बुद्धिबळं


वसंत कानेटकरांच्या 'गाठ आहे माझ्याशी' या नाटकातला एक प्रवेश. विश्वजित हा एक नामांकित वकिल आणि त्याच्या घरातला जुना नोकर पठ्ठे ही दोन पात्रं स्टेजवर आहेत. या दोघांनी सकाळीच बुद्धिबळं खेळायला सुरुवात केली होती, पण त्यानंतर डाव अर्धवट टाकून विश्वजित कोर्टात गेला होता. आता तो संध्याकाळी परतलेला आहे, आणि खेळ पुन्हा सुरू होण्याच्या बेतात आहे.

पठ्ठे: (गडबडून) डाव पुढे चालू करायचा साहेब?

विश्वजित: मग? मी काय तुझ्यापुढं आरती ओवाळून घ्यायला बसलोय?

[त्या बरोबर पठ्ठे – "तयारी साहेब" असे उद्गारत चटकन वळून आपली खेळी खेळतो. पहिल्या छूट विश्वजितचा उंट उडवून आपला घोडा त्या जागी ठेवीत, क्षणमात्र न थांबता तो बूट ठेवण्यासाठी आत पळतो. विश्वजित क्षणभर चकित होत डावातील ही पडझड न्याहाळत राहतो. तेवढ्यात पठ्ठे सपाता घेऊन परत येतो आणि विश्वजितच्या पायात सरकवतो. मग तो त्याला कोट आणि शर्टाची गळपट्टी काढायला मदत करू लागतो. हे चालले असतानाच –]

विश्वजित: चांडाळा, आपल्या घोड्यानं तू माझा उंट मारलास?

पठ्ठे: (काम करताना थंडपणे) होय साहेब.

विश्वजित: (डाव न्याहाळत) आणि दुष्टा, आता हत्तीनं माझा वजीर ठेचायचा तुझा बेत आहे?

पठ्ठे: तुम्ही वजिराला मागे घेतला नाहीत तर नक्कीच.

विश्वजित: (डाव पाहात) थांब, थांब…तेवढंच नाहीय. अरे चोरा ऽ ऽ ! पठ्ठ्या, तू एक नंबरचा इरसाल दगाबाज इसम आहेस. कट कारस्थान रचण्याच्या आरोपाखाली तुला आठ दिवस पोलिसांच्या लॉकपमधेच लटकावला पाहिजे.

पठ्ठे: (भोळी मुद्रा करून) काय झालं साहेब?

विश्वजित: इथून पुढल्या चौथ्या डावात (खेळीत? - जाणकार प्रेक्षकाचा भुवया आक्रसून स्वत:ला प्रश्न) तू माझ्यावर मात करण्याचा व्यूह रचला आहेस. (दरडावून) खरं आहे की नाही?

पठ्ठे: खरं आहे साहेब.

विश्वजित: हरामखोरा, मी कोर्टात गेलो म्हणजे आपलं काम टाकून तू इथं उभा राहतोस आणि फक्त पुढल्या डावपेचांचा विचार करीत बसतोस!

पठ्ठे: काम टाकून नाही साहेब, काम करता करता आणि त्यासाठी सतत इथं उभं राहायची गरज नसते साहेब. डोक्यात हा पट सदैव मांडून ठेवलेलाच आहे साहेब.

विश्वजित: (थक्क होत) आं? काय म्हणालास?

पठ्ठे: (जाण्यासाठी वळत) साहेब हा पट कोणीही उधळून टाकला तरी मी तो पुन्हा मांडू शकतो, जसाच्या तसा – केवळ स्मरणातून. [कोट घेऊन आत पळतो. विश्वजित चक्रावून बघतच राहतो. क्षणार्धात पठ्ठे कपडे घेऊन येतो आणि –] साहेब, हा आपला झब्बा, आणि हा पायजमा –

विश्वजित: (उसळून, हिसकावून घेत, भिरकावीत) फेकून दे गटारात… (त्याचं मनगट पकडीत) काय रे लुच्चा, पुढले चार चार डाव (खेळ्या? - जा.प्रे.) डोळ्यापुढं ठेवून खेळी खेळायची ही अक्कल कोणी शिकवली तुला? अं? कोण गुरू भेटला तुला?

पठ्ठे: आपणच साहेब.

विश्वजित: मी ऽ ऽ ऽ ? (उलगडा पडून, खुलून, मनगट सोडीत) हां हां ऽ ऽ म्हणजे जिमखान्यात टूर्नामेंटस् मधला माझा गेम पाहिला आहेस तू.

एकतर अत्यंत क्षमाशील, नाहीतर बुद्धिबळ या विषयात बिलकुल ठोंब्या, असा प्रेक्षक वगळता इतर कुणालाही हा प्रवेश पचनी पडणं अवघड आहे. खेळ पुन्हा सुरू करायच्या वेळी विश्वजितची पोझिशन इतकी वाईट असली पाहिजे की तो पुन्हा सुरू करायची तसदी घेतलीच का, हे कळत नाही. शिवाय प्रतिस्पर्ध्याची वाईट पोझिशन पठ्ठेच्या ताबडतोब लक्षात येऊ नये, आणि त्याने ती इतका वेळ विचार करण्याच्या योग्यतेची समजावी, हेही त्याला भूषणावह नाही. चार खेळ्यांनंतर आपल्यावर मात होणार हे गणित जर करता येत असेल, तर याचा अर्थ विश्वजितकडे थोडंफार तरी कौशल्य असणारच, पण मग तरीही तो आधी इतका भिकार का खेळला हे समजत नाही. ह्या 'जिमखान्यातल्या टूर्नामेंटस्' चा उल्लेख रहस्यमय वाटतो. असा खेळूनही जर विश्वजितचा या टूर्नामेंटस् मध्ये निभाव लागत असेल, तर जिमखान्याचे इतर मेंबर्स काय कुवतीचे असतील याची कल्पनाही करवत नाही. एकूण पदार्थ जमलेला नाही. प्रवेशातल्या आक्रस्ताळेपणामुळे त्यात जो थोडाफार विनोद उत्पन्न झालेला आहे, त्यामुळे प्रवेश जास्त सुसह्य होतो की कमी, यावर मी मत देत नाही.

मी नाटक वाचलं असलं तरी पाहिलेलं नाही. आपल्याला विचारी वाचक लाभावा अशी काही लेखकांची इच्छा असते, त्यानुसार मी ही पोझिशन कशी असू शकेल ह्यावर विचार केला आणि एक शक्यता रचून पाहिली, ती पुढे देतो आहे. (पठ्ठे आणि विश्वजित यांच्या सामाजिक स्तरांतला फरक लक्षात घेऊन मी त्यांना अनुक्रमे काळे आणि पांढरे मोहरे दिलेले आहेत.)

पठ्ठे
विश्वजित

असं समजा की, सकाळी खेळ थांबला तेव्हा पठ्ठेचा घोडा d5 या घरावर होता, आणि f4 वर असलेला विश्वजितचा उंट आत्ता संध्याकाळी त्याने खाल्लेला आहे. त्यामुळे विश्वजितच्या वजिरावर d7 वरच्या हत्तीचा जोर पडलेला आहे. याखेरीज पठ्ठे आपला वजीर g2 वर नेऊन मात देऊ पाहात असल्यामुळे विश्वजितला त्या घराची राखण करणं भाग आहे. विश्वजितकडे फारसे पर्याय उरलेले नाहीत, पण तरीदेखील त्याने जर आपला वजीर h2 वर हलवला, तर मरण जास्तीतजास्त लांबणीवर पडतं. पण मग त्यापुढच्या खेळीला जर पठ्ठेने आपला हत्ती d2 वर नेला तर –

पांढरा वजीर काळ्या हत्तीला खातो, काळा वजीर h1 वर जाऊन शह देतो,
पांढरा राजा f2 वर जातो, काळा वजीर g2 वर येऊन मात देतो,

असा एकूण चार खेळ्यांत कारभार आटोपतो.

नाटक आणि सिनेमा यांत एक फरक आहे. सिनेमात बुद्धिबळाचा खेळ दाखवताना कॅमेरा बहुतेक अशा पद्धतीने लावला जातो की पट प्रेक्षकांना स्पष्ट दिसतो. नाटकाच्या प्रयोगातला पट सहसा प्रेक्षकांना इतका नीट दिसत नाही. तेव्हा या नाटकावर सिनेमा काढायचा झाला तर वरच्या चित्राचा उपयोग होऊ शकेल. पण यातला तोटा असा की प्रवेश अकुशलपणे लिहिलेला आहे, हे जास्त लवकर उघडकीस येईल.

मार्टिन एमिसच्या 'मनी (Money)' या कादंबरीचा नायक जॉन सेल्फ हा लंडनला एका जाहिरात कंपनीत काम करत असतो. फील्डिंग गुडनी नावाचा प्रोड्यूसर त्याला सिनेमा काढण्यासाठी न्यूयॉर्कला बोलावून घेतो. बऱ्याच घडामोडी होऊन या प्रकरणात जॉन पुरता बुचाडला जातो, आणि स्वत:कडचे सगळे पैसे गमावून कसाबसा लंडनला परततो. यानंतर त्याला लंडनमध्ये हिंडताना अधूनमधून एक तरूण ओझरता दिसू लागतो. आधी जॉनला या तरुणाचा तोरा आवडत नाही, आणि हा लेखक आहे असं कुठूनतरी कळल्यावर त्याचं मत आणखी वाईट होतं. या तरुणाचं नाव असतं 'मार्टिन एमिस'. एकदा एका रेस्टॉरंटमध्ये दोघांची ओळख होते, यानंतर दोघांचं एकमेकांशी थोडंफार जमू लागतं, आणि फील्डिंगने जॉनला कसकसा घोळात घेतला असणार हे एकदा त्याला मार्टिन तपशिलवार समजावून सांगतो.

कादंबरीच्या शेवटी हे दोघे पैसे लावून बुद्धिबळाचा डाव खेळतात. (बोली ठरवण्यासाठी ते बॅकगॅमनमधला डबलिंग क्यूब वापरतात.) जॉनला स्वत:च्या हुशारीबद्दल माज असल्यामुळे खेळ चालू असताना तो अव्वाच्या सव्वा बोली वाढवत राहतो. मार्टिन खेळत राहतो. शेवटी पोझिशन अशी होते:

जॉन
मार्टिन

पांढऱ्या प्याद्यावर काळ्या राजाचा जोर आहे, आणि काळ्या प्याद्यावर पांढऱ्या राजाचा. प्रत्येक प्याद्याला आपापल्या राजाचा पाठिंबा आहे. पण काळ्या राजाला b5 वर आणि पांढऱ्या राजाला d4 वर मज्जाव असल्यामुळे, या क्षणी ज्या कुणाची खेळी असेल त्याला आपल्या प्याद्यामागचा पाठिंबा काढून घ्यावा लागेल, आणि पुढच्या खेळीला त्या प्याद्याचा बळी जाईल. थोडक्यात, ज्याची खेळी तो हरेल. अशा स्थितीला बुद्धिबळाच्या परिभाषेत zugzwang (त्सुगत्स्वांग) म्हणतात. शब्द जर्मन आहे, आणि त्याचा ढोबळ अर्थ 'जागा सोडण्याची सक्ती'. प्रत्यक्षात कादंबरीत या पोझिशनमध्ये कुणाची खेळी असते आणि म्हणून कोण हरतो, हे मी इथे लिहित नाही.

कादंबरी वाचताना या सगळ्या प्रकारामुळे चिडचिड होते; निदान माझी झाली. आपण साहित्यकृती जेव्हा वाचतो जेव्हा त्यातलं जग (काही प्रमाणात) लेखकाने आपल्या लहरीनुसार निर्माण केलेलं आहे, आणि त्यातल्या पात्रांचं तो वाटेल ते करू शकतो, हे आपल्याला ठाऊक असतंच. पण त्याने आपल्याला पालथं पाडून बखोट्यावर बुटाची टाच ठेवून या गोष्टीची आठवण करून देऊ नये अशी वाचकाची अपेक्षा असते. लेखक जर दादागिरी करू लागला तर वाचकाला बंड करण्याची खुमखुमी येते. तोही हतबल नसतो. कादंबरीच्या कथानकात मनोमन फेरफार करून, म्हणजेच स्वत:च्या डोक्यात तिचं पुनर्लेखन करून, तो कादंबरीकारावर सूड घेऊ शकतो. 'मनी' बाबत मी हेच केलेलं आहे. म्हणजे मूळ कादंबरीत जो जिंकला त्याला मी मनोमन हरवलेला आहे, आणि जो हरला त्याला जिंकवलेला आहे. यासाठी कादंबरीच्या कथानकात करावा लागलेला बदल अगदी किरकोळ असल्यामुळे मला विशेष तोशीसही पडली नाही; म्हणजे नसलेल्या प्रसंगांची आणि पात्रांची तरतूद करावी लागणं आणि असलेल्यांना मनातून पुसावं लागणं, असं काही करावं लागलं नाही. सारांश, मार्टिन एमिस विरुद्ध मी, या चुरशीच्या डावात मार्टिन एमिस हरलेला आहे.

अनिकेत कुरुंदकरांच्या 'कित्ता' ह्या कथासंग्रहात एकमेकांशी जोडलेल्या सहा कथा आहेत, पण त्यांना वेगवेगळी नावं नाहीत. यांपैकी दुसऱ्या कथेत सीतिदोस आणि सैतान यांतला बुद्धिबळाचा डाव आहे.

बायबलातल्या जुन्या करारातली इयोबची कथा थोडक्यात अशी: इयोब नावाचा एक गडगंज श्रीमंत माणूस देवाचा भक्त असतो. त्याचा छळ करण्याची देव सैतानाला परवानगी देतो. सैतान लुटारूंच्या टोळ्या पाठवून इयोबची सगळी गुरंढोरं चोरून नेतो आणि त्याच्या गुलामांची कत्तल करवतो; याखेरीज इयोबचे सात मुलगे आणि तीन मुली एकत्र जेवत असताना अख्खी इमारत कोसळवून सगळ्यांना ठार मारतो. इतकं होऊनही इयोब देवाला दोष देत नाही असं पाहून सैतान त्याच्या अंगभर गळवं आणतो, आणि त्यांतून पू वाहायला लावतो. इयोब अंगाला राख फासून शोक करत असताना त्याचे तीन स्नेही त्याचं सांत्वन करायला येतात. हे चौघेजण 'देव चांगल्या लोकांचं वाईट का होऊ देतो' किंवा 'का करतो' या विषयावर, भ्रमिष्ट माणसाने लिहिलं असावंसं वाटणारं आणि वाचायला तापदायक संभाषण करतात. शेवटी देवाच्या कृपेने इयोबला गेलेली सगळी संपत्ती परत मिळते आणि नवीन दहा मुलंदेखील होतात. ही कथा इसवी सनापूर्वी पाचेकशे वर्षं आधी लिहिली गेली असावी, असा अंदाज आहे. इयोबच्या बायकोचा उल्लेख कथेत अगदी त्रोटकपणे आलेला आहे, पण तिचं नाव मात्र दिलेलं नाही. इयोबवर संकटं कोसळल्यानंतर ती त्याला म्हणते: देवाला शिव्या दे, आणि मरून जा. इयोब हा सल्ला मानत नाही. असा चुकीचा सल्ला दिल्याचं प्रायश्चित्त तिला आणखी दहा बाळंतपणं सहन करून घ्यावं लागतं हे उघड आहे.

यानंतर पाचसहाशे वर्षांनी (म्हणजे इसवी सन सुरू होण्याच्या एखादं शतक आगेमागे) या कथेचा आधार घेऊन दुसरी एक कथा लिहिली गेली. हिला इंग्रजीत 'The Testament of Job' असं नाव आहे. चर्चने ही apocryphal (अप्रमाण) ठरवली असल्यामुळे बायबलात अंतर्भूत नाही. या कथेतली पात्रं बहुतेक आधीचीच असली, तरी कथानक पुष्कळच बदललं आहे. इयोबच्या बायकोचं नाव सीतिदोस असं दिलेलं आहे, आणि कुटुंबाची वाताहत झाल्यानंतर ब्रेड विकत घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे ती सैतानाबरोबर आपल्या डोक्यावरच्या केसांचा सौदा करते, असा प्रसंग घातलेला आहे.

कुरुंदकरांच्या कथांतून दिसून येणारा त्यांचा स्वभाव पाहता, त्यांच्यासाठी इतकी किल्ली पुष्कळ झाली. एकदा बदललेली कथा पुन्हा का बदलू नये? त्यांना सीतिदोस, आणि सत्यवानाच्या प्राणासाठी यमाशी हुज्जत घालणारी सावित्री, या बहिणी वाटतात. (नाहीतरी महाभारत त्याच काळाच्या आसपास लिहिलं गेलं असावं; म्हणजे या दोघी तशा समकालीन ठरतात.) त्यांच्या कथेतला सैतान देवाकडून इयोबच्या छळाची परवानगी घेऊन त्याच्या दाराशी हजर होतो. सीतिदोस सैतानाला म्हणते की आपण बुद्धिबळाचा डाव खेळू. जर तू मला हरवलंस तर माझ्या कुटुंबावर वाटेल ती संकटं आणायला तुला मुभा असेल, पण जर मी तुला हरवलं तर मात्र तू आमच्या केसालाही धक्का न लावता परत जायला हवंस. सैतान हे मान्य करतो, आणि डाव सुरू होतो. सैतान स्वखुषीने काळे मोहरे पत्करतो. एका रात्रीत एक खेळी, अशा १०८ रात्रींनंतर (कुरुंदकरांना थोडासा मिस्टिसिझमचा सोस आहे), यापुढची खेळी सीतिदोसची आहे, आणि पोझिशन अशी आहे:

सैतान
सीतिदोस

जर सीतिदोसने राजा g1 वर आणला, तर डाव बरोबरीत सुटतो तो असा: काळा राजा f3 वर, पांढरा राजा f1 वर, काळं प्यादं g2 वर येऊन शह, पांढरा राजा g1 वर. आता पुढच्या खेळीला काळ्या राजाला एकतर आपल्या प्याद्यामागचा पाठिंबा काढून घ्यावा लागेल (आणि प्यादं खाल्लं जाईल), किंवा g3 वर तरी यावं लागेल. पण मग तसं केल्यास पांढऱ्या राजाला एकही खेळी उरत नाही. याला बुद्धिबळाच्या परिभाषेत stalemate (शिळीमात) म्हणतात.

पण सीतिदोसने राजा f1 (किंवा h1) वर आणला तर ती डाव हरते. उदाहरणार्थ, f1 वर आणला तर काळा राजा f3 वर, पांढरा राजा g1 वर, प्यादं g2 वर; या क्रमानंतर आता पांढऱ्या राजाला नाईलाजाने h2 वर जावं लागतं, आणि काळ्या राजाला f2 वर येण्याची मुभा मिळते. त्याच्या पुढच्याच खेळीला प्याद्याचा वजीर होतो आणि मग लवकरच पांढऱ्यावर मात होते.

निर्णय अवघड आहे. डाव बरोबरीत सुटला तर काय करायचं याबद्दल करारात काहीच तरतूद नाही. त्यामुळे तशी परिस्थिती उद्भवली (आणि तीही परस्परसंमतीने नव्हे तर मार्ग खुंटल्यामुळे), तर सीतिदोस, सैतान आणि वाचक हे तिघेही संहितेबाहेर जातील. याउलट सीतिदोस हरली तर तिच्यावर संकटं येतील हे खरं, पण तिला ती नको आहेत असं आपल्याला नक्की ठाऊक नाही. शेवटी सीतिदोसच्या आणि इयोबच्या आयुष्याचा प्रश्न दु:ख टाळणं हा नसून, ते आपणहून ईश्वराभिमुख होऊन स्वीकारणं हा आहे. (कुंती श्रीकृष्णाकडे प्रार्थना करते की 'विपद: सन्तु न: – आमच्यावर विपत्ती येत राहोत, म्हणजे तू वारंवार भेटत राहशील'.) ही भूमिका एका अर्थी जाणतेपणाची आहे, आणि एका अर्थी हास्यास्पद आहे.

सीतिदोस विचारमग्न असताना कुरुंदकरांनी कथा तिथे संपवलेली आहे, त्यामुळे ती कुठली खेळी करते हे आपल्याला कळत नाही. एक लेखक म्हणून त्यांनी घेतलेला (किंवा वास्तविक मुद्दाम न घेतलेला) हा निर्णय मला एमिसविरुद्धच्या तुलनेत अधिक प्रगल्भ वाटतो.

---------

संदर्भ:

 • एमिस, मार्टिन: 'मनी', जोनाथन केप प्रकाशन, लंडन, १९८४.
 • कानेटकर, वसंत: 'गाठ आहे माझ्याशी', परचुरे प्रकाशन, मुंबई, १९८०.
 • कुरुंदकर, अनिकेत: 'कित्ता', संवादिनी प्रकाशन, सागर, १९६९.
विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

रंजक विषय आहे. अचानक संपला. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख अतिशय आवडला.

(कानेटकरांची कुठली नाटके मी बघितली असतील, तर लवकर आठवत नाहीत. पण या नाट्यप्रवेशासारखे काही असेल, तर त्या वाटेला जाणार नाही. आणि हे लेखनशैलीबाबत, बुद्धिबळातील खेळीबाबत नव्हे. बुद्धिबळ येत नसलेल्या लेखकाने थोडे मोघम लिहायला हवे होते. घोडे-हत्ती-वजीर ऐवजी पहिल्या खेळीत आपले मोहरे बळी देणे, दुसर्‍या खेळीत प्यादे हलवणे, आणि तिसर्‍या खेळीत वजीर मिळवणे... असे काही दिले असते, तर बरे असते. आणि "खेळी"ऐवजी "डाव" केवळ हास्यास्पद. हसू नये, म्हणून मी आधी काहीतरी अर्थ लावायचा प्रयत्न केला. या वेळी काहीतरी खेळी खेळून पुढच्या डावात काळा-पांढरा बदलल्यावर विश्वजितला ती खेळी खेळण्याच्या मोहात पाडणे, वगैरे. पण तो प्रयत्न फारच त्रासदायक झाला, सोडला.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> कानेटकरांची कुठली नाटके मी बघितली असतील, तर लवकर आठवत नाहीत. पण या नाट्यप्रवेशासारखे काही असेल, तर त्या वाटेला जाणार नाही.

कानेटकरांची नाटकं त्यातल्या ढोबळ नाट्यमयतेसाठी प्रसिध्द आहेत. एकेकाळी मराठी नाटकांमधली सर्वात लोकप्रिय शैली ती होती आणि 'कानेटकरी' नाटकं म्हणूनच ती ओळखली जाई. अजूनही मराठी नाटकं आणि टी.व्ही. मालिकांवरचा कानेटकरी छाप कायम आहे. त्यातल्या त्यात विनोदी नाटकं ठीक होती (लेकुरे उदंड जहाली, सूर्याची पिल्ले, प्रेमा तुझा रंग कसा), पण तीही आता डेटेड वाटतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बुद्धिबळाच्य़ा खेळावर आधारित गोष्टींपैकी माझ्यामते all-time great अशी म्हणजे The Royal Game - अर्थात् भाषान्तरित. ही दीर्घकथा मी वाचली तेव्हा मी स्टीफन झ्वाइगच्या सर्वच कथांनी पूर्ण झपाटलेलो होतो. तरी पण ही कथा म्हणजे त्याचा सर्वोच्च बिंदूच वाटतो. जरूर वाचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काळा राजा h3 वर नेला की काळा डाव जिंकू शकतो. का माझी काही चूक होते आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डाव राजाच्या एक-घर हद्दीपर्यंत दर्पण-संमित (मिरर सिमेट्रिक) आहे. श्री. चिपलकट्टी यांनी काळा राजा f दिशेने हलवल्याचा पर्याय सांगितला आहे. त्याचे प्रत्युत्तर म्हणून पांढरा राजा f दिशेने सरकतो. जर काळा राजा g दिशेने हलला, तर पांढरा राजासुद्धा g दिशेने सरकेल, अशी दर्पण संमिती. आणि श्री. चिपलकट्टी म्हणतात त्या पुढल्या खेळी अशाच दर्पण-संमित खेळून डाव तसाच कुंठित होईल. बरोबरीने सुटेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बुद्धिबळातलं काही समजत नाही पण लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाटकातल्या संभाषणांना इतकं सिरियसली का घेतलं आहे ते समजले नाही. या निमित्ताने , नाटकांच्या भाषेतच बोलायचं तर कानेटकरांना निमित्त करुन तुम्ही आपलं प्यादं पुढे सरकवलं आहे असं म्हणता येईल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मलाही बुद्धिबळातलं काही कळत नाही, अगदी लहान-लहान मुलंदेखील मला सहज हरवतात. पण एकंदरीत लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे