चक्का उलटा फिरते!

"ए बेबी, तुझा चक्का उलटा फिरते नं व्ह!" मागून जोरात आवाज आला.
एक सेकंद दचकून मी खाली वाकून चाकाकडे पाहिलंच, पण तेवढ्यात गंगारामच्या रिक्षाच्या टपावर बसलेल्या पोरांनी खाली उतरून त्याला जोरात धक्का मारला, आणि मला मागे टाकून हुल्लड करत रिक्षा पुढे निघून गेला! मी पण जोरजोरात सायकल हाणत ओरडले, "ए गंगाराम, काहीSSS काय सांगतो? मी आता पडले असते म्हणजे!" पण गंगाराम हसत हसत "कशी घाबरली!" करत पुढे निघून गेला.

मी तोल सावरला. जुलैच्या पावसात निसरड्या रस्त्यावर नुकतीच लांबच्या मोठ्या शाळेत मी आपली आपली सायकल घेऊन जायला लागले होते. जाऊदे, तो गंगाराम आहेच आगाऊ! असं मनातल्या मनात म्हटलं, आणि पेडल मारलं. माझी सायकल पुढेच जात होती, पण बाजूनी रिक्षा जास्त वेगाने गेल्यामुळे मला खरंच पुन्हा एकदा वाटलं, "आपली चाकं उलटी फिरतायत का?" SmileSmile चाकं नाही, पण मन उलटं फिरून प्राथमिक शाळेत गेलं.

पहिली ते चवथीची शाळा, मोठ्या रस्त्यावर तीन चौक टाकून होती, म्हणून आम्ही ७-८ वर्षाचे ५-६ फटाके आणि टिकल्या (मुलंमुली) गंगारामच्या सायकलरिक्षातुन शाळेत जायचो. गंगारामच्या मस्कऱ्या स्वभावाने आमची फारच करमणूक व्हायची, पण दप्तर लटकावताना मधेच जर त्याने एका मुलीची वेणी ओढली, दुसरीचा रुमाल पळवला, तर आम्हा मुलींची अस्मिता दुखावली जायची आणि आम्ही जोरात ओरडायचो. आता मी मोठी झाले, असं मला वाटलं होतं, पण मागून येऊन गंगारामने खोडी करायची ती केलीच! मला हसू आलं.

माझ्या तिप्पट चौपट वयाच्या गंगारामला आम्ही ७-८ वर्षापासूनच "ए गंगाराम" च म्हणायचो, कारण माणूस हा असा विनोदी. "अहो गंगाराम काका" वगैरे म्हणायचं, हे पण कधी सुचलं नाही, आणि कोणी शिकवलंही नाही. सगळा बेभरवशाचा कारभार, आणि रोज वेगवेगळ्या वेळी अवतारायचा नेम! Smile

सकाळी सकाळी ७:०० वाजता तयार होऊन अंगणात दप्तर घेऊन उभं राहायचं, तरी सव्वासात पर्यंत ह्याचा पत्ता नाही. कि मग समोरच्या अंगणातून चित्रकाकूचा मुलगा ओरडायचा "आज गंगाराम येत नाही वाटतं!" मग धावत धावत टॉयलेटचं दार वाजवायचं, "बाबा, गंगाराम येत नाही, लौकर करा, शाळेत सोडायचं आहे." आणि नेमकी तेवढ्यात बाहेर घंटी वाजणार. कळकट शर्ट, तारवटलेले डोळे, दाढीचे खुंट वाढलेले, नाकातून सूं सूं पाणी येतंय, अशा अवतारात गंगाराम उभा. "बेबी, पायलीवाली खांडेकरांनी लेट केला नं!" असं म्हणायचा, पण आजी हळूच नंतर सांगायची, "रात्री दारू पिऊन पडला असेल. तू जास्त बोलत जाऊ नको, शाळेत जायचं- यायचं. ह्या लोकांशी कशाला जास्त वाढवा?"

पण ते काही असो, घरच्यांचा, आणि आम्हा पोरांचापण त्याच्यावर विश्वास होता, कारण बाकी तो मनाने मुलांत मूलच होता. रिक्षात बसून आम्ही धांगडधिंगा करायला लागलो, कि "ते बेबी रिक्षातून पडली नं, डॉक्टरकडे जाऊन टाकेबी पडले..." वगैरे नुसत्या कहाण्या सांगायचा, पण आम्हाला शिस्त लावणं त्याला जमणं शक्यच नव्हतं, कारण चौकात रिक्षा थांबला, कि खाली उतरून मागे "टपावर" बसायला आम्ही "टपलेले" असायचो.

मला वाटतं गंगाराम टपावरच्या दोन सीट धरूनच मुलांची भरती करत असावा, कारण त्याला झेपतील, आणि मावतील त्यापेक्षा जास्तच पोरं रिक्षात असायची. (रोज कोणीतरी आजारी, कोणी उशीरा उठलेला, कोणी गावाला गेला - म्हणजे शाळेला बुट्टी, म्हणून उरलेली रिक्षात मावूनच जातील असाहि त्याचा अंदाज असावा SmileSmile शिवाय दुसऱ्या कोणा रिक्षावाल्याची बुट्टी असेल, तर तिथलं पण एखादं चिरकूट "दयाळूपणे" आणून बसवायचा (एक्स्ट्रा कमाई नं!)

इतकी पोरं सीटवर कोंबून बसायला तयार नसायची, उलट टपावर बसायलाच भांडाभांडी व्हायची! म्हणजे आम्ही मुलं पण ह्या कटात भागीदार होतो. टपावर 'बसणं' कसलं, ते रिक्षाच्या मागे लोम्बकाळणंच होतं, पण त्यात काय थ्रिल होतं, ते अनुभवल्याशिवाय कळूच शकत नाही...सायकलरिक्षाच्या दोन चाकांना जोडणाऱ्या पट्टीवर पाय, आणि सीटच्या काठाला हाताने धरलेलं, अशी सवारी करणारी एक दोन तरी पोरं प्रत्येक रिक्षात असायचीच. जरा उंची पुरली, की सीटच्या काठावर मागून चढून उलटं बसता पण यायचं, आणि उतारावर जास्त वारं खायला मिळायचं! शिवाय, दोन रिक्षातल्या शर्यतीत पुढे जायला टपावरची पोरं मधेच उतरून रिक्षाला धक्का पण मारू शकायची. काय पण labor of love होतं आमचं!!!

पुढे पाचवी ते सातवी मात्र "भाऊ" भेटले. खरं म्हणजे भाऊ वयाने गंगारामपेक्षा पुष्कळच तरुण, पण त्यांचा आपसूक आदरच वाटायचा, कारण नियमितपणा आणि शिस्तीचं हे दुसरं टोक! रिक्षा चालवण्यातपण किती शिस्त आणि निष्ठा असावी! रिक्षा अतिशय टापटीप ठेवायचे. त्यांनी रिक्षाला गिअर्स बसवून घेतले होते, आणि दप्तरं लटकवायलाही शिस्तीत दोन्ही बाजूला हुक्स, बाजूने ऊन-पाऊस लागू नये म्हणून वेगळे पडदे! स्वतः ही अगदी कडक कपडे घालायचे! उन्हाळ्यात काळ्याशार रंगाचे भाऊ, जवळजवळ तेजस्वीच दिसायचे इतका त्यांचा रंग तुकतुकीत होता! बेसबॉल कॅप घातलीकी तर आम्ही त्यांना सांगायचो, "भाऊ, आज काय स्मार्ट दिसून राहिले!" असं म्हंटलं, कि भाऊच थोडे गालातल्या गालात हसत लाजायचे, इतका सज्जन माणूस!

सायकल रिक्षात वास्तविक गादीची सीट एकच असते, त्याच्या विरुद्ध बाजूला लाकडी फळकुटच असतं. तर गंगारामच्या रिक्षात उंच सीट पकडायला आम्ही शाळा सुटल्यावर सुसाट धाव घ्यायचो, नाहीतर भांडाभांडी ठरलेली. भाऊंनी मात्र एक दिवसाआडचा नियमच करून टाकला, म्हणजे काल गादीवर बसलेल्यांनी आज खाली बसायचं! गंगारामच्या रिक्षात गादी-फळकुटात फारसा फरकही नव्हता म्हणा, कारण गादी ठिकठिकाणी फाटली होती, आणि भोकातून नारळाच्या का जूटच्या झावळ्या पार्श्वभागाला टोचायच्या Smile त्या पुढे भाऊंचा रिक्षा म्हणजे आमच्यासाठी limousine पेक्षा कमी नव्हती!

रिक्षात गाण्याच्या भेंड्यापासून शाळेतलं गॉसिप आणि होमवर्कपर्यंत सगळं घडायचं, कारण रस्ते अगदी लोण्यासारखे गुळगुळीत होते. नागपूरसारखे भव्य, सरळ, रिकामे रस्ते दुसऱ्या कुठेच पहिले नव्हते. ते रस्ते, आणि सायकल-रिक्षा. दोन्ही आता कालातीत झाले.

गंगारामला "उद्या वेळेवर ये" सांगून थकलो होतो, ते भाऊंना "भाऊ उद्या येऊ नका नं, म्हणजे आई शाळेत सायकलने जाऊ देईल..." असं सांगायला लागलो... आधी रहदारीच्या रस्त्यावर डावी-डावीकडून हळू सायकल चालवत होतो, ते नंतर १०वी त शर्यती लावायला लागलो. तेव्हा कधी गंगाराम, कधी भाऊ, छोट्या मुलांना घेऊन जातांना दिसत. कधी मी त्यांना हसून हात हलवला असेल, कधी दुर्लक्षही केलं असेल, कारण तेव्हा मी मोठी झाले होते नं! टागोरांच्या काबुलीवाल्याप्रमाणे आमच्या आयुष्यात रिक्षावाला, दूधवाला, ही मंडळी होती. १०वी च्या परीक्षेचा निकाल लागल्यावर भाऊ घरी येऊन मला १०० रुपये देऊन गेले, पण मला मात्र त्यांचं संपूर्ण नावही कधी कळलं नाही.

माझी मात्र गरज सरली, की बालपण? त्यांच्याशी बोलण्यासारखं अचानक माझ्याकडे काहीच उरलं नाही...!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

बऱ्याच लोकांबद्दल असं होतं.

आमच्या गल्लीत, इमारतीसमोर एक आणि शेजारी एक असे दोन उकीरडे होते. (काय मोलाची माहिती आहे ना!) तिथे कचऱ्यातून पुन्हा विकता येण्यासारख्या गोष्टी वेचायला बायका येत असतात. एक 'सुदावकर' कधीमधी हातगाडी घेऊन यायचा, या बायकांना मदत करायला. या 'सुदावकर'चं नाव समजलं कारण ते त्या हातगाडीच्या आतल्या बाजूला लिहिलेलं होतं. पत्र्याचे डबे फाडून बनवलेली हातगाडी असेल. या बायकांची नावं कधी माहीतच नव्हती; बोलायची गरजच नव्हती.

मग बरीच वर्षं गेली. दोन्ही उकीरडे खणले गेले, तिथे इमारती झाल्या, गल्ली भरून गेली. या बायका दिसेनाश्या झाल्या. मी बरीच वर्षं ठाण्यात नव्हते. एकदा चार दिवसांपुरती गेले होते तेव्हा अचानक, गल्लीतच त्यांतली एक बाई दिसली; समोरून चालत येत होती. तसेच काळेभोर केस, वय झाल्याची अगदी थोडी लक्षणं, तुकतुकीत चेहरा. मला तिच्या नाकेल्या चेहऱ्याचं, तुकतुकीत त्वचेचं अतिशय आकर्षण वाटलं म्हणून मी तिच्याकडे बघतच राहिले. 'ही बाई काय सुंदर आहे', मी मनात विचार केला. एकदम ट्यूब पेटली, ही बाई कचरा गोळा करायला यायची. मीच थांबून तिच्याशी बोलायला सुरुवात केली. "तुम्ही इथे यायचात कामाला. मी लहान होते, त्या अमक्या बिल्डिंगमधे राहायचे..." तिनं मी काय करते, वगैरे विचारण्याची औपचारिकता दाखवली असावी.

तिच्यासोबत बारका नातू होता. त्यानं माझ्या बुटांकडे बघितलं. एक नाडी लाल, एक नाडी निळी. "हे असं का केलंय?", त्यानं हळूच आजीला विचारलं. आजीनं मला विचारलं. "अरे, गंमत तेवढीच. हे बूट बघायचा कंटाळा आला होता, पण बूट चांगले आहेत, मग टाकून कशाला द्यायचे. मग या नाड्या बदलल्या." आता मात्र आजीनं हसून मान डोलावली. नातवाला अजूनही काहीही समजलं नव्हतं. 'ही चांगली मोठी बाई अशी वेडपटपणा का करत्ये', असं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.

आजीलाही ते दिसलं असावं. तिनं मला एकीकडे 'चला निघते' म्हणलं आणि नातवाला 'चल, आता क्लासला जायचं', म्हणत पाकटवायला लागली.

---

काही दिवसांपूर्वी जुन्या ओळखीतल्या अनेक लोकांनी पुन्हा संपर्क साधला. हे सगळे लोक माझ्याच आर्थिक, सामाजिक वर्गातले. काही तर शाळेतल्या वर्गातले. 'लोकसत्ता'मध्ये माझं नाव वाचलं असेल, असा समज मी करून घेतला. या लोकांशीही बोलण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. या संवादांबद्दल मुद्दाम लिहावं असंही काहीच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कँटॉन्मेन्ट परिसरात घर आणि शाळा नारायण पेठेत मग एक सायकलवाला लावला होता. XXXनावाचा. बराच हडकुळा, अतिशय गरीब (स्वभाव तसेच परिस्थितीने) त्याचे एका झाडाखाली सायकलींचे पंक्चर काढायचे दुकान होते. क्वचित (एकदाच) मला घरी आणत असताना, जिलबी खाण्यासाठी एका हॉटेलात थांबला होता, मलाही देउ केलेली.
एकदा लॉटरी तिकीट मला सांगीतले होते ड्रॉ करायला. लागले नसावेच कारण नंतरही बिचारा तेच आम्हा लहान मुलांना सायकलवरुन ने-आण करण्याचे काम करे.
त्याचाच भाऊ होता XXX नाव होतं, क्वचित मला शाळेत सोडत असे, तो मात्र बेदरकार होता.ट्रकची साखळी धरायचा व सायकल आपोआप पुढे जायची. मी घरी ही चहाडी केल्यावर त्याला ने-आण करायला मनाई केलेली होती.
XXXचा गालफडं वर आलेला चेहरा मी विसरले नाही/ विसरणार नाही. प्रामाणिकपणे, कष्टाने जगणारा हा मनुष्य आता काय करत असेल, आता सुस्थितीत असेल का, तब्येत कशी असेल, मुलं/नातवंडात रमला असेल का? एखाद्या प्रार्थनेच्या क्षणी त्यालाही सामिल करुन घेतलं जातं/जायला पाहीजे.
तेव्हा कळत नव्हतं पण आता आठवणीने गलबलल्यासारखे होते.
______________________
नऊ वारी नेसुन कामाला येणाऱ्या अतिशय बारीक व बुटक्या मावशी. त्यांच्या मुलाने XXXने, इतक्या लहान कोवळ्या वयात. टेकडीवरील टाकीत जीव का दिला असावा? नवरा दारु पिणारा, मुलाने आत्महत्या केलेली, कोणत्या बळावर मावशी जगल्या असतील? त्यांना डिप्रेशन आलेले असतानाही कामावर तर यावेच लागले असेल.
.
हे लोक लहानपणचा अविभाज्य भाग होते. पण त्यांची नावही पूर्ण माहीती नाहीत, फेसबुकवर शोधायचं कुठे? हे ऋणानुबंध असेच नकळत्या वयात गुंफलेले, आता फक्त त्यांच्या सावल्या मनात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.