुभव आहे. म्हणजे त्यांच्याशी बोलताना काय चुकाबिका झाल्या तरी अडखळायला होत नाही - आपल्यालापण नि त्यांनापण. तर उदय दामटून बोलतो. ह्या ऑस्ट्रेलियन पोरीशीपण तो बोलायला लागला नि दामटत दामटत त्यानं त्यांची बोलण्याची गाडी त्याच्या प्रत्यक्षातल्या गाडीपर्यंत आणली. इकडं नंदकिशोर झोपेतून जागा झाला तेव्हा उदय चाललेला त्या गोरीसोबत बाहेर.

गोऱ्या पोरीला काही बाइकवर मागं बसण्यात अडखळायला झालं नाही. उदय तसा उंचीला वगैरे चांगला आहे, त्यामुळं त्याला त्या बाबतीत कॉन्फिडन्स कमी पडण्याचं कारणच नव्हतं. मग ह्या कॉन्फिडन्ससह तो त्या पोरीला घेऊन चिकन रेस्टॉरंटमधे गेला. तिथं त्यांनी दोनेक तास गप्पा मारल्या. एवढा वेळ ऑस्ट्रेलियन पोरीशी उदयनं काय गप्पा मारल्या असतील, याचं आश्चर्य वाटवून घेत नंदकिशोर पुढचा कुठचा चित्रपट पाह्यचा, हे ठरवण्यासाठी टाइमटेबल तपासत इकडं एसीत बसून. उदयच्या गप्पांमधे कळलं की ती पोरगी स्वतः चित्रपट बनवत होती. तिच्या तीन-चार शॉर्ट-फिल्मा बनवून झालेल्या होत्या. आणि ती आता दोन दिवसांनी परत जाणार होती. त्या दोन दिवसांत आपल्याला काय उभा-आडवा चान्स असू शकतो का, हे तपासत उदय तिच्याशी बोलत बसला. मग तीच म्हणाली की, आता तिला हॉटेलात जायला हवं. उदयची बाइक होतीच. बाइकवर ती पोरगी बिनधास्त ह्याला बिलगून बसलेली एवढी, तेवढी दुसरी कोणतीच पोरगी कधीच आत्तापर्यंत बसली नव्हती. उदयनी तिला त्या गुळगुळीत काचांच्या हॉटेलजवळ सोडलं.

उदयसाठी ह्या वर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सगळ्यांत उत्साहानं साजरा झाला. पुढच्या अनेक स्वप्नांना पुरेसा ऐवज त्याला तीन-चार तासांमधे मिळाला. हिंदी चित्रपट दाखवतात ती स्वप्नं काय साली कचकडीची ठरतील, असा प्रत्यक्ष अनुभव घेऊन उदय आंतरराष्ट्रीय रसरसला.

दहा

ह्या वरच्या गोष्टींमधली एकच समान गोष्ट राहिली, ती टेकडी. आणि माणसं. त्या टेकडीवर असं सहज आपली आपण चक्कर टाकली, तरी ह्या गोष्टी आपल्याला सापडतात. अशा अनेक गोष्टींचा कल्लोळ सध्या जगात माजलेला आहे. त्या कल्लोळात खरंतर आपल्यासारख्या एखाद्या साध्यासुध्या लेखकाला कादंबरीतली एक गोष्ट लिहिणंही मुश्किल झालंय. शिवाय गोष्ट वाचून वॉक घेतल्यासारखं वाटत नाही, आप्पे खाल्ल्यासारखं वाटत नाही, सोन्याचं कडं घातल्यासारखं वाटत नाही, अंधारून आलेल्या चळवळींमधे उजेड पडत नाही, की अंगावर रक्ताचे शिंतोडे उडवून देणारा थ्रीडी फीलही अशी कागदावरची किंवा पडद्यावर वाचायची गोष्ट देऊ शकत नाही. जमिनीच्या एका तुकड्याला जेवढी किंमत आहे, तेवढी एका कादंबरीतल्या एका तुकड्याला आहे काय? किंवा एक प्लेट आप्पे घ्या किंवा दोनचार तोळ्यांचं सोन्याचं कडं घ्या, एका कादंबरीची किंमत तेवढी असणारेय काय? पुन्हा तिच्यातून सामाजिक चळवळपण होत नाही, तर त्या गोष्टीचा उपयोग काय ओ? धड मनोरंजन करेल, किंवा काही राज्यशास्त्रीय, समाजशास्त्रीय, सौंदर्यशास्त्रीय, नागरिकशास्त्रीय विश्लेषण करेल, तर तेही धड ह्या गोष्टीच्या ताकदीतलं काम दिसत नाही. काही माहितीपर नाही, मनोरंजक नाही, तर गोष्ट हवीच कशाला.

पण तरी तुम्ही ही अस्ताव्यस्तवादी किंवा बगळावादी गोष्ट इथपर्यंत वाचत आला असाल, तर इथून पुढंही वाचत राहाल याची खात्री मी देतो तुम्हांला. आणि कादंबरीचा विषय काय असेल हे वाचकांना सांगण्यासाठी आपण वरच्या नऊ आणि ही दहावी गोष्टी सांगत आलो, तर विषय असा त्यातून स्पष्ट झाला असेल तोच. आणखी काय स्पष्ट करणार? उलट आपण नोंदवलेल्या गोष्टी कोणाला ढोबळ वाटू शकतील. कसं होतं म्हायतेय काय, कधी कधी अगदी जसंच्या तसं दिसणारं नोंदवलं ना, तरी ते ढोबळ वाटायला लागतं. आणि गोष्टींमधल्या लोकांची आडनावं लिहिली की आपसूक त्यांच्या जाती तुम्ही जोखणार आणि मग तुमची जी जात असेल त्यावरून निष्कर्ष काढणार. जात न मानणारी तुमची जात असेल, तर तोही एक निष्कर्ष. त्यात आपण गोष्टीत लिहिताना अगदी सगळ्याच्या सगळ्या जातींतल्या माणसांचं काही लिहिलेलं नाही, किंवा एका जातीतल्या सगळ्याच्या सगळ्या माणसांचंपण काही लिहिलेलं नाही. आपण निव्वळ आपल्या कादंबरीचा विषय स्पष्ट व्हावा, म्हणून फिरत होतो. आजच्या काळाबद्दलची, जगाबद्दलची कादंबरी होती, त्या दिशेनं विषय स्पष्ट करण्यासाठी ज्या गोष्टी दिसल्या त्या लिहिल्या, इतकंच ते आहे. पटतंय?

वरच्या गोष्टींमधल्या पात्रांबद्दल लेखकाला काही थोडं समजलं, तुम्हांला वाचक म्हणून काही समजलं असेल, कदाचित जास्तही काही समजलं असेल.

ह्या आपल्या समजुतीतून एखादा एकसंध प्रश्न उभा करणं आणि सुट्या सुट्या गोष्टी पाहून त्यात आनंद न मानता लेखकाच्या डोळ्यांतल्या पाण्याचा एक थेंब सागवानाच्या त्या एका पानावर तोलून कुठंतरी जपून ठेवून देणं, हे काम आपण ह्या कादंबरीतून करणार आहोत. हे काम हाच या कादंबरीचा विषय आहे. वरच्या गोष्टींमधली पात्रं या कादंबरीत पुढं असतील असं नाही. पण ही पात्रं ज्या समूहाचा भाग आहेत, त्याच समूहाचा भाग लेखकही असल्यामुळं तो समूह हे या कादंबरीतलं एक पात्र निश्चितच आहे. शिवाय अशा काही सुट्या सुट्या गोष्टींमधून ह्या सामूहिक पात्राचा काही तपशील उभा करायचा प्रयत्न लेखक करेल.

हा तपशील उभा करण्यासाठी खूप ठिकाणं या कादंबरीत येतील, आणखी कुठकुठल्या गोष्टी येतील, कुणाच्या वहीतली टिपणं येतील, कुणाची निवेदनं येतील, कुणाच्या वहीत सापडलेली एखादी आकृतीही इथं चिकटवली जाईल. या सगळ्यातून ही कादंबरी उभी राहील.

आता विषय थोडा स्पष्ट झाला असेल. पण त्यातही असा प्रश्न कोणी विचारू शकेल, की हाच विषय का आणि आलाय तोच तपशील का? तर, त्याचंही तितकंसं स्पष्ट उत्तर या लेखकाकडं नाही. पण एक सांगता येईल. एक सागवानाचं पान मरून मलूल पडत जाताना लेखकाला दिसलं. हेच पान त्याला का दिसलं, याचं तरी काय उत्तर देता येईल? पण ते पान मरताना त्याला दिसलं, त्यामुळं त्याला कायतरी वाटलं. हे वाटणं हीच त्याच्या बाजूनं एक गोष्ट होती.

तसंच त्याला काही माणसंही मरताना दिसली, त्यामुळं त्याला कायतरी वाटलं. हे वाटणं हीच त्याच्या बाजूनं एक गोष्ट होती.

सागवानाच्या त्या पानाचा पत्ता शोधणं लेखकाच्या ताकदीत अवघड होतं, पण माणसांचं जरा वेगळं पडतं. त्यांचे चेहरे आपल्याला चटकन ओळखू येतात, वेगळे कळतात, त्यांचे पत्तेही सापडू शकतात, त्यामुळं माणसं मरतायंत तर त्याच्या गोष्टी लिहिणं जास्त शक्यतेतलं काम होतं. आणि अशी आपसूक वयानं, किंवा जनरल कायतरी अपघात वगैरेमुळं माणसं मरतात ते झालंच, पण त्याशिवाय कुठल्यातरी कल्लोळामुळंही माणसं एका सलग सूत्रानं मरत होती, असं लेखकाला वाटायला लागलं. आणि मग त्याचा शोध घेणं नि त्याची गोष्ट लिहिणं, हे तर नेहमीचंच काम.

ते काम म्हणजेच ही कादंबरी. लेखकाच्या वाटण्याची कादंबरी. हे वाटणं तुम्हांलाही वाटायला लागायलाच हवं असं नाही, पण तुमच्या वाटण्यात ह्या वाटण्याचा काही भाग जमा झाला, तर कादंबरीला अर्थ. नायतर वाटाण्याच्या अक्षता लावून तिला परागंदा करा.

***

(आगामी कादंबरीतलं एक प्रकरण)
अवधूत डोंगरे

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (8 votes)

प्रतिक्रिया

ये बात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मस्त

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

निव्वळ सुं-द-र!!! अप्रतिम. अदिती आपल्या लिखाणाबद्दल भरभरुन बोलली होती माझ्याशी. बरोबर बोलली. फार आवडला हा लेख. धन्यवाद.
_________
नीरीक्षण इतकं तगडं आहे. पट्टदिशी कनेक्ट होऊ शकले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरदस्त! खूप आवडले _/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेघना भुस्कुटे, जॉवलीन मोकाशी,
टिंकू, अपर्णा, मन, आदूबाळ,
मनापासून आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आगामी कादंबरीतलं एक प्रकरण)

हे जास्त आवडले!

अरुण साधूंच्या त्रिशंकूतली पात्रे आठवून गेली काहीशी. पात्रांच्या पार्श्वभूमीकडे अलिप्ततेने पहाताना त्यात वस्तुनिष्ठता असूनही त्यांचा निवाडा करण्याची घाई करण्याऐवजी हे बारीकसारीक कांगोरे दाखवून निवाडा वाचकांवर सोडणारे लिखाण फार आवडले, कादंबरीविषयी उत्सुकता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक्स्लन्ट! खुप मजा आली. एकुण गुन्तगुन्त खिळवून ठेवणारी आणि विचार करायला लावणारी आहे. कादम्बरीची आवर्जून वाट पहातोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

தநுஷ்

पात्रपरिचयाची शैली आवडली. बासू चटर्जी/अमोल पालेकर यांच्या एका सिनेमासारखी वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

वाह! आवडले.
कादंबरीची आवर्जून वाट पाहीन आता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

रुची, धनुष, अनुप ढेरे, राजे,
धन्यवाद..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रचंड आवडली कादंबरीची ओळख . वाचायची उत्सुकता वाढली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोष्ट बांधण्यातले अवधुत ह्यांचे कौशल्य फार आवडले, वेग-वेगळ्या घडणार्‍या गोष्टी आणि माणसांना जोडत जाणर्‍या हॉलिवुडच्या 'क्रॅश' चित्रपटाची आठवण झाली.

सागवानाच्या त्या पानाचा पत्ता शोधणं लेखकाच्या ताकदीत अवघड होतं, पण माणसांचं जरा वेगळं पडतं. त्यांचे चेहरे आपल्याला चटकन ओळखू येतात, वेगळे कळतात, त्यांचे पत्तेही सापडू शकतात, त्यामुळं माणसं मरतायंत तर त्याच्या गोष्टी लिहिणं जास्त शक्यतेतलं काम होतं. आणि अशी आपसूक वयानं, किंवा जनरल कायतरी अपघात वगैरेमुळं माणसं मरतात ते झालंच, पण त्याशिवाय कुठल्यातरी कल्लोळामुळंही माणसं एका सलग सूत्रानं मरत होती, असं लेखकाला वाटायला लागलं. आणि मग त्याचा शोध घेणं नि त्याची गोष्ट लिहिणं, हे तर नेहमीचंच काम.

इथे दिलेल्या कथेत स्टिरिओटाईपिंग जास्त वाटलं, व्यक्तिरेखा ग्रेशेड्स मधे आल्या असत्या तर अधिक छान वाटलं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंतराआनंद, मी,
आभारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेल्या वर्षीचा दिवाळी अंकातला अवधूत यांचा लेख फार आवडला होता, म्हणून हा धागा आधी उघडला नव्हता. शांतपणे वाचला ... फारच आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कादंबरी वाचावीच लागेलच...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काय सांगू आणि काय नको.उत्तरआधुनिक बिधुनिक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

३_१४ विक्षिप्त अदिती, ४_१३ थँक्स..
मेघना भुस्कुटे, परत थँक्स. (वाटाण्याच्या अक्षता तयार ठेवा).
सुशेगाद, बिधुनिक थँक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0