हिची, तिची अवस्था

'ही' भल्या पहाटे पाच वाजता उठते. मुलांचं करून तिला ऑफिस गाठायचं असतं. नाश्त्याला मुलीला पॅन केक हवा तर मुलाला ऑम्लेट. 'ही' पहाटे उठून एका बाजूला कांदा कापत, दुसर्‍या बाजूला पॅनकेकचं मिश्रण घोळवत घड्याळाकडे नजर टाकून उभी असते. दोघांनी एकच नाश्ता करा सांगितलं तर सकाळी उठून भोकाड पसरतो तिचा लहानगा. जे तिला हवं असतं ते हमखास याला नको असतं. सकाळी सकाळी नको वाटतं त्याचं रडणं आणि त्याची समजूत घालत बसणं. वेळ असतो कुठे तेवढा?

'ही'चा नवरा मुलांना उठवून तयार करत असतो तेव्हा 'ही' स्वतःची तयारी करता करता मुलांचे डबे भरत असते. मुलांना शाळेत सोडलं की 'ही'सुद्धा ऑफिसच्या दिशेने सुसाट निघते. गडबडीत 'ही'चा ब्रेकफास्ट कधीच होत नाही.

रस्त्यात ट्रॅफिक जॅम नेहमीचाच. बुडाखाली गाडी असली म्हणून वेळेत पोहोचणं शक्य आहे असे थोडेच असते? पण मग गाडीत कोंडलेली हीच काय ती वेळ 'हिची' स्वतःची असते. अचानक आज तिला १५-२० वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवतो. हिची नवी पहिली नोकरी आणि वरळीला हिच्या ऑफिसच्या फूटपाथवर बसणारी "ती". पथारी टाकून काहीबाही प्लास्टीकचे कंगवे, फण्या, आरसे विकायला बसलेली. बाजूला तिची ३-४ वर्षांची पोरगी खेळत असायची आणि मांडीत ६-८ महिन्यांचं दुसरं पोर. मध्येच कधीतरी गिर्‍हाईक आलं तर ते बाळ, त्या मुलीच्या मांडीत जाई. तिची मांडी ती केवढी! ते बाळ अर्धवट जमिनीला टेकलेलं. धुळीने माखलेल्या मुठी चोखत असायचं. ते विरलेले कपडे, पिंजारलेले केस, वाहणारी नाकं; पोरांचा अगदी अवतार असे.पोरांच्या नाकातून वाहणारा शेंबूड पुसायलाही आईला उसंत नसायची. उन्हा-तान्हात सुकायला घातल्यागत दिवसभर ती पोरं फुटपाथवर बसलेली असत. राग यायचा तेव्हा. 'सांभाळायला जमत नसेल तर कशाला जन्माला घालतात हे लोक ही पोरं?' असं वाटून जायचं. कधीतरी, रडणार्‍या मुलीला वसावसा ओरडताना आणि फटके देताना पाहिलं की जाऊन 'तिलाच' समज द्यावी असं वाटायचं.

पण मग कधीतरी समोरच्या चहावाल्याकडनं घेतलेला चहा फुंकून पोरीला देणं, दुपारच्या वेळी भाकरी पावाचा तुकडा भरवणं आणि भर रस्त्यावर पदराच्या आडोशाखाली बाळाला घेणं... तिच्यातल्या "आई"ची जाणीव करून द्यायचं. कदाचित इतरवेळेस, ज्यांच्यासाठी कमवतो त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ होत नसावा तिला. प्रत्येकाची अडचण असते. मागून हल्का हॉर्न ऐकू येतो. ही भानावर येते. ट्रॅफिक सुटलं आहे.

इतकं करूनही ऑफिस गाठेपर्यंत उशीर होतो. नेहमीचंच आहे. रोज फक्त कारणं बदलतात. मस्टर वगैरेची भानगड नसली तरी आजूबाजूच्यांचे डोळे बरंच काही बोलून जातात. परवा तर मिटींगमध्ये उशीर झाला तेव्हा बॉसने 'पुढल्यावेळी तुमच्याकडून सर्वप्रथम अपडेट्स घेणार हं!' असा टोमणा मारला.

ऑफिसमध्ये पोहोचल्या पोहोचल्या अर्ध्या तासात शाळेतून फोन येतो. 'मुलीचं अंग गरम आहे. घरी घेऊन जा.' ती नवर्‍याचा नंबर फिरवते पण तो मिटींगमध्ये आहे. फोन बंद. गेल्या आठवड्यात मुलगा घरी राहिला होता. सडकून ताप भरला होता तेव्हाही ऑफिसला दांडी मारावी लागली होती. नवरा टूरवर बाहेरगावी गेला होता. मुलाला शाळेतून 'पिक-अप' केलं, डॉक्टरकडे नेलं आणि पुढले दोन दिवस घरातून काम केलं. सर्व मिटींग्जना डायल-इन केलं. मुलाला हवं नको ते बघत कामही केलं.

मुलाचं डोकं दुखत होतं, तापाने अंग फणफणलं होतं. पाच वर्षांचा तर आहे. त्याला तू एकट्याने खोलीत झोप सांगितलं तर पटत नाही. आई जवळ लागते. 'ही'चा हात अंगावर ठेवलेला असला की शांत राहतो पण त्याला जवळ घेऊन मिटींगला डायल-इन कसं व्हायचं? खूपच पंचाईत झाली होती. शेवटी टीव्ही लावून दिला, कोंडून घातलं त्याला खोलीत आणि फोन लावला. नजरसारखी खोलीकडे जात होती. टीव्हीच्या आवाजात त्याच्या कण्हण्याचा आणि रडण्याचा आवाज पोहोचला नाही तर?

आणि आता पुन्हा मुलीचं आजारपण. 'ही' बॉससमोर उभी राहते. नजर ओशाळवाणी. 'मी घरी जाऊ का? मुलीला बरं नाहीये.' ही हळूच विचारते.

'आजही?? ३ वाजता क्लायंटबरोबर मिटींग आहे. डायल-इन करणं फारसं बरं दिसत नाही.' बॉस नाराजीने म्हणतो.

'मुलीला ताप आहे. शाळेतून फोन आला होता.' सांगताना 'ही'च्या डोळ्यात पाणी तरळतं.

'ठीक! पण ३ वाजता नक्की मिटींगला डायल-इन हो.' बॉसचा आवाज नरमतो पण डोळ्यातली नाराजी कायम राहते.

'ही' पर्स उचलून तडक बाहेर पडते. डोकं भणभणतंय. हे सर्व चाललं आहे ते पोरांसाठीच. त्यांच्या भविष्यासाठी. एकाच्या पगारात नाही भागत. दोन मुलं. त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलायची ऐपत हवी म्हणून हा खटाटोप. मुलांना चांगलं आयुष्य जगायची सवय झाली आहे. भीती वाटते ती या आयुष्याला त्यांना मुकावं लागलं तर? संसाराची दोन्ही चाकं चालताहेत. एक चाक मोडलं तर? 'ही'ला नोकरी करायलाच हवी. मंदीचे दिवस आहेत. दोघांपैकी कोणाची नोकरी कधी सुटेल याचा नेम नाही. संसाराचं गाडं चालत राहायला हवं.

'ही' मुलीला शाळेतून पिक-अप करते. मुलगी तापाने फणफणली आहे. शाळेतली नर्स विचारते 'मुलीला शाळेत पाठवतानाच ताप असावा. तुम्ही पाठवलीतच कशी?'

'ही'च्याकडे उत्तर नसतं. सकाळच्या घाईत झोपाळलेल्या मुलीला शाळेत पाठवलेलं असतं. ती कुरकुरत होती किंवा तिचं अंग गरम होतं हे पाहिलेलंच नसतं. 'ही' पुन्हा ओशाळवाणी होते.

'ही' मुलीला उचलूनच घरी आणते. घरी आल्यावर तिचा ताप मोजते. १०४ भरतो. मुलीला ग्लानी आल्यासारखीही वाटते आहे. घरात दुसरं कोणी नाही. मुलीला हाका मारते पण ती 'ओ' देत नाही. तिची तब्येत खरंच खूप बिघडली असावी. 'हीला' काय करावं ते क्षणभर कळत नाही. 'ही'ला रडू फुटतं पण रडता येत नाही. सांत्वन करायला कोणी नाही. 'ही' एकटी. या घरात आणि या देशातही. ही नवर्‍याला फोन लावते. तो येतोच म्हणून सांगतो.. तू तिला इमर्जन्सीला ने... तशी 'ही' तडक निघते.

मुलीला उचलते आणि सुसाट गाडी हाकत इमर्जन्सी रूममध्ये पोहोचते. नवराही येतो. दोघे काळजीत. डॉक्टर सांगतात फ्लू आहे. तिला पुढले ४-५ दिवस तरी शाळेत पाठवू नका. 'ही' नवर्‍याकडे बघते. तो नजर फिरवतो. परवा बाहेरगावी जायचं आहे म्हणतो. 'ही' मान हलवते.

आता मुलगी बरी आहे पण डॉक्टरांनी ओव्हरनाइट हॉस्पिटलला राहायला सांगितलं आहे. 'ही'ला आठवतं की मुलगा शाळेतून घरी यायची वेळ झाली.

'ही' पुन्हा सुसाट घरी. नवरा मुलीजवळ थांबतो. 'ही' मुलाला शाळेतून घेऊन येते. त्याला दूध गरम करून देते आणि जरा सोफ्यावर टेकते. सकाळपासून 'ही'च्या पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाही... 'ही'चं डोकं गरगरतं. अचानक नजर घड्याळाकडे जाते. ४ वाजायला आलेले असतात. ३ वाजताची मिटींग चुकलेली असते.... तिला फारसं काही वाटत नाही कारण डोकं आधीच "ज्यांच्यासाठी कमवायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो खरा!" या विचाराने भरून गेलेलं असतं.

------------

हा प्रतिसाद मूळ मनस्वी राजन यांच्या ऐलपैलवरील स्फुटाला दिला होता. मूळ लेख मला आतिशय आवडला होता.

हे प्रतिसादात्मक स्फुट गविंच्या चर्चेवरून आठवलं. मूळ प्रतिसादात एक परिच्छेद वाढवून-कमी करून येथे प्रकाशित करत आहे.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (6 votes)

प्रतिक्रिया

अगदी.. खूप सत्यदर्शी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतरांना दाखवावेसे वाटले.
पण ह्याचा फॉरवर्डेड इमेल होण्याच्या भीतीने टाळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रियालीताई ~

तुम्ही वाचली नसेल तर जरूर वाचा ~ ह.मो.मराठे यांची 'पक्षिणी' ही कथा. तुम्ही कथेत नोंदविलेला भाव आणि परिस्थिती इतक्या दाहकतेने मांडली आहे मराठ्यांनी त्या कथेत की वाचून वाचक बराच काळ सुन्न होऊन बसतो. तुमच्या नायिकेचा नवरा निदान मिळवता तर आहे (त्यामुळे त्याच्याकडे excuses भरपूर); तथापि 'पक्षिणी' चा नवरा 'ले ऑफ' मुळे घरात लोळत आणि "ही" अशीच बॉसचे/सहकार्‍यांचे टोमणे खात, चाळीत भाड्याच्या घरात, तेथील किळसवाणे वातावरण, अंगावर पिण्याचे वय असलेल्या मुलीला एका मावशीकडे 'टाकून' [होय, हाच शब्द त्या परिस्थितीला योग्य आहे] लोकलकडे धावतपळत जीवन जगणे. कडी म्हणजे ती आपली तगमग नवर्‍याला सांगते पण बेकारीमुळे संत्रस्त झालेल्या नवर्‍याची 'ती' भूख त्याच्या दृष्टीने महत्वाची. सदोदित वखवखलेली.

"ज्यांच्यासाठी कमवायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो खरा!" ~ दॅट्स, नो डाऊट, अ बिटर अ‍ॅण्ड नेकेड ट्रुथ.

गॉश्श....तुमच्या नायिकेने त्या पक्षिणीकडे खेचले मला.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. मी 'पक्षिणी' ही कथा वाचलेली नाही पण मिळाली तर अवश्य वाचेन. सुचवणी आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

या स्फुटात मी मुद्दामच व्यवस्थित घर घेतलं आहे. अगदी, "अमेरिकन ड्रीम" पाहणारे सुखवस्तु घर. जिथे नवरा आणि बायको दोघे कुटुंबवत्सलच आहेत आणि तरीही या परिस्थितीतून जावेच लागते. मी बाई असल्याने आणि आईही असल्याने बाईची परिस्थिती मांडू शकते पण मला खात्री आहे की पुरूषाची आणि बापाचीही अशीच अवस्था/ कुतरओढ होत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्यदर्शी असले तरी सरसकटीकरण करता येणार नाही. लेखिका तसे करतेच असे नाही, परंतू इथे'हि'ची कहानी असल्याने 'ह्या'च्याकडे बघण्याचा दृष्टीकोण चुकीचा नसला तरी प्रत्येक ठिकाणी असाच असतो असे वाटत नाही. सुसाट वेगाने धावणार्‍या आपल्या आयुष्यात संसाराचा रगाडा खेचण्यासाठी 'हि'ला आणी 'ह्या'ला दोघांनाही काम करावेच लागते. 'हि' जेवढी झटते तेवढा 'हा'ही झटतो. माझ्या सध्याच्या पाहण्यातल्या अश्या (म्हणजे दोघेही काम करत असलेल्या) कुटुंबात 'हा' सुद्धा झटताना पाह्यलाय. हा कामावरून घरी आला की स्वयंपाक, भांडी करताना दिसतो. लाँड्रीही तोच करतो, घराचं व्हॅक्यूमही तोच करतो. मुलाबाळांना तयारही तोच करतो. खाऊ घालण्यापासून ते झोपू घालण्यापर्यंत हा त्यांच्या कडे बघतो. ही फक्तं काही उदाहरने आहेत, सरसकटीकरन नाही की 'हि'ला कमी लेखायचे नाही. परंतू लेखिकेच्या लेखातून 'हि'ला जी 'बिच्चारी गं बाई' अशी सहज सहानुभूती मिळेल त्यासाठी 'हा'ही तेवढाच पात्र आहे असे म्हणायचे आहे.

"ज्यांच्यासाठी कमवायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो खरा!"

हे १००% पटलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

लेखिकेच्या लेखातून 'हि'ला जी 'बिच्चारी गं बाई' अशी सहज सहानुभूती मिळेल त्यासाठी 'हा'ही तेवढाच पात्र आहे असे म्हणायचे आहे.

नक्कीच पण लेखनाचा उद्देश सहानुभूती मिळवणे हा नसून "ज्यांच्यासाठी कमवायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो खरा!" हे दर्शवणे आहे. वर अशीच अवस्था पुरूषांची होत असावी असे म्हटलेले आहेच.

परंतु अजूनही आपल्या समाजात बाईला अनेक तडजोडी कराव्या लागतात हे ही सत्य आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परंतु अजूनही आपल्या समाजात बाईला अनेक तडजोडी कराव्या लागतात हे ही सत्य आहे. Smile

मान्य आहेच. विशेषतः भारतात शहरी भाग सोडले तर परिस्थिती अजूनही काही फारशी बदलली आहे असे वाटत नाही. स्वतःच्याच नात्यातल्या काही स्त्रियांची तडजोड पाहता त्यांच्या नवर्‍यांचा राग येतो, पण त्या स्त्रियाच या परिस्थितीत काही बोलायला तयार नसतात तेव्हा आपण काही बोलणे म्हणजे त्यांच्या पर्सनल आयुष्यात नाक खुपसल्या सारखे होते.

वरच्या लेखातली परिस्थिती परदेशस्थं सुखवस्तू घरातली आहे. आणि तिथे दोघेही तेवढेच झटताना पाह्यलेत. म्हणून वरचा प्रतिसाद. तो प्रकाशित करताना तुमचा आधीचा प्रतिसाद पाहिला नव्हता, किंवा तुमची स्वतःची 'ह्या'च्या बद्दलची मतं काही वेगळी असतील असे वाटले नव्हते. तुम्हाला लेखातून जे दर्शवायचंय त्याच्याशी सहमत आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

स्फुट आवडले

एकाच वेळी घर आँफिस मुले संभाळताना होणारी तगमग प्रभावीपणे व्यक्त झालीय
सगळीकडे पुरे पडताना स्वताकडेच लक्ष द्यायला वेळ नाही ही बोचरी वस्तुस्थिती अस्वस्थ करते
संसार दोघाचा आहे वैगेरे प्रत्यक्षात अनुभवायला क्वचितच मिळते
मग या सर्व कुतरओढीला सुपरवुमन असे गोँडस नाव दिले जाते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

कथा वस्तुस्थिती मांडणारी आहे प्रश्नच नाही.

पण काही तरी कमावण्यासाठी काहीतरी गमवावे लागते हा नियमदेखील खरा आहे. You can't have your cake & eat it too. तेव्हा पांढर्‍या शुभ्र कॅनव्हास वरचा काळा ठीपका पहायचा की त्याकडे दुर्लक्ष करून जीवन जगायचे हे "ही" ने स्वतः ठरविणे (एकदाचे काय ते) आवश्यक आहे.

मुलांच्या आजारपणात आई-वडील जवळ हे हवेतच हवेत. पण अन्य वेळी आपल्याला वाटते तेवढी मुलांना आपली गरज नसते. त्यांना मार्गदर्शन जरूर लागते पण थोडं सुटवंग ठेवलें तर ती जास्त कणखर बनतात असे एक आपले नीरीक्षण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका विशिष्ट वयांत मुलांना नक्कीच आईवडिलांची गरज असते. विशेषतः गविंनी दिलेल्या उदाहरणात चार वर्षांची मुलगी, दोन वर्षाच्या मुलीला भरवत असेल तर तो अतिशय खेदजनक प्रकार आहे. मार्गदर्शनाने किंवा शिकवूनही अशी जबाबदारी मुलांच्या गळ्यात घालणे योग्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुसतं छान छान लिहावंसं वाटत नाही आणि असं काहि वाचलं की अधिका काय लिहायचं ते सुचत नाही!
असो फारच सुरेख!
माझा एक परिचित म्हणतो त्याप्रमाणे 'नवरा बायको दोघेही कमवायला लागल्यावर पुर्वी दिवसभर हाफिसात काम करणार्‍या नवर्‍याला काय वाटायचं ते बायकोला आणि घरची कामं करताना किती कष्ट पडायचे ते नवर्‍याला कळू लागलंय"

कालच एका मित्राशी बोलत होतो. त्याने ठरवून नोकरी करू न इच्छिणार्‍या मुलीची लग्न ठरवले आहे. तो सांगत होता "लहान असताना आई-वडील दोघेही नोकरीला. मला व बहिणीला घरात अक्षरशः लॉक करून ठेवायचं. आम्ही संध्याकाळ झाली की दोघंही खिडकीत असायचो (तळमजल्याला घर) आई येताना दिसली की तिच्याशी खिडकीतून पहिला हात मिळवण्यासाठी दोघेही प्रचंड धडपडायचो. तेव्हा आई जवळ असणं किती गरजेचं असतं हे कळलं आणि ठरवलं की स्वतः कितीही कष्ट करेन पण मुलांजवळ आई पाहिजे."

काहि काळाने या बापालाही लेखातल्यासारखंच वाटलं तर नवल वाटणार नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गंमत सांगतो.

याठिकाणी "आई"नेच घरी राहावं अशी एक पक्की समजूत झाली आहे. म्हणजे एखाद्याला आपल्या लहानपणी जे सोसावं लागलं ते टाळण्यासाठी स्वतः पोरांजवळ घरी राहणं पुरुषमाणसाला शक्यच नाही अशी एक पक्की समजूत आहे. जे काही घरी रहायचं ते आईनं. आणि मग त्यासाठी "मुलांना आईचीच खरी गरज असते" असं एक सोयीस्कर आणि शेकडो वर्षं ठोकून घट्ट केलेलं वाक्य घोटून ठेवलेलं आहे.

मला अनुभव घेता आला म्हणून इथे लिहितोय..

मी आणि माझी पत्नी दोघेही एकसमान उत्तम नोकरीत असताना, इक्वली करियरिस्ट असताना आणि एकसमान पगार असताना.. मी नोकरी सोडून घरी बसण्याचा निर्णय घेतला. फ्रस्ट्रेशनची कमाल मर्यादा+दहा वर्षांच्या कष्टदायक नोकरीनंतर एक करियर ब्रेक+ अडीच वर्षाचे लहान मूल, त्याला वेळ देणे+ साठलेली अनेक अ-कार्यालयीन घरासंबंधातली कामं निवांतपणे करणे अशा अनेक उद्देशांनी मी ठरवून, सर्वांना विश्वासात घेऊन हा ब्रेक घेतला.

मला सांगायला आनंद वाटतो की बापासोबतही मुलं तितक्याच आनंदाने राहतात आणि अतिशय अ‍ॅटॅच होतात याचा मला फर्स्टहँड अनुभव आला.

पण सहाएक महिने झाल्यावर नातेवाईक, सासरमाहेरचे लोक, अगदी सोसायटीच्या वॉचमनपासून सर्वांनी माझ्या घरी असण्याबद्दल चर्चा करायला सुरुवात केली. मला ** फरक पडत नव्हता. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की माझी आई, माझी करियरिस्ट पत्नी यांच्या चेहर्‍यावर, वागण्याबोलण्यात या माझ्या घरी बसण्याचा आणि आजुबाजूच्या लोकांच्या त्याविषयीच्या दबावाचा / चर्चेचा प्रचंड ताण सतत जाणवायला लागला.

..आडून आणि शेवटीशेवटी थेट मला सांगण्यात येऊ लागलं की आता बास..!!! प्रश्न फक्त कमाईचा होता असं नव्हे पण तरीही घरच्यांसाठी सगळं अतिशय अवघड होऊन बसलं होतं केवळ माझ्या घरी बसण्याने..

त्यामुळे जास्त नुकसान होऊ लागल्यावर मी पुन्हा नोकरीला लागलो.. एक वर्षं घरी राहण्याचं मी प्रोव्हिजनली ठरवलं होतं पण तेही पूर्ण करता आलं नाही.

माझी पत्नी किंवा फॉर दॅट मॅटर कोणत्याही घरातली पत्नी कितीही चढत्या कमानीची करियर सोडून घरी बसली असती तर यातलं काही म्हणजे काही झालं नसतं.. म्हणजेच जशी स्त्रीच्या करियरला किंमत नाही तशीच पुरुषाच्या घरी बसण्यालाही नाही. किंवा त्याला तशी परवानगी नाही.. Smile

बाप म्हणून घरी राहण्याचं नशीब मला नाही वाटत अजून शंभर वर्षं आपल्याकडे कोणाला मिळेल. फक्त दारुडे आणि जुगारी निकम्मे बापच नोकरीधंदा न करता घरी राहतात आणि म्हणूनच या समजुतीच्या व्यत्यासाने घरी राहिलेले बाप वर उल्लेखल्यातले असतात अशी काहीतरी समजूत असावी..

त्यामुळे घरी राहणार तर ती आईच.. आणि माँ की जगह बाप ले नही सकता हे फिल्मी तत्वज्ञान तसंच टिकून राहणार.. इन्फॅक्ट अंगावर पिण्याच्या वयाची बाळं असताना अगदी खरं असलेलं हे तत्वज्ञान पुढे अनंत काळापर्यंत खेचलं जातं हे खरं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"बाप म्हणून घरी राहण्याचं नशीब मला नाही वाटत अजून शंभर वर्षं आपल्याकडे कोणाला मिळेल."

~ मानवी समूह जीवनाच्या कार्यपद्धतीमध्ये पुरुष हाच कर्ता मानला गेला असल्याने अगदी सिंधू संस्कृतीपासून पुरुषाने "घर चालवायचे" आणि स्त्री ने ते 'सांभाळायचे' अशीच सर्वमान्य कामविभागणी झाल्याने पुरुष घरात बसलेला खुद्द स्त्रीलाही आवडत नाही. त्यामुळे मला वाटते पुरुषाने....जरी तो बाप झाला तरी....घरी बसणे आणि स्त्री ने कामाला जावून रोजीरोटी मिळविणे हे समाजमनालाही भावणारे नाहीच. शेजारीपाजारी तर अशा घरी बसलेल्या पुरुषाबद्दल 'मग नक्कीच याने ऑफिसमध्ये काहीतरी अफरातफर केली असणार, म्हणून सरकारने याला डच्चू दिला असे दिसत्ये" अशीच मल्लीनाथी करत बसतात. ही म्हटली तरी विकृतीच असते आणि त्यातही घरधनीण नोकरीला जात असेल तर मग त्यांच्या कल्पनेचा वारू उधळतोच.

"फक्त दारुडे आणि जुगारी निकम्मे बापच नोकरीधंदा न करता घरी राहतात"
~ होय. हा अनुभव तुम्ही व मी तुमच्याच 'आईचे आजारपण' या धाग्यात शेअर केला आहेच. झोपडपट्टीत राहाणार्‍या कुटुंबाचे हे भीषण आणि विदारक चित्र आहे. यातील बहुतांशी पुरुष हे म्युनिसिपालटीत 'रोजंदारी' वर काम करणारी असतात किंवा एखाद्या बिल्डरकडे साईटवर पोती टाकणारी. दोन्हीकडे काम नसते त्यावेळी असतील थोडेबहुत पैसे खिशात तर ते मटका आणि तीन पानावर खर्च केले जातात व मग त्यातूनही दोनचार रुपये उरले तर ज्याच्या वासाने डुक्करालाही मळमळल्यासारखे होईल अशी दारू ढोसून घरी परततात आणि कामाला गेलेली बायको तिथून खायाला काहीतरी आणेल याची वाट पाहात तिच्याच आयमायची धिंड काढत बसलेले दिसतात.

अशा चित्रामुळेही 'बापा'ने काम केलेच पाहिजे हा समजही फार दृढ झालेला दिसतो आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते फिल्मी तत्वज्ञान तसेच टिकून राहिले यात शंकेलाही जागा नाही.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> अगदी सिंधू संस्कृतीपासून पुरुषाने "घर चालवायचे" आणि स्त्री ने ते 'सांभाळायचे' अशीच सर्वमान्य कामविभागणी
हे कश्यावरून म्हणता?
पुरुषाने घर चालवायचे व स्त्रीने सांभाळायचे ही विभागणी औद्योगिकीकरणानंतर झाली असा माझा समज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याठिकाणी "आई"नेच घरी राहावं अशी एक पक्की समजूत झाली आहे. म्हणजे एखाद्याला आपल्या लहानपणी जे सोसावं लागलं ते टाळण्यासाठी स्वतः पोरांजवळ घरी राहणं पुरुषमाणसाला शक्यच नाही अशी एक पक्की समजूत आहे

थोसा आक्षेप यासाठी की अशी माझी समजूत नाही (आणि अपेक्षा-समज वगैरे तर अजिबात नाही ). आत्र ही समाजातली 'प्रॅक्टिस' असल्याने असे म्हटले आहे.

बाकी तुमचा अनुभव रोचक आहे आनि अनुकरणीयही! तुमचे अभिनंदन! मात्र हल्ली सुदैवाने (निदान आयटी मधे तरी) नवर्‍याने घरी राहणे तितकेसे नाविन्यपूर्ण रहिलेले नाही. माझे काहि परिचित-मित्र सध्या या 'फेज'मधे आहेत. Smile माझा एक जवळचा मित्र वर्षाची सबाटिकल घेऊन पत्नीसोबत ऑनसाईट गेला आहे. तिथे तो मुलाला व घर सांभाळतो बायको नोकरी करते.

अर्थात अश्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या अनेक वर्षे रहात असलेल्या घरापासून दुर किंवा नव्या ठिकाणी राहुन करत असाल तर समाजाचा दबाव कमी येतो असे निरिक्षण आहे. जिथे बरीच जन्ता तुम्हाला ओळखते अश्या ठिकाणी रहाणारी व्यक्ती मात्र असे बरेच दिवस करु शकल्याचे पाहण्यात नाही हे ही तितकेच खरे:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आक्षेप यासाठी की अशी माझी समजूत नाही (आणि अपेक्षा-समज वगैरे तर अजिबात नाही ).

नाही नाही. तुमची अशी धारणा आहे असं अजिबात सुचवायचं नाहीये. रिलेव्हंट जागी प्रतिसाद लिहायचा म्हणून तुमच्या कॉमेंटचा धागा पकडून तिला रिप्लाय टाकला. वेगळा लिहिला असता तरी चाललं असतं, पण तुमच्या कॉमेंटला एक्स्टेंड करणारा वाटला म्हणून तिथे लिहिला एवढंच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण दुर्दैवाची गोष्ट अशी की माझी आई, माझी करियरिस्ट पत्नी यांच्या चेहर्‍यावर, वागण्याबोलण्यात या माझ्या घरी बसण्याचा आणि आजुबाजूच्या लोकांच्या त्याविषयीच्या दबावाचा / चर्चेचा प्रचंड ताण सतत जाणवायला लागला.

असे झाले असावे याच्याशी सहमत आहे. तुमच्या आई आणि पत्नीने सुरुवातीला तुम्हाला साथ देण्याचे ठरवले असेल तरीही नंतर आजूबाजूचे आणि नातेवाईक यांच्या चौकशांना त्यांना तोंड देणे कठीण झाले असावे. विशेषतः, स्त्रियांना सणवार, फंक्शन्सच्या निमित्ताने अधिक लोकांना भेटावे लागते त्यामुळे त्यांच्यावर हा दबाव चटकन येतो आणि आपल्याकडे दुसर्‍यांच्या खाजगी बाबीत नाक खुपसणे हा जन्मसिद्ध अधिकार मानला जातो Wink तेव्हा असे होणे साहजिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.
यापुढे जाउन मी असंही म्हणेन की नोकरी न करणारी मुलगी आजदेखील समाजामध्ये लग्न करण्यासाठी क्वालिफाईड मानली जाते.
पण हे भाग्य बेकार तरुणाच्या नशिबामध्ये आजही नाही हे एक सत्य आहे.

आडून आणि शेवटीशेवटी थेट मला सांगण्यात येऊ लागलं की आता बास..!!!
जर तुम्ही नोकरी सोडण्याचा निर्णय घरातल्या लोकांना विश्वासात घेउन घेतला होता तर नंतर स्वतःचाच निर्णय फिरवणे चुकीचे वाटते.
तुम्ही तुमच्या निर्णयाबाबत पुरेसे ठाम राहायला हवे होते असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निर्णय फिरवणे चुकीचे वाटते.
तुम्ही तुमच्या निर्णयाबाबत पुरेसे ठाम राहायला हवे होते असे वाटते.

कोणत्याही केसमधे मनस्ताप, अस्वस्थता, तणाव व्हर्सेस मनःशांती, आनंद, समाधान यांची तुलना करावीच लागते आणि तुलनेत ते जिथे जास्त आहे असा निर्णय घ्यावा किंवा बदलावा लागतोच. हा काही माझ्यातला आणि माझ्या प्रिय घरच्यांतला संघर्ष नव्हे की मी निर्णयावर ठाम राहून तो जिंकावा..

शिवाय माझ्या मनाची अवस्थाही अशा ठाम राहण्याने सुशेगाद राहिली नसती याची खात्री आहे. मला वाटतं माझ्या जागी कोणीही हेच केलं असतं.

मनापासून प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यापुढे जाउन मी असंही म्हणेन की नोकरी न करणारी मुलगी आजदेखील समाजामध्ये लग्न करण्यासाठी क्वालिफाईड मानली जाते.
पण हे भाग्य बेकार तरुणाच्या नशिबामध्ये आजही नाही हे एक सत्य आहे.

खरंय. किंबहुना, मला नोकरी करणारी बायको नको अशी अटही मुलगे सहज मांडू शकतात. पुरुषांच्या नशीबी हे भाग्य नाही. Smile पण जोपर्यंत लग्न करून मुलीने मुलाकडे जायची प्रथा आहे तोपर्यंत ती घराबाहेर पडते तेव्हा तिची काळजी वाहणारे कोणी (पक्षी: नवरा) समर्थ हवे हे सोबत आलेच.

अवांतरः पूर्वी कुटुंब चांगलं असेल आणि मुलगा काही करत नसेल तरीही त्याला मुली दिल्या जात. घरदार चांगलं आहे, लग्नानंतर येईल जबाबदारीची जाणीव वगैरे कारणे दिली जात. आज ते शक्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या नात्यात असं एक यशस्वी उदाहरण पाहीलंय. नवर्याला ९-५ पेक्षा कला-संगीतादी गोष्टीत रस होता आणि बायको अतिशय हुशार आणि अँबिशियस. नवर्याने नोकरी सोडून, घरी राहून, अतिशय उत्तम प्रकारे दोन्ही मुलींना वाढवलं.
फक्त आमच्या बर्याच (बाई) नातेवाईकांच्या मते त्या बाई मात्र उगीचच 'भारीच आगाऊ आणि कर्कश्श' होऊन बसल्या, अर्थात त्याचा त्यांना काहीच फरक पड्ला नाही ही वेगळी गोष्ट :-).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> आजुबाजूच्या लोकांच्या त्याविषयीच्या दबावाचा
ह्याचा अनुभव घेतला. घर किंवा बाळ सांभाळण्याचे कारण नसतानाही माझ्या नवर्‍याने असा ब्रेक घेतला होता तेव्हा. पण आपण ठाम राह्यले तर जमते असे वाटते. कदाचित 'जवळच्या नातेवाइकांपासून लांब' असल्याचा फायदा झाला असावा. तो घरी असून स्वयंपाक वगैरे फारसा करत नाही हे समजल्यावर माझ्या पुरोगामी मैत्रिणीही थोड्या धास्तावल्या होत्या. ज्याला जे काम आवडते ते करावे, हे म्हणणे सोपे आणि करणे अवघड.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिस्थिती बद्दल लिहीत नाही, बाकी लिहिलय झकास, वाक्या-वाक्यात माणूस गुंतून रहातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्फुट लिहीण्याची शैली आवडली. परंतु त्यातली परिस्थिती स्वतःहूनच निर्माण केलेली असते असे वाटते. विशेषत: ज्यांच्यासाठी कमवायचं त्यांच्यासाठी वेळ नसतो हे वाक्य जरा भावनिक वाटले.
एक तर आपले प्राधान्यक्रम आणि गरजा निश्चित असतील तर वेळ पुरायला काहीच हरकत नसावी. एकाच्या पगारात का भागत नाही याचा विचार बर्‍याचदा केलेला असतो का? स्वतःचं अगदी थ्री-फोर बेडरूमचं घर असलंच पाहिजे, गाडी असलीच पाहिजे, अमुक एकाच (बर्‍याचदा महागड्या) शाळेत शिकायचं वगैरे हट्ट मुले करतात का?
समजा एकाच्या पगारात खरंच भागत नाही असं म्हटलं, तर त्यावरही मुलांच्या बाबतीत कडक धोरण अवलंबायचे उपाय आहेत. खाण्यापिण्याच्या बाबतीत नखरे न करण्याची शिस्त लावणे, स्वतःची कामं स्वतः करायला लावणे इत्यादी गोष्टी कटाक्षाने करता येतात. मुलांना सोल्युशनचा भाग करून घेतल्यास ती विश्वास बसणार नाही इतकी छान वागतात.
मुले आजारी पडल्यावर ओढाताण होते खरी. पण ती विशेष परिस्थिती असते आणि व्यवस्थित सवयी असतील तर वर्षातून दोन-तीनपेक्षा जास्तवेळा अशी परिस्थिती येऊ नये.
उत्तम घरदार, गाडी, हॉलीडेज, स्वतःचं करिअर आणि सोन्यासारखी मुलं हे सगळं पाहिजे असल्यावर हे सगळं होणारच. यू कॅन नॉट ईट द केक अ‍ॅन्ड हॅव इट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्फुट आवडल्याबद्दल धन्यवाद. तुमचा बाकीचा प्रतिसादही ढोबळमानाने योग्य आहे किंबहुना मीही सर्वसाधारणपणे असा विचार करेन पण थोडा अधिक विचार करता इतर बाबीही जाणवू लागतात.

बर्‍याचदा परिस्थिती ही माणूसच निर्माण करत असतो. उदा. दारूडा नवरा आहे. परिस्थिती वाईट आहे तरीही दुसरं मूल जन्माला घालणे, नवरा बायकोचे पटतच नव्हते, डिवोर्स घ्यायचं निश्चित होतं पण मग मूल झाल्याने एकट्या आईच्या नशिबी ते मूल सांभाळणे येणे वगैरे वगैरे अशी उदाहरणे खूप मांडता येतील.

परंतु, ज्यांचे सर्व सोन्यासारखे आहे. उदा. नवरा उच्चशिक्षित, त्याला लागणारी बायको उच्चशिक्षित (आणि तिला लागणारा नवरा उच्चशिक्षित). लग्न झाल्यावर परिस्थिती चांगलीच होते, माणसाला जर सुखवस्तु परिस्थिती मिळाली तर त्याची चटक लागते. उच्चशिक्षणामुळे काम, फिरत्या, प्रवास यांचा बोजाही वाढलेला दिसतो. ती परिस्थिती आणली हे खरे असले तरी ती परिस्थिती सोडून माणूस ९-५ नोकरी करेल असे वाटत नाही.

दुसरं म्हणजे, वर स्फुटात म्हटल्याप्रमाणे एकदा परिस्थिती निर्माण झाली की ती मेन्टेन करावी लागते. नवरा कमावतो, बायको घरी आहे पण अचानक नवरा चाळीशीत (म्हणजे अलमोस्ट सेटल झाल्यावर) गेला आणि बायकोपुढे अनेक प्रश्न उत्पन्न झाल्याची अनेक उदाहरणे बघतो. उच्चशिक्षित मुलीशी लग्न केल्यावर, मुलं झाल्यावर तिने घरी बसावं ही अपेक्षाही रास्त नसते. लग्न झालं पण मुलं होऊ देऊ नयेत असाही विचार सरसकट केला जात नाही. आणि ही परिस्थिती आजची नाही. ३०-३५ वर्षांपूर्वी सरकारी कार्यालये गाठायला लोकलचा तासाभराचा प्रवास करणार्‍या बायकांचीही हिच परिस्थिती होती.

मुले आजारी पडल्यावर होणारी ओढाताण अधिक असते हे खरेच पण मुले आजारीच पडायला हवीत असे नाही. कधी त्यांच्या शाळेतून इतर अ‍ॅक्टीविटीज असतात, कधी त्यांच्याकडून अभ्यास, कला वगैरे काही करवून घ्यायचे असते. विशेषतः, मुले जेव्हा लहान असतात तेव्हा काही ना काही सुरूच असते. वरील स्फुटात एक अतिशय तणावपूर्ण दिवस दिला आहे हे खरेच पण आई-वडिल दोन्ही नोकरी करत असतील आणि घरी परतण्याच्या वेळा पक्क्या नसतील तर त्यांना अनेक गोष्टी करणे कठीणच जाते.

अशीच परिस्थिती नोकरीनिमित्त फिरतीवर असणार्‍या बापाचीही असावी. ज्याच्यासाठी कमावतो त्याच्यासाठी वेळ नसतो हे वाक्य भावनिकच आहे (तोच तर हेतू आहे स्फुटाचा) पण बेगडी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वी कुटुंब चांगलं असेल आणि मुलगा काही करत नसेल तरीही त्याला मुली दिल्या जात. घरदार चांगलं आहे, लग्नानंतर येईल जबाबदारीची जाणीव वगैरे कारणे दिली जात.

आमच्याइथे अजूनही चालतं हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला लेख, चांगली चर्चा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या पाहण्यात एक कुटुंब होते ज्यात नवर्‍याची नोकरी गेलेली अन पत्नी बँकेत होती. मी बर्‍यापैकी लहान होते पण कधी कधी त्या बाईंचे पती घरात नसताना ऑफीसमधील किंवा इतर कुठला मित्र आणुन त्याच्याशी वागणे आठवले की वाईट वाटते. अर्थात तिचा नवरा अतिशयच मेंगळट होता याबद्द्ल वाद नाही.
चालायचंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी स्वतः १० ते ५ वेळ पाहिजे म्हणून बँकेची प्रमोशनची परीक्षा कधीही दिली नाही, तो मोहच नको म्हणून. थोडे पैसे कमी मिळतील, पण आपल्याला नेमकं काय हवं याची पूर्ण कल्पना असेल तर घर आणि अर्थार्जन दोन्ही साधता येतं. थोडीशी तडजोडीची तयारी हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ललित लेखन म्हणून आवडलंच पण एकूण परिस्थिती पाहून वाईटही वाटतं. आज या परिस्थितीला सध्यातरी सर्वमान्य उपाय नाही असं वाटतं. पैशासाठीच्च स्त्रीने नोकरी करण्याचे दिवस संपले आहेत आणि स्त्रियांनीही स्वत्व शोधणं सामान्य झालं आहे. जंगली भटक्या टोळ्यांमधून मानवांनी घरं बनवायला सुरूवात केल्यापासून पुरूष हेच करत आहेत. अर्थात पैशांसाठीच नोकरी करत असणार्‍या स्त्रिया स्वतःचा शोध करत नाहीत असा माझा दावा नाही.

महाराष्ट्र टाईम्समधली ही एक बातमी वाचून थोडंसं (का होईना!) आश्चर्य वाटलं. गेल्या पन्नासेक वर्षांत भारतात स्त्रियांनी नोकरी करायला सुरूवात केली असेल. बाजारात तयार अन्न मिळायला लागणं भारतात त्यामानाने नवीनच, साधारणतः आर्थिक उदारीकरणानंतर काही वर्षांनी सुरू झालेलं. एवढी वर्ष स्त्रिया नोकरी आणि मुलांच्या पालन-पोषणाकडेही लक्ष देत होत्या आणि आता त्यांनीही साधारणतः पुरूषी वाटणारे पर्याय निवडल्यावर मुलांचं आरोग्य उतरणीला लागलं आहे अशी बातमी दिसते. सांख्यिक विदा पहाता, तारेवरची कसरत करण्यात पुरूष कमी पडतात, निदान आपली कुटुंबाप्रती असणारी जबाबदारी पार पाडत नाहीत असं वाटतं.

गवि, तुमच्या दोन्ही निर्णयाबद्दल तुमचं अभिनंदन. नोकरी सोडण्याचा निर्णय आणि पुढे वर्षभर घरी बसण्याचा निर्णय फिरवण्याबद्दलही. दुर्दैवाने तुमच्यासारखे लोकं अपवाद असण्याचीच पद्धत आपल्याकडे रूढ आहे असं वाटतं.

'In praise of idleness' असा निबंध लिहीणार्‍या बर्ट्रांड रसलची आठवण येते. सर्व स्त्री-पुरूषांनी पोटापाण्यासाठी आवश्यक तेवढंच काम करावं आणि इतर वेळ आपल्या छंदांसाठी द्यावा; त्यातून मर्यादित गरजा पूर्ण होतील आणि सर्वांना नोकरी मिळेल असा त्याचा विचार होता. चार तास नोकरी करून पोटापुरते पैसे मिळतील असं त्याचं गणित होतं. बालसंगोपनाचा प्रश्नही त्यातून सुटेल. इतर एका पुस्तकात (बहुदा 'Conquest of happiness') त्याने मांडलेले विचारही पटतात. गुलामगिरी, स्त्रियांचं पराधीन जिणं हे (त्यांच्या स्वतःसाठी त्रासदायक, वाईट होतं पण निदान) श्रीमंत पुरूषांसाठी फायद्याचं होतं. बदललेल्या समाजात त्यासाठी पुरेसा विचार झालेला नाही.

१. घरची लक्ष्मी वगैरे उल्लेख करणार्‍या बातम्या जितपत यडपट वाटतात त्यातलीच ही पण असं म्हणता येईल. पण "लहानग्यांचे स्वास्थ्य धोक्यात आले आहे." वगैरे पेट्रनायझिंग (मराठी?) वाक्यांनी मनापासून हसू आलं.
२. पुरूषी वाटणारे पर्याय - घरात एकटी बाई असेल तरी ती अजूनही बहुसंख्य वेळा साधंसं का होईना पण स्वतःचं जेवण बनवून खाते. पुरूष मात्र अनेकदा बाहेरून आणून किंवा बाहेरच खातात. यात बदल होत आहे, म्हणून 'वाटणारे' असा शब्द प्रयोग केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मटामधील बातमी मटाला साजेशी आहे. अति खाल्ल्याने येणारा जाडेपणा वर्किंग मॉमशी संबंधीत नसून उपलब्धता आणि खरेदी करण्याची क्षमता या गोष्टींशी संबंधित असावा.

सांख्यिक विदा पहाता, तारेवरची कसरत करण्यात पुरूष कमी पडतात, निदान आपली कुटुंबाप्रती असणारी जबाबदारी पार पाडत नाहीत असं वाटतं.

शक्य आहे. तरीही, परिस्थिती बदलते आहे हे चित्र आशादायक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शक्य आहे. तरीही, परिस्थिती बदलते आहे हे चित्र आशादायक आहे.

अर्थातच. निदान माझ्या घरात, ओळखीतल्या घरांत एका पिढीत पडलेला बदल नक्कीच आशादायक आहे.

माझ्या वाक्याचा रोख मटाच्या बातमीकडे होता. घरातल्या नोकरी करणार्‍या स्त्रीला वेळ नाही म्हणून ती बाहेरून खाणं मागवते, पण त्याआधी कित्येक पिढ्या बाईच घरात सगळ्यांना खायला घालत होती. आता तिला वेळ नाही (आणि तिच्या हातातही पैसा आहे, तयार अन्न बाजारात उपलब्ध आहे ) तर पुरूष कितपत ही पोकळी भरून काढतात? बातमीतला सांख्यिकी विदा पहाता नोकरी करणार्‍या स्त्रियांच्या मुलांमधे अर्ध्याधिक मुलांना विकार आहेत असा उल्लेख आहे. याचा अर्थ या घरांमधे पौष्टीक अन्नाच्या बाबतीत आई-वडील दोघेही 'नापास' झाले आहेत, बातमीचा रोख मात्र स्त्रियांच्या नोकरीवरच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> आवश्यक तेवढंच काम करावं आणि इतर वेळ आपल्या छंदांसाठी द्यावा

संस्कृतीच्या उत्क्रांती संदर्भातल्या एका पुस्तकात असे वाचले होते की प्रिमिटिव टोळ्यांत (आफ्रिका, टंड्रा, प्रशांत महासागरावरील बेटे, दक्षिण अमेरिका अश्या विविध भागातील) ६० ते ७०% वेळ मित्रमैत्रिणींना, नातेवाइकांना भेटण्यात, नाचण्यात, गाण्यात जातो. उरलेल्या वेळात पोटाची व्यवस्था. अश्या अल्गोरिदम मुळे हे लोक आहे त्यात सुखी राहिले, देशांतरी गेले नाहीत पण मग आक्रमणांना बळी पडले.

दुसर्‍या शब्दात बळी तो कान पिळी! निवांत राहणार्‍या माणसांच्या जमातीचे भवितव्य, न-निवांत राहणारी माणसे त्यांना गाठू शकली नाहीत तरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निवांत रहाण्याबद्दल ही दुसरी बाजू आहे हे मान्य. शिवाय काहीच लोकांना पोटापुरतं काम करण्याचा पर्याय आवडेल असं वाटतं. सध्या असा पर्याय फारच कमी लोकांना उपलब्ध असतो. आणि अशी कामं बर्‍याचदा डोक्याला 'त्रास' देण्यातली नसतात (त्यामुळे चार तासांत पोटापुरते पैसे मिळतील याची खात्री नाही).

तुझ्या वरच्या प्रतिसादातल्या वाक्यावरून

ज्याला जे काम आवडते ते करावे, हे म्हणणे सोपे आणि करणे अवघड.

थोडं बदलून सुचवते, ज्याची ज्या बाबतीत सहनशक्ती कमी त्याने ते काम करावे. विकत मिळणार्‍या पोळ्या किंवा पाव खाऊ शकत नाही तर पोळ्या लाटणे हाच उपाय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>ज्यांच्यासाठी कमवायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो खरा!
मुले झाल्यावर आपण काय जे करतो ते केवळ त्यांच्यासाठीच अशी मनस्थिती होते का? (अनुभव नसल्याने प्रश्न).

प्राप्त परिस्थितीत स्वतःचा विचार करता येतच नाही असे कुठे असते. हिच्या गोष्टीत, गाडीत सिग्नलला एक/ दोन सिरियल बार खाता येतील. नवर्‍याला फोन करून मुलीला इमर्जन्सीत नेल्यावर योग्य वेळी (३ वाजता) जिथे असू तिथून डायल इन करता येईल. सगळी जबाबदारी आपलीच आहे, आणि तिच्यात कोणी वाटेकरी नाही असा आंतरिक विचार या कथेत दिसला. (उदा नवर्‍याने मुलांना तयार केल्याचा उल्लेख आणि तरी नर्सने तुम्हाला कळले कसे नाही असे म्हटल्यावर अपराधी वाटणे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राप्त परिस्थितीत स्वतःचा विचार करता येतच नाही असे कुठे असते. हिच्या गोष्टीत, गाडीत सिग्नलला एक/ दोन सिरियल बार खाता येतील.

घरातले इतर ऑम्लेट आणि पॅनकेक खात असता, चालत्या गाडीत स्टिरिंग व्हीलवरचा हात सोडून सिरिअल बार खाणे ही तडजोडच झाली. (सिग्नल आहेत हे गृहितक झाले.) तसे तर ऑफिसमध्ये जाऊन कॅफेटेरियातही जाता येते. ऑप्शन असतातच.

नवर्‍याला फोन करून मुलीला इमर्जन्सीत नेल्यावर योग्य वेळी (३ वाजता) जिथे असू तिथून डायल इन करता येईल.

मूल इमर्जन्सीत असल्यावर डायल-इन करायची मानसिक तयारी किती पालकांची असते याविषयी मला स्वानुभव नाही. त्यामुळे मत मांडू शकत नाही.

सगळी जबाबदारी आपलीच आहे, आणि तिच्यात कोणी वाटेकरी नाही असा आंतरिक विचार या कथेत दिसला. (उदा नवर्‍याने मुलांना तयार केल्याचा उल्लेख आणि तरी नर्सने तुम्हाला कळले कसे नाही असे म्हटल्यावर अपराधी वाटणे.)

करता येण्यासारख्या आणि सल्ले देण्यासारख्या बर्‍याच गोष्टी असतात. प्रत्यक्ष अनुभव आणि मानवी मन त्यापेक्षा वेगळे असू शकते.

-----------

मुले झाल्यावर आपण काय जे करतो ते केवळ त्यांच्यासाठीच अशी मनस्थिती होते का? (अनुभव नसल्याने प्रश्न).

नेहमीच नाही पण बर्‍याचदा होते. हा माझा वैयक्तिक अनुभव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> प्रत्यक्ष अनुभव आणि मानवी मन त्यापेक्षा वेगळे असू शकते.
एकदम मान्य.

मी दुसरीत असे पर्यंत पाळणाघरात आणि तिसरीपासून एकटीच घरी राहू लागले. स्वतःची किल्ली वापरून घर बंद करून खेळायला जायचे. त्यामुळे मला घरी आल्यावर आई (किंवा कोणीतरी) घरी असावी(वे) किंवा आजारी वाटत असताना आईच हवी हा विचार एकदम ओवररेटेड वाटतो. असो. तो विषय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला घरी आल्यावर आई (किंवा कोणीतरी) घरी असावी(वे) किंवा आजारी वाटत असताना आईच हवी हा विचार एकदम ओवररेटेड वाटतो.

मला आत्ता या वयातही माझ्या अडचणीत माझी आई सोबत असावी असा विचार ओवररेटेड वाटत नाही. Smile (प्रॅक्टिकली पॉसिबल/ इम्पॉसिबल वगैरे वेगळ्या बाबी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, माझ्या मातेलाही तिच्या आईबद्दल असे वाटे. मला एक फोन केला, बोलले की पुरेसे वाटते. फिजिकल प्रेझेन्स गरजेचा वाटत नाही. हा विचार जेनेटिक असावा की संस्काराचा भाग (म्हणजे कंडिशनिंग, कशाची सवय आहे ते) असा विचार करते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला एक फोन केला, बोलले की पुरेसे वाटते.

प्रॅक्टिकली मलाही फोन केला आणि बोललेकीच पुरेसे वाटते. Wink

हा विचार जेनेटिक असावा की संस्काराचा भाग (म्हणजे कंडिशनिंग, कशाची सवय आहे ते) असा विचार करते आहे.

जेनेटिक आहे का ते सांगता येणार नाही पण हा सवय किंवा संस्कारांचा भाग असावा. जवळीकीशीही संबंधीत असावे. अशी भावना मी परदेशस्थांमध्येही पाहिली आहे आणि अगदी मनापासून पाहिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला शंका वाटते कारण एकत्र वाढलेल्या भावंडांतही मला ह्या बाबतीत वेगळेपणा आढळला आहे. जेनेटिक असेल तर देशस्थ, परदेशस्थ सगळ्यांच्यातच असे वाटत असावे.

>>बोललेकीच पुरेसे वाटते
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं हे मूळ स्वभाव आणि थोडंफार कंडीशनिंग असण्याची शक्यता आहे. लहानपणी आजारी पडल्यावर मी घरी आरामात झोपा काढायचे आणि आई घरी आल्यावर तिचा चेहेरा उतरलेला दिसायचा.
काही लोकांच्या बाबतीत उलट होतानाही पाहिलेलं आहे. लहानपणी एकटं रहायला लागलं असेल तर पुढे स्वतःच्या मुलांना एकटं रहावं लागू नये याची काळजी घेणं इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही स्फुटकथा आवडल्याचे तिथे सांगितले होतेच.

पुन्हा प्रतिसाद अशासाठी की अगदी परवा (म्हणजे रविवारी) एका स्त्री एकपात्री एकांकिकेची तालिम पाहिली. तिथे हे स्फुट प्रकर्षाने आठवले.
तालमीनंतर झालेल्या चर्चेत या कथानकाचा उल्लेखही मी केला.
त्या एकांकिकेचे (वेकिंग अप - रूपांतर 'जाग' , अनु. माया पंडित) कथानक समांतर आहे. मूळ लेखक आहेत नोबेल विजेते दारिओ फो आणि फ्रॅका रामे (...थिंक अलाईक वगैरे Smile ).
अर्थात त्या एकांकिकेत बहुराष्ट्रियीकरणावर भाष्य आहे. (लेखकदंपतिची वैचारीक भूमिका)
मराठी समाजात (किंवा भारतीय समाजात) स्त्रीची तारेवरची कसरत गेल्या तीस-चाळीस वर्षात प्रकर्षाने जाणवू लागली.
त्या तिथे पलिकडे ते त्याहीपूर्वी झाल्याने अशी कथानके थोडी आधी आली असे म्हणता येईल. पण अनुभवांची आणि विचारांची जातकुळी साधारण सारखीच आहे.
मूळ इटॅलियन एकपात्रीचे स्क्रिप्ट (किंवा त्याचे इंग्रजी भाषांतर) मी वाचलेले नाही. तरीही स्थळ-काळाचे तपशील वगळता ती सद्यस्थितीत इथे चपखल लागू होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0