ऐकू आनंदे!

- लेखक: समीर धामणगावकर व वैभव कुलकर्णी

(श्री. समीर धामणगावकर व श्री. वैभव कुलकर्णी हे दोघे 'स्नॉवेल' या ऑडियोबुक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आहेत. बी.ई. आणि एम.बी.ए. केल्यानंतर नोकरी करताना, मुळात असणारी आवड आणि व्यावसायिकता अशा दोन्हीचा मेळ घालून त्यांनी ही कंपनी सुरू केली. या क्षेत्रात त्यांना अल्पावधीत यश मिळत आहे. 'ऐसीअक्षरे'च्या दिवाळी अंकासाठी त्यांनी दिलेल्या मुलाखतीचे हे ऋषिकेशने केलेले शब्दांकन)

जगातली सर्वात शाश्वत - स्थिर गोष्ट जर काही असेल तर ती म्हणजे 'बदल'. अन् भारताच्या बाबतीत म्हणायचे तर गेल्या दोनेक दशकांत या बदलांचा वेग सर्वाधिक ठरावा. एकूणच समाज बदलत असताना वैयक्तिक जाणिवांपासून ते सामाजिक संदर्भ असलेल्या अनेक क्षेत्रांमध्ये बदलांना सामोरे जावे लागले आहे. नव्या यंत्रयुगात म्हणा किंवा तांत्रिक युगात म्हणा या बदलांनी अनेक नव्या संधी, नवे विचार, नव्या सोयी, नवी माध्यमे समोर आणली त्याच बरोबर अनेक गोष्टी कालपरत्वे मागे पडल्या - पडू लागल्या आहेत. इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच साहित्यक्षेत्राचे महत्त्वाचे अंग असलेले "छापील पुस्तक" बदलांपासून कसे (आणि का?) वंचित राहावे?

पुस्तक प्रकाशन (आणि अर्थातच वाचन) यासारखे क्षेत्र अनेक काळापासून आपले स्थान टिकवून आहे. भारतात अजूनही 'छपाई' जोरात चालू आहे. मात्र जगात इतरत्र पाहिले तर काहीसे वेगळे चित्र दिसून येईल. अनेक प्रगत देशांत लोकांना बराच काळ प्रवास करावा लागतोच, शिवाय स्वतः वाहन चालवावे लागत असल्याने इतर कोणतेही काम करणे शक्य नसते. अशावेळी रेडियो किंवा अन्य साठवलेली गाणी ऐकणे या व्यतिरिक्त फारशी करमणूक उपलब्ध नव्हती. अशावेळी "ऑडियो बुक्स" ही संकल्पना पुढे आली आणि बघता बघता या देशांमधील - विशेषतः अमेरिकेतील - खूप मोठे ग्राहकक्षेत्र (अर्थात मार्केट) काबीज केले.

आम्हा मित्रांना नाटक, सिनेमा आणि साहित्य वाचायची आवड लहानपणापासून होती. शालेय जीवनापासून या क्षेत्राशी सुरू झालेली जवळीक वृद्धींगत होत गेली. अशावेळी केवळ नाटक बघणे/करणे, सिनेमात काही प्रयोग करणे वगैरे शक्य होते, पण मुळातूनच वेगळे - वेगळ्या शक्यतेला प्रत्यक्षात आणणारे किंबहुना प्रथितयश प्रयोग सोडून वेगळ्या धाटणीचे काही करावे असा विचार - काहीसा बंडखोर विचार म्हणा हवं तर - डोक्यात होता. अशावेळी "ऑडियो बुक्स" या क्षेत्राविषयी समजले. यात अधिक माहिती घेतल्यास असे कळले की भारताबाहेर हा ९००० कोटींचा मोठा व्यवसाय आहे. मात्र आपल्याकडे या प्रकाराला म्हणावा तसा लोकाश्रय लाभलेला नाही - नव्हता. भारतातही आता लांबचे प्रवास करून रोज कार्यस्थळाला जाणारी मंडळी कमी नाहीत. मुंबई, पुणे, नाशिक इत्यादी सतत वाढ होत असणार्‍या शहरांत बर्‍याच व्यक्ती दूरची अंतरे रोज कापत असतात. इथे वैयक्तिक वाहन नसले तरी सार्वजनिक वाहने वापरून तितकाच प्रवास केला जातो. त्यातील गर्दीमुळे तर अनेकदा पुस्तक वाचणे काय उघडणेही अशक्य असते. अश्या वेळी जर ऑडियोबुक्स परदेशात यशस्वी होऊ शकतात तर आपल्याकडे का नाही हा प्रश्न आम्हाला होता, आणि या प्रश्नातूनच एक संधी आणि त्याच बरोबर एक आव्हानही आकार घेत होतं.

मराठी पुरतं बोलायचं तर आपल्या सर्वांचे लाडके पु.लं, व.पु.काळे आणि काही प्रमाणात द.मा. मिरासदार किंवा गो. नी. दांडेकर अशी दिग्गज नावे सोडली तर फारसे कोणी लेखक या 'श्राव्य' माध्यमाकडे वळलेले दिसत नाहीत (अर्थात काही नावे निसटली असतील - आहेत- पण ते अपवादच). तसे, या क्षेत्रात भारतातही थोडे फार प्रयोग चालू होते, पण कोणी तांत्रिक दृष्टिकोनातून (टेक्निकली) आणि "मार्केटिंग"च्या दृष्टीने या क्षेत्राकडे फारसे लक्ष दिले नाही असे वाटते. भारतात बघितले, तर "कराडी टेल्स" नावाच्या चेन्नैस्थित कंपनीला पहिली ऑडियोबुक कंपनी म्हणायला हरकत नसावी. २००८ साली अमर चित्रकथा (ACK) यांनी ती विकत घेतली. त्याच दरम्यान, काही मोठ्या प्रकाशकांनीही स्वतःकडील पुस्तकांची ऑडियोबुक्स आणायला सुरवात केली होती. २००९-१० साली रैडो (Reado) नावाची एक कंपनी सुरू झाली. परंतु कराडी टेल्स वगळता इतर बहुतांश प्रयोगात ऑडियो बुक्स म्हणजे केवळ पुस्तकाचे- कथा/कादंबरीचे- शब्दशः: वाचन दिसून येते.

आमच्या डोक्यात मात्र वाचन हे केवळ वाचन न करता त्या कथेचे किंवा कादंबरीचे "श्राव्य सादरीकरण" करण्याचे होते. अनेक कल्पना डोक्यात होत्या पण नक्की दिशा समजत नव्हती. अशावेळी अनेक दिग्गजांनी मागताक्षणी किंवा अनेकदा न मागता मदतीचा हात पुढे करून एक सुखद अनुभव दिला. खरंतर या क्षेत्रात शिरणार असे म्हटल्यावर विविध परिचितांकडून आलेल्या प्रतिक्रिया हा आमच्या अपेक्षेपलिकडे वाटावा इतपत उत्साहवर्धक अनुभव होता. घरातील कुटुंबीय - आप्तेष्ट -मित्र वगैरे तर बरोबर होतेच त्याव्यतिरिक्त ज्या लेखकांना, कलाकारांना भेटलो त्यांच्याकडून खूप प्रोत्साहन मिळाले. बहुतेकांच्या बोलण्याचा सारांश सांगायचा तर "तुम्ही एका मोठ्या श्राव्य चळवळीची सुरवात करत आहात" अश्या धर्तीच्या प्रतिक्रिया होत्या ज्यामुळे आमचे मनोबल वाढले. आमचे एक परिचित तर गमतीने म्हणत की "अरे! तुम्ही इंजिनियरिंग शिकलात आणि आता हे काय करताय?"

याच उत्साहात आणि आशावादाने २००९ साली आम्ही 'स्नॉवेल' सुरू केली. 'स्नॉवेल म्हणजे साउंड-नॉवेल. यावरूनच आमच्या कंपनीचं नाव 'स्नॉवेल' ठेवलं. सुरवातीला आम्ही बालसाहित्याला "श्राव्य" माध्यमात आणायचा प्रयत्न केला. परंतु असे लवकरच लक्षात आले की या क्षेत्रात लहान मुलांसाठी मात्र बरेच श्राव्य साहित्य उपलब्ध आहे मात्र मोठ्यांसाठी फारसे काही नाहीये. मग आमचा मोर्चा आम्ही त्या दिशेने वळवला. अर्थातच पुलं, वपु वगैरे सर्वमान्य नावांना टाळून आम्ही काही इतर परिचित नावे निवडली. सर्वप्रथम आम्ही प्रसिद्ध कथाकार चिं.त्र्यं.खानोलकर यांच्या 'कोंडुरा'मधील काही भागाचे श्राव्य सादरीकरण केले. त्याच बरोबर सदानंद देशमुख यांच्या 'रगडा' या कथासंग्रहातून "अमृतफळ" नावाच्या कथेचे सादरीकरणही रेकॉर्ड केले. अनेक परिचितांकडून, प्रस्थापित कलाकारांकडून प्रशस्ती मिळाल्यावर आमचा उत्साह वाढला आणि अधिक आव्हानात्मक सादरीकरणाकडे आम्ही मोर्चा वळवला. जी. ए. कुलकर्णी यांची "राधी" ही कथा जेव्हा आम्ही खाजगी वर्तुळात सादर केली तेव्हा त्याची अधिकच स्तुती झाली. 'राधी'पर्यंत आम्ही केलेले हे प्रयोग खाजगी स्वरूपाचे होते. मात्र या सगळ्यातून आत्मविश्वास वाढला आणि आम्ही व्यावसायिक स्तरावर उतरायचे ठरवले. गेल्या वर्षी, १९ फेब्रुवारी २०११ रोजी, आम्ही चार श्राव्य उपक्रमांचे लोकार्पण केले. दि.बा.मोकाशी लिखित चार कथांचा संग्रह "कथामोकाशी", मिलिंद बोकिलांचे "समुद्र", जयवंत दळवी ह्यांचे "सारे प्रवासी घडीचे" आणि गो.नी.दांडेकरांचे "शितू"! त्याच दरम्यान आम्हाला 'रारंगढांग' खुणावत होते. या पुस्तकाची लोकप्रियता बघता हे मोठे शिवधनुष्य आम्ही उचलायचे केलेले धाडस आता योग्य होते असे वाटते.

या प्रकारच्या वेगळ्या माध्यमांतून लोकांसमोर जाऊ लागल्यावर बरेच वेगवेगळे अनुभव आले. त्यातला एक उल्लेखनीय म्हणजे आम्ही जेव्हा राधी केलं तेव्हा (ते खाजगी असल्याने) केवळ परिचित व मित्रांमध्ये त्याचे वाटप केले होते. चिंचवडमधील एका परिचित गृहस्थांनी 'राधी' ऐकली आणि नंतर त्यांच्या सहावीतल्या मुलीला ऐकवली. तेव्हा त्यांचा आम्हाला फोन आला की गेले चार दिवस माझी मुलगी 'राधी' ऐकल्याशिवाय झोपत नाही. आम्हाला हे ऐकून मजाही वाटली आणि आनंदही झाला. कुठेतरी असंही वाटली की मराठी कथा / साहित्य याची मुलांमध्ये कमी झालेली आवड यामुळे वाढू शकेलही कदाचित. व्यावसायिक स्वरूप देण्याआधी आलेले असे अनुभव आमच्यासाठी तरी फारच उत्साहवर्धक होते. जेव्हा व्यावसायिक दृष्टिकोनातून यात उतरायचं ठरवलं तेव्हा अनेक दिग्गजांनी दिलेला मदतीचा हातही मोलाचा वाटतो. वीणाताईंना (डॉ. वीणा देव) जेव्हा आम्ही पहिल्यांना भेटलो तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी आम्ही सुरू करत असलेल्या प्रकल्पाबद्दल कौतुकाची थाप दिली. मात्र केवळ कौतुकावरच न थांबता त्यांचा स्वतःचा अभिवाचन, श्रुतिका या कलाप्रकारांबद्दल बरीच बहुमोल माहिती दिली. त्यांच्याशी यावर सखोल चर्चा करताना लक्षात येत होतं की आपला प्रवास योग्य दिशेने चालू आहे आणि हुरूप वाढत गेला.

जस जसं या क्षेत्राशी आमची ओळख वाढत गेली तसतशी जाणही वाढत गेली. छापील पुस्तके आणि या श्राव्य माध्यमातील फरक विचाराल तर सांगू की तर या दोन्ही प्रकारांच्या अनुभवांमध्ये बरेच अंतर आहे- इतके की श्राव्य माध्यम हा एक स्वतंत्र कलाविष्कार आहे. मराठीमध्ये (आणि बहुतांश भाषांमध्ये) लेखी भाषा आणि बोली भाषा वेगळी असते हे आपण सर्व जाणतोच. श्राव्य सादरीकरणात याचे भान ठेवणे हा सर्वात मोठा फरक आहे असे आम्ही मानतो. प्रत्येक वाचक पुस्तक वाचताना स्वतः समांतरपणे कथेचे, त्यातील पात्रांचे एक चित्र तयार करत असतो. श्राव्य माध्यमातून तीच कथा समोर आल्यावर त्या चित्राला आवाजाचा आणि संगीताचा पैलू लाभतो आणि ते चित्र आपोआप अधिक परिणामकारक वाटते. अजून एक मोठा फरक असा आहे की इतर माध्यमे श्रोत्याला पॅसिव्ह बनवतात. ऑडियो बुक्स श्रोत्याला अ‍ॅक्टिव्ह ठेवतात. म्हणजे टीव्ही बघता बघता किंवा पुस्तक वाचता वाचता हातातली इतर कामं करता येणं कठीण व बर्‍याचदा अशक्य असतं. थोडक्यात इतर माध्यमे ही वाचकाला/प्रेक्षकाला एका जागी बसण्याची मागणी करतात तर याउलट श्राव्य माध्यम बॅग्राऊंडला चालू ठेवूनही आस्वाद घेता येतो. अर्थातच यामुळे ऑडियोबुक्स कुठेही / कधीही ऐकता येतात. स्नॉवेल सुरू केल्यावर यात काम करताना असेही लक्षात आले की अशा कित्येक व्यक्ती आहेत ज्यांच्या कानावरून मराठी भाषा अनेक वर्ष गेल्याने त्यांना मराठी समजते मात्र सराईतपणे लिहिता / वाचता येत नाही. अश्या व्यक्तींनाही ही स्नॉवेलची ऑडियो-बुक्स आवडत आहेत असे ध्यानात आले. अर्थातच हेही मान्य / स्पष्ट करायला हवे की पारंपरिक छापील माध्यमाशी ही तुलना केली असली तरी आमच्या मते दोन्हीही स्वतंत्र कलाविष्कार आहेत आणि त्यांच्या जागी अत्यंत महत्त्वाची भूमिका ही माध्यमे निभावू शकतात.

वाचक पुस्तक वाचताना जसे मनःपटलावर एक चित्र उभे करतो तसे ते ऐकतानाही त्याहून अधिक परिणामकारक चित्र उभे राहावे यासाठी स्नॉवेलमध्ये आम्ही विशेष प्रयत्न घेतले. जसे सादरकर्त्यांचा आवाज कसा असावा, पार्श्वसंगीत काय असावे यावर अनेकदा बराच विचार होत असे. केवळ ध्वनी-माध्यमातून प्रसंगाची वेळ, परिसर, पात्रांची स्थिती एकमेकांमधील अंतर, आवाजाच्या तीव्रतेमधून त्यांचे भाव, हावभाव, आवाजाचा पोत आदीच्या मदतीने अधिक ताकदीचे चित्र श्रोत्यांपुढे उभे करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. प्रत्येक सादरीकरणाचा एक 'दिग्दर्शक'असतो जो कथेवरून 'पटकथा' लेखन, आवाजावरून पात्रयोजना, संगीत दिग्दर्शकाकडून योग्य ते संगीत देणे, आवाजाचा पोत-तीव्रता, ध्वनीयोजना या सगळ्यांचा मेळ घडवत असतो. त्यामुळे हे पुस्तकाचे केवळ 'वाचन' न राहता त्याचे विविधांगाने 'श्राव्य सादरीकरण' होते.

सुरवातीला आमच्यासाठी आणि आमच्या श्रोत्यांसाठीही काहीशा नवख्या असलेल्या या क्षेत्रात, आता काही श्राव्य-पुस्तकांचे प्रकाशन झाल्यानंतर, एकूणच ऑडियो बुक कडे पाहण्यात काही बदल घडत आहे. हे सध्या एक नवे क्षेत्र असल्याने ही संकल्पना लोकांपर्यंत पोचणे हे सध्या सर्वात मोठे आव्हान असले तरी एक स्नॉवेल घेतल्यानंतर लोकांना ते आवडू लागल्याचे प्रमाण बघता हा प्रसार हळू पण निश्चितपणे होत आहे असे दिसते. सुरवातीला मुंबई-पुण्यात दिसणारा ग्राहकवर्ग, ही पुस्तके ऑनलाईन मिळू लागल्यापासून सर्वदूर दिसू लागला आहे. डेमोग्राफीमध्ये संख्यात्मक आणि विस्तारात्मक अश्या दोन्ही पातळ्यांवर हळू तरीही निश्चित वाढ दिसते आहे. आम्हाला या क्षेत्रात छापील साहित्याकडून स्पर्धा आहे का? तर आहेसुद्धा आणि नाहीसुद्धा ! मुळात ही दोन वेगळी माध्यमे असल्याने थेट स्पर्धा नाही, मात्र नव्या क्षेत्राची होणारी अपरिहार्य तुलना मात्र होतेच होते. आमच्याच कंपनीपुरते आणि तेही मराठी पुरते बोलायचे तर मात्र आम्हाला फारशी स्पर्धा नाही. मोठे मोठे प्रकाशक या क्षेत्रात उतरायचे की नाही या द्विधेमध्ये दिसतात. दुर्दैवाने सद्यस्थितीत ही स्पर्धा नसणे हा आमच्यासाठी एक अडथळा ठरत आहे. या क्षेत्रात अधिक श्रोतृवर्ग तयार होण्यासाठी, त्यांना अशी पुस्तके ऐकण्याची 'सवय' होण्यासाठी आरोग्यपूर्ण स्पर्धा सध्यातरी गरजेची आहे. जितकी अधिक स्पर्धा तितका अधिक प्रचार हे सूत्र लागू आहे!

परदेशात बघितले तर, छापील पुस्तके, ई-पुस्तके आणि ऑडियो-बुक्स ही तीन वेगळी 'मार्केट्स' आहेत. त्यापैकी छापील पुस्तकांपेक्षा स्वाभाविकपणे इतर दोन क्षेत्रांच्या वाढीचा वेग अधिक आहे. तिथे हा व्यवसाय अधिक संघटित स्वरूपात आहे. APA - Audiobooks Publishers Association ही संघटना हा व्यवसाय नियमित ठेवण्याचे काम करते. (http://www.audiopub.org/). अर्थातच संघटित व्यवसायाला मिळणारे फायदे तेथील प्रकाशकांना मिळत आहेत. या कलाप्रकाराचा प्रचार आणि प्रसार तिथे अधिक जोमाने होत आहे. आपल्याकडे येणार्‍या काळाचा विचार केला तर यात जनता नक्की कोणत्या मार्गावर जाण्याचे निवडेल यासंबंधी एकूणच प्रकाशकांमध्ये असमंजस दिसतो. सगळीकडे अशीही ओरड आहे की वाचन कमी झाले आहे - जे खरे असेलही. मात्र स्नॉवेलच्या प्रयोगाला मिळणारा प्रतिसाद पाहिला तर हल्लीच्या यंत्रयुगात ऑडियोबुक हे यावर उत्तर आहेत का? याचा विचारही प्रकाशकांना करावा लागेल. या बाबतीत आम्ही थोडा वेगळा विचार करतो. छापील पुस्तकांच्या क्षेत्रात दोन महत्त्वाच्या समस्या आहेतः "वितरण व्यवस्था" आणि "उधार अवधी". आधुनिक युगात, आंतरजालामुळे हे दोन्ही प्रश्न निकालात निघाले आहेत. आम्हीदेखील ऑडियो बुक्स आंतरजालावरून वितरित करणे सुरू केले आहे. तेव्हा ईबुक्स आणि ऑडियोबुक्स मुळे हे दोन्ही ताप बरेच कमी होतील असे दिसते. मात्र परदेशाशी तुलना केली तर या क्षेत्रात मोठा वाव दिसतो. मोठे प्रकाशक या क्षेत्रात यायला बिचकत असल्याने यात मोठी 'गुंतवणूक' होत नाहीये आणि त्यामुळे या क्षेत्राची प्रगतीही कमी वेगाने चालली आहे. तरीही लोकांचे बदलते जीवनमान आणि घटता उपलब्ध मोकळा वेळ बघता येत्या ५-७ वर्षांत ऑडियोबुक्सचे प्रमाण वाढेल असा अंदाज आहे. अर्थात छापील पुस्तकांवर त्याचा त्वरित परिणाम दिसत नसला तरी वीसेक वर्षांनंतर - जेव्हा आताच्या तंत्रयुगात वाढलेली नव्या सहस्रकातली पिढी ग्राहक बनेल- तेव्हा कदाचित छपाई-क्षेत्र एक महागडी आवड म्हणून शिल्लक राहण्याकडे वाटचाल करू लागेल असे वाटते.

दुसरे असे की व्यावसायिक यशाबरोबरच सामाजिक भान सुटू न देणे हे देखील आम्ही महत्त्वाचे मानतो. या श्राव्य सादरीकरणाचा सर्वाधिक फायदा जर कोणाला होणार असेल तर तो दृष्टिहीन किंवा अधू दृष्टीच्या व्यक्तींना. वाचन आणि दृक्-श्राव्य अशा दोन्ही माध्यमांचा पूर्ण आनंद घेऊ न शकणार्‍यांपुढे आता हा नवा पर्याय आला आहे. आम्ही सध्या 'एकांश' या संस्थेच्या माध्यमातून अंधांपर्यंत पोहोचायला सुरवात केली आहे. आशा आहे की ऑडियो बुक्स त्यांच्या आयुष्यात चार विरंगुळ्याचे - आनंदाचे क्षण आणतील.

शेवटी इतकेच म्हणू की स्नॉवेलच्या माध्यमाकडे लोकांनी एक वेगळा कलाविष्कार म्हणून पाहायला हवं यासाठी प्रयत्न करत आहोत. नव्या तांत्रिक युगात, इंटरनेटच्या युगात सर्व क्षेत्रात बदल होत आहेत. एखाद्या चित्रपटासारखेच विविध कलाकृतींचा मेळ साधून सादर होणार्‍या या कलाकृतीकडे काही अपवाद वगळता प्रसारमाध्यमांचेही दुर्लक्ष झाले आहे. आशा आहे समाज नव्या आधुनिक युगात कूस बदलत असताना काळासोबत आलेल्या या नव्या क्षेत्राकडे सकारात्मक दृष्ट्या पाहील आणि आम्ही लावलेल्या या रोपट्यातून एका श्राव्य चळवळीचा जन्म होईल!

---

स्नॉवेलच्या ऑडीओ बुक्सचे हे काही अंशः

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

माझी आणि या माध्यमाची ओळख 'रारंगढांग' च्या ऑडीयोबुकच्या माध्यमातून झाली. रारंगढांग हे माझ्याच नाही तर एकूणच मराठी वाचकांच्या मनात घर करून बसलेले मोठे नाव. या पुस्तकाचे 'ऑडीयो बुक' तयार झाले आहे, त्यात दिलीप प्रभावळकरांसारख्या जेष्ठांचा आवाज आहे हे एका मित्राकडून कळल्यावर त्याच्या उद्घाटनसोहळ्याला खेचला गेलो होतो.

स्नॉवेल ने मात्र इथे केवळ अभिवान न करता मुळातून वेगळे सादरीकरण केलेले जाणवले. विविध पात्रांना वेगळे आवाज, पाश्वसंगीत आदींमुळे अनुभवाची खुमारी वाढली आहे. रारंगढांग विकत घेऊन ऐकली आणि या माध्यमाच्या ताकदीचा पुरेपूर अंदाज आला. मराठीतल्या नव्या माध्यमांतराच्या नांदीचे पाऊलखूण उमटण्याचा प्रवास या दिवाळी अंकाच्या निमित्ताने वाचकांसमोर येतो आहे याचा अधिक आनंद वाटतो.

स्नॉवेल ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला व्यक्तीगत निरोप्यावर एक आलेल्या एका एमेलमध्ये विचारणा होती की स्नॉवेल चे ऑडीयोबुक्स कसे विकत घेता येतील.
सगळ्यांच्या सोयीसाठी इमेल सोबत इथेही उत्तर देतो आहे:

स्नॉवेलची ऑडियोबुक्स जालावर फ्लीपकार्ट वगैरे स्थळआंवर उपलब्ध आहेतच. अधिक माहितीसाठी त्यांच्या संस्थळाचा पत्ता आहे: http://www.snovel.in/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रोचक वाटतेय. 'पुस्तक हाताळून वाचण्याची मजा वेगळीच' अशी पिंक एरवी सहज टाकली गेली असती. पण गेल्या काही वर्षांत माझ्या स्वत:च्या वाचनातही संगणक नि मोबाईल यांच्या पडद्यावर वाचण्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे, की आपलेच शब्द कधी घशात घातले जातील, त्याची शाश्वती उरली नाही!
सोय महत्त्वाची हे खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

उपक्रम व त्याची ओळख.

माझी आजी मुंबईतील एक नामांकित समाजसेविका होती. पूर्वी ती तिच्या अत्यंत व्यग्र कर्यक्रमातून अधेमधे काहीबाही हलकेफुलके वाचावयाची. नंतर दृष्टी दगा देऊ लागली. खूप अ‍ॅक्टिव्ह असलेली ती नुसतीच बसून राहू लागली.तेव्हा तिला पुल, माडगूळकर, अत्रे इत्यादींचे साहित्य ऑडियो स्वरूपात देता आले तर छान होईल असे मला वाटत होते. तेव्हा स्नॉव्हेलचा जन्म झाला नव्हता, हे माझे दुर्दैव.

एक नम्र सूचना: सामाजिक भान वगैरे ठीक आहे पण उपक्रमापासून संचालकांना नफा होणे जरूरीचे आहे. तेव्हा सुरूवातीसच उत्साहाने खर्चिक प्रॉडक्शन्स करण्यातील धोका त्यांनी लक्षात घ्यावा. अशा तर्‍हेचा उपयुक्त उपक्रम जरूर अजूनही नवनव्या परिमाणांत सुरू रहावा, इतक्याच अपेक्षेने हे सांगत आहे.

स्नॉव्हेलच्या संस्थळावर डिस्ट्रिब्यूशनसाठी (भारतापुरते) फ्लिपकार्ट व इतरस्त्र बुकगंगा ह्यांचे संदर्भ दिलेले आहेत. बुकगंगाच्या संस्थळावर काही स्नॉव्हेलच्या काही ऑडियो बुकांची माहिती आहे, पण त्या संस्थळावर 'ऑडियो बुक्स' असा फिल्टर नाही. तेव्हा तिथे स्नॉव्हेलची पुस्तके शोधणे सहजसाध्या आहे असे सध्यातरी दिसत नाही. स्नॉव्हेलनेच स्वतःच्या संस्थळावर आपल्या सर्व पुस्तकांही जंत्रावळी दिल्यास उत्तम राहील.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्नॉवेलने १३ व १४ जुलै रोजी अनुक्रमे "कथामोकाशी" (ज्योत्स्ना भोळे सभागृह, सायं ७ वा) व रारंगढांग (सुदर्शन कलामंच, सायं ६ वाजता) याचे 'ऑडीयो शो' ठेवले आहेत अशी माहिती मला व्यनीमधून नुकतीच मिळाली.

ज्यांना या नव्या माध्यमाचा अंदाज घ्यायचा असेल त्यांना याचा लाभ घेता येईल म्हणून ही माहिती इथे देणे योग्य वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!