माझा परिसर, माझा कलाव्यवहार

माझा परिसर, माझा कलाव्यवहार

लेखक - सचिन कुंडलकर

'सुदर्शन कलादालन' आणि 'पालकनीती' ह्या संस्थांनी एकत्र येऊन ३१ मे आणि ३ जून २०१२ दरम्यान पुण्यात एक दृश्यकला रसग्रहण वर्ग घेतला होता. त्याचे सविस्तर वार्तांकन 'ऐसी अक्षरे'चे सदस्य ऋषिकेश ह्यांनी तेव्हा केले होते. अनेक मान्यवरांनी ह्या उपक्रमाअंतर्गत व्याख्याने दिली होती. लेखक, नाटककार, सिनेदिग्दर्शक सचिन कुंडलकर ह्यांच्या सत्रात त्यांनी जे भाष्य केले होते, त्यातला काही भाग 'ऐसी अक्षरे'च्या ह्या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या विषयासंबंधित होता. त्यांच्या भाषणातला हा विषयानुरूप संपादित अंश -

दोन चित्रकार – एकाची चित्रं सर्व आसमंतात आजूबाजूला अडकवलेली आहेत, पण त्याचं नाव माहीत नाही. नि दुसरा, ज्याचं नाव प्रत्येकाला माहीत आहे, पण त्याची चित्रं कुणीही कधीही पाहिलेली नाहीत. पहिला राजा रविवर्मा आणि दुसरा पिकासो. हे माझ्या अनुभवविश्वातल्या लहानपणीचं पुणं शहर होतं. 'चांदोबा' हे मासिक माझ्यासमोरचा दृश्यकलेचा सर्वात गडद नमुना होता. माझ्या बालपणीचा. चांदोबा मासिकाच्या मांडणीनं आणि रंगांनी मला हे पाहायला मिळालं की आपल्या वातावरणापेक्षा वेगळं काही तरी जगामध्ये चालू आहे. त्याच्या सोबत जिवतीचे कागद, अंगणातल्या रांगोळ्या, आईनं स्वच्छ आवरलेलं, नीट घडी करून ठेवलेल्या कपड्यांचं कपाट, फ्लॉवरपॉटनं सजवलेले टी.व्ही. सेट, खालून आणि वरून दोन्ही बाजूंनी वायर घालून ताणलेले खिडक्यांचे अर्धे पडदे − ते वारा आल्यावर गच्च फुगत आणि त्यावरची भरतकाम केलेली फुलं क्षणभरासाठी आपल्या जवळ येत... कोणत्याही पृष्ठभागावरची किंवा अंतराळातली सुबक व्यवस्था ही माझ्या आजूबाजूच्या वातावरणातल्या लोकांची कलेची व्याख्या होती. मी लहान होतो तोपर्यंत ते मी मुकाटपणे मान्यही केलं होतं. पण सुदैवानं अनेक व्यक्तींनी, पुस्तकांनी, चित्रांनी आणि चित्रपटांनी माझी कलेची व्याख्या सुबकतेपुरती मर्यादित ठेवली नाही.

प्रत्येकाच्या दिवाणखान्यातली शोकेस हा त्या-त्या कुटुंबाची कलात्मक जाणीव जोखण्याचा संदर्भबिंदू असे. अतिशय साधे, माझ्या आईसारखे, लोकही प्रत्येकाच्या घरातली शोकेस कशी होती ह्याबद्दल चर्चा करत असत. इकडे एक हत्ती आणि तिकडे एक हत्ती, नीट रचून ठेवलेल्या काचेच्या प्लेटी, खास समारंभांना वापरायचे सरबताचे ग्लास, घरात मुलं असतील तर त्यांच्या बाहुल्या, बक्षीस मिळालेली पदकं, लग्नातले जुने एकदोन फोटो, बेकमनच्या ब्रेडमधून मिळणारे ही-मॅनचे स्टिकर त्यावर आम्ही मुलं जाऊन लटकवून ठेवत असू... असा सर्व काळांचा आणि संस्कृतींचा कल्ला म्हणजे त्या काळचं मध्यमवर्गीय घरामधलं शोकेस. एका प्रकारे त्या-त्या कुटुंबानं तयार केलेलं ते इन्स्टॉलेशन आर्ट होतं − त्यांच्या एक्स्प्रेशनचा भाग.

माझ्यावर माझ्या आईच्या मानसिकतेतून आलेल्या स्वच्छतेचा आणि टापटिपीचा गडद परिणाम आहे. माझ्या चित्रपटांच्या फ्रेममध्ये गोलाकार रचना कमी असतात. माझ्या आईनं तिच्या दैनंदिन जीवनामधून एक प्रकारचा स्वच्छ सुबक चौकोनीपणा मला बहाल केलेला आहे. तो अप्रत्यक्षपणे माझ्या सर्व कामात उतरतो. मला त्याचा काही वेळा कंटाळा येतो. अनेक वेळा असं वाटतं की त्या चौकोनामधनं आपली सुटका का होत नाही? कुठलीही फ्रेम लावताना, कुठलंही पात्र लिहिताना, त्याची मानसिकता घडवताना, पहिल्यांदा जे मनातून साकारतं तो चौकोन, एक चौकट. बांधीव काहीतरी साकारतंय असं वाटत राहतं आणि त्या-त्या फॉर्मप्रमाणे त्याचं पुढे काहीतरी होतं. लिखाण असलं, तर खूप वेळ असण्याची मुभा असते. मग त्यात बदल करून मी त्याला गोलाकार देतो. जर मी चित्रपटाचं काम करत असेन आणि शॉट लावत असेन तर वेळ नसतो. मग काही वेळा जे होतंय ते मी होऊ देतो. आणि त्याला मी माझं काम मानतो. माझी मोडतोड आणि माझा विध्वंस ह्यालाही तो चौकोनीपणा चिकटलेला आहे. गणपती-गौरीची रात्ररात्र खपून केलेली आरास, दिवाळीचा किल्ला, एका सरळ ओळीमध्ये गच्चीत वाळत घातलेले नाचणीचे पापड, वेलबुट्टीची नक्षी सरळसोट येईल अशी घातलेली पलंगावरची कुरकुरीत चादर, लख्ख घासून उन्हात ठेवलेली स्टील-पितळेची भांडी आणि अत्यंत कौशल्यानं वाढलेलं जेवणाचं ताट. मी लहान असताना माझ्या आजूबाजूला असलेली ही कलात्मक व्यवस्था.

उघडलेली दारं...

अनेक गोष्टी पाहिल्या जातात, पण आपल्या जगण्याशी मेळ साधणाऱ्या काही कलाकृती मनामध्ये उमटून राहतात आणि स्वत:चं काम करताना सातत्यानं मन:पटलावर येऊन आपला प्रभाव उमटवण्याचा आग्रह व्यक्त करत राहतात. माझ्या आजूबाजूच्या सुबक दृश्यांची आणि आखीव सौंदर्यदृष्टीची व्याख्या पहिल्यांदा मोडली ती 'पिकासो' (लेखिका : माधुरी पुरंदरे) ह्या पुस्तकामुळे. ते पुस्तक मला वाढदिवसाला भेट म्हणून मिळालेलं होतं. मी ह्याआधी त्या चित्रकाराचं एकही चित्र पाहिलेलं नव्हतं. 'पिकासो' हे नाव आम्हां पुणेरी भटांना माणिक वर्मा आणि सुधीर फडक्यांइतकंच माहीत होतं, पण कुणीही कधीही त्याचं एकही चित्र ना कधी पाहिलेलं होतं, ना कधी एकमेकांना उचलून दाखवलेलं होतं. कुणी काही न कळणारं पाहिलं, की 'ते कसलं चित्र पिकासोछाप!' असं आमचे शिक्षकही म्हणत असत. 'पिकासोछाप' हा आमच्यासाठी निव्वळ एक शब्द होता. म्हणजे ती एक व्यक्ती आहे हेही आम्हाला शाळेमध्ये माहीत नव्हतं. पण हे पुस्तक हातात आल्यावर मला पहिल्यांदा असं काहीतरी जाणवलं: एखादी गोष्ट आपल्याला संपूर्ण काही कळली आहे असं नाही, पण केवळ कळली नाही म्हणून ती टाकून द्यायला नको... आपण ती परत वाचू या. समजणं महत्त्वाचं नाही, हे पहिल्यांदा मला मराठीतच लिहिलेल्या 'पिकासो' ह्या पुस्तकानं सांगितलं. पुढचे अनेक चित्रपट, चित्रं, शहरं आणि माणसं ह्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलायला त्या पुस्तकामुळे सुरुवात झाली.

पुढे मला एक अत्यंत महत्त्वाची संधी मिळाली. मला एका चित्रपटाच्या सेटवर हरकाम्या म्हणून काम करायची संधी मिळाली. मी ज्यांच्याबरोबर चित्रपटाचं काम करत होतो ती माणसं लिहिणारी, वाचणारी आणि चित्रं बघणारी होती. अनेक चित्रकारांच्या चित्रांच्या प्रिंट्स् आमच्या कार्यालयात संग्रहित होत्या. हुसेन, रझा, सूझा, आरा ह्या भारतीय चित्रकारांसोबत वॅन् गॉफ्, पिकासो, मातिस, दगा, सरा, मोने, तूलूज लोत्रेक हे युरोपियन चित्रकार. ही नावं ह्यासाठी की, वेगवेगळ्या संस्थांच्या धोरणांमुळे ह्या चित्रकारांच्या प्रिंट्स् सहज मिळण्याची शक्यता होती. पण हे मला नंतर कळलं. मुंबईला जाऊन ह्या प्रिंट्स् जमवता येत असत. त्या घरी साठवता येत असत. त्यामुळे ही नावं. ह्याच्या अलीकडे काही नाही आणि पलीकडे काही नाही. त्यामुळे काय निवडायचंय, काय साठवायचंय ह्याची निवड तेव्हा आपल्या हातामध्ये नव्हती. पण त्या वेळी, पहिला अनुभव असताना, माझ्यासाठी ते फार मोठं कपाट होतं. ते सगळं पाहणं, आठवणं आणि पुन:पुन्हा त्याला भेट देणं हा माझ्यासाठी पहिला आणि नवा आणि ग्रेट अनुभव होता. गोष्टींची पुस्तकं वाचावीत तशी मी ह्या चित्रांची पारायणं करत असे, कारण मला ती चित्रं त्यांच्याकडे खेचत असत. ते मनोरंजन नव्हतं किंवा 'पाहिलं आणि उमजलं' असा सोपा व्यवहार नव्हता. अशा व्यवहाराची आम्हांला टी.व्ही.मुळे सवय झाली होती, पण चित्रामध्ये हा व्यवहार नव्हता. 'मी तुम्हांला पंधरा मिनिटं दिली आहेत, तर मला काय मिळालं?' नावाची गोष्ट त्यामध्ये अस्तित्वात नव्हती. मला त्या चित्रकारांचा इतिहास, त्यांच्याविषयीच्या दंतकथा, ती चित्रं कुठे टांगलेली आहेत अशी काहीही माहिती नव्हती. तरीही, मी शिकत असलेल्या चित्रपटकलेविषयी अनेक दारं त्या चित्रांनी माझ्यासाठी उघडली. आजही ती दारं उघडत असतात, मिटत असतात, पण विद्यार्थिदशेत असताना आणि अशा मन:स्थितीत असताना आपल्या मनातला राग, आपली अत्यंत आतली दु:खं आणि शारीरिक-मानसिक संकोच, आकर्षण, तिरस्कार, मध्येच भरून येणारा अपरिमित उत्साह, ह्या सगळ्यांचं त्या चित्रांशी आणि रोज संध्याकाळी आम्ही फिल्म आर्काइव्हमध्ये पाहत असलेल्या चित्रपटांशी काहीतरी जवळचं नातं आहे, असं मला सातत्यानं वाटत होतं.

विस्तारलेलं क्षितिज

कॉलेज संपताना आणि चित्रपटक्षेत्रामध्ये काम करत असताना मी फ्रेंच शिकलो. चित्रपटाशी संबंधित तीन महिन्यांच्या एका कार्यशाळेत भाग घ्यायला विद्यावृत्ती मिळवून पॅरिसला गेलो. पहिल्या भेटीत पॅरिस आपलं काय करून सोडतं, हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. पहिल्यांदा मद्यप्राशन करण्याचा पुन्हा कधीही न येणारा सुखद अनुभव आणि पहिल्यांदा पॅरिसला जाण्याचा अनुभव हे दोन्ही फार जवळचे अनुभव आहेत. पॅरिसच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेत बारा देशांतून आम्ही बारा मुलं आलो होतो. आम्हाला सर्व म्यूझियम्समध्ये आणि सर्व चित्रपटगृहांमध्ये पुढचे तीन महिने फुकट प्रवेश होता. भारतात कुणाचा जावई होण्याचं भाग्य मला लाभलेलं नाही, पण फ्रेंच सरकारनं माझे पहिले सगळे सणवार फार थाटानं केले.

पॅरिसमध्ये जाताना मी जी जाणीव घेऊन गेलो होतो, ती चित्रकलेच्या आणि शिल्पकलेच्या इतिहासाची होती. पण मी म्हटलं तसं मी फार मर्यादित चित्रकारांची चित्रं साठवणुकीतून पाहिली होती. आणि त्या वेळी मी अशा फेजमध्ये होतो की, कलेचा प्रथम अनुभव घेताना, थोडंसं सोपं जाण्यासाठी मी दंतकथांमध्ये जास्त रस घ्यायचो. कोण कुठे जेवायला जायचं, कोण कुठे कुणाला भेटायला जायचं, रात्रीच्या पार्ट्या कशा चालायच्या... त्यामुळे मला वाटायचं की आपलं विमान मोंमार्त्रपाशीच उतरणार आहे आणि तिथे अशी सगळी कलाच चालू असणार आहे. प्रत्यक्षात गावाबाहेर कुठेतरी मेटलच्या, दगडी, राकट आणि राक्षसी बिल्डिंगमध्ये माझं विमान उतरलं. तिथून शहर कोसो दूर होतं आणि ते शहर फार वेगळ्या स्वरूपाचं होतं. वेगळी काहीतरी बोहेमियन इमेज बाळगून मी त्या प्रवासाला गेलो होतो. अतिशय भाबडेपणा माझ्यात होता.

मी गेलो ते १९९९ साल हे त्या दशकातला सर्वोच्च बिंदू होता. 'ग्लोबलायझेशन' आणि 'डिजिटायझेशन' हे आता गुळगुळीत झालेले शब्द त्या वेळी नवे होते. त्यांच्याविषयी उत्सुकता होती. त्या गोष्टी पूर्ण व्हायच्या होत्या; प्रोसेसमध्ये होत्या. डिजिटायझेशननं मानवी जगण्याचा साचा बदलू लागला होता. चित्रपट होण्याची प्रक्रिया डिजिटाईझ होत होती. अॅन्डी वॉरहॉल आणि साठीच्या दशकातल्या प्रतिक्रियेपेक्षा वेगळा विस्कळीतपणा मांडणारी प्रतिक्रिया नव्वदच्या दशकात येणं अपेक्षित होतं आणि तशी ती येतही होती. वीस वर्षांपूर्वी आपल्या आजूबाजूचं जग शंभर वर्षांपूर्वीचं असल्यासारखं होतं. साठच्या दशकात कलेमध्ये जो ऊतमात झाला, क्रांती झाली, त्यात एक राग होता. तो राग उफाळून एक प्रतिक्रिया वेगवेगळ्या दृश्यकलांमध्ये आली होती. त्यानंतर १९९०-२००० ह्या काळात आर्थिक कारणांमुळे आपल्या जगण्याखालची वीट काढली गेली. त्याची प्रतिक्रिया तेव्हा ९९मध्ये परदेशात नुकती उमटायला लागलेली होती, असा तो काळ होता.

मी गेल्या-गेल्या पहिल्या आठवड्यात आयफेल टॉवरवर गेलो, मग सगळे जे काय करतात ते केलं. मी ब्रांकुशीचे पक्षी पाहिले. वॅन गॉफची सूर्यफुलं पाहिली. मोंमार्त्रवरच्या सगळ्या नॉस्टॅल्जियामध्ये महिनाभर शांतपणे फिरलो. मला बरं वाटलं. त्यात चूक काही नाही. पण मग काहीतरी वेगळं घडलं. एकदा पॉम्पिदू सेंटर नावाच्या म्यूझियमच्या अंगणामध्ये सगळे मित्र फिरायला गेलो होतो. त्या अंगणामध्ये प्लॅस्टिकचे कपडे घालून जिवंत शिल्पांचा एक शो चालू होता. आम्हा सगळ्यांना वाटलं ही किती सुंदर कला आहे! आपण असं काही पूर्वी पाहिलेलंच नाही. सगळ्या माणसांनी फ्लोरेसन्ट आणि पारदर्शक कपडे घातले होते. त्या रेनकोटसारख्या कपड्यांमधनं त्यांची लाल आणि पिवळी अंतर्वस्त्रं दिसत होती. अत्यंत भेसूर आवाजात ती माणसं जोरजोरात गिटार वाजवत होती. केऑस होता. गिटारचं संगीत आपण एन्जॉय करू शकू असं नव्हतं. आणि मे महिन्यातलं कडाक्याचं होरपळणारं उन होतं. थोड्या वेळानं आमच्या लक्षात आलं की, तो नोकरी गमावलेल्या लोकांचा मोर्चा होता. तो न चालणारा मोर्चा होता. ते सगळे जण एका जागी उभे राहून सरकारविरोधात प्रोटेस्ट करत होते. इतक्या वर्षांनतर आजही तो दृकश्राव्य अनुभव एखाद्या चित्राइतका, चित्रपटाइतका किंवा नाटकाइतकाच माझ्या मनात गडद आहे. म्हणजे आंद्रे तारकोव्हस्कीच्या 'मिरर'मधला घर जळण्याचा अनुभव जसा आपण कधीच विसरू शकत नाही, तसा तो न चालणारा उभा मोर्चा मी कधीच विसरू शकत नाही. मग मला प्रश्न पडला की, ह्या सगळ्यांनी अशा प्रकारे एकत्र येऊन राग व्यक्त करायचं कसं ठरवलं असेल? ह्यांना लहानपणापासून अशी सवय असेल का, की आपण रंगांमधनं, संगीतातनं व्यक्त होऊ या? राग आणि विरोधसुद्धा वेगळ्या पद्धतीनं व्यक्त करू या? हे कुठून आलं? आणि हे माझ्या आजूबाजूला मला का सापडत नाहीए? अशा पद्धतीनं, तात्पुरतं का होईना, (मराठी असल्यामुळे!) ताबडतोब आपल्या आयुष्याकडे न्यूनतेनं बघण्याची एक फेज माझ्या आयुष्यामध्ये सुरू झाली. ती तेव्हा चांगली होती. मी आज हे मान्य करतो.

थोडक्यात, त्या दृश्यानं चित्रपटाकडे आणि कलेच्या शिक्षणाकडे पाहण्याचा माझ्यातला भाबडेपणा संपवला. आणि दुसरी जाणीव करून दिली ती आजच्या काळाची. आतपर्यंत पोहोचणारी दृश्यकला हा कलेच्या विकासाच्या टप्प्यातला एक काळ होता. कारण आपण इतिहासातले टप्पे आजमावत होतो. आता आपलीही जबाबदारी असणार आहे. आपण उठून गेलं पाहिजे कलाकारांपर्यंत − 'मला आजचं काम दाखवा आणि उद्याविषयी तुमच्या मनात काय चालू आहे ह्याविषयी तुमच्या भावना शेअर करा' असं म्हणत... ही माझी जबाबदारी आहे. माझ्यासाठी कुणीतरी प्रिंट छापाव्यात; एक दुकान उघडून त्यात त्या ठेवाव्यात; पुण्यातल्या एखाद्या संस्थेनं तिथं जावं आणि त्या प्रिंट्स घेऊन याव्यात; माझ्या घरी बसून मी त्या प्रिंट्स पाहाव्यात... आणि मग 'कलेचा आनंद' म्हणून मी बोलावं, हे आता चालणार नाही. मला लक्षात आलं की, ह्यापुढे मला सिनेमे बनवायचे असतील, लिहायचं असेल, नाटकं करायची असतील, तर मग मलाच उठून गेलं पाहिजे आणि मला शोधलं पाहिजे. मला कलेशीच नाही, तर त्या क्षेत्रातल्या कलाकारांशी आता जास्त 'नम्र होऊन' (हा शब्द आणि हे एक्स्प्रेशन मी एरवी कुठच्याही बाबतीत वापरत नाही, पण ते मी कलाकारांच्या बाबतीत वापरतो) संवाद साधता आला पाहिजे. ही माझी जबाबदारी आहे. जर मी ते केलं नाही, तर मी माझं स्वत:चं काम करू शकणार नाही. ही फार गडद जाणीव मला त्या काळामध्ये झाली.

मी आजपर्यंत जो कलात्मक आस्वाद घेत होतो तो काळ आजचा नाही, माझा नाही, ही जाणीव मला त्या काळातल्या पॅरिसच्या टेक्स्चरमुळे झाली. कारण आज जर तुम्ही जाऊन बघितलंत, (आणि जुनं शहर पाहिलेल्या लोकांशी चर्चा केलीत) तर हे लक्षात यावं की, आपल्या कुठल्याही शहराप्रमाणे, मग ते मुंबई असो किंवा कलकत्ता, ते शहरसुद्धा पूर्ण बदलायला लागलेलं आहे. त्याच्याकडे एका क्लासिकल दृष्टीतून पाहिलं, तर ओरखडा उठावा अशा काहीतरी एका सामाजिक दृश्याचा अनुभव आपल्याला येत राहतो. शहराभोवती 'देफॉन्स्' नावाचा बिझनेस डिस्ट्रिक्ट दशकापूर्वी उभा राहिला. तो जर विमानातनं पाहिला, तर ह्या शहरावर आक्रमण करायला एक काहीतरी इंटरेस्टिंग (मला ते स्ट्रक्चर आवडतं!) स्पेसशिप येऊन उभं राहिलंय असं वाटावं, इतकं ते मेटॅलिक आणि काचेचं आहे. आपले सगळे मॉल्स एकत्र करून जर चौकामध्ये ठेवले, तर आपल्याला तिथे फिरताना कशी भोवळ येईल तशी त्या उपनगरामध्ये गेल्यावर येते. त्या शहराच्या बदलण्यामुळे मला काळाची अशी जाणीव झाली. तो बदलतोय, फार वेगानं बदलतोय. ते बदलणं समजून घेणं आपल्या कामाचा अनिवार्य भाग आहे. इतर कोणतंही शहर त्या वेळी मला ती जाणीव करून देऊ शकलं नसतं. मी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी होतो, हे मला आज त्या काळचे फोटो बघताना आणि त्या काळची मित्रांची पत्रं वाचताना लक्षात येतं.

अशा प्रकारे हळूहळू मी शिकत गेलो... प्रवास केले, गाणी ऐकली, चित्रं पाहिली, काही व्यक्तींशी मानसिक आणि शारीरिक संबंध जोडले... आणि ह्या सगळ्यामधून माझी दृश्यजाणीव तयार होत गेली.

- सचिन कुंडलकर
kundalkar@gmail.com

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

रोचक आहे. गेल्यावर्षी भाषण ऐकताना काही मुद्दे सुटले होते - काही विसरलो होतो.
शिवाय, या निमित्ताने भाषण वाचणे आणि ऐकणे यातील फरक प्रकर्षाने जाणवला. त्यावेळी ऐकताना जाणवलेला सूर, बाज आणि मुद्दे वाचताना जाणवणार्‍यांपेक्षा वेगळे होते.

आता हे भाषण अधिक रोचक वाटले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मोजक्या शब्दात मोठे मुद्दे आहेत.

...बदलण्यामुळे मला काळाची अशी जाणीव झाली. तो बदलतोय, फार वेगानं बदलतोय. ते बदलणं समजून घेणं आपल्या कामाचा अनिवार्य भाग आहे.

हे तर कोणत्याही क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला उपयुक्त वाक्य.

कोणतीही कलाकृती बघायच्या आधी त्या कलाकाराची भुमिका, जडणघडण, त्याचा परिसर , आजुबाजुचा इतिहास बघुन मग त्या कलाकृतीचा आस्वाद अजुन चांगल्याप्रकारे घेता येतो असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख एकदा वाचून उपयोग नाही.
पुन्हा सविस्तर वाचून त्याचा आनंद घ्याव लागेल.
पण सुदैवानं अनेक व्यक्तींनी, पुस्तकांनी, चित्रांनी आणि चित्रपटांनी माझी कलेची व्याख्या सुबकतेपुरती मर्यादित ठेवली नाही
ह्यावरून गुण गाईन आवडी का कोणत्या तरी पुस्तकात पु लं नी "सुबकता आणि सौंदर्य ह्यांत गल्लत करु नये" हे किमान शब्दांत सांगितलेलं कमाल तत्वज्ञान आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख एकदा वाचून उपयोग नाही.
पुन्हा सविस्तर वाचून त्याचा आनंद घ्याव लागेल.
पण सुदैवानं अनेक व्यक्तींनी, पुस्तकांनी, चित्रांनी आणि चित्रपटांनी माझी कलेची व्याख्या सुबकतेपुरती मर्यादित ठेवली नाही
ह्यावरून गुण गाईन आवडी का कोणत्या तरी पुस्तकात पु लं नी "सुबकता आणि सौंदर्य ह्यांत गल्लत करु नये" हे किमान शब्दांत सांगितलेलं कमाल तत्वज्ञान आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आहा. या भाषणाबद्दल लईच आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एका व्यक्तीच्या कलात्मक जडणघडणीची शोकेस आहे. पुन्हा-पुन्हा निरखणे आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेट्के आणि प्रामाणिक !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed