मांजा (पूर्वप्रसिद्धी: हंस दिवाळी २०१७)
संक्रांतीपूर्वी एक आठवडा:
कॉलनीतल्या गच्चीवर पोरांचा गलका चालला होता.
'नारळ', 'तपेली' आणि मन्या सिनियर पतंगबाज.
नारळ काय काटाकाटीतला नव्हता. तो आपला सुम्ममध्ये पतंग बदवून मजा बघत बसायचा... कोणाच्या अध्यात ना मध्यात.
तपेलीचा पतंग नुकताच 'कायपो छे' झालेला आणि क्लासची वेळ झाल्यामुळे तो कल्टी मारायच्या तयारीत होता.
मन्या मात्र फुल्ल फॉर्ममध्ये होता. तसा तो नेहमीच असायचा.
लागोपाठ चार पतंगी कापल्या होत्या त्यानं.
चार तोळे कडक खरवाल्या बदामी मांजाची पूर्ण फिरकी बदवून आकाशात इवलूसा ठिपका दिसत होता त्याचा पतंग.
पूर्ण स्थिर, गुम्म... घारी-बिरींनापण पाठी टाकून वर वर चालला होता त्याचा दुरंगा.
बाकी तीन-चार छोटी पोरं इकडे तिकडे लुडबुडत होती.
सुमितनं तर चक्क प्लास्टिकच्या पिशवीला दोरी बांधून तीच उडवायची ट्राय चालवली होती.
सिध्धूनी घरच्या घरीच लोकसत्ताचा हीराच्या काड्या लावून पतंग बनवलेला.
पण तो काय नीट जमला नव्हता. कठड्यावरच ठाप खाऊन परत परत सिध्धूच्या तोंडावरच येत होता तो.
पिनाकनं मात्र छान छोट्याश्या फिरकीला मांजा गुंडाळला होता.
आईच्या मागे लागून छोटूशी पतंगपण आणली होती.
खूप म्हणजे खूप आवडायची त्याला पतंग. या सगळ्या दादा लोकांसारखीच आकाशात उंच पतंग बदवून काटाकाटी करायचं त्याचं आवडतं स्वप्न होतं.
मागे एकदा तपेलीदादानं बदलेली पतंग पिनूच्या हातात दिली होती थोडावेळ, तेव्हा खूप मस्त वाटलेलं त्याला.
दूरवर गेलेली पतंग जवळजवळ आकाशाला टेकलेली... इतक्याजवळ की पतंगीवर मेसेज लिहिला तर तो बाबांपर्यंत पोचेल बहुतेक.
आणि तो मांजा... अस्सा वाऱ्यानं वाकडा झालेला... स्टाईलमध्ये.
मागच्या वर्षी बाबा होते तेव्हा तो, आई आणि बाबा त्या जंगल सफारीला गेले होते.
तिकडचा जंगलातला रोडसुद्धा असाच होता... ऐटबाज वाकडा... त्याची आठवण झाली त्याला.
पतंग तिकडे लांबवर असली तरी मांजा त्याची बोटं ओढत होता...
पॅंटला धरून हळूहळू खेचणाऱ्या माऊच्या पिल्लासारखा वाटलेला त्याला तो मांजा...
हातातून सोडूच नये असं वाटलेला... पण तेवढ्यात त्याला पाठीमागे काहीतरी टोचलेलं...
बघतो तर मन्यादादा त्याला एकदम पाठी चिकटून उभा असलेला...
आणि विचित्र हसत असलेला... पण मग नारळदादा मन्यादादाला ओरडलेला.
पण त्या दिवसानंतर पिनू मन्यापासून जरा लांबच राह्यचा.
आत्ताही तो थोडं अंतर राखूनच होता.
पतंग काय विशेष उडत नव्हती त्याची खरंतर... पण तो आपला प्रामाणिकपणे सगळ्या दादा लोकांचं बघून पतंगीला टिचक्या देत होत्या.
इतक्यात वरती आकाशात दिलावरचा कौवा सरसरत आला आणि मन्या तरारला.
दिलावर म्हणजे मन्याचा एक नंबर रायव्हल. प्रेरणावरून दोघांमध्ये ठसन चालू होती.
मन्यानं कावळ्यासारखा एक डोळा समोरच्या खिडकीत वळवला.
दळवींची प्रेरणा चहा पीत खिडकीतच उभी होती... बेस्ट चान्स... इम्प्रेशन मारायचा.
त्यानं आपली पतंग किंचित उतरवून दिलावरच्या पतंगीवर क्रॉस टाकली आणि तो रापराप घसटी मारायला लागला.
दिलावर सुद्धा तिकडून घसटायला लागला.
प्रेरणापण वरच बघत होती.
'च्यायची दिल्याची पतंग लटकवून दोन्ही पतंगी उतरवून दाखवायच्या प्रेरू डार्लिंगला.'
मन्या तापला.
पिनाक थोडं बाजूला धडपडत होताच...
इतक्यात एक रँडम वाऱ्याचा झोत आला आणि त्याची पतंग मन्याला क्रॉस पडली...
अगदी हातभर अंतरावर...
पिनाक थोडा गडबडला आणि त्यानं पतंग खेचली... आणि...
मन्याचा मांजा सपकन तुटला!
मन्याला क्षणभर काही कळलंच नाही... की गॅलरीत प्रेरणा खदाखदा का हसतेय ते...
मग त्याला उं SSS च आकाशात गुल झालेली पतंग दिसली... आणि त्याची तार सटकली.
त्यानं भांबावलेल्या पिनाकच्या फाडकन एक कानफटात मारली, "चुत्या साला. मध्ये मध्ये आपली आई घालतोय."
तो पिनाकला अजून मारणार होता पण तपेली आणि नारळनी त्याला पकडला.
पिनाकच्या डोळ्यासमोर अंधारल्यासारखं होत होतं...
फुटणारं रडू आवरत त्यानं पतंग घेतली आणि तो खाली आला.
त्यानं कुलूप काढून दार उघडलं. आई ऑफिसमधून यायला अजून दोन तास तरी होते.
वाटीत खाऊ काढून ठेवला होता तिनं... पण त्याचा गाल दुखत होता आणि मूडही नव्हता.
त्यानं पतंग-फिरकी टी.व्ही.खाली ठेवली आणि त्याला एकदम आठवलं,
'डांगूल'ला खाणं द्यायचं विसरूनच गेला होता तो.
त्यानं फ्रीजमधून डेअरी-मिल्कचा छोटासा तुकडा काढला आणि तो गॅलरीतल्या तुळशीजवळ आला.
त्यानं हलकेच हाक मारली आणि आणि कुंडीतून गांडुळासारखा दिसणारा सोनेरी-हिरवट रंगाचा डांगूल सरसरत बाहेर आला.
त्यानं प्रेमानं पिनूच्या हाताला हलकेच दंश केला आणि त्याच्या हातातलं चॉकलेट मटामटा खाल्लं.
डांगूल पिनूचा बेस्ट फ्रेंड होता. सगळं सगळं सांगायचा तो डांगूलला.
जेव्हा बाबा होते मागच्या वर्षी तेव्हा तो, आई आणि बाबा जंगल सफारीला गेले होते... खूप मजा आली होती.
जीपच्या ड्रायव्हर काकांनी त्यांना जंगलाच्या एकदम आत नेलं होतं.
तिकडे म्हणे एलियन्सचं प्लेन क्रॅश झालं होतं असं सगळे म्हणत होते...
पण बाबा म्हणत होते की ती अफवा होती कारण त्यांना एलियन्सचं प्लेन किंवा एलियन्स काहीच दिसलं नाही.
त्यांची जीप मात्र पंक्चर झाली... आणि तिकडेच दगडाखाली पिनाकला डांगूल दिसला होता.
मुंग्या लागलेला... अर्धमेला.
पिनूनं त्याला वॉटरबॅगेतलं पाणी पाजलं आणि कोणाचं लक्ष नाही असं बघून हळूच वॉटरबॅगेत घालून घरी आणलेलं, आणि कुंडीत लपवून ठेवलेलं.
डांगूलला तो सगळं सांगायचा आणि डांगूलही त्याच्याशी बोलायचा पण तोंडाने नाही तर त्याच्या वळवळत्या शरीराची अक्षरं करत:
"हा य पि नू मु ड ऑ फ?"
आता मात्र पिनूला रडं आवरलं नाही आणि त्यानं गच्चीवरची सगळी गोष्ट डांगूलला भडाभडा सांगितली...
मन्यादादा पाठून त्याला चिकटायचा ते सुध्दा.
डांगूल आधी काहीच बोलला नाही फक्त थरथरत राहीला...
आणि मग पटापटा अक्षरांची वेटोळी करायला लागला:
"ए क आ ठ व डा
म ला बा री क व्हा य ला ला गे ल
आ णि लां ब खु प लां ब
प ण नु स तं चॉ क ले ट खा ऊ न चा ल णा र ना ही
तु झं थो डं सं र क्त प्या वं ला गे ल
अ ग दी थो डं
चा ले ल ?
आ णि आ ई ला सां गू न को स "
तसंही पिनू आईला सांगणार नव्हताच,
तिनं रानमांजरीसारखा ओरबाडला असता मन्याला पण मग पिनूचं पतंग उडवणं बंद झालं असतं.
पिनूनं मान डोलावली आणि डांगूल त्याच्या बोटाला खुषीत लुचला.
संक्रांतीची संध्याकाळ:
आख्ख आकाश पतंगींनी भरलं होतं.
लाल, हिरव्या, जांभळ्या, गुलाबी, पिवळ्या पतंगी...
आणि त्यांचे बा SSS रिक दिसणारे मांजे...
बदामी, घासलेटी, तारवाला, साखळीछाप मांजे... अगदी फुलपुडीचे दोरेसुद्धा.
नारळला कोणी आज सुखाने फक्त पतंग उडवू देणार नव्हतंच, त्याने नाईलाजाने दोन पतंगी कापल्या होत्या.
तपेलीच्या दोन ऑलरेडी 'कायपो छे' झाल्या होत्या आणि तो तिसरीची कणी बांधायला बसला होता.
आणि मन्या...
मन्यानी सात पतंगी कापल्या होत्या... नॉट आऊट... त्यात दिलावरच्या दोन.
खिडकीतून प्रेरणानं त्याला चक्क अंगठा आणि पहिल्या बोटाचा गोल दाखवून लाईन दिली होती.
पतंगीसारखाच मन्या हवेत होता...
आणि गच्चीत पिनाक आला.
हातात भला मोठा ढेल पतंग... गुलाबी रंगाचा... मध्ये निळाशार चांद.
आणि रक्तासारखी लाल लांबलचक शेपूट.
भर्र वाऱ्यात फुरफुरणारा पतंग... शर्यतीच्या घोड्यासारखा.
आणि दुसऱ्या हातात फिरकी... पूर्ण भरलेली... हिरवट सोनेरी मांजाने.
माहित नाही का पण सगळे अगदी गप्प झाले होते.
पिनू इकडेतिकडे न बघता सरळ मन्याच्या विरुद्ध बाजूला गेला आणि त्याने पतंग कठड्यावरून खाली सोडली. पुढच्या क्षणाला त्याची पतंग वर झेपावली... त्याच्या पुढच्या क्षणाला ती सरसर जायला लागली.
फिरकीतून सटासट मांजा सुटत होता आणि पतंग वर... अजून वर.
निळा चांद गुलाबी रंगात मिसळला.
लांबवर छोटूसा ठिपका दिसायला लागला वळवळणाऱ्या शेपटीसकट... विजयी शुक्रजंतूसारखा.
दिलावरनं त्याच्या गच्चीतून नवा शिकाऊ बकरा हेरला आणि पतंग पिनूच्या पतंगीवर टाकली.
तो सपासप घसटी मारायला लागला...
आणि... आणि... त्याचीच पतंग कटली.
दिलावर कपाळावर हात मारत फिरकी गुंडाळायला लागला.
पिनू खुषीत हसला आणि शांत झालेल्या गच्चीवर पुन्हा आनंदी कल्ला झाला.
मन्या सोडून सगळेच पिनूच्या नावानं ओरडत होते,
"सही छोट्टे!" "हक् है तेरेको जिनेका!" "हय पिनू!" "भाई शिकला पोरगा पतंग!"
पिनूनं मिस्कील हसत त्याची पतंग तपेलीच्या पतंगीवर टाकली आणि हलकेच घसटी मारली...
तपेलीचा दुरंगा गुल्ल झाला.
पण तो खाली जायच्या आतच त्यानं दुरंगा वरच्यावर आपल्या मांजावर लटकावला आणि हळूहळू खाली उतरवत तपेलीच्या हातात दिला.
तपेलीनं आधी आ वासला आणि मग कौतुकानं पिनूच्या पाठीत धपाटा घातला.
आता त्याचा मांजा सरसरत नारळच्या पतंगीकडे चालला होता,
पण पिनू हळूच काहीतरी मांजाजवळ जाऊन पुटपुटला आणि डांगूलनं नारळच्या पतंगीखालून हळूच स्वतःला सोडवला आणि त्याला एकटा सोडला.
मग डांगूल वळला मन्याकडे
उंचच उंच आकाशात दोनच पतंगी होत्या आता.
मन्या आणि पिनाक...
मन्याची जास्तच उंच उडत होती कारण तपेलीची पतंग लटकावण्याच्या नादात पिनूनं आपली पतंग बरीच उतरवली होती.
पण त्यानं हलकेच टिचकी दिली आणि पिनूची पतंग सपसप आकाशात चढू लागली.
मिनिटभरात ती मन्याच्या पतंगीला भिडली.
मन्या चवताळला.
त्यानं घसटी मारायला चालू केली सपासप दोन्ही हातांनी.
पिनू मात्र ढील देत होता अजून अजून.
मन्यानं तोंडात शिवी पुटपुटत फायनल हिसका मारला...
मांजा झालेल्या डांगूलनं आपले अणुरेणू फिरवत सूक्ष्म अणकुचीदार दात बाहेर काढले आणि चावा मारला.
बरोब्बर मन्याच्या कण्णीखाली.
दुसऱ्याच क्षणी मन्याची पतंग गुल्ल!
मन्या क्षणभर बघत राह्यला आणि मग दात ओठ खात पिनाकच्या दिशेनी सरकला...
पण थबकला.
गच्चीवरच्या मावळत्या उन्हात पिनाकचे डोळे वेगळेच चमकत होते.
आणि हातात तो बारीक धारदार मांजा... लवलवणारा.
का कोणास ठाऊक पण मन्याला धीर झाला नाही पिनूवर हात उचलायचा.
तो हळूहळू पाठी झाला.
त्याचे कान शरमेनी गरम झाले होते... सगळा उत्साह गळलेला...
तो खांदे पाडून परत फिरला.
इतक्यात...
मन्याच्या पायात मांजाचं वेटोळं बसलं आणि तो भिरकावला गेला.
आधी गच्चीच्या कठड्याकडे आणि मग खाली... खूप खाली.
----------------------------------------------------- समाप्त -----------------------------------------------------
-नील आर्ते
प्रतिक्रिया
गुंतवणारी गोष्ट
मुलांचं बोलणं, विश्व बरोबर पकडलं आहे. कलाटणी भारी आहे.
----
पण डांगूल म्हणजे कोणता प्राणी अंदाज आला नाही.
---------
मी लहानपणी करायचो पतंग पण बदवायला आणि काटाकाटी करायचा धाकटा भाऊ.
आभार जोकोदादा.
आभार जोकोदादा.
माझ्या मनात डांगूल अपरिमित ductile strength असलेला एलीयन प्राणी आहे.
जबरी
गोष्ट इतकी छान जमलीये की वाचता वाचता त्यांत हरवून गेलो. एलियनचा मांजा होणे ही फारच भारी कल्पना आहे. काश, मी पतंग उडवायचो तेंव्हा आम्हाला त्रास देणाऱ्या, नोकराच्या हातात फिरकी देऊन दिवसभर पतंग काटणाऱ्या दिनेशला धडा शिकवायला हा डांगूल असता तर ?
आभार तिरशिंगराव
आभार तिरशिंगराव
लहान मुलं जशी पतंग उडवतांनाची
लहान मुलं जशी पतंग उडवतांनाची चित्र काढतात तसे वरचे चित्र आले आहे.
म्हणजे कसे की, एकाच फ्रेममध्ये एका पतंगीसाठी वारा ह्या दिशेने वाहतो तर दुसर्या पतंगीसाठी वारा त्याच्या विरुद्ध दिशेने वाहतो.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
.
चित्र टूडीमध्ये (ऑर्थॉगोनल व्ह्यू? चूभूद्याघ्या.) पाहताय, म्हणून होतेय असे.
…
दोन समांतर रेषा एकमेकींना कधीही छेदत नाहीत, हा सिद्धांत१ विसरलात काय?
सगळेच पतंग जर एकाच दिशेने उडू लागले, तर काटाकाटी होणार कशी?
==========
१ खरे तर, हा सिद्धांत, की गृहीतक? की निव्वळ व्याख्या? असो.
आवडली/आमची(ही) पतंगविद्या (अतिसवांतर)
का कोण जाणे, परंतु लहानपणी (किंवा फॉर्दॅट्मॅटर आजतागायत) पतंग उडविणे हा प्रकार कधी जमला नाही. आणि, not for a lack of trying. बोले तो, हौशीने पतंग आणणे, त्याला मांजा बांधणे, तो दोन्हीं बाजूंनी सारख्याच लांबीचा बांधला गेलाय की नाही, याची खात्री करणे, वगैरे सोपस्कार अत्यंत धार्मिकपणे पार पाडीत असे. फक्त, आमच्या पतंगाने पृथ्वी कधी सोडली नाही. किंवा सोडलीच, तर ती केवळ काही इंच वर जाऊन पुन्हा खाली आदळण्याकरिताच. फॉर सम स्ट्रेंज रीझन, पतंगाच्या टेकऑफकरिता लागणारे टेक्नीक कधी जमलेच नाही.
(थोडक्यात, भारतीय स्पेस प्रोग्रामच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या परफॉर्मन्ससारखीच काहीशी आमची या विद्येतली स्थिती होती. मात्र, कालांतराने भारताने रॉकेटविद्येत फार मोठी मजल मारली; आम्ही मात्र पतंगविद्येत होतो तेथेच राहिलो. चालायचेच.)
—————
(पतंग, टेकऑफ वगैरेंवरून आठवले. विद्यार्थिदशेत असताना, अत्यंत माफक दरात थोडेफार ग्लायडिंग शिकण्याची संधी मिळाली होती. ग्लायडिंग क्लब कँपसपासून जवळच होता. तेव्हा भारतात जे ग्लायडिंग क्लब होते, तेथे भारत सरकारप्रणीत सर्वसाधारण पर फ्लाइट रेट ₹३६ असे. (ही १९८४-८५च्या आसपासची गोष्ट आहे.) मात्र, भारतीय नागरिकांकरिता भारत सरकारतर्फे ५०% सवलत म्हणजे ₹१८ दर असे. त्यात पुन्हा आमचा क्लब हा आमचे विद्यालय चालविणाऱ्या संस्थेच्या परिवारापैकी असल्याकारणाने, आमच्या विद्यार्थ्यांना फारच सवलतीचा दर म्हणजे ₹२ वगैरे असे. थोडक्यात, डर्ट चीप. त्यामुळे, आम्ही रीतसर सदस्यत्व घेऊन तेथे जवळजवळ दररोज पडीक असू. (तसेही, लेक्चरे अटेंड करणे वगैरे क्षुल्लक गोष्टींना अवाजवी महत्त्व कधीच दिले नाही, वगैरे.) आमच्यासारखेच आमचे इतरही अनेक सहविद्यार्थी – तथा अपवादात्मक एखादी सहविद्यार्थिनीसुद्धा – तेथे कायम पडीक असत.
अडचण एकच होती. आम्ही सर्वजण तेथे साधारणतः दुपारी दीड ते दोनच्या आसपास टपकत असू. त्यानंतर मग सावकाश आमचा अजस्रदेह इन्स्ट्रक्टर फुरसतीत डुलतडुलत येत असे. (इन्स्ट्रक्टर उत्तम होता; मात्र, अत्यंत लहरी होता.) आता, आम्ही पंधरा ते वीस जण, मात्र आमच्यात ग्लायडर एकच, नि इन्स्ट्रक्टर एकच. त्यामुळे, आपली पाळी यायची वाट पाहायची. प्रत्येकास जास्तीत जास्त एक फ्लाइट, फ्लाइटचा साधारण अवधी पाच मिनिटांच्या आसपास. (उंची ९००-१,००० फूट वगैरे.) शिवाय, पाळी कोणाचीही असो, फ्लाइटच्या अगोदर ग्लायडरला टेकू देऊन उभे राहणे आणि फ्लाइटनंतर ग्लायडर उचलून पुन्हा स्टार्टिंग पॉइंटला योग्य ठिकाणी उचलून नेणे, या कर्तव्यांत (ज्याची/जिची पाळी आहे तो/ती आणि इन्स्ट्रक्टर वगळून) सर्वांनी हातभार लावणे अपेक्षित असे. (ते ठीकच होते म्हणा.) उड्डाणे मात्र अर्थात दिवसाउजेडीच आणि तीही शक्यतो जास्तीत जास्त पाच वाजेपर्यंतच चालत; अनेकदा अचानक हवामान खराब झाल्यामुळे म्हणा, किंवा इन्स्ट्रक्टरची लहर फिरल्यामुळे म्हणा, किंवा इन्स्ट्रक्टरला कंटाळा आल्यामुळे म्हणा, पाचाच्याही बऱ्याच अगोदर इन्स्ट्रक्टर गाशा गुंडाळावयास भाग पाडीत असे. एकदोनदा तर आल्याआल्याच आज फ्लायटी होणार नाहीत म्हणून सांगितलेनीत्. परंतु, तो तेथील सर्वेसर्वा असल्याकारणाने, त्याच्यासमोर कोणाचे काही चालत नसे.
थोडक्यात, कोणत्याही दिवशी तुम्ही रांगेत तासन् तास कितीही ताटकळा नि कितीही हमाली करा, रांगेत तुमचा नंबर लागेलच, याची शाश्वती नसे. (हमाली करण्याचे दुःख अर्थातच नव्हते, परंतु त्याअखेरीस आपली पाच मिनिटांची फ्लाइट न मिळाल्यास प्रचंड वैताग येत असे.)
तर सांगण्याचा मतलब, लहानपणीच्या पतंगविद्येत आम्ही टेकऑफपर्यंतसुद्धा प्रगती केली नसेलही – भले (क्रॅश)लँडिंग कितीदाही केले असले, तरीही. मात्र, या दुसऱ्या पतंगविद्येत आम्ही टेकऑफ करण्यापर्यंत प्रगती केली होती. (ग्लायडर हे धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाकडून केबलने हापसले जाऊनच एअरबोर्न होते, भले इष्ट उंची गाठल्यानंतर केबल सोडून देत असले, तरीही. त्या अर्थाने ग्लायडरविद्या ही एका प्रकारची पतंगविद्या म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.) मात्र, तोवर वर वर्णिल्यासारखे प्रकार वारंवार होऊ लागल्याने, कंटाळून आम्ही तो नाद सोडून दिला. त्यामुळे, लँडिंग हा प्रकार आम्ही कधी शिकलो नाही. (लँडिंगचे धडे टेकऑफच्या धड्यांच्या नंतर येतात. टेकऑफ तुलनेने सोपा असतो, लँडिंग त्या मानाने पुष्कळच अवघड असते, असे ऐकलेले आहे. अर्थात, आम्ही स्वतः कधी लँडिंग शिकण्याच्या पायरीपर्यंत न पोहोचल्याकारणाने, आमच्याकरिता ही केवळ सांगोवांगीची कथा; विदा नव्हे.) त्यामुळे, ग्लायडिंगमधील आमची तत्कालीन प्रगती ही काहीशी अभिमन्यूसारखी म्हणता येईल – चढता येते, परंतु (एकदा चढल्यावर) उतरता येत नाही. असो.)
—————
(एक अवांतर गोष्ट. (बोले तो, आतापावेतो जेवढे अवांतर केले, त्याहूनही अवांतर.) ग्लायडरविद्येतील आमच्या प्रगतीवरून आठवले. अटलांटाच्या ईशान्येकडील ज्या उपनगरवजा गावात मी राहातो, तेथे, माझ्या घरापासून ३-४ मैलांच्या अंतरावर एक छोटासा स्थानिक/म्युनिसिपल विमानतळ आहे. (अटलांटा विमानतळ नव्हे; तो अटलांटाच्या आग्नेयेस असून फारच प्रचंड, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. बहुधा अमेरिकेतील सर्वाधिक मोठ्या विमानतळांपैकी. तो हा नव्हे. असो.) तर आमच्या या छोट्याशा, स्थानिक विमानतळाबद्दल. हा खऱ्याखुऱ्या विमानांचा विमानतळ आहे; ग्लायडरांचा नव्हे. मात्र, तेथे नेहमीच्या व्यापारी विमानकंपन्यांपैकी कोणाचीही कोणतीही नियमित फ्लाइट जातयेत नाही. तेथे एकदोन चार्टर विमानकंपन्या आहेत, झालेच तर एक फ्लाइट ट्रेनिंग स्कूल आहे, त्याउपर कदाचित कोणी खाजगी विमानांकरिता तो विमानतळ वापरीत असल्यास असू शकेल, कल्पना नाही. परंतु, याउपर अॅक्टिविटी नाही.
तर आमच्या या छोट्या विमानतळाबद्दल एक अर्धी खरी, नि अर्धी रंगविलेली कहाणी. आमच्या या छोट्याशा विमानतळाचा क्लेम टू फेम म्हणा, किंवा क्लेम टू नोटोरायटी म्हणा, तो म्हणजे, तेथे जे फ्लाइट ट्रेनिंग स्कूल आहे, तेथे, ९/११चे जे अपहरणकर्ते होते, ज्यांनी पुढे अपहृत विमान डब्ल्यूटीसीवर जाऊन आदळले, त्यांच्यापैकी काही जणांनी विमानउड्डाणाचे प्रशिक्षण घेतले होते. (इथवरचा भाग सत्य आहे. यापुढील पुस्ती मात्र माझी कपोलकल्पित, तिखटमीठ लावलेली.) आता, वस्तुतः, त्या भावी अपहरणकर्त्यांनी जेव्हा तेथल्या त्या प्रशिक्षकाशी बार्गेन करायचा प्रयत्न केला, की ‘हे बघ, तू आम्हाला टेकऑफ शिकव, झालेच तर पुढचे ते स्ट्रेट अँड लेव्हल फ्लाइंग, कंट्रोल्स नि काय काय ते शिकव; ठीक आहे. लँडिंग शिकवले नाहीस, तरी चालेल. (स्वगत: इथे लँडिंग करायचेय कोणाला?) कुछ डिस्काउंटविस्काउंट देता है क्या?’, तेव्हाच खरे तर त्या मठ्ठ प्रशिक्षकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकावयास हवी होती; नव्हे, त्याच्या टाळक्यात लख्ख प्रकाश पडावयास हवा होता. परंतु… इट वॉज़ नॉट टू बी. ईश्वरेच्छा बलीयसि, दुसरे काय?
तर सांगण्याचा मतलब, आमच्या लोहरज्जुपतंगविद्येतील प्रगतीच्या अवस्थेची तुलना, एका प्रकारे काही अंशी त्या अपहरणकर्त्यांच्या विमानविद्येतील प्रगतीशीही करता येईल. तर ते एक असो.)
—————
हं, तर आता एवढ्या सगळ्या आट्या लावून झाल्यावर, ज्याकरिता म्हणून हा प्रतिसाद दिला, ते मूळ कारण. काही विशेष नाही; गोष्ट आवडली, एवढेच कळवायचे होते. असो चालायचेच.
न'बा, धन्य झालो.
तुम्हाला पहिल्या चारही श्रेणी एकाच वेळी द्यायच्या आहेत. ऐसीने सोय करावी. तुम्ही खरे ब्लॉगर आहात.
मलासुद्धा पत्ंग जवळ जवळ चाळीसचा होईपर्यंत उडवता येत नव्ह्ती.
>>>>
फक्त, आमच्या पतंगाने पृथ्वी कधी सोडली नाही. किंवा सोडलीच, तर ती केवळ काही इंच वर जाऊन पुन्हा खाली आदळण्याकरिताच. फॉर सम स्ट्रेंज रीझन, पतंगाच्या टेकऑफकरिता लागणारे टेक्नीक कधी जमलेच नाही.
>>>>
माझा पतंगकलेचा इतिहासही फार रोचक आणि अगदीच रिसेंट आहे.
(तो खरं तर एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. )
पण मलासुद्धा पत्ंग जवळ जवळ चाळीस चा होईपर्यंत उडवता येत नव्ह्ती. माझीही अवस्था अगदी तुम्ही नमूद केल्याप्रमाणेच होती.
पण साधारण २०१६ मध्ये मला अवचित कळालं की पतंग उडवण्याचे (आणि उडवणार्यांचे) दोन प्रकार असतात.
१. बर्यापैकी टेक्नीकल आणि हुकमी. ह्यात लोक "टिचक्या" मारून मारून कुठेही केव्हाही कशीही पतंग बदवतात. पण हे "टिचक्या" टेक्नीक बर्याच वर्षांच्या प्रॅक्टीसनेच येतं.
बरेचदा स्लम्समधली पोरं झोपड्यांच्या गर्दीतले गटारांचे काठ, दोन्ही बाजूनी वाहत्या रस्त्यांमधला डिव्हायडर, कचर्याच्या ढिगापासची टीचभर मोकळी जागा अशा कुठल्याही अशक्य जागेतून पतंग लीलया उडवताना दिसतात.
तो हा पहिला प्रकार.
मित्रवर्य माननिय पंकज भोसले ह्या प्रकाराचा अनभिषिक्त सम्राट आहे.
२. अफाट मोकळी जागा आणि भणाण वारं असलं तर ह्या टेक्निक फारसं नसूनही पतंग झकास उडते.
(बक्कळ पैसा, बापाची फिल्म लायनीतली वट आणि चांगली श्रवणीय गाणी असली की टुकार हिरोही स्टार होतो उदाहरणार्थ कुमार गौरव वगैरे तसंच हे)
) उडते.
मी काहीच वर्षांपूर्वी हा दुसरा प्रकार शिकलो.
समुद्र किनारा, डोंगर टेकड्यांचे माथे, (पुण्यातील ... मुंबईचा ट्राय नाही केला अजून) रेसकोर्सचं मोकळं मैदान,
उंच बिल्डिंगच्या (सोलर पॅनेल्सची छपरं आणि वारा अडवणाऱ्या कमानी नसतील तर) गच्च्या अशा ठिकाणी माझी पतंग आताशा "बहुतेक" (पण हुकमी नव्हे
पण उडली की त्याचा आनंद औरच असतो.
न. बा. अमेरिकेत अशा मोकळ्या जागा सुदैवाने बऱ्याच आहेत. जमल्यास पुनश्च ट्राय करा.
अर्थात बेसिक नेव्हिगेशन लागेल पण खालचा डेटा सांगतोय की तेवढं तुम्हाला हमखास येईल.
>>>>
आणि, not for a lack of trying. बोले तो, हौशीने पतंग आणणे, त्याला मांजा बांधणे, तो दोन्हीं बाजूंनी सारख्याच लांबीचा बांधला गेलाय की नाही, याची खात्री करणे, वगैरे सोपस्कार अत्यंत धार्मिकपणे पार पाडीत असे
>>>
आणि अर्थात ही गोष्ट बरीचशी ड्रायव्हिंग किंवा हुला-हूप रिंग सारखी आहे.
आपल्याला येणार नाही नाही असं वाटता वाटता अवचित जमू लागते.
प्रयत्न करणार असाल तर शुभेच्छा आणि आउटपुट जमल्यास कळवा.
टीप: अमरिकेतील पतंगी वेगळ्या असतात आणि मला स्वतःला आपल्या कागदी पतंगी आणि मांजाच आवडतात.
तशा पतंगी मिळवण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते कदाचित. पण आल्यास आपण काय करता येईल ते बघूया.
कणी वा कन्नी
पतंग हवेत जाऊन स्थिर होण्यासाठी त्याची कणी/कन्नी ही चांगली बांधता आली पाहिजे. तसेच पतंग घेतानाच, त्याची मधली काडी जाड आहे याची खात्री करुन घेतली पाहिजे. कित्येकदा, खालच्या भागात वारं कमी असतं. त्यावेळेस पतंग वर उडवणे ही खरी कला आहे. एकदा का पतंगाला वरचं वारं लागलं की तो हवेत भराऱ्या मारायला लागतो.(काही माणसांच्या बाबतीतही हे वाक्य खरं आहे).
पतंग उडवणं, भोवरा फिरवता येणं, गोट्या खेळता येणं, खाचखळग्यांच्या शेताडीत क्रिकेट खेळता येणं या कला आम्हाला डोंबिवली या त्यावेळच्या ग्रामाने शिकवल्या.
हम्म्म्म्म्…
यावरून एक कल्पना सुचली. पतंगास व्हिस्की पाजल्यास बात जमून जाईल काय?
(पतंगाऐवजी पतंग उडविणाऱ्या/रीने व्हिस्की प्यायल्यास परिस्थितीत कितपत फरक पडावा? पतंग आणि पतंग उडविणारी/री दोघांनीही व्हिस्की ढोसल्यास अधिक फायदा होईल काय? ॲरिस्टोक्रॅट वापरावी, की ग्लेनफिडिच? भराऱ्या मारणे आणि झोकांड्या खाणे यांत क्वालिटेटिव फरक नक्की काय?)
तुम्ही डोंबोलीचे, की पार्ल्याचे? (एकदा काय ते नक्की ठरवा.)
अगदी बारा गांवचं
अगदी बारा गांवचं नाही तरी, मालाड, डोंबोली, पार्ले,अंधेरी, बडोदा, अमदाबाद, आणि पुणे शहराचं पाणी प्यायलोय आत्तापर्यंत!
!
मालाड, अंधेरी, आणि पार्ल्याचे पाणी वेगळे गणताय, ही गंमत आहे. नाही म्हणजे, बृहन्मुंबईने गिळंकृत करण्यापूर्वी ही सर्व गावे वेगवेगळी होती, हे ठाऊक आहे. आणि, भाषा दर १२ कोसांवर बदलते, हेही ठाऊक आहे. (खरे तर, विलेपार्ले ते अंधेरी किंवा विलेपार्ले ते मालाड हे अंतरसुद्धा १२ कोसांच्या जवळपासदेखील नसावे, परंतु त्याकडे तूर्तास दुर्लक्ष करू.) परंतु, विलेपार्ल्याचे आणि अंधेरीचे (फॉर्दॅट्मॅटर मालाडचेसुद्धा) पाणी वेगळे असण्याचे काही कारण?
मालाड
आम्ही मालाडला होतो तेंव्हा ते मुंबईत नव्हतं. आमच्या वाडीतल्या विहीरीतले पाणी आम्ही प्यायचो. पार्ले पूर्व आणि अंधेरी पश्चिम हे दोन्ही मुंबईतच असलं तरी ईस्ट आणि वेस्ट यांच्या स्ंस्कृतीत आणि जडणघडणीत फार फरक होता. रेल्वेने केलेली ही विभाजने बरेच काही बदल घडवीत. फ्लायओव्हर नसल्यामुळे , इथून तिथे जाणंही सोपं नव्हतं. आता हे सगळं बदललं आहे.
मजा आली
मजा आली, नील. तुझ्या कथांमध्ये बहुतेकदा निराळी गंमत असते, फार हीरोगिरी न करणारा सुपरहीरो, किंवा गमतीशीर वैज्ञानिक कल्पना वगैरे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आभार
आभार
कुतुहल
मराठीत पतंग पुल्लिंगी आणि अनेकवचनही पतंगच असे शिकलो आहे. पतंग स्त्रीलिंगी आणि अनेकवचन पतंगी हे पहिल्यांदाच वाचले. हे मराठीच्या कुठल्या बोलीत आहे यांचे कुतुहल वाटले.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
ठाणे
मी ठाण्यात वाढले. एक (ती) पतंग, अनेक पतंग आणि मोठा असेल तर (तो) ढब; अशी भाषा मी आत्मसात केली. तो पतंग कानाला खटकत नाही; लहानपणी ही भाषाही ऐकली असणार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.