बुकर पारितोषिक, साहित्यिक मूल्य, दर्जा वगैरे

प्रतिसादांना मिळणाऱ्या श्रेणी आणि आता धाग्यांनाही मूल्य देता येणं या सुविधांवर अनेक मतमतांतरं वाचतो आहे. मराठी आंतरजालावर याविषयी अजूनही चर्चा होत राहणार हेही जवळपास निश्चित आहे. कोणतीही गुणवत्तानिर्देशक व्यवस्था ही अधिकाधिक निर्दोष कशी करता येईल हा प्रश्न कठीण आहे. गुणवत्ता आणि लोकाभिमुखता यांतलं द्वंद्वात्मक द्वैत फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी दिसतं. बुकर पारितोषिकाच्या निमित्तानं नुकतंच उठलेलं वादळ मला या निमित्तानं आठवलं. त्याचा हा थोडक्यात परिचय. त्या अनुषंगानं साहित्यिक दर्जाविषयी चर्चा होऊ शकते किंवा धागे आणि प्रतिसादांच्या श्रेणी यांवरही काही मुद्दे मांडले जाऊ शकतात.

तर बुकर पारितोषिक. साहित्यिक पारितोषिकांच्या राजकारणाविषयी होणाऱ्या गदारोळातून नोबेल किंवा ज्ञानपीठ यासारखी पारितोषिकंदेखील सुटलेली नाहीत. बुकर पारितोषिकाचाही याला अपवाद नाही. ‘बुकरचा पूर्वीचा दर्जा राहिला नाही’ अशी ओरड गेली काही वर्षं इंग्लंडात होत असते. (अरुंधती रॉयच्या वेळीसुद्धा अशी चर्चा झाल्याची आठवते.) या वर्षी मात्र प्रकरण हाताबाहेर गेलं. Stella Rimington या प्रमुख परीक्षकाच्या साहित्यिक जाणीविषयीच संशय व्यक्त केला गेला. तरीही ‘सुमार थ्रिलरलेखिका झाली म्हणून काय झालं, तिला साहित्यिक जाण असू शकते’ असा संशयाचा फायदा काही उदारमतवादी लोक तिला देताहेत तोच ‘वाचनीयता’ कशी महत्त्वाची आहे याविषयी Chris Mullin या परीक्षकानं म्हटलं की ‘the books had to zip along’ म्हणजे थोडक्यात काय तर हाती घेतलेलं पुस्तक झपाझप वाचून संपलं पाहिजे . Rimington बाईंच्या मते ‘लोकांनी पुस्तकं विकत घेऊन वाचावीत; नुसती विकत घेऊन त्यांचं कौतुक करू नये असं आम्हाला वाटतं’. Susan Hill या आणखी एका परीक्षकानं तर ट्विटरवर अवाचनीय पुस्तकांची एक यादीच दिली: "War and Peace, The Waves, Ulysses, rubbish books like that". वाचनीयता असा निकष असावा असं म्हणता म्हणता या परीक्षकांना जणू असं म्हणायचं होतं की जी पुस्तकं वाचकांसमोर आव्हानात्मक किंवा युगप्रवर्तक असं काहीतरी ठेवतात ती वाचनीय नसतात आणि जे लोक अशा पद्धतीच्या पुस्तकांची भलामण करतात ते उगीच उच्चभ्रूगिरी करत असतात. मग अर्थात बुकर नामांकनाच्या शॉर्टलिस्टपर्यंत जी पुस्तकं पोहोचली होती त्यांची चिरफाड झाली. या वर्षातल्या काही महत्त्वाच्या पण प्रयोगशील कादंबऱ्यांना तिथे स्थान मिळालं नव्हतं असं समीक्षकांचं म्हणणं पडलं. त्यात गंमत अशी झाली की शॉर्टलिस्टमधून डावलले गेलेले पण अनेक समीक्षकांनी उत्तम म्हणून वाखाणलेले असे तीन लेखक समलैंगिक होते. त्यांचं हे वगळलं जाणं काहींच्या मते संशयास्पद होतं. आजकालच्या सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात बुकर पारितोषिकाचं एक अधिकृत संवादस्थळही होतं. तिथे अनेक सामान्य वाचकांनीही आपला निषेध नोंदवला. एकेकाळचा इंग्लंडचा पोएट लॉरीएट Andrew Motion यानं त्याच्या मते शॉर्टलिस्टमध्ये कोण असायला हवे होते यांची एक यादी दिली. त्यात आणि अधिकृत शॉर्टलिस्ट अशा दोन्हींमध्ये समाविष्ट असणारं फक्त एकच नाव निघालं (आणि अखेर त्यालाच बुकर मिळालं). अनेक वर्षांपासून सातत्यानं उत्तम लिखाण करणाऱ्या Julian Barnes या लेखकाला इतके दिवस हुलकावणी दिल्यानंतर अखेर एकदाचं बुकर मिळालं आणि सध्यापुरता तरी हा शिमगा ओसरला.

तर यातून कोणते प्रश्न उपस्थित झाले?

वाचनीयता हा दर्जाचा निकष असावा म्हणजे काय?
वाचनीय म्हणजे निव्वळ एकदा वाचायला घेतलं की खाली ठेवता येत नाही असंच आणि एवढंच का? निदान काही परीक्षकांना तसं वाटत होतं. दर्जेदार किंवा वाचनीय साहित्य असं म्हणताना त्यात वाचकाला चिंतनीय, मननीय काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करणं गैर आहे का? अशी अपेक्षा करणारे कुणीतरी उच्चभ्रू आणि मग त्यातून कंपूबाजी किंवा एक वर्णव्यवस्था निर्माण होते आणि वर्णव्यवस्था गैर असं म्हणून जर बसलो तर मग प्रयोगशील आणि काळाच्या पुढे जाणारं साहित्य कुठे जाईल? बुकरसारखं पारितोषिक (किंवा नामांकन) मिळाल्यावर नक्कीच कुतूहलापोटी किंवा ते एक दर्जाचं लक्षण मानून अशी पुस्तकं वाचण्याकडे लोकांचा कल असतो. निव्वळ रंजक किंवा चटपटीत वाचनासाठी बेस्टसेलर्सच्या याद्या असतातच. मग पुन्हा अशा प्रतिष्ठित आणि बहुचर्चित नामांकनांसाठी असा चटपटीतपणाचा आग्रह धरणं म्हणजे दर्जेदार वाचनासाठी अशा नामांकनांवर अवलंबून असणाऱ्या वाचकांचा एक प्रकारे विश्वासघात होत नाही का?

साहित्यिक दर्जाच्या बाबतीत सापेक्षतावाद (Relativism; relativity नव्हे) किती टोकाला नेता येतो?
साहित्यासारख्या शास्त्राधारित नसणाऱ्या बाबतींत दर्जा सापेक्ष असतो असं म्हटलं जातं. काही प्रमाणात ते खरंही आहे. पण म्हणून ते इतक्या टोकाला नेता येईल का की निखळ दर्जा असं काही नसतंच? मग कोणतीच समीक्षा, पारितोषिकं किंवा कुठल्याच ‘बेस्ट ऑफ' वगैरे याद्यांना अर्थ राहत नाही. मग ज्यांना दरवर्षी प्रकाशित होणारी सगळी पुस्तकं वाचणं शक्य नसतं (यात बहुसंख्य लोक येतात) पण ज्यांना निव्वळ रंजनापेक्षा काहीतरी वेगळं आणि दर्जेदार वाचण्याची इच्छा असते त्यांनी काय करावं? (असे लोक बहुसंख्य नसले तरी अगदीच अल्पसंख्य नसतात असं वाटतं.)

हे इथं का मांडावंसं वाटलं?
थोड्या वेगळ्या प्रकारच्या कवितांना इथे आलेले अनेक 'दुर्बोध! दुर्बोध!!' प्रतिसाद किंवा काही मला दर्जेदार वाटलेल्या धाग्यांना न आलेले किंवा किंचितच आलेले कोमट प्रतिसाद पाहून मला इथे या मुद्द्याची चर्चा व्हावी असं वाटलं. अर्थात हे सापेक्ष आहे असं पटकन म्हणता येईल. पटकन दुर्बोधतेचा शिक्का मारून मोकळं होणं हीही कदाचित काही लोकांची प्रतिक्षिप्त क्रिया असेल, पण म्हणून अशा प्रतिक्रिया देणं गैर नाहीच असं म्हणणं मला तरी जड जातं. हे उद्याचे महान कवी असतील नसतील, पण त्यांना काय म्हणायचं आहे हे समजून घेण्यासाठी थोडे कष्ट घेणं स्वत:ला सुजाण म्हणवणाऱ्यांनी तरी गैरलागू मानू नये.

शिवाय, धाग्यांना आणि प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा अधिकाधिक लोकांना देण्याची अपेक्षा आपण बाळगून आहोत. ही (दुसऱ्याच्या लिखाणावर श्रेणी देण्याची) सत्ता तर हवी पण त्याबरोबर येणारी जबाबदारी मात्र नको असं होऊ नये अशीही कळकळ त्यामागे आहे. एखादी गोष्ट समजायला कठीण आहे किंवा अनाकलनीय वाटते आहे म्हणून लोक सटासट प्रतिसाद जसे देत सुटले तसेच वाईट श्रेणी देत सुटतील. कदाचित मग इतरांपेक्षा ज्यांचं लिखाण थोडं वेगळं आहे असे लेखक हिरमुसून निघून जातील. (इतरांनी चांगलं म्हटल्यानं न सुखावणारा लेखक आणि वाईट म्हटल्यानं न हिरमुसणारा लेखक विरळाच असतो.) नेहमी मराठी संकेतस्थळांवर जे वाचायला मिळतं त्याहून थोडं वेगळं वाचायची ज्यांना इच्छा आहे त्यांची ती इच्छा मग पूर्ण होऊ शकणार नाही आणि त्याच त्याच पद्धतीच्या लिखाणाला आपण चान चान म्हणत राहू.

असो. या वर्षीच्या बुकर वादाविषयी अधिक वाचण्यात ज्यांना रस आहे त्यांच्यासाठी हे काही दुवे:
http://www.guardian.co.uk/books/2011/oct/16/booker-prize-judges-betray-r...
http://www.guardian.co.uk/books/booksblog/2011/sep/08/booker-prize-short...
http://www.guardian.co.uk/books/2011/oct/17/booker-prize-populism-backfire
http://www.guardian.co.uk/books/2011/oct/16/booker-prize-cricitism-andre...

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

श्टॅन्डर्ड पायजे ब्वॉ कुठेतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा प्रच्या

माझ्या आवडीचा विषय आणि तोही इतक्या सविस्तर रितीने मांडल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.

१. एका परीक्षकानं तर ट्विटरवर अवाचनीय पुस्तकांची एक यादीच दिली: "War and Peace, The Waves, Ulysses, rubbish books like that".
~ ही फॅशन आहे एक आणि आत्ताच नव्हे तर ज्या काळात या अभिजात कलाकृती जन्माला आल्या त्यावेळेपासून या ना त्या माध्यमातून त्यावर चिखलफेक होत राहिलीच आहे (युलिसिसवर एक स्वतंत्र पुस्तकच होईल अशा झडलेल्या बाह्य चर्चेबाबत). अशा परिक्षकांची मते थिल्लर स्वरूपाची मानावी लागतील मग भले ते बुकर सिलेक्शनवर असोत वा नोबेलवर. अमुक एका मंडळावर जागा मिळाली म्हणजे मला जगातील सर्व वाड.मयावर मल्लीनाथी करण्याचा घटनात्मक अधिकार प्राप्त झाला अशी मनोवृत्ती यांच्या मनी वसत असते. अर्थात जे लेखक स्वत:चे लेखन-स्वातंत्र्य पारितोषिकापेक्षा महत्वाचे मानतात त्याना अशा समीक्षकांच्या शेर्‍यांना महत्व द्यावे असे कधीही वाटत नाही. किंबहुना ज्याँ पॉल सार्त्र सारखा लेखक 'नोबेल प्राईझ' नाकारतो तो अशा 'लेखकमूल्य' ठरवू पाहणार्‍या संस्था कारभारावर कार्यरत असणार्‍यांच्या बुद्धीची पातळी ओळखूनच.

अवाचनीय आणि वाचनीय अशी पुस्तकांची वर्गवारी करणे पोरकटपणाचे आहे. अवाचनीय वाटले म्हणून ते पारितोषिक देण्याच्या योग्यतेचे नसते आणि वाचनीय आहे म्हणून जर पारितोषिक द्यायचे असे ठरल्यास इंग्लिशमध्ये ज्या पुस्तकांना Unputdownable असे म्हणतात त्यातील हॅरॉल्ड रॉबिन्स आणि फ्रेडरिक फोर्सिथ यांच्यासारख्या 'Million copies worthy' अशा पेपरबॅक किंग्जनाच फक्त पारितोषिके मिळत राहतील.

२. "ज्यांना दरवर्षी प्रकाशित होणारी सगळी पुस्तकं वाचणं शक्य नसतं"
~ हे दुखणे सर्वसामान्य वाचकाचे तर असतेच पण विशेष म्हणजे सरकारी पारितोषिक कमिटीवर नियुक्ती मिळालेल्या ढुढ्ढाचार्यी परिक्षकांचेही आहे. आपले शासन अशी दिव्य शक्ती असलेल्या परिक्षकांची नावे जाहीर करत नाही हे तर उघडच आहे. सरकारी वार्षिक दक्षिणेस पात्र अशी सुमारे ४००-५०० पुस्तके प्रकाशकांकडून सादर होत असतात आणि पाच सदस्यांची ही कमिटी सदस्य वाचनास [अर्थात एकत्र नव्हे, स्वतंत्रपणे] बसतात आणि त्याना मुदत दिली जाते २ महिने. आता ज्यांच्या चष्म्याचा नंबर २+ च्याही पलिकडील आहे, बी.पी., मधुमेहाने ज्याना ग्रासून टाकले आहे, संधीवात तर पाचवीलाच पुजला आहे इ. इ., अशा थोर समीक्षकांकडून दोन महिन्याच्या अवधीत ४५० पुस्तके पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत नीटपणे वाचून होत असतील याच्यावर मेन्टल हॉस्पिटलमधील रुग्णही विश्वास ठेवू शकणार नाही. ललित साहित्यातील ज्याला गम्य आहे त्यानेच विज्ञानविषयकचीही पुस्तके वाचायचीच कारण त्या विभागालाही पारितोषिक आहे म्हणून. ज्याला संत साहित्याशिवाय कशातही गम्य नाही त्यालाही आधुनिक कविंच्या कवितासंग्रहाचे ढीग पालथे घालावे लागतात. या प्रचंड ढिगार्‍याखाली तितकीच प्रचंड पानाची ना.सं. इनामदार, विश्वास पाटील, रंगनाथ पाठारे थाटाची एखादी कादंबरी असतेच. ती तरी पूर्ण वाचली जातच नाही, केवळ खपाच्या आकड्यावरून, चर्चेवरून ती पारितोषिक प्राप्त ठरविली की दुखणे राहातच नाही. त्यामुळे दर्जाबाबत फक्त नोबेल आणि बुकर इथेच प्रश्नचिन्ह नसते तर थेट अकादमी आणि राज्य शासन पुस्तक पारितोषिके इथपर्यंत हे रहाटगाडगे कुरकुरत का होईना चालत असते. ही पंचमंडळीही पुस्तकामागे मिळालेले मानधन कनवटीला लावून आपापल्या गावी परततात. कुणालाही 'वाद' नको असतो आणि त्यासाठी प्रमुख समजल्या जाणार्‍या पारितोषिकाबाबत आपल्या नावाने राळ उठू नये असेच ते सही करण्यापूर्वी म्हणत असतात. श्री.ना.पेंडसे यांच्या 'रथचक्र' ला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळते पण महाराष्ट्र शासनाचे मिळत नाही. कारण ? कृष्णाबाई.

३. नोबेल
बुकरच काय पण जगभर प्रतिष्ठेचा मानदंड ठरलेल्या 'नोबेल प्राईझ' बद्दल तर काय वेगळे आहे ? स्वीडिश समितीमध्ये त्या देशातील साहित्यिकांची प्रामुख्याने भरती असणार हे ओघानेच आले. आता १९०१ ते २०११ असा तब्बल ११० वर्षांचा 'नोबेल लिटरेचर प्राईझ' चा इतिहास तपासला तर काय चित्र समोर येते ? तर या शतकात ज्यावेळी २६ इंग्लिश साहित्यिकांना, प्रत्येकी १३, १३ फ्रेन्च आणि जर्मन, ११ स्पॅनिश साहित्यिकाना नोबेल देण्यात आले त्याचवेळी ११० वर्षात केवळ ५ रशियन लेखकांना साहित्याचे नोबेल मिळाले. यातही हास्यास्पद म्हणजे मास्कोच्या बाहेर ज्याचे नावही फारसे माहीत नाही अशा इव्हान बुनीनला साहित्याचे पहिले नोबेल स्वीडिश कमिटीने जाहीर केले. जगप्रसिद्ध लेखक लीओ टॉलस्टॉय याचे नाव तर कमिटीने अगदी क्रूरपणे एकदा दोनदा नाही तर तब्बल नऊ वेळा पारितोषिकासाठी अपात्र मानले...आणि अखेरपर्यंत टॉलस्टॉयला नोबेलने हुलकावणी दिलीच; तर चेखोव्ह आणि गोर्की यांची नावे तर विचारासाठीही आली नाहीत. बोरिस पास्तरनाकला का मिळाले ? तर त्याने आपल्या साहित्यातून रशियन क्रांतीच्या विरूद्ध टिपणी केली म्हणून. त्यामुळे पारितोषिकाला साहित्यमूल्याऐवजी राजकीय मूल्य दिले गेले म्हणून मास्कोने पास्तरनाकला पारितोषिक नाकारण्याचा सल्ला दिला तो त्याने मानला. रशियाला जाणीवपूर्वक नोबेल सन्मानापासून दूर ठेवणे ही समितीची स्कॅन्डेनेव्हियन आणि जर्मन मातीशी असलेली जवळीक आणि रशियाशी असलेला वैरभाव याचेच प्रतिक होते. [नोबेल इतिहासाच्या पहिल्या पन्नास वर्षात तर साहित्याचे सोडाच पण एकाही रशियन शास्त्रज्ञाला फिजिक्स, केमिस्ट्री यातील पारितोषिक मिळाले नव्हते. पन्नास वर्षात फक्त एक मेडिसिनचे].

अर्थात आपल्याकडील 'ज्ञानपीठ' बद्दलही सारे काही 'आल इज वेल' असे नाहीच, पण त्याबद्दल पुढे केव्हातरी चिंजं लिहितीलच.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चान्गली माहिती दिलीये Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पर्ल बक" या लेखिकेचे "द गुड अर्थ" पुस्तक मला खूप आवडले होते. कारण त्यातील वर्णन (नॅरेशन) तसेच व्यक्तीचित्रण (कॅरेक्ट्रायझेशन). तसेच गॉन विथ द विंड पुस्तकातील अप्रतिम व्यक्तीचित्रण आवडले.
पण सहसा पाहीले तर आपण ज्या वातावरणाशी/भावनांशी थोडेफार परीचीत असतो त्याच भावना जर पुस्तकात प्रतिबिंबित झाल्या तर चटकन आकर्षित होतो. थोडा फँटसी (स्वप्नरंजन) ला वाव असेल तरी ते पुस्तक आवडून जाते. याउलट क्लिष्ट भाषा, किंवा अगदीच वेगळी पार्श्वभूमी असेल तर तितकेसे समरसून ते पुस्तक वाचले जात नाही. अति आदर्शवादी/ आव्हानात्मक पुस्तके मी तरी वाचेन का याबाबत मी साशंकच आहे.

>> वाचनीय म्हणजे निव्वळ एकदा वाचायला घेतलं की खाली ठेवता येत नाही असंच आणि एवढंच का?>>
किमान तेवढे तरी असावे. काहीतरी बोजड/ क्लिष्ट/ वातुळ शब्दात पण चिंतनीय आणि मननीय देणारे पुस्तक मी तरी वाचायला घेणार नाही.

>> हे उद्याचे महान कवी असतील नसतील, पण त्यांना काय म्हणायचं आहे हे समजून घेण्यासाठी थोडे कष्ट घेणं स्वत:ला सुजाण म्हणवणाऱ्यांनी तरी गैरलागू मानू नये. >>
ही अपेक्षा रास्त आहे. म्हणूनच मी एकाही न कळलेल्या कवितेवर शेरा मारत नाही. नाही ना आपल्याला कळत मग उगी तरी रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवर लेख व प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा आहे. या पार्श्वभूमीवर दर्जा म्हणजे काय हा कळीचा प्रश्न येतो. तो मांडल्याबद्दल धन्यवाद.

मी प्रामुख्याने संस्थळावरच्या लिखाणावर लक्ष केंद्रित करणार आहे. मुळात ही श्रेणी देण्याची सुविधा का आहे? याचं कारण थेट संस्थळाच्या ध्येयातून आलेलं आहे. इथे दर्जेदार साहित्य निर्माण व्हावं, इथे लेखन करून लेखकांना शिकायला मिळावं, आणि वाचन करणाऱ्यांना चांगल्या लेखन वाचण्याबरोबरच चांगलं म्हणजे काय, ते कसं लिहिलं जातं, त्याचे कुठचे पैलू अनुभवता येतात याची जाण निर्माण व्हावी. म्हणजे प्रत्येक जण गाऊ शकला नाही, तरी स्वरांची जाण होऊन अधिक चांगले कानसेन बनावेत.

श्रेणीच्या एका आकड्यात दर्जा कसा मोजायचा हा प्रश्न कठीण आहे. कारण दर्जा मोजताना अनेक परिमाणं ध्यानात घ्यावी लागतात. आणि प्रत्येक कलाकृतीला तीच परिमाणंदेखील लागू पडतातच असं नाही. उदाहरणच द्यायचं तर कवितेचं घेता येतं. कवितेचं सौंदर्य मोजताना, लय, यमक, वृत्त, गेयता, शक्तिशाली रूपकांचा वापर, आशयाची खोली.. अशा गोष्टींचा विचार करावा लागतो. पण काही कविता मुक्तछंद असतात. मग त्यांच्यासाठी यमक, वृत्त आणि गेयता हे निकष लागतच नाहीत.

हाच प्रश्न दुसऱ्या वेगळ्या संदर्भात विचारता येतो. माणसं वेगवेगळ्या प्रकारची असतात. पण त्यांना एक श्रेणी देऊन चांगला की वाईट या दोन टोकांमध्ये कुठेतरी उभं करायचं झालं तर किती कठीण होईल? माणसाचा चांगलेपणा ठरवण्यासाठी त्याची वागणूक, बोलण्याची पद्धत, इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती, पापभीरूपणा, हुशारी, देखणेपणा अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. कोणाला पुढे, कोणाला मागे ठेवायचं हे ठरवताना नाकी नऊ येतील. माझे जे निकष असतील त्यापेक्षा वेगळे माझ्या मित्राचे असतील. माझा भाऊ आणखीन वेगळ्या प्रकारे लोकांना मागेपुढे उभं करेल. बुकर पारितोषिकासाठी जेव्हा समिती बसते तेव्हा तर हे आणखीनच कठीण होतं. कारण त्यांच्याकडून केवळ त्यांचे स्वतःचेच निकष लावण्याची अपेक्षा नसते, तर एका मोठ्या जाणकार, चोखंदळ वाचकवर्गाच्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी असते.

चांगलं वाईट ठरवण्याची रांग लावण्याचे निकष वेगळे असतील हे मान्य. पण परिस्थिती इतकी वाईट आहे का की दोघांनी केलेल्या याद्यांमध्ये काहीच नातं असणार नाही? मला तसं वाटत नाही. माणसांचंच उदाहरण घेतलं तर कितीही वेगवेगळ्या लोकांनी या पद्धतीने रांग लावली तरी एखाद्या खुनी वा बलात्कार करणाऱ्या माणसाला बहुतेकांच्या यादीत वाईटाच्या टोकाकडे बसवलेलं असेल, तर बाबा आमटेंसारखा स्वार्थत्याग करून आयुष्यभर लोकांची सेवा करणाऱ्यांना चांगल्या टोकाकडे ठेवलं जाईल. मात्र त्यासाठी त्यांचं कार्य काय हे जाणून घेण्याची थोडी तयारी पाहिजे. याचाच अर्थ कुठेतरी काहीतरी निखळ, ऍब्सोल्यूट चांगलं असतं. कलाकृतींच्या दर्जाबाबतदेखील तेच. दुर्बोधता उलगडून पहाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे दर्जाच्या निकषांचे बारकावे समजून घेणं.

गेय असेल तरच ती कविता, देखणा असेल तरच तो 'चांगला', आणि वाचनीय असेल तरच ते दर्जेदार हे म्हणणं म्हणजे आपल्या दृष्टीला सरळ रस्त्यावर चालण्यासाठी घोड्याच्या डोळ्याला लावतात तशी झापडं लावून घेणं. मग सरळधोपट रस्त्यापलिकडे काही जग आहे हेच दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादी गोष्ट समजायला कठीण आहे किंवा अनाकलनीय वाटते आहे म्हणून लोक सटासट प्रतिसाद जसे देत सुटले तसेच वाईट श्रेणी देत सुटतील. कदाचित मग इतरांपेक्षा ज्यांचं लिखाण थोडं वेगळं आहे असे लेखक हिरमुसून निघून जातील. (इतरांनी चांगलं म्हटल्यानं न सुखावणारा लेखक आणि वाईट म्हटल्यानं न हिरमुसणारा लेखक विरळाच असतो.)

शक्य आहे पण कठीण आणि अनाकलनीय वाचून त्यावर वेळ घालवायचा नसेल आणि सोपे आणि आकलनीय पर्याय उपलब्ध असतील तर वाचक तेथे वळतात. बहुतांश वाचकांचा वाचन हा फुलटाइम बिझनेस नाही. वाचन हा विरंगुळा असेल तर मला* महान वाचक व्हावेसे वाटणार नाही आणि एखाद्याने मला मारून मुटकून महान वाचक बनवलेलेही आवडणार नाही.

क्रिटिक्स आणि मासेस यांच्या आवडीनिवडी बर्‍याचदा वेगळ्या असतात. दोघांना एकमेकांचं कातडं ओढून घ्यायची सक्ती केलेली आवडणार नाही असे वाटते.

Smile

बाकी चालू द्या!

* मला म्हणजे प्रियालीला असं सोपं आणि आकलनीय गणित बांधू नये ही विनंती. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम उत्तम पद्धतीने मांडलेला चर्चा प्रस्ताव.
बुकर किंवा तत्सम वादांवर मला काहि म्हणायचे नाही, कारण असे पुरस्कार हा एका विविक्षित संस्थेचा एक प्रकारचा व्यवसाय आहे असे मी मानतो. त्याचे नियम काय असावे यात माझ्या मतापेक्षा त्याभोवतीचे अर्थकारण अधिक प्राधान्य घेते (घ्यावे) असे वाटते. (उद्या बुकर/नोबेल पुरस्कार विजेत्याला रक्क्म-ट्रॉफ्या वगैरे सोडून जर काहि समाजिक-राजकीय-आर्थिक अधिकार मिळणार असतील तर जनसामान्यांच्या मताची कदर करावी (लागेल) असे वाटते. जसे उद्या मॅगसेसे अवॉर्ड विनर हा लोकपाल समितीवर जाणार असेल - व अप्रत्यक्षपणे माझ्यावर अधिकार गाजवणार असेल तर मात्र मॅगसेसे विजेता कोण असावा याबद्दल माझे एक ठाम मत असेल)

इथल्या श्रेणीबद्दल बोलायचे तरः
एखादी गोष्ट 'चांगली' आहे की नाही यासाठी बहुमान्य नियम हवेत हे कबुल. मात्र ती गोष्ट 'आवडली' की नाही या बाबतीत वैयक्तीक नियम पुरेसे वाटतात. धाग्यांवर असलेली श्रेणींची सुविधा ही केवळ वैयक्तीक मत गोळा करण्याची प्रणाली आहे. 'कलेक्शन' आहे. इथे त्यावरून लेखनाच्या दर्जा पेक्षा त्यामुळे लोकांमधे उठलेल्या भावनांचा 'अंदाज' येतो.

जर लोकांच्या 'खर्‍या' मतांचा अंदाज घ्यायचा असेल तर ब्लाईंड लेखन सुरु केले पाहिजे. जसे लेखन प्रसिद्ध झाल्यावर पहिले काही दिवस त्याच्या लेखकाचे नाव लपवून ठेवावे. (तसेच प्रतिसादकांचेही) या काळात येणारे प्रतिसाद व त्याच्या श्रेण्या अधिक 'निरपेक्ष' व लेखनाधिष्टीत असतील असे वाटते. Smile

बाकी एखादे लेखन 'चांगले' आहे की नाहि हे ठरवणे (कंबहुना त्यासाठी निकष ठरवणे) अतिशय कठीण काम आहे असे वाटते. प्रत्येक लिखाणाची स्वतंत्र चव असते तसे ते आवडणार्‍या-नावडणार्‍यांची स्वतंत्र रुची! तेचा चांगले वाईट न ठरवा आवडते-नावडते ठरवुन सापेक्ष रहाणे मला अधिक पसंत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गुणवत्ता आणि लोकाभिमुखता यांतलं द्वंद्वात्मक द्वैत फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी दिसतं.

अनेक ठिकाणी हीच गोष्ट दिसून येत असली तरी गुणवान लोकांना बहुजनांपर्यंत पोहोचता येईल का असा प्रश्न अनेकदा पडतो. सुबोध कविता अनेकदा बाळबोध वाटतात आणि रोचक वाटणार्‍या कविता दुर्बोध. याचा संबंध शालेय शिक्षणाशी आणि शिकताना लावलेल्या/लागलेल्या सवयींशी लावावा का? इंग्लिश भाषा मजेशीर आहे हे माझ्या लक्षात आलं तोपर्यंत माझ्या शिक्षणक्रमातून भाषाविषय मी पूर्णतः वगळले होते. संस्कृत सुभाषितांचे अर्थ लावण्यासाठी शब्दांचा क्रम बदलून घ्यावा लागतो हे थोडं-बहुत शिकवलं जातं; पण कवितांचा आस्वाद घेणं शिकायचं असेल तर मुळात ते शिकण्याची आवड पाहिजे आणि काही प्रमाणात मार्गदर्शन. ललित साहित्याची मुळात फार आवड निर्माण न झालेल्या माझ्यासारख्या बहुसंख्य जनतेचं लक्ष चांगल्या, दर्जेदार साहित्याकडे ओढून घ्यायचं असेल तर ते सोपं नसलं तरी अशक्य नाही.
स्वतःच्या उदाहरणावरून, आंतरजाल हे माध्यम या गोष्टीत काही कन्स्ट्रक्टीव्ह करू शकतं असं वाटतं.

इतर गोष्टींमधे डोकं गुंतलेलं असताना एखादं सोपं पुस्तक वाचावं असं अधूनमधून वाटतं; पण साधारणतः मजा येते ती डोक्याला खुराक देणारी पुस्तकं वाचतानाच. अशा पुस्तकांबद्दल स्वतःची मतं मांडणं मला अनेकदा जमत नाहीच. पण लेखात तुलना केल्याप्रमाणे असं आंतरजालावर लिखाण दिसलं की प्रतिसादांना श्रेणी देणं मला सोपं वाटतं. "हे उद्याचे महान कवी असतील नसतील, पण त्यांना काय म्हणायचं आहे हे समजून घेण्यासाठी थोडे कष्ट घेणं स्वत:ला सुजाण म्हणवणाऱ्यांनी तरी गैरलागू मानू नये." हे मान्य आहे पण त्याबरोबरच कविता समजून घेताना चार सुजाण लोकांची मदत मिळते हा मला आंतरजालाचा फायदा वाटतो.

अशोक पाटील यांनी प्रतिसादात नोबेल पुरस्काराचं उदाहरण दिलं आहे. नोबेल मानकर्‍यांच्या निवडीत निदान दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत ज्यूद्वेष आणि स्त्रीद्वेष दिसत होता. या रोषाला बळी पडलेलं मोठं उदाहरण म्हणजे लिझ माईट्नर. याउलट आजच्या इस्रायलमधल्या भौतिकशास्त्राच्या अनेक लॅब्जमधे नोबेल मानकरी अगदी सहज आढळून येतात असं इस्रायलमधे संशोधन करून आलेल्या मैत्रिणीकडून ऐकून आहे; तिचं त्याबद्दलचं मत "त्यातही लॉबिंग आहेच!" अशा प्रकारचं होतं. गांधीजींना शांततेचा नोबेल पुरस्कार न मिळणं आणि १९४८ सालचा हा पुरस्कार जाहीर न होणं, १९९४ सालचा हा पुरस्कार यासर अराफात, यित्झाक राबिन आणि शिमॉन पेरेस यांना, २००९ सालचा बराक ओबामा यांना मिळावा याबद्दलही अनेकदा कुशंका येतातच. एक वेगळंच उदाहरण आठवलं म्हणजे १९९४ सालच्या मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड आणि मिस अर्थ, तिघी भारतीय असणं; एकूणच त्या दशकात भारतीय मॉडेल्सनी हे तीन किताब जिंकणं आणि सौंदर्यप्रसाधनं बनवणार्‍या मोठ्या कंपन्यांना भारतीय मार्केट खुलं होणं याबद्दलही अनेकदा चर्चा ऐकू येतात.

राजेशच्या प्रतिसादातलं शेवटचं वाक्य आवडलं. इतर दोन उदाहरणं आणि लेखनाबद्दलचं उदाहरण यात मला किंचित फरक वाटतो. वाचनीय असेल ते दर्जेदार असेलच असं नाही, पण दर्जाची व्याख्या सापेक्ष असली तरीही दर्जेदार लेखन बहुतांश वेळा वाचनीय असतंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकेकाळी किंवा अजूनही करमणूकप्रधान लिहीणार्‍यांना हीन लेखलं जायचं. Chris Mullin आणि Susan Hill यांची मतं वाचून त्यामुळे गंमत वाटली. एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं काहीतरी.
आपल्याकडेही अत्रे आणि पुलंनी विद्वज्जड लोकांची बर्‍यापैकी खेचलेली आहे आणि उलटंही झालं असल्यास कल्पना नाही कारण मी करमणूकप्रधान लेखनच वाचलेले आहे.
तरीही लेखात मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे. दुर्बोध म्हणून लगेच टाकून देणे हे योग्य नाही हे अगदी बरोबर आहे आणि दुर्बोध असलेलंच दर्जेदार आहे असं म्हणणं योग्य नाही हे ही बरोबर आहे.
दुर्दैवाने, दोन्ही प्रकारची बरीच मंडळी दिसतात.
एखादं पुस्तक वाचताना "छ्या, बंडल आहे", असं म्हणून फेकता येतं पण जेव्हा आपल्या मतावर जर अनेक लोक ते पुस्तक वाचायचं की नाही हे ठरवणार असतील तर नक्कीच ते पूर्ण वाचण्याचे आणि यथामती समजून घेण्याचे प्रयत्न केलेच पाहिजेत.
तेच धाग्यांना श्रेणी देण्याबाबतही लागू होते.
त्यामुळे धाग्यांच्या श्रेणीच्या बाबतीत जबाबदारीने वागण्याची आवश्यकता पटलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमका विषय मान्डलाय! Smile आवडले.

>>>>>एखादी गोष्ट समजायला कठीण आहे किंवा अनाकलनीय वाटते आहे म्हणून लोक सटासट प्रतिसाद जसे देत सुटले तसेच वाईट श्रेणी देत सुटतील. कदाचित मग इतरांपेक्षा ज्यांचं लिखाण थोडं वेगळं आहे असे लेखक हिरमुसून निघून जातील. <<<<
हा धोका संभवतो, पण समुहाच्या शहाणपणावर विसंबुन बघायला काय हरकत आहे? भले भारतीय लोकशाहीतील एकुण मतदारान्पैकी (इथे श्रेणी देऊ शकणारे असे समजा) पन्नास पेक्षा जास्त टक्के, मतदानाला बाहेरच पडत नाहीत, उरले ते एकतर उदासीन अस्तात्/विखुरलेले अस्तात वा एकान्गी प्रलोभनाद्वारे कार्यरत होतात. भारतीय लोकशाहीतील मतदारान्चे हेच चित्र श्रेणी व्यवस्थेमधे दिसल्यास मला नवल वाटणार नाही, मात्र एकदा काय तो वर्षसहामहिने श्रेणी व्यवस्थेचा प्रयोग होऊनच जाउदे, म्हणजे काय सुधारणा करायला हव्यात ते कळेल.

अवांतरः
>>>>(इतरांनी चांगलं म्हटल्यानं न सुखावणारा लेखक आणि वाईट म्हटल्यानं न हिरमुसणारा लेखक विरळाच असतो.) <<<<
हे बरोबर आहे. पण याचबरोबर अपवादात्मकरित्या माझ्यासारखे काही "कोडगे" देखिल अस्तात, त्यान्ना कशाचाच काही फरक पडत नाही, पडून देत नाहीत. Blum 3
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुकर पारितोषिक आणि त्याच्या आजूबाजूच्या गोंधळाची माहिती रोचक वाटली.

एकूण मान्यवर लेखकांनी घेतलेल्या आक्षेपावरुन घोळ आहे हे खरे असावे असे वाटते, अर्थात त्यांची देखिल ही फक्त मते असू शकतात, तरी घोळ असण्याची शक्यता दाट आहे.

तुम्ही थेट एखादे मत व्यक्त न करता ज्या पद्धतीने लेख लिहीला आहे हे फार छान आणि रोचक वाटले (सकारात्मकरित्या)

वाचनीयता हा दर्जाचा निकष असावा म्हणजे काय?

साहित्यिक दर्जाच्या बाबतीत सापेक्षतावाद (Relativism; relativity नव्हे) किती टोकाला नेता येतो?

दोन्ही प्रश्नांची उत्तरे एकत्र देण्याचा प्रयत्न करतो, वाचनीयता ही सापेक्ष "असू शकते"/असते असे माझे वैयक्तिक मत आहे, ही सापेक्षता समूह-सापेक्षता आहे, वैचारीक-प्रगल्भता जशी असेल त्याप्रमाणे वाचनीयता असू शकेल, आणि वाचनीयतेनुसार तो समूह दर्जा ठरविणार, पण इथे बुकरच्या केस मधे निरपेक्ष निवड असणे अपेक्षित आहे, जे सर्व्-साधारणपणे वाचनिय म्हणून गणले जाते अशा साहित्य-प्रकारांच्या पलिकडे जाउन जे नविन अणि प्रगल्भ समूहाने वाचनिय म्हणून दखल घेतलेले साहित्य"ही" विचारात घेतले पाहिजे, अन्यथा वर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बेस्ट सेलर आणि बुकर ह्यात फरक तो काय राहिला. निखळ दर्जा एकार्थी सापेक्ष असू शकतो आणि ते गैर असेलच असे नाही, हे थोडेफार चित्रांसारखे आहे, रेखाचित्रे, जलरंगीत, तैलरंगीत,अब्स्ट्रक्ट असे अनेक प्रकार असले तरी "एकच" असा निखळ दर्जा ठरविणे बायस्ड वाट्ते, किंवा निर्गुण सगुणापेक्षा कायमच श्रेष्ठ आहे असे म्हणण्यासारखे आहे.

हे इथं का मांडावंसं वाटलं?

Smile हे मात्र बुकरच्या मागून वार करत आहात की काय? (सडेतोड प्रतिक्रिया देउन लोकांना नाउमेद न करता, समुपदेशन करत आहात असे वाटले - ह्.घ्या.)

सहमत आहे.

कदाचित मग इतरांपेक्षा ज्यांचं लिखाण थोडं वेगळं आहे असे लेखक हिरमुसून निघून जातील.

हे अचिव्ह करणे जिकरीचे वाटते, दुर्बोध असेल तर ते हिणावले जाण्याची शक्यता आहेच (सगळ्याच प्रकारचे सदस्य असतात), त्यापेक्षा मी एक सुचना करतो - इथे मान्यताप्राप्त, उत्तम जाणकार लोकांचा एक समूह बनवावा (उदा. चिंज, धनंजय, घासकडवी, रोचना, प्रियाली व इतरही जाणकार), ह्या समुहाने प्रत्येक धाग्याला रेटिंग द्यावे, शक्य असल्यास रसग्रहण करावे, पण हे होत असताना तमा"आम" जनतेला देखिल सर्वाधिकार द्यावेत जेणेकरुन दर्दी वाचक समूहाच्या रेटिंगप्रमाणे चांगल्या लेखानाचा अस्वाद घेउ शकेल व उर्वरित जनतेला (अभिव्यक्ती?)स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखे वाटणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरीही ‘सुमार थ्रिलरलेखिका झाली म्हणून काय झालं, तिला साहित्यिक जाण असू शकते’ असा संशयाचा फायदा काही उदारमतवादी लोक तिला देताहेत

असाच फायदा आम्ही आमचे आवडते लेखक 'मस्ताराम' ह्यांना कायमच देत आलो आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

>>बहुतांश वाचकांचा वाचन हा फुलटाइम बिझनेस नाही. वाचन हा विरंगुळा असेल तर मला* महान वाचक व्हावेसे वाटणार नाही आणि एखाद्याने मला मारून मुटकून महान वाचक बनवलेलेही आवडणार नाही.

क्रिटिक्स आणि मासेस यांच्या आवडीनिवडी बर्‍याचदा वेगळ्या असतात. दोघांना एकमेकांचं कातडं ओढून घ्यायची सक्ती केलेली आवडणार नाही असे वाटते.<<

सक्ती नसावीच, पण क्रिटिक्स आणि मासेस या दोहोंच्यामधे कुठेतरी असणार्‍या वाचकांची संख्या दुर्लक्ष करण्याजोगी असते असं वाटत नाही. माझ्या लेखातल्या या वाक्यात मी हेच म्हटलं आहे:

>>ज्यांना दरवर्षी प्रकाशित होणारी सगळी पुस्तकं वाचणं शक्य नसतं (यात बहुसंख्य लोक येतात) पण ज्यांना निव्वळ रंजनापेक्षा काहीतरी वेगळं आणि दर्जेदार वाचण्याची इच्छा असते त्यांनी काय करावं? (असे लोक बहुसंख्य नसले तरी अगदीच अल्पसंख्य नसतात असं वाटतं.)<<

बुकरविषयी झालेल्या गदारोळानिमित्तानं विविध ठिकाणी ज्या शेकडो प्रतिक्रिया आल्या त्यातही हे स्पष्ट दिसत होतं. उदाहरणादाखल सूझन हिलच्या ट्वीट्सबद्दलची खुद्द बुकर फोरमवरची ही प्रतिक्रिया पाहा:

Her tweets actually had a really negative impact on how I saw the list, it all seemed very smug and self-congratulatory and 'ooh aren't we daring with our populist list' and honestly I didn't think it was daring at all

किंवा शॉर्टलिस्टमधल्या पुस्तकांविषयीची तिथलीच अजून एक प्रतिक्रिया:

I have read all of the books except the Barnes, yet a few days ago I could not even remember the titles when warning a friend to 'stay well away'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

साहित्यिक मूल्य ठरवताना लेखकाचे प्रतिमामूल्यही हिशोबात येते. नावडतीचे मीठ अळणी ही म्हण त्यातुनच आली असावी. सापेक्षतेचा मुद्दा किती टोकाला नेता येतो हे पुन्हा सापेक्षच आहे. गाढवाला गुळाची चव काय? हे म्हणताना त्यात चवी पेक्षा उपहास जास्त दिसतो. आपण स्वतः गाढव झाल्याशिवाय कशी काय ती चव आपल्याला कळणार? चव ही पुन्हा विकसीत होणारी बाब आहे. सुरुवातील श्रावणीतल्या गोमूत्रासारखी लागणारी बियर मला नंतर अमृतासमान वाटायला लागली. नेहमीचे आवडते उदाहरण म्हणजे बोंबलाच्या वासाने कुणाला मळमळते तर कुणाचा जठराग्नी कावतो. यात संस्कार सापेक्षता आली. तसे साहित्याचे झालेले 'आकलन' कि ज्यावरुन तो साहित्याचे मुल्यमापन करणार आहे ते प्रत्येकाचे वेगवेगळे असणार आहे. वाचकांच्या समुहगतीतुन देखील आपला प्रतिसाद बदलत असतो. एखादे वेळी आपण चर्चेला अमुक एक प्रतिसाद द्यायचा असे ठरवतो पण वाचकांच्या/ प्रतिसादांच्या समुहगती मुळे चर्चा वेगळ्याच वळणावर येउन ठेपते. मग आपण अमुक ऐवजी तमुक प्रतिसाद देतो. कधी प्रतिसाद देतेवेळी असलेले मानसिक आरोग्य / भावनिक हिंदोळा यावरही प्रतिसादाची निर्मिती होते.
एखादा खायचा अज्ञात पदार्थ हा चवीला गोड खारट आंबट तुरट कडू तिखट इ चवींच्या श्रेणीला अगोदरच ठेवला तर मानसिक तयारी होते.
अवांतर एखाद्याला कडू लागणारा पदार्थ सामान्य परिस्थितीत दुसर्‍याला गोड लागत असेल असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अवांतरः
ह्या धाग्याचं टायटल वाचून व त्या बुकरबिकरमधे मला फारसा रस नसल्याने उघडूनही पाहिला नव्हता. पण एका व्यनि च्या निमित्ताने उघडून, वाचून झाल्यावर हे नवे शिकलो, की कोणत्या टायटल खाली काय इन्टरेस्टिंग मसाला या साईटीवर येईल हे काही सांगता येत नाही. (तसंच ते द्व्यर्थी गाण्याच्या टायटल अन कंटेंट चं झालं होतं. पण उलट. टायटल इंटरेस्टिंग अन आत भलतंच काहीतरी.)

***

जर लोकांच्या 'खर्‍या' मतांचा अंदाज घ्यायचा असेल तर ब्लाईंड लेखन सुरु केले पाहिजे. जसे लेखन प्रसिद्ध झाल्यावर पहिले काही दिवस त्याच्या लेखकाचे नाव लपवून ठेवावे. (तसेच प्रतिसादकांचेही) या काळात येणारे प्रतिसाद व त्याच्या श्रेण्या अधिक 'निरपेक्ष' व लेखनाधिष्टीत असतील असे वाटते. Smile

या मतशी १००% सहमत.

दर्जेदार लेखन निर्माण व्हावे हा कथित उद्देश (डिक्लेअर्ड एम) असला, तरी कोणती ही कला, खर्‍या अर्थाने दर्जेदार, अशी ठरवून निर्माण करता येत नाही. ती 'होते' नाही तर फिल्म इन्स्टीट्यूटीतून अत्तापर्यंत १००एक तरी दिग्गज + लोकप्रिय नट-नट्या मिळाल्या असत्या? शेवटी लेखनाचा दर्जा वाचक मनात ठरवतो. अन जसजसा काळ जातो अन अधिकाधिक वाचक ते वाचतात, तसतसे कसाला उतरून उत्तम काय ते सर्वमान्य होत असते.

वाचत असतांना, लेखक अन वाचक यात १:१ असा डायरेक्ट संवाद असतो. लेखकाच्या मनातलं मंथन वाचक आपल्या डोळ्यांनी वाचत असतो, तेंव्हाच 'अंतःचक्षूंनी' पहात/ऐकत/अनुभवत असतो, अन त्याबद्दल हा मनातल्या मनात त्याच्याशी बोलतही असतो. किंबहुना स्वता:स त्या लेखातील पात्राच्या जागी कल्पून थोडा वेळ 'जगत'ही असतो. हे जगणे ज्या लिखाणातून अनुभवायला येते, ते उत्तम लिखाण. असे मला वाटते. ते काही इथे पॉप्युलर मतदानाने ठरणार/ठरविता येणार नाही. कारण आपली सँपल साईझ (वाचक संख्या) फाआआआरच लिमिटेड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लेख आणि त्यावरची चर्चा आवडली.
सामान्य वाचक = एक डिपार्टमेंटल स्टोअर मधला ग्राहक. एकाच दिवशी एकाच दुकानातून - किंवा शक्य असेल तर लायब्ररीतून - माणसं दस्त्येव्हस्की सुद्धा उचलतील आणि सहज समोर दिसलं म्हणून टॉम क्लान्सीसुद्धा. शिवाय वाचनासंदर्भात आलटून पालटून एकेका पुस्तकाबरोबर "शय्यासोबत" होते हे आणखी वेगळंच. मथितार्थ असा की, बुकर किंवा तत्सम व्यासपीठांच्याबाबत चर्चा चालू देत - आणि ती चालणे आरोग्यकारकच आहे - परंतु सामान्य ग्राहक बर्‍याचदा सरमिसळयुक्त निवड करताना दिसतो. रंजन आणि प्रगल्भता , प्रबोधन आणि टाईमपास एकाच वेळी वसतीस असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

काहीसा असहमत आहे श्री.मुक्तसुनीत यांच्या या निरिक्षणाबाबत.

इतरांचे जाऊ दे. मी वैयक्तिक पातळीवर आजदेखील स्वतःला सामान्य वाचकच समजतो. पण एक अभिजात कलाकृती म्हणून 'ब्रदर्स कारामाझोव्ह' घेणे आवश्यक असल्याने ती घेतली आणि अजून खिसा गरम वाटतो म्हणून शेजारच्या काऊंटरवरील 'सेव्हन मिनिट्स' घेणार नाही. याचा अर्थ मी वॅलेसचे रंजनमूल्य कमी मानतो असे नाही. तोही मला एका वेगळ्या वाचन-आनंदासाठी आवडतोच. फक्त एकाच दिवशी एकाच वेळे अशा दोन विभिन्न प्रकृतीच्या पुस्तकांची (माझ्याकडून तरी) खरेदी होणार नाही.

[किशोरी आमोणकर यांच्यासमवेत प्रभा अत्रे यांच्या सीडीची खरेदी करताना कुणाच्या भुवया वक्र होणार नाहीत. पण किशोरीताईंच्या सोबतीला, आहेत पैसे म्हणून जर सलमान हिट्स सीडी घेतली तर आलुरकर बिल करताना माझ्याकडे एक विचित्र नजर टाकतीलच.]

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यातील मला कळीचे वाटलेले वाक्य उद्धृत करतो :

निव्वळ रंजक किंवा चटपटीत वाचनासाठी बेस्टसेलर्सच्या याद्या असतातच. मग पुन्हा अशा प्रतिष्ठित आणि बहुचर्चित नामांकनांसाठी असा चटपटीतपणाचा आग्रह धरणं म्हणजे दर्जेदार वाचनासाठी अशा नामांकनांवर अवलंबून असणाऱ्या वाचकांचा एक प्रकारे विश्वासघात होत नाही का?

जर नामांकनासाठी (परीक्षकांकडून) चटपटीतपणाचा जाहीर आग्रह असेल, तर वाचकांचा विश्वासघात नाही. निव्वळ चटपटीतपणा नको असलेल्या वाचकांनी त्या नामांकनाला निव्वळ-चटपटीतपेक्षा-वेगळ्या-दर्जाचा निकष मानले, तर ती त्या वाचकाची चूक होय. चहा-परीक्षकांनी दिलेल्या बक्षिसाने कॉफी-गिर्‍हाइकाचा विश्वासघात होतो काय? जर बक्षीस देताना "चहा-कॉफी दोहोंकरिता बक्षीस" असी खोटी घोषणा केली असेल, तर विश्वासघात होतो. पण "चहाकरिता बक्षीस" अशी स्पष्ट घोषणा केली असेल, तर तिथून कॉफी मिळण्याची आशा करणार्‍याने स्वतःची चूक मान्य केली पाहिजे.

तरी माझ्याबाजूने "कौल"वजा काही उत्तरे देतो.

वाचनीयता हा दर्जाचा निकष असावा म्हणजे काय?

काही प्रमाणात.

साहित्यिक दर्जाच्या बाबतीत सापेक्षतावाद (Relativism; relativity नव्हे) किती टोकाला नेता येतो?

मला काही पुस्तके आवडतात/नावडतात, आणि ती उस्तके माझ्या मित्रांनाही आवडावीत/नावडावीत, अशा प्रकारचा संवाद मी त्यांच्याशी साधतो. त्या संवादांमध्ये आवडण्या-नावडण्याबाबत कुठलीशी चौकट असते. ती एकतर त्या-त्या मित्राशी दीर्घ ओळखीमुळे ठरलेली असते, किंवा त्या संवादात थोडीशी थेट स्पष्टकरावी लागते. त्या संवादात त्या चौकटीला सापेक्षतावाद छेदू शकत नाही.

थोड्या वेगळ्या प्रकारच्या कवितांना इथे आलेले अनेक 'दुर्बोध! दुर्बोध!!' प्रतिसाद किंवा काही मला दर्जेदार वाटलेल्या धाग्यांना न आलेले किंवा किंचितच आलेले कोमट प्रतिसाद पाहून मला इथे या मुद्द्याची चर्चा व्हावी असं वाटलं.

ही चर्चा अर्थातच या संकेतस्थळावर सुसंदर्भ आहे आणि सुयोग्य आहे. संकेतस्थळाच्या मांडणीनुसार येथील "परीक्षक", "परीक्षकांचे निकष" वगैरे ठरतील. ते निकष मॅन-बुकर परीक्षक रिमिंगटन, हिल वगैरे यांच्यासारखे असतील किंवा नसतील.

एखादी गोष्ट समजायला कठीण आहे किंवा अनाकलनीय वाटते आहे म्हणून लोक सटासट प्रतिसाद जसे देत सुटले तसेच वाईट श्रेणी देत सुटतील. कदाचित मग इतरांपेक्षा ज्यांचं लिखाण थोडं वेगळं आहे असे लेखक हिरमुसून निघून जातील.

चांगला मुद्दा आहे. पण "निव्वळ-चटपटीत की वेगळे काही" या मॅन-बुकर चर्चेशी तितकासा संबंधित नाही. मुद्दामून उकरून-उकरून संबंध लावल्यास असा लावूया : War and Peace, The Waves, Ulysses या पुस्तकांचे लेखक हिरमुसले होते का? त्यांना सटासट वाईट श्रेणी मिळत होती का? सटासट वाईट श्रेणी मिळू शकणार्‍या ठिकाणी ते आपली पुस्तके पुढेपुढे करीत होते का? वगैरे. अशा पुस्तकांना चाहाणार्‍या थोड्या रसिकांपर्यंत पुस्तके पोचवून त्याची पोच हे लेखक मिळवू शकले का? अनेकांकडून उपेक्षा पण काहींकडून प्रशंसा यांचे मिश्रण या लेखकांनी भावनिक रीत्या कसे हाताळले? याकरिता त्यांना प्रकाशनसंस्थेकडून मदत मिळाली, आणि ती मदत महत्त्वाची होती का?
जर या संकेतस्थळाला War and Peace, The Waves, Ulysses सारखी साहित्यनिर्मिती प्रकाशित करण्याचे ठिकाण व्हायचे असेल, तर तशा प्रकारच्या विवेचनातून काही मार्गदर्शन मिळू शकेल. ज्या प्रकारच्या प्रकाशन-समीक्षण वातावरणात असे लेखक हुरूप मिळवत, तशा प्रकारचे प्रकाशन-समीक्षण वातावरण या नव्या आंतरजालीय माध्यमात निर्माण होऊ शकते काय? असा विचार क्रियाशील होऊ शकतो.*

"बहुसंख्यांची आवड विरुद्ध थोड्या रसिकांचा आस्वाद : एक टक्कर" या प्रकारचे विश्लेषण मला तितकेसे समजत नाही. म्हणजे त्यातून काय निष्पन्न होणार हे समजत नाही.
- - -
*चिंतातुर जंतु हे अशा प्रकारचा क्रियाशील विचार खचितच करतात. स्लॅशडॉट संकेतस्थळावर सुरुवातीला सदस्याची समानता असली, तरी पुढे प्रत्येक सदस्याला कर्म/पुण्य मिळवून प्रतिष्ठित होता येते, हे त्यांनी अन्यत्र चांगले समजावून सांगितलेले आहे. असा प्रयोग यशस्वी झाला, तर समानता आणि अभिजातता यांच्यातला विरोध केवळ आभास होऊन राहील. त्यांच्या या क्रियाशील विचारांचा मी चाहता आहे. म्हणूनच हे विस्कळित विश्लेषण मला पटलेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>जर नामांकनासाठी (परीक्षकांकडून) चटपटीतपणाचा जाहीर आग्रह असेल, तर वाचकांचा विश्वासघात नाही. निव्वळ चटपटीतपणा नको असलेल्या वाचकांनी त्या नामांकनाला निव्वळ-चटपटीतपेक्षा-वेगळ्या-दर्जाचा निकष मानले, तर ती त्या वाचकाची चूक होय. <<

सुटा पाहता हा मुद्दा योग्यच वाटतो, पण बुकरच्या चौकटीत पाहता मी ज्याला अपेक्षाभंग म्हणतो आहे ते थोडंसं वेगळं आहे. आतापर्यंतच्या बुकरच्या इतिहासानुसार दरवर्षीच्या बुकर-नामांकित पुस्तकांच्या यादीकडून वाचकांच्या काही अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत. परीक्षक दरवर्षी बदलत असतात, पण तरीही यादीत दर्जाचं सातत्य राखलं जावं अशी या वाचकांची अपेक्षा अनाठायी म्हणता येत नाही, कारण आतापर्यंतच्या याद्यांमुळे पडलेल्या पायंड्याचा त्याला आधार आहे. या वर्षीच्या परीक्षकांनी चटपटीतपणाला गैरवाजवी महत्त्व दिलं, अन त्यामुळे यादी पाहून भ्रमनिरास झाला अशी तक्रार अनेक वाचकांनी केलेली दिसते. या पार्श्वभूमीवर हा अपेक्षाभंग होता असं म्हणता येईल का?

>>"बहुसंख्यांची आवड विरुद्ध थोड्या रसिकांचा आस्वाद : एक टक्कर" या प्रकारचे विश्लेषण मला तितकेसे समजत नाही. म्हणजे त्यातून काय निष्पन्न होणार हे समजत नाही.<<

ही टक्कर आहे असं मानू नये असं मला वाटतं. 'द्वंद्वात्मक द्वैत' असं म्हणताना मला काहीसं असं अभिप्रेत होतं:
बुकर फोरमसारख्या लोकाभिमुख ठिकाणी वाचकांच्या ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या त्यात एक गंमत दिसते. 'वाचनीयतेचे आमचे निकष कसे लोकाभिमुख (किंवा लोकानुनयी - पॉप्युलिस्ट) आहेत' असं सांगत एका बाजूला परीक्षक आपल्या धोरणांचं समर्थन करत होते तर दुसरीकडे (उदा: बुकर फोरमवर किंवा गार्डियनमधल्या प्रतिसादांमध्ये) 'बुकर नामांकनयादी पाहून आमचा भ्रमनिरास झाला' असं अनेक लोक सांगत होते. म्हणजे इथे बहुसंख्यांचं प्रातिनिधित्व ज्या मोजक्यांकडे होतं त्यांना लोक त्यांच्याकडून काय अपेक्षा करताहेत हे समजून घेण्यात अपयश येत होतं असं वाटत होतं. अशा वेळी साहित्यिक पुरवण्यांमधून समीक्षा करणारे मोजके थोडेदेखील या प्रतिनिधींवर टीका करत होते. याला निखळ टक्कर म्हणण्यापेक्षा निकोप लोकशाहीमध्ये जी घुसळण होणं मला अपेक्षित असतं तसंच काहीसं हे होतं. एखाद्या वर्षी परीक्षकांच्या निवडीबद्दल शंका उपस्थित होऊ शकतात आणि त्यातून काहीशी संघर्षपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली दिसू शकते. पण त्यातून जे सद्य काळातल्या इंग्रजी वाचकांचं चित्र (त्साइटगाइस्ट अशा अर्थानं) उभं राहिलं ते लोकशाहीवरचा माझा विश्वास दृढ करणारं होतं.

>>ज्या प्रकारच्या प्रकाशन-समीक्षण वातावरणात असे लेखक हुरूप मिळवत, तशा प्रकारचे प्रकाशन-समीक्षण वातावरण या नव्या आंतरजालीय माध्यमात निर्माण होऊ शकते काय? असा विचार क्रियाशील होऊ शकतो.* <<

*चिंतातुर जंतु हे अशा प्रकारचा क्रियाशील विचार खचितच करतात. स्लॅशडॉट संकेतस्थळावर सुरुवातीला सदस्याची समानता असली, तरी पुढे प्रत्येक सदस्याला कर्म/पुण्य मिळवून प्रतिष्ठित होता येते, हे त्यांनी अन्यत्र चांगले समजावून सांगितलेले आहे. असा प्रयोग यशस्वी झाला, तर समानता आणि अभिजातता यांच्यातला विरोध केवळ आभास होऊन राहील. त्यांच्या या क्रियाशील विचारांचा मी चाहता आहे. म्हणूनच हे विस्कळित विश्लेषण मला पटलेले नाही.

असा प्रयोग यशस्वी करण्यासाठी मदत म्हणूनच हे स्फुट लिहिण्याचा माझा हेतू होता. आताही ८०च्या आसपास श्रेणीदाते आहेत आणि अधिकाधिक सदस्य श्रेणीदाते व्हावेत असंच मला वाटतं. त्यासाठी सर्वसामान्य सदस्याला काय करावं लागेल (म्हणजे दर्जेदार प्रतिसाद/धागे लिहिणं आणि त्याद्वारे कर्म वाढवणं, वगैरे) याची माहिती वेगवेगळ्या धाग्यांवर दिली जाते आहेच. हे एक प्रकारचं सक्षमीकरण (एम्पॉवरमेंट) म्हणता येईल. त्यापलीकडे जाऊन, सदस्यांना उपलब्ध झालेल्या आणि होणार्‍या सुविधांचा त्यांना अधिक जबाबदारीनं वापर करता यावा यासाठी त्यांना कसं सक्षम करता येईल असा प्रश्न माझ्या मनात होता/आहे. त्यांच्या मनात वरचे प्रश्न उपस्थित व्हावेत, त्याची उत्तरं त्यांनी शोधावीत यासाठी त्यांना विचारप्रवृत्त करणं हा माझा (सकारात्मक) उद्देश होता. मग वर उल्लेख केलेल्या निकोप लोकशाहीच्या दिशेनं जायला मदत होईल अशी काहीशी आशा त्यामागे होती. लिखाणात विस्कळितपणा जाणवत असेल, किंवा त्यात लावलेला संबंध बादरायण वाटला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो अन अजूनही चर्चा करता येईल असं म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||