ईस्टर रविवार, ख्रिस्ताब्द कालगणना आणि अन्य तसलेच useless knowledge...(भाग २)

(भाग १ येथे पहा.)

सर्व जगभर आज वापरल्या जाणार्‍या ख्रिस्ताब्द कालगणनेचे मूळ प्राचीन रोममध्ये इ.स.पूर्व ४५०-५०० वर्षे, किंवा त्याहून अधिक काळ वापरात असलेल्या कालगणनेमध्ये आहे. मूळची रोमन संस्कृति ही स्वयंपूर्ण नगरराज्यांची बनली होती आणि प्रत्येक नगरराज्याचे स्वत:ची कालगणना असावी, जी कालगणना अशी नगरराज्ये अस्तित्वात येण्याच्याहि पूर्व काळातील शेतीप्रधान व्यवस्थेचा भाग असावीत असा तर्क आहे, यद्यपि अशा कालगणनांचा काहीहि पुरावा आता उरलेला नाही.

आकाशातील गोलांची दैनन्दिन गति हे एक कालगणनेचे निसर्गनिर्मित साधन आहे. त्यांपैकी चन्द्राची दैनंदिन गति ही अन्य कोठल्याहि गोलापेक्षा आणि आकलनाला सोपी असल्याने रोम संस्कृतीच्या शेतीप्रधान काळातील कालगणना चान्द्रमासांच्या होत्या. त्यांमध्ये मार्च ते डिसेंबर असे दहा महिने होते. त्या महिन्यांपैकी मार्च, मे, जुलै आणि ऑक्टोबर ह्यांना प्रत्येकी ३१ दिवस आणि अन्य सहा महिन्यांना प्रत्येकी ३० दिवस असे एकूण ३०४ दिवस होते. त्या महिन्यांची नावे Martius, Aprilis, Maius, Iunius, Quintilis, Sextilis, Septembris, Octobris, Novembris, Decembris अशी होती (१० महिन्यांच्या ह्या कालगणनेची खूण आजहि टिकून आहे. Quintilis पासून Decembris ही नावे पाचवा ते दहावा महिना ह्यांची निर्देशक आहेत आणि तो निर्देश सध्याच्या चालू नावांमध्येहि आपणास दिसतो, जरी सप्टेंबर ते डिसेंबर हे आता ७वा ते १०वा असे महिने नसून ९वा ते १२वा झाले आहेत. Martius ते Iunius ही चार नावे मार्स, जूनो ह्या देवतांशी वा शेतीकामाशी संबंधित आहेत.) उत्तर गोलार्धातील वसंतऋतूपासून हे दहा महिन्यांचे शेतीवर्ष सुरू होऊन हिवाळा सुरू होईपर्यंत चालत असे. हिवाळ्याच्या अशा उर्वरित सुमारे ६० दिवसांची गणति ह्या वर्षामध्ये केली जात नसे.

ह्यामध्ये पहिला बदल रोमचा दुसरा राजा नुमा पॉंपिलिअस (इ.पू. ७१५-६७३) ह्याच्या काळात झाला. ३०४ दिवसांच्या ह्या गणनेमध्ये ५० दिवस वाढवून आणि ३० दिवसांच्या सहा महिन्यांमधून प्रत्येकी एक दिवस कापून २८ दिवसांचे दोन नवे महिने निर्माण करण्यात आले आणि त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी - Januarius, Februarius - अशी नावे देण्यात आली आणि ते दोन महिने डिसेंबरच्या नंतर जोडण्यात आले. रोमन संस्कृतीमध्ये सम संख्या अशुभ आणि विषम संख्या शुभ मानीत असत तदनुसार जानेवारीचे २८ दिवस बदलून त्यालाहि २९ दिवसांचा महिना केले गेले. अशा रीतीने ३१ दिवसांचे ४ महिने, २९ दिवसांचे ७ महिने आणि २८ दिवसांचा एक महिना - फेब्रुवारी - असे ३५५ दिवसांचे वर्ष निर्माण करण्यात आले. हे वर्ष चन्द्राच्या पृथ्वीभोवतीच्या १२ महिन्यांच्या प्रदक्षिणाकालाशी - Synodic months - जवळजवळ सारखे आहे. तदनंतर केव्हातरी ह्याच प्राचीन काळात जानेवारी आणि फेब्रुवारी ह्यांना वर्षाच्या शेवटापासून काढून वर्षाच्या प्रारंभास जोडले गेले आणि वर्ष जानेवारीपासून सुरू होऊ लागले.

चान्द्रवर्षांची अशी गणना सूर्याच्या ३६५.२५ दिवसांच्या सौरवर्षाच्या गणतीशी जुळती नसल्याने त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. शेतीची कामे सुरू करण्याचा पारंपारिक मार्च महिना पेरणीला आवश्यक अशा हवामानात पडण्याची खात्री राहिली नाही आणि ह्या दोन्ही गणना एकमेकींच्या बरोबर राहाण्यासाठी चान्द्रगणनेमध्ये काही अधिक दिवस काही वर्षांनंतर वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली.

इ.स.पूर्व ४५० पासून असे महिने मधूनमधून घालण्याची प्रथा सुरू झाली, यद्यपि त्यासाठी सार्वकालीन नियम असा कोणताच निर्माण करण्यात आला नाही. वर्षगणनेचा प्रारंभिक हेतु वेगवेगळी धार्मिक कृत्ये, उत्सव वगैरे वेळच्यावेळी पार पाडली जावी असा असतो. सर्व इतिहासात जागोजागी हेच तत्त्व दिसून येते. तदनुसार अधिक मास केव्हा टाकायचा हा निर्णय धर्माधिकार्‍यांच्या अधिकारात होता. (अशा व्यक्तींना Pontifex म्हणत असत आणि त्यांच्या प्रमुखाला Pontifex Maximus - सर्वोच्च धर्माधिकारी - असे म्हणत असत. नंतरच्या काळात कॉन्सल वा सम्राट् हाच Pontifex Maximus असे आणि ख्रिश्चन पोपहि स्वत:ला हे बिरुद घेत आले आहेत.)

ह्या अधिक महिन्याला Mercedonius असे नाव होते. फ़ेब्रुवारी, जो सर्वसाधारणपणे २८ दिवसांचा महिना असे, त्यातील शेवटचे ५ दिवस वेगळे काढून त्यांना आणखी २२ दिवस जोडून हा महिना तयार होत असे आणि अशा रीतीने धर्माधिकार्‍यांच्या निर्णयानुसार मधूनमधून काही वर्षे ३५५+२२=३७७ दिवसांची असत. फेब्रुवारी (Februarius) हा शब्द februa - religious purification ह्यापासून निर्माण झाला असून त्या महिन्यात सर्व प्रकारचे शुद्धिविधि केले जात, Mercedonius चा तोच उपयोग होता.

रोमन वर्षाचे दिवस सांगण्याची पद्धति वेगळी होती. महिन्याच्या तारखा १,२ अशा न मोजता चंद्राच्या कलांनुसार निर्माण झालेले तीन प्रमुख दिवस - कॅलेंड्स्, नोन्स आणि आइड्स् - मानत असत. महिन्याचा पहिला दिवस म्हणजे कॅलेंड्स्, ५वा किंवा ७वा नोन्स आणि १३वा किंवा १५वा आइड्स् (हे दोघे महिन्याच्या लांबीवरून). अन्य कोठलाही दिवस ’अमक्याअमक्याच्या इतके दिवस मागे’ असा सांगितला जाई. फेब्रुवारीचा अखेरचा दिवस pridie Kalendas Martias, अथवा मार्चच्या कॅलेंड्सच्या आधीचा दिवस, फेब्रुवारी ९ म्हणजे ante diem V Idūs Februarias किंवा संक्षेपात a.d. V Id. Feb., फेब्रुवारीच्या आइड्सच्या (१३ फेब्रुवारी) पूर्वीचा ५वा दिवस. हा ५वा दिवस मोजण्यासाठी १३ आणि ९ हे दोन्ही दिवस धरून मागे मोजणी करायची. पहिल्या भागात एका जागी प्रतिसादात मी असे लिहिले होते की धाकटया प्लिनीने पॉंपे विस्फोटाचा दिवस 'Nonum Kal. Septembres' असा दिला आहे. ह्याचा अर्थ 'सप्टेंबरच्या कॅलेंड्सच्या आधी ९ दिवस'. १ सप्टेंबरपासून मागे मोजले आणि पहिला आणि अखेरचा असे दोन्ही दिवस ९ मध्ये धरले म्हणजे आपण २४ ऑगस्टला येऊन पोहोचतो. शेकस्पीअरने अमर केलेले Beware the Ides of March हे ज्यूलिअस सीझरचा मृत्यु सूचित करणारे वाक्य आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे.

विकिपीडियावर मिळालेले ह्या काळात चालणार्‍या वर्षाचे हे चित्र पहा.

चित्रात जानेवारी ते डिसेंबर असे महिने आणि अखेरीस अधिक मास (Intercalary) पहिल्या ओळीत दाखविले आहेत. त्यांखाली उभ्या रेघेत प्रत्येक महिन्याचे दिवस, ३१ वा २९ (फेब्रुवारी २८) आणि अखेरीस तेरावा महिना अधिक मास २७ दिवसांचा दाखवला आहे. प्रत्येक महिन्याचे कॅलेंड्स, नोन्स् आणि आइड्स् दिवसहि दाखविले आहेत आणि प्रत्येक दिवसास A पासून H पर्यंतची आठ अक्षरे क्रमाने जोडली आहेत. रोममध्ये आठवडयाचा बाजार आठ दिवसांनी भरत असे, ते दिवस कळण्यासाठी ही अक्षरे कामी येतात. सर्वात खाली प्रत्येक महिन्याचे एकूण दिवस .२९, २८, ३१, २९, ३१, २९, ३१, २९, २९, ३१, २९, २९ आणि २७ (अधिक मास) असे दाखवले आहेत.

आर्थिक व्यवहारांवर अशा अधिक महिन्याचा परिणाम होत असल्याने धर्माधिकारी असा महिना आपल्या सोयीने जोडत. त्या कारणाने अधिक महिन्यामुळे प्रश्न न सुटता अधिकच जटिल होऊन बसला. सुमारे ४०० वर्षे ही अंदाधुंदी चालू राहिल्यानंतर इ.स.पूर्व ४६ साली तेव्हाचा Pontifex Maximus ज्यूलिअस सीझरने अधिक शास्त्रीय पद्धतीने हा गुंता सोडवायचे ठरवले. (स्वत: Pontifex Maximus झाल्यावरहि प्रथम तो गॉल प्रदेशाच्या - आजचा फ्रान्स - मोहिमेवर असल्याने आणि नंतर रोममधील बंडाळ्य़ांमध्ये अडकून पडल्याने कित्येक वर्षे अधिक महिना घोषितच झाला नव्हता.) त्याच्या ह्या सुधारित पद्धतीस ’ज्यूलिअन कालगणना -Julian Calendar' असे म्हणतात आणि थोडया फरकाने तीच गणना आपण आज वापरत आहोत.

ह्या वेळेपर्यंत नैसर्गिक ऋतु आणि त्यांच्याशी संबंधित उत्सवांचे दिनदर्शिकेत दर्शविलेले दिवस ह्यांच्यामध्ये सुमारे तीन महिन्यांचे अंतर पडले होते. ज्यूलिअस सीझरच्या सुधारणेनुसार इ.स. पूर्व ४६ ह्या वर्षात फेब्रुवारीचे शेवटचे ४ दिवस कमी करून त्याला २७ दिवसांचा एक अधिक मास जोडण्यात आला, तसेच नोवेंबर आणि डिसेंबरच्या मध्ये ३३ आणि ३४ दिवसांचे दोन अधिक मास टाकण्यात आले. इ.स.पूर्व ४६ हे वर्ष अशा मार्गाने ३५५-४+२७+३३+३४=४४५ दिवसांचे झाले. तदनंतर जानेवारी १ ला इ.स.पूर्व ४५ हे वर्ष सुरू झाले. त्या वर्षापासून पुढे जानेवारी ३१ दिवस, फेब्रुवारी २८ दिवस, मार्च ३१ दिवस इत्यादि आपल्याला परिचित महिने ठरवून देण्यात आले आणि सर्वसाधारण वर्ष ३६५ दिवसांचे झाले. सांपातिक वर्षाचे प्रत्यक्ष मान सध्याच्या सूक्ष्म मापनानुसार ३६५.२४२५८ दिवस इतके आहे, म्हणजेच ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण सांपातिक वर्षाच्या तुलनेत सुमारे १/४ दिवसाने लहान आहे आणि तेच चालू राहिले तर त्याच्या तारखा ऋतूंच्या तुलनेने ४ वर्षांमध्ये १ दिवस, १०० वर्षांमध्ये २५ दिवस इतक्या आधी पडतील. असे होऊ नये म्हणून असेहि ठरले की इ.स.पूर्व ४५ पासून ४ ने भाग जाणारे प्रत्येक वर्ष ३६६ दिवसांचे असेल आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्यात २४ हा दिनांक दोनदा पडेल. दिनांक दर्शविण्याच्या रोमन पद्धतीनुसार हा दिवस VI Kal. Mar. (मार्च कॅलेंड्स् पूर्वीचा सहावा दिवस - ह्याचे विवेचन वर आलेलेच पहा.) असा ओळखला जात असे. तो दोनदा पडल्यामुळे अशा वर्षांना bissextile - सहावा दिवस दोनदा येणारे वर्ष - असे म्हणत असत. आपण इंग्लिशमध्ये त्यांना Leap year म्हणतो. अधिक दिवस फेब्रुवारीच्या अखेरीस जोडण्याची पद्धतहि नंतरची आहे. (Leap year ह्या वर्णनाचे मूळहि मनोरंजक आहे. सर्वसाधारण ३६५ दिवसांच्या वर्षात ५२ पूर्ण आठवडे आणि १ दिवस असतो. एका वर्षाच्या १ मार्चला सोमवार पडला तर पुढच्या साधारण वर्षाच्या १ मार्चला मंगळवार पडतो. पण ते पुढचे वर्ष ’लीप’ असेल तर १ मार्चला बुधवार पडतो, म्हणजेच एका वारावरून ’उडी’ मारली जाते म्हणून ते ’लीप’ वर्ष.)

ह्या ज्यूलियन गणनेनुसार १०० वर्षांत ३६५२५ दिनांक होतात. त्याच कालात ३६५२४.२५८ इतके सावन दिवस पडतात. दोनातील फरक १०० वर्षांमध्ये अदमासे ३/४ दिवस इतका छोटा असल्याने त्या काळात त्याच्यासाठी काहीच तरतूद करण्यात आली नाही.

ह्यानंतरचा महत्वाचा बदल म्हणजे दोन महिन्यांच्या नावांमध्ये बदल. ज्यूलिअस सीझरच्या सेनेटमधील प्राणघातक हल्ल्यानंतर सेनेटने Quintilis ह्या सातव्या महिन्याचे नाव बदलून ते ’जुलै’ असे केले. तदनंतर त्याचा वारस ऑगस्टस - पहिला रोमन सम्राट् - ह्याचा सन्मान म्हणून सेनेटने इ.स.पूर्व ८ साली Sextilis ह्या आठव्या महिन्याचे नाव बदलून त्याला ’ऑगस्ट’ असे नाव दिले.

१०० सांपातिक वर्षे १०० ज्यूलिअन वर्षांहून ३/४ दिवस ( सुमारे १८ तासांनी) छोटी असण्याचा परिणाम साठत जाऊन १५८२ इसवीपर्यंत ज्यूलिअन कालगणनेच्या तारखा सांपातिक वर्षाच्या नंतर सुमारे ११/१२ दिवस पडू लागल्या होत्या.

ईस्टरचा दिवस कोणता मानायचा हा प्रारंभापासून एक गहन प्रश्न झाला होता आणि त्याबाबत अनेक मतमतान्तरे होती. सम्राट् कॉन्स्टंटाइनने सन ३२५ मध्ये बोलविलेल्या Council of Nicaea ची शिफारस अशी होती की वसंतसंपाताच्यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेनंतरच्या रविवारी ईस्टर पडावा. वसंतसंपाताचा दिवस २१ मार्च असा ठरला होता. ह्या दिवसानुसार ईस्टर ठरविला तर तो खर्‍या (वेधावरून ठरविलेल्या) वसंतसंपाताच्या बराच नंतर पार पडला जाण्याची शक्यता होती. (ह्या काळापर्यंत खरा वसंतसंपात ११ मार्चपर्यंत मागे आलेला होता.) ही शक्यता दूर करण्यासाठी तेव्हाचा पोप १३वा ग्रेगरी ह्याने १५८२ साली कालगणनेमध्ये पुन: मोठी सुधारणा घडवून आणली. तिच्यानुसार १५८२ सालातील गुरुवार ४ ऑक्टोबर ह्या दिवसानंतरचे १० दिवस मोजण्यात आले नाहीत आणि शुक्रवार १५ ऑक्टोबरला गणना पुन: सुरू झाली. लीप वर्ष मानण्याचा नियमहि बदलण्यात आला आणि ’दर चौथे वर्ष लीप, पण ते वर्ष १०० ने भागले जात असल्यास ते लीप नाही, पण ते वर्ष ४०० ने भागले जात असल्यास ते लीप आहे’ असा नियम करण्यात आला. ह्यामुळे ४०० वर्षात ९७ लीप दिवस आणि १४६०९७ दिनांक पडतात. त्याच काळात ४०० सांपातिक वर्षांचे १४६०९७.०३२ इतके सावन दिवस होतात. आता सांपातिक वर्ष ग्रेगोरियन वर्षापेक्षा मोठे आहे पण दोनांतील फरक ४०० वर्षांमागे ०.०३२ दिवस इतका आहे. सांपातिक वर्षाला ग्रेगोरियन वर्षाहून पूर्ण एक दिवसाने मोठे होण्यासाठी सुमारे १२५०० वर्षे लागतील म्हणून सध्यापुरते ह्या प्रश्नाला येथेच सोडलेले आहे. (पृथ्वीचीच दैनंदिन आणि वार्षिक गती कमी होणे इत्यादि बाबी येथे विचारात घेतल्या गेलेल्या नाहीत.)

ह्या सुधारणा धर्मकेन्द्रित असल्याने ख्रिश्चन धर्माच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये त्यांना मान्यता मिळायलाहि वेळ लागला. कॅथॉलिक भागांनी - इटलीतील राज्ये, पोर्तुगाल, स्पेन इत्यादींनी - ती लगेच मान्य केली पण ब्रिटनमध्ये ती मान्य व्हायला १७५२ साल उजाडले. तोपर्यंत फरक ११ दिवसांचा झाला होता आणि तेथे १७५२ साली बुधवार २ सप्टेंबर नंतर गुरुवार १४ सप्टेंबर हा दिवस घालण्यात येऊन मधले ११ दिवस गायब करण्यात आले. ऑर्थोडॉक्स चर्च मानणार्‍या रशियामध्ये ही सुधारणा पोहोचायला राज्यक्रान्ति व्हावी लागली. कम्युनिस्टांनी सत्ता प्राप्त केल्यावर १९१८ मध्ये ३१ जानेवारी नंतर १४ फेब्रुवारी हा दिवस आणून मधले १३ दिवस गायब करण्यात आले. ह्यातून एक मौज अशी झाली की २४ ऑक्टोबर १९१७ च्या ’महान् ऑक्टोबर क्रान्ती’चा (Великая Октябрьская Революция - The Great October Revolution) वार्षिक वाढदिवस नोवेंबरमध्ये साजरा होतो. अशा सर्व देशांच्या त्या त्या दिवसातील ऐतिहासिक तारखा O.S./N.S. (Old Style/New Style) अशा दाखविण्याची प्रथा आहे.

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

कालगणनेचा इतिहास रोचक आहे. ज्युलियस सीझरनेच चांद्रगणेनच्या जागी सौर कालगणना सुरू केली का? या ज्युलियस सीझरच्या सन्मानार्थ खगोलशास्त्रात दिवसांची संख्या ज्युलियन डेने दर्शवतात.

रोमन संस्कृतीमध्ये सम संख्या अशुभ आणि विषम संख्या शुभ मानीत असत

आपल्याकडेही देणग्या देताना ११, २१, १०१ असे आकडे असतात.

ते चित्रातलं कॅलेण्डर फार किचकट आहे. आजची तारीख काय हे ठरवायला एवढे कष्ट पडण्यापेक्षा आजचं सुलभ कालनिर्णय उत्तम आहे. या बाबतीत विसरभोळेपणा करून न्यूटनचे नियम लक्षात ठेवायला मेंदूची थोडी जास्त जागा उपलब्ध होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्या प्रतिसादातून मला 'ज्यूलिअन डे' ह्या संकल्पनेची माहिती झाली आणि मी तिची विकिपीडियामधील अधिक माहिती वाचली. मला असे जाणवले की कोठल्याहि काळातील घडलेली खगोलीय घटना कोणत्या दिवशी घडली हे सर्वांना एकमताने कळावे ह्यासाठी एक पुरेसा प्राचीन दिवस मानून (इतका प्राचीन की सर्व उपलब्ध नोंदी त्याच्यानंतरच पडाव्यात) त्या दिवसापासून ज्यूलियन पद्धतीने सर्व दिवसांना क्रमांक द्यायचे. १५८२ साली ग्रेगोरियन कॅलेंडर सुरू झाल्यावर युरोपात माहीत असलेल्या ह्या दोन कॅलेंडरांच्या गणतीतील तफावतीमुळे गोंधळ निर्माण होऊ नये ह्यासाठी १५८३ साली जोसेफ स्कॅलिगरने ही सूचना केली.

अशीच एक संकल्पना, पण वेगळ्या कारणासाठी, भारतीय ज्योतिषशास्त्रात वापरतात. ती म्हणजे अहर्गण. एका पूर्वीच्या विशिष्ट चान्द्र दिवसापासून (उदा. युगारंभ, कल्पारंभ, कलियुगारंभ इ.), दुसर्‍या एखाद्या चान्द्र दिवसापर्यंत किती दिवस गेले ह्याची संख्या म्हणजे अहर्गण. अधिकमास, क्षयमास, तिथीची वृद्धि आणि क्षय विचारात घेऊन हा हिशेब कसा करायचा ह्याचा algorithm आहे. अहर्गण काढले की त्रैराशिक पद्धतीने ग्रहांची स्थाने शोधता येत असत असे काहीसे माझ्या समजुतीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय रोचक इतिहास. पुन्हा एकदा नीट वाचून मग प्रश्न विचारतो, तूर्त ही पोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान माहीती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान माहीती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या पोच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!