एकदा काय झाले कुणास ठाऊक

एकदा काय झाले कुणास ठाऊक
स्वातंत्र्याचं बिनसलं अभिव्यक्तीशी
स्वातंत्र्य म्हणजे कसं स्वच्छंदी, दिलखुलास
अभिव्यक्ती मात्र सोयीनुसार स्वैर
स्वातंत्र्याला बागडायला अवकाश पडे कमी
अभिव्यक्तीला अडथळे मात्र पदोपदी
अभिव्यक्तीला कोंदण जातपात धर्माच्या अस्मितेचे
स्वातंत्र्याचा मार्ग ऐतिहासिक चळवळीतून समतेकडे
अभिव्यक्ती आणि समतेचे भयंकर वैर
स्वातंत्र्य बंधुभावाशिवाय सैरभैर
स्वातंत्र्याला राजमान्य राजाश्रय कागदोपत्री
अभिव्यक्तीचे सकल छायाछत्र प्रसंगानुरूप
स्वातंत्र्याला आसक्तीचा प्रचंड तिटकारा
अभिव्यक्तीच्या गटातटात ऐक्याचा दिंडोरा
स्वातंत्र्याला शोषितांची प्रबळ पार्श्वभूमी
अभिव्यक्तीला मात्र उच्चभ्रूंची घरकोंडी
स्वातंत्र्याची ऐट सार्वभौम अन् दिमाखदार
अभिव्यक्तीची लाचार फरफट दारोदार
कर्मदरिद्री करंटेपणाचा स्वातंत्र्याचा स्थायीभाव
अभिव्यक्तीला मिळे आवकनुसार बाजारभाव
स्वातंत्र्याच्या पाठीशी जाज्ज्वल्य लढ्याची मशाल
अभिव्यक्ती केवळ वैचारिक द्वंद्वात बेजार
स्वातंत्र्याला अभिव्यक्तीशी करायचाय कर्तरी प्रयोगाप्रमाणे संसार
अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याशी कर्मणी प्रयोगाप्रमाणे उठतो बाजार
अव्याहत चालूय अभिव्यक्तीची गळचेपी अन् स्वातंत्र्याचा उदोउदो
तर कुठे स्वातंत्र्याची गळचेपी अन् अभिव्यक्तीचा उदोउदो
----------------------------------------------
भूषण वर्धेकर
२६ नोव्हेंबर २०१७
दुपारचे २ वाजलेत
गच्चीबौली, हैद्राबाद
----------------------------------------------

field_vote: 
0
No votes yet