वैद्यकात वस्तुनिष्ठता

एकूण विज्ञानात, आणि विशेषतः वैद्यकशास्त्रात खूप काही अगम्य असते, असे लोक म्हणतात. याबाबत मी त्यांच्याशी सहमत आहे. परंतु त्या योग्य विचारांबरोबर परंतु लोक असेही मानतात, की वैज्ञानिक-वैद्यकात वस्तुनिष्ठतेच्या अतिरेक होतो आहे आणि वैज्ञानिक-डॉक्टर बिगर-वस्तुनिष्ठ विधांच्या फायद्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे वैज्ञानिक-वैद्य हे वस्तुनिष्ठतेमुळे अहंमन्य झाले आहे, असा विचार काही जणांच्या मनात येतो.

मला मात्र ही दुसरी बाब इतकी सोपी वाटत नाही. अहंमन्यता आणि वस्तुनिष्ठता यांच्यात पुष्कळदा गल्लत होते आहे, असे मला वाटते.

त्यावरून मागे रेडियोवर ऐकलेली एक मुलाखत आठवली. डॉक्टर रेचल नेओमी रेमेन या श्रद्धेबाबत, डॉक्टर-पेशंट संबंधाबाबत डॉक्टराने जागरूक असण्याबाबत मुलाखत देत होत्या. या सर्व बाबतीत मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. त्यांनी काही अहंमन्य डॉक्टरांबद्दल आपला एक अनुभव सांगितला आणि वैज्ञानिक वस्तुनिष्ठतेबद्दल आपली टिप्पणी सांगितली.

मला ती कथा त्यांच्या दुसर्‍या एका मुलाखतीत येथे सापडली (दुवा) तिथून भाषांतरित करतो आहे. त्यापुढे मी रेडियो स्टेशनाला पाठवलेले पत्र (दुवा) भाषांतर करून देत आहे.
- - - -
डॉक्टर रेचल नेओमी रेमेन म्हणतात :
"ही स्लोन केटरिंग हॉस्पिटलात रोग अद्भुतपणे बरा होण्याची ती सुंदर कथा... एका माणसाचा किमोथेरापी (कॅन्सरवरचा औषधोपचार) उपचार काम देईनासा झाला होता. तो हॉस्पिटलात आता मरायचे म्हणून गेला. हे बर्‍याच वर्षांपूर्वी झाले - त्या काळात "हॉस्पिस-सेवा" (अंतिम अवस्थेतील रुग्णांकरिता हॉस्पिटल) उपलब्ध नव्हती. चमत्कार व्हावा तसा तो बरा झाला. अशा गोष्टी नित्यच होत असतात, त्यांचे स्पष्टीकरण देता येत नाही, त्या कमालीच्या गूढ असतात. त्यांच्यापैकीच ही एक. हे किती न-अमेरिकन आहे - जीवन विज्ञानावर आधारित नसून गूढतेवर आधारित असावे. अशा गोष्टी घडाव्यात, त्या आपल्याला मोजता येत नाहीत की त्यांचे स्पष्टीकरण देता येत नाही. आपण त्या बघू शकतो, आणि त्यांच्यातून स्फूर्ती घेऊ शकतो - इतकेच काय करू शकतो. आपण विज्ञानात इतके गुरफटले गेलो आहोत, ..., तंत्रज्ञानात, जणू काही विज्ञान आपल्यासाठी जीवनाची व्याख्या करून देणार आहे.
(त्यानंतर या रुग्णाबद्दल चर्चा करायला हॉस्पिटलातले डॉक्टर जमले. याचे स्पष्टीकरण देता येत नाही, म्हणून त्यांच्यात तळतळाटच फार झाला, आनंद जाणवला नाही... हा तपशील रेडियो मुलाखतीतून आठवतो [अनुवादकाची टीप])
या इतक्या सगळ्या कॅन्सरच्या गाठी या माणसाला होत्या, (आणि आपल्या डोळ्यांच्या देखतच जणू) त्या गेल्या - परत न येण्यासाठी! पण याबाबत आम्ही डॉक्टर भारावून गेलो का? नाही! डॉक्टर म्हणून आमची विवंचना झाली (फ्रस्टेट झालो.) म्हणून निदानाची पुन्हा चाचणी करण्यासाठी त्याच्या पॅथोलॉजीचे नमुने विश्लेषणासाठी आम्ही परत पाठवले. निदान अत्यंत घातक कर्करोग असेच होते. लोकांनी मग असा निष्कर्ष काढला, की ११ महिन्यांपूर्वी बंद केलेला तो किमोथेरॅपी उपचार, तो आता अकस्मात प्रभावी झाला होता, आणि कॅन्सरच्या गाठी नाहिशा होण्याचे ते कारण होते. आश्चर्य आहे! मला वाटते अतिरेकी "वैज्ञानिक वस्तुनिष्ठते"मुळे मनुष्य अक्षरशः आंधळा होतो.

- - - -

मी रेडियो स्टेशनाला लिहिलेले पत्र असे (पत्रातील काही चुका सुधारून) :

वस्तुनिष्ठता

डॉ. रेमेन यांचे बिंदूगामी निरीक्षण मला भावले. विज्ञानातील वस्तुनिष्ठतेमुळे अप्रूप वाटणाच्या आपल्या दृष्टी धुकाळते, असे त्या म्हणाल्या. ही बाब स्पष्ट दाखवणारे उदाहरण त्यांनी सांगितले : स्लोन केटरिंग येथील डॉक्टरांपुढे असा एक रुग्ण आला, काही स्पष्ट कारण नसता त्याचा कॅन्सर पार नाहिसा झाला. तर भारावून जाण्याऐवजी त्या डॉक्टरांना राग आला, कारण त्यांच्यापाशी स्पष्टीकरण नव्हते. ती कथा ऐकून मला शंका वाटली मला ज्या गुरूंकडून "वस्तुनिष्ठता" कळली, आणि या रागावलेल्या डॉक्टरांना जो अर्थ वाटतो, ते अर्थ एकच आहेत की वेगळे?

हे शक्य आहे की विज्ञानाच्या क्षेत्रातील काही लोकांची दृष्टी अतिरेकी आत्मविश्वासाने गढूळ झाली असेल. विज्ञानाचे तत्त्वज्ञान वस्तुनिष्ठता कशासाठी सांगते, हे त्यांच्या दृष्टीआड झाले असू शकते. वस्तुनिष्ठता खरे तर नम्रतेबद्दलची श्रद्धा आहे. वस्तुनिष्ठता म्हणजे अनेकांना सहभागी करणारा अनुभव ओळखणे, आणि त्याचा गौरव करणे. जर मला एखादा अनुभव असा आला, तो दुसर्‍या कोणाला कधीच आला नाही, तर दुसर्‍या लोकांना अनुभव आला नाही, तेही ठीकच आहे, हे मी नम्रपणे मान्य केले पाहिजे. जर मला एखादा अनुभव आला, आणि दुसर्‍या कोणाला नंतर कधी तसाच अनुभव आला तर त्या पुनःप्रत्ययी अनुभवात आम्ही दोघे सहभागी आहोत. सह-अनुभवाला मूल्य देणे हे आपल्या मानव असण्यात अंतर्भूत आहे.

तो रोग अनपेक्षितपणे बरा झाला, त्याचा अभ्यास करणार्‍या स्लोन-केटरिंगमधल्या डॉक्टरांना वाईट वाटायला काही कारण होते खरे - पण रोग बरा होणे हे ते कारण नव्हे. आपण भविष्यातील रुग्णांना आणि डॉक्टरांना या प्रकारे रोग बरा कसा करता येईल, हे नेमके सांगू शकलो नाही; अशा प्रकारे बरा होणारा रोग ओळखून पुढच्या काही रुग्णांच्या मानसिक यातना कमी करू शकणार नाही, याबद्दल वाईट वाटावे. त्या डॉक्टरांनी चर्चागट का बनवावा? त्यांच्या सर्वांचे अनुभव एकत्र करून या कोड्यात पाडणार्‍या रोगनिवारणाबद्दल अधिक जाणावे म्हणून. त्यांचे कर्तव्य होते, भविष्यातील डॉक्टरांसाठी आणि रुणांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे देणे. त्यांना तसे कुठले मार्गदर्शक तत्त्व सापडले नाही, तर त्यांची दिलगिरी त्या भविष्यातील रुग्णांच्यासाठी असावी. वस्तुनिष्ठता कशासाठी हवी, हेच ते विसरले, आणि जो रुग्ण बरा झाला, त्याच्यावर ते संतापले. खरे पाहता, ते वस्तुनिष्ठ नव्हतेच.

विज्ञानातील वस्तुनिष्ठता दुसर्‍यांच्या अनुभवाचा आदर करण्यास उपयोगी पडते. अनेकांचा सहभाग असलेले (पुनःप्रत्ययी) अनुभव हे माझ्या खाजगी अनुभवांपेक्षा अधिक विश्वासार्ह आहेत असे ते तत्त्व सांगते. एकटाच असलो, तर मी स्खलनशील आहे, हे मान्य करण्यावेगळे वस्तुनिष्ठ असण्याचे काम काय? मी वस्तुनिष्ठ का आहे, हे नजरेआड केल्यास, ती दृष्टी भविष्यातील रुग्णांकरिता, आणि डॉक्टरांकरिता माझे कर्तव्य आहे, हे मी विसरेन. माझा आजचा अनुभव भविष्यातील ते डॉक्टर, ते रुग्ण सहभागी असतील त्या अनुभवांपेक्षा उच्च आहे, असे मानल्यासारखे होईल. असे करताच मी वस्तुनिष्ठ राहाणार नाही.

काळजीपूर्वक विचार करता असे वाटते, की स्वतःच्या ज्ञानाबद्दल अतिरेकी अभिमान हा खर्‍या वस्तुनिष्ठतेबरोबर राहू शकत नाही. विज्ञानाच्या शिक्षकांनी भविष्यातील वैज्ञानिकांमध्ये नम्र वस्तुनिष्ठतेचे मूल्य गिरवून द्यायला हवे. असे केले नाही तर कथेतील संतापलेल्या आत्मगौरवी डॉक्टरांसारखे सोंग वस्तुनिष्ठता म्हणून वावरू लागेल. ज्ञानाच्या नैतिक शोधाला आडथळा होऊ लागेल.

- - -

(पूर्वप्रसिद्धीचा दुवा)
(जुनेच लेखन पुन्हा देत आहे, याबाबत वाचकांची माफी मागतो. परंतु हा लेख पूर्वी प्रसिद्ध केला होता, तेव्हा फारसा काळ पुढल्या पानावर टिकला नव्हता. मराठी संकेतस्थळांवरच्या कित्येक वाचकांनी तो वाचला नसेल, असे वाटले, म्हणून पुन्हा दिला. अधिक चर्चा होण्याकरिता.)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

काळजीपूर्वक विचार करता असे वाटते, की स्वतःच्या ज्ञानाबद्दल अतिरेकी अभिमान हा खर्‍या वस्तुनिष्ठतेबरोबर राहू शकत नाही. विज्ञानाच्या शिक्षकांनी भविष्यातील वैज्ञानिकांमध्ये नम्र वस्तुनिष्ठतेचे मूल्य गिरवून द्यायला हवे.

यात अमान्य होण्यासारखं काही नाही, पण एक अडचण अशी की 'मला अापल्या ज्ञानाबद्दल अतिरेकी अभिमान अाहे' असं कोणाच वैज्ञानिकाला त्यावेळी वाटत नाही. उदाहरणार्थ, समजा जॉन या climatologist ची अशी पक्की खात्री अाहे की global warming मुळे अमुकतमुक दुष्परिणाम होणार अाहेत. समजा मेरी ही climatologist त्याच्याशी असहमत अाहे, अाणि तिला असं वाटतं की निदान सध्यातरी या शास्त्रात अनिश्चितता बरीच अाहे, अाणि जॉनने अापल्या निष्कर्षांवर 'अतिरेकी' भरवसा ठेवलेला अाहे. यात अाता निवाडा कसा करणार? जर हे दुष्परिणाम खरे ठरले तर जॉनचं बरोबर ठरेल, अाणि खोटे ठरले तर मेरीचं. पण तोपर्यंत या सिद्धान्ताची confidence level काय असावी याचं काही नक्की गणित नसतं. 'अापल्या ज्ञानाबद्दल नम्र असा' असं वैज्ञानिकांना सांगून व्यावहारिक परिणाम फारसा होत नाही. (हे उदाहरण वैद्यकातलं नाही हे मान्य, पण असं उदाहरण वैद्यकात तयार करणं अवघड नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

प्रस्तुत धागा हा केवळ वैज्ञानिक-वैद्यांनाच लागु आहे काय हे काहीसे अस्पष्ट आहे. जर वैज्ञानिक-वैद्य हे व्यावसायिक वैज्ञानिक असतिल तर इतर व्यावसायिकांना आणि पर्यायानी इतरांना जे स्वभाव दोष लागू होतात तेच त्यांनाही लागू होतिल.
हेच ह्याशिवाय इतर डॉक्टराना ( जे केवळ व्यावसायिक आहेत ) सुद्धा लागू होईल.
अहंमन्यता ही एक बाब झाली. गविंनी एअर क्रॅश मालिका सुरु करण्यापूर्वी मानवी स्वभाव ( वैमानिक ), आणि त्यांचा अपघाताशी संबंध ह्यावर एक चांगला लेख लिहिला होता. हे स्वभाव विशेष सर्वातच असतात असे माझे मत आहे. फक्त त्यावरुन होणारे अपघात कदाचित एवढे भयंकर नसतिल ( potential for loss of life/ lives). जिथे हे पोटेन्शियल जास्ती आहे, तिथे जबाबदारी जास्ती आहे, तिथे पैसा जास्ती आहे आणि गविंनी नोंद केलेले दोषही जास्त ( खरोखरच जास्त नसतिलही परंतु जास्त निरिक्षित नक्कीच ) आहेत. ईथे वस्तुनिश्ठ्तेचा अभाव कदाचित नसेल पण दुर्लक्ष होण्याची शक्यता निर्माण होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण भविष्यातील रुग्णांना आणि डॉक्टरांना या प्रकारे रोग बरा कसा करता येईल, हे नेमके सांगू शकलो नाही; अशा प्रकारे बरा होणारा रोग ओळखून पुढच्या काही रुग्णांच्या मानसिक यातना कमी करू शकणार नाही, याबद्दल वाईट वाटावे.

जरी भविष्यातील (स्पेक्युलेटीव्ह) उद्देश ग्राह्य धरला नाही तरी सुद्धा "मी/आम्ही कुठे चुकलो?" ह्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यानेही डॉक्टर मंडळी फ्रस्ट्रेट झाली असतील तरीही ते साहजिकच आहे. लेखात म्हणल्याप्रमाणे रोगी बरा झाल्याबद्दल नम्रता नाही असे नसून रोगी बरा झाल्याचे कारण न कळल्याने निर्माण झालेली विवंचना आहे.

अवांतरः लेख पुन्हा दिल्याबद्दल धन्यवाद. अनेकदा अनेक संस्थळांवर असूनही अनेक लेख निसटतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

डॉक्टर म्हणून आमची विवंचना झाली (फ्रस्टेट झालो.) म्हणून निदानाची पुन्हा चाचणी करण्यासाठी त्याच्या पॅथोलॉजीचे नमुने विश्लेषणासाठी आम्ही परत पाठवले. निदान अत्यंत घातक कर्करोग असेच होते. लोकांनी मग असा निष्कर्ष काढला, की ११ महिन्यांपूर्वी बंद केलेला तो किमोथेरॅपी उपचार, तो आता अकस्मात प्रभावी झाला होता, आणि कॅन्सरच्या गाठी नाहिशा होण्याचे ते कारण होते. आश्चर्य आहे! मला वाटते अतिरेकी "वैज्ञानिक वस्तुनिष्ठते"मुळे मनुष्य अक्षरशः आंधळा होतो.

अशा प्रकारच्या अजुन काही अनुभवांचे संकलन होईल त्यावेळी पुन्हा वस्तुनिष्ठतेकडे वाटचाल करणारी अनुमाने काढता येतील. उदा. अशा प्रकारच्या अवस्थेतील रुग्ण वाचण्याचे प्रमाण किती तर शंभरात एखादे / हजारात एखादे/ लाखात एखादे अशा प्रकारे विश्लेषण करता येईल. अशा प्रकारे अनुमाने काढतानाच त्याची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करणे यातुनच ही वाटचाल होणार आहे. प्रस्तुत उदाहरणात ११ महिन्या पुर्वी बंद केलेला किमोथेरपी उपचार हा कालांतराने प्रभावित झाला असे कारण सांगितले गेले आहे.
आता याला चमत्कार म्हणायचे म्हटले तर कारण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर अनाकलनीय शक्यता विचारात घ्यावी लागते. अशी शक्यता विचारात घेणे यालाच ( काहींच्या मते) अवैज्ञानिक पणाचा शिक्का बसू शकतो.
विज्ञानाने असा रुग्ण वाचण्याचे प्रमाण (समजा )लाखात एक असे जरी दिले तरी संबंधित रुग्ण ९९,९९९ पैकी एक आहे की उरलेला एक आहे हे कोणीच ठामपणे सांगु शकत नाही. अशा वेळी एखाद्या ज्योतिषाने/ बाबा बुवाने रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले कि काही काळजी करु नका तुमचा रुग्ण नक्की बरा होईल आणी बोलाफुलाला गाठ पडुन तो रुग्ण बरा झाला तर त्याचा गवगवा मोठ्या प्रमाणात होणे स्वाभाविक आहे. समजा तसे नाही घडले तर आहेच प्राक्तन/ नशीब / दैव.

अवांतर-जुनाच लेख पुन्हा दिल्या बद्दल दिलगीरीची कुठलीही गरज नाही. ज्याने वाचला असेल त्याला सदर लेख वगळून पुढे जाण्याची मुभा आहेच की!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

एकूण विज्ञानात, आणि विशेषतः वैद्यकशास्त्रात खूप काही अगम्य असते, असे लोक म्हणतात. याबाबत मी त्यांच्याशी सहमत आहे. परंतु त्या योग्य विचारांबरोबर परंतु लोक असेही मानतात, की वैज्ञानिक-वैद्यकात वस्तुनिष्ठतेच्या अतिरेक होतो आहे आणि वैज्ञानिक-डॉक्टर बिगर-वस्तुनिष्ठ विधांच्या फायद्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे वैज्ञानिक-वैद्य हे वस्तुनिष्ठतेमुळे अहंमन्य झाले आहे

अज्ञात गोष्टींच्या बाबतीत नक्की काय भूमिका ठेवायची याबाबतच्या भूमिकेतून हा तिढा निर्माण होतो असं मला वाटतं. अज्ञात हे ज्ञेय आहे की अज्ञेय आहे हा प्रश्न आहे. जे आपल्याला ठाऊक नाही ते एका मर्यादेपर्यंत जाणून घेता येईल असं सर्वच मानत असावेत. पण माहीत नसलेल्या सर्वच गोष्टी वस्तुनिष्ठ पद्धतीने जाणून घेता येतील की नाही आणि अज्ञेयच रहातील असं एका पक्षाचं म्हणणं असतं. त्या पक्षाला सर्व काही जाणून घेण्याचा प्रयत्न ही देखील एक प्रकारची वैचारिक ब्लास्फेमी वाटते. ही भावना बायबलमधल्या आदाम, इव्ह व ज्ञानवृक्षाचं फळ या कथेत व्यक्त केलेली आहे. 'मला माहीत नाही, पण मला खात्री आहे की योग्य प्रयत्न केले, पुरेसा विदा जमवला तर या प्रश्नाचं उत्तर सापडेल' ही खात्री त्या पक्षाला अहंमन्यतेचं लक्षण वाटतं. 'माझं ज्ञान पुरेसं आहे, आणि अज्ञात असं काहीच नाही' असं ठामपणे म्हणण्यातून दिसणारी अहंमन्यता वेगळी, व ती वाईट हे या लेखात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आणि प्रतिसादांमुळे माझे विचार आणखी स्पष्ट होण्यास मदत झाली.

एखाद्या गोष्टीचं आकलनच होणार नाही किंवा मला (पक्षी: विज्ञानाला) सगळं समजलेलंच आहे असा विचार केला तर आकलन होण्याची शक्यता खूप कमी होईल. पण दुसर्‍या एखाद्या गोष्टीचं, घटनेचं आकलन होत आहे, आणि इतर तशाच प्रकारच्या घटनांचा अभ्यास करून झालेल्या आकलनातल्या त्रुटी भरून काढत आहोत अशा विचारांमुळे विज्ञानाचा विस्तार होईल. धनंजय आणि जयदीप यांनी दिलेली उदाहरणं मला परस्परपूरक वाटतात.

लेख पुन्हा प्रकाशित करण्याबद्दल आभार. आधी नजरेतून सुटला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नजरेतून सुटलेला लेख पुन्हा दिल्याबद्दल धन्यवाद. जे माहीत नाही ते जाणून घेण्याची वृत्ती ही संशोधनात कळीची असते. त्यामुळे एखाद्या गोष्टीची कारणमीमांसा शोधता न येणं हे अगदी हैराण करू शकतं. या हैराणीतून संताप होणं हे तात्पुरतं असतं, पण उलट पुढे काहीतरी विधायक घडू शकतं. याउलट घडल्या गोष्टीला निव्वळ एक चमत्कार मानून स्वस्थ बसणं हा संशोधकाला एक प्रकारचा पलायनवाद वाटू शकतो. नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धनंजय ह्यांच्या भुमिकेशी सहमत*

रेमेन ह्यांची मुलाखत वाचली, मुलाखतिमधील काही भागावरुन त्या मुन्नाभाई एम्.बी.बी.एस प्रकारच्या डॉक्टर वाटल्या, म्हणजे नकली डॉक्टर नव्हे तर शंकांचे समाधान विज्ञान-वस्तुनिष्ठपणे न शोधता, चमत्कारात किंवा भावनेत शोधणार्‍या अशा. कदाचित त्यांच्या आयुष्यातिल अनुभव व त्यांचा स्वभाव त्यांना अशाप्रकारचा विचार करण्यास भाग पाडत असावेत.

त्या वैतागलेल्या डॉक्टरांनी रुग्ण बरा होण्याचे निदान चमत्कार असे सांगुन एकप्रकारे कामचुकारपणा केला आहे असेच वाटते, बरे आज १५ वर्षांनीदेखिल रेमेन ह्यांना त्याबद्दल खेद न वाटता त्याला ते अद्भुत चमत्कार असे नाव देतात, कदाचित त्यानीं त्या रोगाचे यथायोग्य निदान केले असते तर अनेक रोग्यांचे आयुष्य आज निरोगी होउ शकले असते.

*डॉ. रेमेन यांचे बिंदूगामी निरीक्षण मला भावले

हे समजले नाही, तुम्हाला त्यांचे निरीक्षण कसे भावले, त्या हे कुठेच कबुल करित नाहित कि त्या बरे होण्याचे निदान करणे आवश्यक होते, त्या गोष्टीला रेमेन अद्भुत असेच मानतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्मिक अशी श्रेणी दिली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-