भोलारामचा जीव - हरिशंकर परसाई

संकल्पना

भोलारामचा जीव

मूळ लेखक - हरिशंकर परसाई

- भाषांतर - कविता महाजन

असं कधी घडलं नव्हतं.
धर्मराज लाखो वर्षांपासून असंख्य माणसांना त्यांचं कर्म आणि वशिला पाहून स्वर्ग किंवा नरकात निवासस्थान 'अॅलॉट' करत आलेत; पण असं कधी घडलं नव्हतं.

समोर बसलेले चित्रगुप्त पुनःपुन्हा चष्मा पुसून, पुनःपुन्हा पानांना थुंकी लावून पालटत एकामागून एक रजिस्टर तपासत होते. चूक काही सापडतच नव्हती. शोधून शोधून वैतागून शेवटी त्यांनी रजिस्टर इतकं खाडकन बंद केलं की, त्यात एक माशी सापडली. माशी काढून फेकत चित्रगुप्त म्हणाले, "महाराज, रेकॉर्ड तर सगळं व्यवस्थित आहे. भोलारामने पाच दिवसांपूर्वीच प्राणत्याग केला असून यमदूतासोबत तो या 'लोका'त येण्यासाठी निघालासुद्धा... पण अद्याप इथवर पोहोचलेला नाहीये."
धर्मराजाने विचारलं, "आणि तो दूत कुठे आहे?"
"महाराज, तोदेखील गायब झालाय."

त्याच वेळी दार उघडलं आणि एक हडबडलेला यमदूत दारात उभा असलेला दिसला. त्याचा विलक्षण कुरूप चेहरा कष्ट, त्रास आणि भीतीमुळे अधिकच वेडावाकडा बनला होता. त्याला पाहताच चित्रगुप्त ओरडून म्हणाला, "अरे, तू होतास तरी कुठे इतके दिवस? भोलारामचे प्राण कुठे आहेत?"

यमदूत हात जोडून म्हणाला, "दयानिधान, काय घडलं हे मी कोणत्या तोंडानं सांगू? आजपर्यंत कधीच माझी अशी फसवणूक झाली नव्हती, पण या भोलारामचा प्राण मात्र मला धोका देऊन निसटला. पाच दिवसांआधी प्राणानं भोलारामच्या देहाचा त्याग केला, तेव्हा मी त्याला पकडलं आणि या 'लोका'त येण्यास निघालो. नगरीबाहेर येत मी त्याला घेऊन एका तीव्र वायुतरंगावर स्वार होतो न होतो, तोच तो माझ्या तावडीतून निसटला आणि न जाणे कुठे गायब झाला. गेले पाच दिवस मी अवघं ब्रह्मांड धुंडत फिरलो, पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही."

धर्मराज संतापून म्हणाले, "अरे मूर्खा! प्राण आणून आणून इतका म्हातारा झालास, तरीही एका क्षुल्लक म्हाताऱ्या माणसाच्या प्राणाने तुला चकवा कसा दिला!"
दूत मान झुकवून म्हणाला, "महाराज, मी सावधच होतो. माझ्या कर्तव्यात मी अजिबात कसूर केली नाही. माझ्या या अनुभवी हातांमधून भलेभले वकीलदेखील सुटू शकलेले नाहीयेत. पण या वेळी मात्र काहीतरी जादूच झाली."
चित्रगुप्त म्हणाला, "महाराज, आजकाल पृथ्वीवर या प्रकारच्या घडामोडी जरा जास्तच घडताहेत. लोक मित्रांना एखादी वस्तू पाठवतात आणि ती रस्त्यातच रेल्वेवाले पळवतात. होजियरीच्या पार्सलांमधले मोजे रेल्वे अधिकाऱ्यांनी घातलेले दिसतात. मालगाड्यांचे अख्खे डबेच्या डबे रस्त्यात कापले जातात. अजून एक उदाहरण सांगतो. राजकीय पक्षांचे लोक विरोधी नेत्याला पळवून नेऊन कोंडून ठेवतात. या भोलारामचा प्राणदेखील अशाच कुणा विरोधकाने मेल्यानंतर हाल करण्यासाठी पळवून नेला नसेल ना?"
धर्मराजानं कुत्सित नजरेनं चित्रगुप्ताकडे पाहून म्हटलं, "तुझीही निवृत्त होण्याची वेळ आलेली दिसतेय. आता त्या भोलारामसारख्या नगण्य, दीन माणसाशी कुणाला काय देणंघेणं असणार आहे?"

त्याचवेळी कुठूनतरी हिंडूनफिरून नारदमुनी तिथं आले. धर्मराजाला वैतागलेलं पाहून त्यांनी विचारलं, "काय झालं धर्मराज, कशाची चिंता करताय? नरकामधल्या निवासस्थानांची समस्या अद्याप सुटली नाही की काय?"
धर्मराज म्हणाले, "ती समस्या तर कधीच सुटली. गेल्या काही वर्षांमध्ये नरकात मोठे गुणी कारागीर आले आहेत. अनेक इमारतींचे ठेकेदार आहेत ज्यांनी पैसे सगळे घेतले, पण इमारती रद्दड बांधल्या. मोठमोठे इंजिनिअरही आले आहेत. त्यांनी ठेकेदारांशी संगनमत करून पंचवार्षिक योजनांचा पैसा खाल्ला. हजेरीबुकात काल्पनिक मजुरांच्या नावांच्या हजेऱ्या लावून त्या मजुरीचे पैसे हडपणारे ओव्हरसीयर आहेत. या सगळ्यांनी मिळून नरकात बऱ्याच इमारती बांधल्या. तो प्रश्न तर सुटला, पण आता एक मोठाच घोळ होऊन बसला आहे. भोलाराम नावाच्या एका माणसाचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला. हा दूत त्याचा प्राण घेऊन इकडे येत होता, तर वाटेतच त्या प्राणाने याला गुंगारा दिला. यानं सगळं ब्रह्मांड शोधलं, पण भोलारामचा प्राण काही कुठे सापडला नाही. आता असं जर होऊ लागलं, तर पाप-पुण्यात काही भेदच शिल्लक राहणार नाही."
नारदानं विचारलं, "त्याची काही इन्कमटॅक्सची भानगड तर नव्हती ना? तसं असेल तर त्या लोकांनी अडकवलं असेल."
"इन्कम असतं तर टॅक्स असता ना. हा तर भूकबळी होता."
नारद म्हणाले, "हे काहीतरी निराळंच वाटतंय. बरं, मला त्याचं नाव-पत्ता द्या, मी पृथ्वीवर जाऊन पाहतो."
चित्रगुप्तानं रजिस्टर पाहून सांगितलं की, "भोलाराम नावाचा माणूस जबलपूरमध्ये घमापूर नावाच्या वस्तीत गटाराजवळ एका दीडखणी मोडक्यातोडक्या घरात कुटुंबासह राहत होता. त्याला एक बायको होती आणि एक मुलगा व एक मुलगी. वय सुमारे साठ वर्षं. सरकारी कर्मचारी होता. पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाला होता. घराचं भाडं वर्षभर देऊ न शकल्यामुळे घरमालकानं त्याला घराबाहेर काढण्याचा चंग बांधला होता. तेवढ्यात भोलारामनं जगच सोडलं. आज पाचवा दिवस आहे. घरमालक जर पक्का असेल, तर त्यानं भोलारामचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला घरातून हाकलून लावलं असेल. त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा शोध घ्यायचा, तर तुम्हांला पुष्कळ फिरावं लागेल."

मायलेकीचा एकत्र आक्रोश ऐकून नारदानं भोलारामचं घर ओळखलं.
दाराशी जाऊन त्यांनी साद घातली, "नारायण! नारायण!"
मुलगी डोकावून पाहत म्हणाली, "पुढे जा बाबा!"
नारद म्हणाला, "मला भिक्षा नकोय. मला भोलारामविषयी थोडी चौकशी करायची आहे. तुझ्या आईला जरा बाहेर बोलावतेस का मुली?"
भोलारामची पत्नी बाहेर आली. नारदानं विचारले, "माते, भोलारामला कुठला आजार झाला होता?"
"काय सांगू? गरिबीचा रोग होता. पाच वर्षं झाली निवृत्त होऊन, अजून पेन्शन मिळाली नाहीये. दर दहा-पंधरा दिवसांनी एक पत्र लिहून पाठवत होते, पण तिकडून काही उत्तरच यायचं नाही. आलंच कधी तर, तुमच्या केसबाबत विचार सुरू आहे - असं कळवायचे. या पाच वर्षांत आम्ही सगळे दागिने मोडून खाल्ले. मग भांडी विकली. आता विकण्यासारखंपण काही राहिलं नाही. उपास घडू लागले. काळजीनं पोखरून काढलं बघा त्यांना. भुकेनं व्याकूळ होऊन जीव गेला त्यांचा!"
नारद म्हणाला, "काय करणार माते... त्याचं आयुष्य इतकंच होतं."
"असं म्हणून नका महाराज! आयुष्य पुष्कळ लाभलं असतं. पन्नास-साठ रुपये पेन्शन दर महिन्याला मिळाली असती; मग अजून एखादं काम शोधलं असतं, त्यात भागलं असतं आमचं. पण काय करणार? पाच वर्षं घरी बसून काढली नुसती आणि अजून एक कवडीही मिळाली नाही बघा."

दुःखाची कहाणी ऐकत बसायला नारदाकडे वेळ नव्हता. तो आपल्या मुद्द्यावर आला – "माते, मला एक सांग... इथं त्याचं कुणावर विशेष प्रेम होतं का, म्हणजे कुणात जीव अडकावा इतकं?"
पत्नी म्हणाली, "महाराज, असं प्रेम मुलाबाळांवर असतंच माणसाचं."
"नाही, कुटुंबाबाहेरही असू शकतं. म्हणजे कुणा एखादी दुसरी स्त्री..."
पत्नीनं भडकून नारदाकडे पहिलं. म्हणाली, "तोंडाला येईल ते बडबडू नका महाराज! तुम्ही साधू आहात, साव नाहीत. माझ्या नवऱ्यानं आयुष्यभर दुसऱ्या कुणा बाईकडे नजर वळवली नाही."
नारद हसून म्हणाला, "बरं. तुला असं वाटणं स्वाभाविकच आहे. याच विश्वासावर बहुतेक संसार टिकतात. माते, मी निघतो आता."
पत्नी म्हणाली, "महाराज, तुम्ही तर साधू आहात, सिद्धपुरुष आहात. यांचं अडकलेलं पेन्शनचं काम होऊन जाईल, असा काही तोडगा काढून द्या ना. माझ्या मुलांच्या पोटात चार घास जातील, असं काही करता नाही का येणार?"
नारदाला दया आली होती. तो म्हणाला, "साधूंचं सांगणं कोण ऐकतं? माझा तर इथं काही मठबीठही नाहीये. तरीही मी त्या शासकीय कार्यालयात जाईन आणि प्रयत्न करेन."

तिथून निघून नारद शासकीय कार्यालयात पोहोचले. तिथं पहिल्याच खोलीत बसलेल्या कारकुनाला त्यांनी भोलारामच्या केसविषयी विचारलं. कारकुनानं नारदाला नीट न्याहाळून पाहत सांगितलं, "भोलारामनं पत्रं तरी पाठवली होती, पण त्यावर वजन ठेवलं नव्हतं, त्यामुळे ती कुठंतरी उडून गेली असतील."
नारद म्हणाला, "इथं तर पुष्कळ 'पेपरवेट' ठेवलेले दिसताहेत. ते का नाही ठेवले?"
कारकून हसला, "तुम्ही साधू आहात. सांसारिक गोष्टी तुम्हांला कळत नाहीत. अशी विनंतीपत्रं पेपरवेट ठेवून टिकत नसतात. ठीक आहे, तुम्ही त्या खोलीत बसलेल्या कारकुनाला भेटा."

नारद त्या कारकुनाकडे गेला. त्यानं तिसऱ्याकडे पाठवलं, तिसऱ्यानं चौथ्याकडे, चौथ्यानं पाचव्याकडे. नारद जेव्हा पंचवीस-तीस कारकून आणि अधिकाऱ्याकडे फिरून दमला, तेव्हा एक शिपाई म्हणाला, "महाराज, तुम्ही कशाला या नसत्या झंझटात अडकताय? तुम्ही इथं वर्षभर फेऱ्या मारत राहिलात तरीही काही काम होणार नाही. तुम्ही थेट मोठ्या साहेबांना भेटा. त्यांना खूश केलंत, तर काम होऊन जाईल."

नारद मोठ्या साहेबांच्या केबिनजवळ पोहोचले. शिपाई डुलक्या घेत होता, त्यामुळे त्यांनी त्याची झोपमोड केली नाही. 'व्हिजिटिंग कार्ड' न पाठवता सरळ आत आल्यामुळे साहेब खूप वैतागले. म्हणाले, "हे काय मंदिर-बिंदिर वाटलं की काय? धाडकन आत शिरलात! चिठ्ठी का नाही पाठवली?"
नारद म्हणाला, "कशी पाठवणार? शिपाई झोपलेला होता."
"काम काम आहे?" साहेबांनी रुबाब दाखवत विचारलं.
नारदानं भोलारामच्या पेन्शन केसबाबत सांगितलं.
साहेब म्हणाले, "तुम्ही आहात वैरागी. कार्यालयातले रीतिरिवाज तुम्हांला माहीत नाहीत. खरंतर भोलारामनं चूक केली आहे. अहो, हेदेखील एक मंदिर आहे. इथंही दानाचं पुण्य कमावावं लागतं. तुम्ही भोलारामचे जवळचे कुणीतरी आहात वाटतं. भोलारामची विनंतीपत्रं उडताहेत, त्यावर वजन ठेवा."

नारद गोंधळला. इथंही पुन्हा वजनाचा प्रश्न कायम आहेच.
साहेब म्हणाले, "हे बघा, सरकारी पैशांचा मामला आहे. पेन्शनची केस पाच-पंधरा कार्यालयांमधून फिरून क्लिअर होत असते. वेळ तर लागणारच. वीसवेळा एकच गोष्ट वीस जागी लिहावी लागते, तेव्हा कुठे ठप्पा लावला जातो. जितकी पेन्शन मिळते, तितकीच स्टेशनरी लागते. हां, काम लवकरही होऊ शकतं, पण..." साहेब थबकले.
नारदानं विचारलं, "पण काय?"
साहेब कुटीलपणे हसत म्हणाले, "पण वजन पाहिजे. तुम्हाला कळत नाहीये. उदाहरणार्थ, ही तुमची सुंदर वीणा आहे, हिचं वजनही भोलारामच्या विनंतीपत्रांवर ठेवता येऊ शकतं. माझी मुलगी गायन-वादन शिकते आहे, तिला उपयोग होईल. साधुसंतांच्या वीणेमधून तर अधिक चांगले सूर निघतात म्हणे."

आपली वीणा हिसकावून घेतली जाण्याच्या कल्पनेनं नारद घाबरला. मग सावरून त्यानं वीणा टेबलावर ठेवत म्हटलं, "ही घ्या, पण आता लवकर त्याच्या पेन्शनची ऑर्डर काढा."

साहेबांनी प्रसन्न चेहऱ्यानं नारदाला खुर्चीवर बसायला सांगितलं, वीणा उचलून एका कोपऱ्यात ठेवली आणि बेल वाजवली. शिपाई आत आला.
साहेबांनी ऑर्डर सोडली, "मुख्य कारकुनाकडून भोलारामच्या केसची फाइल घेऊन ये."

थोड्या वेळाने शिपाई भोलारामच्या शे-दीडशे विनंतीपत्रांनी भरलेली फाइल घेऊन आला. तीत पेन्शनची कागदपत्रंही होती.
साहेबांनी फाइलवरचं नाव वाचलं आणि खात्री करण्यासाठी विचारलं, "काय नाव सांगितलंत महाराज तुम्ही?"
नारदाला वाटलं की, साहेबाला कमी ऐकू येतं. त्यामुळे त्यानं ओरडून सांगितलं. "भोलाराम!"

अचानक फाइलमधून आवाज आला, "कोण हाक मारतंय मला? पोस्टमन आहे का? माझ्या पेन्शनची ऑर्डर आलीये का?"
नारद दचकला, पण दुसऱ्याच क्षणी त्याला काय ते समजलं. म्हणाला, "भोलाराम! तू भोलारामचा जीव आहेस का?"
"हो..." आवाज आला.
नारद म्हणाला, "मी नारद आहे. तुला न्यायला आलो आहे. चल, स्वर्गात सगळे तुझी वाट पाहताहेत."
आवाज आला, "मी नाही येणार. मी तर पेन्शनच्या विनंतीपत्रांमध्ये अडकलेलो आहे. मला त्याशिवाय दुसरं काही नको आहे. मी माझी विनंतीपत्रं सोडून कुठेही जाऊ शकत नाही."

---

( एन. बी. टी. कडून प्रकाशित होणाऱ्या 'स्वातंत्र्योत्तर हिंदी कथा'; संपादक : कमलेश्वर या आगामी अनुवादित पुस्तकातून साभार.
हरिशंकर परसाई यांच्या काही कथा भाषांतरित करण्यासाठी कविता महाजन यांनी रीतसर परवानगी घेतली होती. मात्र, आता तो प्रकल्प पूर्ण होऊ शकणार नाही. त्या संबंधात पुन्हा बोलणी होतील तेव्हा कदाचित परवानगीबाबतची परिस्थिती बदलू शकेल.)

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

कथेतला पॅथॉस मन विषण्ण करणारा आहेच, त्यांत कविताताईंच्या आठवणीने आणखीनच उदास झाले मन!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जमल्यास अनुक्रमणिकेतील शीर्षकात हरिशंकर परसाई यांचा उल्लेख करावा.

अनुवादकाचा उल्लेखही जरूर करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता महाजन यांच्या अकाली मृत्यूमुळे भाषांतराचा हा जवळजवळ-शेवटचा खर्डा कच्चा राहिलेला होता का? की त्यांनी तयार म्हणून मान्यता दिलेली होती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कथा त्यांच्या अखेरच्या आजारपणाच्या बरीच आधी आली होती. त्यामुळे त्यांची तयार म्हणून मान्यता होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बरेच प्रकल्प अर्धे सोडून तिचा प्राण मात्र चटकनच गेला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0