(जुन्या धाग्यात १००च्या जवळपास प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)
==========
विकांताला "मिस्टर & मिसेस" नावाचं नाटक पाहिलं. मधुरा वेलणकर आणि चिन्मय मांडलेकर यांचं हे नाटक. चिन्मय मांडलेकर हा एकेकाळी प्रतिथयश मात्र आता बेकार असलेला नट आणि त्याची कमावती बँकेत काम करणारी बायको यांचे आयुष्य संघर्षमय झाले असते. त्यात चिन्मयला घटस्फोट घ्यावा वाटु लागतो. अशावेळ ईत्याचा एक जुना निर्माता मित्र त्याला त्याच्या घटस्फोटाचे छुपे चित्रीकरण करून रीअॅलिटी शो करायचे व त्या बदल्यात त्याला दिवसाला २ लाख रुपये द्यायचे कबूल करतो. हिरो ती ऑफर स्वीकारतो. मग काय होते हे सांगणारे हे नाटक आहे. नवरा बायकोचं नातं, एकुणच समाजात वाढलेली बाजारू प्रवृत्ती आणि रिअॅलिटी शो अशा तीन गोष्टींच्या आधारावर एक रोचक कथानक देण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकाच्या पुर्वार्धात कथा इतकी नेमकी फुलते, नाट्य योग्य तितके समोर येते आणि उत्कंठा वाढत जाते. एकुणच विषयाचा गुंता, वेगळा विषय, चांगला अभिनय यांची सांगड घालत पुर्वार्ध रंगतो. उत्तरार्धात मात्र लेखक भरकटत जातो. हा गुंता कसा सोडवावा हे न कळल्याने की अजून नवे काय द्यावे हे न सुचल्याने की काय कोण जाणे पण नाटक दिशाहीन होते. नुसते दिशाहीनच नाही तर भडक संवाद, प्रखर रंगयोजना वगैरेसोबत पात्रेही ओरडु लागली की अपेक्षित 'डार्कनेस' उथळ वाटत जातो.
एकुणात संगीत कर्कश्श आहे. चिन्मय मांडलेकर व मधुरा वेलणकरही बर्यापैकी नाटकी संवाद म्हणातात विशेषतः दुसर्या भागात. मात्र हा दोष त्यांच्यापेक्षा मला लेखकाचा वाटला. नेपथ्य ठिकठाक आहे. छुप्या क्यामेरांमध्ये काय दिसतेय हे स्टेजच्या दोन्ही बाजुला लावलेल्या LED टीव्हीवर दिसत रहाते. पण ते व्यावसायिक रिअॅलिटीशोच्या दर्जाच्या मानाने अगदीच 'शेडी' वाटते. (नी ती स्क्रीन बहुदा पहिल्या ८-१० रांगांनाच नीट दिसावी)
थोडक्यात अगदीच करण्यासारखे काही नसेल तर नाटक बघता येईल, अन्यथा टाळूही शकता (५/१०)
-------------
चांगल्या कवितांना विचित्र संगीत देऊन त्याची वाट लावल्याचं तुम्ही अनेकवार पाहिलं/ऐकलं असेल. मात्र आपल्या भल्या-बुर्या चाली जेव्हा संगीतकार-गायक लोकांसमोर सादर करायच्या ठरवतो - आणि तेही मुक्ता बर्वेसारख्या अभिनेत्रीच्या शेजारी उभे राहून - तो कवितांचा कार्यक्रम कंटाळवाट्या गाण्याचा ऑर्केस्ट्रॉचे स्वरूप कसे घेतो हे पहायचे असेल तर "रंग नवा" हा कार्यक्रम बघावा.
मुळात कवितावाचन हा ट्रिकी प्रकार. त्याच्या सादरीकरणाकर विविध प्रयोग होत असतात हे खरे. पण "कधीतरी वेड्यागत" सारखे उत्तम अभिनेते - व ठिकठाक गायक जेव्हा कवीच्या सोबतीने त्याचे 'नाट्यरुपांतर" सादर करतात तेव्हा ते अतिशय छान वठते. (इतके की मी तो कार्यक्रम दोनदा पाहिला आहे). दुसरीकडे एका जागी बसून "ओवी ते हायकू" सारखा कविता मोजक्या वाद्यांसकट गाऊन दाखवायचा कार्यक्रमही तुफान आवडला होता. त्यामुळे या 'रंग नवा' ला मोठ्या अपेक्षेने गेलो होतो.
मिलिंद जोशी यांनी विविध कवींना कवितांना चाली दिल्या आहेत. काही चाली चांगल्या आहेत, काही ठिक तर क्वचित काही भयंकर. मात्र सर्व चाली या एकाच साच्यातील वाटतात. बरं हे ही एकवेळ समजु शकतो (डॉ.कुलकर्णींच्या नै का सगळ्या चाली एकाच मापात असतात - सहन करतात लोकं) पण जेव्हा हा संगीतकार मुद्राभिनय - प्रसंगी कायिक अभिनय करत - कविता गायला लागतो तेव्हा पितळ उघडं पडतं.
कवितांना चाली लाऊन त्या गाउ नयेत वगैरे माझं मत नाही. मात्र चाली देताना कवितांना एक अंगभूत ताल असतो तो जपावा असे वाटते. इथे प्रत्येक कवितेला चाल लावताना आपली गायकी दिसावी अश्यापद्धतीने चाली लागल्या आहेत. मग त्या कवितेचं सौंदर्य चालींमुळे अधिक उठावदार होण्याऐवजी वाद्ये, गायक, सूर यांच्यातीलच एक भाग ते शब्द होऊन जातात. त्यात जेव्हा तोच संगीतकार मुक्ताबर्वे सोबत लाडिक वगैरे कविता सादर करतो तेव्हा ते भेसूर दिसतं, तर तोच संगीतकार जेव्हा सुत्रसंचालक म्हणून 'घुम्मड' सारख्या शब्दांवर १०-१० मिनिटे नीरस बोलतो किंवा तेच ते बोलतो तेव्हा आपल्याला जांभई आवरत नाही!
प्रत्येक दोन कवितांमध्ये किमान ३-४ मिनिटांचं संथ सूत्रसंचालन - ज्यात ही चाल मला कशी स्फुरली नी हा शब्द कसा वेधक आहे बघा वगैरेच जास्त.
मुळात कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमाला कवितांशी संबंध नसलेले लोक बहुसंख्येने येतील असा काहिसा गैरसमज करून हा कार्यक्रम बांधलेला दिसतो. (नशीब यमक म्हणजे काय पासून शिकवणी सुरू होत नाही). आम्हालाच काय ती कविता दिसते आणि आम्हीच कसे कवितेचे सौंदर्य तुमच्यापर्यंट पोचवत आहोत याचेच कवतिक - तेही स्वतःच करायचे हे काही रुचले नाही.
मुक्ता बर्वेचा चोख पर्फॉर्म्न्सही या नीरस प्रकाराला सावरू शकला नाही.
तुम्हाला कविता आवडत असतील तर-तरी- या कार्यक्रमापेक्षा त्या घरी बसून वाचा हा सल्ला! :P