त्रेमिती द्वीपे - ठिपक्यांच्या झाल्या आठवणी

त्रेमिती द्वीपे - ठिपक्यांच्या झाल्या आठवणी

लेखिका - ऋता

इटलीसारख्या पर्यटनासाठी प्रसिद्ध देशात रहाताना खरं तर कुठे जाऊ आणि कुठे नको असं होतं. जगात सगळ्यांना माहिती असलेली रोम, व्हेनिस, फ्लोरेन्स ही शहरं उत्साहाच्या भरात पाहिली जातात. मग तुम्ही माझ्यासारखे, तिथेच राहणारे असाल, तर तोचतोचपणा जाणवतो. म्हणजे तीच ती चित्रकला, भव्य चर्चेस्, वगैरे. त्यातून, मुळात या गोष्टींमध्ये रस नसेल, तर आपण लगेचच दुसर्‍या जागा शोधू लागतो. मला पक्षी निरीक्षणाचा छंद आहे. त्यामुळेच माझा इटालियन पक्षी निरीक्षकांशी संपर्क झाला आणि मला काही आडवाटेवरची निसर्गाने नटलेली स्थळं पाहायला मिळाली.

इटलीतली थंडी बाकीच्या युरोपसारखी कडाक्याची नसली, तरी ती कधी संपेल याची वाट सगळेच पाहत असतात; विशेष करून पक्षी निरीक्षक. त्याचं कारण म्हणजे वसंत ऋतू सुरू होताच भारत-आफ्रिकासारख्या गरम हवामानात स्थलांतर करून गेलेले पक्षी युरोपात परत यऊ लागतात. तो त्यांच्या विणीचा हंगामदेखील असतो आणि पक्षी अगदी 'रंगात' आलेले असतात. या पक्षी निरीक्षणाच्या काळाची मीही आतुरतेने वाट पाहत होते.

मार्च महिना संपताना पक्षी निरीक्षकांकडून एका सहलीची घोषणा झाली. एप्रिलमध्ये चार दिवस 'इसोले दी त्रेमिती' म्हणजेच 'त्रेमिती द्वीपांवर' जायचे ठरत होते. मी कधीही न ऐकलेली जागा असली, तरी तारखा अनुकूल असल्याने मी येणार हे आयोजकांना कळवून टाकलं! मग अर्थातच गूगल नकाशा उघडला. इटलीच्या पूर्व किनार्‍यावर थोडं दक्षिणेकडे पाहिलं, तर भारताच्या रामेश्वरमची आठवण होईल अशा प्रकारे भूमीचं एक टोक एड्रिअ‍ॅटिक् समुद्रात घुसलेलं दिसेल. तिथे किनार्‍यापासून थोड्या अंतरावर त्रेमिती द्वीप-समूह आहे. पाच इवल्या बेटांचा समूह म्हणजे नकाशावरचे ठिपकेच आहेत. आमचा प्रवास रावेन्नाहून सुरू होऊन तेर्मोलीपर्यंत कारने आणि पुढे बोटीने करण्याचं ठरलं होतं.

एड्रिअ‍ॅटिक समुद्रकिनार्‍यालगतच्या महामार्गावरून आमचा प्रवास 'तेर्मोली'च्या दिशेने २४ एप्रिलला सुरू झाला. पूर्व दिशेला समुद्र, तर पश्चिमेला काही पर्वत रांगा दिसत होत्या. जगातले सर्वात पहिले आणि लहान गणराज्य असल्याचा मान 'सान् मारिनो'ला आहे. प्रवासात हे गणराज्य ज्या पर्वतावर आहे, त्यावरचा किल्ला दिसला. पुढे बर्फाच्छादित ‘ग्रान् सास्सो’ हा पर्वत दिसला. प्रवासातल्या दृश्यांचा आनंद घेत, तसे रमतगमतच चार-पाच तासात तेर्मोलीला पोहोचलो. तिथेच जवळ असलेल्या 'क्यूती' या गावात रात्रीचा मुक्काम होता. दुपारीच तेर्मोलीला पोहोचल्यामुळे संध्याकाळी थोडं पक्षी निरीक्षण करता आलं. रात्रीचं जेवणही खास लक्षात रहाण्यासारखं होतं. 'लेसीना' आणि 'पुल्यीआ' हे इटलीतले प्रांत तिथल्या ऑलीव् फळासाठी खास प्रसिद्ध आहेत. एरवी मला ऑलीव् तेलाची चव विशेष कळते असं नाही पण तिथे सॅलडवर जे तेल घेतलं त्यामुळे सॅलड्ला आलेली चव विसरू शकणार नाही.

दुसर्‍या दिवशी सकाळी बोटीच्या धक्क्यावर गाड्या पार्क करून बोटीत बसलो. जेमतेम पन्नास मिनिटांचा प्रवास होता. बोट विमानासारखीच बंदिस्त होती. त्यामुळे डेकवर जाऊन समुद्र पाहत प्रवास होईल ही आशा मावळली. खिडक्यासुद्धा आपल्या ट्रेनच्या एसी डब्यांना असतात तितपतच पारदर्शक असल्याने प्रवासात समुद्राचा आनंद अजिबात घेता आला नाही. बोट 'सान् निकोलाय्' ह्या त्रेमिती द्वीपांपैकी धक्का असलेल्या बेटाला लागली आणि सगळे उतरलो. सान निकोलायावर उतरलो तेव्हा सुंदर ऊन पडलं होतं आणि समुद्राचं पाणी निळंहिरवं चकाकत होतं. बेटावर असंख्य गल्स् पक्षी कावळ्यांसारखेच दिसत होते. तिथून छोट्या बोटीतून 'सान् दोमीनो' ह्या त्रेमिती द्वीपांपैकी सर्वात मोठ्या बेटावर आलो. हे बेट अडीच-तीन किलोमीटर लांबीचे आहे. पूर्णपणे पाईन् वृक्षांनी आच्छादलेलं हे बेट, लांबून काळ्या खोडाच्या आणि हिरव्या छत्रीच्या विशाल मशरूम्सचे बनले असल्यासारखे भासले.

त्रेमिती द्वीपांपैकी फक्त सान दोमीनो बेटावर वस्ती आहे. त्यावरच्या 'इसोले वेर्दे' (हिरवे बेट) या ब्रेड् अ‍ॅन्ड् ब्रेकफास्ट्मध्ये आम्ही राहिलो. तेर्मोलीच्याच धक्क्यावर आम्हांला आमचे गाईड जोडपे भेटले होते आणि आम्ही एकत्रच बोटीतून सगळे आलो होतो. हे जोडपं म्हणजे 'गार्गानो पार्क'मध्ये आढळणार्‍या काही वनस्पतींचा अभ्यास करणारे पी.एच्.डी.चे विद्यार्थी होते. सान् दोमीनो आणि सान् निकोलाय् या दोन बेटांवर आम्ही या गाईड्ससोबत फिरलो. पक्षी आणि थोडा इतिहास, या दोन्हींबद्दल यांच्याकडून काही कळले. सान डोमिनोवर पाईन वृक्षामध्ये राहणारे पक्षी दिसले. अधूनमधून एखाद-दुसरा शिकारी पक्षी वर घिरट्या घालताना दिसत होता. 'हेर्रिन्ग् गल्स्' सगळीकडेच मोठ्या संख्येने दिसत होते. सान् निकोलाय् बेटावर किल्ला आहे. तिथे तुरुंग होता आणि अनेक राजकीय कैद्यांना तिथे डांबले होते, असे ऐकले. किल्ल्याच्या तटबंदीलगत आम्ही पक्षी पाहत फेरी मारली. फिरताना समुद्र दिसत होताच, पण कडेकपारीतले पक्षीही काही जण अधून मधून हेरत होते. त्यात 'पेरेग्रीन् फाल्कन्' बघायची संधी मिळाली. तो फक्त एकदाच आधी मी बंगलोरजवळ पाहिलेला होता. पहिल्या दिवशी पाईन वृक्षांमुळे थोडी तरी सावली मिळत होती. पण सान् दोमीनोवर सगळं फ़िरणं भर उन्हात होतं. या दिवशी संध्याकाळी गाईड्सना निरोप दिला.

दिवसभर भटकंतीनंतरही रात्रीच्या एका खास 'पक्षी ऐकण्याच्या' कार्यक्रमाची उत्सुकता होती. आमच्यासोबत पक्ष्यांचा अभ्यास करणारी एक विद्यार्थिनी होती. एका प्रकारच्या समुद्री पक्ष्यावर जी.पी.एस्. उपकरणे बसवून त्यांच्या समुद्रसंचाराचा अभ्यास ती करत होती. तिनेच 'बेर्ता' या पक्ष्यांचे ओरडणे ऐकण्याचा कार्यक्रम आखला होता. बेर्ता पक्षी दुर्मिळ असल्याने आणि मुख्यत्वे ते दूर समुद्रात विहरत असल्याने, त्यांच्याबद्दल कमी माहिती आहे. हे पक्षी पाच-सहा वर्षांनी कडेकपारीताल्या घरट्यात एक अंडं घालतात. नर आणि मादी आलटून पालटून घरट्यात राहतात. नर जर समुद्रावर गेला तर तो खाणं घेऊन दुसर्‍या दिवशी मध्यरात्री परततो. मग मादी, जी घरट्यात अंडं उबवत असते, ती समुद्राकडे जाते आणि दुसर्‍या दिवशी परतते. तर हे ड्यूटीचं हस्तांतरण करण्यासाठी रात्री पक्षी येतात, तेव्हा आपापलं घरटं आपल्या जोडीदाराच्या आवाजाने बरोबर शोधून काढतात. हे ओरडणं ऐकायला आम्ही रात्री जेवणानंतर एका कड्यापाशी गेलो. सुरुवातीला फक्त, अात्तापर्यंत सारखं ऐकून वैताग आणणारं गल्सचंच ओरडणं ऐकू येत होतं. पक्षी परत येण्याच्या आधीच आम्ही तिथे पोहोचलो होतो. काही वेळ वाट पाहत शांत बसलो. अचानक वेगळे आवाज येऊ लागले आणि ते वाढतच जाऊ लागले. कण्हण्यासारखे असे ते आवाज होते. बेर्ता पक्ष्यातच दोन उपजाती आहेत - 'बेर्ता माज्जोरे' आणि 'बेर्ता मिनोरे'. आणि प्रत्येक जातीतले नर आणि मादी थोडा वेगळा आवाज काढतात. मला ते काही फार स्पष्टपणे वेगळे काढता आले नाहीत. हे ओरडणं म्हणजे काही मधुर असं नसलं, तरी या पक्ष्याच्या रोजच्या व्यवहारातली एक गोष्ट अनुभवायला मिळाल्याचा आनंद होता.

तिसर्‍या दिवशी सकाळी त्रेमिती द्वीपांपैकी सर्वात छोट्या 'काप्राय्या' या बेटावर फ़िरलो. हे बेट खडकाळ आहे आणि फक्त खुरटी झुडुपे त्यावर आहेत. एका छोट्या बोटीतून आम्हाला त्यावर सोडलं गेलं आणि ती बोट निघून गेली - संध्याकाळी परतण्यासाठी. या बेटावर फक्त एक जुनी मच्छिमारांची, आता वापरात नसलेली झोपडी आहे. या बेटावर चालताना 'खाली बघत चाला', असे आम्हाला सांगितलेच होते. तसे चालताना लगेचच अगदी पावला-पावलावर 'हेर्रिन्ग् गल्स'ची २-३ अंडी असलेली घरटी दिसायला लागली. ही घरटी म्हणजे, काही काटक्या एकत्र गोलाकारात लावून, त्यावर काही मऊ गोष्टी घालून तयार केलेली होती. अंडी निळसर करडी आणि वर काळी नक्षी असलेली होती.

अगदी इतक्या प्रमाणात होती म्हणून आम्हांला दिसली, नाहीतर एरवी ती सभोवतालच्या रंगातनं हेरणं कठीण. या बेटावर अजिबातच सावलीची जागा नव्हती. कोरडे पदार्थ जेवण म्हणून बरोबर आणले होते. तेच खाऊन मग परत ते बेट फिरत पालथं घातलं. एका कड्याजवळच्या खडकात गल्सचे पिल्लूही दिसले. खूपच गोंडस पण हेरायला अंड्यांहूनही कठीण असे होते. या बेटावर फिरताना घरटी दिसली तसेच मेलेले गल्सही अनेक दिसले. बरोबरचे पक्षी अभ्यासक मेलेल्या पक्ष्यांच्या पायात वळं (रिंग) आहे का हे पहात होते. एकीने आठवण म्हणून एका गलची कवटी बरोबर घेतली!

छोटी बोट आम्हाला परत न्यायला आली. याच बोटीतून त्रेमिती द्वीपांभोवती समुद्रातून एक चक्कर ठरवली होती. काप्राय्या बेटावर खडकांचीच एक कमान तयार झाली आहे. ती आधी बेटावरून पाहिलीच होती, आता समुद्रातूनही पाहिली. आणखीनही एक गुहा पाहिली. मग बेटांपासून थोडे लांब समुद्रात गेलो. आता नक्की कुठे नेणार आहेत, ते आधी कळेना. मग बोट थांबवली आणि आजूबाजूचा समुद्र दुर्बिणीतून पाहू लागलो. जिथे आधी फक्त चकाकणारं पाणी होतं तिथे अचानक एक पक्ष्यांचा थवा आहे, हे कळलं. होय, तेच ते - रात्री ज्यांचे ओरडणे ऐकले होते - तेच ते बेर्ता पक्षी होते! दुर्बिणीतून थोडावेळ ते पाहिले. मग ते उडून दूरवर गेले. आम्हीही बेटावर परतलो.

दुसर्‍या दिवशी परतीची मोठी, बंदिस्त बोट पकडली. तेर्मोलीला परत गाड्यामधून शहरांकडे निघालो. ग्रान् सास्सो, सान् मारीनो असे पाहत पुन्हा रावेन्ना गाठलं. तिथे सर्वांना निरोप देऊन, मी बोलोन्याची ट्रेन पकडली. पहिल्यांदा नकाशात दिसलेल्या त्रेमिती द्वीपांच्या ठिपक्यांचे आता आठवणीत रूपांतर झाले होते.

१. तळटीप : विणीच्या हंगामात पक्ष्यांच्या अनेक प्रजातींमध्ये नराला रंगीबेरंगी पिसे फुटतात, जसा मोराला पिसारा फुटतो.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

उत्तम.. वेधक आणि वेचक लेखन.. थोडक्यात सारं काही सांगितलं आहे
घरट्याची, पक्षांची जवळून चित्रे घेतली असतील तर तीही बघायला आवडतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काप्राय्या बेटावर दिसलेली घरट्यातली गल पक्ष्यांची अंडी आणि एक पिल्लू. माझ्या १८-५५ लेन्सने पक्ष्यांचे जवळून फोटो काढायला मला फारसे जमले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍या चित्रातील गोंडस पुंजका! वॉव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडतय.
ह्या बेटांबद्द्ल सप्तरंग पुरवणीत वाचलं होतं. "चिमुकले देश" अशा नावाचे काहीतरी सदर नियमित येइ तेव्हा.
बादवे, जगातले सर्वात पहिले आणि लहान गणराज्य असल्याचा मान सान मारिनोला आहे. ह्यात बारीकशी दुरुस्ती :-
सध्या अस्तित्वात असलेल्यांपैकी जगातले सर्वात पहिले आणि लहान गणराज्य असल्याचा मान सान मारिनोला आहे.
ग्रीक गणराज्य, खुद्द रोमन रिपब्लिक, भारतीय सोळा महाजनपदेदांतील काही(लिच्छवी, वृज्जी, मत्स्य, कांभोज) हे सगळेच मरिनोपेक्षा जुने आहेत.
पण सध्या तिथे सलग अशी आलेली गणराज्याची परंपरा नाही.
.
सवडिने निवांत वाचून अधिक प्रतिक्रिया देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धन्यवाद मन आणि ऋषिकेश. माहितीतल्या दुरूस्ती बद्द्लही धन्यवाद. आणखी काही निवडक, पूरक चित्रही लवकरच देईन.
एक दुरूस्ती: सहाव्या परिच्छेदात 'पेरेन फाल्कन' ऐवजी 'पेरेग्रीन फाल्कन (Peregrine Falcon)' असे वाचावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात योग्य तो बदल केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरवणीतील चित्रे मूळ लेखात आता समाविष्ट केली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0