(Y)

(Y)

लेखक - सतीश तांबे

"सरडू" अशी हाक सुमारे सतरा-अठरा वर्षांपूर्वी पावसाळ्यातील एका काळोख्या संध्याकाळी जेव्हा मी मारली तेव्हा मी एका मनस्तापाला बोलावतो आहे, ह्याची मला सुतराम कल्पना नव्हती. असणारच कशी ना? एखाद्याला हाक मारल्यानंतर पस्तावण्याची वेळ सहसा तशी कुठे येते कुणावर! बरं, ती हाक उत्स्फूर्त देखील नव्हती, तर मी सरडूला सहा तेराच्या बोरिवली लोकलला दोन तीन दिवस नीट न्यहाळून तो तोच असल्याची खात्री करून घेऊन नंतरच हाक मारली होती. एवढंच नव्हे तर त्याची माझी नजरानजर झाली असताना सरडूच्या डोळ्यात ओळखीचा लवलेश देखील जाणवला नव्हता. तेव्हा मी त्याला ओळख दिली नसती तर काही बिघडलं नसतं. आणि अगदी खरं सांगायचं तर मी एरवी तसा काहीसा कोरडा माणूसच आहे. तुसडा म्हणायला देखील काही हरकत नाही. 'जुने जाऊ द्या मरणालागुनी' ह्या वृत्तीचा. मागच्या आठवणी चिवडण्यात मला आत्ता ह्या वयातही फारसं हशील वाटत नाही. उदाहरणच द्यायचं तर, काही वर्षांपूर्वी मला शाळेच्या वर्गमित्रांकडून माजी विद्यार्थी मंडळाचा सदस्य होण्यासाठी आमंत्रण आले होते. मी ते नम्रपणे का होईना पण नाकारले होते. किंवा अलिकडे फेसबुकवर देखील बहुतांश लोक जसे जुन्या जुन्या ओळखी शोधण्यासाठी आसुसलेले असतात तसं मी कधी केलं नाही. जे कुणी समोर आले तेवढ्यानाच फ्रेंड-लिस्ट मध्ये सामावून घेतलं. असो.

तसं बोरिवलीला रहायला गेल्यावर सुरुवातीला मला मुळात ह्याची गंमतच वाटली होती की गिरगावात आपण पाहिलेले अनेक चेहेरे इथे दिसतात. त्यातील कुणी अगदीच ओळखीचं निघालं तर ओळख देण्यावाचून गत्यंतरच नसायचं, त्यामुळे इथे तशा बर्‍यापैकी ओळखी झाल्या होत्या आणि नवीन गावात अशा ओळखी होणं गरजेचंच असतं तसं. फार काय, बायकांमुळे एकमेकांच्या घरी देखील जाणं येणं सुरू झालं होतं. माझ्या बायकोला तर आवडच आहे ओळखीपाळखींची. ती सोशल म्हणतात ना तशी आहे काहीशी. मात्र मी आपणहून उठून ओळख द्यायच्या फंदात पडलो नाही कुणाच्या. फार काय, सुभाष घागरे नावाच्या एका म्युनिसिपालिटीच्या शाळेतील विद्यार्थ्याने मला ओळख काढण्यासाठी भाजी बाजारात "तुम्ही नवीवाडीच्या म्युनिसिपल शाळेत होता का?", असं विचारलं असतां, मी त्याच्याच वर्गात होतो हे मला ठाऊक असूनही की त्याला सरळ "नाही" असं म्हटलं, जे त्याला खरं तर पटतच नव्हतं. पण तो नाईलाजाने "तुमच्यासारखाच एक राघव देसाई म्हणून होता माझ्या वर्गात", असं पुटपुटत म्हणाला तेव्हा त्याला माझं नावदेखील आठवत होतं, हे कळून माझी काहीशी कुचंबणाच झाली होती. उद्या कुणीतरी सामाईक मित्र भेटला तर फजिती होणार आपली असं वाटून. पण पुढचं पुढे अशा विचाराने मी ती वेळ सराईतपणे मारून नेली. उलट 'सरडू' हा माझ्या कॉलेजातील एक मित्र -प्रकाश ब्रम्हे ह्याचा वाडीतील मित्र होता. त्या काळात जेमतेम १५-२० वेळा भेटलेला असेल नसेल. पण त्याच्या नावामुळे आणि तर्‍हेवाईक वागण्यामुळे त्याचं मला खूपच आकर्षण होतं.

त्याचं खरं नाव शरद राव होतं. ओळखीचं वाटतंय ना? पण ते युनियन लीडर शरद राव वेगळे. मात्र सरडू हे नाव काही शरदचा अपभ्रंश नव्हता. तर त्या टोपण नावाचा प्रकाशकडून कळलेला उगम असा होता की शरदला लहानपणी म्हणे कीटक, आसपासचे प्राणी ह्यांच्यासंबंधी खूप कुतुहल होतं. त्यामुळे हा झुरळं, फुलपाखरं वगैरे जिवंत पकडून त्यांना खोक्यात वगैरे पाळून त्यांच्या हालचाली, वागणं वगैरेचं निरीक्षण करायचा. त्यात ते जीव बर्‍याचदा प्राणही गमवायचे. पण त्याचं ह्याला फारसं सोयरसुतक नसायचं. सुट्टीत तर तो असले उद्योग हटकून करायचा. तर तसंच त्याने एका सुट्टीत म्हणे एक सरडा पकडला होता आणि बरेच दिवस पाळला होता. लोक कुत्र्यांना साखळ्या घालून फिरवतात ना तसा हा सरड्याला गळ्यात दोरी घालून फिरवायचा. म्हणजे समजा खेळायला आला तर हातात सोबत सरडा. त्याला तो कुठल्यातरी झाडाला बांधून ठेवायचा. सरडा झाडावर खेळायचा, नि हा मुलांबरोबर! मात्र खेळताना देखील त्याचं सरड्याकडे लक्ष असायचं. हा त्याला जपायचा खूप. आता कसं काहीही करायचं म्हटलं तर आपल्याला नेटवरून माहिती मिळवता येते. पण त्या काळात तसं नव्हतं. तेव्हा स्वत:च प्रयोग करत करत शिकायला लागायचं. बरं, गाय, म्हैस, कुत्रा, मांजर, शेळी, मेंढी वगैरे पाळीव प्राणी पाळणं वेगळं. त्यासाठी तुम्हाला काही अनुभवी माणसांकडून सल्ला तरी मिळवता येतो. माकड, गाढव देखील चालू शकतं, एकवेळ. पण सरडा पाळताना कुणाच्याही अनुभवाची शिदोरी आयती मिळणारी नव्हती. शरद रावला अशाच उफराट्या उचापती करायला खूप आवडायच्या.

त्याने म्हणे शाळेत camouflage शिकताना हे सरड्याचं उदाहरण कळल्यावर ठरवूनच टाकलं होतं की सुटीत सरडा पाळायचा आणि बघायचे त्याचे रंग बदलण्याचे खेळ. त्यानुसार त्याने परीक्षा झाल्याझाल्या पकडला होता एक सरडा. त्याला आधी दगड मारून जायबंदी करत. प्रकाशकडून शरद रावच्या ह्या करामती कळल्या तेव्हाच मी त्याच्याशी मनातून जुळला गेलो होतो. एव्हाना तुम्हाला कळलं असेल ना की मी वर जरी स्वत:ला तुसडा म्हटलं असलं तरी मी काही तद्दन माणूसघाणा इसम नाही. नेमकं आणि मराठीतील सर्वांना कळणाऱ्या पु लंच्या भाषेत सांगायचं तर मला 'व्यक्तीं'चा काहीसा तिटकारा आणि 'वल्लीं'चं आकर्षण आहे. त्यामुळेच प्रकाशकडून मला शरद राव ह्या त्याच्या मित्राची माहिती कळल्यावर मी त्याला तगादा लावून त्याच्याशी ओळख करून घेतली आणि माझ्या सुदैवाने त्या चक्करछाप माणसाने माझ्याशी त्याकाळात खूप गुफ्तगू केले. बहुदा त्याला देखील माझा बारकाव्यांमध्ये रस घेण्याचा स्वभाव भावला असावा.

मी हे म्हणतोय ह्याचं कारण हे आहे की, एक दोनदा तो मला म्हणाला होता, की 'Yes, you know, Subtle is the Lord'. आणि हे ऐकून मी त्याला म्हटलं होतं की 'मला subtle मधील ब सायलेंट हे एस्थेटिकली देखील सुंदर वाटतं', तेव्हा तो पागलच झाला होता. इतका की तो मला म्हणाला, "तू जर मुलगी असतास ना, तर मी तुला मागणीच घातली असती". मग त्याची माझी छान नाळच जुळून गेली. इतकी की त्याच्या माझ्या गप्पा, प्रकाश आणि त्याच्या गप्पांपेक्षा देखील जास्त रंगू लागल्या, सखोल होऊ लागल्या. सरड्यासंबंधात त्याने मला सांगितलेली एक गोष्ट तर मला भलतीच क्लिक् झाली होती; त्यात तथ्य असेल नसेल.

शरद मला म्हणाला होता की "ते कॅमोफ्लाज् ही भानगड होतीच पण दुसरी ही देखील होती की सरड्यासारखे रंग बदलणे आणि तेरड्याचे रंग तीन दिवस ह्यात काहीतरी साधर्म्य दिसलं मला. सरडा आणि तेरडा! काहीतरी चोरटा संबंध आहे ह्या दोघांचा असं वाटतं ना ? आणि आमच्या कन्नडा मध्ये माहिती आहे का 'तरडू' कशाला म्हणतात ते? गोट्यांना! सरडा आणि तेरडा, सरडू आणि तरडू... काय मस्त लोच्या आहे ना.. गच्चागोळ!"

तर सांगायचं काय, तर आम्ही त्या काळात जे काही भेटलो असू, प्रत्येक वेळी आमच्या गप्पा खूप रंगल्या होत्या तेव्हा. तो मला भेटलेल्या नंबरी विक्षिप्तांपैकी एक होता एवढे नक्की. म्हणजे असं बघा की - नंतर माझे डोळे उघडले म्हणा - पण त्या काळात मी स्वत:ला अत्यंत उदारमतवादी समजायचो. जगात कुणी काहीही केलं तरी मला त्याचं काही सोयरसुतक नसतं, असा समज मी करून घेतला होता. हां, तर एकदा काय झालं की व्हीटीच्या पोलिस कँटीनमध्ये मी सरडूबरोबर २-४ बाटल्या बीअर पिऊन बसलो होतो. तिथे तेव्हा सेल्फ् सर्विस् होती. मी माझ्या सवयीनुसार पोट भरण्यासाठी बटाटावडा-उसळ-पाव-कांदा खायला आणला. तर सरडूने डाळ भात आणला आणि हातात एक ग्लुकोज बिस्किटांचा पुडा. मला वाटलं हा नंतर खाणार असेल. पण ह्या पठ्‌ठ्याने काय करावं ? पोहा, उप्पीट अशा पदार्थांवर जसं खोबरं, कोथिंबीर किंवा शेव भुरभुरवतात ना कुणीकुणी, तशी ह्याने त्या आमटी भातावर चक्क ग्लुकोज बिस्किटं कुस्करून टाकली. ते बघून माझ्या मनात की पोटात की डोक्यात कुठं ते नक्की कळलं नाही पण कळमळलं. हा गडी आपण जणू काही आगळीक केलीच नाही अशा थाटात बोटं चाटून पुसून मन लावून ते जेवत होता. तेव्हा मला जाणवलं की एरवी कुणी कुठचाही प्राणी खातो हे कळल्यानंतर - जसं की, झुरळं, साप वगैरे- मला कधी 'ई-शीऽऽ' असं झालं नव्हतं, जसं हे डाळ-भात-बिस्किट कॉम्बिनेशन पाहून झालं होतं. कोणतंही खाणं हे त्या प्रदेशाच्या भौगोलिक घटकांतून आलेले म्हणून माझं मन स्वीकारत होतं. पण सरडूच्या ह्या खाण्याचं काय करायचं? तर तुम्हाला आता सरडू ही काय चीज आहे ते कळलं असेलच. तो होता देखील आडदांड. ताडमाड, ओबडधोबड, खडबडीत. चटकन्‌ कुणी जवळ जायला बावरेल असा.

त्यात माझी गोम अशी होती की मला देखील लहानपणापासून माझ्या आजोळी सरडा, खार आणि सापसुरळी ह्यांचा सहवास लाभला होता. आणि ह्यातील खारीवर माझ्या हातून कधी दगड उगारला गेला नव्हता, मात्र सापसुरळी आणि सरडा ह्यांना मी - इतर मुलांच्या जोडीने देखील असेल - पण अनेकदा दगड मारलेले होते. काहींची शिकार देखील केलेली होती. सापसुरळी ही जमिनीवर धावणारी असल्याने तिला मारणे तसे सोपे होते. पण सरडा मारायला क्वचित जमायचं. तो मध्येच मान उंचावून जे पहायचा त्यात त्याचा कुठेतरी खुन्नस यायचा. तर नंतर काय झालं की मी 'ब्यूटीफुल पीपल' नावाचा एक सिनेमा पाहिला आणि मला काही दिवसांनी अचानक आठवलं की आपण लहानपणी ह्या सरपटणाऱ्या प्राण्यांना मारायला कशासाठी जायचो? अशा प्रश्नांची उत्तरे थोडीच तडकाफडकी मिळतात. पण 'सरडू' नावाचा मला ऐकल्याक्षणी जो मोह पडला, त्याचं हे देखील एक क्षीण का होईना, एक कारण होतं.

नंतर काही दिवसांनी कॉलेज संपल्यानंतर प्रकाश ब्रम्हेच्या आणि माझ्या वाटा वेगळ्या झाल्या. सरडूच्या गाठीभेटी देखील कमी झाल्या. मला त्याचं जेवढं आकर्षण होतं, तेवढं त्याला बहुदा माझं नसावं. तशी 'समसमा आकर्षणं' एकूण कमीच असतात म्हणा. पण तरीही त्याने मला काही वर्षांनंतर समोर आलो असताना ओळखू देखील नये, हे मला जरा अतीच - खरं तर अशक्यच - वाटलं. एकदा असंही वाटलं की आपण जसे काही लोकांना ओळख दाखवायला राजी नसल्याने तोंडावर मागमूसही दाखवत नाही तसे तर करत नसेल ना 'सरडू'? पण नंतर मी विचार केला की ठीक आहे, करू दे की. पण आपण त्याला ओळख द्यायला काय हरकत आहे? आपण जसं काही जणांना ओळख असून प्रतिसाद देत नाही तसं करील फार तर तो. त्याची आपण तयारी ठेवायची. बस्‌. पण तो होता सरडूच!

मग मी त्याच्या शेजारीच उभं राहून त्याला ऐकू येईल अशा आवाजात 'सरडू' असा शब्द उच्चारला. तत्क्षणी मनात असंही आलं की त्याच्या चेहेर्‍यावर जर ओळख जाणवली नाही आणि त्याने आपले शब्द ऐकल्याचा भाव तेवढा जाणवला तर आपण 'सर, डू मी ए फेवर. मूव ए लिटल्' म्हणून वेळ मारून नेऊ शकू. ह्याची मनातल्या मनात मजा वाटत असतानाच सरडू किंचित हसून म्हणाला, "अरे तू होय? आठवलं! आमच्या पक्याचा मित्र. बरोबर ना?" मी म्हटलं,"होय, मी राघव देसाई. प्रकाशचा कॉलेजमेट". तुला तीन-चार वेळा ह्या सहा तेराच्या बोरिवलीला पाहिला होता, पण तुझ्या चेहेर्‍यावर ओळख दिसेना, म्हणून म्हटलं हाक मारून पाहूया. बरं नसशील तू शरद, तर जरासा अचंबित होशील, आणखी काय होईल? ह्यावर तो म्हणाला, "खरंच आहे, हाक म्हणजे काही दगडधोंडा नव्हे, की मारायची भीती वाटावी! बरं झालं हाक मारलीस ते, आता नवीन ठिकाणी रहायला गेल्यावर ओळखी होणं जरा जडच जातं. त्यात ते ब्लॉक कल्चर. तू रहातोस कुठे?"
मी म्हटलं, "तुझ्या पुढचंच स्टेशन. बोरिवली."
तो म्हणाला, "तुला कसं कळलं?"
मी म्हटलं, "तुला बोललो ना मगाशी, की मी आधी तुला बघितला होता, म्हणून."
तो म्हणाला, "विसरलोच की, तू आता एक कर. कांदिवलीला उतर. आपण थोडा वेळ गप्पा मारू. मग तू जा घरी. चालेल ना?"
एरवी सहसा मी असे केले नसते. 'नंतर कधीतरी ठरवून भेटू', असं म्हणालो असतो. पण सरडूविषयी मला मुळातच ओढ असल्याने मी तयार झालो आणि घरी तशी आईची सोबत असल्याने मला अधनंमधनं मित्रांबरोबर उंडारता येत होतंच. त्यामुळे मी त्याला होकार दिला.
उतरल्यावर तो म्हणाला, "कांदिवलीत एक बरं आहे की, स्टेशनमधून बाहेर पाय टाकताच ३/४ चांगले बार आहेत. त्यामुळे बरं पडतं. एरवी मी राहतो कांदिवली बोरिवलीच्या मध्ये पोयसरला. त्यामुळे मला खरं तर कुठूनही जाऊन चालतं. पण सकाळी देखील कांदिवलीहून उलटं जायला बरं पडतं. म्हणून मी कांदिवलीचीच वहिवाट ठेवली आहे. बरं.. तू घेतोस ना?
किमान समोर तरी बसशील ना?"
मी म्हणालो "मला खरं तर सवय किंवा आवड नाहीये त्याची. पण कंपनी द्यायला एखादी बीअर पिऊ शकतो. म्हणजे तसा सोवळा नाहीये मी. चल बसूया."
सरडू म्हणाला, "माझं पिणं गेल्या काही वर्षात वाढलंय. जवळपास रोजचंच म्हण ना. आईबाबा देखील कंटाळलेत मला. त्यांना ठाऊकच नाहीत ना असले विझवटे धंदे. पण काय करणार?"
असं म्हणत म्हणत आम्ही एका साध्याशा बारमध्ये शिरलो देखील. तिथे सरडूची चांगलीच ओळख दिसत होती. सरडू टेबलजवळ लगबगीने आलेल्या वेटरला म्हणाला, "इनके लिये एक किंग फिशर ले के आना!"
वेटरने विचारलं, "स्ट्राँग् की माइल्ड्?"
मी तात्काळ म्हणालो, "माइल्ड, माइल्ड्."

तर अशा तर्‍हेने आमचं सुरू झालं. मला जाणवलं की सरडूची रया कुठेतरी गेली आहे. त्याच्या बोलण्यात पूर्वीची मजा उरली नव्हती. कुठेतरी काहीतरी बिनसलंय ह्याचं. पहिला बराचसा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात गेला. जुने मित्र, गिरगावातील रहाणं आणि उपनगरातील रहाणं वगैरे. सणासुदीतील फरक वगैरे. मग गप्पांच्या ओघात तो म्हणाला, "इथे मुख्य कुचंबणा होते ती म्हणजे एक तर जुने मित्र भेटत नाहीत आणि ह्या ब्लॉक्सच्या वस्त्यात शेजारपाजार उरत नाही. त्यामुळे कुठे मोकळेपणे बोलताच येत नाही. बरं घरच्यांबरोबर किती बोलणार? सगळा लोच्या होऊन बसलाय. आता हे साधं बघ. माझं लग्न मोडलं हे देखील मला कुणाला सांगायची सोय नव्हती. आता तू भेटलास त्यामुळे हा विषय मी बोलू शकलो."

त्याचं हे बोलणं ऐकून मला काही क्षण अर्थातच अवाक् झाल्यासारखं झालं. तो पुढे म्हणाला, "तसं मुळात माझं लग्न देखील बरंच उशीरा झालं होतं. एकतर माझं रंगरूप हे असं. त्यात अभ्यासापेक्षा अवांतर उद्योग केल्यामुळे नोकरी धड नाही. आणि दारूमुळे नाव खराब! म्हणजे तेव्हा मी खरं तर आजच्या एवढी प्यायचो नाही. आठवड्यात २-३ वेळा. पण ज्ञातीमध्ये कळतंच शेवटी. पण बायको मिळाली ती दृष्ट लागावी एवढी देखणी होती. नोकरी देखील करणारी. साधारण माझ्याएवढाच पगार होता तिला. तिच्या रूपात असं काहीतरी होतं - तुला म्हणून सांगतो - की तिला पाहिली की आवळावीशीच वाटायची. मात्र जवळ घेतली की कळायचं की हिच्या तोंडाला काहीतरी खूप घाणेरडा कुबट्‌ट वास येतो आहे. आता तुला सांगायला काही हरकत नाही. पण लग्नाआधी मी तिकडे जायचोच. अधेमधे. जमना मॅन्शनला. तिथे तर बायका कायकाय खात असतात."

मी म्हटलं "मला काहीच कल्पना नाही. पण, मला वाटतं सगळ्याच स्त्रिया पुरुषांच्या तोंडाला वास हा येतोच. त्यात जवळ गेल्यावर तर येणारच. तर ते काही लग्न तुटायचं कारण होऊ शकत नाही. म्हणून तर बरेच जण किस घ्यायचंच टाळतात. बाई काय आणि पुरुष काय आपल्या तोंडाला वास येईल ह्या चिंतेत असतातच. मला तर बऱ्याचदा वाटतं की पान खाणं, तंबाखू-मावा खाणं,बडिशेप, लवंग, वेलची, मुखशुद्धी किंवा अगदी चिकलेट वगैरे खाण्याचं मूळ ह्याच्यातच आहे. तोंडाचा मूळ वास लपवणे. त्यात तो सुखावह झाला तर ठीकच आहे,पण समजा बिघडलाच तर त्या पदार्थावर खापर फोडता येतं."

माझं हे बोलणं ऐकून सरडू म्हणाला, "हे असंच बोलायला कुणीतरी चांगला मित्र लागतो. तुझं म्हणणं खरंच आहे. तोंडाला वास हा येतोच. शरीराला देखील येतोच ना! आता ते अत्तरं, फित्तरं मारून शमवतात ती गोष्ट वेगळी. पण शरीर आहे तिथे वास आहे. मला तर वास ही खूण वाटते माणसाच्या ओळखीची. 'मेरी आवाजही पेहेचान हैं' आहे तसंच वासाबद्दलही खरं आहे. आणि तिच्या शरीराचा वास आवडायचा की मला. पण तोंडाचा मात्र आंबट्ट कुबट्ट होता. अर्थात ह्यावर उपाय हाच होता की तो वास टाळणे. तर ते मी करतच होतो. तर त्यावरून ती धुसफुसायची. तिला स्वत:ला तिच्या तोंडाला येणाऱ्या दुर्गंधाची तीव्रता ठाऊक नसावी बहुदा. त्यामुळे मी तिला जेव्हा म्हटलं की आपण डॉक्टरांकडे जाऊया, तर त्याला देखील ती तयार नसायची. कारण मी तेव्हा कुठेतरी वाचलं होतं की बर्‍याचदा ह्या दुर्गंधाचं कारण पोटात असतं."

मला आता हा विषय थोडासा हलकाफुलका करायची संधी आली होती. ती साधून मी म्हणालो, "म्हणजे ते देखील पोटातून ओठात येतं वाटतं?" पण सरडूला ते बोलणं असं हलकंफुलकं करणं मान्य नसावं. त्यामुळे तो पुढे म्हणाला की, "मुळात तिची प्रकृती पित्त प्रकृती होती. शिवाय पोटात गॅस, जंत असे बरेच प्रॉब्लेम होते. त्यावर ती काहीतरी तिच्या आजीने सांगितलेली जडीबुटीची औषधं, काढे वगैरे घ्यायची. वावडिंग, पिंपळी, सुंठ, शेंदेलोण, पादेलोण असं काहीतरी घ्यायची ती गुपचूप. मला तर बऱ्याचदा असंही वाटायचं की त्यामुळे उपाय तर होत नाहीच, उलट काहीतरी अपाय होऊन हा असा कुबट्ट घमघमाट सुटतो आहे. उकिरड्यासारखा!"

हा शब्द ऐकून मी सरडूला म्हटलं की "तू पण जरा अतिच करतो आहेस. पुरुषाच्या तोंडाला दारू, तंबाखू, विडी, सिगरेट ह्यांचे वास येतात, ते काय प्रसन्न असतात की काय? तू देखील वहिनींच्या जवळ दारू पिऊन जातच असशील ना अधनंमधनं?"

सरडू म्हणाला, "तेच तर लफडं झालं. मी स्वत: तिला तिच्या तोंडाच्या वासाबद्दल फारसं बोलायचो नाही. एक तर मला ते प्रशस्त वाटायचं नाही. कारण त्यात तिची काय चूक असं वाटायचं. आणि दुसरं असं की तोंडाचा वास सोडली तर ती अस्मानकी परीच होती तशी. त्यामुळे तिला दुखावून मला शरीरसुख घालवायची इच्छा नव्हती. मला तिचा इतका लळा होता की मला ते परवडण्यासारखंच नव्हतं. मग मी ही आयडिया काढली. स्वत:ला फूस लावली की तिच्या तोंडाला वास आहे ना. मग तुझ्याही तोंडाला आणून फिट्टमफाट कर. तर ते तिला आवडेना. मग एकदा मी फुल नशेत असाताना तिला बोलून गेलो की "आयझवाडे, तुझ्या तोंडाला संडासचा वास मारतो तर मी कधी बोललो काय!" झालं. तिथून आमच्या संबंधात राडाच सुरू झाला. तुला बायकांचं ठाऊक आहे ना, त्यांनी एक शब्द पकडला ना की त्या तो धरूनच ठेवतात. तशी मी तिला तिच्या तोंडाच्या वासावरून कधी हेटाळणीकारक बोललो नव्हतो आणि शिवी तर कधीच दिली नव्हती. पण तेव्हापासून आमची जी भांडणं सुरू झाली ती संबंध पार तुटेपर्यंत ताणली गेली. जाऊ दे. तुला आता ती पहिल्याच भेटीत सांगून बोअर करीत नाही. नंतर बोलू कधीतरी."

हे ऐकून मला धसकाच बसला. म्हणजे हा आता बहुदा मला, वरचेवर असा वेठीला धरणार.

मला ह्या अवचित भेटीत तो अजिबात पहिल्या 'सरडू'सारखा इंटरेस्टिंग वाटला नाही. तरी मी ह्या वाक्याचं बोट धरून आज पळ काढता येईल की काय ते पहायचं ठरवलं. आणि मला कळलं की सरडू देखील घरी जायला उत्सुक आहे. कारण तो म्हणाला, आज आईचा संकष्टीचा उपास सुटायचाय. सकाळपासून ती म्हातारी जेवलेली नसेल, तर आता माझ्यामुळे तिला उशीर नको व्हायला. एक तर सारिका गेल्यानंतर मला एकटं वाटू नये म्हणून इथे येऊन राहिले. त्यात पोरगा पितोय हा मनस्ताप आहेच. पण गप्प रहातात बिचारे माझी मनस्थिती ओळखून. जाऊ दे. आता भेटत जाऊ असेच."

बोलता बोलता कला हे कळलं होतं की तो जरी कांदिवलीला उतरत असला आणि मी जरी बोरिवलीला तरी आमची दोघांचीही घरं खरं तर बोरिवली आणि कांदिवलीच्या मध्येच. आणि ती देखील तशी दीड दोन किलोमीटरवर. त्यामुळे आम्ही मग रिक्षानेच घरी गेलो.

माझ्या डोक्यात सरडूची गोष्ट नंतर काही काळ घुमत राहिली. समोर बसलो असताना सरडू जरी पहिल्यासारखा इंटरेस्टिंग वाटला नव्हता तरी नंतर त्याची गोष्ट आठवल्यावर मला ते 'वास' प्रकरण भलतंच इंटरेस्टिंग वाटू लागलं. वाटलं ही 'वास-धुसफुस' प्रत्येक जोडप्यात थोड्याफार प्रमाणात होतच असणार. ह्या नवराबायकोत त्याला तोंड फुटलं एवढंच. 'सहवास' ह्या शब्दामध्ये 'वास'चा अर्थ मुळात ह्या वासाशी निगडित आहे असं देखील वाटून गेलं मला. त्यात सरडूचा तिढा असा की त्याला तिच्या देहाचा वास आवडतो आहे, अंगांगाचा मोह देखील आहे. ही जबरी कॉकटेल वाटली मला वासांची. आणि मी मनात ठरवलं की आपणहून ह्यात रस घेणे जरी आपल्या सभ्यतेत, स्वभावात बसत नसले तरी सरडूने जर पुन्हा बोलावले तर अवश्य जायचे. शिवाय कुणाकडे तरी मन मोकळे करणे ही त्याची देखील गरज आहेच. आणि भले आपल्याला कंटाळा आला तरी हे काम आपण मित्रकर्तव्य म्हणून करायलाच हवे.

पुढील ४-५ दिवसातच सरडू मला सहा तेराला भेटला. त्याने मला भेटल्याभेटल्याच विचारले, "आज आहे का वेळ? तिथे जायला!"

मी म्हटलं "जाऊया की".

गेलो.

मागच्या वेळी अनेक वर्षांनी भेट झालेली असल्याने गप्पांचे सांधे पुन्हा जुळवण्यासाठी अवांतर बोलण्यात बराच वेळ गेला होता. ह्यावेळी मात्र स्थिती तशी नव्हती. त्याने बसल्या बसल्या इंटर्वल नंतर सिनेमा सुरू व्हावा तेवढ्या चपखलपणे बोलणं सुरू केलं. "सारिकाला नशेच्या भरात शिवीगाळ केल्याने आणि तिच्या तोंडाला संडास म्हटल्याने तिने जो रुद्रावतार धारण केला तो तिने कधी सोडलाच नाही नंतर. आणि तिचे खरेच होते. तिला तिच्या मोहक रंगरूपाचा असलेला अभिमान सार्थच होता. मुळात माझ्यासारख्या सुमार पुरुषाला अशी लावण्यवती बायको म्हणून मिळणे हा मलाच स्वत:ला चमत्कार वाटत होता. अणि त्याची संगती मी मुळात अशीच लावली होती की तिने कुठेतरी काहीतरी शेण खाल्लं असणार त्यामुळे घरच्यांनी तिला उजवली असणार. ते काहीही जरी असलं तरी मी विचार असा केला की, "ठीक आहे, माणसाचे घसरतात पाय आयुष्यात, पुढे सुधारू देखील शकतात ती. शिवाय आपण तरी कुठे धुतल्या तांदळासारखे आहोत, बायकोकडून तशी अपेक्षा ठेवायला?" पण ह्या माझ्या समजुतदारपणाचं मूळ खरं तर तिच्या देहाच्या पडलेल्या मोहातच होतं. त्यामुळेच तर मी तो वास सहन करत खरं तर अख्खं आयुष्य रेटायचं ठरवलं होतं. पण नंतर ती मला जवळ गेलो असता दूर देखील लोटायला लागली. तेव्हा मात्र माझी खोपडीच खसकली. त्यात मी तिला दोनचार वेळा हाणली देखील. एकूण काय ते प्रकरण चिघळतच गेलं. मग ती एकदा मला चिडवायला असंही म्हणाली की 'तुझ्याआधी एकही पुरूष मला माझ्या वासावरून बोललेला नव्हता.' तिच्या ह्या असल्या बोलण्यावरून मला संशय आला की ही आता चिरडीला पेटली आहे आणि ती आपल्याला सोडून जायच्या मनस्थितीत दिसते आहे बहुदा. बरं, ती जेव्हा मला मिळाली तेव्हाच तिचा कुठेतरी पाय घसरलेला असणार ही शक्यता मी मनात खेळवलेली होतीच. ती फक्त एवढं दाखवत होती की तिच्या जीवनात आधी एकापेक्षा जास्त पुरुष आले होते. तशी ती हुशार होती. तर मी त्या विषयाकडे लक्ष तर द्यायचं नाहीच.पण थोडं नमतंच घ्यायचं असं ठरवलं.

माझ्या ह्या नवीन पवित्र्याने सारिका थोडी वरमली. काही दिवसातच आमच्या संबंधातील गढूळता थोडी निवळली. थोडं शरीरसुख पुन्हा मिळू लागलं. अर्थात वास होताच. तो कुठे जाणार? मी मात्र पिणं कमी केलं. आणि आपणहूनच तिला सांगितलं की 'ज्या दिवशी मी पिऊन येईन तेव्हा आपण ३६चा आकडा करून झोपायचं. मग तर झालं?' त्यावर ती असंही म्हणाली की 'असंच काही नाही, कधी मला असह्य झालं तर मी पाठ फिरवीन एवढंच'. तर हळूहळू गोडीगुलाबी पुन्हा सुरू झाली होती. नंतर एक दिवस काय झालं मी थोडा जास्त प्यायलो होतो आणि मला हुक्की तर आली होती, तर माझ्या डोक्यात आयडिया आली की 'आपण मघई जोडी घेऊन जाऊया. दोघांनी एकेक खाऊया’. जोडीने आम्ही मस्त खाल्लं. एंजॉय केलं. तिला मुळात पान खायची आवड नव्हती. पण मघई मात्र तिला आवडल्याचं ती म्हणाली. मला देखील ते बरेच वाटले. त्या रात्री तिच्या तोंडाचा वास मला सुसह्य नक्कीच वाटला होता. मी मग मनाशी ठरवूनच टाकलं की आपल्याला जेव्हा मूड असेल तेव्हा मघई जोडी ऑफिसातून घरी जाताना घेऊनच जायची. काही दिवस बरे गेले. एके दिवशी काय झालं कुणास ठाऊक, पण तिने पुन्हा माझ्या ध्यानीमनी नसताना रुद्रावतार धारण केला. ती म्हणाली ‘ज्याला मी एवढी नकोशी झाले आहे त्याच्याबरोबर मला रहायचंच नाहीये’. मला मुळात कळेचना की ती कशावरून एवढी बिघडली आहे ते. नंतर जेव्हा मी दिलेले पान तिने स्ट्रेट डस्टबीन मध्ये फेकलं तेव्हा मला कळलं. तिचं म्हणणं हे होतं की तिच्या तोंडाचा वास सहन होत नसल्याने मी ही नवीन चाल रचली आहे. मघई पान आणण्याची! आणि ते खरंही होतंच की. पण मी पिणं खरोखर कमी केलं होतं. मात्र ती दुसऱ्या दिवशी माहेरी गेली ती गेलीच...

मला काय बोलावं ते कळत नव्हतं. सरडू हा इतका दंगून बोलत होता की काहीही विचारणे, बोलणे अवघड होते. शिवाय बोलताना ती त्याची बायको आहे, आणि मुख्य म्हणजे त्याला कसंही करून हवीहवीशी देखील आहे, तेव्हा त्याला भरीला घालताना देखील तिच्या विरोधात जपून बोलायला हवं, ह्याचं मला अवधान बाळगावं लागतंच होतं. शिवाय मी केवळ त्याला कंपनी देण्यासाठी बीअरचे अधनंमधनं घोट घेत होतो तेवढेच. तो मात्र गटागटा पीत होता; त्यामुळे आमच्या नशेच्या पातळ्या देखील वेगळ्या होत्या, ज्या सांभाळून संवाद साधणे देखील तसे अवघडच असते. त्याच्या जिव्हारी लागलेला विषय होता तो. जीवनमरणाचा प्रश्न होता तो. तरी देखील मधला काही काळ तो पिण्यात, सिगरेट पेटवण्यात थोडा वेळ गप्प आहे. हे लक्षात आल्याने मी त्याला म्हणालो, "तू वहिनींना परत आणायचा प्रयत्न केलास का? पाहिजे तर चल, मी येतो बरोबर... "

हे ऐकून त्याच्या डोळ्यात घळाघळा धारा लागल्या. मला काय करावं तेच कळेना.
मी त्याला "सॉरी" म्हटलं. तर तो म्हणाला, "सारिका आता या जगात नाही."
हे शब्द माझ्या कानात ठरेचनात. त्यामुळे मी तात्काळ म्हणालो, "काय"?
तर तो म्हणाला, "होय, तिचा खून झाला. १२ ऑक्टोबरला जुहू चौपाटीला कुणीतरी तिच्या पाठीत चाकू खुपसला."

हे ऐकून मी भलताच हादरलो. मला घामच फुटला. पुष्कळ दिवसांनी मी एक सिगरेट मागून शिलगावली.

सरडू आता जरा सावरला होता. तो म्हणाला, "मागच्या वेळेसच मी तुला हे सांगणार होतो.पण माझ्याच्याने सांगवलं नाही. अशा गोष्टी काही लपून रहात नसतात. पण मला अद्याप कुणी तोंडावर तसं विचारलेलं नाही, की मी कुणाला आपणहून काही सांगितलेलं नाही. त्यामुळे विचार करत होतो की तुझ्याशी तरी बोलावं की नाही? पण कुठेतरी बोलायला हवंच होतं मला. कारण ते झाल्यापासून पोलिसांनी मला चौकशीसाठी चौकीत दोनदा नेलं होतं. माझ्यावर संशय येणे साहजिकच आहे ना! त्यांची काय चूक. त्यात नेमका पंधरावडाभर आधी मी तिला वकिलाकडून घटस्फोटाची नोटिस पाठवली होती. त्यामुळे खरा खुनी सापडेपर्यंत मला अधनंमधनं पोलिसी हिसका सहन करणं भाग आहे. मला तर असा दाट संशय आहे की माझ्यावर पाळतच असणार त्यांची. इथे सुद्धा असतील. मला सारखी भीती वाटते. पण मी कशाला भिऊ? मी असं काहीही केलेलं नाही."

असं म्हणून त्याने एक मोठा घोट घेतला आणि आसपास पाहत तो म्हणाला की, "पण माझ्या मनात तसं आलं होतं एक दोन वेळा. तुला खरं सांगायला हरकत नाही. मी हे कुणाशी बोललेलो नाही". मग तो जरासं वेडगळ हसत मला डोळा मारत म्हणाला, "आपल्या मनात काय असतं ते कुणाला कळेलच कसं?"

मला ह्यावर बोलावंसं वाटत होतं, की 'पोलिसांकडे ते काय लाय डिटेक्टर वगैरे असतं आणि बनचुक्या गुन्हेगारांना देखील ते बोलते करतात, तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी असणारच ना?'

पण ते बोलायचं त्राण नव्हतं उरलं माझ्यात. त्याक्षणी मला प्रथम पश्चात्ताप झाला त्याला सहा तेराला 'सरडू' म्हणून हाक मारल्याचा. पण आता काहीच शक्य नव्हतं. आता तर त्याने मला त्याचं सगळं गुपित तर सांगितलं होतंच. पण तो म्हणत होता त्याप्रमाणे ते आता त्याच्या बायकोचा खुनी सापडेपर्यंत तरी शक्य नव्हतं. केवळ मला एकट्यालाच सांगितलं होतं. हे मला अधिकच भीतीदायक वाटलं. कारण आता हा त्याचा एक भावी साक्षीदार म्हणून माझ्यावर देखील आकस धरू शकतो, असं 'पोलिस टाइम्स' वगैरे क्राइम स्टोर्‍या वाचून मनात कुठेतरी अडकलेलं होतंच, ते हे ऐकून उफाळून आलं. हातपाय कापायला लागले. वाटलं नशीब आपण हे बायकोला सांगितलं नाही, मागच्या वेळी. नाहीतर आता आपण आणखीनच गांजून गेलो असतो. आता हा मनस्ताप आपला आपणच सहन करायला हवा. सुटका नव्हती!

माझ्या मनात हे समांतरपणे सुरू असताना सरडू बोलतच होता. त्याचं बरोबरच होतं. कुणावरही असा प्रसंग आला असता तर कुणी वेगळं काय केलं असतं? त्याच्याकडे आता तुंबलेलं आणि भळभळतं असं सांगण्यासारखं खूप काही होतंच. त्याला वाट करून देणं गरजेचंच होतं. ह्यावेळी तो मागच्यापेक्षा थोडा जास्त प्यायला होता. तो म्हणाला, "सारिकाचा खून झालाय, हे माझ्या आईवडिलांना अर्थातच माहिती आहे. पण पोलिसांना माझ्यावर संशय आहे, हे मी त्यांना सांगितलेलं नाही." मी म्हटलं, "ते बरंच केलंस तू. त्यांना कशाला आता उतारवयात त्रास द्यायचा? आणि तू कुठे काय केलं आहेस!"

अर्थात हे बोलताना माझा अंतस्थ हेतू हा होता, की त्याचा सारिकाच्या खुनाशी कितपत संबंध आहे ते त्याच्या प्रतिक्रियांवरून न्याहाळणे. मी आता नाइलाजास्तव त्या संशयकल्लोळात ओढला गेलो होतो. सरडूने कशावरून तिला हस्तेपरहस्ते उडवली तर नसेल? असा संशय मला देखील यायला लागला होताच. तसे असेल तर माझी भीती आणखीनच वाढणार होती.

सरडू माझं बोलणं ऐकून जरासा सावध होऊन सरसावला असा मला क्षणभर संशय आला. पण कदाचित नशेतून जाग आल्याने तो दचकला असावा असा मी अंदाज केला. तो म्हणाला, "मला साधारण अंदाज आहे कुणी तो खून केला असावा त्याचा. पण जाऊ दे. पोलिस बघून घेतील. पण पोलिसांनी मला सांगितलं आहे की तू दर सोमवारी चौकीत येऊन जायला हवं. खुनाचा छडा लागेपर्यंत." असं म्हणून त्याला पुन्हा एक हुंदका फुटला. मग मी त्याला म्हटलं, "चल, आपण आता निघूया. तुझी गोष्ट ऐकून मला खूपच दु:ख झालं. पण अशा प्रसंगी कोण काय करू शकतं? तुला माझ्याकडे मन मोकळं करावंसं वाटलं, हेच काय ते मला शक्य होतं."
हळुहळू आम्ही दोघं उठलो आणि मागच्या वेळप्रमाणेच रिक्षा पकडून आपापल्या घरी गेलो. रिक्षातच मी ठरवून टाकलं की हा आता अधनंमधनं आपला वेळ असा खाणारच, म्हणजे आपल्याला घरी जायला उशीर होणार हे नक्की. तर आपण आता घरी सांगून टाकणंच शहाणपणाचं ठरणार आहे. शिवाय उद्या जर का हे झेंगट वाढलंच तर घरी माहिती असलेलं बरं. हो.. ह्या भैकूंचा काय भरवसा! तो आपल्याला आत्ता भावनेच्या भरात बोलून जाईल आणि समजा त्यानेच खून केला असेल तर मला त्याने माहिती दिली आहे, तेव्हा वेळप्रसंगी मी साक्षीदार ठरू शकतो ह्या संशयाने हा मलाच उडवायचा! एकदा खून चढला की काय एक खून काय आणि दहा काय? गुन्हेगारांची मने काय असतील कुणास ठाऊक!

माझ्या डोक्यात हा विचार एकसारखा घोंघावू लागला. ह्यावर उपाय एकच होता, तो म्हणजे सरडूला चार लोकात बोलता करायचा. किमान आणखी कुणाला तरी त्याला हे सांगायला लावायचं. तेही आपल्या उपस्थितीत, की मग त्यातील गोपनीयता नाहीशी होईल. ह्या विचाराने माझ्या मनाला जरा उभारी मिळाली.

मग मी ठरवलं सरडूला आपणच येत्या सोमवारी संध्याकाळी गाठायचा, त्याला पोलिस चौकीत काय झालं, हे विचारायचं आणि पुन्हा एखाद्या बारमध्ये जायचं. मात्र ह्यावेळी मी एक ठरवलं, की आपण त्याला बार बदलायला लावायचं. तसे मला देखील माझ्या घराच्या आसापासचे दोन तीन बरे बार माहिती होते. ह्याचा हेतू एवढाच होता की सरडू म्हणाला तसे पोलिस जर खरंच पाळत ठेवून असतील, तर त्यांना आपण सहजी नजरेत येऊ नये.

असा सर्व प्लॅन करून मी सोमवारी सहा तेराला गेलो तर ठरलेल्या जागी सरडू दिसलाच नाही. मी काहीसा खट्टू झालो. एकदोन गाड्या सोडल्या देखील मी. पण सरडूचा काही पत्ता नाही. शेवटी मी काहीशा गारठलेल्या मनाने घरी आलो. घरी आल्यावर मनात फक्त सरडूचाच विचार होता, की त्या पोलिसांनी अटक तर केली नसेल ना! पण ह्या विचाराने मला आनंदच झाला. कारण त्यातून मला संभाव्य साक्षीदार म्हणून माझी वासलात लावण्याच्या भीतीतून मुक्तता मिळणार होती. मग मी आधीच ठरल्याप्रमाणे बायकोला एवढंच सांगितलं की माझ्या एका जुन्या मित्राला एक जबरदस्त फॅमिली प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे थोडे दिवस मला घरी यायला अधनंमधनं जरा उशीर होऊ शकेल. तिच्या मनाची तयारी करणं मला गरजेचं होतं. कारण मी दुसऱ्या दिवशीच घरी उशीरा यायची शक्यता होतीच. तशी माझ्या घरी मी कधीही वाटेल तेव्हा जायची सवय नव्हती. आणि आता अधनंमधनं तसं व्हायची शक्यता होतीच. बरं, सरडूला नाही म्हणणं तसं मला थोडं दिवस तरी शक्यच नव्हतं.

मंगळवारी मी सहा तेराला गेलो, तर सरडू दिसला आणि मला हुश्श वाटलं. मीच त्याला आपणहून म्हटलं की, "मी कालच तुला शोधत होतो, चौकीत काय झालं हे विचारण्यासाठी." तर सरडू म्हणाला, "नाही आज फार काही झालं नाही. जुजबी माहिती विचारली त्यानी. 'तुमचा घटस्फोट का होणार होता?' वगैरे. तुम्हाला कुणावर काही संशय वगैरे. चल, आपण बसल्यावर बोलूच." तर मी त्याला म्हणालो, "आज आपण बार बदलूया का?" तर तो म्हणाला, "मला चालेल की! आणि मला तसे कांदिवली बोरिवलीतील सगळे बार माहिती आहेत. मी तर काही वेळा कडकी असली ना की गौराई रोडला देशी दारूचे एक दोन अड्डे आहेत तिथे देखील पितो. चल, आज आपण डहाणूकर वाडीतील गोपाळ शेट्टीकडे जाऊया. मस्त वाटेल तिथे तुला. शांत आहे एकदम. गप्पा मारायला निवांत. बाहेर उघड्यावर देखील तो सर्विस देतो ओळखीच्या लोकांना." उघड्यावर बसायच्या कल्पनेने मला अर्थातच छान वाटलं होतं. पण पुन्हा गप्पा त्याच. आज आणखी पुढचे काही तपशील. जे मला कळणे हे माझ्यासाठी जिवाला घोर वाढवणारे ठरणार होते. मला खरं तर नुसत्या गप्पाटप्पा हव्या होत्या. जशा आमच्या सुरुवातीच्या काळात व्हायच्या.

बार खरंच छान होता. शेट्टी करतात त्या तुलनेत बाकड्यांची दाटीवाटी खूपच कमी होती स्टेशनपासून लांब असण्याचा परिणाम असावा तो बहुदा. बसल्याबसल्या ऑर्डर देऊन त्याने सरळ विषय सुरू केला. "त्याचं काय आहे, मला सारिका तिच्या सेक्स अपील मुळे किती आवडायची, हे मी तुला सांगितलं होतं. त्यामुळे मी तिला सहजपणे सोडायला देखील तयार नव्हतो, हे देखील बोललो होतो. पण नंतर काय झालं, तर ती त्या मघई पान प्रकरणानंतर माहेरी निघून गेल्यावर माझी पण जरा खसकलीच. मग मी तिची चौकशी सुरू केली. तिचा पाठलाग देखील केला कधीकधी. तिच्या घराजवळच्या अड्‌ड्यावर जाऊन प्यायलो, तर मला कळलं की ती तिकडे २-३ पुरुषांना लागू होती आणि लहानपणापासूनच तिला ही सवय होती- पुरुषांना पाघळवायची.

तिथे एक पंजाबी पोरगा होता, त्याने तर तिचं अॅबॉर्शन देखील केलं होतं. तो त्या भागातील गुंड होता. टपोरीगिरी करायचा. त्यात एक सेनावाला पंटर पण तिच्यावर डोळा ठेवून होता. त्यासाठी तिच्या बापाशी त्याने घसट वाढवली होती. सारिका त्याच्याशी बोलायची पण त्याला भाव द्यायची नाही. तो तर तिच्याशी लग्न करायलाही तयार होता. पण तरीही, सारिका माहेरी परत गेल्यानंतर तिच्या घराच्या आसपासच्या कुणालाच चान्स देत नव्हती. तर तिने म्हणे एका नाटकवाल्याबरोबर सूत जुळवलं होतं. तो तिला कुठे भेटला होता कुणास ठाऊक, पण त्याने तिला थेट सिनेमातच न्यायचं आमिष दाखवलं होतं. सारिकाला तिच्या रूपाचं व्यवस्थित भान होतं. आणि सिनेमात जरी नाही तरी टीवी सीरियलमध्ये तर ती सहज जाऊ शकली असती तिच्या रूपाच्या जोरावर.", असं म्हणून त्याने पुन्हा जरा इकडे तिकडे पाहून सावध होत तिचे काही फोटो मला दाखवले. तेव्हा मी खरोखरच दिपून गेलो. तो म्हणाला ते खरंच होतं. ती नाकी डोळी तर चांगलीच होती. चक्क देखणीच. आणि तिचा देह खरोखरच कुठच्याही पुरुषाला आजन्म गुलाम करील असा रसरशीत मादक होता. अर्थात मी त्या फोटोकडे फार वेळ नाही पाहू शकलो कारण एक तर ती सरडूची बायको होती आणि आता ती ह्या जगात नव्हती. पण मी दिपून गेलो होतो, हे खरंच. फार काय माझ्या मनात असाही वेडा विचार आला होता की आज मी जे सरडू ही हाक मारल्यामुळे पस्तावतो आहे, ते ही मदालसा जर सरडूच्या आयुष्यात असती तर हिची ओळख झाल्यामुळे माझ्या भावना आज कदाचित उलट्या देखील असत्या.
सरडूने मग पितापिता तिच्याविषयी आणखी देखील काही सांगायला सुरुवात केली. पण मी त्याला थांबवत म्हटलं की, "आपण एक काम करूया. आपण आता पोलिसात ओळख काढूया. म्हणजे तुझ्या डोक्याचा व्याप कमी होईल. मी ओळख काढतोच आहे. पण मला वाटतं आपण प्रकाशला हे प्रकरण कळवूया. त्याच्या ओळखी असू शकतील." ह्यावर तो म्हणाला, "एक तर मला हे प्रकरण माझ्या तोंडाने तू सोडून कुणालाही सांगायची इच्छा नाहीये. तू देखील चुकून भेटलास म्हणून. नाही तर आपल्या बायकोद्दल कुणालाही असं सांगणं सोपं काम नाही. ती देखील हवीहवीशी बाई, जिच्याबरोबर भलत्याच कारणाने बिनसलेलं. एरवी आमच्यात तशी काही फारशी भांडणं वगैरे नव्हती. जाऊ दे. पण हे काहीतरी भलतंच घडलं. कदाचित ती रागाच्या भरात माहेरी गेली नसती तर ती आत्ता जिवंत असती." त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं. समोरचा कुणी रडायला लागला की काय करावं हा माझ्यासाठी एक सनातन प्रश्न आहे. त्यामुळे मी काही काळ नुसता गप्पच राहिलो. मग डोळे पुसत तो म्हणाला की, "आणि तुला ठाउक नाही का, अरे प्रकाश गेली अनेक वर्षे गल्फला आहे."

त्याचं हे एकूणच बोलणं ऐकून मला कळलं की त्याच्या गुपिताचा तीळ सात जणांमध्ये वाटून माझी भीती दूर करण्याचा माझा बेत तडीस जाणं शक्य नाहीये. तेव्हा मला आता हे ओढवून घेतलेलं संकट निदान त्या खुनाचा तपास लागेपर्यंत तरी सहन करणे भाग आहे. सुटका नाही, हे शब्द माझ्या मनात मग वरचेवर घुमू लागले. पण इलाजच नव्हता. अर्थात सरडू हा तसा डिसेंट माणूस होता. एकदा त्याची ही कर्म कहाणी ऐकवल्यानंतर त्याने मला बारमध्ये बोलावणं तसं कमीच केलं. मात्र तो एकटा रोजच पीत असणार ह्याची मला त्याला न विचारताच खात्री पटली. त्या काळात मोबाइल नुकताच आला असल्याने आज जसे उठसूठ कुणालाही कुणाशी कधीही कुठेही संपर्क साधता येतो ती शक्यता तेव्हा नव्हती ते बरं होतं. तेव्हा मोबाइल असता तर काय झालं असतं, ह्या कल्पनेनेही अंगावर शहारा येतो, अजूनही. पण कदाचित मोबाइल असता तर त्यात संबंधांचे पुरावे बाय डिफॉल्ट तयार होण्याची सोय असल्याने संशयित खुनी सापडणे हे सोपे देखील गेले असते कदाचित. कुणी सांगावं? पण तरीही पांढरपेशी लोकांचा तसा गुन्हेगारीशी संबंध क्वचितच येतो ना, त्यामुळे भीती टळली नसतीच बहुदा!

त्यामुळे मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो, त्या काळात. बरं, घरी बायकोला देखील सांगायची शामत नाही. ती तर माझ्याहून भित्री भागुबाई!

एकदा संध्याकाळी तर गंमतच झाली, मी सहज कोथिंबीर आणायला म्हणून खाली उतरलो. तर माझ्या घराच्या खालीच रस्त्याने सरडू चालताना दिसला. तो तसा झिंगलेला नव्हता पण त्याच्या चालीत एक भरकटलेपण होतं. मी त्याला हाक अर्थातच मारली नाही. मला क्षणभर भीतीच वाटली की हा आपल्या मागावरच तर आला नसेल ना इथे? मी तर त्याला माझ्या घरचा पत्ता कधीच दिला नव्हता. त्याला फक्त एरिया माहीत होता. मग हा इथे कशासाठी आला असेल? घरी जाऊन मी कोथिंबीर दिली पण ती देताना मला जाणवलं की माझ्या तळहाताला घाम फुटला आहे. रात्री मला बराच वेळ झोप येईना. सरडूनेच जर बायकोचा खून केला असेल तर तो आपल्यालाही उडवू शकतोच. खून पहाणाऱ्या व्यक्तीला खुनी माणूस साक्षीदार नष्ट करण्यासाठी मारून टाकल्याच्या गोष्टी लहानपणापासून वाचनात आलेल्या असतातच आपल्या त्या आठवल्या. पण नंतर असंही वाटलं की आपण कुठे पाहिलाय खून? की सरडूने आपल्याला कुठे सांगितलंय की त्यानेच तिचा खून केला म्हणून. उलट सरडू तर आपण खून केला नसल्याचंच म्हणाला आहे. मग सरडू कदाचित आपल्या घराजवळच्या साईबाबाच्या मंदिरात आला असेल. कारण हे देऊळ पावतं असा लोकांचा विश्वास होता. खरं सांगायचं, तर सरडू प्रकरण झाल्यापासून माझं देखील ह्या देवळात जाणं वाढलं होतं. हे सर्व आठवून साईबाबांच्या देवळात तो आला असणार अशी मनाची समजूत काढल्यानंतर मला अपरात्री कधीतरी झोप लागली.

मग मी सहा तेराची गाडीच हळूहळू बदलली. म्हणजे कधीतरी जायचो पण ते देखील सरडू आहे का ह्याचा अंदाज घ्यायला. एक दोन भेटी देखील झाल्या नंतर आमच्या. पण आता त्यातून नवीन काही माहिती हाती येत नव्हती आणि माझ्या दृष्टीने ते चांगलंच होतं. त्यात बर्‍याचदा तो तेच तेच गुऱ्हाळ परत परत लावायचा. त्यात काहीवेळा बायकोबद्दल उमाळा असायचा तर काही वेळा रागराग असायचा. मला मात्र त्याने त्याच्या बायकोचा फोटो त्याने पुन्हा दाखवावा असं वाटायचं, एवढी ती माझ्या मनात भरली होती. 'सुंदरा मनामध्ये भरली' ही स्थिती! मजा ह्याची वाटायची की ती त्याला सोडून गेलेली बायको होती, मग तिची लफडी कळल्यामुळे ह्याने तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती, नंतर तिचा खून झाला होता आणि तरीही मला त्याच्याकडे तिचा फोटो मागताना संकोच वाटत होता. हे मला गंमतीशीर वाटत होतं. सरडू जर पूर्वीचा असता तर मी त्याच्याशी हे बोललो देखील असतो. पण त्याच्या सध्याच्या मनस्थितीत काहीही शक्य नव्हतं. सरडूचं पिणं भरकटणं वाढतच चाललं होतं आणि खुनी काही सापडत नव्हते. माझ्या अंदाजाने सारिकाच्या भानगडी इतक्या असाव्यात की त्यामुळे नेमका कुणावर वहीम घ्यावा ते पोलिसांना समजत नसावे. मी मात्र जणू देव पाण्यात बुडवून बसलो होतो की सारिकाचा खुनी लवकर सापडावा म्हणून. मी साईबाबांना साकडं देखील घातलं होतं. मला ह्या भीतीतून मुक्त व्हायचं होतं.
पण झालं भलतंच. एके दिवशी वर्तमानपत्र उघडलं आणि आत्महत्या, अपघात, खून वाचायची सवय असल्याने, एक बातमी वाचून मी हबकूनच गेलो. डिसेंबरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे तुंबलेल्या गटारात गौराई खाडीच्या सुनसान रस्त्यावर श्री. शरद राव ह्या मध्यमवयीन गृहस्थाचा देह मृतावस्थेत सापडला. त्यांनी मद्यप्राशन केलेले होते. त्या अवस्थेत ते झाडाखाली आडोशाला उभे असाताना, त्यांचा तोल जाऊन ते गटारात पडले असावेत आणि नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा कयास आहे.

ही बातमी वाचून मला क्षणभर दु:ख झालं. पण काही क्षणातच हुश्श झालं. कारण आता 'सरडू'च जगातून नाहीसा झाल्याने माझ्या मनात तो माझं काही बरंवाईट करेल ही शक्यताच नाहीशी झाली होती. मनातल्या मनात मला 'साईबाबा पावले!', असं देखील वाटलं. पण हा सगळा आनंद काही काळच टिकला. मी बायकोला मग घडलं ते सारं सांगून टाकलं. कारण मला देखील कुठेतरी मन मोकळं करणं भागच होतं. पण हा मन मोकळं झाल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण नंतर हा आनंदच माझ्या जिव्हारी लागला. आपल्या मित्राच्या मरणाचं आपल्याला हुश्श वाटावे ह्याचा अधिकच भेदक मनस्ताप सुरू झाला. माझ्यापाशी मन उघड केल्याने तो मला मारू शकतो ही माझ्या पांढरपेशा मनाने स्वत:हून तयार केलेली भीती होती. ती काही सरडूने मला दिलेली धमकी नव्हती. एवढंच नव्हे तर मी ह्या प्रकरणात रस घेत नाहीये, हे माझ्या वागण्यातून जाणवल्यावर त्या बिचार्‍याने मला भेटणे आपणहूनच खूप कमी केले होते. त्यामुळे त्या बिचार्‍याला बोलायला कुणी उरले नसेल. आपण त्याला जर साथ दिली असती तर तो कदाचित लिमिटमध्येदेखील प्यायला असता. कदाचित त्यादिवशी गौराईला गेला देखील नसता. एका परीने आपण त्याच्या मरणाला कारणीभूत आहोतच आणि आपल्या मनाच्या खेळासाठी त्याला जबाबदार धरून वर त्याच्या मरणाचा आनंद घेतोय. मला माझं मन खूप घाण वाटलं. त्यात त्याच्या बायकोचे फोटो डोळे भरून पाहण्याची माझ्या मनात खदखदणारी वासना आठवून मला स्वतःची किळस आली.

हा मनस्ताप सुरू असतानाच मला एकदा पोलीस चौकीतून फोन आला की, "तुमच्याशी थोडे काम आहे; तर तुम्ही लवकरात लवकर बोरिवली मार्केटच्या चौकीत येऊन इन्स्पेक्टर विजय घोरपडे ह्यांना भेटा."
हा फोन सरडूच्या संदर्भात असणार हे उघडच होतं. मला ते एका अर्थी बरंच वाटलं, कारण सरडू कसा मेला त्याबद्दल मला थोडं कुतूहल होतंच. ते शमवण्याची मला ही आयती संधी चालून आली होती. मी त्या दिवशीच संध्याकाळी इन्स्पेक्टर विजय घोरपडेंना भेटलो. ते माझ्याशी अत्यंत आपुलकीने बोलले. "ह्या सर्व प्रकरणात तुम्हांला नाहक ताप होणार आहे. पण आमचा काही इलाज नाही. कारण शेवटचे कित्येक महिने तुम्हीच त्याच्या बरोबर असायचात, अशी आमची माहिती आहे आणि त्यामुळे, तुम्हांला शरद रावने काय काय माहिती दिली होती, हे जर तुम्ही सांगितलंत तर आमचं काम अर्थातच सोपं होईल. कारण तो मरून गेला पण आमचं कोडं काही सुटत नाहीये. जर तुम्हांला त्याने स्वत:च बायकोला मारल्याचं सांगितलं असेल, तर आम्हांला आमच्या तपासाची चक्र त्या दिशेने फिरवता येतील. किंवा त्याचा कुणावर संशय असल्याचं तो बोलला होता का? कारण शरद बहुधा अपघाती मेला असावा, असं त्याच्या बॉडीवरून दिसतं आहे. मुसळधार पाऊस पडल्याने तो तर्राट अवस्थेत झाडाखाली आडोशाला गेला असणार आणि त्याचा तोल जाउन तो झाडाजवळच्या गटारात पडला असणार. सकाळी झाडूवाल्याने त्याला पाहिलं आणि चौकीत कळवलं. तिथे गेल्यावर आमच्या हवालदाराला ग्राउंड लेवलला इंग्रजी Y आकाराचे पाय दिसले आणि त्याचं धड पूर्णपणे गटारात होतं. बॉडी फुगली होती रात्रभर पाणी खाऊन. तो बहुधा अपघातच होता. तरीपण त्याच्या बायकोला संपवणार्‍याचा हात ह्यामध्ये असेल का, हे देखील आम्हांला पाहायला पाहिजे ना? तर तुम्ही जी काय असेल ती माहिती आम्हांला द्याल तर बरं होईल. शरदनेच जर बायकोचा खून केला असेल तर मग ही केस सोपीच आहे. शिवाय त्यात राजकीय प्रेशर वगैरे.. जाऊ दे."

मी इन्स्पेक्टर घोरपड्यांना सांगितलं की, "शरदने तिचा खून केला वगैरे तो माझ्याशी अजिबात बोलला नाही आणि ना त्याने कुणावर संशय असल्याचं मला सांगितलं. मला त्याच्या बोलण्यातून एवढंच जाणवलं की त्याला त्याची बायको खूप आवडायची परंतु काही कारणामुळे त्यांचं बिनसलं आणि त्यात त्याचं दारूचं व्यसन वाढतच गेलं; ज्याची परिणती अखेर त्याच्या मरणात झाली."

त्यांनी मग त्यांच्या असिस्टंटला सांगून माझी जबानी रीतसर नोंदवून घेतली आणि मला सोडलं. त्यानंतर मला कधीच चौकीतून फोन आला नाही की मी देखील त्या प्रकरणात पुन्हा लक्ष घातलं नाही. पण नंतर कैक दिवस माझ्या मनःचक्षुंपुढे सरडूचा तो Y आकारात गटारात बुडालेला देह दिसायचा. पोलिसांकडून मिळालेल्या वर्णनानुसार मी ते झाड आणि तो जिथे बुडाला, ती जागा बघूनही आलो. एक दोनदा तो माझ्या स्वप्नातही आला.

पण ह्यात झालं असं की सरडूच्या मृत्यूचं ते वर्णन ऐकल्यापासून माझ्या डोक्यातील Y ह्या अल्फाबेटला एक वेगळीच आकारछटा येऊन चिकटली. तरी माझं नशीब की एकूणातच Y तसा कमीच सामोरा येतो. काहीवेळा असंही मनात येतं की तो I नाहीये ते बरं आहे. किंवा You साठी U असं जे संक्षिप्त रूप लिहितात, ते जर का समजा Y असं रुळलं असतं, तर कदाचित माझ्यासाठी 'रात्रंदिन आम्हा' अशी स्थिती झाली असती. मग असंही वाटतं की असा सततचा भडिमार झाला असता तर मन निबर देखील झालं असतं कदाचित. अर्थात काळाच्या ओघात मला त्याचा हळूहळू विसरही पडला होता. माझी मधली काही वर्ष तशी मनस्तापाविना गेली.
पण नंतर मी फेसबुकवर वावरू लागलो. त्यातही पहिली काही वर्षे निवांत गेली. पण हळूहळू मी स्मायली शिकलो. आणि त्यात माझं जुनं Y दुखणं पुन्हा उफाळून आलं. म्हणजे कळलं ना?

........ हल्ली फेसबुकवर पसंतीचा आंगठा उंचावताना जेव्हा जेव्हा मी (Y) असं टाइप करतो तेव्हा तेव्हा माझ्या मनात मनाचा भित्रेपणा आणि त्यातून अनुभवलेला एका मरणाचा विखारी आनंद हे मनस्ताप हटकून खुडबूड करतात.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

एक वेगळे लेखन आहे हे नक्की. याला काय म्हणावे? हे आवडले का? या दोन्ही बद्दल जरा संभ्रमात आहे.

कथा म्हणावेसे वाटले, पण कथानायक म्हणा किंवा लेखक म्हणा हा केवळ प्रस्तावक/श्रोता म्हणून भेटतो तर नाट्यपूर्ण घटना असलेल्या व्यक्तीला नायक समजावे तर त्याला आटोपल्यावरही लेखन चालु राहते. शिवाय 'टिपिकल कथां'सारखे दुसरी बाजू समज(व)णारे (इथे त्या पत्नीची) काहीही घडत नाही.

व्यक्तीचित्र म्हणावे तरी पंचाईत आहेच.. निव्वळ ललित लेखन म्हणूनही सोडून देता येऊ नये इतके नाट्य आहे.

असो. वाचित रहावे हेच उत्तम.
इतरांच्या प्रतिसादावरून काही दिशा मिळेल तर बघतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाट्य बाकी जबरा आवडले. वर्णनशैली मस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला तांब्यांच्या गोष्टी आवडतात. पण ही नाही आवडली.

एकतर Y (फेसबुकी लाइक) आणि सरडूच्या मृतदेहाचा आकार ही ओढूनताणून लेखकीय सोय वाटली. (यातून बहुदा फेसबुकावरचा कृतिशून्य पाठिंबा दर्शवायचा असावा, पण तरी ओढूनताणूनच.) नि त्यांच्या गोष्टीतल्या 'खास मध्यमवर्गीय भित्र्या' प्रतिक्रिया प्रेडिक्टेबल झाल्या आहेत असं ही गोष्ट वाचून जाणवलं. 'पठारावर अमर' कायच्या काय भारी होती. (किंवा ती कणकेशी चाळे करून आपल्या गंडातून मुक्त होणारा बाप्या असतो ती, किंवा मित्रामित्रांच्यात स्त्रीसंगाबद्दल गप्पा होतात ती, किंवा साध्या बोलण्यात हिंसेची बीजं टपलेली असतात असं नायक नायिकेला पटवून देऊ पाहतो ती.) ते फॉर्म्समधले प्रयोग अशक्य चपखल होते. ते या गोष्टीत नाहीयेत. जामच सरळसोट-बाळबोध वाटली.

असंही शक्य आहे, की मला काही कळलंच नसेल. Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी पहिल्यांदाच सतीश तांब्यांची कथा वाचत आहे. लेखन आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रभावी लेखन.
मीही प्रथमच सतीश तांब्यांची कथा वाचत आहे. लेखन आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कथा बरीचशी आवडली.

या मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे शीर्षक सापडल्यानंतरच कथा लिहून झाली असावी. (Y) पासून वरचे सगळे कथानक कसे सूचत गेले असावे याचा विचार करणे मजेशीर वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आहे. आवडली. मी पण सतीश तांबे ची कथा पहिल्यांदाच वाचत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शैली आवडली पण कथा समजली/ठसली नाही.
मध्यमवर्गीय कातडीबचाऊपणा आणि निष्क्रियता वगैरे दाखवायचं असेल तर ते रोज जाणवतं त्यापेक्षा अधिक ठसठशीतपणे जाणवलंं असं झालं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा आवडली. पहिल्याच वाचनामधे शैली आणि शब्दरचना खास वाटली. पण ते शीर्षकाचे आणि कथेच्या शेवटाचे तेवढेसे जुळून आले नाही असे वाटत राहिले. आजचा काळ आणि विचार असल्याने कथावस्तू अधिक आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0