राजा राममोहन रॉय आणि सती प्रथा निवारण

When the social reformer challenges society there is nobody to hail him a martyr. There is nobody even to befriend him. He is loathed and shunned. But when the political patriot challenges Government he has whole society to support him. He is praised, admired and elevated as the saviour. Who shows more courage?"-The social reformer who fights alone or the political patriot who fights under the cover of vast mass of supporters?
- डॉ. बी.आर. आंबेडकर

ब्रजविनोद रॉय शेवटच्या घटका मोजत होते.

त्यासमयी त्यांना गंगाकिनारी आणले गेल. ब्रजविनोद रॉय यांना अंत्यसमयी सिरामपोर जिल्ह्यातील श्यामाचरण भट्टाचार्य यांनी एक वर मागितला.
ब्रजविनोद बाबूंनी गंगेची शपथ घेउन त्यांना रुकार दिला. ह्यावर श्यामाचरण बाबूंनी वर मागितला की त्यांच्या कन्येचा, ब्रजविनोद बाबूंच्या सात पैकी एका पुत्राशी विवाह करावा. श्यामाचरण बाबू हे भंग (कमी दर्जाच्या) कुळातील तर होतेच शिवाय ते शाक्तही (शक्ती चे उपासक) होते आणि रार्‍ही ब्राम्हण असलेले रॉय बाबू हे वैष्णव (चैतन्यचे(विष्णू) उपासक) होते. शाक्त आणि वैष्णव यांच्यात बेटीसंबंध ही फार अवघड गोष्ट होती. पण रॉय बाबूंनी तर गंगामातेची शपथ घेउन वचन दिल होत.
रॉय बाबूंनी त्यांच्या सगळ्या पुत्रांना आपल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी विचारल असता रमाकांत बाबू सोडून इतर सर्वांनी नकार दिला.

यथासांग रमाकांत बाबू यांचा विवाह श्यामाचरण यांची कन्या तरीणी देवी, ज्या पुढे फूल ठकुरानी या नावाने ओळखल्या गेल्या, यांच्याशी झाला. या दांपत्याला पुढे दोन पुत्र, जगन्मोहन (की जगमोहन?) आणि राममोहन आणि एक कन्यारत्न प्राप्त झाले. हा राममोहन म्हणजेच राजा राम मोहन रॉय.

राजा राम मोहन रॉय यांना परंपरांनी जखडलेला भारत आणि सर्व परंपरा झुगारून देणारा भारत यांच्यामधील पूल अस म्हटल जात. त्यांच जीवन कार्य इतक प्रचंड आणि असाधारण आहे की त्याचा केवळ एकाच लेखात धावता आढावा घेणदेखील शक्य नाही.

त्यामुळ इथे या लेखात त्यांच्या सतीप्रथेविरुध्दच्या कार्याची फक्त ओळख करायचा हा एक प्रयत्न आहे. ह्यातील माहीती जास्तीत जास्त अचूक येइल यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेला असला तरीदेखील सूक्ष्मशी चूक आढळल्यास तत्काळ निदर्शनास आणावी ही विनंती.

जन्म आणि शिक्षण

२२ मे १७७२ (१७७४?) रोजी बंगालमधील राधानगर येथे जन्मलेल्या राममोहन यांच्या जडणघडणीत त्यांच्या माता-पित्यांच्या घराण्यांचा संबंध फार मोठा आहे. वडीलांकडील सर्व मंडळी आधुनिक शिक्षण घेतलेली आणि बहुतांश सरकार दरबारी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारी होती. त्यामुळ त्यांच्या वडीलांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांना अरबी, फारसी या त्याकाळच्या सरकारात / व्यवहारात वापरल्या जाणार्‍या भाषा आणि शास्त्र शिकण्यासाठी पाटण्याच्या एका मदरशात (मुक्तब) पाठवल. मदरशामधे अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.
तिथ शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी आईच्या प्रभावामुळे, ज्यांच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी म्हणून बनारस (काशी) इथ त्यांना पाठवण्यात आल. तिथ त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदांत, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारस मधे वास्तव्य केल.

हे अस दोन टोकाच्या किंवा पूर्ण वेगवेगळ्या व्यवस्थेत शिक्षण घेउन राम मोहन वयाच्या सोळाव्या वर्षी घरी परत आले. घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहीला. यामधे त्यांनी मूर्तीपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्यामते मूर्तीपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळ वडीलांशी त्यांचे पटेनास झाल आणि स्वत्:च घर सोडून निघून गेले.

भटकत भटकत ते तिबेट पर्यंत गेले. तिथे बुद्ध धर्माच्या प्रमुख भूमीत त्या धर्माचा अभ्यास चालू केला. परंतू तिथ शिकवल्या जाणार्‍या एकेश्वरवादाची मते त्यांना पटली नाहीत. त्यांचे मत त्यांनी उघड बोलून दाखवल असता त्यांना हिंसेचा सामना करावा लागला, आणि प्रकरण जीवावर बेतल. त्यावेळी काही स्थानिक स्त्रीयांनी राम मोहन बाबूंचा जीव वाचवला. ह्या प्रसंगान त्यांच्या मनात स्त्रीयांविषयी अतिशय आदरभाव उत्पन्न झाला.

दरम्यानच्या काळात रमाकांतबाबूंनी पुत्राला शोधण्यासाठी काही लोक पाठवले होते. वडीलांचा निरोप मिळाल्यावर राम मोहन बाबू पुन्हा एकदा घरी आले. घरी आल्यावर वडीलांनी त्यांच लग्न लावून दिल.

सती प्रथेशी संबंध आणि विरोध

इ.स. १८१२ मधे त्यांचे थोरले बंधू जगन्मोहन यांचा मृत्यू झाला. त्याप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांनी बळजबरीन जगन्मोहन यांच्या पत्नीला सती जायला लावल. राम मोहन यांनी त्याप्रसंगी विरोध केला, पण तो प्रकार थांबवू शकले नाहीत.

त्या काळात स्त्रीया सती जाण्याच प्रमाण प्रचंड होत. तत्कालीन पंडीतांच्या मते पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीपुढे दोनच पर्याय असत. एक म्हणजे सर्व सुखांचा त्याग करून अत्यंत कठोर नियमांनी बद्ध अस जीवन जगणे किंवा दुसरा पर्याय म्हणजे सती जाणे. एकदा स्त्रीनं सती जाण्याचा निर्णय घेतला असता तिला त्यापासून परत फिरता येत नसे. अर्थात ज्या समाजात स्त्रीला मूळातच दुय्यम स्थान होत (/आहे) आणि जिला स्वतःचा आवाजच नव्हता ती हा निर्णय स्वतः घेत असेल ही शक्यताही धूसरच आहे.

भावनेच्या भरात एखाद्या स्त्रीन असा निर्णय घेउन नंतर चितेवर गेल्यावर तिथून परत फिरायचा प्रयत्न केला तर तिला मोठ्या मोठ्या बांबूंच्या सहाय्यान आत ढकलंल जात असे. तिचा आक्रोश कोणाला ऐकायला येउ नये यासाठी तिथ मोठ-मोठी वाद्य वाजवली जात. कलकत्त्याच्या स्मशानभूमीत वाद्यांच्या गजरात पतीच्या चितेवरती बळजबरीन जाळल्या जाणार्‍या स्त्रीया हे नेहमीच दृश्य असे. बरेचदा त्या स्त्रीला नशा येणारा भांग किंवा तत्सम पदार्थ दिला जात असे आणि त्या अमलाखाली असतानाच ती चितेवर गेली की तिला तिच्या मृत पतीच्या प्रेताशी बांधून टाकण्यात येई.

बंधू च्या मृत्यूनंतर अशाप्रकारे त्यांच्या पत्नीला देखील जाळल्यामुळ राम मोहन प्रचंड व्यथित झाले आणि त्यांनी सती प्रथे विरोधात मोहीम उघडली. राम मोहन बाबू स्मशानात जाउन सती जाणार्‍या स्त्रीयांच मन वळवायचा, त्यांना सती जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत.

ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीन १७९८ साली कलकत्त्यामधे सर्वप्रथम सतीबंदी कायदा लागू केला. परंतु हा फक्त कलकत्ता शहरापुरताच लागू होता.
त्यानंतर विल्यम कॅरे हा ख्रीश्चन मिशनरी आणि विल्यम विल्बरफोर्स या दोघांनी सती प्रथेविरुद्ध आंदोलन आणि प्रचार सुरु केला. याची दखल घेउन कंपनी सरकारन १८१३ मधे सती जाणार्‍या स्त्रीयांची मोजणी सुरु केली.

सती प्रथेचे बळी

इ.स. १८१५ ते १८२८ या दरम्यान सती प्रथेमुळे किती हिंदू स्त्रीया प्राणाला मुकल्या याची सरकारी आकडेवारी खालीलप्रमाणे;

१८१५ १८१६ १८१७ १८१८ १८१९ १८२० १८२१ १८२२ १८२३ १८२४ १८२५ १८२६ १८२७ १८२८
कलकत्ता २५३ २८९ ४४२ ५४४ ४२१ ३७० ३७२ ३२८ ३४० ३७३ ३९८ ३२४ ३३७ ३०९
ढाक्का ३१ २४ ५२ ५८ ५५ ५१ ५२ ४५ ४० ४० १०१ ६५ ४९ ४७
मुर्शीदाबाद ११ २२ ४२ ३० २५ २१ १२ २२ १३ १४ २१ १०
पटना २० २९ ४९ ५७ ४० ६२ ६९ ७० ४९ ४२ ४७ ६५ ५५ ५०
बनारस ४८ ६५ १०३ १३७ १०३ ११४ १०२ १२१ ९३ ५५ ४८ ४९ ३३
बरेली १५ १३ १९ १३ १७ २० १५ १६ १२ १० १७ १८ १०
एकूण ३७८ ४१२ ७०७ ८३९ ६५० ५९७ ६५४ ५८३ ५५७ ५७२ ६३९ ५११ ५१७ ४६३

राम मोहन रॉय यांच्यामते संपूर्ण बंगाल प्रांतात (जो आजच्या पश्चीम बंगालपेक्षा बराच मोठा होता) प्रत्यक्षात सती जाणार्‍या स्त्रीयांची संख्या या आकडेवारिच्या दसपट तरी असेल. ज्येष्ठ बंधूंच्या पत्नीच्या मृत्यूनंतर राम मोहन यांनी थेट स्मशानात जाउन सती जाणार्‍या स्त्रीयांना थांबवण्याचा प्रयत्न केला. काही प्रसंगी ते यशस्वी देखील झाले.

१८१८ मधे प्रथेला विरोध करणारा एक लेख प्रसिद्ध केला. यामधे एक प्रथेचा समर्थक आणि एक विरोधक यांच्या संवादातून त्यांनी सती प्रथेच्या समर्थनार्थ दिल्या जाणार्‍या कारणांच खंडन केल आहे. त्यांनी मांडलेले बहुतांश मुद्दे हे आजही जसेच्या तसे, लागू होतात.
ह्या लेखात त्यांनी चर्चेला घेतलेले प्रमुख मुद्दे म्हणजे स्त्रीया ह्या मुळातच पुरुषांपेक्षा हीन आहेत, त्यांची शारिरिक क्षमता पुरुषांपेक्षा कमी आहे. स्त्रीया निर्बुद्ध असतात, निर्णय घ्यायला सक्षम नसतात. त्यांच्यावरती (चारित्र्या बाबतीत) विश्वास ठेवला जाउ शकत नाही . त्या फार भावनिक असतात. हे आणि इतरही काही मुद्दयांचा समाचार त्या निबंधात घेतला आहे.
त्या काळच्या प्रथेच्या समर्थकांनी ही सगळी कारण हे स्त्रीच अस्तीत्वच गौण असत, तिला तिचा पती हाच परमेश्वर असतो आणि त्याच्याशिवाय तिच अस्तित्वच नाही हे सिद्ध करण्यासाठी हा सगळा प्रपंच केला होता अस दिसतय. ("त्या काळच्या" समर्थकांनी अस म्हणायच कारण उपसंहारात आहे.)

सती जाणे ही वरवर जरी धार्मिक प्रथा दिसत असली तरी अनेकदा एखाद्या स्त्रीला सती जायला लावण्यात लोभी नातेवाईकांचादेखील हात असे. ह्यामुळ धर्माचा सर्रास आधार याकामी घेतला जात असे. त्यामुळ १८३० मधे, सरकारन १८२९ मधे या अमानुष प्रथेवर बंदी घातल्यानंतर, राम मोहन बाबूंनी Suttee and the Shastras असा एक लेख लिहीला. यामधे त्यांनी वेद, स्मृती, भगवद्गीता यांतील अनेक श्लोकांचा आधारे या प्रथेला शास्त्राधार नाही हे दाखवून दिल. त्यात त्यांनी अंगिर आणि व्यास ऋषी यांचे प्रथेचे समर्थन करणारे तर मनु, याज्ञवल्क्य, भगवद्गीता यांचे ही प्रथा सक्तीची नसून सर्वस्वी ऐच्छीक असल्याचे दाखले दिले आहेत.

फलित

४ डिसेंबर १८२९ रोजी, राजा राम मोहन रॉय आणि इतरांच्या प्रयत्नाला यश येउन, सती प्रथा बंद करण्याविषयीच विधेयक लॉर्ड विल्यम बेंन्टीन्क गव्हर्नर जनरल, व्ह्यायकाऊंट काँबरमीअर कमांडर-इन-चीफ, डब्ल्यू. बी. बेयले आणि सर सी. टी. मेटकाफ यांच्या संयुक्त समीतीन संमत केल.

१६ जानेवारी १८३० ला राम मोहन रॉय यांनी लॉर्ड विल्यम बेन्टीन्कला सती प्रथेवर कायद्यान बंदी घातल्याबद्दल अभिनंदन आणि आभाराच एक पत्र पाठवल.

परंतू यानंतरही सती प्रथेच्या समर्थक धर्म मार्तंडांनी, तत्कालीन सर्वोच्च न्यायपीठ म्हणजेच प्रीव्ही कौन्सीलपुढे याचिका दाखल केली. दिल्लीचा मुघल बादशहा अकबर दुसरा याच्यावतीन त्याची तनखा वाढवून देण्यासाठी "राजा" हा किताब देउन राम मोहन रॉय यांची नियुक्ती झाली होती. त्या बादशहाची बाजू मांडण्यासाठी राजा राम मोहन रॉय १८३० साली इंग्लडला गेले.

तिथे असतानाच त्यांनी सरकारपुढे सती प्रथेविरोधात पुन्हा एकदा बाजू मांडली.
११ जुलै १८३२ रोजी इंग्लंडच्या प्रीव्ही कौन्सीलपुढे या विधेयकाला विरोध करणारी याचिका फेटाळण्यात आली.

इंग्लंडमधील स्टेपलटन या गावी २७ सप्टेंबर १८३३ रोजी या महात्म्यान या जगाचा निरोप घेतला. दक्षिण ब्रिस्टल मधील आर्नोस वॅले दफनभूमीत त्यांच दफन करण्यात आल.

उपसंहार

ब्रिटीश कंपनी सरकारन १८२९ मधे कायदा करून यावर बंदी आणूनही १९४३ नंतर किमान ४३ स्त्रीया सती गेल्याची नोंद आहे.
४ सप्टेंबर १९८७ रोजी, राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील देवराला गावात १८ वर्षाची रूप कुंवर सती गेली. रूप कुंवरच्या सती जाण्याचे उदात्तीकरण करण्याच्या आरोपाखाली ज्या ११ लोकांवर गुन्हा दाखल केला त्या सर्वांना जयपूरच्या विशेष न्यायालयान "सबळ पुराव्याअभावी" ३१ जानेवारी २००४ रोजी मुक्त केल. याहून वाईट गोष्ट म्हणजे रूप कुंवर चे एक मंदीर देखील बांधण्यात आल आहे जिथ आता नियमीत यात्रा भरते आणि त्या यात्रेवर बंदी घालायला (सती प्रथेच उदात्तीकरण करायला कायद्यान मनाई असताना देखील) न्यायालयान नकार दिला आहे.

अलीकडील घटना: छत्तीसगढच्या रायपूर जिल्ह्यातील चेचेर गावची रहिवासी असलेली ७१ वर्षीय लालमती नावाची महिला १३ ऑक्टोबर २००८ रोजी सती गेली.

संदर्भः
१. Raja Ram Mohun Roy His Life Writings and Speeches
२. Sati Tradition - Widow Burning in India: A Socio- legal Examination
३. विकीपीडीया

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

सती संबंधी काहीही वाचवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझंही अगदी असंच होतं....फार भयंकर वाटत राहतं काहीतरी. अतिशय उदास, निराश वाटतं.(सातारकर,तुमचा लेख माहितीपूर्ण आहे..त्याबद्दल आभार..या प्रथेविरुद्ध लढलेल्या मंडळींच्या मोठेपणाबद्दल मी काय बोलणार? आपलं लहानपण दिसून येतं इतकच..पण या प्रथेचा उल्लेख कुठे वाचला, पाहिला की त्या स्त्रियांच्या विचाराने एक माणूस म्हणून शून्य शून्य वाटतं...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी असंच वाटतं याविषयी काहीही वाचताना..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सती प्रथेच्या विरोधात कायदा व प्रबोधन अशा दुधारी शस्त्राने दीर्घ काळ लढावे लागले. राजा राम मोहन रॉय यांचा उत्तम परिचय करुन दिल्याबद्दल धन्यु!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

माहितीपूर्ण लेख

राममोहन राँय यासारख्या आदरणीय व्यक्तिमत्वाचा परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद

He is called as father of mordern india
ही सतीप्रथा भारतात गुप्तकाळाच्या अगोदर चालू झाली
पहिला सतीचा उल्लेख मध्यप्रदेश येथे केलेल्या उत्खननात सापडतो
उत्तरोतर या प्रथेचे उदात्तीकरण होत गेले
अकबराने यावर बंदी घातल्याची नोँद आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

माहितीबद्दल अनेक धन्यवाद.

अकडेवारी भयानक आहे. लेखाच्या अनुशंगाने, वारसा-हक्काशिवाय सती-प्रथेमागे इतर कोणती कारणे असतिल ह्याबद्दल चर्चा झाल्यास त्यातुन तात्कालिक समाजाची मानसिकता समजण्यास सोपे जाइल, धार्मिक अंधळेपणा आणि संपत्तीची हाव ही कारणे जात्याच कमजोर स्त्रियांवर असे अन्याय करण्यासाठी तोकडे वाटत आहेत.

१८१८ मधे प्रथेला विरोध करणारा एक लेख प्रसिद्ध केला.

हा लेख संदर्भात दिलेल्या लेखापैकीच आहे काय? नसल्यास हा मिळाल्यास उत्तम माहिती मिळू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीबद्दल आभार. राम मोहन रॉय यांच्या आजोबांपासून असलेली बंडखोर पार्श्वभूमी माहित नव्हती. राजा राममोहन रॉय यांनी केलेला विविध धर्मांचा अभ्यासही माहित नव्हता. त्यांनी सतीबंदीसाठी केलेलं काम महान आहेच, पण त्यामागे असणारी त्यांची अभ्यासू आणि बंडखोर पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं वाटतं.
जिवंत माणसाला जाळण्याचं कोणतंही समर्थन तोकडंच वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगली माहिती.. असेच विस्तृत लेख येत राहु द्या!

समांतर माहिती: सतीप्रथा भारतात केवळ पतीसोबत नाहि तर मुलासोबत आई - आजी वगैरे स्वरुपातही होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राजा राममोहन रॉय यांची केवळ साधारण माहिती होती. या लेखामुळे त्यांच्या लढ्याचे अनेक पैलू समोर आले. त्यांनी लिहिलेला सती ऍंड शास्त्राज हा लेख कुठे सापडू शकेल का? त्यांनी कुठच्या कुठच्या मुद्द्यांचं खंडन केलं आहे हे वाचून त्या वेळच्या मतप्रवाहाचा अंदाज येईल.

त्यांचा दसपटीचा अंदाज खरा असेल, तर बंगाल प्रांतात वर्षाला सुमारे पाच हजार स्त्रिया सती जायच्या. त्या वेळच्या लोकसंख्येच्या मानाने हे प्रमाण प्रचंड आहे. इतक्या आयुष्यांना क्रूरपणे जाळून मारायचं या कल्पनेनेच काटा येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@जाई
अकबराने यावर बंदी घातल्याची नोंद आहे
बहुतेक सर्व परकीय आक्रमकांनी यावर बंदी घातल्याची नोंद आहे. मुघल, इंग्रज, फ्रेंच आणि बहुतेक डच सुध्दा. कोणत्याही हिंदू राजान यावर बंदी घातल्याचा उल्लेख सापडला नाही. जिजाउंना सती जाण्यापासून शिवाजीनी परावृत्त केल्याचा उल्लेख असला तरी पुन्हा त्यांच्या मृत्यूनंतर एक पत्नी सती गेल्याचा उल्लेख आहे बहुतेक.

ही सतीप्रथा भारतात गुप्तकाळाच्या अगोदर चालू झाली
प्रथा नक्की कधी सुरु झाली याविषयी बरेच मतभेद आहेत.

@ मी, राजेश
हा लेख संदर्भात दिलेल्या लेखापैकीच आहे काय? नसल्यास हा मिळाल्यास उत्तम माहिती मिळू शकेल.
त्यांनी लिहिलेला सती ऍंड शास्त्राज हा लेख कुठे सापडू शकेल का?
संदर्भातील क्र. १ मधे दिलेल्या पुस्तकात हे दोन्ही लेख अहेत.

@ऋषिकेश
समांतर माहिती: सतीप्रथा भारतात केवळ पतीसोबत नाहि तर मुलासोबत आई - आजी वगैरे स्वरुपातही होती.
नेपाळमधे तर राजघराण्यातील लोकांबरोबर सेवकांनी (स्त्री / पुरुष) सती गेल्याचेही उल्लेख आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. एका क्षुल्लक घटनेपासून सामाजिक प्रवाहापर्यंत कथानक नेण्याची शैली आवडली. अशाच अकस्मात घडणार्‍या, वळणार्‍या घटनांनी इतिहास तयार होतो!

सतीबद्दल अलिकडे स्त्रीवादी, वसाहतोत्तरवादी इतिहासकारांनी बरेच संशोधन केले आहे. राममोहन राय यांनी घेतलेल्या सतीविरोधी भूमिकेचा तत्कालीन ऐतिहासिक संदर्भ रेखाटून त्यांचे विचार तत्कालीन चर्चासत्रापासून किती निराळे होते, आणि एकूण वादाची वैचारिक चौकट काय होती, त्यात "परंपरा", "प्रगती" इत्यादींबद्दल काय कल्पना होत्या, हे शोधण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यातून सतीसमर्थक (कर्मठ ब्राह्मण गट), आणि सतीविरोधी गट (सुधारक, मिशनरी, ब्रिटिश सरकार) यांच्या भूमिकांचे रोचक, वैविद्यपूर्ण चित्र उभे राहते. या लेखनाचा थोडासा गोषवारा देण्याचा प्रयत्न करते (टिपा, व विस्तृत मुद्द्यांसाठी खाली यातील जालावर उपलब्ध दोन लेखांचे दुवे दिले आहेत, बाकींचा संदर्भ दिला आहे).

सतीप्रथेबद्दल ब्रिटिशांमध्ये चर्चा प्रवाशांच्या, कंपनी अधिकार्‍यांच्या पत्रांतून, चित्रांतून, इत्यादी बंदी कायद्याच्या शंभर वर्षांआधीपासून होत होती. अगदी सुरुवातीच्या प्रवासवर्णनांनी या प्रथेशी मध्ययुगात युरोपात बायकांना "सटविण" (witches) लेखून जीवंत जाळण्याच्या प्रथेशी साम्य जोडले. कंपनी अधिकारी प्रथेची खाजगी चर्चा-वर्णन करत असले तरी अधिकृत रित्या काही करण्यास सरकार धजत होती - १७९८ मध्ये कलकत्ता परिसरातली बंदी खास शहरावर ब्रिटिश कायदा लागू केल्यामुळे आली. १७८०च्या दशकात काही कलेक्टरांनी त्यांच्या जिल्यात बंदी घालून सरकारी शिक्का मागितला, तेव्हा "खाजगी विनवणीने जे होईल ते करून पहावे, हिंदूंच्या धार्मिक प्रथांविरुद्ध जाऊन काही उपयोग नाही" असे उत्तर त्यांना आले. १८०५ मध्ये हे प्रश्न पुन्हा उभे राहता यात धार्मिक म्हणजे नक्की काय हे शोधण्याचा उपक्रम हाती घेतला. १७७० पासून वॉरन हेस्टिंग्स च्या निर्देशनाखाली हिंदू आणि मुसलमान कायद्यांचा पाया धर्मशास्त्रांत आणि मुसलमानी अरबी ग्रंथांत शोधून "अस्सल" प्रथांना हे संहितिक स्वरूप व पाया देण्याचे काम ब्रिटिश कायदेपंडित, प्राच्यपंडित व त्यांचे देशी ब्राह्मण-काझी सहकारी करत होते. एतद्देशीय धार्मिक प्रथांचे संरक्षण, त्यासाठी "अस्सल" प्रथांचा शोध, धर्मग्रंथात उल्लेख-समर्थन सापडल्यास प्रथा न्याय्य, आणि नसल्यास त्याज्य, त्यासाठी सर्वात पुरातन ग्रंथात पुराव्याचा शोध, अशी या उपक्रमाची एकूण वैचारिक चौकट होती. सतीबद्दल अधिकार्‍यांमधील चर्चा देखील याच चौकटीतून घडली. १८१३ साली कंपनीच्या पंडिताने प्रथेसाठी ग्रांथिक पुरावा दिला, पण त्यात सती स्वेच्छेने व्हायला हवी, आणि अशी इच्छा नसल्यास, विधवेला लागू होणार्‍या प्रायश्चित्ताची ही नोंद केली. १६ वर्षांखाली, अफिम-भंगच्या नशेत, किंवा गरोदर स्थितीत, सती जाण्यास एकूण धर्मग्रंथांत समर्थन नसल्याचा निकाल निघाला. सरकारने तेथेच थांबून या पलिकडे सतीप्रथा चालू ठेवण्याचे ठरवले. या नंतर १८२९ पर्यंत याच धार्मिक "अस्सलते"ला प्रमाण धरून प्रथा "अधिकृत रित्या" चालवण्यावर सरकार ने भर दिलेला दिसतो - सती जाणार्‍या बाईच्या मुलांसाठी केलेली व्यवस्था, सहगमन फक्त ब्राह्मण बायकांनी करावयाचे; ब्राह्मणेतर स्त्रियांनी काही दिवसांनंतर केले तरी चालेल, इत्यादी. प्रत्येक वर्षी कलेक्टरांना सती गेलेल्या स्त्रिया, व त्यांच्या पतींबद्दल नाव, जात, गाव, शिक्षण, नोकरी इ. बद्दल माहिती गोळा करून सरकारात जमा करण्याचे आदेश दिले गेले.

या माहितीनुसार या काळात सती जाणार्‍या स्त्रियांची अचानक वाढ होत असलेली दिसू लागली. ही वाढ मोजणीच्या सुधारणेमुळे दिसत होती, की सरकारी बंदोबस्ताच्या सुरक्षेमुळे खरोखर वाढ झाली होती, यावर अधिकार्‍यांमध्ये वाद उठले. प्रथेचे अधिकृतिकरण करूनच त्याचे विचित्र समर्थन होत आहे, किंबहुना कंपनी समोर स्वत:च्या समाजाला आम्ही "अस्सल प्रथां चे पालन करणारा शिष्ट गटांपैकी आहोत" हे दाखवू पाहणार्‍यांमध्ये प्रथेचे एक भीषण आकर्षण निर्माण झाले आहे, हे म्हणणारा पक्ष आता बळावला. याच काळात सदर लेखात सांगितल्याप्रमाणे विल्बरफोर्स इ. मिशनर्‍यांनी बंदीचा पुकारा सुरू केला. तरी कायद्याने बंदीला अजून तेवढा उत्साह नव्हता. कोणी शिक्षणाकडे आशेने पाहत होते, तर कोणी प्रथेची परवानगी "कुलीनातल्या कुलीन" लोकांपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे सुचवत होते (ही संख्या कमी असून कमी बायका जाळल्या जातील, या आशेने).

या उदासीनतेला जीवंत केले राममोहन राय आणि धर्मसभेच्या पंडितांच्या चर्चांनी. मात्र प्रथा "अस्सल" आहे, धार्मिक रित्या अधिकृत आहे, हे दाखवण्यासाठी सती समर्थकांनी देखील कायदापंडितांच्या चौकटीतच आपले विचार बसवले - सतीची चर्चा बायकांबद्दल न राहून धार्मिक प्रथा, आणि ग्रंथांच्या विश्वासूपणाबद्दल होऊन बसली. राममोहन राय यांच्या विरोधी लेखनात ही आपल्याला हा दृष्टीकोन दिसतो - "तुहफत" च्या विवेचनात धर्माबद्दल एक इर्रेव्हरेन्स (अवज्ञा?) दिसून येते, ती सतीबद्दलच्या लेखनात कमी होत जाते असे काही राममोहन-संशोधकांनी दाखवले आहे. सतीविरोधबद्दल राममोहनांच्या भूमिकेची मानवतावादी दृष्टीकोनाच्या, आणि धार्मिक "अस्सलते"च्या, ग्रांथिक पुराव्याच्या दृष्टीकोनांमध्ये ओढाताण होत राहिली. अधिकार्‍यांना "अधिकृत" सती रास्त होत्या, मान्य होत्या; तसा "अधिकृतपणा" ग्रंथांत मुळीच नाही, म्हणून सतीबंदी हवी, ह्या मुद्दयावरून राममोहनाहवी, अनेकदा सतीविरोधाबद्दल लिहीले. सातारकर यांनी लिहील्याप्रमाणे, ते मूळ प्रथेच्या केंद्रस्थानी असलेल्या स्त्रीच्या मानवतेबद्दल त्यांचे विचार स्त्रीच्या गौणत्वाचा पुरस्कार करणारे ही होते. पण हे गौणत्व ही त्यांनी स्त्रियांना प्रथम मानव, आणि भावनायुक्त मानव मानून दिले, हे ही तितकेच खरे. त्या काळात हीच भूमिका "प्रगतीशील" होती. शेवटी राममोहनांच्या प्रयत्नांना अनपेक्षित दुजोरा मिळाला तो १८१८ मध्ये मराठ्यांना सर्वत्र हरवून १८२०च्या दशकांत कंपनीला मिळालेल्या स्थिरस्थावरतेने. १८२९ साली बेंटिंकनेच म्हटल्याप्रमाणे, "आता आपण सार्वभौम झाले आहोत, त्यामुळे पूर्ण बंदी आणायची नैतिक आणि लष्करी बळ दोन्ही आपल्याकडे आहे".

या सगळ्या चर्चेतून दोन मुद्दे उभे होतात.
१) एक म्हणजे कंपनीच्या, ब्रिटिश सरकारच्या दृष्टीकोनात, सतीबद्दल चर्चेत (आणि एकूण सामाजिक प्रथांच्या चर्चेत) "अस्सलते"ला, आणि हे ठरवण्याकरिता धार्मिक ग्रंथांच्या पुराव्याला दिलेले केंद्रस्थान; आणि
२) स्त्रीयांच्या स्वेच्छेबद्दल, स्त्रियांच्या कल्याणाबद्दल झालेल्या या चर्चेत खुद्द स्त्रियांच्या मतांचा, आवाजाचा संपूर्ण अभाव.

चर्चेच्या केंद्रस्थानी "स्वेच्छा" होती - धर्मसभेची पूर्ण भूमिका स्त्रियांच्या स्वत:ला जीवंत जाळून घेण्याच्या संपूर्ण मोकळ्या आणि आग्रही इच्छेवर बेतली होती. अजीबात बळजबरी नाही, पतीप्रेमाने, पतीव्रतेच्या भावनेने त्या आनंदाने आगीत उडी टाकतात हे त्यांचे म्हणणे होते (पुढे हरी नारायण आपट्यांच्या आणि अन्य तत्कालीन ऐतिहासिक कादंबर्‍यांमध्ये अशाच "स्वेच्छेने व्याकूळ" स्त्रिया स्वप्नाळू सुवर्णयुगात फक्त "अधिकृत" सती जाताना आपल्याला दिसतात). कंपनी अधिकार्‍यांना ही स्वेच्छेचे महत्त्व होते - त्यावरूनच ते कुठली अधिकृत सती आणि कुठली गैरकानूनी, हे ठरवायचा प्रयत्न करीत. राममोहनांनी स्त्रियांच्या स्वेच्छेबद्दल मानवतावादी भूमिका घेतली, पण "खरी, पतिव्रता स्त्री, विधवा स्थितीतही जीवनदानास पात्र" असे एक केविलवाणी, पण आदर्श स्त्री पात्र तयार केले. पुढे जीवंत राहणार्‍या विधवांवर जे कठोर दैनंदिन निर्बंध आणले गेले, त्यात राममोहनांनी सतीला पर्याय म्हणून आखलेले विधवाजीवनाच्या साधवी प्रथा अत्यंत प्रभावी होत्या. सुधारक म्हणवणार्‍या, पण विधवांना खरोखर मानवासारखे वागवू न शकणार्‍या अनेक लोकांना हे शारिरिक, आहाराचे, वेशभूशाचे निर्बंध चांगलेच उपयोगी पडले. सतीबद्दलच्या अवाढव्य दस्तावेजात स्त्रियांच्या वर्तनाची, स्वेच्छेची, त्यांच्यावर बळजबरी झालेल्याची अनेक वर्णने आहेत. त्यांतून स्त्रीचे एक अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्र तयार होते - ती शक्तीरूप पतिव्रता तरी आहे, किंवा बाळबोध केलेली अबला नारी तरी आहे, किंवा जंगली प्रथा व समाजात अडकलेली सभ्य, पाश्चात्य, ख्रिस्ती मदतेची गरजू आहे. खर्‍या, जीवंत, स्वत:ची मते मांडणार्‍या स्त्रिया कुठेही नाहीत. या अखंड चर्चेत स्त्रियांचे मत कुणी मागितल्याची देखील नोंद नाही. सतीप्रथेवरील चर्चा ही स्त्रियांना जीवंत जाळावे की नाही, याबद्दल होती. तरी, १९व्या शतकात पुढे स्त्रियांच्या अधिकारांची, व सामाजिक प्रथांच्या संरक्षण-खंडनाची चर्चा धार्मिक, ग्रांथिक स्वरूप आणि "आपल्या परंपरे" च्या चौकटीतच होत राहिले, ही या चर्चासत्राची एक महत्त्वाची देणगी होऊन बसली. वर, स्त्रिया व परंपरा यांची विलक्षण सांगड घालून स्त्रीचे कल्याण ठरवण्याचा हक्क गोर्‍या साम्राज्यवादी शासनाकडे आहे, का एतद्देशीय पुरुषांकडे आहे (म्हणजेच तिला स्वत:ला नाही) हा प्रश्न कायदेकानू, समाजप्रबोधनविचार, व सुधारकप्रवाहामध्ये जास्त महत्त्वाचा ठरला. (उदाका१८८०-९० दशकात संमती कायद्यावरून सुधारक-सनातनी गटांमधला वाद....)

संदर्भः
Lata Mani, Contentious Traditions: The Debate on Sati in Colonial India, Cultural Critique, No. 7, (Autumn, 1987) pp. 119-156.
Lata Mani, Production of an Official Discourse on "Sati" in Early Nineteenth Century Bengal: Economic and Political Weekly,Vol. 21, No. 17 (Apr. 26, 1986), WS32-40.
Vasudha Dalmia, Sati as a religious rite: the Parliamentary Papers on Widow Immolation, 1821-30, Economic and Political Weekly, Vol. 27, No. 4 (Jan. 25, 1992), pp. PE58-PE64
V.C. Joshi, ed., Rammohun Roy and the Process of Modernization in India (New Delhi: Vikas, 1975) यात अनेक लेख सतीविरोधी भूमिके संबंधी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत अभ्यासपूर्ण प्रतिसाद आहे हा रोचना यांचा. मी जरूर जाणू शकतो की, खुद्द धागाकर्ते श्री.सातारकर या प्रतिसादाने प्रभावित होतील. या दोघांचाही या विषयातील अभ्यास वाखाणण्यासारखा आहे हे त्यांच्या विषय-मांडणीवरून स्पष्ट दिसते.

@ रोचना :
"स्त्रीचे एक अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्र तयार होते" असे म्हणताना तुम्ही तिला [म्हणजे भारतीय नारीला म्हणू या] "पाश्चात्य, ख्रिस्ती मदतेची गरजू आहे" असा जो उल्लेख केला आहे त्याचा नक्की बोध झाला नाही. हे राममोहन रॉय यांचे मत होते की लॉर्ड बेंटिंगचे ?

(अवांतर : इर्रेव्हरेन्स साठी तुम्ही मराठी शब्द "अवज्ञा" योग्य होईल का असा प्रश्न केला आहे. मला वाटते इर्रेव्हरेन्सचा अर्थ आहे "तुच्छता". मग ती धर्माविषयी असो वा तिच्या शिकवणीविरूद्ध. "रेव्हरंड मदर" असा उल्लेख आपण वाचतो. त्या मदरच्या "रेव्हरंड" पणा विषयी वा तिच्या शिकवणीविषयी तुच्छता दाखविण्यासाठी इर्रेव्हरेन्सचा उपयोग केला जातो.)

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद अशोक (आणि खाली ऋषिकेशला सुद्धा!).

"पाश्चात्य, ख्रिस्ती मदतेची गरजू आहे" यात एकूण ब्रिटिश साम्राज्यवादी आणि मिशनर्‍यांचे लेखन अभिप्रेत आहे - बंदी कायदा आल्यावर, आणि एकूण साम्राज्याच्या समर्थनार्थ अवाढव्य लेखनात सतीबंदी करून भारतीय महिलांना त्यांच्याच संस्कृतीच्या तावडीतून वाचवण्यासाठी ब्रिटिश सत्ता भारतात आली असल्याचे दावे सर्वत्र केले गेले. (आजही केले जातात.) मिशनर्‍यांचा त्यात धार्मिक टीकेचा सूर होता, पण एकूण अधिक प्रगत आणि सभ्य जाणीवेमुळे या महिलांचे कल्याण करत आहोत, आणि त्यातून अखंड संस्कृतीचे, हा आत्मविश्वास सतीबद्दलच्या सगळ्या नंतरच्या लेखनात होता.

इर्रेव्हरेन्स = तुच्छता जरा कडक भाषांतर वाटते नाही का? मी तुच्छता चा कंटेम्प्ट contempt असा अर्थ लावते. irreverence पेक्षा contempt जास्त नकारात्मक वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ माहितीपूर्ण अशी श्रेणी देण्यापेक्षा कितीतरी विस्तृत असा हा प्रतिसाद मुळ लेखा इतकाच माहितीपूर्ण आहे. (अर्थात श्रेणी दिली आहेच)
रोचना यांचे प्रतिसाद म्हणजे अनेकदा माहितीचा खजिना असतो. अशी माहिती देत जा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिशय सुंदर लिहीलं आहात. अगदी पाय धरण्या योग्य!
अन या निमित्ताने जे चिंतन केलं आहात तेही सुंदर अन अगदी मूलगामीच. अगदी मुळापर्यंत गेला आहात.

त्यांतून स्त्रीचे एक अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्र तयार होते - ती शक्तीरूप पतिव्रता तरी आहे, किंवा बाळबोध केलेली अबला नारी तरी आहे, किंवा जंगली प्रथा व समाजात अडकलेली सभ्य, पाश्चात्य, ख्रिस्ती मदतेची गरजू आहे. खर्‍या, जीवंत, स्वत:ची मते मांडणार्‍या स्त्रिया कुठेही नाहीत. या अखंड चर्चेत स्त्रियांचे मत कुणी मागितल्याची देखील नोंद नाही. सतीप्रथेवरील चर्चा ही स्त्रियांना जीवंत जाळावे की नाही, याबद्दल होती. तरी, १९व्या शतकात पुढे स्त्रियांच्या अधिकारांची, व सामाजिक प्रथांच्या संरक्षण-खंडनाची चर्चा धार्मिक, ग्रांथिक स्वरूप आणि "आपल्या परंपरे" च्या चौकटीतच होत राहिले, ही या चर्चासत्राची एक महत्त्वाची देणगी होऊन बसली. वर, स्त्रिया व परंपरा यांची विलक्षण सांगड घालून स्त्रीचे कल्याण ठरवण्याचा हक्क गोर्‍या साम्राज्यवादी शासनाकडे आहे, का एतद्देशीय पुरुषांकडे आहे (म्हणजेच तिला स्वत:ला नाही) हा प्रश्न कायदेकानू, समाजप्रबोधनविचार, व सुधारकप्रवाहामध्ये जास्त महत्त्वाचा ठरला. (उदाका१८८०-९० दशकात संमती कायद्यावरून सुधारक-सनातनी गटांमधला वाद....)

पूर्ण मान्य.
ही प्रथा बंद झाली हे तर छानच झाले, पण पुढची प्रक्रीया, ज्यात

वर, स्त्रिया व परंपरा यांची विलक्षण सांगड घालून स्त्रीचे कल्याण ठरवण्याचा हक्क गोर्‍या साम्राज्यवादी शासनाकडे आहे, का एतद्देशीय पुरुषांकडे आहे (म्हणजेच तिला स्वत:ला नाही) हा प्रश्न कायदेकानू, समाजप्रबोधनविचार, व सुधारकप्रवाहामध्ये जास्त महत्त्वाचा ठरला.

हे सर्वात महत्वाचे. आज आपण योग्य मार्गावर चालून आलो आहोत असे वाटले.

जाता जाता : ही प्रथा इजिप्तमधे सम्राटांना पुरताना त्यांच्यासोबत त्याच्या बायका, नोकर चाकर, घोडे, गाई गुरे इ. पुरण्याशी साधर्म्य दाखवत होती का?

दुसरे काही करता येत नाही म्हणून माहितीपूर्ण अशी श्रेणी वाढविलीदिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मन घट्ट करून वाचल्यावर बरीच माहिती मिळाली. रोचना ह्यांचा प्रतिसादही उत्तम.
जालवरची अशीच एक चर्चा http://www.mimarathi.net/node/1016 इथे मिळाली.

सती प्रथेचा उगम फार अलीकडचा आहे असा बर्‍याच जणांचा अंदाज दिसतो. हे काही पटत नाही. "सती"ची कथा वेदांमध्ये बघायला मिळते. भणंग चांद्रमौली शंकरासोबत संसार करणार्‍या दक्ष राजाच्या कन्येला पित्याने शिवाचा केलेला अपमान सहन झाला नाही व तिने पित्याच्या घरात सुरु असलेल्या यज्ञातच अग्नीप्रवेश केला अशी कथा आहे.

सतीचे समर्थन करणारी टाळकी ह्या कथेचा संदर्भ सतीप्रथेसाठी देत असावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भणंग चांद्रमौली शंकरासोबत संसार करणार्‍या दक्ष राजाच्या कन्येला पित्याने शिवाचा केलेला अपमान सहन झाला नाही व तिने पित्याच्या घरात सुरु असलेल्या यज्ञातच अग्नीप्रवेश केला अशी कथा आहे.

हे काये???

तिचं नाव सती होतं.

ती सती गेली नव्हती. तो शंकर चांगला ठण्ठणीत जिवंत होता अन त्याने त्या बायकोचं पार्थीव हाती उचलून तांडव सुरू केलं होतं. त्याने जगबुडी व्हायची वेळ आली तर विष्णूने सुदर्शन सोडून साडे३ तुकडे केले होते तिच्या शरीराचे. ती शक्तीपीठं आहेत. ३ पूर्ण अन एक अर्धी.

सती प्रथेचा संबंध तिथे कुठून आला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पण आजही आडून आडून सती प्रथेचं उदात्तीकरण करणार्‍या जुनाट टाळक्यांना "सती" हे नामसाधर्म्य म्हणून चालतं.
पूर्वीच्या काळीही ते तसेच होते असे साहेबांचे म्हणणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

करणारे विकृत जीव या जगी वळवळतांना दिसले की ठेचून टाकावे ही उर्मी अनावर होते. समोर असले तर जो मार्ग हाती येईल तो गहेऊन ठेचतोच!
असो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आडकित्ता,जाऊ द्या हो, होते चिडचिड माणसाची.

तुमची चिडचिड कथेबद्दल नसून सतीप्रथेबद्दल आहे हे ध्यानात आले.

असो.
आता तुमचा राग आवरा असे म्हणतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंकर सतीचे पार्थिव खांद्यावर घेऊन तांडव करत असल्याने प्रलय व्हायची वेळ आली. शंकर शांत होत नसल्याची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने अखेर विष्णूने सुदर्शन चक्र सोडून सतीच्या शवाचे ५२ तुकडे केले. हे तुकडे भूमीवर जिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठे निर्माण झाली. भारतात अशी एकूण ५२ शक्तीपीठे आहेत. पाकिस्तानातही हिंग्लासमाता मंदिर हे एक शक्तीपीठ आहे. या सर्व शक्तीपीठांमध्ये कामरुप (आसाम) येथील शक्तीपीठाचे आत्यंतिक महत्त्व आहे. सतीचा गुह्यभाग तेथे गळून पडला म्हणून आजही तेथे योनीशिल्पाची पूजा केली जाते.कामाख्या देवीचे मंदिर हे स्त्रीबीजाची पूजा करणार्‍या शाक्तपंथियांचे मुख्य केंद्र आहे.

प्रथम पंथ निर्माण होतात व नंतर अनुयायांना आकर्षित करण्यासाठी पुराण कथा रचल्या जातात, चमत्कार सांगितले जातात. त्यामुळे ही कथाही भारतात शाक्त पंथाचे प्राबल्य असण्याच्या काळात रुढ झाली असावी, असा तर्क करता येतो.

अवांतर - बंगालमध्ये सतीप्रथेच्या नावाखाली दरवर्षी शेकडो स्त्रियांना जाळले जात होते. बालविधवा झालेल्या स्त्रिया जेव्हा वृद्ध होत तेव्हा त्यांचा पत्कर घ्यावा लागू नये म्हणून त्यांना चक्क काशी अथवा वृंदावन येथे रवाना केले जाई. मथुरा परिसरात या स्त्रिया अक्षरश: भीक मागून जगत असत. सतीची जबरदस्ती करण्यामागे 'दायभाग' द्यावा लागू नये असेही कारण असेल. अखेर पैशाचा लोभ माणसाला जनावर बनवतो.

महाराष्ट्रात तुलनेने चित्र सुखद होते. मुंबईत धर्मप्रसारार्थ आलेल्या पहिल्या ख्रिस्ती धर्मोपदेशकाच्या प्रवास वर्णनात सतीचा उल्लेख आढळत नाही (सन १८१०) पण घरच्या बाईला बडवून काढण्याचा पुरुषार्थ मात्र महाराष्ट्रात रुढ होता. मार खाऊन घराबाहेर रस्त्यावर रडत बसलेल्या बायका पाहिल्याचा उल्लेख या प्रवास वर्णनात आहे. मुंबईवर इंग्रजांचे राज्य असल्याने कदाचित तेथे सती प्रथेला आधीच पायबंद बसला असावा.

महाराष्ट्रात सतीप्रथेचे स्तोम नव्हते. मोठ्या घराण्यातील स्त्रिया सती जात. १८२२ मध्ये पुण्यात एका चित्पावन महिलेला सती जाण्याची जबरदस्ती केली जात होती. त्यावेळी गव्हर्नरने हस्तक्षेप केला. पुण्यातील धर्मपंडितांची सभा झाली, पण इंग्रजांचे राज्य व खंबीर भूमिका यामुळे हा बेत बारगळला. पुढे तर कुणीच ही प्रथा मानेनासे झाले. केशवपनाची प्रथा मात्र बराच काळ सुरु होती.

(स्त्रीमुक्तीची महाराष्ट्रातील पावले कसकशी पडत गेली यावर मी तपशीलवार सन्दर्भ ठेवले आहेत. दुर्दैवाने मला लिहायला वेळ होत नाहीय.पण हा सगळा इतिहास रोचक आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ रोचना
सर्वप्रथम धन्यवाद एवढ्या सविस्तर आणि मुद्देसूद प्रतिसादाबद्दल.
Witches = चेटकीण होत असाव (सटवीची पूजा होते).

या उदासीनतेला जीवंत केले राममोहन राय आणि धर्मसभेच्या पंडितांच्या चर्चांनी. मात्र प्रथा "अस्सल" आहे, धार्मिक रित्या अधिकृत आहे, हे दाखवण्यासाठी सती समर्थकांनी देखील कायदापंडितांच्या चौकटीतच आपले विचार बसवले - सतीची चर्चा बायकांबद्दल न राहून धार्मिक प्रथा, आणि ग्रंथांच्या विश्वासूपणाबद्दल होऊन बसली.
इथ अस म्हणता येइल की मूळातच कायदेपंडीतांनी प्रथेच्या निर्मूलनासाठी धर्माच्या चौकटीत विचार केला त्यामुळ धर्ममार्तंडांना आपोआपच त्या दिशेन बाजू मांडायची संधी मिळाली. खुद्द बेंटीन्क याला धर्ममार्तंडांच्या प्रश्नांना उत्तर देता याव म्हणून राम मोहन बाबूंनी त्याच्याशी अतिशय विस्तृत चर्चा केल्याचा उल्लेख दोघांनीही केला आहे. बहुधा यामूळच प्रथेवर अधिकृतरित्या बंदी घातल्यानंतरदेखील १९३० मधे त्यांनी सती आणि शास्त्रे हा निबंध प्रकाशित केला असावा.

कोणी शिक्षणाकडे आशेने पाहत होते, तर कोणी प्रथेची परवानगी "कुलीनातल्या कुलीन" लोकांपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे सुचवत होते (ही संख्या कमी असून कमी बायका जाळल्या जातील, या आशेने).
मी जेवढ काही यासंदर्भात वाचल त्यावरुन अस वाटत की मुळातच ही प्रथा कुलीन ब्राम्हणांच्यात असावी. कारण पहिल्या निबंधात टीकेचा रोख सर्वस्वी ह्यांच्यावरच आहे. दुसर अस की आपणही कुलीन आहोत हे दाखवण्यासाठी इतर जातीतील स्त्रीयांना सती जायला लावल्याची देखील उदाहरणे आहेत. (बंगालमधे कदाचित ब्राम्हणांची संख्या जास्त असेल त्या काळात, त्यामुळ इतक्या स्त्रीया सती गेल्याचा उल्लेख असावा)

या सगळ्या चर्चेतून दोन मुद्दे उभे होतात.
यातल्या पहिल्या मुद्याशी सहमत.
पण स्त्रीयांच्या स्वेच्छेबद्दल, स्त्रियांच्या कल्याणाबद्दल झालेल्या या चर्चेत खुद्द स्त्रियांच्या मतांचा, आवाजाचा संपूर्ण अभाव. याबद्दल अस वाटत की त्या विशिष्ट काळातल्या समाजातल्या स्त्रीयांकडून ही अपेक्षा कितपत करावी किंवा समाजधुरिणांकडून स्त्रीयांना विचारल जाइल ही तरी अपेक्षा कितपत करावी. (एक नमुना: अगदी अलीकडे १९१० मधे स्त्रीयांना मतदानाचा अधिकार द्यावा की नाही यावर इंग्लंडमधे जोरदार वाद चालू होता आणि त्याला विरोध करणार्‍यांची संख्यादेखील प्रचंड होती. चर्चील त्या विरोधी मोहीमेचा म्होरक्या होता.)

"तुहफत" च्या विवेचनात धर्माबद्दल एक इर्रेव्हरेन्स (अवज्ञा?) दिसून येते, ती सतीबद्दलच्या लेखनात कमी होत जाते असे काही राममोहन-संशोधकांनी दाखवले आहे.
यातला irreverence हा धर्माविषयी असण्यापेक्षा प्रचलित धार्मिक प्रथांविषयी जास्त असावा. कारण त्यांनीच म्हटल्याप्रमाणे प्रचलित धर्माच स्वरुप हे वेदांच्या विरोधात होत आणि ते वेदांचे खंदे समर्थक होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर असलेला इस्लामचा (एकच परमेश्वर) प्रभाव. ह्यामुळ इतके सगळे देव मानण हेच मुळी धर्मविरोधी असल्यान त्यांच्यासाठी म्हणून जे काही होत तेही धर्मविरोधी अस त्यांचा दृष्टीकोन वाटतो. पुढे जाउन त्यांनी एकच परमेश्वर मानणार्‍या ब्राम्हो समाजाची स्थापनाही केलीच

जाता जाता:
सती प्रथा निवारणाविषयी देशी साहित्यात प्रामुख्यान .राजा राममोहन यांच नाव आहे तर पाश्चात्य साहित्यात फक्त मिशनरी आणि बेंटींकच नाव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथ अस म्हणता येइल की मूळातच कायदेपंडीतांनी प्रथेच्या निर्मूलनासाठी धर्माच्या चौकटीत विचार केला त्यामुळ धर्ममार्तंडांना आपोआपच त्या दिशेन बाजू मांडायची संधी मिळाली. खुद्द बेंटीन्क याला धर्ममार्तंडांच्या प्रश्नांना उत्तर देता याव म्हणून राम मोहन बाबूंनी त्याच्याशी अतिशय विस्तृत चर्चा केल्याचा उल्लेख दोघांनीही केला आहे. बहुधा यामूळच प्रथेवर अधिकृतरित्या बंदी घातल्यानंतरदेखील १९३० मधे त्यांनी सती आणि शास्त्रे हा निबंध प्रकाशित केला असावा.

हो, मुळातच एतद्देशीयांबद्दल माहिती-ज्ञान गोळा करून त्याला व्यवस्थापक, संस्थातम्क रूप देताना कायदेपंडित, व सरकारी दृष्टीकोनात धर्माच्या, व त्यात ग्रांथिक, पुरातन ग्रांथिक चौकटीला दिलेले प्राधान्य, हेच मणि यांच्या लेखांतून उद्भवणारा व्यापक विचार आहे. मुद्दा मग फक्त सती कायद्यापुरताच सीमित राहत नाही, तर १९व्या शतकाच्या सुधारणा-राजकारणांचा, व आपल्याला १९४७ नंतर आलेल्या संस्थात्मक, संविधानिक वारशाच्या पायाचेही विवेचन करायला प्रवृत्त करतात. मणि यांचे संशोधन अत्यंत विचारप्रवर्तक आहे (मी फक्त गोषवारा दिला आहे) - धार्मिक चौकटीबद्दलचे अधिकार्‍यांमधले विचार, व अधिकारी-पंडित यांच्यातली चर्चा या चौकटीमुळे कशी आकार घेत गेली ते अगदी मार्मिक पणे, बारीक परीक्षणाने दाखवतात. सरकारनेच नेमलेल्या पंडितांची मते अनेकदा ठासून एका बाजूने नसत; त्यांत परस्पर विरोधी मतांचा उल्लेख असे, संदेह - शंका असत. पण "ग्रांथिक पुराव्या" च्या अधिकृत गोषवार्‍यात ह्या विवादी सुरकुत्यांवर इस्त्री फिरवून "अस्सलते"च्या किंवा "त्याज्य उपवृद्धी" या गटात सपाटीकरण होत असे. भारतासाठी व्यापक, आधुनिक कायदेकानू (आणि खासकरून पुढे वैयक्तिक सदरातले कायदे - पर्सनल लॉ) ठरवण्यात धर्मशास्त्रांच्या मतांना प्राधान्य याच प्रकारे दिले गेले.

पण स्त्रीयांच्या स्वेच्छेबद्दल, स्त्रियांच्या कल्याणाबद्दल झालेल्या या चर्चेत खुद्द स्त्रियांच्या मतांचा, आवाजाचा संपूर्ण अभाव. याबद्दल अस वाटत की त्या विशिष्ट काळातल्या समाजातल्या स्त्रीयांकडून ही अपेक्षा कितपत करावी किंवा समाजधुरिणांकडून स्त्रीयांना विचारल जाइल ही तरी अपेक्षा कितपत करावी.

काळाचे भान राखायला हवेच. पण सतीबंदी हे आधुनिक स्त्रीअधिकार चळवळीचे ते पहिले पाउल मानले जाते. ते ज्या पद्धतीने अमलात आले, त्याच्या पार्श्वभूमीचे विवेचन करता, या चळवळीला, त्याने प्रसवलेल्या सुधारक विचारप्रवाहाच्या छटा आणि सीमा, आणि उणिवाही लक्षात घ्यायला हरकत नाही. स्त्रियांचे (किंवा कुठल्याही शोषित गटाचे) कल्याण कोणी ठरवायचे, त्यांना नक्की काय म्हणून लेखून ठरवायचे, याचे परिणाम काय असू शकतील, हे सगळे प्रश्न त्यात आले, आणि ते रास्त आहेत. त्यातून कल्याण म्हणजे नक्की काय, सुधारणेच्या नावाखाली कसले अधिकार नेमके दिले जात आहेत, अपेक्षित आहेत, त्यातून नवीनच विषमतेच्या छटा दडल्या आहेत का, हे सगळे ही आले.

पुढे ८० वर्षे लोटली तरी संमती कायद्यात "आम्ही आमच्या स्त्रियांबद्दल काय ते ठरवू; तुम्ही मधे बोलणारे कोण?" असा राष्ट्रीय चळवळीचा शासनाविरुद्धा सूर होता. एका मुलीशी संभोग ती वयात आल्याआल्या व्हायला हवा, की एक-दोन वर्षे थांबायला हरकत नाही, म्हणजे १० वर्षांपासून संमती १२ वर्षांपर्यंत ढकलायची, ह्या मुद्द्यांवर चर्चा धार्मिक चौकटीतूनच झाली. शास्त्रात एकही बीज वाया घालू नये असे दाखले आहेत की नाही, वगैरे. अशी अनेक उदाहरणे आहेत. पुढे शारदा अ‍ॅक्टच्या वेळेला बायका प्रथम यावर बोलू लागल्या - रादर, त्यांची मते चर्चेत ऐकू जाऊ लागली.

हा निव्वळ काळाचा भाग नाही, तर राजकीय-सामाजिक विषमतेची, सत्तासंबंधांचा भाग आहे. एकूण असा चर्चेच्या घडणीचा इतिहास गोड गोड आणि भारावून टाकणार्‍या इतिहासातल्या ह्याच विषमता उघडकीस आणतो. सतीकायदा चर्चेच्या संदर्भात रोचक म्हणजे या बारीक परीक्षणातून, राममोहनांच्या लेखनाचे धागे तत्कालीन चर्चेत गोवून सुद्धा त्यांच्या विचारांचा निराळेपणा स्पष्ट दिसतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ रोचना
तुमच्या प्रतिसादात एक वाक्य आले आहे :: "अगदी सुरुवातीच्या प्रवासवर्णनांनी या प्रथेशी मध्ययुगात युरोपात बायकांना "सटविण" (witches) लेखून जीवंत जाळण्याच्या प्रथेशी साम्य जोडले."

~ Witches संकल्पना शेक्सपीअर आणि समकालीन नाटककारांच्या लेखनातून सर्रास आढळत असे, त्याला कारण त्या वेळेच्या समाजाला मान्य असलेले 'विचेस' चे अस्तित्व, तसेच त्या अनुषंगाने चेटकिणी करीत असलेल्या कारवायाही. मग त्यातून 'त्रस्त समंधा शांत हो !" यासारखी आळवणीही येत राहिली. पण Witches ना "सटविण" म्हणता येणार नाही. 'चेटकीण' ती होऊ शकते. सटविण, सटवाई या संकल्पना आपल्या मातीतील असून त्यांची सांगड ग्रामदेवता, कुलदेवता, क्षेत्रदेवताही आदीशी घातली जाते, त्या गावात सर्व परिचित असतात. गावात जसे 'मारुती' चे देऊळ असलेच पाहिजे असा अलिखित नियम आहे तसेच गावकुसाबाहेर एका पिंपळाखाली 'सटविण' निद्रावस्थेत का असेना पण राखण्याची परंपरा आहे. ही सटविण काही ग्रामकुलदेवता खंडोबा, म्हसोबा, बिरोबासमवेत स्त्रीरुपातील अंबाबाई, रेणुका, यल्लमा आदीचे अंशतः रूप असल्याने तिचे पूजनही (भयापोटी का होईना) सुवासिनींकडून नित्यनेमाने होत असते. सटविणीचे/सटवाईचे उपकारक रूप रक्षक असते तर उग्र रूप घातक असते अशी गावात धारणा असते. म्हणजे बाळाला आजार, रोगराई होते ती अशाच एखाद्या बालघातक-रोगरूपी देवतेमुळे म्हणून गावातील सर्वच स्तरावरील स्त्रिया जाणीवपूर्वक या सटवीची/सटविणीची यथासांग पूजा करतात, नैवेद्य दाखवितात आणि बाळावर लोभाची माया ठेव म्हणून तिची आराधना करतात. ["मरीआई" देखील असाच एक प्रकार जो पटकीशी संबंधित होता.]

भटक्या आदिवासी जनात या ग्रामदेवतेला 'सटवी' 'सटवाई' म्हटले जाते तर अभिजन स्तरावर हिचा उल्लेख 'शीतलादेवी' म्हटले जाते. आदिवासी त्यांच्या प्रथेनुसार सामीष (विशेषतः दारूसह अंडी) नैवेद्य दाखवितात तर शाकाहारी लोक साहजिकच पुरणपोळीचा.

(असो, मूळ विषयाशी अवांतर झाले असले तरी 'Witches = सटविण" असा गोंधळ होऊ नये म्हणून ही टिपणी, इतपतच याचे महत्व मानावे.)

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भटके आदिवासी...

सातपुड्यातील आदिवासींत एक डाकीण अशी 'प्रथा' आहे, अन त्यामुळे अमुक महिलेची धिंड काढली वै वृत्तांत दैनिकांत प्रसिद्ध झालेले वाचनात आहेत.

बादवे, आदिवासी भटके नव्हेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

"बादवे, आदिवासी भटके नव्हेत."

~ येप्प, डॉक्टर. एका 'कॉमा' ने तो घोळ केला. 'भटक्या व आदिवासी' असेही चालले असते. Nomadic and Denotified Castes या गटात येणार्‍या जातीना "भटके" अशी संज्ञा आहे तर Tribal (शासकीय भाषेत Scheduled Tribe म्हटले जाते) मध्ये वर्गीकरण झालेल्याना 'आदिवासी' असे संबोधन आहे. हे दोन स्वतंत्र घटक असून शासनाने अलगअलग रितीने नोकरीत आणि शिक्षणात यांच्यासाठी आरक्षण ठेवले आहे.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुप्लिकेट :प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सॉरी सातारकर आणि अशोक, मला witches = चेटकीणच म्हणायचे होते. चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद.

@सातारकर - तुमच्या तिसर्‍या मुद्द्याशी (तुहफत, धर्माविषयी irreverence असण्यापेक्षा प्रचलित धार्मिक प्रथांविषयी जास्त असणे) सहमत. राममोहनांचा वैचारिक, तत्वज्ञानी प्रवास, आणि त्यांनी हाताळलेल्या विचारांचा व्याप खरोखर चकित करणारा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम चर्चा.

खूपच माहिती मिळाली.

अवांतरः साष्टांग नमस्कार दर्शवणारी स्मायली बनवावी. तोवर <०()= हे चालवून घ्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.