बागकामप्रेमी ऐसीकर : ३
आधीच्या धाग्यात ९०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा. घरगुती बागकामासंबंधित प्रश्न, शंका, विचार, माहिती, फोटो, योजना, कार्यक्रम, अपडेट्स इत्यादी गोष्टी या धाग्यात लिहिता येतील.
धागा क्र १, धागा क्र २
---
२५ जूनला रोचना यांनी बागकामाबद्दल धागा काढल्यावर उत्साहाने बागकाम सुरू केलं. त्यात अतिउत्साहाने बाझिलच्या बियांचं आख्खं पाकीट कुंडीत ओतलं. आणि त्यातली बहुतेकशी झाडं उगवल्यावर, हे फारच बाझिल झालं हे पण लक्षात आलं. आता बाझिलची ३०+ (बहुदा ३२) झाडं आहेत. आज चौथ्यांदा बाझिल खुडलं. टोमॅटो-बाझिल सूपपुरतं निघेल असं वाटलं होतं, पण एवढं बाझिल अजून काढलं की बऱ्यापैकी पेस्तो तयार होईलसं दिसतंय. झाडं इतपत वाढणार असतील तर कदाचित फ्रीज करून ठेवण्याइतपत बाझिल निघेलसं दिसतंय. हा फोटो -
काही रोपं इंचावर वाढली नव्हती. गेल्या आठवड्यात तरीही त्यांची वरची पानं खुडली. आणि आता त्या रोपांनाही नवीन पानं फुटून ती रोपं वाढताना दिसत आहेत. "तू चार पानं खुडलीस तर मी आठ पानं वाढवेन" असं काहीसं झाडांनी ठरवल्यासारखं दिसतंय. काही पानांवर तपकिरी ठिपके दिसत आहेत. इथे म्हटल्यानुसार पाणी घालताना पानं ओली राहिली, बागकामाची हत्यारं खराब असतील किंवा आसपास जंतूसंसर्ग होऊ शकेल असं असल्यास सूडोमोनास चिकोरी नावाचं फंगस (हे फंगस सूडो नाही हो!) येऊन असे ठिपके पडतात. शक्य तितकी काळजी घेऊन काही रोपांवर हे फंगस दिसतंच आहे. त्यामुळे फार खराब झालेली पानं खुडून फेकून देणं आणि छोटासाच भाग खराब असेल तर तेवढा भाग काढून सुपात टाकते. सुपात ते सगळं उकळलंही जातं.
---
टोमॅटो-बाझिल सुपासाठी ही पाककृती थोडी बदलून वापरते. या कृतीमधले कांदे, कॅन केलेले प्लम टोमॅटो आणि थाईम वापरत नाही. वस्तूंची प्रमाणं पहिल्यांदा मोजून घेतली, आता साधारण अंदाजानेच घेते. (अजून घरचे टोमॅटो असलेच तर पायाच्या करंगळीच्या नखाएवढेच आहेत त्यामुळे ते विकत आणलेलेच आहेत.) पण सूप छान होतं.
आशेवर झाडं जिवंत आहेत.
साधारण दीड महिन्यापूर्वी पेरलल्या वांग्याला अजूनही फक्त सहा-सात पानं आहेत. त्यातली नवीन तीन पानं "अमेरिकन" आकाराची झालेली आहेत, पण उंची तीन-चार इंचाच्या वर नसेल.
आता जरा 'थंड' होईल या आशेवर मटार पेरलेले आहेत. आधी ते बाहेर, गॅलरीत ठेवले तर काही बियांवरच खारींनी डल्ला मारला. आठ बियांमधून एक रोप आलं तर त्यांचा शेंडा कुरतडलेला दिसतो आहे. पण तरीही काही पानं दिसत आहेत. त्यामानाने घरात लावलेली रोपं चटकन उगवली आणि वाढत आहेत. सध्या पाणी पिण्याच्या प्लॅस्टीकच्या (साधारण ३०० मि.ली. आकाराच्या) पेल्याच्या बुडापर्यंत मुळं पोहोचलेली दिसत आहेत. ही रोपं तीन आठवड्यांची. कमाल तापमान ३२ अंश सेल्सियसच्या खाली उतरलं की मग ती बाहेर काढेन असं म्हणत्ये. तोपर्यंत घरातच ती बऱ्यापैकी मोठी होतील आणि खारींना फार स्वारस्य राहणार नाही अशी आशा आहे. मधल्या काळात, हौस आलीच तर स्वस्त (मस्त का नाही ते समजेलच) कार्बन फायबर आणून त्याचे सांगाडे बनवून झाडांवर जाळी टाकता येईल का, याचाही विचार करते आहे. याच काड्यांवर मटारचे वेलही चढवता येतील.
(सध्या, अंदाजे हिशोबानुसार केलेल्या खर्चाच्या दोन टक्के रक्कम खाऊन झाली.)
सेम हिअर
असचं काहीसं झालं आहे, ६ इंचापर्यंत लाल माती घातली, त्यात १ इंच शेणखत मिसळलं, त्यात परत भुसभुशीतपणा रहावा म्हणून ते ढमकं मिक्स घातलं, परत नारळाच्या शेंड्या वगैरे कापुन टाकल्या, आधी प्रोटेक्टेड कुंडीत रोपं तयार केली मग ती हळुवारपणे मातीत हलवली, पुरेसा सुर्यप्रकाश मिळेल अशाच जागेवर लावली, पाणीही घातलं जातयं, शेजारी भोपळ्याचा* वेल त्याच्यानंतर लावून माझ्या उंचीपलिकडे गेलाय पण मिर्ची मात्र एक वितच वाढली आहे.
हाच आजार गुलाबाला जडला आहे, त्यात मातीत मुंग्या झाल्या म्हणून त्यांची पावडर घालुन झाली, कडुनिंबाचा रस फवारुन झाला.
*वेल भोपळ्याचा असावा अशी शंका आहे, म्हणजे न लावताच आला आहे, पण बघणार्या प्रत्येकाने मला हा वेल भोपळ्याचाच आहे असं सांगितलं. असो.
मटारचे कोंब
सगळ्यात डाव्या बाजूचा पेला कोंब फुटेपर्यंत स्वयंपाकघरात, गॅसपासून लांब, ओट्यावर होता. मधला पेला खिडकीच्या तावदानावर पण एसी खोलीतच होता. आता हे दोन्ही खिडकीत आहेत, तिथे दुपारी दोन-तीन तास, काचेतून सूर्यप्रकाश येतो. पण आत साधारण २७ अंश से. तापमान असतं. दोन्ही पेले नेहेमी पाण्यातच असतात. सगळ्यात उजवीकडे दुधाचा गॅलन आहे. (घरात रंग सापडले म्हणून ते ही त्या गॅलनला फासले.) हे कोंब वरून कुरतडल्यासारखे दिसतात - फोटोत अगदी उजव्या बाजूला, कोंबाच्या उंचीच्या मध्यात कुरतडलं आहे. त्या बिया/मटार २४ तास पाण्यात भिजवून, मातीत घातल्या आणि तेव्हापासून बाहेरच आहेत. सध्या आमच्याकडे तापमान २४०-३८० से असतं.
पेल्यांमध्ये प्रत्येकी दोन मटार होते त्यामुळे दोन कोंब आहेत.
(फोटोवर क्लिक केल्यास मोठा फोटो दिसेल.)
हरिश्चंद्राची फॅक्टरी (अवांतर)
मटारांची रोपे पाहून 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' चित्रपटातला एक मार्मिक प्रसंग आठवला.
फाळके एकदा बायकोची जबाबदारी घेत स्वयंपाक करतात, जो कुणालाच खाववत नाही. त्यावेळी जेवणाच्या पानातील एक मटार उचलून, "आता शेती करायची.... एका मटाराची !", असे म्हणत एक मटार कुंडीत पेरून उगवणारे कोंब हे रोपात प्रहरागणिक कसे बदलत जातात याचे चित्रण करण्याची कल्पना त्यांना सुचते. दिवसाच्या विशिष्ट वेळांना एक-एक करीत टिपलेल्या दृश्यांची एक सलग चित्रफीत बनते नि ती पाहून प्रेक्षक अवाक होतात. निव्वळ थोर कल्पना !
रबी ची पेरणी
येत्या थंडीतल्या मोसमासाठी कोणत्या भाज्या लावायचा विचार आहे? परवा काही बिया विकत घेतल्या, आणि साथी-फसल बेसिस वर थोडा विचार करून एकाच कुंडीत कोणकोणत्या भाज्या लावायचा हा बेत आखला. आज-उद्या मिर्ची, टोमॅटो आणि वांग्यांच्या बिया मातीच्या छोट्या चहाच्या कपमधे पेरणार आहे. येथील एका देशी बियाण्यांच्या उत्सवात वांग्यांच्या अनेक देशी प्रजाती पहायला मिळाल्या. चमत्कारिक नावं - वनमाला, मुक्तकेशी, लुटकी, काटा, बुलेट, वगैरे. वांगी लावण्याचा प्रथमच प्रयत्न आहे, बघू काय होतं ते.
प्रत्येक कुंडीत एक फळभाजी, एक पालेभाजी अथवा मूळ-भाजी आणि जमल्यास एक छोटे हर्ब / फुलाचे झाड लावायचा विचार आहे:
टोमॅटो - बॅजिल - झेंडू
टोमॅटो - गाजर - चाइव्स
टोमॅटो - कोथिंबीर
मिर्ची - कोथिंबीर
मिर्ची - मोहरी
कार्ल - मुळा - चाइव्स / झेंडू
फरसबी - मेथी
फरसबी - चाकवत
फरसबी - पिडिंग (स्थानिक, छोटी मेथी)
मटार - लेटस - शेपू
मटार - पालक - मुळा
वांगं - पालक
वांगं - राजगिरा
वांगं - आंबट चुका
गेल्या मोसमात पालेभाज्यांची, आणि स्थानिक चवळीच्या शेंगांची लागवड यशस्वी झाल्याने खूप उत्सुकता वाढली आहे. पण टोमॅटो वगैरे कधीच (यशस्वी रित्या) लावले नाहीत, त्यामुळे स्ट्राइक-रेट काय असेल माहित नाही!
अरे वा
प्रत्येक कुंडीत एक फळभाजी, एक पालेभाजी अथवा मूळ-भाजी आणि जमल्यास एक छोटे हर्ब / फुलाचे झाड लावायचा विचार आहे:
सुचवल्याबद्दल धन्यवाद, 'मटार - पालक - मुळा' हे कॉम्बिनेशन मला डुएबल वाटत आहे, मीही प्रयत्न करेन.
पण टोमॅटो वगैरे कधीच (यशस्वी रित्या) लावले नाहीत,
आंगणातल्या मातीत प्रचंड काळ्या मुंग्या झाल्याने सगळ्याच रोपांच्या मुळांच नुकसान झालं, त्यामुळे आता रोपं काढून मातीत मुंग्यांची(किटक-रेसिस्टंट) पावडर मिसळणार आहे(येत्या १५ दिवसात वगैरे), त्यामुळे टोमॅटोची सगळी रोपं मेली, मिरच्या वाढत आहेत, सध्या दिड-वित हि प्रगती आहे.
पाऊस कमी झाल्याने मॉइश्चर थोडे कमी होईल मग काही प्रयोग करता यावेत.
नाही शेवटी कंटाळून उपटली,
नाही :-( शेवटी कंटाळून उपटली, आणि पानांची भाजी करून खाल्ली. पण शेजारी देशी बॉर्बोटी वाढत होती तिला मात्र भराभरा फुलं येऊन दहाबारा शेंगा आल्या, आता तिचा उत्साह संपला वाटतं.
मी यंदा फरसबीच्या दोन प्रकारच्या बिया आणल्यात - एक झुडपं आणि एक वेल. महिनाखेरला दुर्गा पूजेच्या वेळेस बाहेरगावी जाणार आहे, तेथून परतल्यावर लावणार आहे. तोवर तापमान थोडं कमी होईल अशी आशा आहे, आणि टोमॅटो-मिर्ची-वांग्यांच्या बियांना अंकुर फुटले तर ते देखील मोठ्या कुंड्यांत लावणार आहे.
मागच्या आठवड्यात आलेल्या
मागच्या आठवड्यात आलेल्या अकाली हिमवादळाने बागेची अपरिमित हानी झाली. सर्वसाधारणपणे आमच्याकडे सप्टेंबर हा शिशिराच्या सुरुवातीचा महिना असल्याने दिवसा बरे तापमान असते आणि रात्री थंड असतात. या हवेत मेथी बरी येऊ शकते म्हणून मी ऑगस्टच्या अखेरीस लावली होती आणि चांगली उगवूनही आली होती. पण मागच्या आठवड्यात फूटभर बर्फ पडला आणि चांगला दोन दिवस टिकला. मोठ्या झाडांची पाने गळायच्या आधीच, जड, ओला बर्फ पडल्याने, त्याच्या वजनाने काही जुनी मोठी झाडेही कोसळली आणि जवळजवळ सर्वच झाडांच्या फांद्या तुटल्या. इतके सगळे नुकसान झाल्यावर मी बागेकडे पहाताना "झाले. आता आठ महिने तिकडे फिरकायला नको" म्हणून नि:श्वास टाकला. पण दोन दिवसांतच हवा पुन्हा उबदार झाली, बर्फ वितळला म्हणून सहज कम्युनिटी बागेत चक्कर टाकली तर काय आश्चर्य, मेथी चक्क जिवंत आहे! मेथीच्या जिवटपणाला सलाम!
बटाट्याच्या झाडांचे शेण झाल्याने बटाटे उकरावे लागले नाहीतर अजून थोडे दिवस ठेवणार होते. चार जुन्या बटाट्यांना कारणी लावण्यासाठी घेतलेले पीक चांगलेच आले. तीन-चार झाडांतून दीड किलो फिंगरलिंग बटाटे निघाले. त्यातल्या एका मानवी बटाट्याचा फोटो आणि जिवट मेथी (आणि पार्स्ली)चा फोटो खालीलप्रमाणे,
मानवी बटाट्याचे हातपाय चांगले
मानवी बटाट्याचे हातपाय चांगले दणकट दिसताहेत! मी त्या हिमवादळाचे फोटो फेसबुकवर पाहिले, बरेच नुक्सान केले असावे.
गेल्या शनिवारी आम्ही (चार चौघं हौशी माळी मंडळी) स्थानिक बियाण्यांचा एक उत्सव आयोजित केला होता. परसबाग सुरू करण्यासाठी एक छोटेसे प्रशिक्षण शिबिर, कंपोस्टिंग आणि सेंद्रीय शेतीबद्दल माहिती, आणि बियाण्यांची विक्री. धमाल प्रतिसाद मिळाला. लोकांना एकूण भाज्यांवर लावल्या जाणार्या विषारी कीटनाशकांबद्दल खूप काळजी आहे, पण पर्यायांबद्दल नीट माहिती नाही, स्वत: भाज्या उगवायची इच्छा आहे पण कसे-काय ते माहित नाही हेच ठासून दिसले. देशी बियाणे, पालेभाज्या, वगैरेंची चांगली विक्री झाली. सर्वात आनंददायी म्हणजे कित्तेकांनी घरातील ओला कचरा जिरवून कंपोस्ट करायचा प्रयत्न केला होता, पण वास-आळ्या-चिलटांमुळे सोडून दिला होता. एका-दोघांनी आम्हाला कंपोस्टिंग आणि परसबागेबद्दल त्यांच्या हौसिंग सोसायटीत शिबिर घ्यायला बोलावलंय. बाग राहिली पुढे, दोन-ती मोठ्या सोसायट्यांनी ओला कचरा जिरवायची जबाबदारी घेतली तरी या शहरावर खूप उपकार होतील :-) एकूण मला हे सर्व बघून खूपच हुरूप आला. मला चांगले गांडूळ-खत आणि तांदूळ आणि गहू सेंद्रीय पद्धतीने उगवून विक्री करणारा एक स्थानिक शेतकरी भेटला. इथल्या काही देशी सुगंधी तांदळाच्या खिरीची चव काही औरच असते!
मलाही बटाटे लावून पहायचे आहेत. एक मोठं ज्यूटच पोतं आणून त्यात लावायचा विचार आहे, पण आधी तीन-चार डोळेवाल्या बटाट्यांना मोड आणायला हवी.
अरेच्चा!
हा धागा अचानक सापडला.
मग क्रमांक १,२ चे ह्याचे पूर्वज धागेही वाचून काढले.
बागकाम हा आवडीचा विषय आहे, त्यात थोडंफार डॅबलिंग केलेलं आहे, अजूनही करतो. त्यामुळे समान रुची असलेल्यांचा हा धागा पाहून बरं वाटलं.
आता मी ही इथे नेमाने येत जाईन जाणकारांचे अनुभव वाचायला...
इन बीटवीन द सीझन
जरूर. पण सध्या दोन सीझनच्या मध्येच आहे ना!
यावर्षी उन्हाळ्यात मिरची, टोमॅटो आणि फरसबी लावली होती. त्यातले शेवटचे काही टोमॅटो टिकून आहेत अजून...
आता फॉलमध्ये पुन्हा नांगरून मग हिवाळी लागवड करीन तेंव्हा फोटो काढीन...
यावेळेस रोमेन लेट्यूस, मेथी आणि मटार लावायचा विचार आहे, बघू...
मुद्दाम भाज्यांचे असे फोटो अजून कधी काढले नाहीत हो! फुलझाडांची आणि फळझाडांची गोष्ट वेगळी...
अजवैन, ओवा, वगैरे मधे मला
अजवैन, ओवा, वगैरे मधे मला नेहमी गोंधळ होतो. दोन वेगळ्या प्रजाती आहेत - trachyspermum ammi आणि trachyspermum copticum. दोन्हींना अजवैन, ओवा अशी नावं आहेत. अडकित्तांच्या फोटोत आहेत तशी पानं बारीक, नाजुक असतात - महाबळेश्वरच्या केसरी गाजराला असतात तशी - गाजर, सेलरी, पार्सली, अजवैन हे सगळे एकाच Apiaceae जातीतले.
सेलरी (apium gravioleae) आणि अजवैन च्या बिया सारख्याच दिसतात, पण चव अगदी वेगळी लागते.
अॅनीस (Pimpinella anisum) देखील याच जातीचे आहे, पण चव धनंजय म्हणाला तसं बडिशेप सारखी (fennel).
याहून पान ओवा म्हणजे coleus aromaticus वेगळाच. याच पान-ओव्याच्या बिया ओवा म्हणून जे खातो ते वाटलं होतं, पण ते वेगळंच झाड आहे, फक्त चव ओव्यासारखी लागते.
अनीस म्हणजे बडीशोप. ओवा,
अनीस म्हणजे बडीशोप.
ओवा, अजवाईन = सेलरी असे नेटवर वाचले. ओवा रुजायला कठीण असेही वाचनात आले.
रात्रभर भिजवून मग तो ओवा रुजवल्यावर जे काय कुंडीत आलंय त्याचा तो फोटो आहे. झाड मोठे झाल्यावर समजेलच, की नक्की काय उगवतंय. ही नुसती कोवळी पानं खाऊन पाहिलीत तर इंटरेस्टिंग चव लागतेय.
धनंजय म्हणताहेत ते खरे असेल तर बाजारात मिळते तशी सेलरी उगवणार नाही कदाचित.
भोके
मिरच्यांची रोपे वितभर उंच तर झालीयेत पण आता काही मोजक्या पानांवर लहानशी भोके दिसताहे.
काल एकेक पान हाताने धुवून काढले. (एकुण पर्ण संख्या फार न वाढल्याने हे सध्या तरी सहज शक्य आहे). मात्र कोणत्याही पानावर एखादा किडा किंवा अंडी किंवा इतर काही संशयास्पद आढळले नाही.
काही अस्थायी/उडणार्या किड्यांचा हा प्रताप असेल का?
अशावेळी काय करावं? का आता काही करणे शक्य नाही?
बीअर ट्रॅप
सर्वत्र बीअर ट्रॅपचे सजेशन आहे
या पानावर बीअर ट्रॅपऐवजी पाण्यात यीस्ट मिसळून त्याचा ट्रॅक करण्याचा पर्याय दिला आहे.
घरी यीस्ट असल्याने तो प्रयोग आज करून बघेन
"मी" तुम्हाला खर्या बीअरचा ट्रॅप घरी करणे शक्य असल्यास मला रिझल्ट सांगाल का? रिझल्ट आल्याशिवाय घरच्यांना (माझ्या वडिलांना) घरी बीअर आणण्याचे कारण पटवणे कठीणे ;)
एखादा फोटो डकवता येईल
एखादा फोटो डकवता येईल का?
एक-दोन दिवसात प्रयत्न करतो.
"मी" तुम्हाला खर्या बीअरचा ट्रॅप घरी करणे शक्य असल्यास मला रिझल्ट सांगाल का?
बिअर मिरच्यांवर वाया घालवण्याबद्दल घरात अनेक मतप्रवाह असल्याने तुर्तास कडुनिंबाच्या रसाचाच प्रयोग करण्यास अनुमती आहे, तरी प्रयत्न करुन कळवतो.
काही नवीन फोटो
फळे, भाज्या आणि कंद वगैरेची तोडणी झाल्यावर काढलेले काही फोटो इथे लावतेय,
फिंगर्लिंग बटाटे आणि गाजरे
बदकरुपी बटाटा
मेथी आणि मटाराचा पाला
हिमवादळानंतरही टिकलेल्या मेथीचे पीक चांगलेच आले आणि आता त्याला फुलेही येऊ लागल्याने उरलेली मेथीही कापून आणणार आहे. मटाराच्या शेंगात आता काही दाणे भरणार नाहीत म्हणून मटाराचा पालाच (कोवळा) खाऊन घेतो आहोत. मेथी आणि मटाराचा पाला मिसळून पीठ पेरून केलेली भाजी फार मस्त लागते, मेथीच्या किंचित कडवटपणाबरोबर मटाराच्या पाल्याची गोडसर चव फार छान लागते. ही भाजी करताना तेल आणि पीठ सोडून वापरलेले इतर सर्व जिन्नस म्हणजे कांदा, मिरच्या, लसूण हेही सर्व बागेतलेच ताजे होते. आता या वर्षीपुरते बागकाम संपले आहे. शेवटची लसणाची पेरणी करून झाली आहे, आता बर्फ पडला की बर्फाच्या आच्छादनाखाली लसूणाची मुळे जमीनीखाली वाढत रहातील आणि त्याला वसंतात कोंब फुटतील. इथल्या हवेत हिवाळ्याआधी पेरणी केलेला लसूण अधिक चांगला येतो असे समजल्याने ही पेरणी केली आहे. आता पुढच्या आठवड्यात वाळलेल्या पानांनी वाफे झाकून टाकायचे आणि थेट वसंतात बागकामाला पुन्हा सुरवात करायची.
मस्त!
माझेही बागकाम संपल्यात जमा आहे. जमल्यास मीही लसूण पेरून बघते आता. यावर्षी पुढच्या वर्षीकरता काही रोपे कलम करायची असा मनसुबा होता, पण जमले नाही. अजूनही वांगे, फरसबी आणि भोपळी मिरची येते आहे बागेत. ते बहुदा शेवटचे पीक असेल.
यावर्षी याशिवाय घरचे टोमॅटो, अळू, मिरची, चवळी व कांद्याची पात खायला मिळाली.
माफिया गँग!
आमच्याकडच्या कठीण हवामानात, 'रेड रशियन', 'व्हाईट इटालियन', 'हार्डनेक' असल्या माफिया गँगसारखी नावे असलेल्या लसणांच्या जाती चांगल्या येतात त्यामुळे त्याच यावर्षी लावल्या आहेत. सध्या (बर्फ वगैरे पडायला लागण्याआधी) लसूण लावायला चांगला मौसम आहे त्यामुळे आवश्य लावा. किडे-आळ्या-हरणे-ससे वगैरे लोक लसणाच्या फारसे मागे लागत नसल्याने ते आपल्या पदरात पडण्याची शक्यता जास्त असते. चांगल्या पोताच्या मातीत, तीन ते चार इंचाखाली लसणाची एकेक पाकळी (सालीसह) पुरली की झाले, फक्त जेंव्हा लावायचे तेंव्हाच लसणाचा (चांगला सशक्त) गड्डा फोडायचा. खूप खंडी पडण्याआधी, या वाफ्यावर थोडी वाळलेली पाने, वाळलेले गवत वगैरे पसरून टाकले तर त्याचा त्यांना ऊबदार रहायला फायदा होतो. गंमत अशी की जिथे शून्याच्या खाली दहा अंशाखाली तापमान जातं अशा प्रदेशात बाहेर कुंडीत काही टिकत नाही पण जर मातीत पेरल्या तर मात्र ह्या गोष्टी चांगल्या उगवतात. चाईव्ह्ज पेरायलादेखिल हा आताचा शिशिराचा काळ चांगला आहे. वसंतात सर्वात आधी (ट्यूलिप्सच्याही आधी) चाईव्ह्ज उगवतात, त्याची पात खायला तर चांगली लागतेच पण त्याची निळी फुलेही फार सुंदर दिसतात.
झकास
बदकरुपी बटाट्याला छोट्या गाजराची सोंड लावून गणपती बनव.
माझा एक टोमॅटो अतिपावसाने गेला. तीन-चार टोमॅटो धरले होते, पण पुढे काहीच मिळालं नाही. पुढच्या वर्षाकरता धडा तरी मिळाला. अजून दोन चेरी टोमॅटो व्यवस्थित आहेत. एकाला बरीच फुलं लागली आहेत. (या झाडावर आधी बुरशी येऊन वाढ अगदीच खुंटली होती.)
बेझिल अजूनही भरपूर आहे. मटारची बहुतेकशी रोपं खारींनी खाल्ली, पण अजूनही दोन टिकून आहेत. हवा आता थोडी थंड होत्ये, पण दोन दिवस गुलाबी थंडी पडल्यावर आता पुन्हा आठवडाभर ३०० से पर्यंत तापमान असेल. खारींनी खाल्लेल्या मटारच्या कुंड्यांमध्ये बीट पेरायचा विचार आहे. ते खारींनी खाल्लं नाही तर काहीतरी मिळेल. वांग्याची झाडं दीड-दोन फूट वाढली आहेत. पाकीटावर लिहिल्यानुसार ऑक्टोबरच्या शेवटी वांगी यायला पाहिजेत, पण अजून फुलांचाही पत्ता नाहीये.
कंपोस्ट करायला लागल्यापासून घरातून बाहेर जाणारा कचरा निम्म्यापेक्षाही कमी झाला आहे. ते सुद्धा आता चाळायला तयार आहे असं दिसतंय, दिवाळीनंतर तो उद्योगही करेन.
---
इथे प्रतिसाद लिहून बाहेर डोकावले तर उरलेली दोन मटारची रोपं गायब. यापुढे मटार लावणार नाही. किंबहुना खाणेबल पाला वाढवणं कठीण दिसतंय. पण मेथी कडवट असते त्यामुळे प्रयत्न करेन म्हणत्ये.
मस्त
पहिला फोटो खास आवडला.
दोन प्रश्नः
१. मटार हिवाळ्यात घेतात ना? असं ऐकलं आहे. तुम्ही उन्हाळ्यात घेतलीत तर कशी आली? कदाचित तुमच्याकडे बर्फ पडतो म्हणून घेतली असावीत.
तुम्ही कुठल्या झोनमध्ये रहाता? (अगदी तुम्ही कुठे रहाता असं डायरेक्ट कसं विचारणार म्हणून झोन विचारतोय!!) :)
२. लसूण तयार व्हायला जवळजवळ वर्ष लागतं असं ऐकून आहे, तुमचा अनुभव काय आहे?
ध्रुवं
१. मटार हिवाळ्यात घेतात ना? असं ऐकलं आहे. तुम्ही उन्हाळ्यात घेतलीत तर कशी आली? कदाचित तुमच्याकडे बर्फ पडतो म्हणून घेतली असावीत.
तुम्ही कुठल्या झोनमध्ये रहाता? (अगदी तुम्ही कुठे रहाता असं डायरेक्ट कसं विचारणार म्हणून झोन विचारतोय!!)
हवामानाच्याबाबती त्या उत्तर ध्रुवावर राहतात अशी खात्रीलायक माहिती आहे! त्यामुळे त्यांच्याकडे बारमाही मटार असायला हरकत नसावी! ;-)
बरोबरचे!
पुण्याची मटार उसळ मंडळी सगळी अमेरीकेला गेली आणि आता अमेरीकेची परिस्थिती पाहता कॅनडावाले लोक चैनच करताहेत. तेव्हा मटार उसळ अन शिक्रण सद्ध्यापुरते तरी कॅनडाकडेच ठेवायला हरकत नाही! ;-)
अवांतर पुरे करतो, नाहीतरी ही बागकामवाली मंडळी जंतूनाशकं फवारतील माझ्यावर!
आमचा उन्हाळा, तुमचा उन्हाळा.
मी कॅलगरीत रहाते, आमच्याकडे हिवाळ्यात फक्त सुचिपर्णी झाडे जिवंत रहातात :-)(उणे तीस सेल्सियसला अजून काय रहाणार म्हणा!) पण उन्हाळ्यात हवा +तीस अंशाच्या वर सहसा जात नाही. मटार आम्ही साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यात पेरतो (कारण तो फ्रॉस्टचा शेवटचा दिवस मानतात) आणि जून हा आमचा स्प्रिंग असल्याने मटार चांगले उगवतात, मग ऑगस्टपर्यंत तयार होतात. यावेळी मटार येऊन गेल्यावर ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यात दुसरे पीक येईल का हे पहायला पुन्हा लावले होते. उगवून आले, शेंगाही आल्या पण आता गार व्हायला लागले आहे त्यामुळे दाणे भरत नाहीयत म्हणून पालाच खाऊन घेतो आहोत.
लसूण आत्ता लावलाय तो पुढच्या ऑगस्ट्पर्यंत तयार होईल पण हे आमच्या उत्तर ध्रुवावर! इतर गरम हवेच्या ठिकाणी स्प्रिंगच्या सुरवातीला लावलेला लसूण उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत तयार होऊ शकतो असे वाटते पण नक्की कल्पना नाही.
सुरेख!
वाह, छान पिक आलंय! एका बटाट्याचे साधारण किती बटाटे येतात? मला यंदा लावून पहायचाय. सिमेंटच्या मोठ्या पिशव्या येतात त्यात लावून बघायचं म्हणतेय, म्हणजे वाढेल तशी माती घालून झाकता येईल आणि पिशवीचे गुंडाळे सोडता येतील. सध्या घरातल्या एका बटाट्याला चांगले डोळे आलेत, तोच पेरला तर किती येऊ शकतात?
टोमॅटो आणि वांग्यांचे कोंब चांगले फुटलेत - पुढच्या आठवड्यात काही दिवस गावाला जायच्या आधी त्यांना मोठ्या कुंडीत हलवून काही बीन्स आणि पालेभाज्या लावणार आहे - मेथी, पालक, आंबट चुका, चाकवत, पिडिङ (हिला इथे छोटी मेथी पण म्हणतात)... परत येईपर्यंत सगळे जीवंत राहील याची आशा आहे.
वेगवेगळ्या जातींप्रमाणे यिल्ड
मी वेगवेगळ्या जातींचे जुने सात-आठ बटाटे लावले होते, त्यातल्या पाच बटाट्यांची झाडे झाली. जे मोठे बटाटे लावले होते त्याला एका झाडाला पाच-सहा भलेमोठे बटाटे आले पण फिंगर्लिंगच्या एका झाडाला वीस-बावीस बटाटे तरी मिळाले. सगळे मिळून (सर्व झाडांचे) तीन किलोतरी बटाटे निघाले असतील. कम्युनिटी गार्डनच्या सामायिक जागेतही अनेक बटाट्यांची झाडे लावली होती त्याचे बटाटे अजून काढले नाहीत पण ते काढले की अजून चांगला अंदाज येईल. बटाटे लावणे हा फार सोपा प्रकार वाटला आणि आवडला, फारशी निगा वगैरे राखायला लागत नाही आणि नंतर भेटवस्तूंची पाकिटे उघडायला जी मजा येते तशीच मजा बटाटे उकरताना येते :-).
गावाला जाताना झाडांना पाणी घालायला असले काही करता येईल का पहा. मागच्या वर्षी आठवडाभर गावाला जाताना नवर्याने असले काही प्रयोग केले होते आणि येईपर्यंत झाडे जिवंत होती अर्थात त्यावेळी पाऊसही होऊन गेला होता त्यामुळे नक्की कशामुळे झाडे जगली ते कळले नाही.
हा पिडिड प्रकार काय आहे ते पाहिले पाहिजे.
बाटलीचा प्रयोग मागे यशस्वी
बाटलीचा प्रयोग मागे यशस्वी झालाय, पण या वेळी आठवड्यापेक्षा अधिक वेळेसाठी जातेय म्हणून नवर्याला दर दोन दिवसांनी पाणी घालण्याबाबत बजावून ठेवलंय. बाटलीपेक्षा डिपेंडेबल ठरतो का हे आता बघायचे :-)
ता.क.: पिडिङ ला trigonella corniculata l नाव आहे असं वाटतं. मेथी trigonella foenum-graecum L; तिचाच जवळचा प्रकार. थंडीत इथे भरपूर वाढतो.
सध्या घरातल्या एका बटाट्याला
सध्या घरातल्या एका बटाट्याला चांगले डोळे आलेत, तोच पेरला तर किती येऊ शकतात?
आमच्याकडे बटाट्यांना अनेकदा डोळे आलेले दिसतात. तसे बटाटेच पेरायचे असतात होय! मला वाटायचे बटाटे हे मूळ असल्याने झाडावर वेगळी फुले व बियाही येत असतील :)
आमच्या अज्ञानाचे प्रदर्शन पुरे.
किती जागा लागेल? बहुदा हे कुंड्यांत घेण्यासारखे पीक नसावे. करेक्ट?
डोळे आलेल्या बटाट्याला दोन
डोळे आलेल्या बटाट्याला दोन भागात आडवा चिरून, डोळे वरच्या बाजूला आहेत याची खात्री करून तो जमिनीत पेरायचा.
कुंड्यांत घेण्यासारखे नक्कीच आहे, पण बटाटा जसा वाढत जातो तसा त्याला मातीने झाकत जावे लागते. त्यामुळे भली मोठी कुंडी तरी हवी, नाहीतर दोन अडीच फुटाची खोलगट पिशवी (सिमेंटची पोती असतात तशी) घ्यायची. कडेने गुंडाळून १२" खोलीची ठेवायची. त्यात बटाटा पेरायचा. फार खोल पेरायचा नाही, ४-५" खोली बस.
मातीतून ३-४ " रोप डोकवायला लागला, की माती घालून झाकायचे, एक दीडच इंच बाहेर ठेवायचे. भरलेल्या मातीसाठी गुंडाळी थोडीशी सोडवायची. असे करत जायला लागते. रुची, पिकलेले बटाटे तयार व्हायला साधरणतः किती वेळ लागतो ?
डिस्केमरः अर्थात मी पहिल्यांदाच करणार आहे, हे आम्हाला वर्गात दाखवले होते :-) आमच्या गुरुजींनी जुन्या टायर मधे लावले होते. रोप वाढत गेलं तसं नवीन टायर वर रचून माती घालत जायचे.
नांगरट
गेल्या आठवड्याला जुनी टॉमॅटो, मिरची वगैरेंची झाडं उपटून टाकून जमीन हिवाळ्यासाठी नांगरली...
दोन वाफे नांगरून पूर्ण केलेत, तिसरा अजून करायचा आहे...
तिसर्याला काम जरा जास्त आहे, दोन वाफे करतांनाच कंबर मोडायला आली म्हणून काम थांबवलं! :)
तिसरा बहुतेक या वीकेन्डला करीन...
हिवाळ्यात काय लावावं? सध्या रोमेन लेट्यूस, मेथी, मोहरी आणि केल लावायचा प्लान आहे...
अजून आयडिया द्या...
हिवाळ्यात शेती?
तुम्ही कुठल्या झोनमध्ये रहाता? :-) हिवाळ्यात शेती करताय म्हणजे कॅलिफोर्निया रहाता वाटतं!
गरम हवामानात रहात असाल तर बीट्स, स्विस चार्ड, पालक, मटार, सोरेल हे सगळं हिवाळ्यात छान येईल. सोरेल तर लावाच, मस्त आंबटसर पातळ भाजी करता येते आणि सोरेल वगैरे शक्यतो बाजारात फार मिळतही नाही.
आणि हो..बाकी काहीही लावा पण भेंडी लावताना दहा वेळा विचार करा!
मालीबू जवळ
होय, मी दक्षिण केलिफोर्नियात रहातो. आमच्याकडे हिवाळ्यात काही मोजकी शेती करता येते...
ओकराची न्यूज फनी आहे!!! :) माझा अनुभव असा की ओकरा लावायला सोपा, पण फार जागा खातो.
कुटुंबाला भाजी पुरायची म्हणजे बरीच रोपं लावावी लागतात आणि मग ती खूप जागा खातात!!! :(
मी यापूर्वी कोबी-फ्लावर घेतले आहेत पण अनुभव मिश्र आहे...
सोरेल हा काय प्रकार आहे? कधी ऐकला नाही....
सोरेल सूप + स्कॅलप्स
अलीकडेच मिलवॉकीतल्या सॅनफर्ड नावाच्या रेस्तराँमध्ये Seared स्कॅलप्स + (टोमॅटो+वॉटर-चेस्टनेट+क्रीम)चा बेस + त्याहीखाली सोरेलचे सूप अशी एक डिश चाखायला मिळाली, तेव्हा सोरेलची किंचित मिरमिरीत अशी चव आवडून गेली होती. त्याबद्दल अधिक विचारलं असता, सोरेलचे watercressशी साधर्म्य असून सूप करताना ते किंचित कमी शिजवल्यास उत्तम, हे ज्ञान पदरी पडलं.
थॅन्क्यू सो मच, अदिती!!
मेथी पेरली होती तिची काल काकूने मेथीडाळ केली. आता नवी बॅच पेरायला हवी या वीकेन्डला...
आणखी मोहरी आणि काबुली चणे पेरले होते. मोहरीची छोटी-छोटी रोपं उगवून आली आहेत. मात्र बहुतेक काबुली चणे खारींनी उकरून खाऊन टाकले! :(
काल नव्या वाफ्यात मटार आणि चवळी पेरली आहे; बघू त्यांचं काय होतंय ते!!
खूप दिवसांनी ऐसीवर आले....
खूप दिवसांनी ऐसीवर आले.... धाग्यांचा बॅकलॉग प्रचंड आहे!
सीझनचा पहिला टोमॅटो दिसतोय, दोन प्रकारची मुळं चांगली उगवली, आणि पावटा भरपूर लागलाय. अजून वांग्यांना फुलं आली नाहीत. कायकी पालेभाज्यांचे यंदा कुछ जम्या नाही, आणि कोथिंबीर मिरचीचं आणि माझं वा़कडं ते वाकडंच चालू आहे.
बटाटे पण लावलेत, पण नेमके कधी उकरून घ्यावे हे माहित नाही - तीन महिने तरी पिकायला हवेत, नाही का?
आंबे हळद आणि आलं पण अजून एका महिन्यात तयार होतील असं वाटतं.
बटाटे मस्त आहेत. मागच्या
बटाटे मस्त आहेत. मागच्या वर्षी याच महिन्यात कोनफळ (रताळ्यासारखे आतून जांभळे) आणले होते. त्याचा वेलाकडचा इंचभर तुकडा कापून वेगळा ठेवला होता. एप्रिलमध्ये त्याला फुटवे आले मग दोन किलोच्या प्ला पिशवीत लावले होते. आता वेल पिवळे पडू लागल्यावर पिशव्या फोडल्या बटाट्या एवढी कोनफळे आली आहेत.
कोनफळ काढल्यावर
कोनफळ! तोंडाला पाणी सुटलं.
कोनफळ! तोंडाला पाणी सुटलं.
थंडीच्या दिवसांत ही कोनफळं बाजारात येतात. त्यांच्या साली काढण्यासाठी अनंत संयम पाहिजे. पण तेवढं काम केलं की मग जाडसर काचऱ्या करायच्या आणि तूप-जिरं-हिंगाच्या फोडणीवर परतायच्या. चवीला मीठ घातलं की त्याला थोडं पाणी सुटतं. झाकण ठेवून शिजवायचं. काट्याने एकेक तुकडा तोंडात टाकत स्वर्गसुख अनुभवायचं.
(दुर्दैवाने) अनेकांना हे
(दुर्दैवाने) अनेकांना हे माहित नसतं, अचरट यांनी कोनफळाचं वर्णन - रताळ्यासारखं जांभळं - असं लिहिलंय यात काही आश्चर्य नाही. भारतात भाजीबाजारातही मोठ्या प्रमाणावर कोनफळ बघितलेलं नाही.
आमच्याकडे आईबाबा दोघांनी एकत्र मिळून फक्त हीच पाकृ बनवली. चार (खादाड) लोकांसाठी कोनफळ बनवायचं तर ते सोलण्यात दोघांची बहुतेकशी सकाळ संपून जायची.
रातराणी
'रातराणी'संबंधी माहिती हवी आहे -
ही फुले येण्याचा वर्षातला विवक्षित असा काळ आहे का ?
मराठी विश्वकोशात पुढील विधाने सापडली -
१. फुले जुलै-सप्टेंबरमध्ये पानांच्या बगलेत व शेंड्याकडील मंजिरीवर येतात.
२. फुलांचा बहार जानेवारी ते एप्रिलमध्ये येतो व तो दोन-तीन आठवडे टिकतो.
फुले येणे आणि फुलांचा बहार येणे ह्या एकच क्रिया असतील तर ही परस्परविरोधी विधाने आहेत.
नसतील तर फरक काय आहे ? (उदा - बहार येणे म्हणजे अनेक फुले एकाच वेळी फुलणे पण नुसते फुले येणे म्हणजे वेगवेगळ्या वेळी फुलणे)
ऐसीकरांचा काय अनुभव ?
पेस्तो करून फ्रीज करणार असलीस
पेस्तो करून फ्रीज करणार असलीस तर वेगवेगळे दाणे वापरून बॅचेस कर - काही चिलगोजा घालून, काही अक्रोड किंवा काजू घालून. मग बर्फाच्या ट्रे मधे ओतून सुटे तुकडे फ्रीज कर. प्रत्येक वेळेस लागले की एक-दोनच तुकडे काढता येतात.
३०च्या वर झाडं म्हणजे भरपूर पानं झाली - मला एकच चांगलं पुरलं. आता फुलं येऊन वाळायला लागली आहेत. बिया काढून साठवल्यावर मी देखील पानांचं पेस्तो करून ठेवून देणार आहे.