यातला आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्याने हा नवीन भाग.
याआधीचे भाग :१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ । ९
My afternoons with Margueritte नावाचा फ्रेंच चित्रपट पाहिला. जरमॉं नावाचा कमी शिकलेला, शारीरिक कष्टाची कामं करून पोट भरणारा उतारवयाकडे झुकलेला पुरुष (जेरार्द दिपार्दिउ) मार्गरित नावाच्या सुशिक्षित, वृद्धेला (जिझेल कासादिसु) भेटतो. त्या दोघांची मैत्री होते अशी चित्रपटाची गोष्ट. दोघं योगायोगाने बागेत भेटतात. मार्गरित बागेत कबुतरं बघत बसलेली असते. दोघं कबुतरांवरून गप्पा मारायला सुरूवात करतात आणि पुढे त्यातून दोघांची ओळख वाढते.
मार्गरित आणि जरमॉंमधला फरक सगळ्या प्रकारचा आहे; ती अशक्त, छोटीशी, पुस्तकांपलिकडे बोलण्याचे विषय नसलेली आणि हा आडदांड, काहीसा रासवट वाटावा अशा शरीराचा, वाचनाशी काहीही संबंध नसलेला. पण दोघांमधे एक गोष्ट समान आहे, दोघंही हळुवार मनाचे आहेत. अगदी रासवट दिसणारा जरमॉंसुद्धा गर्लफ्रेंडवर आसुसून प्रेम करणारा आहे. मार्गरित त्याला पुस्तकं वाचून दाखवते. त्यातली जी वाक्य त्याला लक्षात राहतात, त्यावरून मार्गरित त्याच्या आयुष्याबद्दल बोलायला सुरूवात करते. आणि दोघांची मैत्री व्हायला लागते.
चित्रपटाबद्दल सांगण्यासारख्या अनेक सुंदर गोष्टी आहेत, पण त्या पाहिल्याशिवाय त्याबद्दल बोलणं-वाचणं योग्य नाही. पण अशी ही न-गोष्ट अतिशय बघण्यासारखी चित्रित केलेली आहे. वयोमानानुसार अशक्त पण उल्हसित मार्गरित नेहेमी वसंत ऋतूतल्या कोवळ्या, फिक्कट पिवळ्या उन्हात काहीतरी वाचताना, विचार करताना, गप्पा मारताना दिसते. दोनच प्रसंगांमधे मार्गरित बंदीस्त खोलीत दिसते, जेव्हा ती तिच्या निकामी होत जाणाऱ्या दृष्टीबद्दल बोलते आणि एकदा जेव्हा तिच्यावर आर्थिक दुरवस्था येते. जरमॉंचा पुस्तकं वाचण्याचा आळस, शब्दांशी करावी लागणारी झटापट हे सगळं दिसताना त्याचं मांजर समोर असणं हे पण गमतीशीर आहे.
चित्रपटाबद्दल बोलता येईल खूप, पण त्यापेक्षा तो पहाच. (अॅमेझॉन व्हीडीओवर विकत किंवा भाड्याने घेता येईल.)