चित्र : मूळ आणि कॉपी

Roy With Munch

फोटुत मिस्टर रॉय (अर्थात माझा दहा वर्षांचा मुलगा) आपल्या पहिल्या तैलचित्रासोबत दिसत आहेत. हा प्रोजेक्ट शाळेसाठी होता. शाळेमध्ये कुठल्यातरी जुन्या चित्रकाराच्या प्रसिद्ध चित्राची कॉपी करण्याचा होमवर्क होता. अर्थात या होमवर्कसाठी पुष्कळ दिवस मिळाले होते. आमच्या चित्रकार साहेबांचा लहरी स्वभाव पाहता इतके दिवस गरजेचे होतेच, तरीही वेळेत चित्र पूर्ण होईल का अशी आईला कायम भीती !

आता होमवर्क मिळाल्यावर कुठलं चित्र निवडायचं हा प्रश्न होताच. हे चित्र स्वतः रॉयनेच निवडलं. त्यानं हे चित्र कुठे पाहिलं , का निवडलं हे आम्हालाही माहीत नाहीत आणि त्यालाही. पुढचा प्रश्न होता कॅनवास साईजचा. त्यासाठी मीच ( नेहमीच्याच हौसेने ) वेगवेगळ्या साईजचे कॅनवास आणले आणि त्यातला हा निवडला. नंतर कुठल्या माध्यमात चित्र करायचं यावर पुष्कळ चर्चा झाल्या, चर्चा नव्हे गप्पा ! एकूणातच चित्रकलेच्या बाबतीतल्या आमच्या गप्पा या आनंदाचा ठेवा असतात. आम्हाला अनेक नवीन कल्पना सुचतात, आम्ही नुसतेच मनसुबेही रचत बसतो, भंकस करतो. तर या आमच्या गप्पांमध्ये मूळ चित्रासारखेच तैलरंग वापरायचं ठरलं. मी दहा वर्षाचा होतो तेव्हा स्केचपेन आणि कॅम्लिनचे त्याकाळात उपलब्ध असलेले पेस्टल हे सोडले तर बाकी कुठलेही रंग मला ठाऊक नव्हते. सहा स्केचपेनची छोटी पेटी वाढदिवसाला हमखास प्रेजेंट म्हणून मिळे. त्याचा उपयोग दिवाळीच्या ग्रीटिंग कार्डांसाठी होत असे. मी अनेक वर्षे बाबांच्या आग्रहाखातर ( आणि ऑर्डरीनुसार ) स्केचपेनमधली ग्रीटिंग कार्डे बनवली. आज स्केचपेन या एकाच प्रकारातली विविधता पहिली तर एकेकाळी आपण इतकी साधी स्केचपेन वापरत होतो यावर विश्वास बसत नाही. नंतर एलिमेंटरी , इंटरमिजिएटच्या निमित्ताने मग रंगीत पेन्सिली ,चारकोल, जलरंग,पोस्टर कलर आणि ड्राय पेस्टल ही माध्यमं माहिती झाली. पण अजून ऑइल कलर हे दूरच होते. चित्रकला हा महागडा छंद आहे.अर्थात नुसतं पेन्सिल किंवा बॉलपेन स्केचिंग देखील करता येऊ शकतंच, आणि धाकल्या माडगूळकरांच्या रेषेवर चालता येऊ शकतं ; पण सगळी माध्यमं वापरून पाहिल्याशिवाय आणि त्यात स्वतः प्रयोग केल्याशिवाय चित्रकलेची मजा नाही ! मी पहिले ऑइल कलर घेतले किंवा वापरले तेव्हा २०-२१ वर्षांचा असलो पाहिजे. म्हणजे उशिराच की ! पहिल्यांदा ऑइल कलर वापरताना झालेला आनंद , त्यातलं वेगळेपण, ऑइल कलरने गच्च भरलेला ब्रश कॅनव्हासवर चालवतानाची जी एक खास मजा आहे ती आणि मुख्य म्हणजे टर्पेंटाइनचा उग्र वास हे सर्व आठवणींमध्ये दडलेलं हे फर्निचर कामात , सुतार कामात वापरायचं असतं इतकीच त्याची ओळख होती. आमच्या घराच्या मागच्याच बाजूला मिस्त्रींचा छोटा फर्निचर कारखाना होता, त्यात टर्पेंटाईनचा वास भरून राहिलेला असे ! आजूबाजूच्या लोकांमध्ये, आमच्या कुटुंबात ऑइल कलर वापरण्याबद्दल कुठलीच जाणीव, माहिती वगैरे नव्हती. अर्थात भूगोल/नकाशा तज्ञ, चित्रकार काका चंद्रशेखर पुरंदरे यांनी वेळोवेळी काही चांगल्या टिप्स मात्र नक्की दिल्या होत्या.

माझ्या मुलांची कहाणी मात्र एकदम निराळी आहे. या मुलांना अगदी लहानपणापासूनच अनेक वेगवेगळी उत्तम दर्जाची माध्यमे वापरायला मिळाली आहेत. त्यांच्या शाळेत चित्रकलेत वेगवेगळे प्रयोग मुलंमुली करत असतात. त्यांच्या चित्रकलेच्या बाई स्वतः वेगवेगळे उपक्रम मुलांबरोबर करत असतात. दृश्यकलेच्या अनुभवाचं एक्स्पोजर हे इथल्या हवेतच आहे. त्याचा मुलांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फायदा होतचअसतो. आता चित्राची कॉपी करायची म्हणल्यावर त्याच्या काही पद्धती आहेत. चित्ररचना जर सोपी असेल तर मूळ चित्र ( अर्थातच फोटो ) समोर ठेवून लगेच रेखाटनाला सुरुवात करता येऊ शकते, पण या चित्राची रचना वाटते तितकी सोपी नाही. दहा वर्षाच्या मुलाच्या दृष्टीने तर नाहीच नाही. यातला पर्स्पेक्टिव्ह, पार्श्वभूमीमध्ये असलेल्या हलक्या छटा आणि रेघा, त्याच्या सीमा अशी काही म्हत्वाची रचनातत्वे जर कॉपीमध्ये योग्य उमटली नाहीत तर ती कॉपी खराब वाटेल. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की युरोप खंडात जितकी वरिजिनल चित्रकाराला मागणी आहे तितकीच मागणी - अस्सल नक्कल - करणाऱ्या चित्रकाराला आहे. अशा प्रकारची -अस्सल नक्कल - करणारे काही चित्रकार माझ्या ओळखीचे आहेत आणि त्यांची तंत्रावरची हुकूमत फारच भारी आहे. मोठ्या चित्रकारांच्या उत्तम चित्रांच्या कॉप्या का कराव्यात, कधी कराव्यात हा खूपच विस्तृत विषय आहे. या प्रश्नांच्या अनुषंगाने इथे असलेल्या लोकांनी त्यांना या संदर्भात काय वाटते हे जरूर सांगावे. माझ्यामते विशिष्ट जाणीव ठेवून केलेली उत्तम चित्रांची कॉपी ही बरंच काही शिकवून जाते. यात रचना, रंगसंगती, आकारांची , रेघेची लय अशी कित्येक तत्वे समाविष्ट करता येऊ शकतील. रॉयसोबतच्या चर्चेत ; खरंतर गप्पांमध्ये कॉपी का करावी याबद्दल मी पुष्कळ बडबड केली. रॉयने बिचाऱ्याने ती निमूटपणे ऐकूनही घेतली. कारण मुद्दा असा आहे, की रॉयला स्वतःला चित्रं सुचतात. त्याच्या स्वतःच्या चित्ररचना त्याच्यापरीने फारच सुंदर असतात. ही बडबड करण्यामागे माझा उद्देश एवढाच होता, की त्याने या नक्कल-प्रक्रियेतून जाणीवपूर्वक काहीतरी शिकावं आणि स्वतःची कल्पनाशक्ती घालवून बसू नये. पुन्हा यात मातोश्रींचा सहभाग होताच. त्यांनी लगेच चित्राची कलर प्रिंट घेऊन त्यावर चौकट काढून कॉपी करण्याच्या मूलभूत प्रक्रियेचा श्रीगणेशा करून टाकलाच.

आमच्याकडे सुदैवाने रंगांची आणि ब्रशेसची काही कमी नाही ! त्याच्यासाठी मी ऑइल कलर आणि ब्रशेस तयार ठेवले आणि बिनवासाचं टर्पेंटाइनही. ( ही एक गंमत आहे, माझ्या ऑइल कलरच्या आठवणींमध्ये हा वास हमखास आहे आणि माझ्या मुलाच्या ऑइल कलरच्या आठवणींमध्ये तो नसेल). कॅनव्हासवर चौकटी बनवण्याच्या किचकट कामात मी थोडी मदत केली. मग त्याने स्वतःनेच पेन्सिलीने ( लहान मुलं पेन्सिल इतकी दाबून का चालवतात ? नेहमीच ?हलकी आऊटलाईन मारण्याची जाणीव माणसाला नक्की कोणत्या वयात होते ?) फोटोतल्या चौकटींनुसार कॅनव्हासवरच्या चौकटींमध्ये रेघ मारल्या आणि एक मूळ सांगाडा तयार झाला. या कामात काही दिवस गेले, कारण शाळेचा अभ्यास , खेळ आणि बाकीची व्यवधानं, आजारपणं मधेमधे येत होतीच. अखेरीस एकदाचं रेखाटन पूर्ण झालं रंग काढण्याचा दिवस उगवला. रंग हाताळण्याची ,म्हणजे कागद आणि स्वतःचं शरीर हे समसमान प्रमाणात रंगवण्याची जेनेटिक सवय माझ्या मुलामध्ये आहे. त्याची मला भीती वाटत होतीच. कारण ऑइल कलर हातापायावर लागले तर ते काढणं हा वैताग असतो हे मला अनुभवानं चांगलंच माहित आहे. आणि इथे मातोश्रींचा ओरडण्याचा रोल येतोच, तो कसा टाळता येईल याचा पहिला विचार ! मग आधी ऑइल कलर कसे वापरावेत याबद्दल माझं एक लेक्चर बिचाऱ्याला ऐकून घ्यावं लागलं. सर्व जय्यत तयारी आणि बेसिक डेमो झाल्यावर मी त्याला एकटं सोडलं आणि माझं काम करू लागलो. चित्र काढण्यात रॉय इतका रंगतो, की शक्यतो त्यातून बाहेर येत नाही. आताही पहिल्याच सेशनमध्ये अर्धा तास सलग शांतपणे तो रंगवत होता. रंगांच्या नव्या ट्यूब उघडत होता, छोटे मोठे ब्रश वापरत होता, तसेच ब्रशचं मागचं टोक वापरून पाहत होता. ( हे अजून एक ! मुलांना आपण एखादी वस्तू निराळ्या पद्धतीने, निराळ्याच कामासाठी कशी वापरायची याच्या युक्त्या सांगत असतो, आणि ती देखील स्वतःची कल्पनाशक्ती वापरात असतात. या चित्रातल्या मागच्या बोटी या स्क्रू ड्रायव्हर वापरून बनवल्या आहेत !) अर्धा तास झाल्यावर स्वतःहूनच ऑइल कलरमध्ये काम करणं कसं भारी आणि वेगळं आहे हे तो मला भरभरून सांगू लागला. यावेळी नुसता कॅनव्हासच नाही तर त्याला दिलेली पॅलेट , त्याचा शर्ट आणि हातपाय असं सर्वच रंगलं होतं. मग आमच्या ऍक्रिलिक आणि ऑइल कलर याबद्दलच्या गप्पा झाल्या ! ऍक्रिलिक मध्ये रंग लगेच वाळत असल्याने ते एकदाच आणि अचूक करावं लागतं याचा त्याला अनुभव आहे. अशी काही सेशन झाल्यावर आज हे चित्र तयार झालं. फोटोमध्ये रॉयच्या चेहऱ्यावर रंग लागलेला दिसत असेलच: रंगों में रंगना कोई हमसे सीखे!

हे सगळं पाल्हाळ लावायचं कारण असं, की बदल सगळीकडे होत असतात. तसे आपल्याकडेही होत आहेत. पण चित्रकला , चित्रकला शिक्षण एकूणच दृश्य-जाणीव या संदर्भात असलेली तीस चाळीस
वर्षांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती याबद्दल लोकांची निरीक्षणे काय आहेत हे जाणून घ्यायला आवडेल. आज गुगल करून , तूनळीवर डेमो पाहून नवीन तंत्रे अवगत करून घेता येऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे रंग, नवे-जुने चित्रकार याबद्दल आज पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. आज आपण इंटरनेट वापरून आपल्या अनुभवांची देवाण घेवाण करू शकतो. यामुळे चित्रकलेबद्दलच्या जाणिवेत काही बदल होतील (होत आहेत का ), त्यात काही सुधारणा होईल (होत आहे का )? याचा प्रभाव आपल्या नाट्यमंच डिजाइनवर होईल? अजूनही आपल्याकडे बॉक्स सेट , दिवाणखाना सेट यांचाच प्रभाव दिसतो. दृश्यकलेतल्या जाणीवा या मंचावर दिसाव्यात असं मला फार मनापासून वाटतं. तुमची मुलं किंवा तुमच्या आजूबाजूची मुलं कशा प्रकारची चित्रं काढतात, त्यासाठी कोणती माध्यमं वापरतात ?

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

लेख फारच आवडला.
रॉयचं कौतुक आहे.
तुमच्याकडे एकूण मजाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अतिशय आवडला. 'द चाईल्ड इज द फादर ऑफ द मॅन' ही वर्ड्सवर्थच्या एका कवितेतली ओळ आठवत राहिली. रॉयचं अभिनंदन!

विशिष्ट जाणीव ठेवून केलेली उत्तम चित्रांची कॉपी ही बरंच काही शिकवून जाते. यात रचना, रंगसंगती, आकारांची , रेघेची लय अशी कित्येक तत्वे समाविष्ट करता येऊ शकतील.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>फोटोतल्या चौकटींनुसार कॅनव्हासवरच्या चौकटींमध्ये रेघ मारल्या आणि एक मूळ सांगाडा तयार झाला<<

म्हणजे काय केलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

त्यांनी ही पद्धत वापरली असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राॅयचं कौतुक, तुम्हां दोघांचंही.

त्याचं काय म्हणणं पडलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फक्त तैलरंगच नाही, जलरंगांनाही एक स्वत:चा वास असतो. पोस्टर कलर नावाच्या प्रकारालाही. शिवाय कॅम्लिनचा वास वेगळा, फनकलर्सचा वेगळा. पण इथे तुम्ही जे शिक्षण आणि स्वातंत्र्य दिलेलं आहे ते फार उच्च दर्जाचं आहे.

मी दहा वर्षाचा...

ह्यानंतरची वाक्यं आजही जराही बदललेली नाहीत. त्यातही मुंबईत बऱ्यापैकी वस्तीत, घरात मी होतो. मला माझी आवड जोपासायला मिळाली, नंतर सुलेखन शिकायला मिळालं. आज हे शिक्षण इतक्या मुक्ततेने फक्त अत्यंत सधन लोकांना शक्य आहे.
चित्रकलेचं शिक्षण, स्पर्धा परिक्षा ह्या योजना काढणारा इंडिया आणि त्या पार पाडाव्या लागणारा भारत ह्यांतली दरी मिटेपर्यंत दिवाणखान्यातून सुटका नाही!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.