सामुदायिक बाग

garden-4
मागच्या उन्हाळ्यात एके दिवशी रणरणत्या उन्हात, सायकलीवरून फेरफटका मारत मुलीच्या शाळेजवळ पोहोचलो आणि जरा बसायला सावली शोधताना शेजारच्या कम्युनिटी सेंटरच्या जवळ एक सुंदर बहरलेली बाग दिसली. वास्तविक या ठिकाणी हिवाळ्यात अनेकदा आलो होतो पण उन्हाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्या जागेचे असे सुंदर बागेत झालेले रुपांतर आश्चर्यकारक होते. थोडी चौकशी केल्यावर हे आमच्या विभागाचे 'कम्युनिटी गार्डन' आहे असे समजले. दुर्वैवाने त्यावर्षी विभागण्यात आलेले सर्व वाफे संपल्याने आम्ही भाग घेऊ शकलो नाही पण यावर्षी मात्र वसंताच्या आगमनाआधीच नावनौंदणी केल्याने बागेत सहभाग घेता आला. भाग घेण्याचा मुख्य उद्देश इतर अनुभवी माळ्यांकडून काही गोष्टी शिकाव्यात आणि त्यानिमित्ताने समविचारी मित्रमंडळी मिळावीत हा होता, प्रत्यक्षात या बागेने आम्हाला त्याहीपेक्षा अधिक बरेच काही दिलेय.

संपूर्ण बागेत मुख्यतः फळे आणि भाज्या लावायच्या, फक्त ऑर्गॅनिक खत व बियाणे वापरायचे आणि रासायनिक कीटकनाशके वापरायची नाहीत असा अलिखित नियम आहे. बागेत पाणी रिजविण्यासाठी जमीनीखाली अजूबाजूचे पाणी एकत्र करून रिजवण्यासाठी पाईप्स टाकलेले आहेत. बागेसाठी लागणारे बहुतांश कंपोस्ट बागेतल्याच कंपोस्टर्समध्ये बनविण्यात येते. बागेसाठी मिळालेल्या छोट्याश्या अनुदानातून गार्डन शेड, थोडे बागकाम साहित्य आणलेले आहे आणि सामुदायिक जागेत फळझाडे वगैरे लावलेली आहेत. मुलांसाठी खास दोन-तीन वाफे राखीव आहेत आणि त्यांना बागकामाबद्दल माहिती द्यायला मधूनमधून काही पाहुणे येतात आणि सामुदायिकपणे बियाणे पेरले जाते. आठवड्यातून एक दिवस गवत काढायला राखीव असतो, आपापल्याला वाटून दिलेल्या जागेतले तण उपटायला सगळे संध्याकाळी एकत्र जमतात आणि त्यानिमित्ताने गप्पाटप्पा होतात. उन्हाळ्यात अनेकजण गावाला जात असल्याने प्रत्येकाला एक आठवडाभर बागेला पाणी घालण्याची जबाबदारी दिलेली असते. बागेची जबाबदारी आणि मालकी सामुदायिक असल्याने प्रत्येकजण आपल्या वाफ्याबरोबरच इतरांच्या वाफ्याचीही काळजी घेताना दिसतात, मुले एकत्र बागडत असतात आणि कळतनकळत मोठ्यांकडून बागकामातल्या लहानमोठ्या गोष्टी शिकत जातात. अनेकदा आलेले पीक सदस्यांच्या घरादाराला पुरून उरते मग इतर सदस्य तो मेवा वाटून घेऊ शकतात. सध्या सॅलेडची पाने इतकी मोठ्या प्रमाणावर पिकली आहेत की एखाद्या सार्वजनीक संस्थेला काही भाजीपाला भेट म्हणून द्यावा असा विचार चालला आहे.

अलिकडेच बागेच्या बाजूला, केवळ भंगारातून जमवलेल्या गोष्टींपासून एक वॉटरफीचर बनविलेले आहे, ज्यात बर्याच लहानमोठ्यांचा सहभाग होता. जुन्या घरांच्या डेकचे लाकूड, हॉकीच्या काठ्या वगैरेतून एक सुंदर डेक तयार केला गेला आहे आणि त्याच्याखाली एका खड्यात शेजारच्या इमारतीवरून येणारे पावसाचे पाणी साठविले गेले आहे; त्यातून बाहेर आणलेल्या एका खांबावर एक भिरभिरे बसविलेले आहे ज्याच्या सहाय्याने पाणी उपसले जाऊ शकते. त्याचशिवाय एक मुलांना खेळायला एक छोटासा हातपंपही बसविला आहे. शेजारच्या कम्युनिटी सेंटरच्या इमारतीत या बागेचे सदस्य अनेकदा काही कार्यक्रमांसाठी एकत्र जमतात, मग ते पॉटलक असो की बागकामाबद्दल एखादी फिल्म असो.

परवा इथे दोन-चार मुले खेळत पोहोचली आणि या किंचित आत दडलेल्या बागेकडे पाहून आश्चर्यचकीत झाली, त्यातला एकजण म्हणाला "हे तर एखाद्या हरविलेल्या नंदनवनासारखं आहे!" टवटवीत मटाराचे दाणे तोंडात कोंबताना आणि वाईल्ड स्ट्रॉबेरीज खुडताना त्या मुलांच्या चेहेर्यावरून ओसांडणारा आनंद पाहिला आणि मला त्याची नंदनवनाची उपमा सार्थ वाटली. इथली माती, इथे येणारे लहान-थोर, त्यांच्यातल्या स्नेहाच्या रेषा, आणि त्यातून निर्माण झालेली ही सुंदर बाग समाजाच्या, कम्यनिटीच्या सगळ्या सुंदर अंगांचे दर्शन घडवितात. ही बाग आता तिसर्या वर्षात प्रवेश करतेय पण इथल्या लहान-थोरांचा उत्साह पहाता आता लावलेल्या रोपांचे वॄक्ष होईपर्यंत आणि त्याही पुढे हे नंदनवन असेच राहील.

तुमच्या आजूबाजूला अशा बागा आहेत काय? भारतात, विशेषतः शहरांत जिथे बहुसंख्य लोक अपार्टमेंट्समधे रहातात, तिथे बागकामप्रेमीयांनी एकत्र येऊन असा एखादा प्रकल्प सुरू केला आहे काय? त्यासाठी सरकारी अनुदानाची शक्यता असते काय? भाग घेणार्यांचा उत्साह आणि थोडीशी जमीन याव्यतरिक्त अतिशय थोड्या साधनांत एक सुंदर सामाजिक प्रकल्प यशस्वी झालेला दिसला म्हणून तो इथे मांडावासा वाटला.

हिवाळ्यानंतर जमीन तयार करताना लहानथोर,
garden-10garden-9

नवीन वॉटरफीचर,
Garden-Water Feature-1 Garden-Water Feature-2

फोफावलेला र्हुबार्ब आणि चेरी
garden-8garden-5

भोपळा आणि बटाटे
garden-3garden-2

ताजी भाजी आणि हर्ब्स (पर्स्ली, सोरेल, टॅरगॉन वगैरे)
garden-12garden-6

सूर्यफुले आणि शोभेची विहीर
garden-11garden-7

श्रावणघेवडा
garden-1

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

प्रकल्प फारच चांगला आहे. माझ्या डोक्यात पहिला प्रश्न पडला तो हा - तुमच्या वाफ्यावरच्या भाज्या-फळं दुसरं कोणी घेऊन जात नाही का? याची दक्षता कशी घेतली जाते? बागेत वाफा नसलेल्यांना बाहेर ठेवले जाते का, व कसे? कारण हेच कारण आम्हाला सामुदायिक बागाची चर्चा सुरू झाली की सगळे प्रथम विचारतात, आणि प्रयत्न फेटाळून लावतात. आम्ही काही हौशी माळी-मंडळी एकत्र येऊन आमच्या परिसरात, सोसायटीच्या सामुदायिक जागेत अथवा ऑफिसच्या अंगणात वगैरे, थोडा-फार असा प्रयत्न करून पाहिला आहे. पण "भाज्या! त्यापेक्षा शोभेची चार झाडं कुंड्यांमधे लावा, छान दिसतील आणि त्रास ही कमी" हे ज्ञान पुरविणारी, नाहीतर 'कोण पाहणार?' आणि "गेल्या वर्षी दुधी लावला होता, पण रातोरात कोणी पळवला कळलेच नाही" हीच उत्तरं. बहुतेक सोसायट्यांच्या मधोमध चांगली, ६-७ तास ऊन मिळणारी जागा असते, पण अशा बागा क्वचितच दिसतात. पुण्यात आमच्या सोसायटीत मात्र सामुदायिक कंपोस्टिंगच्या प्रकल्पाला सभासदांनी साफ विरोध केला - चिलटं, डास, आळी वाढतील, इत्यादी. इथे माझ्या घरासमोर सुंदर जागा आहे, पण समोरच्या वस्तीतले लोक कुंपण पार करून भाज्या चोरतील या भीतीने घरमालकाने तिथे भाज्या लावण्यास मला सक्त मनाई केली आहे.

पण याच वस्तीत ठिकठिकाणी लोकांनी अगदी छोट्याशा जागेत सुरेख परसबागा केल्या आहेत - भोपळा, भेंडी, लालमाठ वगैरे सर्वत्र दिसताहेत. त्यांच्या शेजारच्यांवर ते पहारा कसे ठेवतात हे विचारले पाहिजे! गेल्या काही वर्षांत इथल्या रुंद फुटपाथांच्या एका भागात नवीन तृणमूल सरकारने ब्यूटिफिकेशन ड्राइव्ह अंतर्गत मातीचे उंच बंधारे तयार करून त्यात फुलझाडं, शोभेची झाडं लावली. शेजारच्या गल्लीत या वर्षी काही बिल्डिंगांच्या वॉचमन वगैरे मंडळींनी एकत्र येऊन त्यात फळभाज्या लावल्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय छान कल्पना आहे!
पुण्यात असे काही कुठे आहे का माहिती नाही.
आमच्या सोसायटीत जागा बरीच आहे. एकदा सोसायटी ऑफिसला विचारून एक मिटिंग बोलवायचा प्रयत्न करतो.

वर रोचना यांनी उभे केले प्रश्नही महत्त्वाचे आहेत. आमच्या कडे सिक्युरीटी गार्डसमुळे बाहेरील मंडळी कमी येत असली तरी भाज्या वगैरे लावल्यावर सोसायटीतील सदस्य, मोलकरणी (विशेषतः त्या सोबत घेऊन येतात ती बच्चे कंपनी), इतर सेवादाते (सुरीयर, प्लंबर्स, माळी वगैरे) यांना तिथे जाण्यापासून कसे रोखावे हा प्रश्न आहेच. कदाचित त्यांनाही सहभागी करून घेऊन व येणार्‍या पिकांतील वाटा त्यांनाही देऊन हे साध्य करता येईल का पहायला हवे.

समांतरः कितीही उच्चभ्रु सोसायट्यात जा, सकाळी उठून सोसायटीच्या जास्वंदीच्या झाडावर पहाटेपासून होणारा हल्लाबोल (नी छुपी काँपिटिशन - तीच्याआधी पोचून चांगली भरपूर जास्वंद नी कळ्या मिळवते की नै बघ!) नी ओरबाडणे थोपवायला मात्र साक्षात गणराय अवतरले तरी उपाय होईलसे वाटत नाही. Sad श्रावणात आघाडा, दुर्वांची, (गणपतीच्या दिवसात) पंचत्रींची उपट करून बागेचा कोपरा/झाडे आपण असुंदर करतो आहोत असे त्यांना पटतच नै Sad
अशा मानसिकतेत वरील कल्पना काहिशी धाडसी वाटते आहे! तरी प्रयत्न करून बघायला हवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फ्रँक्ली, बाहेरची मंडळी भाज्या चोरून नेतील ही भीती थोडी रेड हेरिंग आहे (याला मराठी वाक्प्रचार आहे का?). बाहेरच्यांना बाहेर ठेवणे तितके कठीण नाही. तूच दिलेल्या उदाहरणात सोसायटीतल्याच मंडळीत फुलांवरून भांडणं होतात हे दिसतं. मुळात सामुदायिक प्रकल्पात सोसायटीतल्या सभासदांमधेच वाटपाच्या प्रश्नावर नेहमी गाडी येऊन अडखळते - लेबर आणि उत्पादन या दोन्हींच्या वाटपात. free riders च्या भीतीने public good चाच विचार होत नाही. खरंतर सोसायट्यांच्या नियमांनुसार हौशी मंडळींच्या एका छोट्या गटाला ही जबाबदारी देऊन, खत-बियाणांच्या खर्चासाठी सर्वांकडून वर्गणी घेऊन, लहान मुलांना त्यात गुंतवायचा प्रकल्प चांगला होईल. जमणेबल आहे. पण बरेच पालक आपल्या मुलांना असल्या कामात गुंतवायला नकार देतात. वर नेमलेला गट वाटप सर्वांना सारखाच करेल हा विश्वास बसणे महत्त्वाचे आहे. हे झाले खाजगी सोसायटीतले - अस्सल सामुदायिक ठिकाणी तर हेच प्रश्न द्वि,त्रिगुणीत असतात.

मला सरासर सोशियोलॉजिकल विधान करायचे नाही, कारण शहरात परसबाग करणारे नेहमीच पुष्कळ जण राहिले आहेत - मोठ्या बंगल्यांच्या प्लॉटवर असो, छोट्याशा बाल्कनीत असो किंवा वस्तीतल्या नाल्याशेजारी असो. पण माझ्या (सीमित, दोन-तीन सोसायट्यांच्या) अनुभवानुसार अलिकडेच शहराकडे स्थलांतर झालेल्या मध्यम, निम्न-मध्यमवर्गीय मंडळींकडून अशा प्रकल्पाला जास्त विरोध असावा. खरंतर शेतकाम-बागकामाची अशा लोकांना जास्त माहिती असते, पण "शहरी," पांढरपेशी बनण्यात ग्रामीण जीवनाच्या अनेक बाबी सोडल्या जातात, त्यात अशा प्रकारचे काम महत्त्वाचे असावे. आमच्या घरच्या अनेक मंडळींचे अ‍ॅटिट्यूड यात मी मोजेन. हौशी, फुलझाडांचे बागकाम चालते, पण भाजी-फळांचे नाही. शहरी मध्यमवर्गात पांढरपेशी, आधुनिक, बाजारावर अवलंबित जीवनात अनेक काळ काढल्यावरच पर्यावरणाबद्दल आस वाढून पुन्हा हौशी बागकामाकडे, स्वत: उगवलेल्या धान्य-भाज्यांबद्दल उत्सुकता वाढले आहे, हे ही तितकेच खरे आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंय
वाक्यावाक्याशी सहमत! __/\__

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा!! सुंदर उपक्रम आहे. व्हरमाँट्ला अशी सामुदायीक बाग पाहीली होती. तिच्यातून फेरफटका मारताना, प्रसन्न वाटलेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जवळच एक अशी बाग आहे. तुमचा अनुभव वाचून पुढच्या वर्षी भाज्या लावायच्या मोसमाच्या आधी एकदा तिकडे जाऊन यायला हवं अशी खूणगाठ बांधली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या वाफ्यावरच्या भाज्या-फळं दुसरं कोणी घेऊन जात नाही का? याची दक्षता कशी घेतली जाते? बागेत वाफा नसलेल्यांना बाहेर ठेवले जाते का, व कसे?

बागेचे मूळ उद्दिष्ट कोणाला बाहेर ठेवायचे नसून सगळ्यांना आत ओढण्याचे असल्याने असे प्रश्न तयार होत नाहीत. सर्वसामान्यपणे आपण जे उगविण्यासाठी कष्ट केलेले नाहीत ते आपण घेऊन जाऊ नये अशी जाणीव आजुबाजूच्या नागरिकांमध्ये दिसत असल्याने कोणतेही कुंपण नसताना बागेत कोणाचा उपद्रव दिसत नाही, त्याअर्थाने आम्ही भाग्यवान आहोत. शिवाय सभासदांमध्ये केवळ 'भाजीपाला उगवायची जागा' यापेक्षा 'सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी चांगले उभे करण्याची जागा' असे या बागेचे महत्व असल्याने कोणी सभासद नसलेल्याच्या मुलाने चार स्ट्रॉबेरीज तोंडात टाकल्या तर त्याचे कोणी फार मनावर घेत नाहीत.
मुख्य काळजी असते ती प्राण्यांच्या वावरामुळे होणार्या नसधुसीची आणि कीटकनाशके वापरायची नसल्याने इतर कीड वगैरेची, पण असे असतानाही त्यामुळे पूर्ण बागेची नासधूस झालेली कधी दिसत नाही. लेडीबग्ज सारख्या अतिशय उपयुक्त किड्यांच्या मोठ्या प्रमाणामुळे (कीटकनाशके न वापरल्याने) इतर प्रकारच्या कीडी नियंत्रणात रहातात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.
बागेच्या आवारातच असलेल्या इमारतीत एक प्लेस्कूल आहे आणि शेजारीच एक शाळा आणि पटांगण आहे तरीही मुलांचाही बागेत काही उपद्रव होत नाही हे लक्षणीय आहे आणि त्याला एक मोठे कारण आहे. या बागेत आजूबाजूच्या मुलांना सहभागी करून घेण्यावर खूप भर असतो, एकदा मुलांवरच या बागेच्या काळजीची जबाबदारी दिली आणि ही 'त्यांची बाग' आहे अशी भावना निर्माण केली की ते हिरीरीने त्या बागेच्या रक्षणार्थ धावतात असा अनुभव आहे. माझ्यासाठी तर या बागेच्या निमित्ताने माझ्या मुलीला इतर सभासदांकडून मिळालेली मैत्री आणि प्रेम बागेतल्या झाडांपेक्षा अधिक मोलाचे आहे. तिथे काम करायला जातो तेंव्हा आपला वाफा सोडून ती बरेचदा इतर सभासदांबरोबर त्यांच्या वाफ्यावर काम करायला आणि गप्पा हाणायला जाते, इतरांच्या वाफ्याला पाणी देण्याचीही आठवण करते पण मग त्याचबरोबर दुसर्याच्या वाफ्यातला एखादा मटार तोडून खायलाही तिला फार अपराधी वाटत नाही Smile
बागेत प्रत्येकाचे वैयक्तिक वाफे असले तरी काही सार्वजनिक भागही आहेत जिथे लावलेल्या झाडांची जबाबदारी आणि मालकीही सार्वजनिक आहे आणि तुम्ही तिथले सभासद असाल तर तिथे लावलेल्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. वरच्या फोटोत लावलेला र्हुबार्ब, चेरी, सूर्यफुले, मुळ्याच्या शेंगा हे सगळे सार्वजनिक जागेतले आहे.
मला वाटते की अशा प्रकल्पात सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या आवडीप्रमाणे फुले,फळे, भाज्या यातले काय लावायचे असेल त्याप्रमाणे थोडी सवलत देऊन आणि शक्य तिथे सगळ्यांच्या सूचनांकडे लक्ष देऊन पुढाकार घेणारी व्यक्ती केंद्रभागी असणे फार महत्वाचे वाटते. एकदा बाग बनली आणि सगळ्यांना त्यातले फायदे दिसायला लागले की हळूहळू सुधारणा करता येतील अशी शक्यता दिसते.
सार्वजनिक प्रकल्पाबद्दल भारतीय मानसिकता हे फार रोचक प्रकरण वाटतं, म्हणजे उदाहरणार्थ आमच्या या बागेतल्या सर्व सदस्यांमध्ये सर्वच मुद्द्यांबद्दल पूर्ण सहमती आहे असे मुळीच नाही पण या असहमती प्रकल्प उभा करण्याच्या आणि यशस्वी होण्याच्या आड येत नाहीत असे निरिक्षण आहे. फक्त सेंद्रीयच खते आणि बियाणे लावण्याच्या मुद्द्यावरून काही सदस्यांत असलेली नाखुशी एका सभेच्या दरम्यान जाणवली होती पण तरी त्यामुळे बागेत त्या सदस्यांचा सहभाग आजिबात कमी होत नाही किंवा गटगटाचे राजकारणही होत नाही, निर्णय बहुमताने घेतले जातात. असेही जाणवते की बागेशी संबंधित इतर सोशल प्रकल्पांमधे काही सदस्य सहभागी होत नाहीत पण तो त्यांच्या वैयक्तिक निवडीचा आणि त्यांच्यापाशी असलेल्या वेळेचा भाग असतो.
आईवडीलांना मुलांचा वेळ बागेला देण्याबद्दल नाखुशी ऐकून तर फारच आश्चर्य वाटले, मोकळ्या वेळेत टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक खेळण्यांमधे मुले मश्गूल असतात म्हणून पालकांच्या तक्रारी ऐकल्यावर सार्वजनिक बाग हा त्यावर रामबाण उपाय असावा असे वाटून गेले होते.
यावर्षी भारतातून आलेल्या सासू-सासर्यांचा आमच्या बागेत मोठा सहभाग होता आणि त्यांना बागकामाची खरेच आवड आहे. सुरुवातीला मात्र आपण इतरांच्या वाफ्यांना पाणी का द्यायचे? आपल्या वाफ्याला बाकीचे लोक पाणी देतात का? आपल्या झाडाच्या शेंगा कोणी खाईल का? असे अनेक प्रश्न त्यांना पडत असत Smile नंतर मात्र एकंदरीत विश्वासाचे आणि मैत्रीचे वातावरण पाहिल्यावर त्यांच्या दृष्टीकोनात पडलेला फरक सहज लक्षात येईल असा होता, मग हिरीरीने आपल्या आपल्या पाककृती आणि माहिती इतरांना वाटण्यात यायला लागल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही केलेली बाग आवडली आणि विचारही पटले. तुमच्या ब्लॉगवरून कळले की तुम्ही युरोपात कुठेतरी राहाता. प्रश्न एकच आहे की या प्रकारची बाग भारतात होऊ शकेल का आणि केली तरी ती टिकेल का? दुर्दैवाने माझ्या अनुभवावरून तरी ती शक्यता फार कमी वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी भारताबाहेर राहते (ब्लॉगची माहिती जुनी आहे आणि आता बदलायला हवी) हे खरे आहे पण भारतात अशी बाग बनणे वाटते तेवढे कठीण नाही. रोचना म्हणतात त्याप्रमाणे बागकामाची आवड खूपजणांना असते आणि आपल्या घरांच्या आवारात अनेकांच्या उत्तम बागा असतात. पूर्ण सार्वजनीक जागांचे कठीण वाटते पण खासगी सोसायट्यांच्या आवारात अशा नक्की बनू शकतील पण त्यासाठी एखाद्याला पुढाकार घेऊन नेटाने वाट बनवावी लागेल.
लॉस एंजेलिसमधल्या अतिशय दरिद्री आणि अपराधग्रस्त भागांतही काही ठिकाणी 'फूड फॉरेस्ट' आणि 'गोरीला गार्डनिंग'चे प्रयोग अंशतः यशस्वी झाले आहेत असे ऐकून आहे.
रॉन फिनली या अतिशय मस्त माणसाचा अनुभव टेड टॉकवर ऐकल्यापासून मी त्याच्या प्रेमात पडले होते. तो इथे चिकटवते आहे,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतात राहणाऱ्यांना इमारतींच्या गच्च्यांवर सामुदायिक बाग बनवता येईल काय? यूट्यूबमधल्या व्हीडीओंमध्ये भारतात राहणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांनी गच्चीवर कुंड्या ठेवून बाग बनवलेली दिसते. कुंड्यांखाली ताटल्या ठेवल्या की गळण्याची भीतीसुद्धा दाखवता येणार नाही, शिवाय वरच्या मजल्यावर उलुसं कमी तापण्याची शक्यता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.