या धाग्यावर ऋषिकेषचा हा प्रतिसाद आहे. ज्यांना ह्या धाग्याच्या विषयाचे स्वरुप पाहता आवश्यक वाटते त्यांनी जरुर तो धागा वाचावा नि मग हा वाचावा.
आता खालिल उतारा (पून्हा?) वाचा -
माझी बायको जपानमध्ये होती तेव्हा तिने केलेले निरिक्षण मांडतो आहे. ते प्रातिनिधिक आहे किंवा कसे याची कल्पना नाही, परंतु धक्कादायक जरूर आहे:
-- जपानमध्ये एकुणच अविवाहित महिलांची संख्या भरपूर (a) आहे कारण लग्न झाल्यावर अगदी क्वचित (b) नोकरी करता येते. शक्यतो लग्न झाल्यावर स्त्रीला पूर्ण गुहकर्तव्यदक्ष असावे लागते.
-- त्यामुळे आधुनिक पिढीतील बहुतांश (c) मुली अविवाहित राहणे पसंत करत आहेत, तिथे कुटुंब संस्था बर्यापैकी कोलमडली आहे. ज्यांना मातृत्त्वाची आस आहे अशा अनेक (d)मुली स्पर्म बँकेच्या मदतीने सिंगल मदर होणे पत्करत आहेत. अर्थातच अनेक (e) पुरूषही जबरदस्तीने अविवाहित आहेत.
-- डिव्होर्सचे व पुनर्विवाहाचे प्रमाण प्रचंड (f) आहे किंबहुना तेथील स्थानिक शैक्षणिक पुस्तकात जन्म, शिक्षण, लग्न, डिव्होर्स, रिटायर्मेंट/सन्यास व मरण अशा स्टेजेस दिल्या आहेत.
-- कौटुंबिक हिंसेचे प्रमाण बर्यापैकी (g) असावे. माझ्या बायकोला ऑफिसातून निघायला उशीर होत असे कारण तेथील बहुतांश (h ) कर्मचारी उशीरापर्यंत काम करतात व क्लायंट निघाल्याशिवाय निघणे त्यांना अपमानास्पद वाटे. नंतर ते एकदर दारू प्यायला पबमध्ये जातात किंवा मग व्हिडीयो गेम्सकडे किंवा गेयशांकडे. थेट घरी जाणारा जापनिझ पुरूष एक तर नवविवाहित असतो किंवा बायकोचे नुकतेच पिरीएड्स येऊन गेले असतात असे चेष्टेने म्हटले जाते (ही माहिती माझ्या एका मित्राला त्याच्या जापनीझ कलीगने दिली आहे. खरे खोटे माहित नाही).रात्री उशीराच्या ट्रेनने गेल्यावर काही (i ) मध्यमवयीन बायका पुरूषांना स्टेशनवर रिसिव्ह करायला येतात असे दिसे. कारण त्यांचे पुरूष भरपूर पिऊन येत असत, त्यापैकी काही (j ) पुरूष स्टेशनवरच बायकांना मारत.
-- सामान्यतः (k ) बुद्धीनेही ते अत्यंत अॅवरेज वा बिलो अॅवरेज आहेत. मात्र तो बॅकलॉग ते अत्यंत हार्डवर्क आणि पर्फेक्शनच्या पराकोटीने भरून काढतात.
-- मागे भुकंप झाला तेव्हा माझा एक मित्र तिथे होते. बिल्डिंग हलु लागली तेव्हा मित्र घाबरून उभा राहिला. तरी सगळा (l )स्टाफ शांत बसून होता. तेथील 'डीआराअर' ने सुचना देईपर्यंत सगळे शांत होते. मग सुचना आल्यावर जणु बागेत फिरावे तितक्या शांतपणे एका रांगेत एमर्जन्सी एक्झिट मधुन बाहेर पडले. सांगायची गोष्ट 'वरच्यांचा आदेश' त्यांच्यासाठी देवाच्या आदेशासारखा आहे. त्याआधी काम करत नाही आणि त्यानंतर काम केल्याशिवाय राहत नाहीत. स्वतःची बुद्धी वापरून काहि सुधारणा वगैरे करण्याचा विचारही त्यांना आगाऊपणा वाटेल. मान खाली घालून दिवसभर मनापासून काबाडकष्ट करत राहणारा, अतिशय 'सिन्सियर' दिसणारा समाज (m) रात्री घरांत पूर्ण वेगळा असेल असे जाणवत राहते.
सरसकटीकरण हा दुर्गुण आहे. (आता तुम्ही लगेच म्हणणार हे कोण लिहितंय? काय वेळ आली आहे? इ इ. असो.) खास करून मी जेव्हा विचित्र ठिकाणी टक्केवारी देतो तेव्हा या माणसाला "खोटे बोलण्याची सवय आहे" असे ठरवण्यासाठी तिचा अर्थ काढला जातो. काही जणांना "खोटे" असे म्हणायचे नसले तर "बेजबाबदार" म्हणायचे असते.
वरील प्रतिसाद कंसात जी इंग्रजी अक्षरे आहेत ती मूळ प्रतिसादात नाहीत. ती मी टाकली आहेत. या तेरा ठिकाणी (आणि अजूनही काही ठिकाणी) वाचणाराच्या मनात एक आकडा येऊन जातो. त्याने वाचणाराच्या मनात जपानची एक प्रतिमा निर्माण होते.
इथे रोचक गोष्ट अशी आहेत कि ॠषिकेशला स्वतःला ही माहिती धक्कादायक वाटली आहे. शिवाय या प्रतिसादावर शेरा देणार्या मन यांसही ही माहिती धक्कादायक वाटली. बाकी जणांस कशी वाटली असेल कल्पना नाही.
वर f च्या जागी एक आकडा टाका. म्हणजे तुम्हाला किती टक्के लग्नांनंतर घटस्फोट होतात असे वाटले ते फिक्स करा. मी खाली तुम्हाला एक लिंक देणार आहे. तिच्यात १९५५ साली आणि २००५ साली दर हजार लोकांत (वा विवाहांत समजा) किती डायवोर्स झाले (टक्के गुणिले दहा)ते दिले आहे. आपला मूळ आकड्यांचा अंदाज काय आहे? कदाचित मूळ आकड्याचा अंदाज नसेल, पण फक्त २००५ मधे १००० पैकी किती विवाहांत घटस्फोट होत असेल? ते ही सांगता न आले तर १९५५ ते २००५ मधे घटस्फोट किती टक्क्यांनी, ऋषिकेशच्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, वाढले असतील? आता http://www2.aasa.ac.jp/faculty/medwelfare/kiyoo/PDF/No4/JWM04-05.pdf ही जपानच्या १९५५- २००५ पर्यंतच्या घटस्फोटांचे स्टॅट देणारी लिंक उघडा. यात याची टक्केवारी आणि इतर माहिती देणारे टेबल आहेत. तुमच्या ५-१०-१५ टक्केनी चूक होती कि ५०-१००% किंवा जास्त नि चूक होती? फक्त घटस्फोटच्या बाबतीतच पाहिले तर जपानी समाजाचे चित्र तुमच्या डॉळ्यासमोर उभे झाले होते ते योग्य होते का?
यातल्या प्रत्येक alphabet साठी कोण इतका उपद्व्याप करेल? प्रत्येक जण आपल्याला हवा तो अर्थ काढून पुढे जाईल. मग लेखकाला जे लिहायचे आहे ते पोचले असे म्हणता येईल काय? असो.
"भारतीय लोक दांभिक आहेत" असे कोणी कूठे सहज म्हणून गेला तर त्याची दखलही घेतली जाणार नाही. पण "५०% भारतीय ७५% महत्त्वाच्या प्रसंगी दांभिकपणे वागतात" असे कोणी म्हणाला तर त्याची हाडे काढून कुत्र्याला दिली जातील. माझे असे निरीक्षण आहे कि ज्यांच्याबाबत आपण "आपली मते या विषयावर साधारणतः समानच आहेत " असे समजतो त्यांना पण खोलात जाऊन खूप स्पेचिफिक विधान केले तर आवडत नाही.
जिथे आपण फंडामेंटली नवी अशी माहिती स्वीकारतो, तिथे आपण त्या माहितीमागची गृहितके चॅलेंज करतो का? कि आपल्याला जे कळले तेच खरे म्हणून चालतो? सांगणारा एक सांगतो, ऐकणारा एक ऐकतो आणि दोघेही समजतात कि योग्य संवाद झाला आहे...
असो.