ईस्टर रविवार, ख्रिस्ताब्द कालगणना आणि अन्य तसलेच useless knowledge...

भाग १.

आज ईस्टर रविवार आहे. ह्या निमित्ताने ईस्टरच्या सणाचे ख्रिस्तवर्षाच्या कालगणनेशी जे जवळचे नाते आहे त्याबाबत आणि काही अन्य तदनुषंगिक गोष्टींबाबत थोडी मनोरंजक माहिती देतो. आज आपण सहजपणे इ.स. २०० मध्ये अमुकतमुक घटना इ.स. २०० मध्ये घडली असे सर्रास म्हणतो पण इ.स.२०० ह्या साली त्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना आपण इ,स.२०० मध्ये हे पहात आहोत अशी काहीच जाणीव नव्हती कारण इ.स. २०० चे इ.स. २०० असे बारसे अजून व्हायचे होते. ते बारसे कसे झाले त्याची ही कथा.

जीजसच्या आयुष्याच्या शेवटच्या तीन दिवसांबद्दल ख्रिश्चनांमध्ये वेगवेगळ्या श्रद्धा अस्तित्वात आहेत पण सर्वसामान्यपणे असे दिसते की हिब्रू पंचांगाच्या १४ निसान ह्या हिब्रू लोकांच्या पासोवर (Pascha) सणाच्या दिवशी येशू ख्रिस्त आपल्या अनुयायांसह ’शेवटचे भोजन’ करीत असतांनाच रोमन सैनिक त्या जागी आले आणि येशूला घेऊन गेले. हिब्रू धर्मगुरूंनी येशूला आधीच मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती ती त्याच रात्री रोमन प्रीफ़ेक्ट पायलेटने मंजूर केल्यावर त्याला दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता क्रूसावर चढवण्यात आले. त्याचा मृत्यु दुपारी ३ वाजता झाला. हा शुक्रवारचा दिवस होता. त्याचे प्रेत रात्री खाली उतरवून त्याचे दफन करण्यात आले. रविवारी येशूला ईश्वराने पुन: जागे केले आणि पुढचे ४० दिवस अनेक लोकांना दर्शन देऊन तदनंतर येशूने ईश्वराच्या उजव्या हातापाशी बसण्यासाठी स्वर्गारोहण केले. येशूचे पुनरुत्थान रविवारी झाले ह्या कारणाने रविवारचा ईस्टर हा एक फार महत्त्वाचा ख्रिश्चन सण आहे. येथे एक बाब मुद्दाम नोंदवून ठेवतो ती अशी की ह्याचा दरवर्षीचा दिवस सौर - सूर्याच्या चलनावर अवलंबून - असलेल्या तत्कालीन ज्यूलियन पद्धतीतील विशिष्ट दिनांकास पडत नसून प्रतिवर्षी ज्यू पासोवरनंतरच्या पूर्णचंद्रानंतरच्या पहिल्या रविवारी पडायला हवा अशी अट होती. (ज्यूलियन सौर पद्धतीबद्दल अधिक माहिती ह्यापुढील भागात पाहू.) म्हणजेच ईस्टरचा रविवारचा दिवस आणि त्याच्याशी निगडित असलेले अन्य अनेक पवित्र दिवस हे चंद्राच्या चलनावर अवलंबून असतात, यद्यपि प्रचलित कालगणना - तेव्हाची ज्यूलियन आणि आताची ग्रेगोरियन - ह्या कालगणना सौर आहेत.

वेगवेगळ्या हुतात्म्यांचे (martyrs) स्मृतिदिन योग्य त्या दिवशी पाळण्यावर ख्रिश्चन धार्मिकांची मोठी श्रद्धा आहे. त्या कारणाने वर्षातील कोणता रविवार हा ईस्टरचा रविवार आहे हे माहीत असणे सर्वसामान्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते. आजच्या जमान्यात हे अगदी सोपे वाटते कारण वर्षाच्या कॅलेंडरात ईस्टर आणि अन्य सर्वच सण व्यवस्थित दाखविलेले असतात. पण २००० वर्षांपूर्वी धर्माचा पगडा मनावर असण्याच्या आणि सर्वसामान्य भोळीभाबडी जनता अज्ञानी असण्याच्या जमान्यात हे इतके साधेसरळ नव्हते. ईस्टर केव्हा पडेल ह्याचे गणित सर्वसामान्यांच्या कुवतीपलीकडचे होते आणि ते त्यासाठी विद्वान् धर्मगुरूंच्या आदेशाकडे नजर लावून असत. ईस्टर केव्हा आहे हे ठरण्यावरती अन्यहि अनेक धार्मिक आचार केव्हा करणे आवश्यक हेहि अवलंबून होते. (आपल्याकडेहि शंभरसवाशे वर्षांपूर्वीपर्यंत सणवार केव्हा पडणार हे जाणण्यासाठी गावातील खेडूत गावजोश्यावर अवलंबून असत तसेच.)

प्रारंभीच्या दोनतीन शतकांमध्ये ईस्टरचा दिवस ठरविण्यासाठी ख्रिश्चन लोक ज्यू लोकांच्या पासोवरकडे पाहात. वसंतसंपातानंतरच्या पहिल्या पौर्णिमेला पासोवरचा दिवस पडत असे आणि तदनंतरच्या शुक्रवारी गुडफ्रायडे आणि त्यापुढे दोन दिवसांनी ईस्टर साजरा होई. पण नंतरनंतर ईस्टर ठरविण्याच्या ह्या प्रथेबाबत बाबत ख्रिश्चनांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला. एकतर ज्यू-ख्रिश्चन वैराला धार चढू लागली तसे अशा महत्त्वाच्या निर्णयासाठी ज्यू लोकांवर अवलंबून राहणे ख्रिश्चनांना प्रशस्त वाटेना. दुसरे म्हणजे आपल्या निर्णयासाठी ज्यू धर्मगुरु ८४ वर्षांचे चक्र मानत असत त्यामुळे त्यांचे कालनिर्णय चुकीचे येऊ लागले.

हे ८४ वर्षांचे चक्र म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करीत असतांना पृथ्वीवरून सूर्याचे दिसणारे स्थान रोज बदलत असते. असे रोज स्थान बदलत सूर्याला परत पहिल्या स्थानी येण्यासाठी लागणारा काल, म्हणजेच एक ’सावन वर्ष’ अथवा tropical year. प्राचीन कालापासून हे माहीत होते की एक सावन वर्ष पूर्ण दिवसांत मोजता येत नाही. ग्रीक विद्वान् हिप्पार्कसच्या मते ते वर्ष ३६५ दिवस ५ तास ५५ मिनिटे आणि १२ सेकंदांचे होते म्हणजेच ३६५.२४६६६ दिवसांचे होते. सध्याच्या हिशेबानुसार ते ३६५ दिवस ५ तास ४९ मिनिटे आणि १९ सेकंदांचे आहे म्हणजेच ३६५.२४२५८ दिवस इतके आहे. चान्द्रमास (एका अमावास्येपासून दुसर्‍या अमावास्येपर्यंतचा काल) २९ दिवस १२ तास ४४ मिनिटे आणि ३ सेकंद म्हणजेच २९.५३०५९ दिवस इतका आहे. साहजिकच एका सावन वर्षात १२ चान्द्रमास पूर्ण होऊन १३ व्या चान्द्रमासाचाहि काही काल बसतो. सूर्याच्या भ्रमणामुळे पृथ्वीवर ऋतु निर्माण होतात आणि शेतीसारख्या मानवी दैनंदिन बाबी त्यामुळे सूर्याच्या भ्रमणावर अवलंबून असतात. ह्याउलट चन्द्राचे भ्रमण अधिक सहजपणे लक्षात येणारे आणि मोजण्यास अधिक सुलभ असल्याने बहुसंख्य मानवी समूहांचे धर्मांशी निगडित आचार, सण इत्यादि चान्द्रवर्षाशी जोडलेल्या आहेत. ह्यावरून दिसते की चान्द्रवर्ष आणि सौरवर्षांची एकमेकात काही मार्गाने सांगड न घातल्यास धार्मिक बाबी, सणवार आदींचे ऋतूंशी काही नाते उरत नाही. असे नाते टिकण्यासाठी बहुसंख्य जुन्या कालगणनांमधून वेगवेगळ्या मार्गांनी चान्द्रवर्षामध्ये दिवस वाढवण्याचे मार्ग शोधले गेले आहेत, जसे की भारतातील अधिक मास.

इ.स.पूर्व ४३२ सालापासून ग्रीक विद्वान मेटन ह्याला हा एक नैसर्गिक योगायोग माहीत होता की १९ सौर वर्षांत २३५ चान्द्रमास जवळजवळ पूर्णत: बसतात. त्याला माहीत असलेली दोन्हीची मूल्ये आजच्या अधिक सूक्ष्म मापनाहून थोडी कमी सूक्ष्म होती तरीहि आज आपण १९ सौर वर्षे = ६९३९.६०९०२ सावन दिवस आणि २३५ चान्द्रमास = ६९३९.६८८६५ सावन दिवस ह्या गणितावरून मेटनला दिसलेले जवळजवळ योग्यच होते हे ताळून पाहू शकतो. १९ वर्षांमध्ये पडणारा हा फरक ०.०७९६३ दिवस किंवा १.९१११२ तास इतका किरकोळ आहे.

मेटनच्या - किंवा ज्याने कोणी हा योगायोग पहिल्यांदा हेरला - त्याच्या ह्या शोधाचा उपयोग असा की १९ सावन वर्षांमध्ये चंद्राच्या सर्व तिथि एकदा मोजल्या की त्या पुढच्या १९ वर्षांसाठी त्या तिथि पुन: त्याच सौर दिवसांवर पडणार, तो हिशेब पुन: करण्याचे कारण नाही. १९ सौर वर्षांमध्ये २२८ चान्द्रमास नैसर्गिकत: पडतात आणि ७ चान्द्रमास अधिक पडतात. त्या ७ अधिक मासांना एकदा सोयीनुसार बसवले की तेच चक्र पुढच्या, त्याच्या पुढच्या अशा अनेक १९ वर्षांच्या चक्रांना लावता येते.

मेटनच्या १९ वर्षांच्या चक्राप्रमाणेच ८ वर्षांचे दुसरेहि चक्र तयार करता येते. ८ वर्षात हिप्पार्कसच्या मापनानुसार २९२१.९७३२८ सावन दिवस पडतात आणि इतक्या दिवसांमध्ये ९८.९४७३४ इतके चान्द्रमास पडतात. ८ वर्षांमध्ये ९६ चान्द्रमास नैसर्गिकत: पडतात, आणखी ३ चान्द्रमास ह्या ८ वर्षांमध्ये बसविले की असेच एक चक्र सुरू करता येते. १९ वर्षांपेक्षा हे चक्र कमी सूक्ष्म आहे हे खरे पण ८ वर्षांचा कालावधि १९ वर्षांपेक्षा लहान असल्याने कोणासतरी हे आधीच लक्षात आले असणे शक्य वाटते.

ज्यू धर्मगुरु हे ८४ वर्षांचे चक्र मानून आपला पासोवरचा सण ज्यूलियन वर्षाच्या कोठल्या दिनांकास पडणार हे ठरवत असत हे वर म्हटलेच आहे. ८४ वर्षांचे हे चक्र म्हणजे १९ वर्षांची ४ चक्रे अधिक ८ वर्षांचे एक चक्र. ८ वर्षाच्या चक्राचाहि उपयोग ह्या गणनेमध्ये केला गेल्याने हे चक्र जास्ती ढोबळ होते. परिणामी त्यानुसार येणारे ईस्टरचे दिवस हे अधिकाधिक चुकीचे येऊ लागले आणि त्यामुळे वर्षोवर्षाचे ईस्टर दाखविण्याचा काही वेगळा आणि अचूक मार्ग शोधला पाहिजे असे संशोधन ख्रिश्चन समुदायात होऊ लागले. येथे आपण डायोनिसिअस एक्झिग्युअस ह्या ख्रिश्चन धर्मवेत्त्यापाशी येतो. सध्या सर्व जगभर चालू असलेल्या ख्रिस्ताब्द गणनेचा - ज्यामधील वर्षांना ’Anni Domini (A.D.) - years of the Lord' असे संबोधिले जाते - तिचा जनक हाच डायोनिसिअस एक्झिग्युअस आहे. कसा ते आता पाहू.

डायोनिसिअसने ह्या प्रश्नात लक्ष घातले तेव्हा विक्टोरिअस नामक धर्मवेत्त्याने ४५७ मध्ये निर्माण केलेले एक ईस्टरच्या तारखांचे कोष्टक रोममध्ये चालू होते पण ते पुरेसे अचूक नाही असे म्हणून डायोनिसिअसने अलेक्झॅंड्रियामधे वापरात असलेले एक कोष्टक पुढे आणले. हे कोष्टक ९५ (१९ गुणिले ५) वर्षांचे असून ह्याचा प्रारंभ सम्राट् डायोक्लिशिअन (सत्तेचा काळ २८४ ते ३०५) ह्याच्या पहिल्या वर्षापासून म्हणजे २८५ पासून झाला होता. त्या काळात अखंड चालणारी वर्षगणना अस्तित्वात नसल्याने सर्व वर्षे ’अमुक सम्राटाच्या अमुक वर्षात’(regnal years) अशा पद्धतीने दर्शविण्याची पद्धत होती. ह्या शृंखलेमधील डायोक्लेशियन २४७ (१९ गुणिले १३) पर्यंत अलेक्झॅंड्रियन कोष्टक आणून त्यापुढील डायोक्लेशियन २४८ ह्या वर्षापासून पुढील ९५ वर्षांच्या काळाला डायोनिसिअसने Anni Domini Nostri Jesu Christi (Years of our Lord Jesus Christ) असे नाव दिले आणि डायोक्लेशियन २४८ ह्या वर्षाला इसवी सन (Anno Domini) ५३२ असे ठरविले. हे कार्य त्याने ज्या वर्षी केले ते वर्ष ५३२ च्या मागचे ७ वे वर्ष होते म्हणजेच डायोनिसिअसने हे नवे वर्षगणनेचे नाव ५२५ सालामध्ये निर्माण केले. आपल्या पूर्वी ५२५ वर्षे ख्रिस्तजन्म झाला असेहि गणित त्याने केले आणि इसवी सन १ मध्ये ख्रिस्तजन्म झाला असे ठरले.

डायोक्लेशियन वा अन्य कोणाहि राज्यकर्त्याच्या नावाने वर्षे ओळखण्याचा जुना प्रघात सोडून त्याने तेथे येशूच्या नावाने नवी कालगणना सुरू करण्याचे कारण असे की सम्राट् डायोक्लेशियन हा ख्रिश्चनांचा छळ करणारा म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या वा अन्य सम्राटाच्या नावाचा वर्षगणनेशी असलेला पारंपारिक संबंध तोडून डायोनिसिअसने त्या जागी सलग चालणारी नवी वर्षगणना ख्रिस्ताच्या नावाने सुरू केली. युरोपीय संस्कृतीच्या दृष्टीने हा एक नवाच पायंडा त्याने घातला.

डायोनिसिअसने हे काम केले ते वर्ष ख्रिस्तजन्मापासून ५२५ वे वर्ष होते हे त्याने कसे ठरविले हे आज निश्चित प्रकारे सांगता येत नाही कारण त्याने ह्याबाबत काहीच लिहून ठेवले नाही, तरीपण एक तर्क केला जातो तो असा:

डायोनिसिअसच्या काळात प्रचलित असलेल्या समजुतीनुसार Anno Mundi ह्या हिब्रू परंपरेतील कालगणनेनुसार विश्व एकूण ६००० वर्षे चालणार होते. त्यामधील ५५०० वर्षे गेल्यानंतर ख्रिस्तजन्म आणि ६००० व्या वर्षी पुनरुत्थान (resurrection) व्हायचे होते. Anno Mundi गणना खरी मानायची तर आपण ज्याला इ.स. ५२५ म्हणतो त्याच्या पूर्वीच, इ.स. ५०० मध्ये विश्व संपायला हवे होते पण तसे झाले नव्हते हे उघड आहे. त्यामुळे इ.स.५२५ मध्ये लिहिणारा डायोनिसिअस पुनरुत्थानाच्या वर्षाच्या नव्या हिशेबाचा शोध घेऊ लागला.

ह्या वेळेपर्यंत खगोलाच्या अभ्यासकांना अयनचलनाची कल्पना आली होती. (पृथ्वीचा उत्तर-दक्षिण अक्ष आकाशात एकाच बिंदूवर नेम केलेला नसून दर वर्षी तो थोडासा ढळत असतो आणि आकाशपटलावर एक वर्तुळ रेखाटतो. हे वर्तुळ पूर्ण होण्यास सुमारे २४,००० वर्षे लागतात. ह्याला अयनचलन - precession of the equinoxes - म्हणतात.) ह्या २४,००० वर्षांच्या काळाचे २.००० वर्षांचे १२ भाग पाडले होते आणि त्यापैकी प्रत्येक भागाच्या शेवटी सर्व ग्रह एकत्र येऊन पुनरुत्थानाचा दिवस येतो अशी ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांची धारणा होती. डायोनिसिअसने केलेया हिशेबानुसार २००० साली ग्रह पुन: एकत्र येणार होते म्हणजे आणि ते वर्ष डायोनिसिअसच्या काळापासून अद्यापि १४७५ वर्षे भविष्यात होते. साहजिकच त्याचे चालू वर्ष ५२५ आणि ह्या २,००० वर्षांच्या काळाच्या पहिल्या वर्षात येशूचा जन्म. (डायोनिसिअसचा ग्रह एकत्र येण्याचा हिशेब चुकीचा नव्हता कारण मे २००० मध्ये खरोखरच ५ ग्रह एकमेकांपासून २० अंशापेक्षा कमी अंतरावर होते. ते सूर्याच्या आसपास असल्याने त्यांचे दृश्य पृथ्वीवरून उघडया डोळ्य़ांनी दिसले नाही.)

ईस्टरचे कोष्टक करण्याच्या हेतूने डायोनिसिअसने बनविलेले हे कोष्टक रोममधल्या वर्तुळात मान्य झाले आणि अर्थातच ख्रिस्ताब्द गणना हे नामकरणहि मान्य झाली. तरीहि सर्वसामान्यांपर्यंत ते नामकरण आणि ती गणना पोहोचण्यास अजून २०० वर्षे जावी लागली. पूजनीय बीड (Venerable Bede) ह्या इंग्लंडमधील विद्वानाने आपल्या Ecclesiastical History of the English People ह्या पुस्तकात ७३१ साली ह्या कालगणनेचा प्रथम वापर केला आणि हळूहळू ती सार्वत्रिक उपयोगाचा भाग बनली. युरोपीय संस्कृति नंतरच्या काळात जगभर पसरली आणि तिच्याबरोबरच ही कालगणना जगाच्या कानाकोपर्‍यात सर्वसंमत कालगणना म्हणून पसरली.

(ह्यापुढील क्र. २ ह्या भागात रोमन आणि ख्रिस्ताब्द कालगणनांचा संक्षिप्त इतिहास.)

field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (5 votes)

प्रतिक्रिया

useless म्हणवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बरीच माहिती आहे. मात्र पहिल्या वाचनात तरी सगळे समजले नाही.
पुन्हा वाचून पाहेन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिशय रोचक आणि लाँग-सॉट-आफ्टर माहिती. या माहितीवरून आपल्याला जीजसच्या नेमक्या काळाबद्दल काही तर्क नक्की करता येतो का? म्हंजे इसवी सन वगैरे जाऊदे, पण कमीतकमी कुठल्या रोमन बादशहाच्या काळात जीजस होता वगैरे वरून तरी काही तर्क केला असेलच ना? म्हंजे ज्यू पुराणांवरच विसंबायचे काही खास कारण दिसत नै, बरोबर?

आणि एक रिलेटेड प्रश्न: प्राचीन ग्रीक इतिहासात इसपू ४३२ सारखे असंख्य नेमके उल्लेख असतात, अगदी महिना/तारखेसकट, उदा. मॅराथॉनची लढाई ही इसपू ४९० च्या ऑगस्ट/सप्टेंबरात झाली. तर हे सन कशाच्या आधारावर ठरवायचे? ग ह खर्‍यांचा संशोधकाचा मित्र आहे त्यात सर्व भारतीय संदर्भात लागणार्‍या कालगणनांचे विवेचन आहे पण इसपू काळातील युरोपियन कालगणना कशी होती ते काही माहिती नाही. लेखात उल्लेखिल्याप्रमाणे रेग्नल ईयरवरच असेल तर मग यांचे ईसवीमध्ये कन्व्हर्जन करायचे झाल्यास सर्व वंशावळी क्लीअरकट जवळ पाहिजेत. तशा सर्व वंशावळी जवळ असल्याने ते कन्व्हर्जन सोपे झालेय की अजून काही प्रकार आहे? कृपया सांगावे. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमच्या वरील प्रश्नाचे मला जाणवते असे त्रोटक उत्तर मी माझ्या एका प्रतिसादात दिलेच आहे. (खाली पहा.)

त्याहून अधिक तपशीलवार उत्तर येथे मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगली माहिती.
भारतात 'गुड फ्रायडे'ची रजा असते...पण इटलीत त्यानंतरच्या सोमवारी-म्हणजे आज रजा आहे.

"हे वर्तुळ पूर्ण होण्यास सुमारे २४,००० वर्षे लागतात."
२६००० वर्षे लागतात असं कधीतरी अभ्यासात आल्याचं आठवतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कालगणनेचा इतिहास रोचक आहे.

भारतात 'गुड फ्रायडे'ची रजा असते...पण इटलीत त्यानंतरच्या सोमवारी-म्हणजे आज रजा आहे.

वेगवेगळ्या देशांत हे वेगळं असावं.
युकेमधे शुक्रवार आणि सोमवारी सुट्टी असते. या सोमवारच्या सुट्टीबद्दल ईस्टरची सुटी रविवारामुळे जाते, म्हणून मग सोमवारची आणखी एक, असं कारण दिलं होतं. तिथे ख्रिसमस किंवा बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) शनिवार-रविवारी आले तर सोमवार-मंगळवारी सुट्या असतात. वर्षातून १० सुट्ट्या दिल्या पाहिजेत असा नियम आहे आणि त्यांच्याकडे ना स्वातंत्र्यदिन आणि देश ख्रिश्चन आहे (लोकं सेक्युलर असली तरीही!). त्यामुळे रविवारमुळे सुट्टी बुडली असं होत नाही.
अमेरिकेत अनेकांना गुडफ्रायडे आणि ईस्टर मंडे दोन्हींच्या सुट्ट्या नसतात. त्यांच्याकडे (धर्माळू लोकांचं प्रमाण बरंच जास्त असलं तरीही) देश सेक्यूलर आहे. शिवाय कोलंबस, मार्टीन ल्यूथर किंग आणि इतर इतिहासजन्य दिवस आहेतच, उदा: स्वातंत्र्यदिन, सुट्ट्यांच्या सोयीसाठी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अयनचलनाची गति आणि त्यावरून एक चलन पूर्ण होण्यास लागणारी वर्षे वेगवेगळ्या ज्योतिर्विदांनी वेगवेगळी दिली आहेत. त्या त्या वेळेस सूक्ष्म वेध घेणे त्या त्या ज्योतिर्विदाला जसे शक्य झाले तसे त्याचे उत्तर हा नियम दिसतो. टायको ब्राहे वर्षाला ५१ सेकंद - पूर्ण चलनाला २४४१२ वर्षे असे मान देतो तर अल बत्तानी (९वे शतक) वर्षाला ५५.५ सेकंद - पूर्ण चलनाला २३३५१ वर्षे असे मान देतो.

सूर्यसिद्धान्ताच्या 'त्रिप्रश्नाधिकार' ह्या भागात अयनचलनाविषयी पुढील श्लोक आहे:

त्रिंशत्कृत्यो युगे भानां चक्रं प्राक् परिलम्बते।
तद्गुणाद्भूदिनैर्भक्तात् द्युगणाद्यदवाप्यते॥

शंकर बाळकृष्ण दीक्षितांनी ह्या श्लोकाचे स्पष्टीकरण करून अयनचलन वर्षाला ५४ विकला होते असा अर्थ त्यातून अर्थ दिला आहे. वर्षाला ५४ विकला (सेकंद) म्हणजे पूर्ण चलनाला २४००० वर्षे. आर्यभटाने जर पूर्ण वर्तुलाकृति अयनचलन मानले असते तर त्याचा आकडा असा आला असता. (प्रत्यक्षात आर्यभट, आणि अन्यहि अनेक भारतीय ज्योतिषी, अयनचलन हे एक वर्तुळ नसून अयनाचे मूलस्थानापासून पूर्वेस आणि पश्चिमेस अधिक आणि उणे २७ अंशांपर्यंत लंबकासारखे भ्रमण असते (एकूण १०८ अंश) असे मानतात. महायुगातील अयनचलनाचे एकूण भगण आर्यभटाने ह्या १०८ लंबकासारख्या चलनाचे दिले आहेत आणि त्यावरून अयनचलनाचे त्याचे मान ५४ विकला असे होते हे निघते.)

आर्यभट आणि डायोनिसिअस जवळजवळ समकालीन आहेत. तेव्हा त्या काळात युरोपातहि २४००० चा आकडा प्रचलित असणे अशक्य वाटत नाही. सध्याचा आकडा २५७७२ वर्षे आहे असे विकिपीडियावरून दिसते.

(आपले चालू वर्ष ठरविण्यासाठी डायोनिसिअसने अयनचलनाचा विचार केला असावा (वर पहा) असे जे म्हटले आहे तोहि केवळ एक तर्कच आहे हे वरच उल्लेखिलेले आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तर ख्रिस्तजन्माची तारीख "ईसवी"सनाच्या ५२५व्या साली ठरवली गेली! मजा आहे. गमतीदार माहिती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख फार आवडला. मागे एकदा ही माहिती मिळवायचा प्रयत्न केला होता, पण एका ठिकाणी न मिळाल्याने पुढे प्रयत्न बारगळला. धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहितीपूर्ण लेख आवडला.
अवांतर: सावन या शब्दाची फोड काय? या शब्दावरून अर्थबोध नाही झाला. Tropical year साठी सांपातिक वर्ष असेही नाव वाचले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सायन-निरयन असे शब्द मराठीत कालगणनेसंदर्भात वाचले होते. ते ही कधी नीटसे समजले नाहीत. (किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सायन: ज्या पंचांगात वसंत संपाताचे (Vernal Equinox) चे चलन (परांचन गतीमुळे होणारे) लक्षात घेऊन राशी निश्चित केल्या जातात, ते सायन पंचांग. वसंत संपातापासूनचे ३० अंश म्हणजे मेष रास आणि पुढे इतर राशी.
निरयनः ज्या पंचांगात राशी वसंत संपाताचे चलन लक्षात न घेता आकाशातील विशिष्ट बिंदूपासून राशी निश्चित केल्या जातात, ते निरयन पंचांग.
निरयन पंचांगात आकाशातले आकार आणि राशीचे नाव यांच्यात विशिष्ट नाते असते, तर सायन पंचांगात ते काळानुसार ते बदलते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप रोचक माहीती. _/\_
'ख्रिस्ताचा जन्म मार्च महीन्यातला आहे पण त्याकाळच्या कोणत्यातरी पागन सणाला रिप्लेसमेँट म्हणुन डिसेंबरमधे मधे साजरा केला जातो' हे खरे आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'ख्रिस्ताचा जन्म मार्च महीन्यातला आहे पण त्याकाळच्या कोणत्यातरी पागन सणाला रिप्लेसमेँट म्हणुन डिसेंबरमधे मधे साजरा केला जातो' हे खरे आहे का?

असेल असेल! तसेही भारतीय इयर एंडिंग मार्चमध्ये होते ते काय उगाच? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अवांतरच आहे पण परवाच्या ईस्टरच्या वेळेस व्हॅटिकन सिटीत जमा झालेल्या गर्दीच्या रांगेचा फोटो टिपायला मिळाला तो खाली डकवत आहे:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@बॅटमन -

जीजसचा जन्ममृत्यु निश्चित अमुक वर्षी झाला असे कोठे स्पष्ट दिसत नाही. त्याचा जन्म इ.स.पूर्व ३ वा ४ पासून इ.स.१ पर्यंत झाल्यासार्खे वाटते. मात्र मृत्युसमयी तो ३३ वर्षांचा होता ह्याबाबत एकमत दिसते. ह्यावरून असे म्हणता येईल की त्याचा जन्म केव्हाहि झाला असला तरी मृत्यु सम्राट टायबेरिअस (इ.स.१४-३७) ह्याच्या सत्तेच्या काळात झाला.

बॅटमन असेहि विचारतात की ग्रीक/रोमन इतिहासात तारखा इतक्या पक्क्या कशा मिळतात? मी काही ह्या विषयातील तज्ञ नाही म्हणून सर्वसाधारण माहिती असणार्‍याला जसे सुचेल तसे उत्तर देतो.

एकतर आपल्यापेक्षा युरोपात इतिहास, आत्मवृत्त, आठवणी लिहिण्याचा खूपच प्रघात होता. त्या काळातील डझनावारी इतिहासलेखकांची नावे आणि त्यांची पुस्तके आपल्यासमोर आहेत. त्यांतील काही येथे पहा. हे सर्व इतिहास जवळजवळ आज आपण लिहू तसेच लिहिले आहेत. म्हणजे त्यात आपल्या राजाची अफाट स्तुति, त्याच्या कृत्यांना चमत्काराचे रूप देणे, लिखाणात घटना आणि कविकल्पना ह्यांची गल्लत करणे इत्यादि भारतीयांचे आवडते प्रकार फारसे भेटत नाहीत. बहुतेक लिखाण आपल्यासारखे श्लोकबद्ध नसल्याने शाब्दिक कसरती कमी आणि अर्थ अधिक स्पष्ट दिसतो. आपल्याकडच्या पेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात कोरीव लेख, पुतळे ह्यांच्या स्वरूपात मूळ साधने मुबलक उपलब्ध आहेत. रोमन कालगणनाहि आज आहे त्याहून तेव्हा फार वेगळी नव्हती. ह्या सर्वांमुळे आणि विश्वासार्ह वंशावळया उपलब्ध असल्याने regnal years आधारे दिनांकांची पुनर्जुळणी करणे अवघड नसावे. पुष्कळ सम्राटांनी आपल्या काळात काय कर्तृत्व गाजवले ह्याचे दर्शन त्या काळातच निर्माण झालेले आपल्यापर्यंत पोहोचले आहे. ट्रेजनच्या संपूर्ण आयुष्याची कामगिरी त्या काळातच कोरलेली त्याच्या नावाच्या कॉलमवर आजहि आपण रोममध्ये पाहू शकतो. (शेजारचे छायाचित्र पहा.)

ह्याचे उत्तम उदाहरण धाकटया प्लिनीने लिहिलेल्या थोरल्या प्लिनीचा मृत्यु आणि पाँपे नगराचा विनाश ह्यांच्या वर्णनात सापडते. हे वर्णन त्याने टॅसिटस ह्या इतिहासकाराला लिहिलेल्या पत्रात आहे. हे पत्रहि उपलब्ध असून ते येथे पत्रक्रमांक १६ असे पाहता येईल. त्यातील पुढील वाक्ये महत्त्वाची आहेत: "Erat Miseni classemque imperio praesens regebat. Nonum Kal. Septembres hora fere septima mater mea indicat ei apparere nubem inusitata et magnitudine et specie. Usus ille sole, mox frigida, gustaverat iacens studebatque; poscit soleas, ascendit locum ex quo maxime miraculum illud conspici poterat." ह्याचे भाषान्तर मला येथे मिळाले. ते असे: "He was at Misenum in his capacity as commander of the fleet on the 24th of August [sc. in 79 AD], when between 2 and 3 in the afternoon my mother drew his attention to a cloud of unusual size and appearance. He had had a sunbath, then a cold bath, and was reclining after dinner with his books. He called for his shoes and climbed up to where he could get the best view of the phenomenon." मला लॅटिन अजिबात कळत नाही तरीहि ओळखीच्या इंग्लिश शब्दांच्या मदतीने दोन्ही उतार्‍यांची तुलना करता येते. ह्या उतार्‍यात ह्या घटना घडण्याचा काळ म्हणून 'Nonum Kal. Septembres' असे म्हटले आहे. ह्याचा अर्थ 'सप्टेंबरच्या कॅलेंड्सच्या आधी ९ दिवस' म्हणजेच २४ ऑगस्ट असा होतो. (हे कॅलेंड्स, नोन्स आणि आइड्स काय प्रकरण आहे ते पुढील भाग २ मध्ये येईलच.) २००० वर्षांपूर्वीव्या एखाद्या घटनेची इतकी स्वच्छ लिहिलेली तारीख जर एखाद्या प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकाला मिळाली तर त्याला हर्षवायूच व्हायचे बाकी राहील!

मला दुसरे असे जाणवते की ह्या तारखांवर युरोपीय तज्ज्ञांमध्ये फार मारामार्‍या होतांना दिसत नाहीत, सर्वसाधारण consensus जाणवतो. ह्यावरूनहि असे वाटते की ह्या आणि अशा तारखा योग्य पुराव्यावर आधारलेल्या दिसतात.

@अदिति -

ह्याचे उत्तर मिहिर ह्यांनी दिलेलेच आहे. त्यातच थोडी भर. अयन हा शब्द इ(२ प.)= जाणे ह्या धातूपासून झालेला नामवाचक शब्द आहे. पृथ्वीची वार्षिक गति जर सूर्याचा वेध घेऊन ठरवली - जसे की आज सूर्य वसंतसंपातावर आहे तेथपासून तो पुनः वसंतसंपातावर येईपर्यंतचा काल - तर ती सायन (स+अयन), कारण precession of equinoxes (अयनचलन)मुळे वसंतसंपात तारकांच्या पार्श्वभूमीवर १ अंशाहून थोडा कमी इतका मागे आलेला असतो, किंवा, अन्य शब्दात म्हणजे तारकांच्या पार्श्वभूमीवर सूर्य तेव्हढा मागे पडलेला दिसतो. ह्याउलट, पृथ्वीच्या वार्षिक गतीचे मान एखाद्या तारकेच्या वेधावरून घेतले तर ती तारका अन्य तारकांच्या पार्श्वभूमीवर आहे तेथेच असल्याने ते मान सायनवर्षाहून थोडे मोठे असणार कारण अयनचलनाइतका प्रवास अजून करायचा असतो.

@मिहिर - सायनवर्षाला सांपातिक, आर्तव अथवा सावन वर्ष असेहि म्हणतात. 'सांपातिक' कारण एका संपातापासून त्याच संपातावर सूर्यास यायला लागणारा काळ, 'आर्तव' कारण ह्यामुळे ऋतु उत्पन्न होतात. 'सावन' हे 'सवन'पासून झालेले विशेषण - सवनाचे ते सावन. 'सवन' ह्या शब्दाला असलेले वेगवेगळे अर्थ सोमरस तयार करून तो दिवसातून तीन वेळा यज्ञाच्या माध्यमातून देवांपर्यंत पोहोचविण्याच्या कृतीशी संबंधित आहेत. यज्ञ अर्थातच सूर्य उगविणे आणि मावळणे ह्याच्याशी संबंधित असतात. म्हणून सावन दिवस आणि वर्ष म्हणजे सूर्यावरून ठरविलेला दिवस किंवा वर्ष.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह!! विस्तृत अन मेहनतीने संदर्भ शोधून नेमके उत्तर दिल्याबद्दल बहुत धन्यवाद कोल्हटकर सर Smile

जीजसबद्दल पॉइंट नोट केलेला आहे.

ट्रोजन युद्धावरच्या लेखमालेसाठी मी वापरत असलेली इलियडची लिंक ज्या क्लासिक्सआर्काईव्हवर आहे, तिथेच या प्लिनी, हिरोडोटस, इ. लोकांच्या पुस्तकांची इंग्रजी भाषांतरेही आहेत. आपण केलेल्या प्लिनीच्या उल्लेखामुळे या विषयाबद्दल अजूनच उत्सुकता वाटून राहिली आहे, पुढेमागे हिरोडोटस किंवा प्लिनी वाचताना हे सूत्र नक्की लक्षात ठेवेन. बाकी ग्रीकोरोमन इतिहासकारांच्या स्टाईलबद्दल बोलावे तितके कमीच आहे, आपल्याशी पूर्ण सहमत आहे. मुबलक शिलालेख आणि साहित्यिक पुरावे, शिवाय मॅटर ऑफ फॅक्ट शैली यांमुळे सर्व माहिती नीट कंपाईल व्हायला खूप मदत होते हे लॉजिकलच आहे. आणि शेवटी रेग्नल ईयरचाच सगळा खेळ आहे हेही स्पष्ट झाले.

प्लिनीच्या नेमक्या वर्णनामुळे खरंच अचंबित व्हायला होते. ग्रीकोरोमन परंपरा सोडल्यास रेनेसाँपूर्वीच्या युरोपात इतका नेमकेपणा होता की कसे? बायझँटाईन रेकॉर्ड्स सोडल्यास बाकीच्या युरोपची स्थिती कशी होती? ती अंमळ गंडकी असेल असे वाटतेय. असो.

२००० वर्षांपूर्वीव्या एखाद्या घटनेची इतकी स्वच्छ लिहिलेली तारीख जर एखाद्या प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकाला मिळाली तर त्याला हर्षवायूच व्हायचे बाकी राहील!

मुंह की बात छीन ली!!!

मला दुसरे असे जाणवते की ह्या तारखांवर युरोपीय तज्ज्ञांमध्ये फार मारामार्‍या होतांना दिसत नाहीत, सर्वसाधारण consensus जाणवतो. ह्यावरूनहि असे वाटते की ह्या आणि अशा तारखा योग्य पुराव्यावर आधारलेल्या दिसतात.

सहमत आहे. तारखांबद्दल वाद शक्यतोवर नसतो, वाद असलाच तरी त्याची टाईम फ्रेम आपल्याकडच्यासारखी १००-२०० वर्षे इतकी अघळपघळ कधीच नसते. इथे बेसिक कल्चरमध्येच फरक आहे असे जाणवतेय. तरी बरं मौर्य काळापासून रफ तारखा का होईना, आहेत- कमीतकमी साम्राज्यांबद्दल तरी.

पुढच्या लेखाची वाट पाहतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Sidereal year आणि Tropical year हे दोन्ही सूर्याशीच संबंधित आहेत ना? म्हणजे पहिले सूर्य एका नक्षत्रापासून परत त्याच नक्षत्रापर्यंत येण्यास लागणारा वेळ, तर दुसरे म्हणजे सूर्य संपातबिंदूपासून त्याच संपातबिंदूवर येण्यास लागणारा वेळ. तर सावन म्हणजे सूर्यावरून ठरवलेले वर्ष हे वर्णन केवळ Tropical year ला कसे लागू शकते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेकांनी म्हण्टल्याप्रमाणे, उत्कृष्ट, माहितीपूर्ण लिखाण,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हो ते तर खरेच आहे पण शिर्षकाच्या शेवटी "useless knowledge..." असे का लिहीले असावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

अभ्यासपूर्ण आणि सविस्तर माहिती देणारा लेख. हा वाचत असतांना दोन बाळबोध शंका मनात आल्या. या लेखातले एक वाक्य असे आहे.
ह्या वेळेपर्यंत खगोलाच्या अभ्यासकांना अयनचलनाची कल्पना आली होती. (पृथ्वीचा उत्तर-दक्षिण अक्ष आकाशात एकाच बिंदूवर नेम केलेला नसून दर वर्षी तो थोडासा ढळत असतो आणि आकाशपटलावर एक वर्तुळ रेखाटतो. हे वर्तुळ पूर्ण होण्यास सुमारे २४,००० वर्षे लागतात. ह्याला अयनचलन - precession of the equinoxes - म्हणतात.)
पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे कोपरनिकसच्या काळात समजले असे मला आतापर्यंत वाटत होते. असे असेल तर वरील वाक्यामधील पृथ्वीच्या अक्षाचे इतके सूक्ष्म ढळणे त्याच्याही शेकडो वर्षे आधी कसे कळले होते?
दुसरा प्रश्न असा की ५२५ वर्षांनंतर जेंव्हा इसवी सनाची सुरुवात ठरवली गेली, त्या वेळी त्याची सुरुवात १ जानेवारी ही तारीख कशी ठरवली गेली? या दिवशी आभाळात तर काहीच घडत नाही. १ जानेवारी ०००१ रोजी धरतीवर कोणती महत्वाची घटना घडली होती असे तेंव्हा वाटले होते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@मिहिर -

सावन दिवसांचा समुच्चय म्हणजे सावन वर्ष. नाक्षत्र दिवसांचा समुच्चय म्हणजे नाक्षत्र वर्ष. दोन्ही सूर्यावरूनच ठरतात परंतु दैनंदिन आयुष्य सावन दिवसांभोवती फिरते आणि शेतीसारखे व्यवहार सावन वर्षाभोवती फिरतात. नाक्षत्र आणि सावन वर्षात ह्या दोन प्रकारांच्या वर्स्।ंमध्ये एखाद्या किंवा १०-१५ वर्षांपुरताच विचार केला तर वरकरणी काहीच फरक जाणवणार नाही पण काही हजार वर्षे शेतीची लागवड नाक्षत्र वर्षानुसार केली तर उत्पादनावर नक्कीच प्रभाव पडेल. असे वाचले आहे की प्राचीन ईजिप्तमध्ये वर्ष हे व्याधाच्या तार्‍याच्या heliacal rising वरून ठरवत. ते शेतीचे निर्णयहि त्यावरूनच घेत नसावेत कारण त्यांची शेती नाइलच्या पुरावर अवलंबूब असे. पण त्यांनी जर तसे केले असतेच, म्हणजे नाक्षत्र महिन्यांनुसार शेतकामाचे निर्णय घेतले असते (आणि ती संस्कृति अजून काही हजार वर्षे तगली असती) तर कदाचित काही दुष्परिणाम दिसले असते.

ह्याच कारणासाठी सांपातिक वर्षाला आर्तव वर्ष (ऋतूचे ते आर्तव) असे म्हणतात हे वर लिहिले आहेच.

@आनंद घारे -

पृथ्वी स्थिर आहे का स्वतःभोवती फिरते ह्याच्या अयनचलन जाणवण्याशी काही संबंध नाही. तारकांचे वेध नोंदवून ठेवले आणि पुरेशा लांब काळानंतर पुनः त्याच तारकांचे वेध घेऊन ते जुन्यांशी ताडून पाहिले तर तारका चळल्या आहेत हे कळू शकते. हिपार्कसने त्याच्याहिपेक्षा पूर्वीच्या वेधांशी स्वत घेतलेले वेध ताडले आणि त्याला अयनचलनाचा अंदाज आला असे म्हणतात. भारतामध्येहि ग्रंथांमधून आढळणार्‍या उदगयनाच्या - सूर्याचे उत्तरेकडे सरकायला प्रारंभ करणे (winter solstice) तारकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या स्थानी झाल्याच्या नोंदी एकमेकांशी ताडून अयनचलनाचा अंदाज येऊ लागला असे शंकर बाळकृष्ण दीक्षितांनी नोंदवले आहेच.

@पाषाणभेद -

ह्याची एक व्याख्या मी वाचली होती - knowledge you can live without!

On a more serious note, हा निबंध वाचण्याजोगा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तारकांचे वेध नोंदवून ठेवले आणि पुरेशा लांब काळानंतर पुनः त्याच तारकांचे वेध घेऊन ते जुन्यांशी ताडून पाहिले तर तारका चळल्या आहेत हे कळू शकते.
पूर्वीच्या काळात कुठली उपकरणे वापरून आणि कशाच्या संदर्भात हे सूक्ष्म वेध घेतले जात असतील हे एक नवलच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अ‍ॅस्ट्रोलेब नावाने ओळखलं जाणारं उपकरण वापरून मापनं करत असत. इथे आणखी थोडी माहिती आहे. अंधारयुगाच्या सुरूवातीला चौथ्या-पाचव्या शतकातही चांगले अ‍ॅस्ट्रोलेब उपलब्ध होते असं समजतं. अरबांच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास अशा प्रकारचे वेगवेगळे अ‍ॅस्ट्रोलेब सापडतात. (त्या काळात अरब सगळीकडून माहिती गोळा करत आणि अरब विद्वान अभ्यासही करत.) याच्या मोजमापातली त्रुटी किती वगैरे चटकन सापडलं नाही.

परांचन गती, अथवा अयनचलनाची गती वर्षाला ~ १ कोनीय मिनीट एवढी आहे. तुलनेसाठी आकाशातला सूर्य किंवा पौर्णिमेच्या चंद्राचा व्यास साधारण अर्धा अंश एवढा असतो. ३० वर्षांत ध्रुवतार्‍याचं स्थान एका सूर्याएवढं हललेलं दिसलं पाहिजे. ठराविक दिवशी, ठराविक वेळेला पृथ्वीवरच्या, इमारतीचं टोक वगैरे स्थिर वस्तूच्या तुलनेत ध्रुवतारा कुठे आहे हे नोंदवून ठेवलं तर हे लक्षात येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगली नवी माहिती मिळाली. आपले आर्यभट, भास्कराचार्य वगैरेंच्याकडे सुद्धा अशी उपकरणे असतील का? घटिकापात्राच्या पलीकडे मला तरी काही माहिती नाही, पण अयन, परांचन वगैरेंबद्दल त्यांनी लिहिलेले आहे, त्याअर्थी नक्कीच त्यांच्याकडे काही विशिष्ट साधने असावीत.
एक थोडेसे अवांतरः आकाशातला ध्रुवतारा 'अढळ' नाही असे सांगितले तर सर्वसामान्यपणे कोणी ते ऐकूनच घेत नाही. ध्रुवबाळाच्या गोष्टीवर असलेली लोकांची श्रद्धा अतीशय पक्की असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0