छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ८: अल्पावधानी (Minimalistic) छायाचित्रे

अल्पावधानी (Minimalistic) छायाचित्रे छायाचित्रे हा छायाचित्रणातला एक अवघड प्रकार आहे. छायाचित्र काढण्याआधी त्यातून नेमके काय दाखवायचे आहे, हे आपण ठरवतो. एका डोंगरासमोर ५० लोकांना एकसमान कॅमेरा देऊन उभे केले तरी ५० वेगवेगळी छायाचित्रे मिळू शकतात. या वेगवेगळ्या शक्यतांमध्ये मजा आहे, आणि यातली एक मजा म्हणजे "अल्पावधानी" छायाचित्रे. या प्रकारात छायाचित्राचा मूळ विषय हा केंद्रबिंदू न ठेवता, त्याच्या आजूबाजूचा परिसर हा सुद्धा चित्राचा अविभाज्य भाग बनतो. हे तंत्र लेखक कथांमध्ये वापरतात किंवा दिग्दर्शक चित्रपटांमध्ये वापरतात. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर, अल्पावधानी चित्रांमध्ये "active subject" एक किंवा दोनच असतात, आणि चित्राच्या छोट्याशा भागात त्यांच्या अवतीभोवतीच्या परिसरात मिसळून गेलेले असतात. त्यांच्या आजूबाजूचा परिसर हा चित्राचा "passive subject" असतो. मला "अल्पावधानी" हा शब्द "Minimalistic" ला पर्यायी वाटला कारण आपलं अवधान चित्रातल्या अल्प विषयाकडे तितक्याच प्रमाणात जातं जितक्या प्रमाणात चित्रातल्या परिसराकडे. आंतरजालावर या प्रकारातली खूप सुंदर छायाचित्रे आहेत. त्यातलेच हे एक उदाहरण -

http://dzineblog.com/2011/03/40-examples-of-minimalist-photography.html

मी स्वतः काही फुटकळ प्रयत्न केले होते… ते खाली देत आहे…

तर अशी "अल्पावधानी" छायाचित्रे स्पर्धेसाठी येतील हि अपेक्षा… छायाचित्रांसोबत तुमच्या शब्दांत थोडे वर्णन दिले तर उत्तम… ते चित्र काढताना ते "अल्पावधानी" प्रकारात काढावेसे का वाटले या संबधी वाचायला छान वाटेल. त्याचबरोबर "अल्पावधानी" या शब्दाला पर्याय सुचवले तर आवडेल.

नियमः
१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १६ फेब्रुवारी २०१५ रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त विषय! धाग्यातले फोटो अतिशय आवडले.

धन्यवाद! आणखी सुंदर छायाचित्रे बघता येतील ही अपेक्षा आहे.

विषय रोचक आहे. आमचा हातभार मात्र प्रतिसादांपुरताच लागेल असे दिसते.
इतरांचे फोटो बघायला उत्सुक आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सगळेच प्रतिसाद बघायला उत्सुक आहे. तुम्हाला या प्रकारची काही उदाहरणे माहित असतील, किंवा या प्रकाराविषयी तुमचं जे interpretation असेल ते पण धाग्यावर नक्की टाका. हा विषय म्हटलं तर संक्षिप्त आहे, आणि म्हटलं तर सर्वव्यापी आहे. त्यामुळे जे काही उत्तमोत्तम बघता येईल ते सर्व आवडेल!

मस्तच विषय

व्यवस्थापकः टॅगमधे रोमन आकडे द्यावेत.

सुंदर! आजोबा - नातवाची जोडी खूप मस्त टिपली आहे. छान फोटोने आव्हानाची सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद!

छायाचित्रण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करत आहे. मुद्दाम असा विषय दिलाय ज्यात "interpretation" ला भरपूर वाव आहे. तुम्ही स्वतः चित्रे काढत नसाल तर आंतरजालावरून चित्रे टाका. नवे काहीतरी सगळ्यांना बघता येईल. "Minimalism" ची साहित्य / चित्रपट / संगीत या माध्यमातली उदाहरणे देता आली तरी चालेल. स्पर्धेला फोटो देण्याचा आग्रह आहेच, पण या विषयावर खूप नव्या गोष्टी शेअर करता येऊ शकतात त्यामुळे कृपया सगळ्यांनी हातभार लावावा हि विनंती…

टीप: पूर्वी पत्रामध्ये "अक्षरास हसू नये" असं म्हणत. तसंच मी म्हणतो, "विषयास घाबरू नये!" (तसेच "विषय" या शब्दाचे चुकीचे अर्थ लावू नयेत!)

अक्षर पाठक नावाच्या एका ग्राफिक डिझाईनर ने "minimalism" चा कल्पक वापर करून "bollywood posters" करायचे ठरवले आणि त्यातून त्याची website तयार झाली. त्याचा दुवा इथे देत आहे. Minimalism चे हे एक अत्यंत विनोदी आणि तेवढेच unique उदाहरण आहे.

Minimalistic Bollywood Posters

या फोटोला minimalism संकल्पनेत मोजता येईल का? तसं असल्यास हा फोटो स्पर्धेत आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नक्कीच! या विषयात interpretation ला वाव आहे, आणि हे छायाचित्र निश्चितच त्या संकल्पनेत बसते. धन्यवाद!

मगाशी दिसत होतं, आता दिसेनासं झालं. काय बदललंत?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फोटो अतिशय आवडले

हा स्पर्धेसाठी आहे.

हा स्पर्धेसाठी नाही. (उगाच जाहिरातबाजी म्हणून इथे दिला.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उलट जो फोटो स्पर्धेसाठी नाहीये तो जास्त समर्पक वाटला विषयाला (म्हणजे त्यावरचा फोटो ही आहेच).
मला तर त्यातून असं वाटतय भूतकाळातल्या चुका व वाईटपणा मुळे (मागे जो काळा (चुका), ग्रेईश(वाईटपणा) रंग आहे भिंतीचा) वर्तमानात आयुष्याचा गुंता झाला आहे. सरळमार्गी कसं जगावं हे दिसतय समोर -भविष्यात (समोरची गूंता नसलेली दोरी पाहून) पण सध्याचा गुंता तरी भलताच त्रास देतोय. असं काहीतरी....नॉट शुअर माझं चित्रग्रहण किती समर्पक आहे पण पाहिल्या पाहिल्या हेच डोक्यात आलं.

रसग्रहण आवडलं.

त्या बाबतीत सहमत आहे. पण फोटोंमध्ये तोचतोचपणा आहे. पहिल्या फोटोत दिशाहीनता आहे आणि तो स्पर्धेसाठी दिला म्हणून हा तिसरा फोटो स्पर्धेबाहेरच ठेवला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

.

रोचक विषय आणि सुंदर प्रतिसाद!

या वेळेस खूप कॉम्पिटिशन आहे. मला तर सर्वच आवडले.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...


२०१२ च्या दिवाळीच्या दिवशी सूर्याकडून सोलर पॅनेलला प्रकाशाची भेट.

पहिला आणि तिसरा हे दोन फोटो अफाट आवडले, सुंदर!

धन्यवाद.

निकाल

स्पा, ३_१४ विक्षिप्त अदिती, सायली आणि पीटी यांनी स्पर्धेत उत्साहाने भाग घेतल्याबद्दल आभार! सगळ्यांची छायाचित्रे छान आहेत आणि अल्पावधानी छायाचित्रांची व्याख्या रुंदावणारी आहेत. चित्रांसोबत तुमच्या शब्दांत त्यांचे वर्णन आले असते तर अजून आवडले असते. स्पा यांची सर्वच छायाचित्रे उत्तम! आदिती आणि सायली यांनी काढलेली चित्रे रोज दिसणाऱ्या गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने बघणारी अशी होती. पीटी यांचीही छायाचित्रे उत्तम! अथांग समुद्र आणि आपण, हि minimalism साठी आदर्श जोडी असावी बहुधा. समुद्रापाशी चिमुकले दिसणारे आपण, तसे चिमुकले होता यावे म्हणूनच किनारे धुंडाळतो की काय माहित नाही.

असो. तर यावेळचा निकाल खालील प्रमाणे -

तृतीय क्रमांक: पीटी यांच्या सर्व छायाचित्रांपैकी किनाऱ्यावरच्या वाळूमधल्या रेषा, आणि त्या रेषा तुडवणारे पाय घेऊन चालणारा माणूस असलेले छायाचित्र फार आवडले. हे चित्र रत्नागिरीचे काय हो? तिथे काळा किनारा आणि गोरा किनारा अशा भानगडी असल्याचे आठवते. हे छायाचित्र बहुधा काळ्या किनाऱ्याचे असावे असे वाटले. तसेच मागच्या डोंगरावर lighthouse ची पुसट आकृती असल्याचा भास होतो आहे म्हणून रत्नागिरी वाटले. एकूणच छायाचित्र छान जमले आहे.

द्वितीय क्रमांक: स्पा यांचे निळेशार छायाचित्र. इवल्याशा मुंगीला लहान म्हणून चिरडून टाकू शकणारे आपण, अथांग समुद्रात स्वतः किती मुंगी सारखे आहोत हे दाखवणारे. या चित्रात दिसणारे ढग भयावह आहेत. वरकरणी शांत दिसणाऱ्या समुद्राला डिवचणारे, युद्धाचे आव्हान देऊ पाहणारे… समुद्र शांत आहे, वरच्या ढगांची पर्वा न करता कसली तरी वाट पाहत आहे असे भासवणारा… आणि या सर्व परिसरात दिसणारं मुंगी एवढं जहाज. समोर तुफानी ढग दिसत असताना प्रकाशात राहण्याची पराकाष्ठा करणारं… छायाचित्रात या सर्व गोष्टी focus मध्ये आहेत त्यामुळे सगळीकडे समान लक्ष जातं. आणि या सगळ्या पात्रांना एकत्र केलंय ते निळ्या छटेने, आणि रवेदार (grainy) effect ने.…

संयुक्त प्रथम क्रमांक: सायली आणि ३_१४ विक्षिप्त अदिती यांच्या खालील दोन चित्रांना मी संयुक्त प्रथम क्रमांक देत आहे. ही छायाचित्रे विशेष आहेत कारण नेहमीच्या गोष्टी त्यांनी वेगळ्या दृष्टीकोनातून पहिल्या म्हणून. सायली आणि अदिती यांनी त्यांच्या शब्दांत, "ही चित्रे अशीच का काढली" याचे थोडे वर्णन दिले असते तर बहुधा त्यांचे क्रमांक विभागण्यास मला मदत झाली असती. पण तसे नसल्याने, माझ्या मते हि दोन्ही चित्रे "संयुक्त प्रथम" असणे योग्य आहे.

सायली यांचे शिडीचे चित्र: स्वभावाने neutral असणारा पांढरा रंग म्हणजे मिनिमालीस्म चा आदर्श ठरावा! चित्रातली भिंत अंगावर पांढरा रंग घेऊन आधीच "मी बाई passive subject च बरी" असं म्हणून मागे उभी आहे. पण खरा खेळ रंगलाय तो लोखंडी पायऱ्या आणि त्यांच्या सावल्यांचा… आकाशातून पळणाऱ्या सूर्याप्रमाणे बदलणारी सावली, आणि भिंतीला match व्हावं म्हणून पांढऱ्या रंगाने नटलेली, स्वतःचा आकारही बदलू न शकणारी पायरी, यांना एकाच खुंटाला बांधण्यात आलंय. या चित्राची harmony इतकी सुंदर आहे की त्या शिड्यांवर कुणाचा पाय जरी आला असता तरी तो व्यत्यय वाटला असता. या चित्राला "शिडीची सावली" म्हणावं की "सावल्यांची शिडी"?

३_१४ विक्षिप्त अदिती यांचे रंग उडालेल्या फळ्याचे / भिंतीचे चित्र: या चित्रात मला अतिशय आवडलेली गोष्ट म्हणजे रंगसंगती. या चित्रातल्या गोष्टींबद्दल मला जराशी शंका आहे. मला चित्र बघून वाटले त्याप्रमाणे एक रंग उडालेला फळा आणि त्याला बांधून ठेवलेली पेन्सिल यांचे हे छायाचित्र आहे. तो फळा आहे की नुसतीच भिंत आहे ते ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सांगावे हि विनंती. जरी कशाचे चित्र आहे याबाबत मला शंका असली, तरी हे चित्र मला पाहताक्षणीच आवडले होते. यातली भिंत / फळा सायलीच्या चित्रापेक्षा अगदी उलट. "मुझे कुछ कहना है" म्हणणारा / री… त्याचा मूळ काळा रंग उडालाय, आणि एक "किळसवाणा / थुंकीय लाल" रंग कुणीतरी त्याच्यावर उडवलाय. उडालेला आणि उडवलेला रंग अंगावर बाळगून थकल्याने, अगदी कोपऱ्यात कुठेतरी "neutral / surrendaring" पांढरा रंग डोकं वर काढतोय. आणि या सर्वांपासून स्वतःकडे लक्ष वेधून घेणारी, एक दोरी पुरली नाही म्हणून दोन वेगवेगळ्या दोऱ्यांनी बांधलेली पेन्सिल / खडू. मी जे पाहतोय ते पेन्सिल किंवा खडूच आहे हे सुद्धा स्पष्ट करावे हि विनंती… सायली यांच्या "neutral" कृष्णधवल चित्राच्या विरुद्ध रंगांच्या खूप बारीक छटा असलेलं हे छायाचित्र पण मिनिमालीस्म च्या व्याख्येला "paraphrase" करतंय बहुधा… एकूणच, चित्रातल्या content विषयी साशंक असूनही मी या चित्राला संयुक्त प्रथम क्रमांक देतोय ते यातल्या रंगसंगतीमुळे, आणि चित्रातल्या अर्थाच्या शक्यतांमुळे… मला जे दिसलं, त्याप्रमाणे मी अर्थ लावला… स्वतः बनवलेली एखादी गोष्ट आपल्याला खास वाटली नाही तरी इतरांना अर्थपूर्ण वाटू शकते. चौकोन / त्रिकोण एकत्र करून बनवलेले "modern art" बहुधा याच कारणामुळे "art" ठरत असेल…

हा निर्णय सर्वस्वी माझ्या दृष्टीकोनातून आहे. माझ्या विश्लेषणाबद्दल कुणाला आक्षेप असल्यास चर्चा करायला मला आवडेल, पण स्पर्धेच्या नियमानुसार, मी दिलेले क्रमांक अबाधित राहतील.

विस्तृत विश्लेषणात्मक प्रतिसाद आवडला.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

मुळापासून, अचूक ओळखलत. फोटो रत्नागिरीच्या काळ्या किनार्‍याचा आहे. फोटो काढताना मिनिमलिस्टिक थिम डोक्यात ठेवून काढला नव्हता. तुमचे फोटोंचे विश्लेषण आवडले. इतर विजेत्यांचे अभिनंदन.

या काळ्या / गोऱ्या किनाऱ्यांसाठी रत्नागिरीमध्ये प्रचलित शब्द काय आहेत? मी विसरलो.

स्पर्धेचा विषय उत्तम होता. विजेत्यांचे अभिनंदन.
मनासारखी चित्रे टिपायला सध्या वेळ नाही त्याची रुखरूख लागली. काही जुनीच चित्रे देतो आहे, जी टिपताना मिनिमलिस्टिक असा विषय डोक्यात ठेवून टिपलेली नव्हती पण स्पर्धेचा विषय पाहिल्यावर त्याजवळ जाणारी वाटतात.
----
१. निवळ

Camera: Canon Canon PowerShot S2 IS, Exposure: 1/1000 sec, Aperture: 4.0, Focal Length: 6mm
-----
२. मुखवटे

Camera: NIKON COOLPIX L120, ISO: 400, Exposure: 1/8 sec, Aperture: 4.0, Focal Length: 12.6mm
-----
३. झेप

Camera: NIKON COOLPIX L120, ISO: 280, Exposure: 1/250 sec, Aperture: 3.2, Focal Length: 5.1mm, Flash Used: No
------
४. एकल

Camera: Canon PowerShot S2 IS, Exposure: 1/640 sec, Aperture: 4.0, Focal Length: 42.8mm
------

छायाचित्रे सुंदर आहेत. मला दुसरे आणि चौथे छायाचित्र विशेष आवडले. दुसऱ्या छायाचित्रात दिसणारी खिडकीबाहेरच्या झाडाची सावली आणि चौथ्या छायाचित्रातला सोनेरी प्रकाश सुंदर आहे.

मुळापासून, आभार. मी हा फोटो कुठे काढला हे आता आठवत नाहीये, त्यामुळे हे नक्की काय आहे हे सांगता येणं कठीण आहे. दिसतंय त्यानुसार रस्त्यावर असणाऱ्या खाद्यपदार्थांची गाडी किंवा इन्फ्रास्ट्रक्चरपैकी कसलातरी पत्र्याचा खोका असावा. खोक्याचा डाव्या बाजूचा, खालचा रंग उडून तिथे गंज वाढायला लागला असावा. तांबुलाची भर कदाचित पडली असेल. त्या खोक्याला (का कोण जाणे) वरच्या बाजूला प्लास्टिकची दोरी आणि तिला खाली सुतळ जोडली आहे.

हा फोटो का याचं नेमकं उत्तर देता येणार नाही. मला त्यातला नैसर्गिक कारणांमुळे तयार झालेला पत्र्याचा पोत आवडला, प्लास्टिकच्या दोरीला जोडलेली सुतळ आणि त्या दोन्हींची गाठ हा प्रकार रंजक वाटला. काहीच नाही तर बघायलाही गंमत वाटली म्हणून हा फोटो काढला.

---

सायलीशी बोलून पुढचा धागा लवकरच येईल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"पत्र्याचा खोका…" हाहा… मी भलतीकडेच गेलो (भिंत / फळा)… असो… स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद!