स्वत:त खोलवर डोकावणारी... ती... एकटी....

"एकम" - मिलिंद बोकील - मौज प्रकाशन....

"एकम" ही ‘मौज - दिवाळी२००४’ च्या अंकात प्रसिध्द झालेली कादंबरी. ही कहाणी आहे देवकीची. देवकी मराठीतील एक प्रथितयश लेखिका. ‘मातृभाषा मराठीतच लिखाण करायचं’ असं तिनं पक्कं ठरवलं आणि त्यानुसार आपला जीवनमार्ग आखला. त्यासाठी तिला आजन्म एकटेपणा स्वीकारावा लागला आणि तिने तो जाणीवपूर्वक स्वीकारलासुध्दा.
आपला मुलूख सोडून नवर्‍याच्या बरोबर परमुलुखात जाण्याचं नाकारलं. माणसांच्या गजबजाटापासून दूर राहिली. एकटं राहण्याचा तिला कधीच बाऊ वाटला नाही. कारण आई-वडिल दोघंही नोकरी करत असल्याने खूप लहानपणापासून तिला एकटं राहण्याची सवय होती. त्यामुळे मुलगा प्रेमाने ‘ये’ म्हणत असूनही त्याच्याबरोबर ती परदेशी गेली नाही.
अडीअडचणींच्या काळात शेजारी राहणार्‍या शास्त्रीजींची आणि प्रिय मैत्रीण सुभद्राची तिला सोबत झाली. परंतु तिची मैत्रीची गरज भागवणारा सहृदय मित्र तिला कधी मिळाला नाही. तिच्या संवेदनशील, सृजनशील मनाला मानवणारा, तिला ‘जस्ट प्लेन सॉलिड कंपनी देणारा, शानदार’ पुरूष भेटला नाही.
तिचं घर मुख्य गावापासून लांब व नियमित जा-ये करायला गैरसोयीचं होतं, त्यामुळे तिच्या चाहत्यांपासून ती दुरावली. मुलगा नोकरीनिमित्त परदेशी गेला. कालांतराने शास्त्रीजींचं निधन झालं. सुभद्रा नवर्‍याच्या गावी निघून गेली. ह्या सार्‍यामुळे देवकीच्या एकटेपणात भर पडली. स्त्रीसुलभ मायेचा वर्षाव करायला जवळ कुणीच राहिलं नाही. तिचा जगण्यातला रस कमी झाला. उत्साहाने काही करण्याची इच्छा उरली नाही.
एकटेपणातल्या ह्या क्षणांना सामोरे जाण्यासाठी तिने अपेयपानाचा आधार घेतला. मनातील सगळी अस्वस्थता दूर करून जाणिवांच्या पलिकडे नेणार्‍या त्या पेयाची तिला चटक लागली. त्याच्या पेयपानात ती हरवून जाऊ लागली. त्या भरात आपला पोटाचा विकार बळावतो आहे ह्याचीही तिला पर्वा रहिली नाही. शरीर पुन्हा कधीच बरं न होण्याइतकं पोखरून निघालं. देवकीला पोटातील कळा वारंवार सहन करत जगण्याचीदेखील सवयच झाली जणू.
आपल्या मनाप्रमाणे लिखाण करता आल्याचं समाधान तिला आहे, लोकांनी भरभरून प्रेम केल्याचा आनंद आहे. कसलीच काळजी उरलेली नाही. पण तरीही ती आतून अस्वस्थ आहे.
मरणासन्न अवस्थेत ती आपल्या ह्या अस्वस्थतेचा शोध घेत आहे. ‘आपण प्रत्येकजण एकटे का आहोत?’ ह्याचा ती पाठपुरावा करते आहे. शास्रीजींनी सांगितलेल्या ‘नाकाशस्य घटाकाशो...’ ह्या श्लोकाचा उत्तरार्ध तिला काही केल्या आठवत नाहीए. ‘एकटेपणा नावची चीज ह्या जगात खरोखरीच आहे का?’ ह्या विचारांत ती बुडून गेली आहे.
देवकीच्या मनातील विचारांचं बारकाईने रेखाटन करत लेखक मिलिंद बोकील ह्यांनी काही सार्वकालिक समस्यांविषयी लिहिले आहे. जसं की, आयुष्यातील जगण्याचा रस नाहीसा करणारा एकटेपणा, स्त्री-पुरुष नात्याची केमिस्ट्री, लेखकाची लिहिण्याची आणि जगण्याची थीम. इ.
लग्नानंतर संसारासाठी पूर्ण वेळ देत, नवर्‍याच्या इच्छेप्रमाणे जगत राहून आपलं वेगळेपण टिकवणं अशक्य आहे हे लक्षात येताच सरधोपट विचारसरणीचे अनुकरण न करता चाकोरीबाहेर राहून, स्वत:च्या विचारांशी प्रामाणिकपणा राखत जगणार्‍या देवकीचं हे चित्रण.
अवकाशातील घटाच्या खूप आत स्वत:ला सामावून घेतलेल्या स्त्रीचं चित्रीकरण केलेलं मुखपृष्ठ शब्दांशिवायही बोलकं आहे.
कधी स्वत:शीच संवाद साधत, कधी मुलाखतकर्तीच्या प्रश्नांना उत्तरं देत, कधी सुभद्राशी गप्पा मारत देवकी स्वत:त वारंवार डोकावून बघते आहे, खोलवर शिरते आहे.
एका बैठकीत वाचून पूर्ण न होणारी फक्त पाऊणशे पानांची ही कलाकृती...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचायला हवं एकदा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाचावीशी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0