निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)

भाग १ | भाग २
ह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.

त्याउलट इंग्रजांविरुद्धचा वासुदेव बळवंत फडक्यांचा मार्ग कुरुंदकरांना 'अव्यवहार्य, भाबडा आणि पोरपणाचा' वाटतो. आता इथे पहिला प्रश्न असा पडतो, की जर सशस्त्र क्रांती भारतात शक्यच नव्हती, तर सावरकरांच्या देशप्रेमाला आणि त्यातून उपजलेल्या सशस्त्र क्रांतीच्या योजनेला भाबडं आणि अव्यवहार्य का म्हणता येणार नाही? आणि जर ती व्यवहार्य होती, तर सावरकरांना आणि त्यांच्या योजनेला भारतात कितीसे स्वयंसेवक मिळाले? सावरकरांना हिंदूंकडून जे वर्तन अपेक्षित होतं ते व्यवहार्य म्हणता येईल का? 'ज्या तरुणांना सावरकर पचू शकले असते ते तरुण सावरकर बंधमुक्त होण्यापूर्वीच गांधींच्या नेतृत्वाखाली येऊन गेले होते आणि सावरकर ज्यांना पचणेच शक्य नव्हते त्या भिरू, अंधश्रद्ध, सनातनी, वयस्क मंडळींच्या कोंडाळ्यात सावरकरांना राहणे भाग पडले ही भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे', असं कुरुंदकर म्हणतात. भारतीय समाजमन गांधींकडे का वळलं आणि सावरकरांकडे ते का वळलं नाही ह्याची परखड चिकित्सा कुरुंदकर करतील, अशी अपेक्षा असेल तर ती ह्या लेखात तरी पूर्ण होत नाही. सावरकरांचा कठोर बुद्धिवाद, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि त्यांचा जडवाद कुरुंदकरांना आवडणं हे स्वाभाविकच आहे, पण त्यांना व्यापक जनाधार न लाभण्याचं ते एक कारण असू शकतं हे कुरुंदकरांच्या लक्षात येत नाही, की त्यांना ते सांगावंसं वाटत नाही, ते कळत नाही.

ह्यानंतरचा लेख कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्यावर आहे. न्या. रानडे, म. फुले किंवा आगरकर ह्यांचं मोठेपण मान्य करून कुरुंदकर म्हणतात की समाजपरिवर्तनासाठीची व्यापक सामाजिक चळवळ ही माणसं उभी करू शकली नाहीत, पण ते महर्षी कर्वे, राजर्षी शाहू, भाऊराव पाटील आणि डॉ. आंबेडकर ह्यांना जमलं, आणि ह्या सर्वांमधले सर्व गुण एकत्र करणारं व्यापक समन्वयाचं स्थान भाऊराव पाटलांना आहे. 'स्त्रिया, दलित व बहुजन समाज सुशिक्षित करून सोडताना भाऊरावांनी मिळतील ते ब्राह्मणही ज्ञानगंगेत धुऊन पवित्र करून सोडले. म्हणून त्यांना समन्वयाचे सर्वात मोठे प्रतिनिधी म्हणायचे.' असा कुरुंदकरांचा दावा आहे. भाऊरावांवरचा गांधीयुगाचा आणि केशवराव जेध्यांसारख्या बहुजन नेतृत्वाचा प्रभाव सांगून भाऊरावांच्या कार्यातून यशवंतराव चव्हाणांसारखा नेता उभा राहिला असंही कुरुंदकर मांडतात. सहकारी चळवळ आणि शेतीच्या आधुनिकीकरणाचा पाया भाऊरावांनी घातला असं ते म्हणतात. सर्व जाती-जमाती, धर्म-पंथ ह्यांच्यासाठी एकत्र वसतिगृहं आणि शिक्षण ह्यामुळे भाऊरावांनी समाजात जी सरमिसळ केली ती कुरुंदकरांना मूलगामी वाटते. हे मुद्दे सहज मान्य होण्यासारखेच आहेत. पण मग लोकहितवादींच्या सामाजिक कार्याबद्दल कुरुंदकर काय म्हणतात ते ह्या चौकटीत तपासायला हवं.

'लोकहितवादींनी एखादी समाजसुधारणा सुरू करण्याचा संभव नाही. ते फार तर वाचनालयांना पाठिंबा देऊ शकतात, अनाथालये उघडायला मदत करू शकतात; पण त्या बरोबरच मंदिरांनाही मदत करून जातात.' अशा शब्दांत कुरुंदकर लोकहितवादींच्या सामाजिक कार्याची बोळवण करतात. आता 'विद्या हा समाजपरिवर्तनाचा मूलाधार आहे' आणि 'विद्यावृद्धी आणि ग्रंथनिर्मिती ह्यांच्यातलं नातं अतूट आहे' अशी धारणा असलेल्या लोकहितवादींनी वाचनालयं उघडणं अतिशय सुसंगत वाटतं. त्यांनी चालू केलेली 'पुणे नगर वाचन मंदिर'सारखी संस्था (स्था. १८४८) अजूनही चालू आहे. 'ज्ञानप्रकाश', 'इंदुप्रकाश'सारखी महत्त्वाची नियतकालिकं चालू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक आणि शैक्षणिक मदत केली. गुजरातेत त्यांनी वक्तृत्वमंडळ चालू केलं. अहमदाबादेत पुनर्विवाहमंडळ उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या भूमिकेतून स्थापन झालेल्या ‘आर्य समाज’ आणि ‘प्रार्थना समाज’ ह्या दोन्ही पंथांशी त्यांचा निकटचा संबंध होता. भाऊराव पाटलांचं सामाजिक कार्य अर्थात ह्या मानानं फार मोठं आणि गौरवास्पद आहे ह्याबद्दल वाद नाही, पण ते नंतरच्या काळातलंदेखील आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापनाच लोकहितवादींच्या हयातीत झाली. त्यांच्या सामाजिक कार्यापेक्षा त्यांचं लिखाण अधिक महत्त्वाचं आहे, पण त्यांचं सामाजिक कार्य त्यांच्या विचारांना पूरकच आहे असं दिसतं. कुरुंदकरांचे काही पूर्वग्रह इथे आड येतात, की इतरांना न जाणवलेलं काही तरी मांडण्याचा अट्टहास, हे सांगता येणार नाही. पण ते असो. कर्मवीर भाऊराव पाटलांना कुरुंदकर न्याय देतात. त्यांच्याविषयी फार वेगळं असं काही विश्लेषण मात्र ह्या लेखात नाही.

ह्यानंतरच्या लेखाचा विषय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् आहेत. त्यांच्या कर्तृत्वाविषयी सांगताना कुरुंदकर खुलतात असं जाणवतं. राजकीय सामर्थ्य नसणाऱ्या एका तत्त्वज्ञावर राजकीय जबाबदारी टाकली गेली आणि त्यांनी ती चांगल्या प्रकारे पार पाडली ही गोष्ट कदाचित कुरुंदकरांच्या प्रकृतिधर्मामुळे त्यांना भावत असेल. रशियात राजदूत असतानाच्या दोन स्टॅलिनभेटींचा वृत्तांत मुळातूनच वाचण्यासारखा आहे. स्टॅलिनला राधाकृष्णन् ह्यांचं वर्तन नक्की कसं वाटलं असेल ह्याविषयी कुरुंदकर थोडा कल्पनाविलास करतात असं मात्र जाणवतं. बऱ्या वाईट चालीरिती, धार्मिक कर्मकांड, वगैरे सगळाच आपला वारसा मानणारे, आणि आधुनिक जगानं नव्या व्यथा आणि नव्या उणिवा निर्माण केलेल्या आहेत असं म्हणणारे राधाकृष्णन् कुरुंदकरांना भावतात असं दिसतं. ज्याच्या आचरणात आणि मनात आध्यात्मिकता सहज धर्म म्हणून व्यक्त होत जाईल, त्याचप्रमाणे चिकित्सा आणि जिज्ञासाही सहज धर्म म्हणून त्याच्या ठायी वावरेल, असा नवा माणूस कसा घडवायचा हा राधाकृष्णन् ह्यांना पडलेला प्रश्न कुरुंदकरांनाही जवळचा वाटत असावा. पण त्यामुळे एक प्रश्न मात्र पडत राहतो : कुरुंदकरांच्या विचारांत त्या काळच्या (किंवा आताच्याही) समाजाला प्रक्षोभक किंवा धक्कादायक वाटतील, अशा अनेक गोष्टी होत्या. त्यांचा दरारा निर्माण होण्यामागे आणि त्यांचं लिखाण आताही वाचावंसं वाटण्यामागे ह्या इतरांहून वेगळ्या आणि निर्भीड विचारांचा निश्चित महत्त्वाचा वाटा आहे. पण तरीही व्यक्तिश: त्यांना राधाकृष्णन् ह्यांच्या शांत, समन्वयी, बंडखोरीविरहित व्यक्तिमत्वाचं आणि विचारांचं आकर्षण होतं का? आणि तसं असेल तर ते का?

सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान ह्यांविषयी पुढचा लेख आहे. खानांना मिळालेलं 'नेहरू शांतता पारितोषिक' स्वीकारण्यासाठी स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी त्यांचं भारतात पुन्हा आगमन हे त्याचं निमित्त आहे. भारतीय नेत्यांनी पठाणांकडे दुर्लक्ष करून त्यांना लांडग्या पाकिस्तानच्या तावडीत दिलं ही खानांची वैफल्यग्रस्त तक्रार आणि खानांनी स्वतंत्र पख्तून प्रांत मागून अशांतता माजवली, मग ह्यांना हा पुरस्कार कशाला, हा काही भारतीय उर्दू वृत्तपत्रांचा आरोप ही त्याची पार्श्वभूमी आहे. कुरुंदकरांच्या मते १९४७ साली पठाणांनी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात सामील होण्याचा कौल देणं हे अपेक्षित होतं आणि त्यामुळे भारतीय नेत्यांनी त्यांचा विश्वासघात केला ह्या खानांच्या म्हणण्यात अर्थ नाही. आणि, आता खानांना पाकिस्तानातच स्वतंत्र पख्तून प्रांत मागावंसं वाटणं हेसुद्धा गैर नाही. मात्र, खानांची वंदनीयता ही काही ह्या गोष्टींमुळे नाही, तर हिंसेची मोठी परंपरा असणाऱ्या पठाणांमध्ये त्यांनी अहिंसेचं तत्त्व रुजवलं ही खरी वंदनीय गोष्ट आहे, असं कुरुंदकर मांडतात आणि खानांना नेहरू पुरस्कार देण्याचं समर्थन करतात. पठाणांमध्ये अहिंसा कितपत रुजली हा प्रश्न आज उपस्थित करता येईल, पण खानांच्या वंदनीयतेमागचं हे कारण न पटण्यासारखं नाही. मात्र, ह्या लिखाणाला तात्कालिक स्वरूप आहे आणि सरहद्द गांधींविषयी विशेष नवीन किंवा वेगळं काही त्यात मिळत नाही.

ह्या लेखाबरोबर 'इतिहासकालीन व्यक्ती' हा पुस्तकातला पहिला विभाग संपतो. समकालीन व्यक्तींविषयीच्या पुढच्या विभागाबद्दल लेखमालेच्या पुढच्या भागात.

(क्रमश:)

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

उत्तम लेखमाला.

सावरकरांचा कठोर बुद्धिवाद, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि त्यांचा जडवाद कुरुंदकरांना आवडणं हे स्वाभाविकच आहे, पण त्यांना व्यापक जनाधार न लाभण्याचं ते एक कारण असू शकतं हे कुरुंदकरांच्या लक्षात येत नाही, की त्यांना ते सांगावंसं वाटत नाही, ते कळत नाही.

सावरकरांचा उदो उदो करणारेही त्यांच्या विचारांपेक्षा हिंदुत्ववादी भूमिकेला, त्यांच्या सशस्त्र क्रांतीच्या स्वप्नाला, आणि त्यासाठी भोगलेल्या हालअपेष्टांमुळे प्राप्त झालेल्या सच्चेपणावर भाळतात. त्यांना 'गाय हा उपयुक्त पशू आहे' सारखी वाक्यं अडचणीची वाटतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सावरकरांचा उदोउदो करण्याकरिता, त्यांच्यावर भाळण्याकरिता, फार कशाला, त्यांना आदर्श/दैवत/व्हॉटेवर मानण्याकरिता, त्यांचे विचार इन टोटो उचलणे कोणावरही बंधनकारक नसावे.

'गाय हा उपयुक्त पशू आहे' हे सावरकरांचे एक मत झाले. त्यामागे त्यांचे काही विचार असतीलही, आणि, फार कशाला, ते विचार तर्कास धरूनही असतील. पण म्हणून सावरकरांचे अनुयायी म्हणवणार्‍या कोणावरही त्यांस ग्राह्य मानणे हे बंधनकारक असू नये.

काहीही होवो, आणि कोणीही काहीही म्हणो, तरीही आपल्याला पटलेल्या मार्गाशी, तत्त्वांशी एकनिष्ठ राहून, आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची आणि ते जनतेच्या गळी उतरवण्याची गांधीजींची हिंमत आणि ताकद वाखाणताना ज्याप्रमाणे आर्थिक आणि लैंगिक बाबतींतले त्यांचे प्रत्येक म्हणणे ग्राह्य धरणे हे बंधनकारक नसते, त्याचप्रमाणे.

(फॉर द्याट म्याटर, 'गाय हा उपयुक्त पशू आहे' म्हणणार्‍या सावरकरांनासुद्धा स्वतः उठून नजीकच्या ष्टेकहौसात जाऊन एखादा मीडियम-रेअर हाणणे बंधनकारक नसावे.)

आणि तसेही, अंतिमतः, 'सावरकर हा उपयुक्त पशू आहे'. (फॉर द्याट म्याटर, गांधीही.) तेव्हा, सावरकरांच्या काय, किंवा गांधींच्या काय, प्रतिपादनांतला आपल्याला (आपल्या कार्यभागाला) उपयुक्त तेवढा भाग उचलला, तर चुकले कोठे?

- (गोभक्षक गांधीअ‍ॅडमायरर, आणि सावरकरांच्या विचारस्वातंत्र्याचा आणि राष्ट्रप्रेमाचा पूर्णपणे आदर राखूनसुद्धा त्यांना सोयीपुरतेदेखील ग्राह्य न मानून त्यांचा उदोउदो न करणारा) 'न'वी बाजू.
===============================================================================================================================================
या निमित्ताने 'विज्ञाननिष्ठ निबंधा'तला 'गाय हा उपयुक्त पशू असण्या'बाबतचा भाग वाचून काढला. काँट्ररी टू पॉप्युलर बिलीफ, सावरकरांनी त्यात गोमांसभक्षणाचा सरसकट पुरस्कार किंवा समर्थनसुद्धा केल्याचे आढळले नाही. हिंदुसमाजात गायीला महत्त्व, नव्हे, आदराचे स्थानसुद्धा येण्यामागील कारण हे तिचे उपयुक्त पशू असणे हे होय, आणि आंधळी गोभक्ती कशी हानिकारक, या मुद्द्यांवर त्यांचे सर्व प्रतिपादन केंद्रित असल्याचे आढळले. हं, आता आणीबाणीच्या परिस्थितीत, जसे, युद्धात एखादे महत्त्वाचे ठाणे लढवत असलेल्या हिंदुसैन्याला शत्रुसैन्याने वेढा देऊन त्यांची रसद तोडली असता, अन्नपुरवठ्याच्या अभावी हिंदुसैन्यास टिकाव धरून राहणे अशक्य असेल, आणि अशा टिकाव न धरण्यामुळे हिंदुराष्ट्राचे मोठे नुकसान होणार असेल, तर वेळप्रसंगी उपलब्ध असलेल्या गायी मारून खाणे आणि त्यायोगे टिकाव धरून शत्रूचा शक्य तितका प्रतिकार करणे यात गैर काहीच नाही, उलट ते राष्ट्रकर्तव्यच आहे, अशा प्रकारचे प्रतिपादन सावरकर त्या निबंधात करतात खरे; परंतु सरसकट कोणीही उठून बेशक गोमांसभक्षण करण्याचा पुरस्कार सावरकरांनी त्या ठिकाणी केलेला नाही, हे नमूद करणे येथे कर्तव्यप्राप्त ठरावे. (मात्र, सरसकट गोमांसभक्षण करण्याच्या प्रथेमागील कारणमीमांसा ही 'गाय हा उपयुक्त पशू आहे', अत एव त्या उपयुक्त पशूचा मनुष्यकल्याणाकरिता जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याच्या उद्देशातून असावी, अन्य कोणत्याही कारणाने नव्हे, असे तेथे कदाचित स्पष्टपणे प्रतिपादिलेले नसले, तरी तसे अनुमान निर्धोकपणे काढता यावे.)

अर्थात, गोमांसभक्षण करावयाचेच असेल, तर त्याकरिता सावरकरांच्या अनुमतीचीही आवश्यकता नसावी, ना त्यांच्या केल्या-न-केल्या समर्थनाची. त्याचप्रमाणे, गांधींच्या असलेल्या-नसलेल्या विरोधासही विचारात घेण्याचे काही कारण नसावे. आणि तरीही, आपणास पटतील त्या मुद्द्यांवर सावरकरांबद्दल किंवा गांधींबद्दलसुद्धा आदर वाटण्यास (किंवा त्यांचे अनुयायित्व मानण्याससुद्धा) प्रत्यवाय येऊ नये. (अनुयायित्व मानतानासुद्धा मानसनेत्याने उडी मारल्यास त्यामागोमाग उडी मारण्याचे किंवा स्वतः प्राणायाम करताना मानसनेता कसा करतो यावरून तो द्राविडी करावा किंवा अन्यथा, हे ठरविण्याचे बंधन नसावे.)

'राष्ट्रा'च्या संकल्पनेबद्दल सावरकरांशी पूर्णतः मतभेद बाळगण्याचा हक्क अबाधित राखून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका उदाहरणदाखल वाक्यातून एवढा मोठा थिसिस निर्माण करण्याच्या आपल्या क्षमतेचा मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे, या प्रतिसादाने तो अधोरेखित झाला.

ते वाक्य काहीसं प्रातिनिधिक म्हणून वापरलं होतं, हिंदुत्ववादी विचारसरणीतल्या कल्पनांमधला भंपकपणा कमी करण्याच्या सावरकरांच्या प्रवृत्तीचं निदर्शक म्हणून. एका बाजूला धर्माचा अभिमान बाळगून त्याचा वापर सगळ्यांना एका छताखाली एकत्र करण्यासाठी करायचा प्रयत्न आणि त्याचबरोबर या छताला अनंत भोकं आहेत ती बुजवली पाहिजे याची जाणीव या द्विधेत सावरकर होते. माझ्या प्रतिसादाचा स्वर असा होता की ज्यांना गोळा होण्यासाठी छत आवडलं त्यांनी सावरकरांनीच दाखवलेल्या भोकांकडे आणि ती दुरुस्त करण्याच्या गरजेकडे दुर्लक्ष केलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेत्याचा उद्देश काहीही असो, त्यामागे येणार्‍या अनुयायांनी त्याच उद्देशाने त्यामागे यावे, अशी अपेक्षा कशी करता येईल बरे?

शेवटी अनुयायांच्या लेखी नेता हा एक उपयुक्त पशू असतो. अनुयायांना एकत्र आणण्यासाठी, प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी, एक ऑर्गनायझर म्हणून, झालेच तर एक 'म्होरक्या' म्हणून नेत्याची गरज असते, त्या दृष्टीने तो 'उपयुक्त' असतो, इतकेच. आणि ही उपयुक्तता जास्तीत जास्त एक्स्ट्रॅक्ट करण्याचा अनुयायांचाही कल असतो, म्हणून हे चालू शकते. लक्षात घ्या, You do not choose your followers; your followers choose you. आणि शेवटी त्या अनुयायांचे काही हितसंबंध असतात, आणि ते हितसंबंध नेत्याकरवी जपले जातील, या विश्वासापोटी आणि त्या भावनेनेच अनुयायी अनुचरण करत असतात.

तेव्हा, आपल्या काही हितसंबंधांच्या रक्षणार्थ अनुयायांनी नेत्यास निवडले, आणि ते हितसंबंध जपण्याच्या नि आपला कार्यभाग साधण्याच्या दृष्टीने त्याचा एखाद्या उपयुक्त पशूप्रमाणे अधिकतम उपयोग करून घेतला, नि त्याच्या इतर बाबींकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले, तर त्यात आश्चर्य मानण्यासारखे काय आहे?

हं, आता एखादा नेता त्यातही आपल्या म्हणण्याप्रमाणे अनुयायांस वळवू शकला, तर तो त्या नेत्याचा नेतृत्वगुण म्हणता येईल. परंतु तसे तो करू न शकल्यास तो अनुयायांचा दोष कसा?

बाकी, ज्या 'छता'चा आपण उल्लेख करता, ते 'छत' सावरकरांनी प्रस्तुत अनुयायांना दिलेले नव्हते. ते 'छत' त्या अनुयायांजवळ तसेही होतेच, त्याखाली इतरांना समाविष्ट करण्यात त्यांना स्वारस्यही नव्हते, आणि त्या दृष्टीने - त्या छतापासून इतरांना परावृत्त करण्यासाठी - छतातील भोके पथ्यावरच पडत होती. मात्र, त्या छताचा उघड अभिमान बाळगण्याचे दृष्टीने एक रॅलीइंग पॉइंट म्हणून सावरकरांसारखा बकरा - आय मीन नेता - हा आदर्श उपयुक्त पशू होता, आणि प्रस्तुत अनुयायांनी त्यातून अधिकतम उपयुक्तता काढून घेतली, यात विशेष असे काही नसावे.

गांधीजींचा नाही का, फोटो भिंतीवर लावायचा असतो, त्याला हार घालायचा असतो, की मग त्याखाली बसून काय वाट्टेल ते बेशक करायची सोय निर्माण होते, त्यातलाच प्रकार आहे हा! (त्या दृष्टीने गांधीजीही 'एक उपयुक्त पशू'च असतात, याहून अधिक काही नाही! शिवाय गांधीजींचा उपयोग नोटेवर छापण्याकरिता डिझाइन म्हणूनही उत्तम होतो. सावरकर कदाचित एखाद्या पोष्टाच्या तिकिटावर छापण्याकरिता उपयुक्त ठरत असतीलही, कोण जाणे!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेत्याचा उद्देश काहीही असो, त्यामागे येणार्‍या अनुयायांनी त्याच उद्देशाने त्यामागे यावे, अशी अपेक्षा कशी करता येईल बरे?

अपेक्षा नाहीच. किंबहुना अनुयायांनी नेत्याचे सोयीस्कर उद्देश स्वीकारले आणि गैरसोयीच्या उद्देशांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं एवढंच. एकंदरीत प्रतिसादाशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवीबाजूजी,
आपला प्रतिसाद फार संतुलित आणि माहितीपूर्ण वाटला. नेता आणि अनुयायी यांच्या नात्यांकडे पूर्वी असे पाहिले नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सम्यक रसग्रहण

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!