मला संत म्हणा

मला संत म्हणा

मला संत म्हणा
नंतर माझ्या जयंत्या साजऱ्या करा
निर्वाणदिनाला महाप्रसादाचे आयोजन करा
चमत्कार केलेल्या दिवसाचे औचित्य साधून
सलग दहा बारा दिवस जल्लोषात महोत्सव भरवा
रोषणाईच्या भव्य दिव्य मिरवणूका काढा
मोठमोठाले फ्लेक्स लावा, भटक्या कुत्र्यांपासून सगळ्यांचे फोटो लावा
मोहल्ल्यातले ऊरूस रस्त्यावर आणा
नाकं मुरडणाऱ्यांची नेम धरुन टाळकी फोडा
माझ्या संतपणाचा उदो उदो करा
माझ्या भक्तांचे संघटन करा
हक्क, अधिकार, कर्तव्यांसाठी मोर्चे काढा
हाणामाऱ्या, राडा आणि दंगली याची त्रिसूत्री करा
प्रस्थापितांना विस्कळीत करा, विस्थापितांची दिशाभूल करा
आकडेमोडीचे खेळ करुन आरक्षणाची मागणी करा
धिंगाणा घालून जाती पेटवा
अरे हो, जातीवरून आठवले..
माझ्या भक्तांसाठी नवीन धर्म का आचरणात आणू नये.. नव्हे आणाच...
धर्म ताब्यात आल्यावर सत्ता काबीज करता येते..
धर्मनिरपेक्ष हे बुळ्यांचे शस्त्र
आता आपला धर्म एकच
धर्मग्रंथ एकच
त्याची संहिता लिहायला घ्या..
सुरूवातच करा त्याची आपलाच धर्म महान, बाकिचे सर्व शुद्र
जो धर्माचे आचरण करणार नाही
त्याला ७2 दारांचा स्वर्ग मिळणार नाही
आपल्या धर्माचा जो स्विकार करणार नाही त्याचा खात्मा करा
धर्मवाढीसाठी परधर्मीयांची कत्तल करणे पुण्यकर्म घोषित करा
लिहिता वाचता येणाऱ्या लहान पोरांकडून माझ्या धर्मग्रंथाची संहिता मुखोद्गत करुन घ्या
तसं न करणाऱ्या पोरांच्या बापास भर चौकात सुळावर चढवा
बाईला मात्र मानाचं स्थान द्या फक्त कुटुंबात
बाहेर मात्र धर्माचे प्रोटोकॉल पाळले गेले पाहिजेत
धार्मिक अभिमान वाढवण्यासाठी स्त्रियांचा एक ड्रेसकोड ठरवा
स्त्रियांचे सगळे हक्क धर्मग्रंथात अबाधित ठेवा
सामाजिक परिवर्तनाच्या आडून बदल करणाऱ्यांचा कडेलोट करा
कट्टर धर्मगुरुंचे ताफे तयार करा
देशोदेशी पाठवा, रसद पुरवा
एकवेळ जेवा पण धर्म वाढवणाऱ्यांना सढळहस्ते मदत करा
घरादाराला उपाशी ठेवून उत्पन्नाचा काही भाग त्यांच्यावर खर्च करा
धर्म वाढवण्याच्या कामाला राजमान्यता द्या
आपल्याच धर्मातील परंपरा, रूढींवर आक्षेप घेणाऱ्यांचा निर्घृण खून करा
साखर वाटा.... पेढे वाटा....
असे करणाऱ्याला पवित्र पाण्याने आंघोळ घाला..
पापमुक्त करून नवा अध्याय सुरु करायला प्रोत्साहन द्या
आपल्या धर्मात तयार होणाऱ्या विचारवंताना ठेचून मारा
धर्माचे गुणगान करणाऱ्यांना संतपदे द्या
सोहळे साजरे करा.. जयघोषात सामील व्हा.. जल्लोषात सहभागी व्हा..
बोला.. संत शिरोमणी अस्मादिक महापुरूषाच्या नावानं.. चांगभलं

---------------------------------
भूषण वर्धेकर
५ सप्टेंबर २०१६
दौंड
---------------------------------

field_vote: 
0
No votes yet