साहित्यातून नव्या वास्तवाच्या प्रेरणा

नवं वास्तव उत्पल संकल्पना नव्वदोत्तरी

साहित्यातून नव्या वास्तवाच्या प्रेरणा

लेखक - उत्पल

साहित्यातून 'जे अनुभवलेलं वास्तव आहे', 'जे वास्तव असू शकेल' आणि 'जे कल्पनेतलं वास्तव आहे'; त्याचं 'सर्जनशील चित्र' उमटत असतं. साहित्यकृतीच्या मुळाशी वास्तवातून निघालेले अनेक धागे, माणसांचे मनोव्यापार कलात्मकरीत्या गुंतलेले असतात. वास्तवाचं अस्तर असलेली, वास्तव वाटतील अशा व्यक्तिरेखांनी बनलेली, वास्तवातील 'नाट्य' प्रत्ययकारी पद्धतीने चितारणारी, दुर्लक्षित वास्तवाकडे लक्ष वेधणारी, त्यावर भाष्य करणारी आणि महत्त्वाचं म्हणजे वाचकाला अतिशय तीव्र स्वरूपाचा अनुभव देणारी लिखित स्वरूपातील कलाकृती म्हणजे साहित्य असं आपल्याला म्हणता येईल. जशा इतर बाबतीत असतात, तशाच वास्तवाच्या बाबतीतही नवीन-जुनं या संज्ञा अखेरीस सापेक्ष आहेत. त्यामुळे जे मी आजूबाजूला पाहतो आहे ते मला 'जुनं' वाटलं, तरी काहींना ते तसं वाटणार नाही याची जाणीव मला ठेवावी लागते. माझ्या विचारांचा रोख कोणत्या दिशेला आहे हेही मला स्पष्ट करावं लागतं. नवीन-जुन्याच्या वादात 'व्यक्ती आणि व्यवस्था', 'व्यक्ती आणि समूह' हे मुद्दे कायमच केंद्रस्थानी राहिले आहेत. व्यक्तिवादी विचारांच्या उदयाने व्यवस्थेचे प्रश्न तीव्र होतात असा साधारण अनुभव सर्वच समाजांमध्ये आलेला आढळेल. मी जेव्हा नवं वास्तव म्हणतो, तेव्हा मला 'व्यक्तीवादी आणि समाजकेंद्री' विचारातून निर्माण झालेली व्यवस्था आणि या व्यवस्थेचे प्रश्न यांची माडणी अपेक्षित आहे.

या संदर्भात मे. पुं. रेगे यांच्या एका मताचा आधार घेत पुढं जाऊ. 'हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन' या आपल्या पुस्तकात रेगे लिहितात की माणसाच्या स्वातंत्र्याचा, व्यक्तीच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचा उद्घोष आधुनिक काळात प्रथम धार्मिक क्षेत्रात झाला. ख्रिस्ती धर्मग्रंथाचा - बायबलचा - अर्थ लावण्याचा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला अधिकार आहे असं मार्टिन ल्यूथर किंग यांनी जाहीर केलं. परंपरेनुसार हा अधिकार चर्चचा होता. या टिप्पणीच्या अगोदर ते म्हणतात की एखादं मानवी मूल्य विशिष्ट कालखंडात माणसांच्या जाणिवेत उदयाला येऊन स्थिर का होतं याची कारणमीमांसा करणं सोपं नाही. रेग्यांचं पहिलं मत एका सर्वंकष सामाजिक दृष्टीने मान्य होईल असंच आहे. पण 'स्वयंनिर्णया'चा विचार करता अनेक लहान-मोठ्या बाबींमध्ये हा अधिकार व्यक्तींनी मिळवला होता असंही दिसून येऊ शकेल. व्यक्तींच्या इच्छा-आकांक्षा आज जितक्या प्रमाणात वाढल्या आहेत, तितक्याच प्रमाणात त्या शंभर वर्षांपूर्वी अस्तित्वात नसल्या तरी स्थल-काल सापेक्ष अशा काही इच्छांसाठी, व्यक्तिगत आयुष्याच्या संदर्भात निर्णयाचं स्वातंत्र्य निदान काही प्रमाणात काही व्यक्तींनी तरी मिळवलं होतं असं म्हणता येईल. या मुद्द्यावर वेगळी चर्चा संभवू शकेल, पण मला रेग्यांच्या आधीच्या मुद्द्यावर विचार करावासा वाटतो.

एखादं मानवी मूल्य विशिष्ट कालखंडात माणसांच्या जाणिवेत उदयाला येऊन स्थिर का होतं? मला एक विशिष्ट जाणीव मूल्य म्हणून का स्वीकारावीशी वाटते? मला व्यक्तिवादातून नवं वास्तव उभं करावंसं का वाटतं? मला असं वाटतं की हा प्रश्न माणसाच्या स्वयंप्रज्ञेशी जोडलेला आहे. माणूस स्वयंप्रज्ञेनेच अनेक निर्णय घेतो. माणसाचा इतिहास कितीही गुंतागुंतीचा असला आणि माणसाची असहायता, पराधीनता हीसुद्धा परिस्थितीने ओढवलेली अनिवार्यता म्हणून 'अटळ' वाटत असली तरी माणसाने (आणि परिणामत: व्यवस्थेने) पुढचं पाऊल हे स्वयंप्रज्ञेच्या बळावर टाकलं आहे. आपली पराधीनता तो कमी करू शकला आहे. व्यवस्थेतून व्यवस्था निर्माण होत नाही. ते फक्त एकटा माणूस किंवा माणसांचा गट करू शकतो. अमुक व्यवस्थेत काही माणसं सुखी आणि काही इतर दु:खी आहेत, ती सुखी व्हायची असतील तर व्यवस्था जे वर्तन काही जणांच्या बाबतीत करते, तेच वर्तन या इतर काहींच्या बाबतीत केलं पाहिजे - म्हणजेच 'न्याय' झाला पाहिजे हे कुणाला तरी वाटलं आणि न्यायासाठी झगडा सुरू झाला. समता आणि स्वातंत्र्य या मूल्यांसाठीच्या संघर्षाचा उगमही व्यक्तीनेच सुरू केला आहे. स्वयंप्रज्ञा कुणात कशी येते हा आणखी एक वेगळा मुद्दा, पण तिच्या बळावरच माणूस नवं काही मांडू शकतो.

जाणिवेत एखादं मूल्य उदयाला येणं ही भवतालाला दिलेली प्रतिक्रियाही असते. अशा क्रिया-प्रतिक्रियांमधूनच व्यवस्था आकार घेत असते. लेखनाकडेही आपल्याला प्रतिक्रिया म्हणून पाहता येतंच. माणूस-माणूस, माणूस-व्यवस्था आणि व्यवस्था-व्यवस्था यांतील आंतरिक संबंधांबाबत, संघर्षांबाबत लेखकाला आपलं एक विधान करायचं असतं. ही चांगल्या लेखनाची पूर्वअट असलीच पाहिजे असं नाही. पण लेखक जे मांडतो ते या तीनपैकी एखाद्या विभागात बसतंच. ज्यात संघर्षाचा मुद्दा नाही अशी एखादी सुंदर निसर्गवर्णनात्मक कवितादेखील 'निसर्ग' या व्यवस्थेतील काही घटकांमुळे माणसाच्या मनात जे होतं याकडे निर्देश करतेच. बालकवींच्या कविता आपण वाचतो तेव्हा निसर्गाला 'माणूसपण' दिल्याचं आपल्या लक्षात येतं. औदुंबर जळात 'पाय टाकुनी' बसतो, 'निर्झरास' या कवितेत बालकवी निर्झराला 'नीज सुखे क्षणभर बाळ' असं म्हणतात, फुलराणीचं तर लग्नच लागतं ! लेखक-कवी चराचराला 'आपलं' मानून त्याच्याशी बोलत असतो. त्यातले अंतर्विरोध दाखवतो, संघर्ष समोर आणतो, त्यात गुंतलेल्या माणसांची गोष्ट सांगतो. पण हे करत असताना लेखक त्याच्या कृतीतून, म्हणजेच लेखनातून, नवं वास्तव उभारू शकतो का? मराठी साहित्यात तसं झालं आहे का?

इथे काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे. मी साहित्य रसिक असलो तरी साहित्याचा विद्याशाखीय अभ्यासक नाही. माझं वाचनदेखील माझ्या मर्यादेत आहे. त्यामुळे माझ्या आकलनाला मर्यादा आहेतच. दुसरं म्हणजे लेखनातून नवं वास्तव रचलं जावं ही एक अपेक्षा आहे. मुळात लेखक ज्याने 'ट्रिगर' होतो त्यावरच त्यानं लिहावं. त्याने अमुकच दृष्टीकोनातून लिहावं असा आग्रह नाहीच. परंतु ज्याप्रमाणे एखादा शास्त्रज्ञ दीर्घ प्रयोगानंतर एखादा शोध लावतो आणि तो शोध वस्तुरूपात जेव्हा समाजात पसरतो तेव्हा वास्तवाविषयीचं आपलं आकलन बदलतं. म्हणजेच आपल्यासाठी नवं वास्तव उभं होतं. त्याप्रमाणे लेखक आपल्या प्रतिभेच्या बळावर एका वेगळ्या वास्तवाची उभारणी करू शकतो असं मला वाटतं. आणि हे वेगळं वास्तव अगदी एका व्यक्तीच्या आयुष्यापुरतं मर्यादित असू शकतं.

नवीन वास्तव म्हणताना माझा रोख व्यक्तिवादी विचारधारेतून दोन व्यक्तींमधील नातं, कुटुंबसंस्था, लग्नसंस्था, सहजीवनाचे पर्याय, उत्पादनपद्धती, विनिमय, जीवनशैली, गरजांचं नियमन, मूल्यविचार अशा सगळ्याच गोष्टींकडे पाहण्याकडे आहे. अर्थात यातील प्रत्येक विषयाचा आवाका खूपच मोठा आहे आणि त्यावरील चर्चा स्वतंत्रपणेच व्हायला हवी. ती मुळात एक लांबवर चालणारी प्रक्रिया आहे. विशिष्ट क्षेत्राची जाण असलेल्या लेखकाला त्या त्या क्षेत्राबाबत नवी मांडणी करता येईल. व्यक्तिशः मला व्यक्ती आणि व्यवस्था या संघर्षाविषयी आस्था आहे. त्यामुळे या केंद्रीय मुद्द्याच्या आधारे मी व्यक्तींमधील नातं, कुटुंबसंस्था, सहजीवन अशा काही मुद्द्यांबाबत काही सांगू इच्छितो.

'टू द फ्रेंड्स' या माझ्या एका कवितेतून मी अमेरिकन टेलिव्हिजनवरील 'फ्रेंड्स' या अत्यंत लोकप्रिय मालिकेच्या आधारे 'नात्यांच्या व्यवस्थेत' मला जो फरक जाणवला त्याकडे लक्ष वेधायचा प्रयत्न केला आहे. 'सायलेंट मोडमधल्या कविता' या माझ्या संग्रहात ही कविता समाविष्ट केली आहे. अमेरिकन समाज, अमेरिकन साम्राज्यवाद आणि अमेरिकेची उपभोग संस्कृती याविषयी पुष्कळ चर्चा सुरु असते आणि मी स्वत: डावीकडे झुकणारा असल्याने अमेरिका हे एक मोठं प्रश्नचिन्ह माझ्यासाठीही आहेच. पण तरीही या मालिकेतून मला अमेरिकन समाजातील सहा मित्र-मैत्रिणी आणि त्यांचं जग याचं जे दर्शन घडलं ते आकर्षून घेणारं होतं. मुख्य म्हणजे एकमेकांच्या भावनिक, लैंगिक, बौद्धिक गरजांविषयी असलेली त्यांची समज मला महत्वाची वाटली. प्रत्येकाचं स्वातंत्र्य इतरांनी जपायचं आणि त्याबरोबर मानवी संबंधांमध्ये जी मूल्ये अनुल्लंघनीय आहेत त्याचीही जपणूक प्रत्येकानं करायची असा एक आश्वासक मेळ इथे मला दिसला. तुमच्यापैकी काहींनी ही मालिका नक्कीच पाहिली असेल. 'फ्रेंड्स'च्या बरोबरीची, किंबहुना 'फ्रेंड्स'च्या पुढचं पाऊल असणारी, मला अतिशय आवडणारी आणखी एक मालिका म्हणजे 'मॉडर्न फॅमिली'. आपलं शीर्षक सार्थ करणारी ही मालिका आहे. तीन सर्वस्वी भिन्न प्रकृतीच्या कुटुंबांची ही एकत्रित कथा आहे. एक पन्नाशी - साठीतला पुरुष, त्याची तरुण 'हॉट' बायको व तिच्या पहिल्या नवऱ्यापासूनचा किशोरवयीन मुलगा, या पुरुषाची मुलगी - तिचा नवरा व त्यांची तीन मुलं आणि या पुरुषाचा मुलगा - जो गे आहे, त्याचा पार्टनर आणि त्यांनी दत्तक घेतलेली एक छोटी मुलगी अशी ही कुटुंबे आहेत. या कुटुंबांमधले व्यवहार, ताण हे सगळं बघताना त्यांनी व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करत उभी केलेली कुटुंबव्यवस्था मला खिळवून ठेवणारी होती.

एक महत्त्वाचं सांगायला हवं ते म्हणजे 'फ्रेंड्स' काय किंवा 'मॉडर्न फॅमिली' काय - यातली माणसंही माणसंच आहेत आणि माणसांतले विकार त्यांच्यातही आहेत. त्यामुळे कधीकधी 'पझेसिव्ह' होणं, अपेक्षांच्या टकरीत मनं दुखावली जाणं हे सगळं त्यांच्याबाबतीत होतं. पण मगाशी म्हटलं तसं मला आश्वासक वाटलं ते स्वातंत्र्याला केंद्रस्थानी ठेवूनही कुटुंबसंस्था जिवंत ठेवण्यात त्यांना आलेलं यश. अमेरिकेत कुटुंबसंस्था मोडकळीस आली आहे असं मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. त्यात तथ्य नसेलच असं नाही. पण तिथे एकही आनंदी कुटुंब नसेल असं मला वाटत नाही. या मालिकांमधून मला दिसलेली कुटुंब तरी मी पाहिलेल्या भारतीय कुटुंबांपेक्षा नक्कीच प्रगल्भ आहेत. आपल्याकडे संवाद कौशल्याचा जो अभाव दिसतो तो तिथे मला दिसला नाही. आपल्याला जे वाटतंय ते शब्दरूपात मांडायची हातोटी आपण लहानपणापासून का शिकवत नाही असा मला प्रश्न पडतो. त्यादृष्टीने या मालिकांमधील मुलं कशी बोलतात, पालक मुलांशी कसं वागतात आणि लहान आहे म्हणून त्यांची काळजी घेतात पण त्यांना गृहीत कसं धरत नाहीत हे पाहण्यासारखं आहे.

लैंगिकतेबाबत कमालीची मोकळीक व समज हा आणखी एक मुद्दा. मला अमेरिकन मालिका बघत असताना त्यांची लैंगिकतेबाबतची जाण आणि या विषयाकडे निकोपपणे, बरेचदा तर दर्जेदार विनोदी दृष्टीने बघायची सवय नेहमी आवडत आलेली आहे. प्रत्येक समाजात बदलांचं एक चक्र असतं आणि त्यानुसार कधी ना कधी बदल घडतच असतात. त्यामुळे शंभर वर्षांपूर्वीच्या भारतीय समाजाची लैंगिकतेविषयीची जाण आणि आजची समज यात तिळमात्रही फरक पडला नाही असं म्हणणं चुकीचं होईल. पण आजचं भारतीय समाजातलं चित्र पाहिलं तरी लैंगिकतेबाबत आपण समाज म्हणून प्रगल्भ आहोत असं म्हणता येत नाही हे आपण सगळेच मान्य करू. (सामाजिक वर्तनाचे इतर काही आविष्कार पाहिले तरी आपण फारसे प्रगल्भ नाही हे दिसेल.) अर्थात मी वर जे म्हणतो आहे ते अमेरिकन मालिकेत दिसणारं चित्र आहे, प्रत्यक्षातल नाही. प्रत्यक्षातलं चित्र काय आहे यावरही चर्चा होऊ शकते. परंतु प्रत्यक्षातला काही अंश तरी त्यात असणार असं मला वाटतं. दुसरं एक म्हणजे लग्नसंस्थेविषयीची आस्था, लग्न करावंसं वाटणं याही गोष्टीही मला अमेरिकन मालिकांमधून दिसल्या. लग्न ही एक महत्वाची पायरी, महत्वाचा आणि गांभीर्याने घ्यायचा विषय आहे असं दिसलं. लग्नानंतर एकनिष्ठ राहावं हाही आग्रह दिसला. पण म्हणून घटस्फोट वाईट आहे असं नाही दिसलं. लग्न करण्याचा निर्णयही ओळख, मैत्री, गप्पा, लैंगिक समाधान, मग एकत्र राहाणं आणि शेवटी लग्न अशा योग्य टप्प्यांनी होताना दिसला. एकूणात संस्कार-विचारापेक्षा व्यवस्था-विचार प्रभावी दिसला. 'फ्रेंड्स' या मालिकेबाबतची निरीक्षणं कवितेत सविस्तर आलीच आहेत.

मला ज्याप्रकारे नव्या वास्तवाची मांडणी व्हावी असं वाटतं त्यात अडचण कशी येते ते सांगायचा प्रयत्न करतो. मिलिंद बोकिलांची 'समुद्र' ही छोटी कादंबरी मी वाचली. आपल्या बायकोचा दुसऱ्या पुरुषाशी संबंध आला हे कळल्यावर या नवरा – बायकोत 'जो संघर्ष होतो त्याचं वर्णन कादंबरीत आलं आहे. आता माझी गोची अशी होते की लग्नानंतर माझ्या बायकोला दुसरा पुरुष कधीच का हवासा वाटत नाही असा मला प्रश्न पडतो आहे. तिला एखादा पुरुष आवडावा आणि तिने चार दिवस त्याच्याबरोबर घालवावे अशी माझी मुळातच अपेक्षा आहे. त्यामुळे माझ्याबाबतीत संघर्षबिंदू पुढे सरकलाय. एका पुरुषाला दोन स्त्रिया किंवा एका स्त्रीला दोन पुरुष हवेसे वाटूच शकतात अशी माझी धारणा असल्यावर बऱ्याच गोष्टी निकालात निघतात. मुख्य म्हणजे 'तुझा कंटाळा आलाय म्हणून मला दुसरं कोणी आवडू लागलंय' असंही नाही. 'तुझ्या - माझ्यातलं प्रेम आहे तसंच आहे, पण तरी मला आणखी कुणीतरी आवडतंय' अशी निकोप, आरोग्यपूर्ण परिस्थिती संभवूच शकत नाही का?

नवीन वास्तवाच्या बाबतीत मला नेमकं हेच म्हणायचं आहे. आपण प्रेमाला, लैंगिक आकर्षणाला व्यवस्थित मार्गावरून नेऊ शकतो का? आपण मल्टीपल रिलेशन्सची चांगली व्यवस्था लावू शकतो का? त्यातून कोणते प्रश्न उभे राहू शकतात? ते आपण कसे सोडवणार? व्यक्तीच्या ऊर्मी, व्यक्तीचं स्वातंत्र्य, त्याची सौंदर्यासक्ती, नव्या अनुभवाची ओढ आणि या सगळ्याला पुरुन उरणारा व्यवस्थेचा, समाजधारणेचा प्रश्न यांची सांगड आपण कशी घालणार? असे काही प्रश्न उभे राहतात आणि हे प्रश्न लेखनातून हाताळले जावेत असं मला वाटतं. मानवी संबंध, सहजीवन याबरोबरच मघाशी उल्लेख केलेल्या अनेक विषयांबाबत हा परीघ विस्तारता येईल. उद्योग, आर्थिक रचना, उत्पादन पद्धती याबाबतही नवं वास्तव लेखनातून मांडता येईल का हा विचार होऊ शकतो. (डाव्या विचाराने आणि जनआंदोलनांनी ते सातत्याने केलं आहे). प्रस्तुत विषयाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांची 'खेळघर' ही कादंबरी आठवते. 'कम्यून लिव्हिंग'चे प्रारूप त्यांनी या कादंबरीतून मांडले आहे. मला स्वत:ला 'उंबरठा' चित्रपटाचा पुढचा भाग यावा असं नेहमी वाटतं. ज्याक्षणी सुलभा महाजन घर सोडते तो क्षण एका नव्या व्यवस्थेची नांदी ठरू शकतो. ती पुढे कोणता मार्ग निवडते, व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात तिला काय आव्हाने येतात, ती नात्यांच्या नव्या व्यवस्थेत प्रवेश करते का याबद्दल काही मांडलं जाऊ शकतं.

गंमत अशी आहे की आजच्या वास्तवात सहजीवनाचे वेगळे प्रयोग केलेली, लग्नासारख्या एका साच्यातल्या प्रारुपाच्या बाहेरच्या प्रारूपांचा विचार केलेली मंडळी प्रत्यक्षात आपल्याला माहितदेखील असतात. पण साहित्यात त्याचं चित्रण झालेलं फारसं दिसत नाही. मानवी नातेसंबंधांतील गुंतागुंत, आनंदाबरोबर दु:खाची अपरिहार्यता, नात्यातली घुसमट आणि मग नियतीशरणता (म्हणजे खरं तर व्यवस्थाशरणता) या ठराविक चक्रातून बाहेर पडून काही वेगळी व्यवस्थानिर्मिती लेखनातून झाली तर त्याने सांस्कृतिक समृद्धीत भर पडेल असं वाटतं.

'मराठी साहित्य: इतिहास व संस्कृती' या वसंत आबाजी डहाके यांच्या पुस्तकातील 'ब्रिटिश वसाहतकाल आणि मराठी साहित्य' या प्रकरणात एकोणिसावे शतक आणि विसाव्या शतकाची पहिली पन्नास वर्षं या काळातील मराठी साहित्याची वाटचाल पाहिली तेव्हा मला असं जाणवलं की त्या काळात साहित्यातून प्रागतिक व्यवस्थेचा विचार प्रामुख्याने पुढे येत होता. बाबा पदमनजी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यावर १८५४ साली लिहिलेली 'यमुनापर्यटन' ही कादंबरी, १८६६ साली प्रकाशित झालेली लक्ष्मणशास्त्री हळबे यांची 'रत्नप्रभा' ही कादंबरी, ह. ना. आपटे यांची 'पण लक्षात कोण घेतो' आणि 'यशवंतराव खरे' या कादंबऱ्या, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या, ), १९३० साली श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी लिहिलेली 'ब्राह्मणकन्या' , वामन मल्हार जोशी यांची 'सुशीलेचा देव' आणि इतर कादंबऱ्या, बा. सं. गडकरी यांची 'सुधारणेचा मध्यकाल' ही कादंबरी, १८९९ मध्ये गोपाळ बाबा वलंगकर यांनी लिहिलेलं 'विटाळ विध्वंसन' हे पुस्तक, पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांची 'बंधनांच्या पलीकडे' ही व्यक्तीस्वातंत्र्याची मांडणी करणारी १९२७ सालची कादंबरी (वसंत आबाजी डहाके यांनी त्यांच्या पुस्तकात या कादंबरीविषयी, इतर साहित्यकृतींविषयी जे विवेचन केलं आहे ते वाचण्यासारखं आहे - पृ. १९१ ते १९८) अशी काही उदाहरणे देता येतील. वर उल्लेख केलेल्या प्रकरणातील पुस्तकांची, नियतकालिकांची, विविध साहित्यिक व सामाजिक उपक्रमांची जंत्री पाहिली की वाटतं की नवं काही घडवण्याची ऊर्मी फार प्रबळ होती. अर्थात महात्मा फुले, आगरकर, रानडे या पहिल्या फळीतील सुधारकांचा प्रभाव लक्षात घेता त्याचं प्रतिबिंब साहित्यात उमटणंही साहजिकच होतं. पुढे महर्षी कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुधारणेची धुरा सांभाळली. 'समाजस्वास्थ्य'कार रघुनाथ धोंडो कर्वे हे अर्थातच एक महत्त्वाचं, टाळता न येण्यासारखं नाव. एकूणच त्या काळातील साहित्यात लग्नव्यवस्था आणि स्त्री-पुरुष संबंध याबाबत अनेक लेखकांनी विपुल लेखन केल्याचं दिसतं. मुख्य़ म्हणजे स्त्री लेखिका मोठ्या प्रमाणावर लिहित होत्या. विभावरी शिरूरकरांची 'कळ्यांचे नि:श्वास' आणि 'हिंदोळ्यावर' या कादंबऱ्या आणि त्यावरील वादंग हे एक उदाहरण आहेच, पण इतरही अनेक स्त्री कादंबरीकारांची नावं (इंदिरा हरिपूरकर, जानकीबाई देसाई, यशोदाबाई भट, गिरिजाबाई केळकर, शांताबाई भिडे, कमला सोहोनी, काशीबाई कानिटकर, कमला बंबवाले, इंदिराबाई आंबेगावकर, आनंदीबाई जयवंत, गीता साने, शांता नाशिककर, लीला देशमुख, कुमुदिनी प्रभावळकर, प्रेमा कंटक इ.) दिसतात.

विसाव्या शतकाचा उत्तरार्धात जे लेखन झालं आहे त्याच्याशी आपण सगळे बऱ्यापैकी परिचित आहोतच. साहित्याचा समग्र आढावा घेणं इथे शक्य नाही, पण मला साधारण असं दिसतं की व्यवस्थेविषयीची चीड, अनुभवांचं शब्दांकन, औद्योगिकीकरण, महानगरीकरण यामुळे येणारी परात्मता, व्यवस्थेत होणारी घुसमट ही या काळातील साहित्यकृतींची वैशिष्ट्यं आहेत. मी जेव्हा माझ्या आजच्या आणि कालच्या मराठी वाचनाकडे बघतो आणि मला 'नवीन व्यवस्था' निर्मितीबाबत काय दिसलं असा विचार करतो, तेव्हा चटकन काही आठवत नाही. मघाशी म्हटल्याप्रमाणे यात माझी मर्यादादेखील आहेच, पण तरी साधारणपणे असं जाणवतं की वास्तवाची दाहकता दर्शवणाऱ्या अनेक सकस साहित्यकृती निर्माण झाल्या आहेत ('बारोमास' सारखी कादंबरी), परंतु पर्यायी व्यवस्थेची कल्पना रेखाटणाऱ्या साहित्यकृती फारशा दिसत नाहीत. यासंदर्भात दिगंबर पाध्ये यांच्या 'साहित्य, समाज आणि संस्कृती' या पुस्तकातील (प्रथमावृत्ती : १९९८) 'साहित्यातील सामाजिक जाणीव' या प्रकरणातील एक अवतरण मननीय आहे.

साहित्यकृती म्हणजे लेखकाने बाह्यवास्तवाला दिलेला प्रतिसाद असल्यामुळेच तो सुसंबद्ध करण्यात लेखकाचे जे व्यक्तीवैशिष्ट्य असते त्यावरच त्या प्रतिसादाचे महत्त्व ठरत असते. लेखकाचे श्रेष्ठत्व या व्यक्तीवैशिष्ट्यात सामावलेले असते. म्हणूनच श्रेष्ठ लेखकाच्या लेखनात विशिष्ट कल्पनाप्रणाली शोधता येईलच असे म्हणता येत नाही. सामाजिक जाणिवेचे स्वरूप पाहण्यासाठी ते आवश्यक असते असेही नाही. मराठी साहित्याच्या संदर्भात पाहायचे तर १९६० नंतरच्या अनियतकालिकांच्या चळवळीतून निर्माण झालेले साहित्य किंवा 'कोसला', 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर' यांसारख्या कादंबऱ्यांमधून प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्धची एक बंडखोरी व्यक्त झाली आहे. पर्यायाने आधुनिक व्यापारी संस्कृतीविरोधी प्रतिक्रिया तेथे संघटित झाली आहे. परंतु या प्रतिक्रियांमागे विशिष्ट कल्पनाप्रणाली आहे असे म्हणता येत नाही. किंवा ती समाजातील विशिष्ट वर्गाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे असेही सहजपणे दाखविता येत नाही. याच कालखंडातील जी. ए. कुलकर्णी, कमल देसाई, चिं. त्र्यं. खानोलकर यांसारख्या लेखकांविषयीही असेच म्हणता येण्यासारखे आहे.

असे का घडते याचे एक कारण सांगताना असे म्हटले जाते की, आजच्या बाजारप्रधान समाजात गतिमान वास्तव समजावून घेण्याच्या दृष्टीने 'समूह जाणीव' क्षीण ठरत असते. या जाणिवेचा कल केवळ आर्थिक जीवनाचे प्रतिबिंब होण्याकडे असतो. भोवतालच्या समाजात घडणाऱ्या घटनांकडे जरा लक्षपूर्वक पाहिले तरी याचे प्रत्यंतर येण्यासारखे आहे. अशा अवस्थेत 'समूह जाणीव' या कल्पनेला साहित्याच्या संदर्भात फारसा अर्थ न राहणेच स्वाभाविक ठरते. म्हणूनच अलीकडच्या काळातील चांगल्या साहित्यकृतीतून 'वर्गीय जाणीव' व्यक्त होण्यापेक्षा कलावंताची समाजाविषयीची व्यक्तिगत जाणीवच प्रभावीपणे व्यक्त होताना दिसते. आधुनिकता दर्शविणाऱ्या आजच्या साहित्यात व्यक्त होणारा 'परात्मभाव', साहित्यकृतीतील नायकाचा एकाकीपणा, आपल्या अस्तित्वाचाच अर्थ शोधण्याचा त्याचा निरर्थक प्रयत्न इत्यादी बाबी या लेखकाच्या सामाजिक जाणिवेचे स्वरूप निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतात.

या अवतरणाच्या आधारे गेल्या काही वर्षात लेखकाची काहीशी 'कोंडी' झाली आहे असं म्हणता येईल. आणि ते खरंही आहे. मुळात साहित्यकृतीला जिथून प्रेरणा मिळते ते वास्तव 'एकजिनसी' असं कधीच नसतं. वास्तव एकजिनसी आहे असं मानून चालणाऱ्या लेखकाची निर्मितीही अपेक्षित उंची, साहित्यकृतीकडून अपेक्षित असलेला परिणाम गाठू शकत नाही. लेखक आणि इतर यांच्यात हा एक मुख्य भेद आहेच. लेखकाला जे दिसतं ते सर्वांना दिसत नाही. परंतु आजचं वास्तव बहुजिनसी आणि द्वंद्वात्मक आहे आणि त्यामुळे दिगंबर पाध्ये वर म्हणतात तसं 'समूह जाणीव' क्षीण ठरत आहे असं दिसतं. मी ज्या विषयाचा ऊहापोह करतो आहे त्याच्या मुळाशी हाच मुद्दा असू शकेल.

लग्नव्यवस्था, स्त्री-पुरूष संबंध आणि व्यक्तीस्वातंत्र्य या विशिष्ट विषयांबाबत अनेक स्त्री लेखकांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे. मराठी साहित्यात दलित साहित्यासारखाच हा एक महत्त्वाचा प्रवाह आहे. प्रेम, लग्न, लैंगिक संबंध, कुटुंब, मातृत्व अशा विविध पैलूंवर या लेखकांनी स्त्रीवादी जाणिवेतून भाष्य केलं आहे. 'संदर्भांसहित स्त्रीवाद' या ग्रंथात डॉ. रेखा इनामदार-साने यांनी 'लेखिकांच्या कादंबऱ्यांतून प्रकटणाऱ्या स्त्रीवादी जाणिवा' या लेखात गौरी देशपांडे यांच्या 'दुस्तर हा घाट' मधील मीराविषयी बोलताना एक विधान केलं आहे. ते असं - 'पराकोटीचा व्यक्तीवाद हे येथील नायिकेने शोधलेले उत्तर आहे. याचा प्रत्यय नायिकेच्या स्वैर चिंतनातून जागोजागी येतो. लेखिकांच्या कादंबऱ्यांमधील स्त्रीवादी संवेदनांची व जाणिवांची परिणती बहुतेकवेळा अशा तऱ्हेच्या टोकाच्या व्यक्तिवादात होते, हे या ठिकाणी नमूद केले पाहिजे.' (पृ. ५३०) याला जोडूनच माझ्या मनात प्रश्न येतो की व्यक्तीवाद ही 'व्यवस्था' असू शकते का? जर ती असू शकत असेल तर या व्यवस्थेचं चित्रण व्हावं. थोडा वेगळा संदर्भ आहे, पण तरी सांगतो. वर उल्लेख केलेल्या फ्रेंड्स या मालिकेतील एका पुरूषाची बायको गर्भवती होते आणि त्याच दरम्यान आपण लेस्बियन आहोत हेही तिला जाणवतं. इथे हे दोघं वेगळे होतात आणि ती तिच्या लेस्बियन पार्टनरबरोबर राहू लागते. पुढे तिचं बाळंतपण, मुलाचा जन्म या सगळ्यात तिची पार्टनर आणि घटस्फोटित नवरा दोघेही सहभागी असतात. आता हे एका व्यवस्थेतून दुसऱ्या व्यवस्थेत झालेलं स्थलांतर आहे. हे होत असताना काहीच ताण आले नसतील, सगळं अगदी सुरळीत झालं असेल असं नाही, पण असं स्थलांतर होऊ शकतं हे आपल्याला एका टीव्ही मालिकेत बघायला मिळतं. स्त्रीवादी जाणिवेतून जर एखादी नायिका वेगळं, नवीन चिंतन करत असेल तर आता तिने पुढे सरकणं अपेक्षित आहे. तिचं नवीन विश्व कसं असेल हे तिने दाखवावं. व्यक्तीवाद हे एक प्रभावी संकल्पना आहे, पण ती 'आयसोलेशन'मध्ये प्रभावी असून उपयोग नाही. समाजधारणेतील आव्हानांशी तिला जोडून घेता यायला हवं. १९७५ नंतरची स्त्री लेखिकांनी लिहिलेली कादंबरी या विषयावरील एका दीर्घ लेखाच्या समारोपात वंदना भागवत लिहितात, 'आजची सर्व लेखिकांची अवस्था तपासली तर पुरूषसत्ताक व्यवस्थेचे काचणारे स्वरूप त्यांच्या लेखनात उमटलेले दिसते. स्त्री-पुरूष नातेसंबंधांतील अस्वस्थता तपासणे आणि त्यातून नव्या नातेसंबंधांची प्रारुपे निर्माण करणे यासाठी स्त्रियांनी कादंबऱ्या लिहायला हव्यात. एकविसाव्या शतकातील राजकारणाची परिणामकारकता आपण किती आधुनिक, समावेशक आणि प्रगत संस्थात्मकता उभी करतो आणि ती कोणत्या मूल्यांच्या पायावर उभी करतो यावर ठरणार आहे'. (स्त्रियांच्या कादंबऱ्यांमधून प्रकट होणारे सांस्कृतिक राजकारण, खेळ २८)

गौरी देशपांडे यांच्या लेखनाचा सांगोपांग आढावा घेणाऱ्या 'कथा गौरीची' या पुस्तकातील 'गौरी देशपांडे यांच्या कादंबऱ्यांमधील स्त्री-पुरूषसंबंध' या लेखात हरिश्चंद्र थोरात लिहितात, 'गौरी देशपांडेंच्या एकूण सर्वच कथनात्म लेखनात स्त्री-पुरूष समतेबद्दलचा प्रश्न, हा कळीचा प्रश्न आहे असे दिसत नाही. पुरूषांना जे अधिकार मिळाले आहेत ते आपल्यालाही मिळावेत या विषयावरून त्यांच्या नायिका झगडताना दिसत नाहीत. स्त्री-पुरूषांमध्ये भेद नसावेत असा समाज अस्तित्वात यावा यासाठी काही विशेष प्रयत्न करताना नाहीत. अशा समाजाची पुनर्रचना कशी करावी या प्रश्नाने त्यांच्या नायिकांना अस्वस्थ केल्याचे जाणवत नाही.' याच पुस्तकात चंद्रशेखर जहागिरदार यांचा 'आधुनिक अवकाशातील स्त्रीवादी प्रवास' असा लेख आहे. या लेखाच्या समारोपात ते लिहितात, 'उत्खनन'सारखी नंतरची कादंबरी लक्षात घेतली तर स्वतः गौरी देशपांड्यांना आपली व्यक्तिवादी जाणीव आणि स्त्रीवादात अनुस्यूत असलेले सामाजिक भान यांतील दरी लक्षात आली असावी असे म्हणण्यास जागा आहे. या कादंबरीत अर्णव आपण काढलेली चित्रे निवेदक नायिकेला, दुनियामावशीला दाखवतो, आणि म्हणतो, "आपल्या सारख्यांच्या आयुष्यात कधी न येणाऱ्या किंवा आलीच तर आपण ज्यांच्याकडे डोळेझाक करायला शिकलोय त्या माणसांची चित्रं आहेत ती." क्षणभर त्यांच्याकडे स्थिर नजरेने बघत मी पुन्हा विचारले,"म्हणजे कोण?" आता वर बघून माझ्या नजरेला सरळ नजर देत तो म्हणाला, "तुरुंगातली माणसं, वेड्यांच्या इस्पितळातली माणसं, फुटपाथवर जगणारी भिकारी, अपंग, कुणाला नको असणारी म्हातारीकोतारी अशांची चित्रं आहेत ती." मी सुस्कारा सोडून म्हणाले, "अणू, मी अनेकवेळा डोळे मिटून घेतले आहेत हे खरंय, पण जगात ती नाहीतच, अशी स्वतःची समजूत घालायइतकी मी मूर्खपण नाही आणि मठ्ठपण नाही." आणि त्यानेही एक सुस्कारा सोडून म्हटले, "सॉरी, दुनियामावशी. पण जाता जाता त्यांना बघणं, डोक्यातल्या विचारानं त्यांचं अस्तित्व जाणणं आणि खुद्द जवळून, त्यांचा वास येईल इतक्या निकट जाऊन त्यांच्या आयुष्याला, मनाला, दुःखाला आपल्यावर आक्रमण करू देणं, या पार वेगवेगळ्या गोष्टी आहेत." मी थक्क होऊन बघत राहिले. खरेच मी आपल्या दुःखात गुंतून सगळ्या जगाकडे - माझ्याही जगाकडे दुर्लक्ष केले होते." (पृष्ठे ५५-५६) गौरी देशपांड्यांच्या कादंबरी लेखनातील सगळ्या मर्यादांचा अत्यंत प्रामाणिक कबुलीजबाब आपल्याला इथे मिळतो.

गौरी देशपांडे यांच्या लेखनाबाबत एक गोष्ट मात्र मान्य करायला हवी की त्यांच्या नायिका स्त्रीवादी चळवळीतल्या तत्कालीन संघर्षाचा टप्पा ओलांडून पुढे गेल्या आहेत. विचारांच्या पातळीवर त्या मुक्त आहेत. त्यांचा विचार किंवा त्यांचं कल्पनाविश्व काळाच्या पुढे आहे. पण तरी त्यांचं विश्व हे त्यांच्यापुरतं मर्यादित आहे. मी वर उल्लेख केलेल्या अमेरिकन मालिकांमध्ये एका वर्गीय परिघात का होईना, पण एका 'फंक्शनल' व्यवस्थेचं चित्रण पाहायला मिळतं. यात परस्परविरोधी स्वभावाची पात्रं आहेत आणि ती ही व्यवस्था चालवत आहेत. गौरी देशपांडेंच्या लेखनात आधुनिक मूल्यं आहेत, त्यांच्या नायिका समताधिष्ठीत जग बघतायत, पण त्यात फंक्शनल व्यवस्थेचं सलग, प्रभावी असं चित्रण नाही. चंद्रशेखर जहागीरदार यांचं उद्धृत पाहिलं तर त्यात गौरी देशपांडेंची एक व्यक्तिरेखा एका वेगळ्या, 'डीक्लास' होण्याच्या प्रक्रियेकडे निर्देश करते आहे जी वर्गीय परिघाला भेदणारी अशी, एक आणखी पुढची पायरी आहे. इथे गौरी देशपांडेंनी स्वतःच स्वतःवर टिप्पणी केल्याचं दिसतं आणि ही एक मोठी गोष्ट आहे.

मला वाटतं की स्त्री लेखकांबाबत बोलायचं झालं तर कविता महाजन यांची 'ब्र' ही कादंबरी वाचकाचं बोट धरून त्याला पुढे नेते. ती व्यक्तीवादी मांडणीत घोटाळत राहात नाही. ती नायिकेला व्यवस्थात्मक प्रश्नांकडे नेते.

मराठी साहित्यातील एक प्रमुख प्रवाह म्हणजे दलित साहित्य. एका संपूर्ण दुर्लक्षित वास्तवाकडे या साहित्याने लक्ष वेधलं. यासंदर्भात एक उल्लेख करावासा वाटतो. 'दलित साहित्याच्या मूल्यमापनासाठी साहित्यातील आडाखे नवीन लागणार' असं मत १९६७ साली झालेल्या एका चर्चेत डॉ. म. ना. वानखडे यांनी मांडलं होतं. या चर्चेत प्रा. मे. पुं. रेगे, प्राचार्य म. भि. चिटणीस, प्रा. वा. ल. कुलकर्णी सहभागी होते. डॉ. वानखडेंच्या मताला दुजोरा देत मे. पुं. रेगे यांनी दि. पु. चित्रेंच उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात 'चित्रेच्या लिखाणाने जो शॉक बसतो त्यापासून धोका हा आहे की चित्रे 'शॉक' साठी लिहीत राहील. दॅट विल बी बॅड फॉर हिम. त्याचप्रमाणे अनुकंपा व चीड निर्माण करण्यासाठी, इफेक्ट साधण्यासाठी नवबौद्धांनी लिहिलेले वाड्मय सेंटीमेंटल वाड्मय होईल.' रेगे याआधीच्या एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणतात - 'दलित लेखकांमध्ये आत्मपीडक (मॅसोकिस्ट) वृत्ती निर्माण होण्याचा संभव आहे. हा धोका टाळण्यासाठी परंपरागत समाजातील जे वर्ग आहेत त्यांच्यातील व्यक्तींनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे.' 'निळी पहाट' या रा. ग. जाधव यांच्या पुस्तकात हा तपशील दिला आहे. वास्तवाची ओळख करून देताना त्यातच अडकायला होतं असं जे मला नेहमी वाटतं त्याच्याशी साधर्म्य असलेला हा उल्लेख आहे.

रेग्यांच्या 'शॉक'शी मला माझं म्हणणं जोडायचं आहे. जे चाललं आहे ते चुकीचं आहे त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया यावीच. पण प्रतिक्रियेची वारंवारता किती असावी? प्रतिक्रिया ही निर्मिती आहे का? असे प्रश्नही समोर येतात. बंडखोरी आणि विद्रोह सोपा असतो असं नाही पण नवनिर्मिती त्याहून कठीण असते. विद्रोह हा तीव्र संवेदनेचा, प्रतिभेचा आविष्कार आहे, पण नवनिर्मिती हा प्रतिभा आणि चिंतन दोहोंचा आविष्कार आहे. सामाजिक वा राजकीय अरिष्टाचे थेट बळी ठरलेले लोक, त्यांची साहित्यिक अभिव्यक्ती आणि तिचं मूल्यमापन, हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवलं तर काय दिसतं? मध्यम आणि उच्चवर्गीय साहित्यातून अजूनही नात्यांची उकल वगैरेच होताना दिसते, पण धडक कृती दिसते का? लग्नबाह्य संबंधांवर चर्चा होते, बाजू मांडल्या जातात, पण 'आपण एकत्र राहू आणि मला जर वेगळा तो किंवा ती आवडत असेल तर मी त्याच्या/तिच्याबरोबरही चार दिवस घालवेन. मानसिक आणि शारीरिक आनंद घेईन' किंवा 'तुझ्या भौतिक आकांक्षांना माझा विरोध नाही, पण मला काही वेगळं करायचं आहे, त्यामुळे आपण आता मार्ग बदलू' अशा पायावर काही बांधकाम होताना दिसत नाही. व्यक्ती म्हणून परस्परांना समजून घेत व्यक्तित्व अबाधित राखण्यासाठी व्यवस्था बदलायची असेल तर बदलू असा विचार दिसत नाही. ('ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी' हा चित्रपट आठवतो. या चित्रपटात मेरील स्ट्रीप आणि क्लिंट इस्टवुडच्या व्यक्तिरेखांचे मार्ग अखेरीस वेगळे होतात. ती आपल्या संसारात परत जाते आणि तो आपल्या वाटेने जातो. 'नव्या वास्तवा'त ते एकत्र येतील आणि पुढची मांडणी होईल! जुन्य़ा वास्तवातील अंतबिंदू नव्या वास्तवाचे प्रारंभबिंदू असतील.)

नव्या वास्तवाचं 'बांधकाम' करायचे छोटे प्रयत्न झाले तरी चालतील. कारण नवनिर्मिती हा समग्रतेने विचार करण्याचा विषय असतो. खूप मोठ्या प्रमाणात वास्तव विभाजित झालेल्या समाजातील विविध स्तरीय वास्तवांच्या तुकड्यांवर त्या त्या वास्तवाच्या प्रतिनिधी लेखकाला काम करून नवं वास्तव उभं राहू शकेल का हे बघता येईल. नव्या व्य्वस्थॆचं प्रारूप निर्माण करणं हे एक आव्हान आहे आणि नव्या लेखकांनी जर ते केलं तर त्याने साहित्य समृद्ध होईल. साहित्याचा प्रवास 'संघर्षातून निर्मितीकडे' होईल.

शेवटी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. लेखाच्या सुरूवातीला मी त्याबद्दल लिहिलंच आहे, पण थोडं अधिक विस्ताराने सांगतो. ही गोष्ट खरं तर माझ्याच अपेक्षेला छेद देणारी आहे, पण तरी ती मांडणं मला अगत्याचं वाटतं. वैचारिक लेखनाचा प्रांत बाजूला ठेवला तर साहित्य व कलानिर्मिती या मुळात स्वान्तसुखाय गोष्टी आहेत असं मला वाटतं. म्हणजे प्रश्न असे उभे राहतात की गौरी देशपांडेंवर समाजाच्या पुनर्रचनेचं ओझं टाकावं का? ग्रामीण लेखकाने नव्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं सूचन करणारी कादंबरी लिहावी अशी अपेक्षा करावी का? (सुहास पळशीकर यांनी भालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू'वर लेख लिहिला होता त्याचं शीर्षक 'खंडेराव, अडगळ आवरत जा की राव!' असं होतं. त्याची इथे आठवण होते!!) माझ्यातली निर्मितीची ओढ, जे जाणवतं ते सांगायची ओढ, ज्याने मी 'पूर्ण' होतो ती कृती, ज्याने माझा अहंकार सुखावतो ती कृती, ज्याने माझी ओळख निर्माण होते ती कृती अशा विविध अंगांनी कोणत्याही कलानिर्मितीचा खुलासा करता येतो. यातले कुठले घटक किती प्रमाणात प्रभावी असतात ते तपासणं अवघड आहे. आणि त्याचं खरं उत्तर कलाकारानेच प्रामाणिकपणे देणं अपेक्षित आहे. म्हणजे मला साहित्याला समृद्ध करायचं आहे की माझी पहिली गरज लेखक म्हणून माझी ओळख निर्माण करणं ही आहे? दोन्हीही उद्देश आहेत असंही उत्तर देता येऊ शकतं, पण मला असं वाटतं की 'क्रमांक एक'चं उत्तर नेहमीच अस्तित्वात असतं. कला ही आत्मनिष्ठ असल्याने 'अमुक एका बाबतीत लेखकानं भाष्य करायला हवं' असा हट्ट धरणं खरं तर मला मान्य नाही. पण तरी लेखकाकडे जी ऊर्जा आहे, जी दृष्टी आहे तिचा नव्या वास्तवाचा प्रेरणास्रोत म्हणून प्रभावी वापर झाला तर ते दिशादर्शक ठरू शकेल. ते निर्मितीचं मोठं आव्हान असेल. मात्र हा अपेक्षेच्या रूपातला विचार आहे हे लक्षात घ्यावं. 'कलाविष्काराबाबत जी साधकबाधक चर्चा होते ती व्हावी. पण कलेवर अपेक्षांचं रोपण व्हावं का?' असा प्रश्न आला तर माझ्यापुरतं त्याचं उत्तर असं आहे की या रोपणातून जे निष्पन्न होईल त्याने कलाकारालाही समृद्ध झाल्यासारखं वाटत असेल तर ते जरूर व्हावं. अन्यथा ते अपेक्षांपुरतं मर्यादित राहीलच.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

आपण मल्टीपल रिलेशन्सची चांगली व्यवस्था लावू शकतो का? त्यातून कोणते प्रश्न उभे राहू शकतात? ते आपण कसे सोडवणार? व्यक्तीच्या ऊर्मी, व्यक्तीचं स्वातंत्र्य, त्याची सौंदर्यासक्ती, नव्या अनुभवाची ओढ आणि या सगळ्याला पुरुन उरणारा व्यवस्थेचा, समाजधारणेचा प्रश्न यांची सांगड आपण कशी घालणार? असे काही प्रश्न उभे राहतात आणि हे प्रश्न लेखनातून हाताळले जावेत असं मला वाटतं.

सुंदर आहे हा लेख.
.
परवाच ऐसीवरती "अभिषेक राऊत" यांची एक लहानशी कथा वाचली.ज्या कथेत थोडीफार वेगळी वाट (म्हणजे २१ पुरुषांबरोबर संबंध ठेवणारी आणि सेक्स करता स्वतःला ऑन-ऑफ करुन घेऊ शकणारी नायिका, तिने नंतर अशाच ऑफबीट पुरुषाशी केले लग्न असा सेट अप हाताळला आहे.) - http://aisiakshare.com/node/4536
.
खूप आवडला तो सेट अप कारण त्यात काहीतरी वेगळं, मॅचोर होतं. "अव्वा! शी!!! अशी आहे ती/तो. लाज कशी नाही वाटत?" असा नाक खुपसण्याचा, जजमेंटल अविर्भाव नव्हता. अशा प्रकारच्या कथा, कादंबर्‍या वाचायला आवडतील.
.
माझी प्रतिक्रिया त्या धाग्यावर अशी आहे की "तिचा युटिलिटेरिअन अ‍ॅप्रोच पटला नाही." पटला नाही म्हणजे असं ऑन-ऑफ होता येतं हे बहुसंख्य स्त्रियांच्या प्रकृतीत नसतं असे म्हणायचे होते. तसे होता आले तर फारच छान हे देखील तितकेच खरे.
____
दुसर्‍या एका संस्थळावरती तीन एक वर्षांपूर्वी एका "क्रॉसड्रेसर" नवर्‍याची अतिशय सुरस कथा वाचली होती. की तो स्त्रीचे कपडे घालून त्याच्या पत्नीशी रत होतो. आणि तरीही(?) दोघे आनंद घेऊ शकतात. तरीही कारण पत्नीदेखील ते घृणास्पद वाटत नाही. फॅन्टसी टाइप पण एकदमच अनवट व छान फुलवलेली कथा होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता माझी गोची अशी होते की लग्नानंतर माझ्या बायकोला दुसरा पुरुष कधीच का हवासा वाटत नाही असा मला प्रश्न पडतो आहे. तिला एखादा पुरुष आवडावा आणि तिने चार दिवस त्याच्याबरोबर घालवावे अशी माझी मुळातच अपेक्षा आहे. त्यामुळे माझ्याबाबतीत संघर्षबिंदू पुढे सरकलाय. एका पुरुषाला दोन स्त्रिया किंवा एका स्त्रीला दोन पुरुष हवेसे वाटूच शकतात अशी माझी धारणा असल्यावर बऱ्याच गोष्टी निकालात निघतात. मुख्य म्हणजे 'तुझा कंटाळा आलाय म्हणून मला दुसरं कोणी आवडू लागलंय' असंही नाही. 'तुझ्या - माझ्यातलं प्रेम आहे तसंच आहे, पण तरी मला आणखी कुणीतरी आवडतंय' अशी निकोप, आरोग्यपूर्ण परिस्थिती संभवूच शकत नाही का?

जबरदस्त एक्स्ट्राऑर्डीनरीली ब्रॉडमाइंडेड द्रुष्टीकोण !
प्रज्ञा दया पवार यांची एक दिवाळी अंकातलीच कथा आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बंडखोरी आणि विद्रोह सोपा असतो असं नाही पण नवनिर्मिती त्याहून कठीण असते. विद्रोह हा तीव्र संवेदनेचा, प्रतिभेचा आविष्कार आहे, पण नवनिर्मिती हा प्रतिभा आणि चिंतन दोहोंचा आविष्कार आहे.

तुमच्या लेखांत आणि कवितांतही हा प्रतिभा आणि चिंतन या दोन्हींचा अविष्कार वारंवार होत असतो. अतिशय उत्तम, विचारांना चालना देणारा लेख, अनेक आभार.
आपल्याला एखादा अविष्कार इतरांपेक्षा अधिक प्रामाणिक, अधिक आकर्षक आणि अधिक दखल घेण्यासारखा का वाटतो? प्रतिक्रिया म्हणून येणार्या अविष्कारात चिंतनशीलतेचा अभाव असेल तर ते लवकर कालबाह्य होतात का? अनेकदा कलाकार कलात्मकतेच्या, माध्यमांच्या आड लपून चिंतनशीलतेची जबाबदारी टाळून सोपे मार्ग शोधतात का? त्यामुळे त्यांचे अविष्कार कमअस्सल वाटतात का? अशा अनेक गोष्टींचा विचार करताना या लेखातले अनेक मुद्दे जाणवले होते पण त्याला इतके नेमके, मार्मिक आणि ओघवते शब्दरूप मिळलेला लेख म्हणजे पर्वणीच वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ शुचि, मारवा…. प्रतिसादाबद्दल आभार! तुम्ही उल्लेख केलेल्या कथा वाचतो…

@ रुची… आभार!

प्रतिक्रिया म्हणून येणाऱ्या आविष्कारात चिंतनशीलतेचा अभाव असेल तर ते लवकर कालबाह्य होतात का?

हो…असं होत असावं. विविध साहित्य प्रवाहांबाबत चिंतनशीलतेचा निकष लावून हे तपासून बघता येईल. चिंतनशीलतेची जबाबदारी टाळून सोपे मार्ग शोधण्याबाबत तुम्ही म्हणताय त्याच्याशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0