हमारी याद आयेगी!

हमारी याद आयेगी!

लेखक - प्रभाकर नानावटी

हमारी याद आयेगी!

गीत व संगीत आपल्या जगण्याची अविभाज्य अंगे आहेत. कुठले गाणे का आवडते हे सांगता येत नसले, तरी कुठली ना कुठली गाणी किंवा एखादी धून कुठेतरी मनात पक्की गाठ बांधून बसलेली असते. गाणे आठवले वा त्याचे स्वर कानी पडले की आठवणी उसळून येतात. आपण पुन्हा एकदा त्या काळात हरवून जातो. गाण्यांना संगीत देणार्‍या संगीतकारांच्या आठवणीत व ही अजरामर गाणी शब्दबद्ध करणार्‍या गीतकारांच्या सुखदु:खात सहभागी होण्यासाठी, ‘गीतयात्री’ या पुस्तकाचे लेखक माधव मोहोळकर हे वाचकांना, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील एकूण मिळून ३०-४० वर्षांच्या कालखंडातील अवीट गोडीच्या हिंदी चित्रपटगीताच्या दुनियेत फिरवून आणतात.

आत्ताच्या चित्रपटातील गाण्यांचे शब्द ऐकल्यानंतर या हिंदी चित्रपटगीतांना सवंग, छचोर, अर्थहीन, उथळ, असभ्य म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही असेच वाटते. परंतु माधव मोहोळकरांनी त्याकाळातील चित्रपटगीतांना वाङ्मयीन मूल्य होते व त्यांच्यावर ललित लेखन करता येऊ शकते, हे या पुस्तकाद्वारे सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहे. विषय तद्दन फिल्मी असला तरी लेखन वाङ्मयीन दर्जाचे हवे, ह्यावर भर दिल्यामुळे लेखकाने या पुस्तकातील लेखनासाठी घेतलेल्या परिश्रमांना दाद द्यावीशी वाटते. लेखकानेच म्हटल्याप्रमाणे, अशा लेखनासाठी मोठ्या प्रमाणात संदर्भग्रंथ वा इतर साहित्य हवे. परंतु चित्रपटातील गीत-संगीताची दखल काव्य वा संगीत-समीक्षकांनी कधीच गंभीरपणे घेतली नाही. त्यामुळे संदर्भग्रंथ उपलब्ध असण्याचा प्रश्नच नव्हता. हे लेख लिहिताना मुख्यत्वेकरून लहानपणी ऐकलेल्या गाण्यांच्या आठवणी, मित्राकडचे ग्रामोफोन रेकॉर्ड्स व रेडियोवरील गाणे, यावर लेखकाला विसंबून राहावे लागले. त्याकाळी टेपरेकॉर्डर्स नव्हते. रेडियोसुद्धा फक्त श्रीमंतांकडे होते. तरीसुद्धा, लेखकाने खटाटोप करून दर्दी मित्रांच्या संग्रहातून आठवणींना उजाळा देत आपल्यासमोर चित्रपट गीतांच्या आठवणींचे एक विश्व उभे केले आहे.

मुळात हिंदी चित्रपटगीतांचे ढोबळपणे, लतापूर्व कारकीर्द व लताची कारकीर्द, असे दोन भाग करायला हवेत अशी स्थिती आहे. कारण लताची गाणी येऊ लागल्यानंतर काही तुरळक अपवाद वगळता, चित्रपटाच्या संगीतक्षेत्रात इतर कुठलीही स्त्रीगायिका पाय रोवून उभी राहू शकली नाही, हे मान्य करायला हवे. बेभरवश्याचे हे चित्रपटक्षेत्र कुणाला हात देईल व कुणाला आपटवेल, हे कधीच सांगता येत नाही. ‘आराधना’पूर्वी किशोरकुमार गात होता. परंतु ‘आराधना’नंतरची काही वर्षे त्याच्या गाण्याशिवाय दुसर्‍या कुणाचेही गाणे चित्रपट रसिकांना आवडेनासे झाले. असे का होते, याचे कुठलेही ठोकताळे नाहीत. माधव मोहोळकर मात्र आपल्यासमोर लतापूर्वीचा संगीतकाळ उभा करतात व त्यांच्या दृष्टीने तो हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ होता.

लेखकाने उभ्या केलेल्या या जमान्यात जगमोहन, ख़ान मस्ताना, जी. एम्. दुराणी, मास्टर निसार, सुरेंद्र, सैगल, तलत महमूद, रफी, किशोर कुमार, राजकुमारी, नूरजहान, उमादेवी (टुणटुण), गीता दत्त, ज्युथिका रॉय, मुबारक़ बेग़म, बेग़म अख़्तर (अख़्तरी फैज़ाबादी), लता, आशा असे गाण्याच्या जगातील मातब्बर मोहरे आहेत. शैलेंद्र, साहिर लुधियानवी, शकील बदायुनी, राजा मेहदी अली ख़ान, मजाज़, फैज़ अहमद फैज़, सरदार जाफ्री, इ.इ. एकापेक्षा एक असे सरस गीतकार आहेत. तसेच, गीत-संगीतांच्या खाणीतील रत्नांना पैलू पाडणारे नौशाद, ख़य्याम, शंकर-जयकिशन, सचिन देव बर्मन, अनिल बिश्वास, एन्. दत्ता, रवी, सी. रामचंद्र, कमल दासगुप्ता, सज्जाद हुसेन, हुस्नलाल-भगतराम इत्यादी संगीत रचनाकारही आहेत. एवढा भव्य पट असूनसुद्धा लेखक मात्र यातील निवडक अशा आठ रत्नांभोवती फार सुंदर शब्दचित्र उभे करतात. पारुल घोष, नूरजहान, गीता दत्त व बेग़म अख़्तर या गायिका, तलत महमूद हा गायक, मजाज़, साहिर व शैलेंद्र हे गीतकार, यांच्याभोवतीच्या विश्वातूनच आपल्याला इतरांचा परिचय होतो; त्यांच्या सर्जनशीलतेतील बारकावे उलगडतात.

बेग़म अख़्तर: संगीतकारांची संगीतयोजना, गाणार्‍यांनी जीव ओतून गायलेली गाणी व या गाण्यांना, चालींना व चित्रीकरण होत असलेल्या दृश्यांना न्याय देणार्‍या गीतकारांची शब्दरचना, याबद्दलचे वर्णन पुस्तक वाचताना वा पुस्तकात ठिकठिकाणी उल्लेख केलेली गाणी ऐकताना, हे सर्व किती थोर होते हे आपल्या लक्षात येते. अफसाना लिख रही हूँ, दिले बेक़रार का... अशी गाणारी उमादेवी, ये रात फिर न आयेगी, जवानी बीत जायेगी.. म्हणणारी राजकुमारी, रोऊँ मैं सागर किनारे वा प्रीतम आन मिलो.. अशी आर्त साद घालणारा सी. एच्. आत्मा, सैगलचा हुबेहूब आवाज काढणारा चंद्रू आत्मा, इत्यादी गायक-गायिकांबद्दल लेखक भारावून लिहितात. ऐ मोहब्बत, तेरे अंजाम पे रोना आया... ही गझल गाणार्‍या अख़्तरी फैज़ाबादी (बेग़म अख़्तर) ह्यांबद्दलचा लेख वाचताना आपण भान विसरतो. लेख म्हणजे केवळ गाण्यांची जंत्री नसून तिने जगलेला तो काळ, तिच्या आयुष्यातील चढउतार, तिची गझलगायकी, तिची ठुमरी, दादरा, चैती, कजरी वगैरे गायनप्रकार सादर करताना दिसणारी प्रतिभा ही आपल्या सदैव लक्षात राहते.

मजाज़: तलत महमूदने गायलेल्या मजाज़ यांच्या ऐ ग़म-ए-दिल क्या करूँ, ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ.. . . या गाण्यामुळे लेखक मजाज़च्या कवितांच्या प्रेमात पडले. प्रेमामध्ये ज्यांच्या वाट्याला फक्त दु:खच आले, अश्या अगणित कवींपैकी मजाज़ही एक होता. तो मुळातच भावनाप्रधान कवी होता. एक काळ असा होता, की अलीगढ़च्या गर्ल्स् कॉलेजच्या मुली चिठ्या टाकून, मजाज़ कुणाच्या वाटेला येतो ते पाहायच्या; त्याच्या कविता उश्यांखाली ठेवून आसवांनी उश्या भिजवायच्या. मजाज़च्या कवितेत पुरोगामी विचार होते. परंतु त्यात प्रचारकी थाट नव्हता. ती एक वैयक्तिक अनुभूती होती. मजाज़चा प्रेमभंग झाला. त्याचा मानसिक तोल ढळल्यामुळे तो दारूच्या नशेत बुडाला. त्याला दोनदा वेडाचा झटका आला व त्यातच त्याचा अंत झाला.

पारुल घोष: हमको हैं प्यारी हमारी गलियाँ...हमारी गलियाँ... असे स्वप्नाळू आवाजात गाणारी पारुल घोष ही बासरीवादक पन्नालाल घोष यांची पत्नी आणि संगीतकार अनिल बिश्वासची धाकटी बहीण. हिच्या गाण्यावर फिदा झालेल्या लताला पार्श्वगायन काय असते ते समजले आणि मग पारुल तिची आवडती गायिका बनली. लता स्वत: पारुलच्या ऋणाचा उल्लेख करायला कधी विसरली नाही. त्या काळात गाणी मुद्दाम लोकप्रिय करण्याची प्रथा नव्हती. कानावर सतत आदळली म्हणून लोकप्रिय झाली, असे म्हणण्याची सोय नव्हती. जी गाणी मनात रेंगाळत होती ती त्यांच्यातील अंगभूत गुणामुळे. म्हणूनच आजही पारुलची गाणी मनाला चटका लावू शकतात. नंतरच्या काळात लताचा स्वर उमटत राहिला नि बाकीचे आवाज हळूहळू विरून गेले; त्याचप्रमाणे पारुलचा आवाजही!

तलत महमूद: सुरुवातीच्या काळात तलत महमूद पार्श्वगायक म्हणून नव्हे तर गायक म्हणून प्रसिद्धीच्या झोतात होता. त्याला त्या काळी प्रतिसैगल म्हणूनच ओळखत होते. तलत अगदी लहानपणापासूनच सैगलचा वेडा होता. लखनौतील सनातनी वृत्तीच्या त्याच्या वडिलांना तलतचे हे गाण्याचे वेड बिलकुल पसंत नव्हते. तलत मात्र सैगलची गाणी, गझला पाठ करायचा व हुबेहूब सैगलप्रमाणे गायचा. मुकेश, रफीच्या सुरुवातीच्या जमान्यातील हा तलत स्वत:च्या चाहत्यांचा एक वर्ग निर्माण करू शकला. मुळात तलत हा एक गझलगायक होता. गझल व गीत ही दोन्ही भावगीतेच व तलत हा भावपूर्ण आवाजात गाणारा गायक. गझल गाताना कवीच्या मूळ शब्दांची संगत तो कधीच सोडत नसे. तेथे तडजोड नव्हती. आपल्या येथील जगजितसिंग, राजेंद्र मेहता ह्या गझल गायकांनी पाकिस्तानी गझलगायक मेहदी हसनची शैली उचलली आहे. याच मेहदी हसनला ‘पाकिस्तानचा तलत महमूद’ म्हणून ओळखायचे. तलतचा आवाज हा मुळातच निर्मळ प्रीतीचा आवाज होता. वासनेचा लवलेशही त्यात दिसत नसे. तलतच्या गाण्यामध्ये मधुरतेबरोबरच शोकात्मतेचाही सूर होता. काही संगीतकारांनी त्याच्यातील मधुरतेला झुकते माप दिले, तर काहींनी शोकात्मतेला. शंकर-जयकिशन, सचिन देव बर्मन, अनिल बिश्वास, या संगीतकारांनी तलतला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसविले व सामान्य लोकांना त्याची गाणी गुणगुणायला लावली. लेखकाची तलतची ही यादगार आपल्या मनाला भुरळ पाडते.

शैलेंद्र: लेखकाचे शैलेंद्रशी मैत्रीचे संबंध होते. गाणी, गझल व कवितांच्या आवडीमुळे दोघेही समानधर्मी. गाण्याचे दर्दी. खरे पाहता लेखकाला चित्रपटगीतावर लेख लिहिण्यास शैलेंद्रनेच प्रोत्साहित केले. शैलेंद्रच्या मृत्यूनंतर ‘मौज’च्या राम पटवर्धनांशी गप्पा मारताना शैलेंद्रविषयीच्या लेखाची कल्पना लेखकाला सुचली व नंतर तो लेख सत्यकथेच्या अंकात छापून आला. अशाच प्रकारच्या लेखांचा संग्रह, म्हणजेच ‘गीतयात्री’ हे पुस्तक.

शैलेंद्रने लिहिलेल्या व मुकेशने गायलेल्या पतली कमर है, तिरछी नजर है. .. या धुंद आणि बेहोशी आणणार्‍या स्वरांशी लेखकाचा परिचय शाळा शिकतानाच झाला होता, व शैलेंद्रच्या शब्दांची मोहिनी मोठेपणीसुद्धा ओसरली नव्हती. ‘टाळ्यांसाठी लिहिणारा कवी’, असा शैलेंद्र नव्हता. शैलेंद्रमध्ये कवी व गीतकार यांचा सुरेख संगम होता. त्याच्या बोलण्यात कमालीचा गोडवा होता. नम्रता होती व त्याचबरोबर दांडगा आत्मविश्वास होता. त्याने कधी उडवाउडवी केली नाही. लपवाछपवी केली नाही. अहंकार नाही. परळच्या रेल्वेच्या क्वार्टर्समध्ये असताना, कारखान्यात काम करत असताना शैलेंद्रने गरिबी, दारिद्र्य काय असते याचे निरीक्षण केले होते. शैलेंद्र ट्रेड युनियनची कामे करायचा. घरदार नसलेले, फूटपाथवर झोपणारे, तेथेच संसार करणारे, दिवसरात्र भटकणारे, मिळेल ते काम करणारे, नाही मिळाल्यास उपाशी राहणारे, चोरीमारी करणारे अश्या शेकडो लोकांना त्याने त्या काळात पाहिले असेल. आपण कवी आहोत, ह्यापेक्षा आपण सामान्य मनुष्य आहोत ह्यावर त्याचा कटाक्ष होता. मुळात तो सामान्य जनतेचा कवी होता. म्हणूनच पैशासाठी लिहिणार्‍या कवीप्रमाणे त्याला सुरुवातीला चित्रपटक्षेत्रात जावेसे वाटले नाही. परंतु परिस्थितीने त्याला गीतकार बनविले. राजकपूरने त्याला चित्रपटसृष्टीत आणले व ‘बरसात’पासून ‘मेरा नाम जोकर’पर्यंतच्या राजकपूरच्या चित्रपटांसाठी प्रत्येक वेळी त्याच्याकडून थीम साँग्स्, शीर्षक गीते व इतर गाणी लिहून घेतली.

एके काळी चित्रपटगीत म्हणजे प्यार, मोहब्बत, बलम, सनम, दिल के टुकडे, इत्यादी पाच-पंचवीस ठराविक शब्दांचा खेळ अशीच समजूत होती. (व आताही तशीच आहे!) परंतु शैलेंद्रने चित्रपटांसाठी आशयगर्भ गीते लिहून हा गैरसमज दूर केला. चित्रपटगीतांना कलेच्या उंचीवर नेऊन बसविले. अशा प्रकारच्या कित्येक गाण्यांचा उल्लेख मोहोळकरांनी लेखात केला आहे, जी मुळातच वाचायला हवीत. परंतु लेखकाचा हा मित्र मध्येच जग सोडून जातो. म्हणूनच हमसफर, एक दिन बिछड़ना ही था... असे लेखकाला म्हणावेसे वाटले.

नूरजहान: संगीतकार सज्जाद हुसेन यांनी संगीत दिलेल्या ‘दोस्त’ या चित्रपटातील बदनाम मोहब्बत कौन करे... और इश्क़ को रुसवा कौन करे.. हे गाणे गाणार्‍या नूरजहानने एक काळ गाजवला होता. ती अभिनेत्री होती. परंतु ती गायिका म्हणूनच चित्रपटशौकीनांच्या लक्षात जास्त राहिली. अजूनही ‘अनमोल घड़ी’ वा ‘रतन’मधील तिने गायलेली गाणी आवडत असलेले शौकीन हयात आहेत. नूरजहान स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात गेली व तिच्या गायनाला अवकळा आली. आयुष्यात भरपूर चढउतार आले. मध्यंतरी एकदा ती कुठल्यातरी कार्यक्रमासाठी मुंबईला आली. लताने तिचा सत्कार केला. नंतर ती कायमची काळाच्या पडद्याआड गेली.

साहिर: माधव मोहोळकरांनी तलत, शैलेंद्रवरील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे साहिर लुधियानवी या गीतकाराचीसुद्धा ‘अश्कों में जो पाया है वो गीतों में दिया है..’ या लेखात भरभरून कौतुक केले आहे. साहिरनेसुद्धा कवी व गीतकार म्हणूनच चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला होता. तो काळही हिंदी, उर्दूच्या आकर्षणाचा काळ होता. उर्दूतील अनेक श्रेष्ठ कवी चित्रपटात यशस्वी ठरले नाहीत. अपवाद फक्त साहिर व शकील बदायुनींचा असावा. साहिर एक निश्चित दृष्टिकोन आणि विचारप्रणाली सोबत घेऊन आला होता, तरीसुद्धा तो लोकप्रिय गीतकार झाला.

गर्भश्रीमंत, खानदानी, वतनदाराचा मुलगा असूनसुद्धा घराण्यातले ऐषआरामी जीवन सोडून गरिबी त्याने आपल्यावर ओढून घेतली होती. जहागीरदार बापाला, आपला मुलगा सामान्य लोकांसारखा शाळा-कॉलेजात जाण्याचा हट्ट करतो, हे सहन झाले नाही. साहिर घरातून बाहेर पडला. जीवनसंघर्षाला सामोरा गेला. त्यामुळे तो अकाली प्रौढ झाला. केव्हातरी याच काळात प्रेमभंग झाला. उत्कट भावनापूर्ण शायरीतून तो प्रेम व्यक्त करत राहिला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे सरकारी कॉलेजमधून त्याला काढून टाकण्यात आले. लाहोरच्या रस्त्यावर भणंगावस्थेत तो फिरायचा. स्वत: लिहिलेल्या कवितांचे बाड घेऊन प्रकाशकांचे उंबरे झिजवायचा. शेवटी त्याच्या काही कविता दिल्लीच्या मासिकात छापल्या गेल्या. कवितासंग्रह छापला गेला. रातोरात तरुणांचा तो आवडता कवी झाला. स्वातंत्र्यानंतर सचिन देव बर्मन यांनी ‘बाज़ी’ चित्रपटासाठी गीतकार म्हणून त्याची शिफारस केली, त्यानंतर त्याचे भाग्य खुलले.

हा कवी चित्रपटातील गीतांमधून पुरोगामी आशय द्यायचा. प्रेमगीतातूनही ही भावना डोकावत होती. पुरोगामी विचार प्रकट करणारी साहिरची चित्रपटातील गीते कविता वाटायच्या. अनेक वेळा ती निवेदनपर वाटत. सचिन देव बर्मन व साहिर ह्यांची जोडी त्याकाळी भरपूर गाजली. बी. आर. चोप्रांच्या चित्रपटात साहिरला मानाचे स्थान होते. "चोप्राजी आपले संगीतकार बदलतात, पण साहिरऐवजी दुसरा गीतकार घेत नाहीत", इति शैलेंद्र. अनेक कवी व साहित्यिक चित्रपट क्षेत्रात आले व गेले. त्यांच्या काही कवितांना चाली लावल्या गेल्या व त्या लोकप्रियही ठरल्या. परंतु साहिरच्या बर्‍याच कविता चित्रपटांत गायल्या गेल्या. असे भाग्य फारच कमी कवींना मिळाले असेल. ‘प्यासा’ चित्रपटातील हीरो - कवी विजय - ह्याच्या जीवनातील घटना ह्या साहीरच्या जीवनातील घटना असाव्यात, असेच लेखकाला वाटते. ‘प्यासा’ ही कवीच्या मनाची व जीवनाची कथा होती. माधव मोहोळकरांनी या संवेदनशील गीतकाराबद्दल लिहून त्याला अजरामर केले आहे.

गीता दत्त: मेरा सुंदर सपना बीत गया... असे गाणारी गीता दत्तसुद्धा, शैलेंद्र, तलत व साहिर यांच्याप्रमाणे लेखकाचा वीक पॉइंट होता की काय, असे तिच्यावरचा लेख वाचताना वाटू लागते. लताला मिळालेले मानसन्मान तिच्या वाट्याला आले नाहीत. तरीही, तीसुद्धा एक प्रथितयश गायिका होती. भक्तीगीत, विरहगीत, लाडिक प्रेमगीत वा कुठल्याही गीताचा प्रकार असो, गीता दत्त अत्यंत तन्मयतेने गायची. गीताच्या आवाजात नशा होती, मादकता होती पण उथळपणा नव्हता. आशा भोसलेचे आगमन होईपर्यंत ओ. पी. नैयरची उद्दीपक गीते, गीता दत्तच्या नशील्या आवाजात ऐकायला यायची. लेखकाने गीता दत्तच्या आवाजाच्या अजून एका वैशिष्ट्याचा उल्लेख केला आहे. पुरुष गायकांनी गायिलेली गाणी पुन्हा एकदा गीता दत्तने म्हटली तरी ती गायकांपुढे फिकी पडली नाही. सी. एच्. आत्माने गायलेले प्रीतम आन मिलो.. . पुढे गीताने गायलेले हेच गीत कुणाला विसरता आले नाही. न ये चाँद होगा न तारे रहेंगे. . हे हेमंतकुमारने अप्रतिम गायलेले गीत असूनही गीता दत्तचे स्वर झपाटून टाकतात. त्या तुलनेने लता-आशा हरल्या, असे म्हणावे लागेल. लताच्या जीवन के सफर मे राही मिलते है बिछड़ जाने को..पेक्षा किशोरचे तेच गीत अधिक लोकप्रिय झाले. लताच्या ‘जायें तो जायें कहाँ..’पेक्षा तलतचे ‘जायें तो जायें कहाँ..’ लोकांनी अधिक पसंत केले. आशाच्या ए ग़मे दिल क्या करूँ...पेक्षा तलतचे हेच गाणे अधिक लोकप्रिय ठरले.
परंतु या गायिकेचीसुद्धा जीवनकहाणी शोकांतिका ठरली. गुरु दत्तबरोबर लग्न झाले. तिच्या गाण्यावर बंदी आली. एका निसटत्या क्षणी गुरू दत्तने आत्महत्या केली व गीता दत्तचे जीवन संपूर्ण उध्वस्त झाले. वयाच्या ४१व्या वर्षी तिला मृत्यूने गाठले.

हे पुस्तक वाचताना, जुन्या जमान्यातील गीत-संगीताच्या ह्या आठवणींनी भावनावश झालेल्या लेखकाप्रमाणे, त्याने जाग्या केलेल्या स्मृतींनी आपणही नकळत हळवे होतो. मोहोळकरांचे गीतयात्री वाचल्यानंतर, त्यात त्यांनी उल्लेख केलेली (शेकडो) गाणी नेटवर ऐकताना आपला आनंद गहिरा होतो ह्यातच पुस्तकाचे व लेखकाचे यश दडले आहे. एखाद्या सर्जनशील चित्रपटसंगीत-रसिकाने ह्या पुस्तकातील आशय, उल्लेख केलेली गाणी, गीतकार, संगीतकार इत्यादींचे दृक्-श्राव्य विश्व मल्टिमिडीयाद्वारे उभे केल्यास, आमच्यासारखे रसिक नक्कीच चिरऋणी राहतील.

गीतयात्री
माधव मोहोळकर,
मौज प्रकाशन गृह (१९८७)
किं - ५३ रु, पृ.सं - १७६

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

विषय आवडीचा असल्याने लेख आवडला. एक सुधारणा बाकी सुचवावीशीच वाटते. 'ऐ गम-ए-दिल क्या करुं, ऐ वहशत-ए-दिल क्या करं' असे हवे. इश्क मुझको नही वहशत ही सही, मेरी वहशत तेरी शोहरत ही सही वगैरे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

अहा! मेजवानीच आहे..
सावकाशीने एकेक दुवे ऐकेन..

आता दिवाळी सुरू झाल्यासारखे वाटू लागले आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांतील हे एक आहे, व गेली बरीच वर्षे संग्रही आहे. जुन्या हिंदी चित्रपट संगीताची गोडी असणार्‍या प्रत्येकाने आवर्जून वाचावे. (तरूण ऐअकरांना सूचना: जुन्या= इ.स.१९६० पूर्वीच्या, २०००च्या आधीच्या नव्हे. नंतर भ्रमनिरास झाला अशी तक्रार नको. Smile ) ह्या विषयावरील लेखन बरेचदा जंत्रीस्वरूपाचे व/वा कुटाळकीवजा असते. मोहोळकरांच्या ह्या लेखांचा दर्जा व जातकुळी फार वेगळी आहे. लिखाण साहित्यिक आणि (की तरीही म्हणावे?) अतिशय वाचनीय आहे. मजाज व शैलेन्द्रवरील लेख तर खासच.

पुस्तक-परिचय वाचताना एक गोष्ट काहीशी खटकली. काही वाक्ये मोहोऴकरांच्या लेखांतून जवळ जवळ जशीच्या तशी उद्धृत केली आहेत, परंतु अवतरणचिन्हांकित नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

"मजाज: तलत महमूदने गायिलेल्या मजाज यांच्या ए ग़मे दिल क्या करूँ... . ऐ दहशते दिल क्या करूँ.. . . या गाण्यामुळे लेखक मजाजच्या कवितांच्या प्रेमात पडले."

* दह्शत ? - इथे बहुतेक "ऐ वहशत-ए-दिल क्या करूँ" असायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर आहे, वहशत-ए-दिल असेच हवे. टायपो असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

चूक दुरुस्त केल्याबद्दल संजोपराव व गुल्जी यांचा मी आभारी आहे.
मिलिंद यांना लेख वाचताना खटकल्याबद्दल सॉरी.
लिहिण्याच्या भरात अवतरणचिन्ह द्यायचे राहून गेले. कृपया मिलिंद (वा इतर कुणीही) यांनी ती मूळ वाक्ये व्य.नि.ने पाठवावेत. लेख संपादित करून अपलोड करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्मरणरंजनात्मक संगीतावर लिहिलेल्या पुस्तकाचा छान लेखाजोखा. गाणी वेळ मिळतील तशी आवर्जून ऐकेन

हा लेख वाचताना मला एक नक्की जाणवलं. १९६० पूर्वीच्या गाण्यांची कोणाला माहिती असणं तसं कठीणच आहे. मूळ पुस्तक कागदी स्वरूपात असल्यामुळे लेखकाची कितीही इच्छा असली तरी त्या गाण्याचे दुवे तिथल्यातिथे देऊन वाचकाला ताबडतोब अनुभव देण्याची सोय करता आली नाही. याउलट त्या लेखनाची ओळख करून देतानाही इथे ते करता आलं.

हा अंक कलानुभव आणि त्यात झालेले बदल या विषयावर असल्यामुळे हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. बदलत्या तंत्रामुळे बदललेल्या (सुधारलेल्या) कलानुभवाचं हे ठोस उदाहरण आहे.

(दहशत काढून वहशत बसवली गेली आहे Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0