निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध

'नरहर कुरुंदकर' ह्या नावाला महाराष्ट्रामध्ये एकेकाळी एक वलय होतं; मर्यादित प्रमाणात आजही आहे. त्यामागे अनेक कारणं होती - त्यांचा मार्क्सवाद, त्यांचं नास्तिक असणं, शिवाजी किंवा मनुस्मृती अशा विषयांवरची त्यांची चिकित्सा, त्यांची साहित्यसमीक्षा, विद्यार्थीप्रियता आणि प्रभावी वक्तृत्व - अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. निजामाच्या राजवटीत जन्म आणि वाढ, समाजवादी वर्तुळात वावर, मराठवाड्यातल्या परंपराप्रिय ब्राह्मण घराची पार्श्वभूमी, मामा ना. गो. नांदापूरकरांचा लहानपणापासूनचा सहवास, हमीद दलवाईंशी मैत्री अशा अनेक घटकांनी त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेला पैलू पाडले. महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा विचारवंत म्हणून त्यांची ख्याती झाली. १९८२ साली अवघ्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या त्यांच्या अकाली निधनानं त्यामुळे अनेकजण हळहळले.

ह्या पार्श्वभूमीवर 'निवडक नरहर कुरुंदकर' म्हणून काही खंड प्रकाशित होणार असल्याची बातमी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची असणार. जुलै २०१३ मध्ये देशमुख प्रकाशनातर्फे त्या प्रकल्पाअंतर्गत पहिला खंड प्रकाशित झाला. संपादन 'साधना' परिवारातल्या विनोद शिरसाठ ह्यांचं आहे. व्यक्तिचित्रं हा पहिल्या खंडाचा विषय आहे. कुरुंदकरांनी लिहिलेली व्यक्तिचित्रं, त्यांचं स्वत:विषयीचं लिखाण आणि त्यांच्याविषयी इतरांनी केलेलं लिखाण असं ह्या खंडाचं स्वरूप आहे. निवड करताना सध्या पुस्तकरूपात सहज उपलब्ध असलेलं कुरुंदकरांचं लिखाण वगळून ती केली आहे असं संपादक म्हणतात. त्यामुळे पूर्वी प्रकाशित झालेलं पण आता सहज वाचायला न मिळणारं लिखाण इथे वाचायला मिळतं. वरच्या परिच्छेदात उल्लेख केलेले कुरुंदकरांचे अनेक पैलू त्यात दिसतात.

सुरुवातीला 'व्यक्तिपूजा : एक चिकित्सा' ह्या स्फुटाद्वारे कुरुंदकरांचे व्यक्तिचित्रणाबद्दलचे विचार दिले आहेत. संपादकांचा हा निर्णय महत्त्वाचा आहे. कारण, आपण पुढे जे वाचणार आहोत त्याची संदर्भचौकट त्यामुळे स्पष्ट होते. 'ज्या व्यक्तींविषयी आदर किंवा श्रद्धा वाटत असते त्यांचीही चिकित्सा करायला हवी; त्यांचे सर्व विचार पटायलाच हवेत असं नाही'; किंवा, 'एखादी व्यक्ती नक्की कशासाठी मोठी मानली जाते आणि तुम्हाला नक्की कोणत्या क्षेत्रातल्या योगदानासाठी ती महत्त्वाची वाटते ह्याची चिकित्सा करून त्या व्यक्तीचं मोठेपण ठरवावं', अशी कुरुंदकरांची इथे व्यक्त झालेली मतं त्यांच्या तर्कनिष्ठ लौकिकाला साजेशीच आहेत. 'आपल्या वंदनीय नेत्यांच्या चुका आणि मर्यादा सभ्य शब्दांत नोंदवायला आपण तयार आहोत का? निदान इतर कुणी ते केलं तर सभ्यपणे ते ऐकून घेण्याची क्षमता तरी आपल्यात आहे का?' हे त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आजच्या असहिष्णू वातावरणात विशेष मननीय आहेत.

त्यानंतर, म्हणजे पहिल्या विभागात काही ऐतिहासिक व्यक्तींबद्दलचे लेख आहेत. पहिला लेख सॉक्रेटिसबद्दल, किंबहुना त्याच्या मृत्यूबद्दल आहे. 'तर्कशुद्ध विचारांचा आग्रह धरणारा सॉक्रेटिस आत्म्याचं अमरत्व मानत होता, मग तो कितपत तर्कशुद्ध मानावा?', असा सवाल कुरुंदकर करतात. सॉक्रेटिसनं आपला गुन्हा मान्य करून अथेन्स सोडायचा पर्याय स्वीकारला असता, तर त्याला मरण पत्करावं लागलं नसतं, हे सांगून 'नि:स्वार्थ बलिदानाची गरज तर्कानं पटवून देता येईल असं वाटत नाही' असंही ते म्हणतात. म्हणजे सॉक्रेटिसच्या वर्तनातल्या ह्या गोष्टी अतार्किक आहेत असं ते मानतात. शिवाय, येशूला क्रूसावर ठार मारणाऱ्या पॅलेस्टिनी न्यायासनापेक्षा गुन्हा कबूल करून जगण्याचा पर्याय देणारं अथेन्सचं न्यायासन अधिक सुसंस्कृत आहे असं सांगून 'त्यामुळे मला सॉक्रेटिसइतकाच त्या न्यायासनाबद्दल आदर आहे' असं कुरुंदकर म्हणतात. 'विचारांची उपेक्षा करणाऱ्या किंवा त्यांना वंदनीय मानून त्यांची समाधी बांधणाऱ्या समाजापेक्षा विचारांनी हादरून जाणारा, चवताळणारा अथेन्सचा समाज मला सॉक्रेटिसहूनही अधिक पूज्य वाटतो', अशी मांडणी ते करतात.

ह्या मांडणीबद्दल मतभेद शक्य आहेत. ह्या मांडणीत आणि कुरुंदकरांच्या व्यक्तिगत आचार-विचारांत काही विरोधाभास किंवा सुसंगती आढळते का ते पाहिलं तर काय दिसेल? स्वत: कुरुंदकर उपेक्षेचे धनी होते. त्यामुळे, आणि परंपराप्रिय भारतीय समाजात होणारी विचारांची अवहेलना किंवा अंधपूजा त्यांनी जवळून पाहिली असल्यामुळे अथेन्सच्या समाजाबद्दलची त्यांची भावना समजू शकते. पण आज आपण वातावरण ढवळून काढणाऱ्या असहिष्णू जगात वावरतोय. तालिबानी दहशतवाद असो, की 'सनातन प्रभात'चं नरेंद्र दाभोलकरांबाबतचं गरळ ओकणं असो; आपल्याला न पटणाऱ्या विचारांमुळे वेगवेगळ्या पातळींवरचं ते चवताळणंच आहे. मग ह्याला कुरुंदकरांचं तर्कशास्त्र लावावं का? की त्याऐवजी, विचारांनी चवताळून जाणारा समाज तालिबानीसुद्धा असू शकतो, आणि तो येशूला क्रूसावर चढवणाऱ्या न्यायासनाइतकाच क्रूर असू शकतो हे लक्षात घ्यावं? मग त्यापेक्षा 'मला तुझे विचार पटत नसले, तरीही मी त्यांना केवळ उपेक्षेनं किंवा अनुल्लेखानं मारेन; तुला जिवे मारणार नाही' असं म्हणणारा समाज अधिक सुसंस्कृत नाही का?

स्वत: कुरुंदकर नास्तिक होते. 'मी आस्तिक का नाही?' हा त्यांचा लेख ह्याच पुस्तकात आहे. तरीही आपल्या कुटुंबातल्या धार्मिक कार्यांतला त्यांचा सक्रीय सहभाग आणि त्याचं ते करत असलेलं समर्थन ह्यामुळे त्यांच्यावर टीकादेखील झाली होती. सॉक्रेटिसनं (मान्य नसलेला) गुन्हा जाहीररीत्या मान्य करून शहर सोडण्याचा पर्याय निवडणं हे अधिक तार्किक झालं असतं असं म्हणणारे कुरुंदकर अणि नास्तिक असूनदेखील कौटुंबिक धार्मिक कार्यातला आपला सहभाग मान्य करणारे आणि त्याचं समर्थन करणारे कुरुंदकर ह्यांत काही दुवा सापडतो का?

असो. 'सॉक्रेटिस सुसंगत किंवा तर्कशुद्ध नसला तरीही त्याचा ह्या दोन गोष्टींबद्दलचा आग्रह महत्त्वाचा आहे, आणि विचारांशी तडजोड न करता त्यानं स्वीकारलेलं मरण आपल्याला विलोभनीय वाटतं', असंही कुरुंदकर म्हणतात. 'इतर कुणाबरोबर स्वर्गात राहण्यापेक्षा सॉक्रेटिसबरोबर नरकात राहणं चांगलं', असंही ते म्हणतात. त्याच न्यायानं कुरुंदकरांच्या काही आचार-विचारांत विरोधाभास आढळले तरीही त्यांचे जे विचार मननीय वाटतात ते स्वीकारून त्यांचं मोठेपण मान्य करता यावं. शिवाय, 'व्यक्तिपूजा : एक चिकित्सा' ह्या त्यांच्याच स्फुटानुसार असंही म्हणता येईल की त्यांचं नास्तिक असणं हे काही त्यांचं महाराष्ट्राला मोठं योगदान आहे असं नसल्यामुळे हा मुद्दा गौणही मानता येईल.

(पुस्तकाचा परिचय लांबला त्यामुळे तो क्रमश: देईन.)
भाग २ | भाग ३

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

'तर्कशुद्ध विचारांचा आग्रह धरणारा सॉक्रेटिस आत्म्याचं अमरत्व मानत होता, मग तो कितपत तर्कशुद्ध मानावा?', असा सवाल कुरुंदकर करतात.

मग तो आजच्या काळात कितपत तर्कशुद्ध मानावा? असा प्रश्न नक्कीच कोणालाही पडेल. सॉक्रेटीस चा काळ कुठला कुरुंदकरांचा काळ कुठला असा प्रश्नही मनात येतो.
बाकी हा खंड म्हणजे नक्कीच उपयुक्त असेल. एक वैचारिक मेजवानीच म्हणा ना!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सुरूवात. मिळवून वाचण्याच्या यादीत या खंडाची भर घातली आहे.
(पुढील खंड कधी प्रसिद्ध होणार याबद्दल काही कल्पना?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजच साधनामधून पहिला खंड घेऊन आलो. दुसरा खंड फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रकाशित होईल असे सांगण्यात आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

> 'तर्कशुद्ध विचारांचा आग्रह धरणारा सॉक्रेटिस आत्म्याचं अमरत्व मानत होता, मग तो कितपत तर्कशुद्ध मानावा?', असा सवाल कुरुंदकर करतात.

मी आत्म्याचं अस्तित्व मानत नाही, पण मानत असतो तर अमरत्वही मानलं असतं. आत्मा अस्तित्वात आहे पण मर्त्य आहे असं मानणं म्हणजे सान्ताक्लॉज अस्तित्वात आहे पण त्याला मुलं आवडत नाहीत, असं मानण्यासारखं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सान्ताक्लॉजची उपमा नीट कळली नाही.
शरीर जिवंत असणं यालाच शरीरात आत्मा आहे असं म्हणतात अशी माझी समजूत आहे.
शरीर जिवंत असणं हाच जर आत्मा असण्याचा पुरावा असेल तर त्याच्या अस्तित्त्वाची मुळात शंकाच येत नाही. मृत्यू होतो तेव्हा आत्मा(=जिवंत शरीर - मृत शरीर) मरतो(म्हणजे शरीरापासून डीकपल होऊ शकत नाही याआर्थी) का तो 'मुक्त' वगैरे होतो की आणखी कुठल्या स्टेटला जातो (डीकपलत्व/अमरत्त्व असल्यामुळे) याबद्द्ल सॉक्रेटिसच्या समजाला कुरुंदकर तर्कदुष्ट म्हणत आहेत असा अर्थ मला वाटला.

(थोडं अवांतरः तुम्ही आत्म्याचे अस्तित्त्व मानत नाही असं लिहिलं आहे म्हणून एक मनात प्रश्न आला की अत्म्याच्या अस्तित्त्वाचा प्रश्न देव आहे/नाही याच माळेतला आहे का?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

> शरीर जिवंत असणं यालाच शरीरात आत्मा आहे असं म्हणतात अशी माझी समजूत आहे. शरीर जिवंत असणं हाच जर आत्मा असण्याचा पुरावा असेल तर त्याच्या अस्तित्त्वाची मुळात शंकाच येत नाही.

माझी समजूत तशी नाही. सर्वसाधारणपणे जे लोक आत्म्याचं अस्तित्व मानतात ते 'आत्मा' ही काहीतरी अभौतिक आणि शरीरापेक्षा स्वतंत्र वस्तू आहे असं समजतात. उदाहरणार्थ, 'वासांसि जीर्णानि- ' हा गीतेतला श्लोक ज्या कुणी लिहिला असेल, त्याच्या मनात असं काहीतरी असणार हे उघड आहे.

मात्र काहीजण आत्म्याचं अस्तित्व मानतात, पण प्रत्येक जिवंत शरीरात तो असतो असं मानत नाहीत. (उदाहरणार्थ, देकार्तच्या मते जिवंत माणसाला आत्मा असतो, पण जिवंत कुत्र्याघोड्यांना वगैरे नसतो.) पण यात मतांतरं फार आहेत, आणि मुळात माझा स्वत:चा यावर विश्वास नसल्यामुळे इतर लोकांचा नक्की कशावर असतो हे छातीठोकपणे लिहिणं अवघड आहे.

देव आहे की नाही याच धर्तीवर आत्मा असण्यानसण्याबद्दल धुळवड पद्धतीची चर्चा करता येईलच. कुणाला करायची असल्यास माझी काय हरकत असणार? पण यातून एक एंपिरिकल टेस्ट होऊ शकते. चर्चा मेल्यानंतर जर कंप्यूटर स्क्रीन तडकला तर याचा अर्थ चर्चेतला आत्मा आता बाहेर पडलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

पण यातून एक एंपिरिकल टेस्ट होऊ शकते. चर्चा मेल्यानंतर जर कंप्यूटर स्क्रीन तडकला तर याचा अर्थ चर्चेतला आत्मा आता बाहेर पडलेला आहे.

पण... पण... माणूस मेल्यावर त्याच्या शरीराचा कोणता ना कोणता भाग नेसेसरिली तडकलेला पाहिला आहेत काय कधी? आत्मा हा शरीरातल्या (अगोदरच अस्तित्वात असलेल्या) कोणत्या ना कोणत्या छिद्रातून बाहेर पडतो, अशी कायशीशी थियरी आहे ना?

कंप्यूटरला सीपीयू प्रमाणाबाहेर तापू नये म्हणून फ्यान असतो, त्याच्यापुढे गरम हवा बाहेर पडण्यासाठी छिद्रे असतात. आत्मा त्या छिद्रांतून बाहेर पडू शकतो. चर्चा मेल्यानंतर मॉनिटर तडकण्याचे कारण नाही.

तेव्हा, मॉनिटर न तडकणे हे काहीही सिद्ध करत नाही, अत एव टेस्ट क्रायटेरियॉन फ्लॉड आहे, असे नोंदवू इच्छितो. सबब, टेस्ट अमान्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(उदाहरणार्थ, देकार्तच्या मते जिवंत माणसाला आत्मा असतो, पण जिवंत कुत्र्याघोड्यांना वगैरे नसतो.)

देकार्तच्या स्वतंत्र मताबद्दल कल्पना नाही, परंतु प्रस्थापित कृष्णनीतीससुद्धा 'मानवाव्यतिरिक्त इतर प्राण्यांस आत्मा असणे' हे मान्य नसल्याचे ऐकिवात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रस्थापित कृष्णनीतीससुद्धा

आवडल्या गेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

परिचय पूर्ण दिला असता तरी वाचायला आवडलं असतं. मजकुरामध्ये प्रवाहीपणा आहे, मग पूर्ण द्यायला हरकत नव्हती.
कुरुंदकरांचं एक वैशिष्ट्य जाणवलं ते असं, की आपला मुद्दा ते स्पष्टपणे मांडत असले तरी आक्रस्ताळेपणा करताना दिसत नाहीत. आपल्या गतीने आपल्या विचारांची शांतपणे मांडणी करत राहण्याचा फार मोठा गुण त्यांच्या लेखनात आहे. त्याला अर्थातच व्यासंगाची आणि आपल्या क्षमतेनुसार सर्व बाजू तपासून पाहण्याची जोड आहे. आपल्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन असू शकतो याची जाणीव ठेवल्यामुळे कदाचित हे गुण त्यांच्या लेखनात दिसत असतील. वेगळ्या अर्थी असा एक गुण वरच्या परिचयातही जाणवत आला, त्यामुळे परिचय पूर्ण दिला असतात तरी ते वाचनीय ठरलं असतं, असं एक मत.

पुस्तकाचं मुखपृष्ठ एके ठिकाणी सापडलं, ते डकविले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. मी कुरुंद्करांचं काहीच वाचलेलं नाही. पण वाचण्याची इच्छा होत आहे. लेखाच्या पुढचा भागाची वाट पहात आहे.
धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खंड वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

ह्या विषयाची अधिक माहिती असणाऱ्यांसाठी प्रश्न: कुरुंदकर मार्क्सवादी होते, म्हणजे केवळ विचारांनी की CPI शी वगैरे त्यांचा सक्रिय संबंध होता? स्टॅलिनप्रभृतींनी केलेल्या अत्याचारांबद्दल त्यांची भूमिका काय होती? याबद्दल त्यांनी काही लिहिलं आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

माझ्या माहितीप्रमाणे कुरुंदकर मार्क्सवादी होते पण कम्युनिस्ट पक्षाशी त्यांचा संबंध नव्हता. ते सर्वकाळ समाजवादी (आणि पुढे प्रजासमाजवादी) पक्षाशी संबंधित होते. स्टॅलिनप्रभृतींनी केलेल्या अत्याचारांचे समर्थन केल्याचे कुठे त्यांच्या स्वतःच्या लेखनात आढळून आले नाही.

नियंत्रित अर्थव्यवस्थेचे मात्र ते समर्थक होते. या भूमिकेमागे नव्याने उभ्या राहणार्‍या देशाला मर्यादित साधनसामुग्री हव्या त्या दिशेने वळवावी लागते (आणि हे नुसत्या उत्तेजनाने* साध्य होत नाही) असा विचार असल्याचे दिसते.

*उत्तेजनाने म्हणजे सध्या प्रचलित असलेला विचार - करसवलती द्या म्हणजे भांडवलदार आपोआप त्या दिशेने जातील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>> कुरुंदकर मार्क्सवादी होते, म्हणजे केवळ विचारांनी की CPI शी वगैरे त्यांचा सक्रिय संबंध होता? स्टॅलिनप्रभृतींनी केलेल्या अत्याचारांबद्दल त्यांची भूमिका काय होती? याबद्दल त्यांनी काही लिहिलं आहे का?

कुरुंदकर ज्यांना गुरुस्थानी मानत ते भालचंद्र कहाळेकर मराठवाड्यातले मार्क्सवादी विचारवंत होते. पण त्यांचे मार्क्सवादी पक्षाशी मतभेद होते. म्हणजे पृथक्करणाची बैठक मार्क्सवादी पण पक्षीय राजकारणाबाहेर वावर असे ते होते. कुरुंदकरांवरचा त्यांचा प्रभाव कुरुंदकर मान्य करतात. ह्या खंडात त्यांच्यावर एक लेख आहे. त्याविषयी यथावकाश लिहीनच. एकुणात कोणत्याच पोथीनिष्ठाशी कुरुंदकरांचं जमणं शक्य नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कुरुंदकरांची चिकित्सा आक्रमक नसली तरी निरपेक्ष न वाटता विशिष्ट हेतुपूर्वक वाटते, पण वाचनाच्या निमित्ताने आवडणार्‍या आणि नावडणार्‍या विषयांबद्दल चिकित्सा करण्याची सवय लागणे महत्त्वाचे वाटते.

मग ह्याला कुरुंदकरांचं तर्कशास्त्र लावावं का? की त्याऐवजी, विचारांनी चवताळून जाणारा समाज तालिबानीसुद्धा असू शकतो, आणि तो येशूला क्रूसावर चढवणाऱ्या न्यायासनाइतकाच क्रूर असू शकतो हे लक्षात घ्यावं? मग त्यापेक्षा 'मला तुझे विचार पटत नसले, तरीही मी त्यांना केवळ उपेक्षेनं किंवा अनुल्लेखानं मारेन; तुला जिवे मारणार नाही' असं म्हणणारा समाज अधिक सुसंस्कृत नाही का?

हे प्राथमिकतेत बरोबर वाटतं पण 'तुला जिवे मारणार नाही' मधे मारण्याचे सामर्थ्य असण्याचे संकेत आहेत, सामर्थ्य असणारा विचारी असण्याची शक्यता धुसर होत जाते असं इतिहासावरून लक्षात येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे प्राथमिकतेत बरोबर वाटतं पण 'तुला जिवे मारणार नाही' मधे मारण्याचे सामर्थ्य असण्याचे संकेत आहेत, सामर्थ्य असणारा विचारी असण्याची शक्यता धुसर होत जाते असं इतिहासावरून लक्षात येतं.

अगदी पटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

>> सामर्थ्य असणारा विचारी असण्याची शक्यता धुसर होत जाते असं इतिहासावरून लक्षात येतं.

हा मुद्दा व्यक्तीबाबत नाही, तर समाजाबाबत आहे. समाजातली न्यायव्यवस्था फाशी देण्यास समर्थ असली, तरीही समाज फाशी देण्याबाबत विचारी, म्हणजे अगदी अपवादात्मक परिस्थितीतच फाशी देणारा, असू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

समाजाकडे जीवे मारण्याचं सामर्थ्य नेहमी असतंच. सर्व शाह्यां*मध्ये समाजाने ते राज्यव्यवस्थेकडे सुपूर्त केलेले असते. आणि लोकशाहीत राज्यव्यवस्थेकडचं सामर्थ्य सुद्धा रेग्युलेट केलेले असते. (म्हणजे ते राज्यव्यवस्था चालवणार्‍यांच्या डिसक्रिशनवर सोडलेले नसते; तर कोणत्या परिस्थितीत जीवे मारता येईल/येणार नाही याच्या मर्यादा आखून दिलेल्या असतात).

*अराजक असते तेव्हा वेगवेगळे समाजगट हे सामर्थ्य एकमेकांविरोधात/व्यक्तीविरोधात स्वतःच वापरतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>> समाजाकडे जीवे मारण्याचं सामर्थ्य नेहमी असतंच.

म्हणूनच तो मुद्दा समाजाच्या सुसंस्कृततेविषयी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

समाजाकडे जीवे मारण्याचं सामर्थ्य नेहमी असतंच.

हे विधान जरा भोंगळ आहे, समाजाच्या संदर्भात उपयोजित सामर्थ्य संघटनेत किंवा चळवळीत असतं.

हा मुद्दा व्यक्तीबाबत नाही, तर समाजाबाबत आहे. समाजातली न्यायव्यवस्था फाशी देण्यास समर्थ असली, तरीही समाज फाशी देण्याबाबत विचारी, म्हणजे अगदी अपवादात्मक परिस्थितीतच फाशी देणारा, असू शकतो.

न्यायव्यवस्था समर्थ असलेल्या बाबतीत'च' फाशी देऊ शकते, ते सामर्थ्य अपवादात्मक परिस्थिती ठरविण्याच्या विवेकी घटनेत आहे. तालिबानी दहशतवाद किंवा दाभोलकरांचा मृत्यू सहन केला जातो तर सध्या दुर्बल/उपद्रव-मूल्य कमी असलेल्या सनातनकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते, इष्ट वाटले नाही तरी उपद्रव मूल्य वाढल्यावर दुर्लक्ष करणे बंद होऊन सहन करणे किंवा सामर्थ्यवाद(दहशतवाद?) चालू होतो. वास्तवात अथेन्सच्या 'न्यायासनाने' परागंदा होण्याच्या दिलेला पर्यायाबद्दलही साशंकता आहेच, पण सॉक्रेटिसचे बलिदान तर्कशुद्ध नव्हते हे देखील तर्कशुद्धतेने सांगता येणार नाही, फार तर अनुमान काढता येणं शक्य असेल, पण तो मुद्दा वेगळा.

समाजाकडे जीवे मारण्याचं सामर्थ्य नेहमी असतंच. सर्व शाह्यां*मध्ये समाजाने ते राज्यव्यवस्थेकडे सुपूर्त केलेले असते.

समाजाने 'सुपूर्त' केलेले असते ह्याबद्दल इतिहास बघता साशंक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>समाजाने 'सुपूर्त' केलेले असते ह्याबद्दल इतिहास बघता साशंक आहे.

लोकशाहीखेरीज इतर शाह्यांमध्ये समाजाने ते स्वीकारलेले असते. [आणि ते बरोबर असल्याची तत्त्वज्ञाने समाज तयार करतो].

राज्यव्यवस्था नेहमी अल्पसंख्यांकांची असते त्यामुळे जोवर समाज ते निमूटपणे स्वीकारतो (आणि राज्यव्यवस्थेशी सहकार्य करतो) तोवर "समाजाने सुपूर्त केलेले असते" असे म्हणण्यास वाव असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आकलनात भर पडत आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माहितीबद्दल चिंतूशेटना धन्यवाद देतो. आजच साधनामधून हा पहिला खंड घेऊन आलो. पुढील खंड फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रकाशित होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

सध्या जागर वाचतो आहे. मागे शिवरात्र वाचलं होतं आता याच मालिकेत एका पुस्तकाची भर पडली याचा आनंदच आहे.
परिचयाचा पूर्वार्धही कुरूंदकरांना साजेसा म्हणजे विचार करायला लावणारा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!