Skip to main content

दिवाळी अंक २०१७ - आवाहन

नमस्कार,

गेल्या पाच वर्षांची परंपरा पाळत यंदाही 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकाबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी 'ऐसी अक्षरे'च्या सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.

इथे दर्जेदार लेखन प्रकाशित व्हावं, नवीन वाचक-लेखकांना संस्थळाबद्दल जिव्हाळा निर्माण व्हावा, त्यातून लेखन-वाचन संस्कृतीमध्ये, लहानशी का होईना, भर पडावी असा प्रयत्न नेहेमीच केला जातो. दिवाळी अंक हा या प्रयत्नांचाच एक वैशिष्ट्यपूर्ण भाग. गेल्या अंकांत सरस लिखाण आलं, तसंच - किंबहुना त्याहूनही सरस - लिखाण यंदाच्या दिवाळी अंकात यावं अशी आमची इच्छा आहे. उत्कृष्ट दर्जाचं लिखाण करणं सोपं नाही, त्यासाठी लेखकांना कष्ट करावे लागतात. वाचकांच्या केवळ प्रतिसादांतूनच त्या कष्टाचं चीज करण्याची या माध्यमाची शक्ती आहे खरी. पण आमच्या मते तेवढं पुरेसं नाही. त्यामुळे याही दिवाळी अंकातल्या लेखनासाठी काहीतरी मानधन देण्याची इच्छा आहे. काही सदस्यांनी 'ऐसी अक्षरे'ला आर्थिक मदत देऊ केली होती; इतरांनाही यात हातभार लावण्याची इच्छा असल्यास व्यक्तिगत निरोपातून स्वतंत्र संपर्क करूच.

दिवाळी अंकासाठी येणाऱ्या लेखनापैकी सगळंच्या सगळं अंकात समाविष्ट करणं दुर्दैवानं शक्य नसतं. एखादा लेख घ्यायचा की नाही हा निर्णय लिखाणाच्या दर्जावर तर अवलंबून असतोच. पण त्या प्रकारचं आलेलं इतर लेखन, एकंदरीत अंकासाठी आलेल्या लेखांची संख्या, अंकाचं आर्थिक अंदाजपत्रक हेही निर्णायक घटक असतात. लिखाण आमच्या हाती कधी येतं हेही महत्त्वाचं ठरतं. या सगळ्या गोष्टींमुळे काही चांगलं लेखनही नाकारलं जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राग मानू नये ही विनंती. काही लेख काही कारणानं 'ऐसी'च्या दिवाळी अंकात घेणं शक्य नसेल, तर लेखकापाशी तो लेख दुसऱ्या अंकात पाठवण्याचा रस्ता खुला असला पाहिजे, तितका वेळ त्याच्यापाशी उरला पाहिजे - यावरही आमचा कटाक्ष असतो. म्हणून साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१७ ठेवलेली आहे. तुमचं लिखाण आमच्या हाती जितक्या लवकर पोचेल, तितका जास्त वेळ आम्हांला मिळेल. स्वीकृतीचा निर्णय घ्यायला, संस्करण करायला, शक्य झाल्यास लेखासाठी अनुरूप रेखाचित्रं-छायाचित्रं मिळवायला हा वेळ अतिशय मोलाचा आहे. तेव्हा ही तारीख कसोशीने पाळावी ही आग्रहाची विनंती.

दिवाळी अंक अधिकाधिक वाचकांना आपलासा वाटावा असा आमचा प्रयत्न दर वर्षीच असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे अंकात नेहेमीच्या लेखनाप्रमाणेच घनगंभीर(!) माहितीपूर्ण लेखन असावंच; शिवाय उत्तम दर्जाचं ललित लेखन, विनोदी लेखन, व्यक्तिचित्रं, समीक्षा, नवीन विषयांची ओळख करून देणारं, निरनिराळ्या शैलींमधलं आणि घाटांमधलं, प्रयोगशील लेखनही असावं, असं मनापासून वाटतं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या लेखनाचं, माध्यमसंबंधी - घाटासंबंधी - शैलीसंबंधी प्रयोगांचं, आणि हो, रेखाटनांचं आणि छायाचित्रांचंही स्वागत आहे. सदस्यांनी काढलेले आणि त्यांना आवडलेले फोटो, चित्रं, व्यंगचित्रं दिवाळी अंकात सामील करायला आम्ही उत्सुक आहोत. आपल्या अंकावर छापील अंकांवर असणारी पृष्ठमर्यादा नाही, हा आपल्या पथ्यावर पडणारा भाग. त्यामुळे तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणाऱ्या चित्रफिती, संवादफिती, संगीत, चलच्चित्रं, एकाहून अनेक शे‌वटांच्या शक्यता प्रत्यक्षात आणणारं ललित... अशा सगळ्याच प्रकारच्या साहित्याचं मन:पूर्वक स्वागत आहे.

शब्दांच्या जोडीला छायाचित्रं, रेखाचित्रं, रंगचित्रं असावीत, अशी इच्छा आहे; पण आपण चित्रकार / छायाचित्रकार नाही, म्हणून घोडं अडतं, अशी अडचण असेल तर मनमोकळेपणानं संपर्क साधा. समजा, लिखाण पूर्ण झालेलं नसलं, तरीही विषयाबाबत थोडी पूर्वकल्पना दिलीत, तर चित्रांचा अंदाजअंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल. लेख व कथांसाठी चित्रं रेखाटण्याची ज्यांची इच्छा असेल, अशा रेखाटनकारांना, चित्रकारांना आणि छायाचित्रकारांनाही आम्ही आग्रहाचं आमंत्रण देत आहोत.

आता अंकाच्या विशेष संकल्पनेबद्दल. दिवाळी अंकाच्या निमित्तानं काही विशिष्ट विषयांवर चर्चा घडावी असा आमचा प्रयत्न असतो. मात्र अंकाचा आवाका त्या संकल्पनेपुरताच मर्यादित असत नाही. अंकातील काही भाग ह्या विषयाला दिला जाईल. उर्वरित अंकात सर्व प्रकारचं आणि विषयांचं साहित्य असेलच.

संकल्पनेबद्दल -

ट्रम्प, मोदी आणि पुतीन सत्तेवर असलेल्या जगात आज आपण जगतोय. कुणाला त्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटतात, तर कुणाचा मस्तकशूळ त्यामुळे उठतो. ते काहीही असो, हे आपलं आजचं वास्तव आहे. हे वास्तव सेलेब्रिटी पुढाऱ्यांचं जसं आहे तसंच ते ब्रेक्झिटनंतरच्या काळातलं, म्हणजे जागतिकीकरणाचा उन्माद संपल्यानंतरचं आहे. माहितीचा महास्फोट, माध्यमांचं लोकशाहीकरण आणि आता 'बिग डेटा' वगैरेंनंतरच्या वास्तवात खरं काय आणि खोटं काय ह्याचा न्यायनिवाडा भल्याभल्यांना जिथे सहज करता येत नाही असं हे ‘पोस्ट-ट्रुथ’ वास्तवही आहे.

गेल्या काही शतकांत पाश्चात्त्य देशांनी जी लक्षणीय प्रगती केली त्यामागे त्यांच्या प्रबोधनकाळात रूढ झालेली मूल्यं होती असं मानतात. तर्कशुद्ध विवेकवादी वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्या मूल्यांचा महत्त्वाचा भाग होता. धर्माचं समाजकारणातलं आणि सत्ताकारणातलं निर्णायक स्थान बाद करून त्याला खाजगी व्यक्तिगत श्रद्धेपुरतं शिल्लक ठेवणं आणि धर्मनिरपेक्ष कल्याणकारी लोकशाहीद्वारे राज्यकारभार चालवणं हादेखील त्याचा एक भाग होता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्यांना राज्यव्यवहाराच्या आणि मानवी व्यवहाराच्या केंद्रस्थानी आणणं हे फ्रेंच राज्यक्रांतीचं एक फलित होतं. पाश्चात्त्यांनी साधलेली सामाजिक प्रगती, तंत्रज्ञानातली प्रगती आणि त्यांनी जगावर गाजवलेली सत्ता ह्या सगळ्या गोष्टी शक्य होण्यामागे ही मूल्यं होती असं सर्वसाधारणतः मानलं जातं. ब्रिटिशांपासून स्वतंत्र होताना आपणही आपल्या राज्यघटनेत मूलभूत मानवी हक्कांना स्थान दिलं; तसंच वैज्ञानिक विचारसरणीसाएंटिफिक टेंपर रुजवण्याबाबतचं मार्गदर्शक तत्त्वही घातलं. नंतर आपण धर्मनिरपेक्षतेचाही त्यात समावेश केला. आताच्या जगात मात्र ह्या मूल्यांना ग्राह्य धरण्यालाच हादरे बसू लागले आहेत.

पाश्चात्त्य विवेकवादी मूल्यांना डावलणाऱ्या तत्त्वप्रणाली किंवा राज्यव्यवस्था आधुनिक जगातून जरी पूर्णपणे नाहीशा कधीच झाल्या नव्हत्या, तरी आताआतापर्यंत त्यांचे विजय मात्र तात्पुरते ठरत होते आणि त्यातून पुन्हा विवेकवादी मूल्यांना बळकट करणाऱ्या संस्थात्मक व्यवस्था उभ्या राहायला चालना मिळत होती; किमान तसा विश्वास तरी वाटत होता. दुसरीकडे पौर्वात्यवाद (Orientalism) किंवा उत्तर-वसाहतवाद (Postcolonialism) यासारख्या तत्त्वविचारांनी पाश्चात्त्य प्रबोधनाविषयीच्या ह्या अर्थनिर्णयनाला विसाव्या शतकात छेदही दिला. तरीही, व्यवस्थात्मक पातळीवर पाश्चात्त्य मूल्यांना कमकुवत किंवा नेस्तनाबूत करू शकेल अशी कोणतीही नवी व्यवस्था त्यातून उभी राहू शकलेली नाही. त्यामुळेच सोव्हिएत रशिया आणि तिची अंकित राष्ट्रं कोलमडून पडल्यानंतर केवळ हीच एकमेव व्यवस्था शिल्लक आहे असं एकध्रुवीय चित्र निर्माण झालं. जागतिकीकरण त्यानंतर फोफावलं आणि त्यानं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे श्रमव्यवहार बदलले.

जागतिकीकरणामागच्या ध्येयधोरणांचे फायदे जगभरातल्या कॉर्पोरेट विश्वाला मिळाले तसेच ब्राझील, चीन आणि भारत यांसारख्या विकसनशील देशांनाही मिळाले. त्याचवेळी वैध-अवैध मार्गांनी मिळवलेल्या पैशाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांना आपल्या मर्जीनुसार नाचवणारा वर्गसुद्धा त्यातून अधिकच बळकट झाला. आज असं दिसत आहे की पाश्चात्त्य देशांतल्या सामान्य जनतेत मात्र त्या व्यवस्थेविषयी आता असमाधान आहे. त्यातून 'स्थानिक विरुद्ध बाहेरचे' असा संघर्ष अनेक देशांत उभा राहिला आहे. दुसरीकडे, भारतासारख्या देशांत त्यामुळे नवा मध्यमवर्ग उभा राहिला आणि त्याखालच्या स्तरात जगणाऱ्या सामान्य लोकांच्या आकांक्षाही वाढल्या. तरीही, उच्चशिक्षण घेतलं आणि भरपूर पगाराची नोकरी धरली तरी बदलत्या वातावरणात ती उद्या राहील ह्याची मात्र आज कोणतीच शाश्वती उरलेली नाही. उबेरच्या ड्रायव्हरपासून आयटी कर्मचाऱ्यापर्यंत सगळीकडे अस्थिरता ही आहेच. यश मिळालं तरी ते नक्की कशामुळे आणि ते टिकून ठेवण्यासाठी काय करावं लागेल हे अतिशय अनिश्चित आहे. "In the long run we are all dead" हे आजही खरं असलं तरी नव्या पिढीचा सुखाचा शोध मात्र अधिकाधिक क्षणिक आणि क्षणभंगुर सुख देणाऱ्या गोष्टींमागे धावण्यापुरता मर्यादित राहिला आहे. की उद्याची कसलीही शाश्वती नसलेल्या व्यवस्थेत आपल्या हातात फक्त 'आत्ता' आहे ही जाणीव त्याच्या मागे आहे?

विज्ञान-तंत्रज्ञानातले बदल पाश्चात्त्य देशांत आधी होत राहणार ही परंपरा अद्याप कायम राहिली आहे, पण आपल्यालाही ते आता लवकर अनुभवायला मिळू लागले आहेत. एकीकडे तंत्रज्ञान फोफावत असताना सत्याचा शोध घेण्याची चिकित्सक वृत्ती मात्र वाढताना दिसत नाही; उलट छद्मविज्ञान लोकांना रुचत आहे. ठळक उदाहरण म्हणजे ‘हवामान बदलतं आहे’ असा कंठरव शास्त्रज्ञ कितीही करत असले तरी भलेभले लोक त्याला प्रलयघंटानाद मानत आहेत. विचारवंत आणि विषयतज्ज्ञ यांच्याविषयीची तुच्छता सर्व क्षेत्रांत वाढत चालली आहे. उलट ‘बिग डेटा’ वापरून ‘शहाणे’ झालेले रोबॉट किंवा बॉट आपले नवे तज्ज्ञ होऊ घातले आहेत. आधुनिक तंत्र वापरून बहुसंख्यांवर गारुड घालणाऱ्या प्रचारकी वावड्यांच्या जोरावर जनता आपली मतं निश्चित करत आहे आणि आपले निर्णय घेते आहे. राज्यव्यवहार नीट चालण्यासाठी लोकशाहीची गरज आहे असंही आज अगदी पाश्चात्त्य देशातल्याही अनेकांना वाटत नाही.

ह्या सगळ्याचा सारांश सांगायचा, तर मनुष्याच्या विवेकी असण्यावरचा हा पाश्चात्त्य प्रबोधनकालीन विश्वास आता खोटा ठरतो आहे का? मोदी, ट्रम्प, ब्रेक्झिट, पोस्ट-ट्रुथ, बिग-डेटा असे सगळे मुद्दे एकत्रित पाहिले तर आपण एक प्रकारच्या inflection pointवर आहोत. सर्वसाधारण भाषेत सांगायचं तर हा संक्रमणाचा काळ आहे. पुढे जग नक्की कोणत्या दिशेनं जाईल ह्याविषयी नक्की सांगता येणंच कठीण आहे, पण मोठे बदल होऊ घातले आहेत असे संकेत मात्र मिळत आहेत.

ह्या वर्षीच्या ऐसी अक्षरे दिवाळी अंकात ह्या परिस्थितीचा वेगवेगळ्या अंगानं विचार करावा अशी आमची इच्छा आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कलात्मक, पर्यावरणीय, वैज्ञानिक, तत्त्वचिंतनात्मक अशा अनेकविध बाजूंनी त्याकडे पाहावं; त्याचप्रमाणे एक सामान्य नागरिक म्हणून जगताना तुम्हाला ह्याच्याशी कसं भिडावं लागतं हे जाणून घेण्यातही आम्हाला रस आहे.

या दिवाळी अंकासाठी ऐसीकरांकडून उदंड आणि दर्जेदार लेखन येवो ही सदिच्छा.

दिवाळी अंकासाठी भरपूर आणि विविध लेखन पाठवा. खास संकल्पनेबद्दल लिहा, पण संकल्पनाबाह्यही लिहा. तेव्हा विषयाचं बंधन आहे असं कृपया समजू नका. तुमचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो आहोत.

कालमर्यादा - १५ सप्टेंबर २०१७
लिखाण 'ऐसी अक्षरे'ला व्यक्तिगत निरोपाने किंवा aisiakshare@gmail.com या इमेलपत्त्यावर पाठवावं.

लेखन लवकरात लवकर पाठवावं ही विनंती.

जयदीप चिपलकट्टी Mon, 10/07/2017 - 19:01

> दिवाळी अंक हा या प्रयत्नांचाच एक वैशिष्ट्यपूर्ण भाग. गेल्या अंकांत सरस लिखाण आलं, …

तसं असेल तर गेल्या दिवाळी अंकांच्या लिंक्स कुठे आहेत?

जयदीप चिपलकट्टी Mon, 10/07/2017 - 19:44

(१) वरच्या पट्टीवर ‘ऐसी अक्षरे विशेषांक’ आणि ‘विशेषांक’ अशा दोन लिंक्स दिसताहेत. स्टारबक्समध्ये ‘चाय टी’ आणि ‘टी’ असे वेगवेगळे प्रकार मिळतात तसं काही हे आहे का?
(२) ह्यापैकी ‘विशेषांक’ ही लिंक २०१२-दिवाळी अंकाची दिसते आहे. पण त्यातले सगळे लेख तिथे आहेत असं वाटत नाही. उदा. २०१२-दिवाळी अंकात मी जो लेख लिहिला होता तो उडवलेला दिसतो आहे.
(३) ‘ऐसी अक्षरे विशेषांक’ वर गेलं तर एक अनुक्रमणिका दिसते पण तिथे काहीच नाही. शिवाय ‘पोर्नोग्राफी विशेषांक’, ‘भा.रा. भागवत विशेषांक’ ह्यांच्या लिंक्स सापडल्या नाहीत.
(४) २०१४, २०१५-दिवाळी अंकांच्या लिंक्स सापडल्या नाहीत.

संस्थळावर येणाऱ्या माणसाला एखादी गोष्ट पटकन सापडली तरच ती तो पाहील. एकदा दृष्टीआड गेली की ती नसल्यासारखीच असते. इतके कष्ट घेऊन केलेल्या लिखाणाचा असा बोजवारा उडणार असेल तर नवीन अंक कशासाठी काढायचे?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/07/2017 - 20:29

In reply to by जयदीप चिपलकट्टी

अपग्रेडनंतर काही गोष्टी हरवल्या आहेत. त्या नष्ट झालेल्या नाहीत. ते सगळं दुरुस्त करायला सुरुवात केलेली आहे; पण थोडा वेळ लागेल. त्याबद्दल क्षमस्व.

---

उजव्या बाजूच्या स्तंभात सर्व विशेषांकांचे दुवे आता दिसत असावेत. तसदीबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व.

अस्वल Tue, 11/07/2017 - 10:32

बाबौ,
विष‌य‌ पाहून‌ थोडा घाबर‌लो- खोटां क‌शाला बोलाय‌चा?
म‌ला त‌र‌ न‌क्की स‌ंक‌ल्प‌ना काय‌ आहे ते क‌ळल‌ं अस‌ं अजून‌ वाट‌त‌ नाही - हेच‌ ते पोस्ट‌ ट्रूथ‌ ज‌ग‌ की काय‌?

असो, प्र‌य‌त्न‌ केला जाईल‌ अस‌ं स‌ध्या त‌री वाट‌त‌ं आहे...

राजेश घासकडवी Tue, 11/07/2017 - 21:12

In reply to by अस्वल

मग पोस्ट ट्रुथ या शब्दाचीच वाटणारी भीती, किंबहुना आपण कुठल्या प्रकारच्या जगात राहातोय याबद्दल माहिती नसण्याचा गंड यावर खास अस्वली शैलीत लिहू शकता. नव्हे, लिहाच्च.

मिहिर Tue, 11/07/2017 - 21:23

घासूगुर्जींचा लेख वाचायला आवडेल. 'अच्छे दिन आ रहे है' ह्या कथनाचं काय झालं, होतंय ह्याबद्दल, तसंच

ठळक उदाहरण म्हणजे ‘हवामान बदलतं आहे’ असा कंठरव शास्त्रज्ञ कितीही करत असले तरी भलेभले लोक त्याला प्रलयघंटानाद मानत आहेत.

ह्याबद्दलही.

जयदीप चिपलकट्टी Wed, 12/07/2017 - 01:52

> सर्वसाधारण भाषेत सांगायचं तर हा संक्रमणाचा काळ आहे. 

‘सध्या संक्रमणाचा काळ नाही बरं का!’ असा कालखंड गेल्या दहा हजार वर्षांत केव्हा येऊन गेला होता? मला तरी एकही उदाहरण आठवत नाही.

नंदन Wed, 12/07/2017 - 03:28

In reply to by जयदीप चिपलकट्टी

‘सध्या संक्रमणाचा काळ नाही बरं का!’ असा कालखंड गेल्या दहा हजार वर्षांत केव्हा येऊन गेला होता? मला तरी एकही उदाहरण आठवत नाही.

हे आठ‌व‌लं:
It was the best of times, it was the worst of times, it was the age of wisdom, it was the age of foolishness, it was the epoch of belief, it was the epoch of incredulity, it was the season of Light, it was the season of Darkness, it was the spring of hope, it was the winter of despair, we had everything before us, we had nothing before us, we were all going direct to Heaven, we were all going direct the other way – in short, the period was so far like the present period, that some of its noisiest authorities insisted on its being received, for good or for evil, in the superlative degree of comparison only.

अर्थात‌, दिवाळी अंकाची संद‌र्भ‌चौक‌ट ल‌क्षात‌ घेत‌ली त‌र‌ त्यात‌ काही वाव‌ग‌ं आहे असं वाट‌त‌ नाही.

राजेश घासकडवी Wed, 12/07/2017 - 17:05

In reply to by जयदीप चिपलकट्टी

पण सध्याचं संक्रमण वेगळं आहे बरं का... असंही म्हणण्याची किमान शेकडो वर्षांची तरी परंपरा आहेच की.

पोस्टट ट्रुथ वगैरे भंपकपणा आहे, हे प्रकर्ण पूर्वीपासूनच चालू आहे, असं गंभीरपणे किंवा विनोदीपणे म्हणणारं लेखन, व्यंगचित्रं, कविता, व्हीडियो, इन्स्टोलेशन, किंवा लेखनाचा व्हीडियो, व्यंगचित्रांचं पॊडकास्ट, किंवा कवितांचं इन्सटोलेशन असं काहीही चालेल.

१४टॅन Wed, 02/08/2017 - 15:26

माँडळाला विचारायचं होतं-
लिखाण कितपत सेन्सॉर्ड पाहिजे? पशुपक्ष्यांची (!) नावं घ्यावीत का? त्यावरच सटायरछाप थोडं असेल तर कारवाई होऊ शकते का? ऑफेंड होणारे लोक्स असतील आणि डुआयडीने लिखाण पाठवलं तर ओळख लपवली जाईल का?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/08/2017 - 21:00

In reply to by १४टॅन

लिखाण कितपत सेन्सॉर्ड पाहिजे?

ऐसीवर आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार नाही - थोडक्यात मानहानीकारक दावे करता येतील असं लेखन छापलं जाणार नाही. व्यक्तिगत अपमानव्यंजक लेखन टाळावं. पण भावना दुखावण्याबद्दल ऐसीची कोणतीही अधिकृत भूमिका नाही.

पशुपक्ष्यांची (!) नावं घ्यावीत का? त्यावरच सटायरछाप थोडं असेल तर कारवाई होऊ शकते का?

म्हणजे 'चिनी द पूह' छापाचं? निश्चितच चालेल. विनोदावर अजिबात आक्षेप नाही.

ऑफेंड होणारे लोक्स असतील आणि डुआयडीने लिखाण पाठवलं तर ओळख लपवली जाईल का?

लेखन चांगलं असेल तर छापलं जाईल. लेखन कोणी केलेलं आहे यापेक्षा लेखनाचा दर्जा महत्त्वाचा. गेल्या काही दिवाळी अंकांमध्ये डुआयडींच्या नावानं आलेलं चांगलं लेखन छापलं गेलं आहे.

१४टॅन Wed, 02/08/2017 - 22:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गायी, सावरकर, काही संघटना ह्यांच्यावर लिहीलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर मला भीतीही वाटतेय थेट लिहायची. म्हणून प्रतिक्रियाप्रपंच.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/08/2017 - 22:40

In reply to by १४टॅन

असं जाहीर लिहून तुम्ही डुआयडीची गरजच नष्ट करत आहात. (तुम्ही अमेरिकेत राहता ना? मग कोणाची भीती? भारताबाहेर नसलात तर मग भीती वाटण्याबद्दल नो कॉमेंट.)

लेखन जरूर पाठवा.

१४टॅन Wed, 02/08/2017 - 23:18

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी भारताबाहेर पाऊलही टाकलं नाहीये आजपर्यंत.

तुम्ही अमेरिकेत राहता ना?

कौन फैला रहा है ये अफवाएं?
अमेरिकेत असतो तर आत्ताप्रेंत लेख आलाही असता ऐसीच्या व्यनित. मुंबईतला प्रवास अर्धा वेळ खातो लिहीण्याचा.

संपा: च्यामारी, विनोदी श्रेणी? सारकॅझम नॉट इंटेंडेड. खरंच जन्मकर्म भारतभूमी आत्तापर्यंत.

भांबड Thu, 03/08/2017 - 13:02

In reply to by गौराक्का

[थट्टा मोड]म्हणजे अक्का तुम्हाला असं म्हणायचंय का कि अनुतैचा फॅन फॅन म्हणून हे आपल्याच डू आयडी ची भलावण करत आहेत?? अं अं [/थट्टा मोड]

गौराक्का Thu, 03/08/2017 - 20:08

In reply to by भांबड

असु शकतं ... :)
नाई तरी अनु तै एकदम ज्यास्त आवडणारं ते एकच पात्र आहे...

अबापट Fri, 04/08/2017 - 13:19

In reply to by गौराक्का

नाही मला नाही वाटत की अनुतै स्वतःच लिहीत असतील असं ..
कारण
लिहिण्याची स्टाईल आणि विषय आणि सवयी फार वेगळ्या वाटतात.
अनुताई शास्त्रीय गाणार , फॉर टॅन पार हेवी मेटल वर पण बोलणार
शिवाय फॉर टॅन हे स्मोकर असावेत ( माझ्यासारखे ) असे वाटते , अनुताई एवढ्या रॅडिकल अजून झाल्या असाव्यात असे वाटत नाही .
शिवाय फॉर टॅन ना मुंबय लोकल ची पडलीय तर अनुताईंना पौड फाट्याच्या दिव्यांची .
त्यामुळे नाय इ वाटत .

अर्थात एकाच वेळी हे सगळं आणि इतरही काही खरं असेल तर ........................
हे दोन्ही आयडी मनोबाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही ...:) :)

१४टॅन Sat, 05/08/2017 - 09:49

In reply to by अबापट

अनुरावांची माझी तुलना होणं, किंबहुना अनुराव हा माझा किंवा १४टॅन हा अनुरावांचा डुआयडी असल्याचा तुम्हाला संशय येणं हे माझे परमभाग्य...!!

शिवाय फॉर टॅन हे स्मोकर असावेत ( माझ्यासारखे )

हे का वाटलं बाकी तुम्हाला? मी पूर्ण निर्व्यसनी आहे. मैं गंगा की तरह पवित्र हूं.

अबापट Fri, 04/08/2017 - 13:48

आवाहन आत्ता नीट वाचलं .. फार छान लिहिलंय .. कोणी लिहिलंय कळू शकेल का ?

मला हा दिवाळी अंक वाचण्यात फार म्हणजे फारच इंटरेस्ट निर्माण झालाय .. थोर थोर मंडळी काय मांडत आहेत हे वाचण्यात फार इंटरेस्ट आलाय .

ग्लोबल वॉर्मिंग बद्दल लिहिलं आहेत तसाच जगभर पर्यावरण या विषयावर होत असलेला वैचारिक बदल ( विशेषतः नवीन सत्ताधाऱ्यांकडून ) हा मला फार इंटरेस्टिंग वाटतो , त्यावर कोणी लिहिणार का ?

शिवाय नवीन सत्ताधाऱ्यांचा ( इथे मी फक्त भारतापुरते मर्यदित ठेवत नाहीये ) "आम्हालाच सगळं माहितीय काय बरोबर काय चूक ते "हा अहंगंड किती घातक ठरणार , यात सायन्स , ते समाजशास्त्र ते पर्यावरण सगळंच आलं , यावर कोणी लिहिणार का ( पोस्ट स्क्रिप्ट असं आहे कि , पूर्वीचे सत्ताधारी काही फार पुढारलेले , लिबरल , तज्ञ् वगैरे नव्हते , पण निदान स्वतःचे व्हेस्टेड इंटरेस्ट जिथे नाहीत तिथे तरी निदान त्यांचे 'जाऊ दे 'या पद्धतीने केलेले दुर्लक्ष हे बऱ्याच गोष्टी नष्ट न व्हायला /टिकायला कारणीभूत ठरल्या असाव्यात ( का ? ) उदाहरणे म्हणजे जगभर कमी होणारे सायन्स चे फंडिंग ( त्याचा काय उपयोग ) किंवा पर्यावरण विषयक संवेदनशीलता ( घाला रे हायवे तिथून मधून , काय होत नाय,हे अगदी साधे उदाहरण वगैरे )

"यश मिळालं तरी ते नक्की कशामुळे आणि ते टिकून ठेवण्यासाठी काय करावं लागेल हे अतिशय अनिश्चित आहे."
फार फार थोर वाक्य आहे हे !!!

"त्याचवेळी वैध-अवैध मार्गांनी मिळवलेल्या पैशाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांना आपल्या मर्जीनुसार नाचवणारा वर्गसुद्धा त्यातून अधिकच बळकट झाला. "
हे फार सनातन सत्य आहे असे वाटत नाही का ? कधी नव्हतं हे ?
बा द वे , संपादक कोण आहेत ?

ग्लोबल वॉर्मिंग बद्दल लिहिलं आहेत तसाच जगभर पर्यावरण या विषयावर होत असलेला वैचारिक बदल ( विशेषतः नवीन सत्ताधाऱ्यांकडून ) हा मला फार इंटरेस्टिंग वाटतो , त्यावर कोणी लिहिणार का ?

तुम्ही!

अबापट Fri, 04/08/2017 - 14:14

In reply to by आदूबाळ

आबा ,
का गरीबाची चेष्टा मांडलीय ..
कारण :
१. स्वतःला जे वास्तव माहितीय त्याच्या मर्यादांची जाणीव आहे . उगा आपल्याला माहितीय तेच अंतिम सत्य वगैरे ... जाऊ दे ..
२. लिहिता येत असतं तर बालिष्टर ... वगैरे ..
आपण संपादक आहात हे जाणून आणंद जाहला ..
बाकी आपण सध्या स्पष्ट स्टॅन्ड जाहीर मांडू लागला आहात याचा डब्बल आणंद झाला आहे !!

ॲमी Sat, 21/10/2017 - 06:42

काही सदस्यांनी 'ऐसी अक्षरे'ला आर्थिक मदत देऊ केली होती; इतरांनाही यात हातभार लावण्याची इच्छा असल्यास व्यक्तिगत निरोपातून स्वतंत्र संपर्क करूच >> तिन्ही मालकांखेरीज इतरकोणी आर्थिक मदत केली आहे का या दिवाळीअंकासाठी??