जुलूस

सहावी संज्ञा, Intuition किंवा आतला आवाज या प्रकाराला काही शास्त्रीय आधार आहे की नाही, कोण जाणे? आजकाल तंत्रज्ञानाने इतकी मोठी झेप घेतलेली आहे आणि ते इतक्या प्रकारे, इतक्या वेळा मनावर आदळले जाते की कधीकधी स्वत:चा आतला आवाज खोटा वाटायला लागतो. इतकी भरभराट होत असतानाही चुकचुकणारी माणसं नैराश्याची बळी वाटायला लागतात, काहीतरी जुन्याच्या आठवणींनी उसासणार्‍यांना सरसकट वायफळ नॉस्टॅल्जियाचे रोगी समजले जाते आणि इतक्या मोठमोठ्या गोष्टी बोलणार्‍यांसमोर साध्या-साध्या शंका विचारण्याची लाज वाटू लागते.
मुळात माझ्यासारख्याच अनेक लोकांना स्वतंत्र विचार करण्याचं शिक्षण मिळालेलंच नाहीय. वर्गात मागच्या बेंचवर बसून खिडकीतून बाहेर बघणार्‍या मुलांना, ठराविक पद्धतीने निबंध न लिहिणार्‍या मुलांना, ठराविक साच्यातली उत्तरे न लिहिणार्‍या मुलांना वाया गेलेली मुले समजणार्‍या शिक्षणफॅक्टरीतून कशीबशी सर्टिफिकेटं मिळवलेल्या लोकांना स्वतःच्या शंकांच्या योग्यतेबद्दलही शंकाच असतात.
एकीकडे "आराम हराम है" किंवा "Work for all (and more of it)." सारख्या वाक्यांचा येता जाता पवित्र मंत्रासारखी जप करणार्‍या, 'कार्यमग्न' लोकांना पुजणार्‍या आणि काम न करणार्‍यांना ऐतखाऊ म्हणून हिणवणार्‍या व्यवस्थेचे पाईक कामाचे तास कमी करायला का झटतील हे काही केल्या कळत नाही किंबहुना कोणीही स्वतःचा वेळ मोकळा अनुत्पादक का ठेवेल हे "माणसाच्या उपभोगाकांक्षा अमर्याद असतात आणि स्रोत अतिशय मर्यादित" असे ठासून सांगणार्‍या या व्यवस्थेला कसे कळेल हेच समजत नाही (म्हणूनच कामात बदल म्हणजेच आराम वगैरे वगैरे). समृद्धी, शिक्षण वगैरे आल्यावर लोकसंख्या स्थिर होईल असे म्ह्णताना प्रगतीच्या गेल्या साठ वर्षांमध्येच लोकसंख्या दुपटीहून अधिक का वाढली हे कळत नाही आणि आदिमानवाची लोकसंख्या मात्र कोणत्याही समृद्धीविना पन्नास लाखाच्या आसपास कशी स्थिर राहिली हे कळत नाही.
पण सुदैवाने अशा शंकांना आपल्या विचारांनी आधार देणारी माणसे जगात आहेत.
माणसाला आपण स्वत:साठी निर्माण केली आहे असे वाटणार्‍या पण प्रत्यक्षात माणसांपासून बनलेल्या असूनही स्वतंत्रपणे उत्क्रांत झालेल्या आणि कोणत्याही एका माणसाच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या धर्म, सरकारादि यंत्रणांसारखीच "मार्केट" ही एक यंत्रणा उत्क्रांत झालेली आहे आणि माणूस म्हणजे तिच्या प्रभावाखाली तिच्यासाठीच फुकटात काम (Shadow Work) करणारा Homo Economicus झालेला आहे. मोठमोठ्या कंपन्यांची जगातल्या अगदी थोड्या लोकांच्या फायद्यासाठी काम करणारी ही बाजारू यंत्रणा प्रगतीचे ढोल इतक्या मोठ्या आवाजात वाजवत आहे की काय खरं आणि काय खोटं हे न बघताच माणसं त्या तालावर नाचू लागतात. माणसाच्या कोणत्याही गरजेचे संस्थानीकरण हे या यंत्रणेचे वैशिष्ट्य आहे. इवान इलिच या विचारवंताने माणसाच्या गरजांच्या संस्थानिकरणातून झालेला विपर्यास आपल्या Needs या लेखात मांडला आहे. उदाहरणार्थ शिक्षण या शब्दाचा अर्थ शिकणे असा न राहता पदवी मिळवणे, मार्क्स मिळवणे असा झाला आहे. शिकण्याच्या क्रियेपेक्षा बाजारातून मिळणार्‍या सेवेवर माणसाचे अवलंबित्व निर्माण झाले आहे. शाळेबाहेरच्या खर्‍याखुर्‍या शिकण्याला शिक्षण म्हणायची मान्यताच नाही. माणसाच्या शिकण्याच्या गरजेचे संस्थानिकरण करून बाजाराने बहुसंख्य लोकांची ती गरज भागणे दुरापास्त केले आहे. रुसो म्हणतो,"The noblest work in education is to make a reasoning man, and we expect to train a young child by making him reason! This is beginning at the end; this is making an instrument of a result. If children understood how to reason they would not need to be educated.". पण इथे खरेच शिकायचे कोणाला आहे? आम्हाला तर शिक्षण घेतल्याचा कागद हवा आहे म्हणजे बाजारात आमची किंमत वाढेल आणि मग बाजार उदार मनाने आम्हाला घर, गाडी, टीव्ही वगैरे देऊन आमच्या "गरजा" पूर्ण करेल. ज्यांनी असे शिक्षण घेतले आहे अशा आम्हा लोकांना हे सगळं मिळतं, सुबत्ता मिळते, जगात काय चाललंय याची माहिती मिळते पण आपण खातो ते नक्की कुठून येतं त्याचं ज्ञान मिळत नाही. आपण खातो त्यात नक्की किती पेस्टिसाईड्स आहेत ते कळत नाही. उत्पादकाने लावलेल्या "Organic" लेबलवर विश्वास ठेवण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही. समजा नाहीच ते घ्यायचं म्हटलं तर दुसरं काय खायचं त्याचं ज्ञान नाही. आम्ही फक्त बाजाराच्या जगङ्व्याळ यंत्रात एखाद्या स्क्रूप्रमाणे एखादे अतिविशिष्ट काम करत बसतो ज्याचा संबंध आम्हाला आमच्या रोजच्या जगण्याशी लावता येत नाही. आमच्या अतिप्रचंड लोकशाही यंत्रणेतले आम्ही एक नगण्य भाग आहोत ज्यांना आशेशिवाय काहीही करता येत नाही. हळूहळू ही काही न करण्याची आम्हाला सवय लागलेली आहे आणि आमची हवा, आमचं पाणी आणि आमच्या अन्नाचं बाजारीकरण होतानाही आम्ही पाहात राहतो. आम्ही मानसिकरित्या षंढ केले गेलो आहोत. इतके की बाजाराने पवित्र ठरवलेल्या वस्तुंना आम्ही नाही म्हणू शकत नाही, त्यांच्यापुढे आम्ही आनंदाने मान झुकवतो. "Holy Cow" म्हणणार्‍या आमच्या पूर्वजांना आम्ही वेड्यात काढून "Holy Car!" म्हणतो. "गाय हमारी माता है|" म्हणणार्‍यांच्या वंशातले आम्ही आता कारसेवा करतो. कारसाठी आम्ही जमिनीवर डांबर ओतून आखीव-रेखीव रस्ते बनवतो. कोणत्याही दिशेने चालू लागण्याचे आमचे स्वातंत्र्य घालवून ठराविक मार्गाने जायचे नियम पैसे देऊन विकत घेतो आणि त्या पैशांसाठी जास्तीचे कामही करतो. सर्वसाधारण अमेरिकन माणूस कार असूनही त्याच्या आदिम पूर्वजाइतका चालतोच फक्त लॉबी, पार्किंग आणि कॉरिडॉर्समध्ये. इलिच म्हणतो "The model American puts in 1600 hours to get 7500 miles: less than five miles per hour. In countries deprived of a transportation industry, people manage to do the same, walking wherever they want to go, and they allocate only 3 to 8 percent of their society's time budget to traffic instead of 28 percent".
"हेल्थ" या आणखी एका संस्थानिकृत अतिप्रिय गरजेचाही आम्ही या अतिपूज्य कारसाठी त्याग करतो. कॅन्सरच्या नावाने गळे काढणारे आम्ही कारच्या नळीतून बाहेर पडणारे कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड आणि हायड्रोजन सायनाईडसारखे घातक कर्कजनक वायू मुकाट आमच्या फुप्फुसात भरून घेतो.
रस्त्यावर भारतात एक लाखाच्यावर बळी घेणार्‍या या कारसाठी सरकारने लाल गालिचा अंथरला आहे. किरकोळविक्री क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात काचकूच करणार्‍या सरकारने कारनिर्मिती क्षेत्रात आपले दरवाजे सताड उघडे ठेवले आहेत आणि वीस वर्षांत जगातले ऑटोमोबाईल हब व्हायचे स्वप्न बाळगले आहे. त्यासाठी मोठमोठे रस्ते बांधणे, त्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी हडपणे जोमात चालू आहे.
त्याचवेळी या कारसाठी इंधन कमी पडणार हे पाहून नवनव्या इंधनाच्या शोधात मार्केट आहे आणि मार्केटच्या सुपीक डोक्यातून "जैवइंधनाचे" एक नरभक्षक पिल्लू बाहेर पडले आहे. २०५० पर्यंत जगाच्या ऊर्जेच्या २५% ऊर्जा जैवइंधनातून मिळेल असा अंदाज आहे. अर्थातच त्यासाठी आधीच कमी असलेली जमीन द्यावी लागणार. लाखो वर्षे जुनी जंगले तोडून तिथे पामची किंवा जट्रोफाची लागवड करावी लागणार (मलेशिया आणि इंडोनेशियाने यात भारतापेक्षा जास्त प्रगती केली आहे).माणसांना खायला नसेल मिळत पण इंधनासाठी ऊस आणि मका उपलब्ध करून द्यावा लागणार. मग अन्नधान्याच्या किंमती वाढताहेत तर वाढू द्या.
UN च्या फूड अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनने (FAO) भूक कमी करण्याची काही ध्येये ठरवली होती. अगदी आकडेवारीनिशी. पण २००६ नंतर अन्न-धान्याच्या किंमती इतक्या वाढल्या की जगातल्या दीर्घकालीन उपाशी लोकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढायला लागली आणि २००९ मध्ये एक अब्जापेक्षा जास्त होईल असा अंदाज निघाला. मग FAO ने एक युक्ती केली. ध्येय ठरवण्यासाठी आकडेवारी वापरायचेच सोडून दिले. म्हणजे उपाशी लोकांची संख्या अमुक इतकी कमी करू असे न म्हणता फक्त "आम्ही उपाशी लोकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करू" असेच ध्येय ठरवले गेले.
जगातल्या वरच्या १० टक्क्यातल्या लोकांना पोषणमूल्यांनी भरपूर असा बहुढंगी आहार मिळतो, पण हे भाग्य सगळ्यांच्या नशिबी नाही. FAO च्या त्याच अहवालातला हा परिच्छेद पाहा:
"Biodiversity, another essential resource for agriculture and food production, is threatened by urbanization, deforestation, pollution and the conversion of wetlands. As a result of agricultural modernization, changes in diets and population density, humankind increasingly depends on a reduced amount of agricultural biological diversity for its food supplies. The gene pool in plant and animal genetic resources and in the natural ecosystems which breeders need as options for future selection is diminishing rapidly. A dozen species of animals provide 90 percent of the animal protein consumed globally and just four crop species provide half of plant-based calories in the human diet."

प्रदूषणाने वातावरणावर परिणाम होतो म्हणून मार्केटने एक युक्ती काढली आहे. वातावरणाचं खाजगीकरण! म्हणजे वातावरणाचे हक्क आजवर ज्यांनी प्रदूषण केले आहे त्याच लोकांना वाटून द्यायचे. मग त्यातले काही लोक थोडंसं प्रदूषण कमी करतील आणि वाचलेला आपला "कोटा" इतरांना विकतील म्हणजे ते प्रदूषण करायला मोकळे. "कार्बन ट्रेडींग" या आपल्या पुस्तकात लॅरी लोहमानने पृथ्वीवरच्या सगळ्या जीवांच्या मालकीचं आणि हक्काचं वातावरण या मार्केट इकॉनॉमिने प्रदूषणकर्त्यांना कसं परस्पर आंदण दिलं आहे याचा खुलासा केला आहे.

२०५० पर्यंत ९ अब्ज होणारी लोकसंख्या, तिला पोसण्यासाठी ७०% जास्तीच्या अन्नाची गरज असताना इतर कामांसाठी वापरली जाणारी जमीन, अन्न-धान्यांच्या बियाणांची कमी कमी होत जाणारी उत्पादनक्षमता, जेनेटिक्सच्या माध्यमातून कंपन्यांचा त्यावर नियंत्रण आणण्याचा कावा, पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य, मरू घातलेले समुद्र, वाढती विषमता असं सगळं असूनही जणू काहीच प्रश्न नाही असा आव आणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम ही मार्केट इकॉनॉमी करते.
त्या बाजाराच्या चमचमाटापुढे हतबल होऊन माणूस पुढ्यात आलेल्या गोष्टींचा उपभोग घेत राहतो, नवे नवे तंत्रज्ञान, नवे फोन, नवे संगणक, नवे टीव्ही येतच राहतात आणि अखेर मार्केटच माणसाचा उपभोग घेऊ लागते.
असा आपल्या प्रत्येक गरजेचा गुलाम झालेला माणूस त्या गरजा पूर्ण होत नसतानाही त्याच्या आभासासाठी रात्रंदिवस खपत राहतो. आयुष्यातला एक तृतीयांश भाग काम करण्यात आणि एक तृतीयांश भाग झोपेत काढल्यावर उरलेल्या वेळात माणूस आपण सुखी आहोत असे स्वतःला ओरडून ओरडून सांगत राहतो पण मार्केटच्या प्रगतीच्या जुलूसात त्याचा आवाज त्याला स्वत:लाही ऐकू येत नाही.

१. Fekri Hassan, Demographic Archaeology (New York: Academic Press, 1981). Cited in "My Name Is Chellis And I Am In Recovery From Western Civilization"

२. Vandana Shiva, "Soil Not Oil" (Southpress)

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

शिक्षणाबद्दल(दर्जाबद्दल) तुमच्या मताशी सहमत आहे, लोकसंख्येबद्दल बोलायचं झाल्यास, राजेशने दिलेल्या HDI इन्डीकेटर्समधेच लोकसंख्येशी संबंधित इन्डीकेटर बघता असे लक्षात येते की समृद्ध देशांत प्रजननाचा दर फारच नगण्य आहे, भाडवलशाहीबद्दल पुर्ण सहमत आहे, आरोग्याविषयी हा तक्ता बघितल्यास सद्यपरिस्थिती पुर्वीपेक्षा उत्तमच असल्याचे लक्षात येते, त्याबद्दल तुमच्याशी असहमत आहे, पर्यावरणाबद्दल तुमच्याशी सहमत आहे, हा आलेख त्याबद्दल अधिक सांगतो.

लेखात अनेक मुद्दे मांडले आहेत, प्रत्येक मुद्द्यावर स्वतंत्र चर्चा करणे गरजेचे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाजाराच्या चमचमाटापुढे हतबल न होण्याची शक्यता कमी आहे (तशी माणसं संख्येने नगण्य असली तरी आहेत हे महत्त्वाचं) कारण आम्हाला चमचमाट हवा आहे. टी.व्ही नाही, इंटरनेट कनेक्शन नाही आणि मोबाईलची रेंज नाही कळल्यावर माणसं किती अस्वस्थ होतात हे पाहायलाच हवं किमान एकदा तरी. तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्याचा ताबा घेतला आहे असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे सभोवताली हे खरं - पण त्याच्या किती आहारी जायचं हे आपल्यापुरतं आपण ठरवू शकतो. त्यामुळे हा मुद्दा बाजाराचा, तंत्रज्ञानाचा न राहता जीवनदृष्टीचा ठरतो माझ्या मते. त्यासाठी स्वतःला आवर्जून वेळ दिला पाहिजे आणि 'लोक काय म्हणतील' या भीतीतून मुक्त झालं पाहिजे.

थोडे अवांतरः काही पुस्तकं असे विचार करायला प्रवृत्त करतात. How to be Idle (Tom Hodgkinson), The Seven Day Weekend (Ricardo Semler), Small is Beautiful (E F Schumacher)आणि हिंद स्वराज्य (महात्मा गांधी) या पुस्तकांची मदत झाली मला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

End the Ethanol Mandate

निबंधातल्या निराशावादी विचारांशी बव्हंशाने असहमत असले तरीही निबंध आवडला.

आदिमानवाची किंवा अगदी १८ व्या शतकापर्यंत भूक, साथीचे रोग, पिकांना लागणारे साथीचे रोग, युद्ध या सगळ्या प्रकारांमधे लोकसंख्या नियंत्रित रहात होती. आधुनिक वैद्यक आणि दुसर्‍या बाजूला स्थिरावणारी राजकीय परिस्थिती यांच्यामुळे मृत्युदर कमी झाला आहे. विशेषतः बालमृत्युचा दर. बालमृत्युचा दर कमी झाल्यानंतरच स्त्रियांचा जननदर कमी होतो आहे; युरोपीय देशांमधे लोकसंख्या घटती आहे, भारतात ती किंचितच वाढती आहे आणि येत्या काही दशकांमधे कदाचित संपूर्ण जगाची लोकसंख्या स्थिरावेल.

यांत्रिकीकरण ही प्रक्रिया आज किंवा औद्योगिकीकरणानंतर, किंवा गेल्या १०० वर्षांत सुरू झालेली नाही. शिकारीसाठी आयुधं बनवणं, पुढे शेतीसाठी नांगर बनवणं इथेच यंत्र बनवायला सुरूवात झालेली आहे. तेव्हा काम करणारे हात कमी होते म्हणून यंत्रांची आवश्यकता होती, आज खाणारी तोंडं खूप अधिक आहेत म्हणून कमीतकमी जागेत अधिक पिकं काढण्याची आवश्यकता आहे. छोटासा शंभर वर्षांचा काळ घेतला तर त्यात कदाचित अधोगती होते आहे असं वाटेलही, पण दहा हजार वर्षांपासून असणारा इतिहास पाहिला तर प्रगतीच होते आहे.

आजच्या शिक्षणातून कारकून तयार होतात असा एक आरोप केला जातो. जो मला काही अंशी मान्यही आहे. पाचशे वर्षांपूर्वी जे शिक्षण होतं त्यात (भारतात) काय वेगळं होतं? लोहाराने ऐरण कशी चालवायची आणि हातोडा कसा मारायचा एवढंच शिकायचं आणि करायचं. ऐरणीच्या डिझाईनमधे बदल करण्याचं शिक्षण तर सोडाच पण प्रोत्साहनही मिळत नसे. लोहार आणि सुतार एकत्र येऊन एकमेकांना पूरक काम करतील अशी स्थिती नव्हती, जे आज सर्रास दिसतं. दुसरं म्हणजे शिक्षणपद्धतीमधे नवनिर्मितीवर फार भर नसतो असं सुचवलं जातो. खरोखर किती टक्के लोकांकडे नवनिर्मितीची बुद्धी असते? नवनिर्मितीची क्षमता काही वर्ष दाबून ठेवता येईल, पण ती पूर्णच मारून टाकणं शक्य आहे का? दुसर्‍या बाजूने बालमानसशास्त्र या विषयाचा गेल्या शंभर-दीडशे वर्षांत बर्‍यापैकी विकास झालेला आहे. त्याचे परिणाम विकसित देशांमधल्या शाळांमधेही दिसायला लागलेले आहेत.

अमेरिकेत सगळीकडे कारने जावं लागतं, लोकं जातात. त्याचं कारण तिथली लोकसंख्येची कमी घनता. हीच गोष्ट थोड्याबहुत फरकाने कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचीही असावी. दाटीवाटीने वसलेल्या कोणत्याही शहरात सामान्य लोकं सार्वजनिक परिवाहनाचा उपयोग करतात. लंडन, पॅरिस, बर्लिन, न्यूयॉर्क अशी सगळी शहरं बोगद्यांमधून प्रवास करतात. मुंबईतल्या लोकल ट्रेनबद्दल वेगळं सांगायला नकोच. अमेरिकेत दोन शहरांना जोडणार्‍या ट्रेन्स किंवा बसेस फार नाहीत (तो एक वेगळाच विषय आहे). पण युरोप, भारत, चीन इथे मोठमोठ्या शहरांना जोडणार्‍या ट्रेन्स आहेत. तिथून पुढे न्यायला बसेसही असतात.

Biodiesel हा जो पर्याय अलिकडच्या काळात लोकप्रिय होतो आहे त्यात प्रदूषण हा एक मोठा भाग आहे, अन्नधान्याच्या किंमती हा दुसरा. पण त्याची आवश्यकता मुख्यतः आयातीवर, पर्यायाने थोडक्या देशांवर अवलंबून असण्यातून निर्माण झालेली आहे. कितीही पर्यावरण, आरोग्य यांचा पुरस्कार केला तरीही घड्याळाचे काटे मागे फिरवून बैलगाडीच्या जमान्यात जाणं आता शक्य नाही.

या सगळ्यातून निर्माण होणारे हवा आणि पाण्याचे प्रदूषण, गोड्या पाण्याची कमी होत जाणारी उपलब्धता आणि वाढती मागणी हे प्रश्न तेवढेच खरे आहेत. विकसित राष्ट्रांनी पर्यावरणाबाबतीत उदासीनता दाखवणे, विशेषतः अमेरिकेने क्योटो करार मान्य न करणे, हे चिंताजनकच आहे. अमेरिकेच्या बाबतीत तर फारच, प्रक्रिया केलेलं आणि न केलेलं अन्नधान्य वगळता इतर बर्‍याचशा गोष्टी ज्या देशात चीन आणि इतर देशांकडून आयात होतात, ती अमेरिका अजूनही प्रदूषणाच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आधुनिक जीवनशैलीविषयी भाष्य करतो की सर्व मानवी संस्थांवर हे न कळल्याने प्रतिसाद फक्त बाजाराशी संबंधित गोष्टींबद्दल आहे.

बाजार ही एक विनिमय व्यवस्था आहे. बाजार नसता तर आणखी कुठली विनिमयव्यवस्था अस्तित्त्वात असली असती अन्यथा माणसे एकमेकांशी संबंध ठेऊ शकली नसती. मला विनिमयव्यवस्थेविना अस्तित्त्वात असलेल्या जगाची कल्पना करवत नाही. प्रथम मानववंशशास्त्रात (आंथ्रापॉलॉजी) व नंतर अर्थशास्त्रांत जगात अस्तित्त्वात असलेल्या इतर विनिमयवस्था, उदाहरणार्थ नेटवर्क्स, यांचा अभ्यास होत आहे. बाजारातून जशा प्रकारे संपत्तीचे वितरण होते तसेच या व्यवस्थांमध्येही होते. नियमन (रेग्युलेट) न करता बाजारव्यवस्था सोशल कॉस्ट्सचे (उदाहरणार्थ पर्यावरणाच्या हानीची किंमत) वितरण योग्य प्रकारे करत नाही. जर काही दोष असेलच तर तो तंत्रज्ञान किंवा मानवी विकासात नसून लोक कुठल्या प्रकारची नियमन व्यवस्था (रेग्युलेशन रिजिम) राबवतात त्यात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्रेमर, हा प्रतिसाद माझ्यासाठी एखाद्या आधुनिकोत्तर कवितेसारखा आहे. शब्द समजतात, वाक्यही समजतात, पण परस्परसंबंध समजत नाहीये. काही प्रश्न विचारून, मुद्दे देऊन थोडे अधिक तपशील मागवते.
१. विनिमयव्यवस्था बाजाराशिवाय असेल तर कशी असू शकेल याचं एखादं विस्तारित उदाहरण
२. नेटवर्क्स म्हणजे नक्की काय? एखादा सोपा संदर्भ देऊ शकाल काय?

(हवंतर माझा वैचारिक आळस म्हणा, पण थोडं तपशीलवार स्पष्टीकरण द्याल काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१.जास्त लांब न जाता बलुतेदारीच्या पद्धतीकडे पाहता येईल. बाजारात ज्याप्रमाणे ग्राहक-विक्रेते एकत्र येतात (ग्रामीण व्यवस्थेत समजा आठवडेबाजार) तसे न येता वस्तु आणि सेवा यांची देवाणघेवाण होत असे. जातीव्यवस्था ही विनिमयव्यवस्थेचेच एक अंग आहे किंवा कसे या वादात न जाता आपणांस या पद्धतीची कल्पना करणे फारसे अवघड नाही. ही बार्टर (वस्तु किंवा सेवा याच पैशाप्रमाणे मूल्य ठरवण्यासाठी वापरणे) व्यवस्था असल्याने विक्रेता-ग्राहक यांना एक्सचेंज करण्याच्या आधी दोघांनाही एकमेकांकडे असलेल्या वस्तु किंवा सेवा हव्या असायला हव्यात (डबल कोइन्सिडंस ऑफ वॉन्टस) नाहीतर व्यवहार घडत नसे. जेव्हा लोक एखाद्या ट्रेडिंग पोस्टापाशी एकत्र यायला लागले तसतशी बाजार ही विनिमयव्यवस्था विकसित झाली.

२. बाजारात ग्राहक-विक्रेता यांना एकमेकांची पुरेशी ओळख नसली तरी चालते म्हणजे अनामिक राहूनही खरेदी विक्री करता येते.अर्थात आपण दुकानात काही घ्यायला गेलो तर दुकानाचा मालक वगैरे दिसतो पण आपल्याला त्याच्याविषयी आणखी माहिती घेण्याची आवश्यकता नसते. पण समजा एखाद्या अमेरिकन कंपनीला भारतातून काही वस्तु पुरवण्यासाठी कंत्राट द्यायचे आहे तर अमेरिकन कायद्यांमुळे बालकामगार नसणे वगैरे कायदेशीर बाजूंची माहिती ठेवावी लागते तसेच वस्तु वेळेवर व हव्या तशा पुरवल्या जातील याविषयी थोडीफार खात्री असावी लागते. थोडक्यात काही लिंक्स (येथे पुरवठादाराविषयी माहिती) असल्याशिवाय व्यवहार होत नाही अशी विनिमयव्यवस्था म्हणजे नेटवर्क्स असे ढोबळपणे म्हणता येईल. उदाहरणार्थ भारतात मारवाडी व्यापार्‍यांचे एकमेकांस कर्ज देणे किंवा काही लोकांनी मिळून भिशी लावणे वगैरे नेटवर्क्ससची उदाहरणे ठरू शकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>जर काही दोष असेलच तर तो तंत्रज्ञान किंवा मानवी विकासात नसून लोक कुठल्या प्रकारची नियमन व्यवस्था (रेग्युलेशन रिजिम) राबवतात त्यात आहे. विनिमय व्यवस्था नियमन व्यवस्थेचे अपत्य नाही तर त्या दोन्ही समांतर व्यवस्था आहेत, त्यांचा आंतरसंबध आहे. विनिमय व्यवस्थेचे योग्य सामाजिक परिणाम निरंतर मिळण्यासाठी नियमन व्यवस्था योग्य पध्दतिने बनविणे/राबविणे गरजेचे आहे हे मान्य. पण दोष भांडवलशाहीला देताना, त्याच्या राबवणूकीलाच दिला जातो, त्यामुळे दोषाचे खापर फक्त नियमन व्यवस्थेवर फोडता येणार नाही असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नियमन व्यवस्था, विनिमय व्यवस्था, न्याय व्यवस्था वगैरे आणि एखाद्या इकॉनॉमित असलेल्या संस्था (institutions) यांच्यात असलेले संबंध हा क्लिष्ट विषय आहे. प्रतिसादात नियमन व्यवस्थेचेच नाव असणे हे लिहितांनाच्या ढिसाळपणामुळे झाले आहे, संस्थात्मक मांडणी हे कदाचित योग्य ठरले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाजार आणि विनिमय व्यवस्था निर्माण होणे हे नैसर्गिकच आहे कारण बाजार आणि विनिमय माणसाच्या मूळ गरजांव्यतिरिक्त इतर गरजा भागवण्यासाठी आवश्यक आहेत.
पण बाजाराच्या उपयोगापेक्षा त्याचा उपद्रव जास्त होऊ लागतो जेव्हा
१. बाजारातला विनिमय वर्तमानातल्या किवा नजिकच्या भविष्यकाळातल्या ज्ञात गरजा भागवण्यासाठी न होता निव्वळ नफेखोरीसाठी होऊ लागतो. अशा बाजारात होणार्‍या देवाणघेवाणीला नफेखोरीशिवाय कोणतेही Economic Basis नसते. सध्याच्या बाजारात अशा विनिमयाचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाले आहे. अशा नफेखोरीतूनच सामाजिक किंमत वाढत जाते. त्यात, प्रत्यक्ष वस्तूंचे विनिमय न होता पैसा हे विनिमय साधन आल्याने नफेखोरी सोपी झाली आहे आणि बाजार सहजप्रवृत्तीनुसार ज्याच्याकडे जास्त पैसा त्याच्याकडे आणखी जास्त संपत्ती जमा करू लागतो.
Markets by themselves, even when they are stable, often lead to high levels of inequality, outcomes that are widely viewd as unfair. (Joseph Stiglitz, The Price of Inequality (Preface:xiii))
२. तुम्ही म्हणता तशी नियमन पद्धत किंवा बाजाराचा ढाचाच चुकीचा असेल तर वस्तूंचा उपभोग घेतात एक आणि तिची सामाजिक व पर्यावरणीय किंमत भरतात दुसरेच. आपल्या बहुतांश आर्थिक आणि राजकीय व्यवस्था अशा लोकांच्या हातात आहेत की ज्यांचे नियमन केल्याने त्यांना स्वतःला प्रत्यक्ष फरक पडेल.
Any economic system has to have rules and regulations; it has to operate within a legal framework. There are many different such frameworks, and each has consequences for distribution as well as growth, efficiency and stability. The economic elite have pushed for a framework that benefits them at the expense of the rest, but it is an economic system that is neither efficient nor fair. .... Given a political system that is so sensitive to moneyed interests, growing economic inequality leads to a grwoing imbalance of political power, a vicious nexus between politics and economics. (Joseph Stiglitz, The Price of Inequality (Preface:xx))

बाकी तात्त्विक गप्पा कितीही मारल्या तरी आधुनिक बाजार ही एक लोभी लोकांनी लोभी लोकांसाठी राबवलेली लोभाचे उदात्तीकरण करणारी व्यवस्था झालेली आहे. बाजार व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था या दोन्ही मिळून आज आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावर खोलवर प्रभाव टाकत आहेतच शिवाय त्या बदलण्याचे किंवा त्यांना विरोध करण्याचे बळ आपल्यात राहणार नाही याचीही काळजी घेत आहेत.
यात तंत्रज्ञान हे महत्त्वाची भूमिका बजावते आहे. नेहमीप्रमाणे "Guns don't kill people" वगैरे युक्तिवाद यावर करता येतोच, पण तंत्रज्ञान न्यूट्रल आहे यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. मुळात इलिच म्हणतो तसे खरेच ज्या गरजा भागवण्यासाठी तंत्रज्ञान शोधले जाते त्याच तंत्रज्ञानाने त्या गरजा उग्र रूप धारण करतात. उदा. संपर्क साधने वाढूनही माणसांतला संवाद कमी होतो आणि गाड्या आल्या म्हणजे अंतर वाढत जाऊन कालापव्यय कमी होत नाही ते नाहीच.
आजवर एका अडचणीवर मात करण्यासाठी शोधलेल्या तंत्रज्ञानाने इतर अडचणी निर्माण झाल्या आहेत असा इतिहास असतानाही तंत्रज्ञानच आपले सगळ्यांचे सगळे प्रश्न सोडवेल असा आशावाद कोणत्या आधारावर केला जातो हे मला कळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही उल्लेखलेले स्टिग्लिट्झ यांचे पुस्तक मी वाचलेले नाही पण काही परीक्षणे वाचलेली आहेत. त्यावरून त्या पुस्तकाचा विषय विषमतेची किंमत (किंवा विषमतेचा भुर्दंड) सर्व अर्थव्यवस्थेस कशी मोजावी लागते हा असावा असे वाटते. विषमता ही बाजारांमुळे निर्माण होणारी Negative externality असून सरकार अथवा तत्सम संस्थांनी सामाजिक कल्याण (social welfare) वाढवण्यासाठी विषमता कमी करावी, या विचाराशी मी सहमत आहे. बाजार व्यवस्थेअंतर्गत विषमता कमी करता येणे शक्य आहे असा आशावाद मला वाटतो. खुद्द स्टिग्लिट्झ यांनाही खालील उद्धरणावरून तसेच वाटत असावे असे दिसते. (दुवा)

But growing inequality is not inevitable. There are market economies that are doing better, both in terms of both GDP growth and rising living standards for most citizens. Some are even reducing inequalities. ... America can no longer regard itself as the land of opportunity that it once was. But it does not have to be this way: it is not too late for the American dream to be restored.

स्टिग्लिट्झ मुख्यत: अमेरिकेत वाढत असलेल्या विषमतेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. त्यांचा विरोध बाजारांवर आधारीत सर्व अर्थव्यवस्थांना नाही. बाजारांच्या मर्यादा सामाजिक कल्याण वाढवतांना ध्यानात घेतल्या पाहीजेत व सक्षम संस्थांद्वारे बाजारांवर निर्बंध घातले जावेत असे त्यांचे मत असावे. असे निर्बंध (वैयक्तिक स्वार्थ आणि दीर्घकालीन सामाजिक कल्याण दोन्हींना उत्तेजन देऊ शकणारे) अस्तित्त्वात येणे हे अर्थातच अवघड आहे पण बाजारव्यवस्था हा त्यासाठी अडथळा नसून स्वतःचा स्वार्थ साधू पाहणार्‍या मानवी प्रेरणा या मूख्य अडचण आहेत. अशा मानवी प्रेरणा (ज्यांच्या विरहीत कुठलीही समाजव्यवस्था कल्पणे मला अशक्य वाटते) हाच तुमच्या चिंतेचा मूळ विषय आहे असे मला वाटते. तसे असल्यास या प्रेरणांचा उगम आणि नागर संस्कृतीची सुरूवात यांचा परस्परसंबंध दाखवत यायला हवा. तुमच्या प्रस्तावात किंवा तुम्ही दिलेल्या दुव्यातील लेखांमध्ये तसा परस्परसंबंध सिद्ध केलेला दिसत नाही.

पर्यावरणावरील काही विपरीत परिणामांमुळे तंत्रज्ञानावर व्यक्त होणारा राग समजण्यासारखा असला तरी या चर्चेत तंत्रज्ञान हा मुद्दा दुय्यम आहे. तरीही या रागामागची कारणमिमांसा (अडचणी सोडवण्यासाठी उपाय करण्यापुर्वी उपायांमुळे निर्माण होणार्‍या अडचणी ध्यानात न घेणे) पाहता भविष्यात होऊ शकणार्‍या सर्व घडामोडींचे काटेकोर भाकीत करता येणे शक्य नसल्यास कुठल्याही मानवी कृतीचे समर्थन करता येणे शक्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंशतः सहमत.
स्टिगलिट्झ यांना फक्त अमेरिकेची चिंता असली तरी त्यांनी मार्केट्स बद्द्ल लिहीलेले बहुतेक सगळ्या आधुनिक मार्केट्सला लागू पडते. विषमतेचे प्रमाण अर्थव्यवस्थेमध्ये कमी-जास्त असेल एवढाच काय तो फरक. हा फरक सुद्धा अर्थव्यवस्थांच्या ठराविक अवस्थांमुळे असू शकतो. १९५० ते १९८० या काळात अमेरिकेत आर्थिक वाढ होऊनही विषमता फार नव्हती पण एका ठराविक पातळीनंतर वाढ व्हावी म्हणून केलेल्या प्रयत्नांमुळे विषमताच वाढते असे दिसते. (आर्थिक मंदीमुळे अमेरिकेतले मध्य घरगुती उत्पन्न पुन्हा १९८० च्या पातळीला गेले हे रोचक आहे.)
आता यात मार्केटचा काही दोष नसून मानवी प्रेरणेमुळे असे होते असे आपण म्हणू शकतो. पण सरसकट माणसे अशी नसतात किंवा संधी मिळाली तरच लोभीपणा करतात आणि आजची व्यवस्था माणसाच्या लोभीपणाला उत्तेजन देते, पारितोषिक देते म्हणजेच हळूहळू मानवी प्रेरणांना हवा तसा आकार द्यायला लागते. मुळात "माणसाच्या गरजा अमर्याद आहेत आणि स्रोत मर्यादित" आणि "माणूस विचारी असतो." या दोन सरसकट गृहीतकांवर आधारित तयार केलेली Utility Maximization करू पाहणारी व्यवस्था आणखी वेगळी कशी वागू शकेल? फॉर्मलिस्ट आणि सबस्टॅन्टिव्ह वादात सबस्टॅन्टिव्हिजमचा निर्विवाद पराभव झाला आहे हे एकतर्फी जाहीर करून झाले आहे. पण आताशा अर्थशास्त्रज्ञ जेव्हा माणसाच्या अन्न,वस्त्र,निवारा, प्रतिष्ठेचे काम आणि कुटुंबीयांचा सहवास अशा मोजक्याच गरजा असतात असे म्हणून जातात किंवा अर्थशास्त्र हे भौतिकशास्त्रासारखे खरे शास्त्र नाही असे म्हणतात तेव्हा गंमत वाटते.
शेतीपूर्व समाजातही बाजार होता पण तो रेसिप्रोकॅसिटीवर चालत असे. कोणी काही दिले तर त्याची परतफेड करणे या आत्मसन्मानाच्या भावनेतून ही देवाणघेवाण चाले. या संदर्भात सुधा मूर्ती यांच्या पुस्तकात वाचलेली शाळेला दिलेल्या भेटीची परतफेड म्हणून मधाची बाटली देणार्‍या आदिवासी प्रमुखाची गोष्ट आठवल्याशिवाय राहात नाही.

तसे असल्यास या प्रेरणांचा उगम आणि नागर संस्कृतीची सुरूवात यांचा परस्परसंबंध दाखवत यायला हवा. तुमच्या प्रस्तावात किंवा तुम्ही दिलेल्या दुव्यातील लेखांमध्ये तसा परस्परसंबंध सिद्ध केलेला दिसत नाही.

लेखाचा उद्देश प्रगतीवादाचा फसवेपणा दाखवण्याचा होता त्यामुळे सद्यस्थितीवर लक्ष केंद्रित झाले. असा परस्परसंबंध सिद्ध करण्यासाठी वेगळी मांडणी करावी लागेल हे मान्य आहे.

पर्यावरणावरील काही विपरीत परिणामांमुळे तंत्रज्ञानावर व्यक्त होणारा राग समजण्यासारखा असला तरी या चर्चेत तंत्रज्ञान हा मुद्दा दुय्यम आहे.

राग तंत्रज्ञानावर नाही तर तंत्रज्ञानावरच्या अतिलोभाचा आहे. तंत्र नेहमीच माणसासाठी आवश्यक होते. अगदी आदिवासींनाही भाले,तीरकमठे आणि इतर तंत्र शोधण्याची गरज भासतेच पण एका मर्यादेनंतर तंत्रज्ञान माणसाची क्षमता वाढवण्याऐवजी आहेत त्या क्षमतांची उपयुक्तता कमी करू लागते.

(अडचणी सोडवण्यासाठी उपाय करण्यापुर्वी उपायांमुळे निर्माण होणार्‍या अडचणी ध्यानात न घेणे) भविष्यात होऊ शकणार्‍या सर्व घडामोडींचे काटेकोर भाकीत करता येणे शक्य नसल्यास कुठल्याही मानवी कृतीचे समर्थन करता येणे शक्य नाही.

अडचणी सोडवताना उपायांमुळे निर्माण होणार्‍या अडचणींचा विचार करणे शक्य नाही हे बरोबरच आहे म्हणूनच आपल्या पूर्वजांची चूक आहे असे कोणीही म्हणणार नाही पण आता इथून पुढे असलेले धोके दिसत असूनही त्याच मार्गावर चालत राहिल्यास ती नक्कीच चूक असेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानात बर्‍याचदा गल्लत केली जाते. ज्यांना आपण अडचणी समजतो त्या नक्की अडचणी आहेत का याचा विचार झाला पाहिजे. ज्यावर आपण विजय मिळवायला निघालो आहोत तो, निसर्ग असो वा मृत्यू, आपला शत्रू आहे का याचा विचार झाला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.worldaffairs.org/audio-video/2012/china-and-the-global-race.html येथे डॉ. Dambisa Moyo यांची मुलाखत ऐका...(साधारण तासभराचा मासला आहे.)
त्यांच्या भाषणातील एक मुद्दा असा आहे की येत्या दहा ते वीस वर्षात चीन व भारतातील (प्रत्येकी) सुमारे सव्वा ते दीड अब्ज लोक 'मार्केट'ची कास धरुन आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणार आहेत - यामुळे जागतिक स्रोतांवर प्रचंड ताण येणार आहे (वाचा - अमेरिकीय जीवनशैलीचे अनुकरण अडीच अब्ज लोक करु इच्छितात...)

मग मला असं वाटलं की अशी 'प्रगती' खरोखर हवी आहे काय?
उदा. भाषणात म्हटल्याप्रमाणे, अमेरिकेत दर हजार लोकांमागे आठशे गाड्या आहेत तर चीनमध्ये दर हजारी पंच्याहत्तर (त्यांनी भारताचा आकडा दिला नाही, पण नक्की ७५ पेक्षा कमी असावा).
समजा भारतात पुढील २५ वर्षात दर हजारी २०० गाड्या झाल्या तर साधारण ३० कोटी गाड्या होतील!!!
त्यांच्यावर खर्ची पडणारे स्रोत परवडण्यासारखे असतील काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम चर्चा चालु आहे!
दिलेला दुवा वेळ काढून ऐकेन आणि मग मत देईन. दुव्याबद्दल आभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखाचा रोख नक्की समजला नाही. माझ्या टोनसारखाच नकारात्मक आहे इत्कच जाणवलं.
काही मुद्द्यांवर घासूगुर्जींचा प्रतिवाद वाचयला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

विचार करायला उद्युक्त करणारे लेखन आहे.. काहिसे नकारात्मक अंगाने झुकणारे..(ज्याला अनेकदा सत्याच्या जवळ जाणारे असेही म्हटले जाते Wink )
चर्चा वाचतो आहे.. वेळ मिळाताच भर टाकेन

शालेय शिक्षणाविषयी (बहुदा अवचटांचे) एक वाक्य आठवले की "शाळेने मला काय दिले असेल तर न्यूनगंड!" Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

निबंधातल्या निराशावादी विचारांशी बव्हंशाने असहमत असले तरीही निबंध आवडला.

याला +१.

नीड्स हा लेख वाचला. इतर दुवेही बहुतांशी वाचले.

एकंदरीत सारांश पुढीलप्रमाणे वाटतो. 'माणसाने मार्केटरूपी प्राणी पाळला. तो लहान होता तेव्हा उपयुक्त होता. मात्र जसजसा मोठा व्हायला लागला तसं चित्र उलट व्हायला लागलं. बांधलेल्या साखळीने मागोमाग येत रहाण्याऐवजी आता तो इतका प्रचंड झाला आहे की त्याच्यामागे माणूस फरपटत चालला आहे.'

हे चित्र पटत नाही. टीव्हीचं उदाहरण देतो. अनेक लोक टीव्हीविषयी तक्रार करतात. 'काहीतरी भंकस सतत चालू असते. काही चांगलं लागतच नाही. वेळ बरबाद होतो. मुलांना आणि आम्हाला घरबशे व्हायची सवय लागते' पण टीव्हीचा रिमोट त्यांच्याच हातात असतो. टीव्ही नसतानाचं आयुष्य जर सुंदर होतं, तर केव्हाही तो बंद करता येतो. किंवा अगदीच नको असल्यास फेकूनही देता येतो.

तशीच त्या राक्षसी प्राण्याची साखळी सोडून देऊन पुन्हा त्याचं छोटंसं पिलू धरून हवं तिथे मस्त फिरण्याची सोय आजही आहे. याच राक्षसाशी सलगी करून मिळवलेल्या पैशातून दोनचार एकर जमीन आडगावात घ्या. तिथे छान तुम्हाला हवं ते पिकवा. वेगवेगळे प्राणी मारून खा, वेगवेगळ्या झाडांवरची फळं खा, बायोडायव्हर्सिटी वाढवा. डेव्हलपमेंटची रिबेलियन सोडून देऊन नेसेसिटीजना सबमिट व्हा. मग तुम्ही जे काम कराल त्यातलं शॅडो वर्क शून्य असेल. प्रत्येक क्षण न् क्षण केवळ सर्व्हायव्हलसाठीच वहाता येईल. तुम्हाला हे शिकायला कठीण जाईल कदाचित, पण तुमची मुलं आणि त्यांची मुलं यांना तरी या सुंदर विश्वापासून दूर ठेवू नका.

वरचा परिच्छेद तिरकस वाटेल कदाचित. पण सांगायचा मुद्दा आहे की आज तुम्हाला हा मोठा राक्षस - जो काहींना अल्लाउद्दिनचा जीनी वाटतो तर काहींना बकासुर वाटतो - आणि त्याचं लहानगं पिलू यांच्यात निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबहुना हा एवढा प्रचंड झालेला राक्षसही आजवर केलेल्या अब्जावधी निवडींतून मोठा मोठा निवडत जाऊन उत्क्रांत झालेला आहे. या निवडी करणारे आपले सर्वच पूर्वज चुकीचे होते असं वाटत असेल तर तुम्हाला वेगळ्या वाटेने जाण्याचं स्वातंत्र्य आहे. कदाचित त्या मार्गावर एक मैल चालल्यावर तुम्हाला पेस्टिसाइड्स घातलेलं का होईना, बायोडायव्हर्सिटी नसलेलं का होईना, पण अन्न असणं महत्त्वाचं वाटेल. कदाचित तुम्हाला त्या मार्गावर जाऊन अंतिम सुख प्राप्त होईल. मार्ग खुला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहे. काही वर्षापूर्वी पाहीलेला एक दुवा आठवला. (नंदनने दिला होता का?) न्युझिलंड मधे अश्याच एका जोडप्याने आपल्या दोन मुलांना निर्मनुष्य जागी वाढवायचे ठरवले. वर्षातून कधीतरी तिथे हेलिकॉप्टरने त्यांना रसद मिळायची. ते आठवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तीन वर्ष मी स्वतः इंग्लंडमधल्या एका खेड्यापासून काही किलोमीटर अंतरावर राहिले. सुरूवातीचे काही महिने घरात इंटरनेटही नव्हतं. घरात रहाणारी आम्ही ८-१० डोकी आणि सोमवार ते शुक्रवार ऑफिसात भेटणारे आणखी २५-३० लोकं एवढाच आमचा जनसंपर्क होता. आठवड्यातून एकदा आम्ही वाणसामानच्या खरेदीला जायचो तेव्हा सामान्य लोकांचं दर्शन घडत असे. तो एक तास खूप महत्त्वाचा वाटत असे. उन्हाळ्याच्या दिवसात, विकेण्डला हवा चांगली असेल तर घरातून बसल्याजागी गाड्यांच्या जोडीला रस्त्याने धावणारे, सायकल चालवणारे लोकं दिसायचे तेव्हा आम्ही रानी मुखर्जी साईबाबांच्या देवळात गेल्याची बातमी वाचणार्‍या लोकांसारखे वागायचो. घराच्या आवारात एखादी परकी गाडी दिसली ही बातमी आठवडाभर चालत असे.

आणि आमच्यातले बरेचसे लोकं फार गर्दी सहन करू शकत नाहीत तर ही अवस्था. थोडी रसायनं पोटात गेली, धूराची काजळी फुफ्फुसात साचली तरी चालेल पण मी पुन्हा अशा प्रकारच्या निर्जन ठिकाणी रहायला तयार नाही. रस्त्यावरून जाताना ट्रेन दिसली तर थांबून टाळ्या वाजवत, उड्या मारत 'ईस अ ट्रेन' म्हणत नाचणे हा प्रकार विनोदी वाटेल पण फार सुखावह नाही.

----

अमेरिकेत बिझी नसणं हा गुन्हा ठरू शकतो

मनोबा, करायला काही नसणं किती भयंकर असू शकतं हे मी त्या तीन वर्षांत अनेकदा अनुभवलेलं आहे. फार आनंददायी परिस्थिती नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वरचा परिच्छेद तिरकस वाटेल कदाचित.

हे मी आधीच इतरांकडून ऐकले असल्याने मला तिरकस नाही वाटला, पण माझ्यासारख्या जगातल्या वरच्या १०% वर्गातल्या इतर कोणाही माणसाला तिरकस वाटेल आणि हाच परिच्छेद नुकतेच जंगलभागातून किंवा आडगावातून शहरात विस्थापित झालेल्या माणसाला क्रूर वाटेल.
सगळ्या प्रगतीची ८०% फळे खाणार्‍या वर्गाला लेख निराशावादी वाटणे स्वाभाविक आहे.
तरीही असं निसर्गाच्या जवळ आडगावात जायचा गंभीरपणे विचार करायचा म्हटले तर जिथे कारखान्यांची किंवा शहराची घाण ज्यात सोडली जात नाही , ज्यावर वरती धरण बांधलेले नाही अशी नदी/जलप्रवाह असेल; जिथे झाडे उगवण्याइतपत सृजनशील जमीन असूनही शेतीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता नसेल, जिथे आडबाजू समजून आण्विक कचर्‍यापासून शहरांच्या कचर्‍यापर्यंत काहीही डम्प केले जात नसेल, जिथे खाणी नसतील आणि हे सगळं असूनही वन्यप्राणिप्रेमी वनविभागाने तो प्रदेश संरक्षित म्हणून घोषित केला नसेल असा प्रदेश शोधणे भाग आहे.
शिवाय जंगलात (किंवा शहरातही) एकटं राहणं भयंकर आहे या अदिती यांच्या मताशी सहमत आहे. माणूस टोळीने राहणारा प्राणि आहे.
यापेक्षा आणखी एक मार्ग आहे आणि तो म्हणजे मार्केटलाच योग्य त्या गोष्टींची योग्य ती किंमत करायला शिकवणे. त्यासाठी आधी ज्यांना आत्ता कशाचीच झळ बसत नाही पण फायदे सगळे मिळतात त्या एलिट वर्गाने थोडा विचार करण्याची गरज आहे.
आपल्या पूर्वजांना मी तरी मूर्ख समजत नाही. त्यांनी गाय आणि झाडं पवित्र आणि इनव्हायोलेबल ठरवली होती, कार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचा टोन काहीसा असास्च आहे का?(समजून घ्यायचेत मुद्दे म्हणून विचारत आहे.)
अमेरिकेत बंगला किंवा रो हाऊस हे तीन बेडरूमच्या खालचं मिळतच नसावं. त्यांच्या घराला बाहेरचा दरवाजा किंवा दर्शनी दरवाजा हा केवळ जनहित म्हणून ठेवत असावेत. कारण त्या दरवाजाने माणूस आत सणासुदीला येत असावा. कारण सर्वजण गॅरेजमधून घरात शिरतात. मुळात फिरत फिरत आलो आणि भेटलो हा प्रकार कठीण. माणूस गाडीने आत येतो. त्यामुळे तो गॅरेजमधूनच शिरतो. ‘अनोळखी’ डोअर बेल वाजली तर किंचित भीतीचं वातावरण उभं राहतं की न सांगता आलं कोण? कारण तिथे जाण्यापूर्वी कळवायची पद्धत आहे. गलगले घरातून निघाले आणि पडतेंना अकस्मात भेटून गप्पा मारून, चहा पिऊन भेटून आले असा प्रकार नाही. सर्व कसं ठरवून- वुईथ प्रायर अ‍ॅपॉइंटमेंट! कारण सर्व बिझी! अमेरिकेत बिझी नसणं हा गुन्हा ठरू शकतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुमचा टोन काहीसा असास्च आहे का?(समजून घ्यायचेत मुद्दे म्हणून विचारत आहे.)
अमेरिकेत बंगला किंवा रो हाऊस हे तीन बेडरूमच्या खालचं मिळतच नसावं. त्यांच्या घराला बाहेरचा दरवाजा किंवा दर्शनी दरवाजा हा केवळ जनहित म्हणून ठेवत असावेत. कारण त्या दरवाजाने माणूस आत सणासुदीला येत असावा. कारण सर्वजण गॅरेजमधून घरात शिरतात. मुळात फिरत फिरत आलो आणि भेटलो हा प्रकार कठीण. माणूस गाडीने आत येतो. त्यामुळे तो गॅरेजमधूनच शिरतो. ‘अनोळखी’ डोअर बेल वाजली तर किंचित भीतीचं वातावरण उभं राहतं की न सांगता आलं कोण? कारण तिथे जाण्यापूर्वी कळवायची पद्धत आहे. गलगले घरातून निघाले आणि पडतेंना अकस्मात भेटून गप्पा मारून, चहा पिऊन भेटून आले असा प्रकार नाही. सर्व कसं ठरवून- वुईथ प्रायर अ‍ॅपॉइंटमेंट! कारण सर्व बिझी! अमेरिकेत बिझी नसणं हा गुन्हा ठरू शकतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

घासकडवीँचा प्रतिसाद पटला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

आधुनिक अर्थशास्त्राच्या मुळाशी हे गृहीतक आहे: 'गरजा अमर्याद असून त्या पुरवण्यासाठी लागणारे स्रोत/संसाधने (रिसोर्सेस) मर्यादित आहेत'

मोहनदास गांधीन्च्या 'हिन्द स्वराज' (http://www.mkgandhi.org/swarajya/coverpage.htm) मधील गृहीतक : 'गरजा मर्यादित ठेवल्या तर स्रोत अमर्याद आहेत'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या प्रतिक्रीये वरून "स्वावलंबी गावः महात्मा गांधी" ही चर्चा आठवली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars