ललित...

आयुष्यभर आपण दोन स्वतंत्र दिशांनी सुरु होणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी उभं असतो. सुरुवात कोणत्याही स्वतंत्र दिशेने सुरु होणाऱ्या एका रस्त्यानं करा, चुकार मन सारखं त्या दुसऱ्या रस्त्यावर हुंदडतं. त्या रस्त्यानं गेलो असतो तर, खरं तर पाठ फिरवलेला रस्ताही ऱ्हासाचा नसतो. ज्या रस्त्यावरून ऊर फुटेतो धावलो त्यानंही काही छप्पर फाडके दिलेलं नसतं. गंडलो. कळतं कधी. माध्यांनीच्या उन्हानं पोळल्यावर. आता मागं जाता येत नाही. आयुष्य हे असंच असतं. बघायचं तेव्हाचं मागं वळून बघावं. ते टाळलं. स्वतःच्या मस्तीत पुढं निघून आल्यावर मागं वळून बघितलं तर फार फार काय दिसतं. कोपऱ्यावरलं करकरीत काळं कुलंगी कुत्रं. जे बघणं अवघड. मग स्वीकारणं लांबची गोष्ट. हे सगळ्याच्या बाबतीत होत नाही. काही गोटे कुठल्याही सागरात चिंब होतात.काही जण मागं न पाहता, मागचे सगळे दोर कापून, कधी नियतीनं कापलेलं स्वीकारून, जिद्दीनं पुढं जातांना,त्यांच्या रस्त्याचा सुंदर गालिचा करतात. ज्यावरून त्यांच्या मागं चालत येणाऱ्यांना फुलं सुद्धा रुतणार नाहीत. इतका सुंदर गालिचा. तो गालिचा तयार करण्याचं भागधेय प्रत्येकाचं नसतं की असतं हा प्रश्न फार फार खाजगी आहे. तो अगदी एकट्याचा आहे.

'इडा' ऍकेडमी अवार्डेड पोलिश फिल्म, जिचा एकविसाव्या शतकातल्या सर्वोत्तम फिल्ममध्ये समावेश केला असून, जगभरातल्या सिनेमा रसिकांचं प्रेम लाभलेला अतिशय सुंदर सिनेमा. सिनेमाच्या दिग्दर्शकाची, सिनेमॅटोग्राफरची चित्रकलेवर घट्ट पकड असल्यानं 'स्लाईड शो ' शी संगती साधणाऱ्या, एका चित्रातून अनेक अर्थ सांगणाऱ्या, एकामागोमाग सुंदर चित्रमालिका समोर येऊन आपल्या नकळत आपला ताबा घेतात. सिनेमाचं लायटिंग अप्रतिम असून, बर्फ, मोकळे रस्ते, एकोणीसशे साठ- बासष्टचा काळ अत्यंत ताकदीनं उभा करताना पानगळीतल्या निष्पर्ण झाडांच्या प्रतिमा वेगळा अर्थ सुचवू पाहतात. नव्याचा आरंभ की जुन्यातून सोडवणूक की सुटल्याची खंत. इथं सिनेमाच्या कथानकाशी साधर्म्य साधणारी निष्पर्ण पानगळ चपलखपणं उमटते. बर्फात येशूचा पुतळा घेऊन जाणारी 'इडा' ही सुरुवात तर भौतिक सुखाला त्यागून त्वेषानं मठाकडं चालणारी 'इडा' हा शेवट. अशा सुरुवात व शेवटातल्या मध्यावरला प्रवास म्हणजे 'इडा'

जागतिक महायुद्धात आईवडिलांची केवळ 'ज्यू' म्हणून हत्या झाल्यानं, ख्रिस्ती मठातल्या कडक शिस्तीतल्या, तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भौतिक सुखापासून अनभिज्ञ जोगतिणीच्या मेळ्यात रमलेल्या, अनाथ ऍनाचा काही दिवसातच 'नन' म्हणून शपथविधी होणार असतो. त्या विधीच्या आधी ती, तिचं आपलं म्हणून उरलेलं एक नातं. तिची मावशी. वांडाला भेटते. पेशानं जज असलेली, भौतिक सुखाच्या चिखलात रुतलेली की वेगळ्या जीवनशैलीला स्वीकारलेली की भूतकाळापासून फारकत घेतलेली की तो आठवू नये म्हणून नवं जग स्वीकारलेली, व्यक्तिमत्वाच्या अनेक कडांची सरमिसळ होऊन एक अजब रसायन बनलेली वांडा आणि बालसुलभ वृत्ती न मिटवता, तारुण्याच्या प्रवेशावरली ऍना. इथं सुरु होतो ऍना म्हणजे 'इडा' आणि तिची मावशी वांडाचा आपल्या कुंटूंबाच्या शोधाचा प्रवास. मावशीला मनापासून वाटतं की आपल्या भाचीनं 'ननचं ' आयुष्य सुरु करण्याआधी, आयुष्यातला आनंद उपभोगावा, ती तसं तिला सुचवते, सॅक्सोफोन प्लेयर लिसला इडाजवळ आणण्याचा प्रयत्न करते. इडा तो मोह टाळून मावशींकडं परतून तिच्या आईवडिलांचं दफन केलेल्या ठिकाणी जायचं ठरवते. मावशी आपल्या भाचीसह तिच्या घरी येते, जिथं ती आपली बहीण, मेहूणा व मूल सोडून गेलेली असते, ते घर आता पोलो, फ्लिक्स आणि स्किबास यांचं असतं. मावशी आपल्या अधिकाराचा वापर करून, जाणून घेते की तिच्या कुंटूंबासोबत नेमकं काय झालं. क्लिसनं इडाच्या आईवडिलांची व मावशीच्या लहानग्याची हत्या करून जिथं पुरलं असतं, तिथं त्या जातात. (कबरीच्या कडावरल्या मातीच्या ढिगावरल्या त्या दोघी, कबर खोदणारा, टोपल्यानं उडणारी माती,मावशी भाचीचे चेहरे आणि मागची निष्पर्ण झाडं, कबर खोदणाऱ्याचा पश्चाताप हे दृश्य वेगळा परिणाम साधतं) क्लिसनं दिलेले आप्तेष्टाचे सांगाडे घेऊन त्यांचं ज्युईश सिमेट्रीत दफन करून दोघी आपआपल्या मुक्कामी परततात. त्या प्रवासानं त्या दोघी पूर्ण पुसून नव्या होतात. एक नवा परिणाम त्यांच्यावर होतो. वांडाला आपलं मुल, बहीण, मेहुणे आणि आत्ता भेटलेल्या भाचीच्या .दुरावल्याचं दुःख सोसत नाही, असं अर्थहीन आयुष्य जगताना, उपभोगाचे क्षणित्व समजून येतांना, तिला एका क्षणी पूर्ण जाणीव होते की आता इथं या जगण्यात काही उरलं नाही आणि ती तिच्या फ्लॅटच्या खिडकीतून मुक्तीच्या मार्गानं उडी घेते. (या खिडकीला दोन दरवाजे आहेत.पहिला अलगद उघडते, तेव्हांच एक अडथळा संपतो, दुसरा उघडते ते एका नव्या जगाच्या शोधात, जे तसं तिथं असणाऱ्या प्रत्येकाला दिसत असेल, आता इथं काही उरलं नाही. तो मुक्तीचा मार्ग वांडाला दिसला असेल आणि आणि अलगदपणं नव्या जगात सामावून घेतलं)

भौतिक जगाची ओळख होऊन मठात पोहोचलेली इडा, तिच्या बरोबरीच्या,मुलीचा नन म्हणून शपथ विधी असतो, त्या आधी तिला अंघोळ घालताना, जिचा शपथ विधी असतो तिच्या ओल्या वस्त्रातलं तारुण्य बघून भांबावते, ती शपथ घेतांना डोळे मिटून अश्रू ढाळते. तिला वेगळं काही समजलेलं असतं. कदाचित ती मावशीबरोबर गेली नसती, तिला दुसऱ्या जगाची ओळख झाली नसती तर, ते काय आहे ते समजलं नसतं तर आताचं जग स्वीकारल्यावर कशाला पाठ फिरवली आहे हे ही कळलं नसतं. मावशीच्या अंत्यविधीसाठी म्हणून इडा परतते, मावशीच्या फ्लॅटमध्ये राहते. मावशीचे कपडे घालून बूट चालून पहाते. सिगरेट फुंकते, दारू पिते आणि अंत्यविधीच्या दिवशी तिला लिस दिसतो, त्या रात्री, लिसबरोबर मावशीचा गाऊन घालून पार्टीत नाचते, आणि लिस बरोबरच्या संगात मिसळल्यावर, लिस तिला सांगतो. आता आपलं आयुष्य सहज असेल. आपण लग्न करू, आपल्याला मुलं होतील. आयुष्य सफल. इडा दुसऱ्या दिवशी सकाळी लिसला जागं न करता मठाच्या दिशेनं वळते. इडाच्या भौतिक सुखाला पाठ फिरवून चालण्यात सिनेमा संपतो.

गोठा,गाय, गौमूत्र, शेण, गोवऱ्या, शेणखताच्या शोधातल्या मला भरवस्तीत, अगदी हाकेच्या अंतरावरल्या द्वारकेनं आपलंसं केलं . खुंट्याला बांधलेल्या गायीच्या ताज्या शेणाचा 'पो' उचलताना, त्या गरम शेणाच्या स्पर्शानं कितीतरी पावसाळ्याना मागं सारत एका दडवलेल्या जगाला जाग दिली. गाभुळत्या वेळचं शांत गाव, गायगौरा घरी परतलेला, टिमटिमत्या दुधी- पिवळ्या लाईटी, त्याही नसल्या तर काजळी धरलेले कंदील, फडकत्या ज्योतीच्या चिमण्या, (आज घरगुती चिमण्या तयार करायला कितीतरी काचेच्या बाटल्या हातात आहे तेव्हा त्यालाही महाग ) गोठ्यातल्या गाईचं हंबरणं. घुंगुरमाळांची सळसळ, शेणामुताचा घुर्र्ट्ट (उग्र ) वास, चुलीशेगडीले निखारे, कासंडीतलं उबदार फेसाळ दूध, वावरा शेतात दमलेल्यांच्या भिंतीवरल्या लांबलचक सावल्या.सगळयांची धुवट झालेली चित्रं ठळक उमटली. तिच्याकडं जे जे मिळालं ते ते घेऊन घरी आले. घरी आल्यावर पांढऱ्या वास्तवाशी साधर्म्य साधणाऱ्या पांढऱ्या शुभ्र लाईटी बदलून, पिवळ्या कमी होल्टेजच्या बल्बा लावल्या . डिम लाईटीतला हॉल ओसरी झाला. देवापुढं तुळशीपुढं दिवा लावला. देवघर नसलं तरी माझ्या साध्या पूजेच्या देव्हाऱ्यातल्या समईचा उजेड त्या देवघरापाशी घेऊन गेला. बाल्कनीतल्या दिवाळीच्या आकाशकंदिलातल्या, संधीप्रकाशाला साक्षी ठेवूनच गोवऱ्या पेटवल्या. शेण गौमुत्र एक केलं. आता मी माझ्या अंगणांत होते. गोवऱ्याच्या धुराच्या, उदबत्तीच्या , शेणा-मुताच्या मिश्र वासानं, माझं घर साधं, सरळ, सात्विक झालं. एका छोटयाशा गोष्टीनं, लहानग्या कृतीनं, मला माझं अंगण दिलं तर दिलंच पण इतक्या वर्षांनं परत तसंच जगता येणं काही अवघड नाही याची शाश्वतीही दिली.

आठवडा भर मी दोनच गोष्टी केल्या. संध्याकाळ शेणामुताच्या वासात घालवली (फुलझाडांच्या साठी अमृत जल - मिनी जीवामृत केलं त्याची सविस्तर माहिती दुसऱ्या पोस्ट मध्ये देते )आणि रात्री आणि रात्री ब्लॅक अँड व्हाईट 'इडा' सिनेमा बघितला. काळं आणि पांढरं. दुसरं नकोच. जास्त रंग मिसळल्यानं काळं - पांढरं मागं पडतं. सहा रात्री त्वेषानं मागचं सारून पुढं जाणाऱ्या इडाचा आणि नकळत स्वतःच्या जगण्याचा शोध घेतला.आतापर्यंतच्या आयुष्यात कितीदा काय काय मागं टाकलं. का टाकलं. टाकलं तेच बरं झालं. नाहीतर आज 'इडा' पाहिला असता आणि सोडून दिला असता. त्यातनं काही म्हणजे काही काही सापडलं नसतं. आयुष्यातल्या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करतांना, शरीरातल्या पेशींन पेशी, रक्ताचा थेंबन थेंब गोळा करत, हाडं आकसत पाय रोवावे तेव्हा कुठं जमीन जागा देते. आधी पाय टाकायचा की नाही? मग उचलणं. रोवणं. नंतर पायाखालच्या जमिनीनं आपलं म्हणून जागा देणं. जमिनीनं जागा दिल्यावर. रुजणं. फुलणं. बहरणं. शांत समृद्ध डेरेदार झाडाच्या खोडाच्या आणि फांदीच्या मधल्या जागेसारखं, न कुरकुरता सगळं तोलून धरण्याची परीपक्वता येईपर्यंत जगावं माणसानं. त्यातचं खरी मजा आहे. तेच खरं जगणं आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शुभांगी आपल्या लिखाणाची शैली खूप मनस्वी आहे. परत एकदा घरी जाउन हा लेख नीट वाचायचा आहे. ही शीघ्र पोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0