Skip to main content

मेंदूचे अंतरंग

मेंदू हे माणसाला पडलेले सगळ्यात अवघड कोडे आहे. या कोड्याचे उत्तर पुन्हा मेंदूतच दडलेले आहे !
आपल्याला स्वप्न का पडतात? हरवून जातो? स्मरणरंजनात आपण इतके का हरवतो? सूड घ्यायची इच्छा मनात का निर्माण होते? आपण प्रेमात का पडतो? सगळ्या भावभावना हा जर मेंदूतल्या रसायनांचाच खेळ असला तर मग आपल्या हातात काय असतं? या प्रश्नाची उत्तर शोधायला जितकं खोल जावं तितकं गुंत्यात अधिकच अडकायला होतं!
गेल्या दोन तीन वर्षात समोर असलेल्या माहितीच्या आधारांन पण रंजक शैलीत या गुंत्याचे पदर सोडवणारं पुस्तक.

सुबोध जावडेकर यांनी लिहिलेल्या मेंदूच्या मनात या पुस्तकाच्या मागील पानावरील हा परिच्छेद वाचत असताना खरोखरच या प्रश्नांची उत्तर एक-दोन पानात सामावणारे असतील का असा प्रश्न पडू शकतो. तरीही या विषयातील संशोधनाची दिशा काय आहे. हे मात्र निश्चितच समजू शकेल. मुळात हे पुस्तक लेखकांनी एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या सदरांचे एकत्र व संपादित केलेला संग्रह आहे. केवळ वर उल्लेख केलेल्या प्रश्नाचेच लेखकांनी आढाव घेतला नसून सुमारे 25 प्रश्नांचा वेध घेतला आहे.

लबाडी करावी अस प्रामाणिक माणसांच्या मनात का येत नाही? आपल्याला कंटाळा का येतो? बुध्दिमत्ता मेदूच्या आकारावर अवलंबून असते का? सामान्य लोक अंधश्रद्ध का असतात? साध्या साध्या प्रश्नांची उत्तर द्यायला वृद्धांना बराच वेळ का लागतो? बेशुध्द अवस्थेत असलेल्या रूग्णांशी संवाद शक्य आहे का? सोशल नेटवर्किगवर वेळ घालवल्यामुळे मेंदूवर वाईट परिणाम घेऊ शकतो का? .. अशा चित्रविचित्र परंतु आपल्या मनाशी - वा मेंदूशी - संबधित असलेले प्रश्न उपस्थित करून या विषयीचा इतिहास त्याबद्दलचे पूर्वग्रह, चुकीच्या कल्पना व या विषयी तज्ञांचे म्हणणे काय आहे, आतापर्यंतचे झालेले संशोधन, प्रश्नातून उत्पन्न होणारे अनेक पदर यावर इत्यंभूत चर्चा करत असतानासुद्धा लेखकाने यात रंजकता आणल्यामुळे लेख एका दमात वाचून होतात. मेंदूची रचना, त्याचे भाग, त्यांची नावं, इत्यादींच्या उल्लेख टाळून लेख लिहिलेले असल्यामुळे उत्कंठा असलेल्या वाचंकाना नवीन माहिती वाचल्याचे समाधान मिळते शिवाय आपल्या पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनात दुरुस्ती करून लेखकाशी सहमती दाखवावीशी वाटू लागते.

माणसाला पडणा-या स्वप्नांचेच उदाहरण घेतल्यास स्वप्नाबद्दलच्या पूर्वी असलेले कित्येक कल्पना कालबाह्य झाल्या आहेत. रॅपिड आय मूव्हमेंटच्या (REM) वेळी स्वप्न पडतात असे पुर्वी वाटत होते. परंतु REM नसतानाही स्वप्न पडतात. फारच कमी लोकांना रंगीत स्वप्न पडतात अशीही समजूत होती. परंतु 85 टक्के लोकांना रंगीत स्वप्न पडतात. फक्त घोरत असताना स्वप्न पडत नाहीत.

स्वप्नांच्या संशोधनाची सुरुवात दीडशे वर्षापूर्वी झाली व सिग्मंड फ्रॉइड या जर्मन मानसतज्ञाने स्वप्नासंबंधी सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. पुढील काळात इतर अनेक संशोधकांनी त्यातील चुका शोधून याविषयीच्या संशोधनाला दिशा दिली.

स्वप्न दृष्टांत व स्वप्नात भवितव्य शोधणाऱ्यांची मात्र यामुळे घोर निराशा होत आहे. तर्कसंगत नसलेल्या स्वप्नातून काही तरी (अनुकूल) अर्थ काढून भविष्य वर्तविणे शक्य नाही हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. स्वप्नात देवी येऊन गणितांची उत्तरं सांगते अशी प्रसिद्ध गणितज्ञ रामानुजम यांची श्रद्धा होती. परंतु अशा प्रकारची सर्जनशील स्वप्न पडणे निव्वळ योगायोगही असू शकतो.

'हुकुमी स्वप्न पडू शकतात का' हाही प्रश्न या संदर्भात विचारता येईल. स्वत:च्या इच्छेप्रमाणे स्वप्न पाडता येणार्‍यांची संख्या हजारात एक असू शकेल. अशांना ल्युसिड ड्रीमर्स असे म्हणतात. यांच्यावरही संशोधन चालू आहे. मेंदूत तयार होणारी प्रतिमा संगणकांच्या पडद्यावर कृष्ण धवल स्वरूपात सादर करणारी संगणक प्रणाली विकसित होत आहे. कदाचित या प्रणालीतून आपल्याला स्वप्न का पडतात याचा उलगडा होऊ शकेल असे वैज्ञानिकांना वाटत आहे.

'माणसं शिव्या का देतात' याचा शोध घेताना रागाच्या भरात तोंडात शिवी येणं ही आदिम प्रेरणा आहे, असे लेखकाला वाटते. ती जनावरांतही असते. समोरच्याला भेदरवून सोडण्यासाठी, त्याला नॉन-प्लस करण्यासाठी शिव्यांचा उपयोग होऊ शकतो. शिव्यांचा संबंध आपल्या भावभावनांशी निगडित असतात व अशा प्रकारच्या आदिम भावनांचा आपल्या मेंदूतील लिंबिक सिस्टिमशी जवळचा संबंध असतो, असे तज्ञांचे मत आहे. कुठल्याही शब्दाचा शब्दशः अर्थ आणि भावनेशी निगडित अर्थ असे दोन अर्थ असतात. व त्या मेंदूत वेगवेगळ्या ठिकाणी साठवल्या जातात. शिव्यामुळे समोरचा माणूस घायाळ होत असला तरी शिव्या देणार्‍याला याचे काही फायदे होत असतात. मनातील हिंसेच्या उर्मीला वाट मिळते. शिव्या दिल्यानंतर माणूस रिलॅक्स होऊ शकतो. वेदना कमी होतात. परंतु शिवी देणं व शिवी ऐकून रक्त उसळणं हे नैसर्गिक आहे म्हणून त्याला आवरायचेच नाही, हे लेखकाला पटत माही. विवेकाने ते ताब्यात आणणे शक्य आहे यावर लेखकाचा विश्वास आहे.

अंतःप्रेरणेच्या संदर्भात असलेले वाद - प्रतिवाद, चर्चा व त्याचे आपल्या आयुष्यात असलेल स्थान याबद्दलही लेखक अभ्यासपूर्वक लिहित आहे. या पूर्वी अंतःप्रेरणा ही गोष्ट अवैज्ञानिक अशी समजली जात होती. आता मात्र अंत:प्रेरणेने घेतलेला निर्णय हा आपल्या अबोध मनात साठवलेली माहिती वापरून घेतलेला निर्णय आहे असे मानले जात आहे. अंतःप्रेरणेवर विश्वास ठेऊन निर्णय घ्या असे सांगणार्‍या पुस्तकांची चलती आहे. त्यात थोडे फार सत्य आहे. तरीही विचारपूर्वक घेतलेले निर्णय कचर्‍याच्या टोपलीत टाकून फक्त तुमचे अंतर्मन काय सांगते तसेच वागा असे म्हणण्यातही शहाणपणा नाही, असे लेखकाला वाटते.

क्रिकेटपटू, खेळाडू, नट - नट्या व इतर सेलिब्रिटीज यांचा लकी गोष्टीवर भरपूर विश्वास असतो. त्यांच्या काही विशिष्ट लकी गोष्टी असतात. लकी रंग असतात. लकी तारखा, लकी वार, लकी संख्या असतात. व ते नेहमी त्याचे प्रदर्शनही करत असतात. कदाचित अशा गोष्टीमुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत असावा. आत्मविश्वास वाढत असावा. परंतु त्यातून खरोखरच त्यांची कामगिरी सुधारते का हा प्रश्न लेखकाला पडलेला दिसतो. अशा प्रकारच्या अंधश्रद्धांच्या बाबतीत झालेल्या संशोधनाचा आढावा घेत असताना आपला मेंदूच अशा गोष्टींची भर घालत असतो हे लक्षात येत आहे. दोन घटना एका मागोमाग घडत असताना दिसल्यास दुसऱ्या घटनेमागील कारणामुळे पहिली घटना घडते अशी समजूत मेंदू करून घेतो. ओढून ताणून हा संबंध जोडणं कितीही मूर्खपणाचे वाटत असले तरी घटनेमागील कारण अजिबात माहित नसण्यापेक्षा हास्यास्पद कारणसुद्धा चालू शकेल अशी मानसिकता त्यात असते. त्याचा मेंदू स्वीकार करतो व त्यातूनच अंधश्रद्धांचा जन्म होतो. लेख वाचताना लेखकाचा हा निर्णय पटू लागतो. माणसं कर्मकांड करून मनाला दिलासा मिळवू पाहतात, हे खरे असले तरी भोंदूबाबा मेंदूच्या या कमकुवतपणाचा गैर फायदा घेतात व सार्‍या समाजाला उल्लू बनवतात, हेही लक्षात घ्यायला हवे.

पूर्ण पुस्तक वाचताना लेखक मनाचे अंतरंग उघडे ठेवत आहेत व आपल्याला विचार करण्यास भाग पाडत आहेत, हे लक्षात येते. प्रत्येक लेखाच्या शेवटी उल्लेख केलेल्या संदर्भ सूचीवरून लेखकानी हाताळलेल्या विषयांचा आवाका समजतो व आपण थक्क होऊन जातो.

अभ्यासपूर्ण असलेले हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.

मेंदूच्या मनात
सुबोध जावडेकर
मॅजेस्टिक प्रकाशन, ठाणे,
मूल्यः 200 रु, पाः 152

समीक्षेचा विषय निवडा

प्रकाश घाटपांडे Wed, 07/08/2013 - 14:30

पुस्तक वाचतान शिवी ही ओवीच्या धर्तीवर म्हटली वा उलट केले तर काय होईल असा विचार मनात तरळून गेला. समजुतीचे घोटाळे कसे होउ शकतात याचा अंदाज ही पुस्तकामुळे येतो.लेखकाची शैली आवडली. अंधश्रद्धांबाबतचे विवेचन एकदम पटण्यासारखे आहे. मेंदुत झालेल्या बदला मुळे माणुस विचार व भावनांनी बदलू शकतो हे पुन्हा एकदा ठळकपणे जाणवले.

तिरशिंगराव Wed, 07/08/2013 - 17:24

परीक्षण आवडले. पुस्तक वाचताना यावर कोणी 'अधिकारी' व्यक्तीने लिहावे असे वाटत होते, त्यामुळे स्वतः त्यावर लिहिण्याचा मोह आवरला.
अंधश्रद्धांचा उगम कसा होतो याची सयुक्तिक कारणे पटतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/08/2013 - 19:39

पुस्तक परिचय आवडला.

अशासारख्या विषयांवर अमेरिकन टीव्हीवर बरेच कार्यक्रम सुरू असतात. ते पहाता भारतीय टीव्हीचं दारिद्र्य लगेच लक्षात येतं. टीव्ही नाही, निदान अशी पुस्तकं तरी मराठीत येत आहेत हे आशादायक आहे.

सन्जोप राव Thu, 08/08/2013 - 06:34

पुस्तक परिचय आवडला. जावडेकरांना या लेखाचा दुवा पाठवतो आहे.
85 टक्के लोकांना रंगीत स्वप्न पडतात. फक्त घोरत असताना स्वप्न पडत नाहीत.
हे कसे शोधून काढले असेल याबाबत कुतुहल आहे.
स्वप्नात देवी येऊन गणितांची उत्तरं सांगते अशी प्रसिद्ध गणितज्ञ रामानुजम यांची श्रद्धा होती. परंतु अशा प्रकारची सर्जनशील स्वप्न पडणे निव्वळ योगायोगही असू शकतो.
केक्युलेच्या प्रसिद्ध बेंझीनच्या रचनेबाबतच्या स्वप्नाबाबतही असेच म्हणता येईल.
शिवी देणे यात सवयीचा भागही आहे असे वाटते. काही काही लोकांच्या शिव्या अर्थहीन, बोथट झालेल्या असतात त्या याचमुळे. माडगूळकरांनी एक उदाहरण दिले आहे. एका व्यक्तीने 'का रे भडव्या, माज आला का?' असे विचारले की त्याचा अर्थ 'काय, कसं काय? बरं आहे ना?' असा होत असे, असे ते लिहितात. 'लमाण' मध्ये 'गिधाडे' नाटकातल्या शिव्यांबाबतही डॉ.लागूंनी सेन्सॉर बोर्डाला दिलेल्या समर्थनात असेच म्हटले आहे. 'कामाची सदा भेंचोद टाळाटाळ' यातल्या शिवीला तसा काहीच अर्थ नाही.
बाकी विचारपूर्वक घेतलेले निर्णय कचर्‍याच्या टोपलीत टाकून फक्त तुमचे अंतर्मन काय सांगते तसेच वागा असे म्हणण्यातही शहाणपणा नाही, कारण अजिबात माहित नसण्यापेक्षा हास्यास्पद कारणसुद्धा चालू शकेल अशी मानसिकता त्यात असते. त्याचा मेंदू स्वीकार करतो व त्यातूनच अंधश्रद्धांचा जन्म होतो. माणसं कर्मकांड करून मनाला दिलासा मिळवू पाहतात, हे खरे असले तरी भोंदूबाबा मेंदूच्या या कमकुवतपणाचा गैर फायदा घेतात व सार्‍या समाजाला उल्लू बनवतात हे पटले.
श्रावण मासाचा 'मुहूर्त' साधून आयबीएन लोकमत वर डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या मुलाखतीचे आणि प्रश्नोत्तरांच्या भागांचे तुकडे बघायला मिळत आहेत. एकाच वेळी वैचारिक स्पष्टता आणि गतानुगतिकता बघून आपण नक्की कुठे चाललो आहोत हा 'सनातन' प्रश्न मनात अधोरेखित होतो आहे.
अवांतर : घाटपांडेंनी अच्युत गोडबोलेंच्या 'मनात' चे असेच फर्मास रसग्रहण लिहावे असा त्यांना विनंतीवजा आग्रह आहे.

सागर Thu, 08/08/2013 - 16:20

प्रभाकरजी नेहमीप्रमाणेच सुंदर परिचय. मेंदूच्या कार्यावर वेगळ्या पद्धतीने छान प्रकाश टाकलेला दिसतोय या पुस्तकात.
नोंद करुन ठेवली आहे. जरुर वाचेन हे पुस्तक.

मेंदूच्या अंतरंगावरुन आठवले.
गेल्याच महिन्यात 'मेंदूच्या अंतरंगात' हे पुस्तक घेतले. चांगले वाचनीय आहे. मुख्य म्हणजे मेंदूची कार्यपद्धती छानपणे दिलेली आहे.
एका न्यूरोसायंटीस्ट्ला आलेल्या अनुभवातून हे पुस्तक तयार झाले आहे. हे पुस्तक म्हणजे मूळ पुस्तकाचा जसाच्या तसा अनुवाद नसून स्वैर अनुवाद व त्या अनुषंगाने लेखिकेने टाकलेली भर आहे. अधिकचे लेखन पुस्तकाला एक वेगळे वजन प्राप्त करुन देतात. मेंदूत रस असणार्‍यांनी हे पुस्तक जरुर वाचावे.

गवि Thu, 08/08/2013 - 16:47

In reply to by सागर

उत्तम पुस्तक असावं असं वाटतंय. माहितीबद्दल आभार.

बादवे:

मेंदूत रस असणार्‍यांनी हे पुस्तक जरुर वाचावे.

आपला मेंदू ८० की ८७ % पाण्याचाच बनलेला असतो असं कुठेशी वाचलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच मेंदूत रस असतो याविषयी दुमत असू नये.

त्यानिमित्ताने: मेंदूची कन्सिस्टन्सी ही लोण्याच्या गोळ्याप्रमाणे असते(फ्रीझमधले लोणी नव्हे तर ताकातले घुसळून हाताने वर काढत असलेले ताजे लोणी.) तो जवळजवळ प्रवाही असतो असंही कुठेतरी वाचलं होतं. (डॉ. अनिल अवचटांच्या एका लेखात की काय ?!) त्यामुळे त्याच्या अस्तरयुक्त आणि पाण्याने भरलेल्या कोंदणातून बाहेर काढून ठेवला तर तो घरंगळून पसरेल असंही म्हटलं जातं.

ख.खो.त.जा.

बॅटमॅन Thu, 08/08/2013 - 17:05

In reply to by गवि

आपला मेंदू ८० की ८७ % पाण्याचाच बनलेला असतो असं कुठेशी वाचलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच मेंदूत रस असतो याविषयी दुमत असू नये.

त्यानिमित्ताने: मेंदूची कन्सिस्टन्सी ही लोण्याच्या गोळ्याप्रमाणे असते(फ्रीझमधले लोणी नव्हे तर ताकातले घुसळून हाताने वर काढत असलेले ताजे लोणी.) तो जवळजवळ प्रवाही असतो असंही कुठेतरी वाचलं होतं. (डॉ. अनिल अवचटांच्या एका लेखात की काय ?!) त्यामुळे त्याच्या अस्तरयुक्त आणि पाण्याने भरलेल्या कोंदणातून बाहेर काढून ठेवला तर तो घरंगळून पसरेल असंही म्हटलं जातं.

मेंदू टणक नसतो, त्याला बोट लावले तर ते आरपार सहज जाऊ शकेल इथपर्यंत मान्य. पण बुळबुळीत असला तरी तो इतकाही पाणीदार नसावा. नपेक्षा भेजा फ्राय कसा बनवू शकले असते लोक? आता माणूस विरुद्ध अन्य प्राणी यांच्या मेंदूतील पाणीदारपणात फरक असतो का, असला तर त्यामुळे मुख्य फरक पडतो का, इ. मला माहिती इल्ले.

गवि Thu, 08/08/2013 - 17:28

In reply to by बॅटमॅन

आता विकीपीडिया पाहिला (फास्ट रेफरन्ससाठी). त्यातही असाच उल्लेख आहे.

जिलेटिन जेली असं म्हटलं आहे. आणि "जिवंत मेंदू" असा खास उल्लेख आहे. भेजा फ्रायच्या स्टेजला येणार्‍या मेंदूची कन्सिस्टन्सी बदलत असावी.

प्रकाश घाटपांडे Thu, 08/08/2013 - 18:13

पुस्तकात संदर्भ म्हणुन काही मार्मिक व्हिडिओ ची लिंक दिलेली आहे. खालील दृष्य हे अदृष्य गोरिला हा व्हीडीओ आहे. बाजूला काय चालल आहे हे डोळे पहातात पण मेंदु ते 'पहात' नाही.

आंधळ्याची दृष्टी हा व्हिडिओ देखील पहाण्यासारखा आहे.
http://news.bbc.co.uk/2/hi/7794783.stm

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 08/08/2013 - 18:20

In reply to by प्रकाश घाटपांडे

नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर 'ब्रेन गेम्स' नामक एक कार्यक्रम लागतो. तो ही रोचक असतो.

नितिन थत्ते Sun, 08/06/2014 - 16:35

In reply to by प्रकाश घाटपांडे

आपली बहुतेक ज्ञानेंद्रिये सिलेक्टिव्ह ग्रहण करतात. त्यामुळेच अनेकदा (प्रत्यक्ष आपण उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचे) रेकॉर्डिंग नंतर ऐकले तर अनेक जास्तीचे आवाज ऐकू येतात आणि कटकट वाटते.

प्रकाश घाटपांडे Thu, 08/08/2013 - 19:11

पुस्तकात जावडेकर म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!"
दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा.

'न'वी बाजू Sun, 08/06/2014 - 17:04

In reply to by बॅटमॅन

तदुपरि,

तदुपरि पहिल्या वाक्याचे स्पष्टीकरण करा बघू.

Cogito ergo sum (किंवा त्याचा व्यत्यास) इथपासून सुरुवात करता यावी काय?

प्रकाश घाटपांडे Fri, 06/06/2014 - 12:59

मेंदुतला माणुस या डॊ आनंद जोशी व सुबोध जावडेकरांच्या पुस्तक निर्मिती बाबत ची भुमिका स्पष्ट करणारा दिव्य मराठी तील लेख http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-subodh-jawdekar-article-abo…
मेंदुतला माणुस व मेंदुच्या मनात या दोन पुस्तकांमुळे मला विचारांची एक नवीन दृष्टी मिळाली हे मी नाकारु शकत नाही. अंधश्रद्धा निर्मुलन समितीतील माझ्या मित्रांना हे पुस्तक मी आवर्जून वाचायला सांगतो.

............सा… Fri, 06/06/2014 - 17:55

होय आपल्या विचार-भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे अद्भुत काम मेंदू करत अस्तो. या विषयावरील, माझ्या वाचनात आलेले वाक्य आठवले -

मेंदू आपले काम न्यूरॉन्स नावाच्या ट्रान्स्मिटर्स द्वारा करतो.कोणतीही संवेदना अनुभवण्यासाठी हे न्यूरॉन्स विशिष्ठ रेसेप्टर्स्कडे जाणे आवश्यक असते. न्यूरॉन्स = किल्ली अन रिसेप्टर्स = कुलुप असे धरल्यास, या एकमेव अशा किल्ल्या असतात असे मानता येईल. म्हणजे त्या त्या किल्लीने फक्त अणि फक्त ते ते कुलुपच उघडणार. मग सायकोअ‍ॅक्टीव्ह औषधे काय करतात तर या किल्ल्या कॉपी करतात अन हवी ती दारे (कुलपे) उघडतात अथवा बंद करतात.