उसंत सखूंनी एक धमाल लेख टाकल्यावर त्यावर पृच्छा झाली.
त्यापेक्षा उसंत सखूगिरी करण्यासाठी कोणती औषधी घेता ते आम्हाला सांगा की!
आनंदाची गोष्ट म्हणजे हे औषध कसं तयार करायचं हे आम्हाला माहित आहे. एका कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री त्यांच्या कॉफीत थोडीशी बेलिज घातल्यावर त्यांनी अनवधानाने ती आम्हाला सांगितली होती. आणि सांगता सांगता त्या हळूहळू बेलिजमध्ये थोडीशी कॉफी घालण्यापर्यंत पोचलेल्या असल्यामुळे कॉपीराइट वगैरे विषयी काहीच बोलल्या नाहीत. त्याचा रास्त गैरफायदा उठवून मी ती जनहितार्थ इथे सादर करत आहे.
रेशीमबागेतून येणाऱ्या झुळझुळीत रेशमी भगव्या वाऱ्यांनी भगवी झालेली नागपुरी संत्री घ्यावीत. त्यांच्या फोडी आंबटशौकिनांना देऊन टाकाव्या, आणि सालीचा भरपूर ष्टॉक करून घ्यावा. मग येणाराजाणाराला आपल्या गोल गरगरीत साळसूद डोळ्यांची पिटपिट करून दाखवावी. या भोळेपणाने ते आकर्षित होऊन ते जवळ आले की अनपेक्षितपणे त्यांच्या डोळ्यात ती साल दाबून रस उडवावा. त्या झणझणणाऱ्या डोळ्यातून जे अश्रू गळतील ते जमा करावे. यांना संत्राश्रू म्हणतात. किमान दीड लीटर तरी असे संत्राश्रू लागतात.
एक चांगली भरभक्कम गलोल घ्यावी. नागिण - म्हणजे नाग नदी - वाहताना तिने टणाटण आपटून गरगरीत केलेले गोटे घ्यावेत. त्यांचाही भरपूर ष्टॉक करून ठेवावा. येणाराजाणाराला झाडाच्या आड लपून नेम धरून हाणावेत. असे गोटे शेंडीभोवतीच्या गोट्यांवर आपटलेले अर्थातच जास्त प्रभावी असतात. त्या अभागी पुरुषांच्या त्यांच्या तोंडून ज्या अस्सल वऱ्हाडी शिव्या निघतील त्यांचं टेपरेकॉर्डरवर रेकॉर्डिंग करावं. तसंच डोकं चोळताना झालेला विनोदी चेहेऱ्याचे फोटो काढून ठेवावेत. आपल्यासारख्याच चहाटळ आप्तमित्रमैत्रिणींसमवेत हे फोटो आणि आवाज चवीचवीने बघावेत/ऐकावेत. मग त्यातून जो खिदळण्याचा आवाज येईल तोही रेकॉर्ड करावा. या सगळ्या टेपा आणि फोटो जाळून त्यांचं भस्म करावं. याला गोटाभस्म म्हणतात. असं पाव किलो गोटाभस्म आवश्यक आहे.
पुढच्या घटक पदार्थासाठी एक खोटं फेसबुक अकाउंट घ्यावं. त्यासाठी काहीतरी सालस तरुणीचं नाव घ्यावं. त्यावर आपले म्हणून कोणत्याही तरुणीचे फोटो दणादण पोस्ट करावेत. काही गोग्गोड कविता टाकून आपण रसिकातल्या रसिक आहोत हे दाखवावं. 'पावसात भिजून मला उन्मुक्त व्हावंसं वाटतं, तुझ्या मिठीत विरघळून जावंसं वाटतं' टाइप रोमॅंटिक कविता उत्तम. म्हणजे चित्र असं निर्माण व्हायला हवं की कोणीही पुरुष दिसला की त्याच्या गळ्यात पडण्याची निंफॉटिक पर्सनॅलिटी असलेली एक तरुणी आपण आहोत. पण जालिम भारतीय समाजाच्या दडपणामुळे सगळ्या ऊर्मी दाबून टाकल्या गेलेल्या आहेत आणि वाफ साठल्यावर केवळ शिटी उघडण्याची वाट पाहणारा एक प्रेशर कुकर आहोत. या तुमच्या नवीन कॅरेक्टरला तुमचीच मैत्रीण करून घ्यावं, तुमच्याच ग्रुपांमध्ये इन्व्हाइट करावं. आणि अधूनमधून तुमच्या वॉलवर तिच्या कॉमेंटा येऊ द्याव्यात. हे दिसलं की तुमच्याच फ्रेंडलिष्टीतले अनेक बाप्ये लाळ घोटत तिच्याकडे मयत्तर्री मागायला येतील. ती खुशाल देऊन टाकावी. आणि त्यांच्या कवितांचं वगैरे कौतुक करावं. साहित्तिक मंडळी वगैरे असली की 'तुम्मी काय बब्बा, साहीत्तीक...' यासारखं काहीतरी लिहावं. साहित्य, कविता वगैरेंच्या फंदात न पडणारा कोणी ब्रिगेडी वगैरे असला तरी 'संभाजीसारखा मर्द मावळा आजकाल दिसून येत नाही' वगैरे कामेंटा त्यांच्याबरोबर सुरू झालेल्या मेसेजांत टाकाव्यात. मेसेजेस तेच सुरू करतील, तेव्हा काळजी नको. फारतर तुम्हाला त्यांच्या एखाद्या फोटोला लाइक वगैरे द्यावं लागेल. तेवढं करणं हे त्यांना आलिंगनासाठी केलेला भ्रुकुटीविभ्रम वाटतो. असो, तर मुद्दा असा की तुमच्या भोवती गोंडा घोळत अनेक लोक यायला लागतील. आणि तुमच्या मेसेज बॉक्सेसमध्ये तुम्हाला गोग्गोड काहीबाही बोलतील. ते सर्व पाच टवाळ मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करावं. त्यांच्याशी झालेल्या मेसेजांचे प्रिंटाउट घ्या आणि फोनवर झालेल्या संवादांचे रेकॉर्डिंग करा. या प्रिंटाउट्सचे कातरीने बारीक तुकडे करा. ते करताना पार्श्वभूमीला तो कुचाळक्यांचा आणि फिदीफिदी हसण्याचा आवाज ऐकत रहा. मग ते तुकडे मिक्सरमध्ये टाकून भुगा करून घ्या. याला फेस्भुगा म्हणतात. असा किमान पाव किलो फेस्भुगा आवश्यक आहे.
वरील तीन मुख्य पदार्थ असले तरी इतरही गोष्टी तुम्ही वापरू शकता. उदाहरणार्थ आसपास दिसणाऱ्या यडपट लोकांचे नमुने कुठच्या ना कुठच्या प्रकारे गोळा करा. फोटो, लिखाण, चित्रं काहीही. अगदी व्हॉट्सॅप, फेसबुकवर आलेले चांगले दर्जेदार फॉरवर्ड्स देखील चालतील. सगळ्यांचा सोयीप्रमाणे भुगा किंवा भस्म करून मुबलक प्रमाणात घ्या. किंवा तुमच्याचसारखे काही चक्रम मित्रमैत्रिणी जमवा. नागपुरात त्यांची कदाचित वानवा असेल म्हणून त्यांना भेटायला खास मुंबईपर्यंत प्रवास करा. त्यांच्यासाठी फक्कड नागपुरी संत्रा बर्फी आणि घमघमीत केवड्याचं अत्तर न्या. त्यांनी दिलेली बासुंदी-पुरी खा. आणि आख्खा दिवसा ह्या ह्या हू हू करून पुरेसं झालं नाही म्हणून पुढचे चार दिवस सगळ्यांनी मिळून त्या भेटीचं वर्णन लिहा. त्याचाही भुगा करून घ्या. हा लई ष्ट्रॉंग असल्यामुळे काही चमचे पुरतो.
सगळे पदार्थ जमले की ते घेऊन एखाद्या रम्य कोजागिरीच्या रात्री वनवन करायला जा. तिथेही काही कॅरेक्टरं दिसली तर पौर्णिमेच्या चंद्रम्याच्या प्रकाशात ती नीट निरखून पहा. कोणी पहात नसताना कॉफी करण्याच्या निमित्ताने एका मोठ्या पातेल्यात हे सगळे पदार्थ एकत्र करून ढवळा. चंद्रप्रकाशात ते उरलेली रात्र ठेवा. सकाळी घरी घेऊन या. मात्र कोजागिरीच्या रात्री जर तुम्हाला कोणी कॉफीमध्ये बेलीज घालून दिली तर सांभाळून रहा. तुमच्या औषधाचं गुपित फुटण्याची शक्यता आहे.
हे औषध तयार केल्यावर तोंड वाकडं करून पिण्याची किंवा खाण्याची बिलकुल गरज नाही. कारण हे औषध म्हणजे एंड प्रॉडक्ट नसून प्रोसेस आहे हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेलं असेल.