दुर्दम्य

नाव हाकारुन दर्यामध्ये जमीन जेंव्हा केली दूर
आणि नक्षत्रांवर नजर ठेवत, गेलो शीड फुगवून,
वल्हे मारत क्षितीजाकडे, तेंव्हा लक्षात नाही आली
वाऱ्यांची मनमानी आणि वल्ह्यांची ताकद.
पिचलेली.

उत्तुंग शिखरांच्या विक्राळ वळणांवर
ठेवलं पाऊल पहिलं आणि बिलगलो कातळांना
जिवाच्या करारानं, तेंव्हा नाही बाळगली तमा
वैशाख-वणव्यांची नी कड्यात रोवलेल्या नखांची.
रक्ताळलेल्या.

गुणगुणत निघालो शोधत गरुडाचे पंख दिमाखदार,
अवचित दिसलेल्या वेळूंच्या सुरेल बनात थांबून
मी घडविल्या बासरीच्या सुरावटी जीवघेण्या..
आणि दीपचंदी पावलं उठवीत गेलो सुनसान वाटेवर
अंधारलेल्या

ठेचांना, घावांना, जून व्रणांच्या तरल स्मृतींना,
मूठमाती देताना कधी रडलो मूकभावे वा हंबरून
तडफडलो कधी आत्मलांछनेच्या आम्लात विखारी.
पण नाही लाजलो देताना व्यथेला तिचे भागदेय तिच्या ओटीत!
तटतटलेल्या.

हातावरच्या रेषांनी सांगितले असेलच होष्यमाण
ललाटीच्या लेखातही असेल काही खोडाखोड वा
चहाची नक्षी कपाच्या पोटात रेखत असेल गिचमिड
पण वाराभरल्या वावटळीतुन पडतीलच काही पानं माझी.
हुकमाची!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खूपच छान आहे ही कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0