सप्तशैय्या पॅटिस

#संकल्पना #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

सप्तशैय्या पॅटिस

- सई केसकर

मध्यंतरी नाशिकमध्ये कुठेतरी उलटा वडापाव असा एक पदार्थ प्रसिद्ध झाला होता. त्यात पावाच्या आतमध्ये बटाटाभाजी भरून अख्खा पावच तळून काढला होता. खरंतर त्याला उलटा वडापाव म्हणणं चूक आहे. उलटा वडापाव म्हणजे सगळ्यात आत पाव, मध्ये बेसन आणि बाहेर बटाटा हवा. हा फारतर स्क्रॅम्बल्ड वडापाव होईल. यावर मी अनेकांशी फेसबुकवाद घातला पण सगळ्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर आंतरजालावर अनेक ठिकाणी असे आचरट प्रयोग बघितले. काहीही साधं-सरळ दिसणारं घ्यायचं आणि त्याला बेसनात बुडवून तळून काढायचं!

यावर विचार करून मग मीही अशी एक पाककृती तयार केली.

पुढे दिलेल्या पाककृतीचे सगळे हक्क माझ्याकडे आहेत. कुणाला जर या पदार्थाचा ठेला लावायचा असेल तर मला ५०% भागीदारी देणं (फायद्यात, कामात नव्हे) बंधनकारक असेल.

जिन्नस

१ मटारचा दाणा,
७-८ उकडलेले बटाटे (कुस्करून, एकसारखे करून घेतलेले),
१२ बलकासहित फेटून घेतलेली अंडी,
तांदूळ पिठी,
बेसन (याला डाळीचं पीठ असंही नाव आहे),
ब्रेड क्रम्ब्स,
१ कप न तोडता शिजवलेलं मसाला मॅगी,
स्ट्रिकी बेकन (म्हणजे डुक्कर),
रतलामी शेव,
तीळ,
मध,
मैदा,
तळायला भरपूर तेल (साधारण १ किलो),
लागेल तसं पाणी,
धने-जिरे पूड,
मीठ,
खजूर-चिंच पेस्ट.

सप्तशैय्या पॅटिस

कृती

१. बेसन सरसरीत भिजवून घ्या. एका मोठ्या कढईत तेल तापवायला ठेवा.

२. मटार बेसनात बुडवून तळून काढा. ही पहिली पायरी.

३. उकडलेल्या बटाट्याचा साधारण १० ग्राम भाग घेऊन त्यात धने-जिरे पूड आणि मीठ घालून कालवा. तळलेल्या मटारावर या बटाट्याचं आवरण तयार करा. साधारण लहान लिंबाएवढा आकार झाला की हा गोळा फेटलेल्या अंड्यात बुडवून तळून काढा. फेटलेलं अंडं बेसनापेक्षा जास्त गुणकारी आहे. पण भारतीय संस्कृतीत शाकाहाराचा आग्रह असल्याने ही कृती मागे पडली. पहिल्या थरात आपण शाकाहारी आहोत. त्यामुळे दुसरा थर मांसाहारी लोकांसाठी.

४. आता आपण तिसऱ्या थराकडे वळूया. उकडलेला बटाटा विथ अंडं तळून गार झालं की त्यावर स्ट्रिकी बेकनच्या पट्ट्या लावा. या पट्ट्या एकमेकींना चिकटवण्यासाठी पुन्हा एकदा फेटलेल्या अंड्याचा आधार घ्यावा. साधारण चिकटल्या, की तयार झालेला चेंडू ब्रेड क्रम्ब्समध्ये लोळवा. त्यानंतर पुन्हा एकदा तो फेटलेल्या अंड्यात बुडवा आणि पुन्हा एकदा तळून काढा.

५. तिसरा थर भारतातातील अल्ट्रा उदारमतवादी (बिगबास्केटवरून बेकन मागवणाऱ्या क्लूलेस मेरी आंत्वानेत) लोकांसाठी होता. पुढला थर भारतातील आम आदमी थर आहे. मॅगी शिजवताना गृहिणी करतात तसं (मुलांना खायला सोपं जावं म्हणून) त्याचे बारीक तुकडे करू नका. मॅगीचा न तोडता शिजवलेला ठोकळा, गुंता सोडवून दोऱ्यांसारखा सरळ पसरून घ्या. आपण तळलेला बेकन गोळा मग या मॅगीवरून फिरवा, जेणेकरून त्यावर मॅगीचे आवरण तयार होईल. एकीकडे थोडं मीठ घालून तांदूळ पिठी सरसरीत भिजवून घ्या. यामध्ये आपला मॅगी गोळा बुडवून पुन्हा तळून काढा.

६. आता आपण पाचव्या थराकडे वळू. पाचवा थर खास अशा लोकांसाठी ज्यांना पापडी चाट, भेळ, पाणीपुरी असले पदार्थ आवडतात. मॅगी चेंडू तळून गार झाला असल्यास, त्यावर पुन्हा उकडलेल्या बटाट्याचा थर द्यावा. यावेळी मात्र, बटाट्यात खजूर आणि चिंचेची पेस्ट घालावी. नंतर हा गोळा रतलामी शेवेत लोळवावा. शेवेला बांधून ठेवणारं असं काही हवं नाहीतर ती मुक्त होऊन तेलात पोहू लागेल. म्हणून हा गोळा पुन्हा एकदा फेटलेल्या अंड्यात (शाकाहारी लोकांची माफी मागून) बुडवावा. आणि तळून काढावा.

७. सहावा थर ज्यांना गोड पदार्थ आवडतात त्यांच्यासाठी. पापडी चाट चेंडू तळून गार झाला की तो मधात बुडवा आणि तांदूळ पिठीत घोळवा. सगळीकडून तांदूळ पिठी नीट लागली आहे याची खात्री करून पुन्हा तळून काढा.

८. सातवा आणि शेवटचा थर हा सर्वसमावेशक आणि सौंदर्यवर्धक आहे. त्यामुळे आधीच्या कृतीनंतर गार झालेला गोळा सरसरीत भिजवलेल्या मैद्यात बुडवा आणि मग त्यावर तीळ पेरा. हा गोळा पुन्हा तळून काढा. वरून दिसायला आकर्षक सोनेरी दिसला पाहिजे.

या सगळ्या सात पायऱ्या झाल्या की शांतपणे पदार्थ कचऱ्यात टाकून, सॅलड खाऊन झोपी जा.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

सात गाद्यांखाली ठेवलेला वाटाणा जिला टोचतो अशा अतिसंवेदनाक्षम राजकन्येपासून स्फूर्ती घेऊन केलेला हा पदार्थ आहे इतकं स्पष्ट आहे.

> मटार बेसनात बुडवून तळून काढा. ही पहिली पायरी.

हा मटार खवट असल्याचं ज्याच्या लक्षात येईल तोच अस्सल खवय्या हे ओळखण्यासाठी पदार्थ उपयुक्त आहे. बाकी कशासाठी उपयुक्त वाटत नाही.

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

झकास पाककृती*, आजच करुन पाहीन**
फक्त आमच्याकडे^ यात क्रिशयला*** साध्या ब्रेड क्रम्ब्सऐवजी पँको क्रम्ब्ज लागतात.

* = ष्टँडर्ड छाप
** = पाकृवरच्या प्रतिक्रियेत असं लिहिलं नाही तर फाऊल धरतात!
^ = असा पाठभेद दर्शविणे हे ज्ञात्या प्रतिक्रियादात्याचं लक्षण मानलं जातं. ती सर्वस्वी नवीन असली तरी!
*** = पाककृती, विशेषत: फेसबुकवर असेल तर, बिनदिक्कत आपल्या कुलदीपकाचं/नवऱ्याचं**** नाव साऱ्या जगाला ठाऊक आहे, अशा आविर्भावात वापरावं.

**** = पुरुषही पाकृ लिहिताना असं करु लागतील, तोच सुदिन!

(अवांतर = सप्तशैय्या हे नाव भन्नाट आहे. जयदीपने दिलेल्या उदाहरणाव्यतिरिक्त मार्केटिंगचे सात p(ea)s आठवले - Product, Price, Promotion, Place, People, Process, Provision)

(तूर्तास माझी श्रेणिप्रदानव्यवस्था इ.इ.)

मला क्रिशय म्हणजे काहीतरी फ्रेंच कृती वाटली आधी.

Crichelle वगैरे? परंतु मग ते (घसा खरवडून काढल्यासारखे) ‘ख़्रिशय’ वगैरे व्हायला नको काय? (चूभूद्याघ्या.)

आणि… (क्रिशय ही फ्रेंच कृतीच नसेल कशावरून, म्हणणार होतो, परंतु… जाऊ द्या!)

(बाकी, हल्लीच्या मुलांची नावे काहीही असतात हं एकंदरीत.)

एका विवक्षित फ्रेंच कृतीतून उद्भवलेल्या घटनाशृंखलेच्या परिणामाचं नाव आहे हे - परिचयातल्या एका ममव कुटुंबातलंच.

अवांतर: याबाबत अमेरिका तशी मागासच, पण नेमका आजच हा लेख पाहिला
https://www.theatlantic.com/family/archive/2022/02/most-popular-baby-nam...

एका विवक्षित फ्रेंच कृतीतून उद्भवलेल्या घटनाशृंखलेच्या परिणामाचं

तुम्हांस कसे ठाऊक?

Je ne sais quoi - वाच्यर्थाने आणि ध्वन्यर्थानेही!

अरेरे, कसा रे तू नंदन!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

*** = पाककृती, विशेषत: फेसबुकवर असेल तर, बिनदिक्कत आपल्या कुलदीपकाचं/नवऱ्याचं**** नाव साऱ्या जगाला ठाऊक आहे, अशा आविर्भावात वापरावं.

ही पद्धत एका अमेरिकी पुस्तकात वाचली आणि धन्यधन्य झाले. 'ॲटलस ऑफ इमोशन्स' असं भारदस्त नाव घेऊन अशी सेल्फहेल्प छाप, अमेरिकी संस्कृतीतली पुस्तकं येतात आणि माझे पैसे पळवतात हे शहाणपणा १४ डॉलरांना पडलं.

सईबाईंना मटार टोचत असेल, मला १४ डॉलरचं शहाणपण टोचतं!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. सुरुवातीस, ते ‘१ मटारचा दाणा’ वगैरे वाचून, ही रेसिपी गंभीरपणे घेणे अपेक्षित नाही, याची कल्पना आलीच होती. त्यात पुन्हा बेकन, रतलामी शेव, मध, आणि मॅगी, या सर्वांची नावे इन्ग्रीडियण्ट लिष्टेत एकसमयावच्छेदेकरून वाचल्यावर खात्री पटली.

उर्वरित रेसिपी वाचण्याचे कष्ट घेतले नाहीत.

आयायायायाया! रामारामारामारामारामारामा!!! (नाही, बोले तो, डुकराचे मला वावडे नाही, परंतु… बेकन! अऽघ!!!!!!)

२. बेसनाचे, झालेच तर तांदळाच्या पिठीचे, प्रमाण दिलेले नाही. नॉट दॅट आय केअर. ज्या गावी जायचेच नाही, त्या गावाच्या रस्त्याची चौकशी कशासाठी?

३. या कृतीस ‘सप्तशैय्या’ पॅटिस असे नाव का दिले आहे? त्याचा अर्थ काय? (आणि, ‘ै’ आणि ‘य्य’ दोन्ही काय म्हणून? या काँबिनेशनचा उच्चार नक्की कसा करायचा?)

(‘शैय्या’ हा (त्या ‘चल छैयां ४’ गाण्यातल्यासारखा) ‘छैयां’चा अपभंश वगैरे आहे काय? (परंतु मग साताचा हिशेब जुळत नाही.) असो.)

बाकी चालू द्या.

—————

ता. क.: चिपलकट्टींची कमेंट वाचून ‘सप्तशैय्या’चा उलगडा झाला. मात्र, ‘ै’ आणि ‘य्य’चे काँबिनेशन तरीही झेपले नाही. असो चालायचेच.

मला अय्या म्हणायला फार आवडतं. म्हणून नाव तसं आहे.
चिपलकट्टी (अर्थातच) हुशार आहेत.
तुम्हाला बेकन आवडत नसणार याचा अंदाज होताच.

तुम्हाला बेकन आवडत नसणार याचा अंदाज होताच.

प्रथमदर्शनी, चुकून ‘बेसन’ऐवजी टायपो होऊन ‘बेकन’ झाले असावे, असे वाटले. परंतु, पुढे इन्ग्रीडियंटांच्या यादीत बेसनाससुद्धा पाहिल्यावर… असो. (शिवाय, ‘स्ट्रीकी बेसन’ असा कोठलाही प्रकार माझ्या ऐकण्यात वा पाहण्यात नाही. अर्थात, माझ्या सामान्यज्ञानाची व्याप्ती फार मोठी आहे, असा माझा दावा नाही, परंतु तरीही.)

मात्र, (१) प्रस्तुत पदार्थ लाडवासारखा दिसतो, आणि, (२) प्रस्तुत पदार्थात बेकन आहे, या दोन बाबी लक्षात घेता, प्रस्तुत पदार्थाकरिता ‘बेकनलाडू’ असे नाव सुचवू इच्छितो.

(अवांतर: बाकी, चिपलकट्टींच्या हुशारीबद्दल आम्ही काय बोलावे? ती वादातीत आहे. असो.)

स्ट्रिकी बेकन म्हणजे डुकराच्या पोटावरील भागातून काढलेलं मास होय.
त्याला मीठ लावून क्युअर करतात आणि नंतर त्याच्या पट्ट्या कापतात. पण पोटावर बरीच चरबी असल्याने चरबीचे पांढरे पट्टे त्यावर स्ट्रिक्स सारखे दिसतात.
जेव्हा हे बेकन आपण पॅनमध्ये टाकतो, तेव्हा ते आपल्याच चरबीत शिजू लागतं इतकी चरबी त्यात असते. आणि मग चर्बीव्यतिरिक्त जो 'प्रथिनयुक्त' भाग असतो तो त्या चरबीतच कुरकुरीत होतो. मग उरलेल्या चरबीत दोन सनी साईड अप करता येतात. Biggrin

(नाही म्हणजे, तुमचे वर्णन रसभरित तथा चित्रदर्शी आहे खरे, परंतु, मला त्याची गरज नाही. स्ट्रीकी बेकन म्हणजे काय, ते मला ठाऊक आहे.

माझ्या ऐकण्यात किंवा पाहण्यात नसण्याबद्दल मी ज्याचा उल्लेख करीत होतो, ते स्ट्रीकी बेन. फरक आहे.)

भटुरड्या, शाकाहारी जोश्यांसाठी आहे तो प्रतिसाद!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'भटुरड्या' हे संबोधन आपण मला उद्देशून वापरले आहे काय? (Of all the people, मला??????)

परंतु अर्थात, जिथे साक्षात पु.ल.सुद्धा "(खाण्याची आवड: रोज शिक्रण पाहिजे.) कारण शेवटी आम्ही भटेच, त्याला काय करणार?" (कंस माझे.) म्हणून आम्हांस हिणवून गेलेले आहेत, तिथे आम्ही याहून बरी अपेक्षा ती काय करणार?

चालायचेच!

तुम्ही जोशी आहात काय? मी आहे. मी भटुरडी, शाकाहारी, जोशी आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ते मी,

“भटुरड्या,

शाकाहारी जोश्यांसाठी आहे तो प्रतिसाद!”

असे वाचले.

(चालायचेच!)

या वयात असं होतंच म्हणतात, जुने जाणते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणजे सोनपापडी. त्यात एखादा केस खपेल। पण हा पदार्थ कुणी घरी करत नाही.

नका करू असं! बरं नाही असं करणं. आयुर्वेद आणि होमिओपथीमध्ये असं काही लिहिलेलं नाहीये, ते बरोबर आहे. नका करू असं!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आयुर्वेद आणि होमिओपथीमध्ये असं काही लिहिलेलं नाहीये, ते बरोबर आहे.

होमेपदीबद्दल कल्पना नाही, परंतु, रतलामी शेव आणि मध उष्ण, तर बेकन आणि मॅगी शीत आहेत, काय समजलेत? अत एव, दोन्ही प्रकार एकाच पदार्थात एकत्र करणे अपथ्यकारक.

बाकी चालू द्या.

इन्स्टाफूड म्हणून छानच आहे. शिरेसली कुठल्यातरी फूड ब्लॉगवरही हा पदार्थ "फ्युजन" म्हणून खपू शकतो - तेवढं वर चीज घाला म्हणजे झालं.

=====

हे, गुजरातमधल्या खाऊगाड्यांवर जे सात सात लेयर करुन, अंगापेक्षा बोंगा जास्त' पद्धतीचे खाण्याच्या डिशेसचे आचरट व्हिडिओ दाखवले जातात, त्याचं विडंबन वाटत आहे. ते पूर्ण करण्यासाठी, या तयार पदार्थावर अल्टरनेटली, अमूल लोणी व आईसक्रीमचे सात लपके तरी चढवणे क्रमप्राप्त आहे. त्यानेच त्या वाटाण्याला कृतकृत्य वाटेल!

हल्ली भारतात तरी, आपल्या मुलाचं नाव युनिक असावं असं वाटत असेल तर जमेल तितकं जुनाट नाव ठेवायचं. मी असंच केलं.
माझ्या मुलाच्या वर्गात ३ विवान आहेत. आत्ताच ओळखीतल्या एका जोडप्यानं त्यांच्या बाळाचं नाव अव्यान ठेवलं.
त्यामुळे आपल्या मुला/मुलींची नावं मुकुंद, वसंत, शरद, वीणा, कुमुद, मालती, सरोज वगैरे ठेवली की मुलं मोठी होईपर्यंत ती नावं पुन्हा exotic होतात.

माझ्या मुलाच्या वर्गात ३ विवान आहेत. आत्ताच ओळखीतल्या एका जोडप्यानं त्यांच्या बाळाचं नाव अव्यान ठेवलं.

याच सीरीज़मध्ये श्वान हे नाव कसे वाटते? (किंवा, थोडे वेगळे ठेवायचे झाले, तर डॉगमॅटिक्स?)

त्यामुळे आपल्या मुला/मुलींची नावं मुकुंद, वसंत, शरद, वीणा, कुमुद, मालती, सरोज वगैरे ठेवली की मुलं मोठी होईपर्यंत ती नावं पुन्हा exotic होतात.

छान. या परंपरेस साजेशी अशी महादेव, गोविंद, गोपाळ, लक्ष्मण, गंगाधर, केशव, गजानन, सीताराम, गणेश, राम, गंगा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, यमुना, रमा, सुशीला, इंदुमती, सीता, द्वारका ही नावेदेखील सुचवू इच्छितो. द्या असेल हिंमत तर (आणि बेनेफीशियरीज़ असतील तर). (त्यातल्या त्यात बामणांत चालून जातील अशीच नावे तूर्तास सुचविलेली आहेत. (‘कारण शेवटी आम्ही’ इ.इ.) पसंत पडल्यास आणखीही, अधिक व्यापक कोट्यातीलसुद्धा सुचवेन.)

—————

फार पूर्वी, एका प्रॉजेक्टवर काम करीत असताना, तेथील एका भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकी सहकर्मचाऱ्याचे नाव निरोध असे होते, असे आठवते. त्याच्या आईबापांनी नक्की काय विचार करून ते त्यास दिले असावे, हे कळत नाही.

—————

शीला या नावावरून एक जुनाच पाणचट विनोद आठवला.

—————

असो चालायचेच.

सांगा विनोद न बा .

(अर्थात, शीलाचा विनोद शिळाच असणार. लेकिन, अब आप ने फ़रमाया है, तो… अर्ज़ किया है, वगैरे वगैरे…)

(ईर्शाद!)

काही नाही, एकदा कोठेतरी पळत चाललेल्या एका छोट्या मुलीला कोण्या तिऱ्हाईत मोठ्या माणसाने अडवून, ‘काय ग, ए पोरी, तुझे नाव काय?’ आणि ‘अशी धावतपळत कोठे चाललीस?’ असे दोन प्रश्न विचारले असता, तिने अत्यंत घाईने त्या दोन्हीं प्रश्नांची उत्तरे एकाच शब्दात दिली, आणि धूम ठोकली. वगैरे वगैरे.

(माश्या आल्या! माश्या आल्या!)

बघा, इथेच तुम्ही कमी पडता! आमचा नंदन असता तर याला शिळा विनोद म्हणाला असता! त्याबद्दल त्याच्या डोक्यात शिला हाणण्याची संधी मिळाली असती!!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सप्तपदर फेमिनिस्ट वाटेल म्हणून शैया?

---------
अंड्याचे ( अंडी घातलेले) पदार्थ आमच्यात बाद असतात.

मागे एकदा युट्युबवर का फेसबुक, इन्स्टाच्या रील्सवर एक अतिभयानक सँडविच रेसिपी बघितली होती. एका मोठ्या आकाराच्या ब्रेड स्लाईसवर बटर, ग्रीन चटणी, कांद्याचे काप, टोमॅटोचे काप, काकडीचे काप, उकडलेल्या बटाट्याचे काप, लाल पिवळ्या हिरव्या ढब्बू मिरचीचे काप, छोट्या मशरूमचे काप, शिगोशिग किसलेले पनीर, मोझेरिल्आ चीज, अननसाचे काप, मध, अधूनमधून चाट मसाला, रॉक सॉल्ट, मध्येच मधाचा शिडकावा, मायोनिजचा थरावर थर, तंदूरी सॉस, मस्टरँड सॉस, पिझ्यावर टाकतात ते गोलमटोल जलोपिनो, काळ्या ऑलिव्हच्या रिंग्ज, मिक्स हर्बचे फवारलेले वेगवेगळे प्रकार असं सगळं तीन चार स्लाईसमध्ये कोंबून वरून लबलबीत बटर लावून ग्रील करून टुमटमीत झालेल्या भरगच्च सँडविचचे एकसमान सहा काप करून त्यावरून किसलेल्या चीजचा डोंगर असा काहितरी महाराजा सँडविच नामक खाद्यपदार्थ करणारा तो बनवत होता व्हिडीओ रेकॉर्डिंग करणारा लाईव्ह कॉमेंट्री बरळत होता. हायजेनिक वगैरे निषिद्ध असते त्या पठडीतील असं कळकट्ट सँडविच खाऊन एक तर ओकारी येईल किवा जुलाब लागतील एवढेच काय ते समजले.

हे वाचल्यावर सप्तशैय्या ब्रेड सँडविच पण होऊ शकेल. पण तशी रेसिपी टाकण्याचा मोह आवरला.

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

मटार दाणा काढून टाकला तर पा.कृ. बरी लागेल का?

कारण कथेतील राजकुमारीच्या सात शैय्यांच्या खालचा खडा काढल्यावर, तिला शांत झोप लागली असे वाचल्याचे स्मरते.

अवांतर : ब्रेड वडा खरच चवदार/चटकदार लागतो.
ब्रेडच्या कडा कापून त्यात उकडलेल्या बटाट्याची भाजी भरायची, चांगली घट्टं गुंडाळी करून सरसरीत भिजवलेल्या बेसनात बुडवायची, आणि तळून काढायची.
चिली सॉस बरोबर किंवा लसणीच्या चटणीबरोबर (जरासे दही मिसळलेल्या) देखिल मस्त लागतो.

*********

उतनाही उपकार समझ कोई जितना साथ निभाए |
जनम मरन का मेल है सपना, ये सपना बिसरा दे |
कोई ना संग मरे ...

जुनं ट्रॅश नव्या रूपात!

शिळ्या पॅटिसाला ऊत?

पाककृती वाचून मला दिवाळीचा फराळ करायची - म्हणजे खायची - इच्छा झाली!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काहीही खपतं

एका पेक्षा जास्त प्रक्रिया केलेले अन्न मानवास घातक आहे .आरोग्यावर विपरीत परिणाम होतो
ह्याच्या कडे दुर्लक्ष करून ठरवून असा आरोग्यास घातक पदार्थ बनवायची रेसिपी दिल्या मुळे आम्ही त्याचा निषेध करतो

दिवाळी अंकातील हा लेख वाचण्याआधीच त्याखाली माझी प्रतिक्रिया वाचून, मी काळाच्या पुढे गेलो आहे, याची खात्री पटली.

नाशिक मध्ये मिळणाऱ्या पदार्थाला उलट वडापाव म्हणत नसून पाववडा म्हणतात

‘पॅटिस’ या (मराठी) शब्दाची व्युत्पत्ती नेमकी काय असावी? (पदार्थाची नव्हे. शब्दाची.)

हा शब्द इंग्रजीसदृश वाटतो खरा, परंतु इंग्रजी-तत्सम वा इंग्रजी-तद्भव खासा नसावा. (Pattice असा कोठलाही शब्द इंग्रजीत आढळत नाही. बरे, Pattiesचा (Pattyचे अनेकवचन) अपभ्रंश म्हणावा, तर Patty असा जो काही खाद्यपदार्थ असतो, त्याचा पॅटिसाशी दूरान्वयानेही संबंध नसतो. शिवाय, पॅटिसास इंग्रजीत Puff असे संबोधतात, ही गोष्ट वेगळीच!)

मग ‘पॅटिस’ हा शब्द आला नक्की कोठून?

(शिवाय, ‘रगडापॅटिस’ हा (पॅटिसाशी संबंध नसलेला) पदार्थ वेगळाच. मात्र, त्यातील ‘पॅटिसा’चा कदाचित Pattyशी (बादरायण)संबंध जुळविता येईलही. (चूभूद्याघ्या.))

माझा असा अंदाज आहे, and this is just a hunch, की पॅटीस तयार करायला ज्या प्रकारची कणीक करावी लागते (God! I am now calling it कणीक!) तिला इंग्रजीत पफ पेसट्री म्हणतात. ती बहुतेक पहिल्यांदा फ्रान्समध्ये तयार झाली होती. आणि फ्रेंच patisserie ya शब्दाचे पॅटीस झाले असावे.

Patisserieचा संबंध लक्षात आला नव्हता.

Sounds plausible.

आभार.