व्हिज्युअल काॅमेडी लेखमालिका - भाग १ : चित्रपट - एक दृश्य माध्यम

बऱ्याच दिवसांपासून या विषयावर लिहिणार आहे, असं मी म्हणत होतो, अखेर त्यावर लिहिलं आहे. या विषयावरील लेख लेखमालिकेतून प्रसिद्ध करणार आहे. त्यातीलच हा पहिला लेख. पुढील लेख साधारणतः पुढील रविवारी प्रसिद्ध होईल.
--------------------

You don’t want to explain to the audience, because that makes them observers. You want to reveal to them little by little and that makes them participants because then they experience the story in the same way the characters experience it. - Bill Wittliff

एकीकडे चित्रपटांमध्ये संवादांचा, व्हीएफएक्सचा, गाणी आणि इतर गोष्टींचा जास्तीत जास्त वापर होत आहे. या सगळ्यांमध्ये चित्रपट या शब्दातील 'चित्र' कुठेतरी हरवतंय.
म्हणजे सिनेमामध्ये कथा, पटकथा, संवाद, इत्यादींना 'थोडंफार' महत्त्व मिळतंय. त्यातही जास्तीत जास्त भर हा तथाकथित 'मेनस्ट्रीम' चित्रपटांना समांतर कथा, खुसखुशीत आणि टाळ्या घेणारे संवाद, नायक, नायिका, इत्यादी गोष्टींवर दिला जातोय. यालाही ना नक्कीच नाही. कारण, हा एक व्यवसाय आहे. आणि प्रत्येकाने आपला फायदा पाहणे, यात काहीच चूक नाही. पण या सगळ्यांमध्ये छायांकन, छायाचित्रण, संगीत, पार्श्वसंगीत चित्रपटांतील दृश्याची क्षमता, इत्यादी गोष्टी मागे पडतात. अशाच एका गोष्टींपैकी एक म्हणजे व्हिज्युअल काॅमेडी. आता चित्रपटांमध्ये व्हिज्युअल काॅमेडी अगदीच दिसत नाही असे नाही, पण ती कुठेतरी हरवतेय हे नक्की. याच 'व्हिज्युअल काॅमेडी'विषयी बोलण्याचा एक प्रयत्न या लेखमालिकेतून करणार आहे. यामध्ये व्हिज्युअल काॅमेडी, तिचा योग्य वापर, दिवसेंदिवस तिची चित्रपटांमधून कमी होणारी संख्या, विदेशी आणि युरोपीय देशांच्या चित्रपटसृष्टीतील तिचा वापर, भारतीय चित्रपटसृष्टीतील वापर, इत्यादी मुद्द्यांवर चर्चा - भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. या लेखमालिकेतील हा पहिला लेख.

सिनेमा किंवा चित्रपट हे प्रेक्षकांशी संवाद साधायचे व प्रेक्षकांपर्यंत पोहचायचे एक दृश्य माध्यम आहे. तुम्ही म्हणाल की यात नवीन ते काय? तर आजकाल या दृश्य माध्यमात संवाद, वगैरे गोष्टींचा अधिक प्रभाव दिसतो. अर्थात त्याला ना नक्कीच नाही. पण, मुळात चित्रपट या शब्दातील चित्र कुठेतरी हरवतंय की काय, अशी भीती वाटत राहते. म्हणजे हे सगळं एका दिवसात होतंय किंवा एका देशात होतंय असं नाही. तर हे सगळीकडेच दिसून येतं. म्हणजे सिनेमाचा प्रवास साधारणतः काही योग्य पद्धतीने समोर मांडलेली चित्रं, नंतर पुढे त्यासोबत त्यांना चित्रपटगृहात रेकॉर्ड करून ठेवलेलं म्युझिक वाजवण्यापासून ते बोलपट आणि मग इतर काही पातळींवरून ते आजच्या सिनेमा किंवा चित्रपटांपर्यंत आपण येतो. मग मधल्या काळात या चित्रपटांना रंग मिळाले. पण, महत्त्वाचं म्हणजे यातील कॅरॅक्टर्स किंवा पात्रांना आवाज मिळाला. आणि इथेच मूकपट व बोलपट यांतील फरक आणि आपला विषय या दोन्हींचा उगम दिसून येतो. असे म्हणण्याचं कारण हेच की आपला विषय इथूनच सुरू होतो.
तर आपला विषय आहे - व्हिज्युअल काॅमेडी. मग तुम्ही म्हणाल काॅमेडी ऐकलंय, पण ही 'व्हिज्युअल काॅमेडी' म्हणजे नक्की काय? तर चार्ली चॅप्लिन बहुतेक सर्वांनाच माहित असावा. तर या चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटातील विनोद, विनोदी दृश्यं व विनोदनिर्मिती या सर्वांचा संगम म्हणजे 'व्हिज्युअल काॅमेडी', अशी साधीसुधी व्याख्या आपल्याला करता येईल. आता ही व्याख्या म्हणजे एखादी गोष्ट शक्य तितकी साधी करत व तिला लवकरात लवकर गुंडाळण्यातील प्रकार झाला.
आता ही अगदीच वरवरची व साधी व्याख्या झाली. मुळात व्हिज्युअल काॅमेडी ही उत्तम छायांकन, संगीत व पार्श्वसंगीताचा योग्य वापर, उत्तम (दृश्य) विनोदांचे योग्य प्रकारे केलेले सादरीकरण, या सर्व चित्रपट माध्यमातील मूळ घटकांचा योग्य वापर करून केलेली विनोदनिर्मिती.

आता आपण याची ढोबळमानाने सांगता येईल अशी व्याख्या पाहिली. पण आपल्या मूळ विषयाविषयी म्हणजेच व्हिज्युअल काॅमेडी विषयी सविस्तर बोलण्यापूर्वी आपण दृश्य माध्यमाविषयी बोलू. म्हणजे आपल्याला 'व्हिज्युअल काॅमेडी' ही महत्त्वाची का आहे, तिचा आधीच्या काळातील वापर व आता कमी होत असलेला वापर, इत्यादी गोष्टी पुढे समजून घेताना सोपे जाईल.
तर आधीही सांगितल्याप्रमाणे चित्रपटांचा प्रवास साधारणतः मूकपट, बोलपट ते चित्रपट आणि मग आजचा 'सिनेमा' असा होत गेला. यात १८९० च्या दरम्यान चलचित्रपट कॅमेर्‍यांचा (मोशन पिक्चर कॅमेरा) शोध लागला. याच काळात सुरूवातीचे अगदी चित्रपट नाही, पण काही 'व्हिडिओं'ची निर्मिती झाली. हे साधारण एक दीड मिनिट लांबीचे असायचे. यात आपण 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'मध्ये पाहिले तशा बुल फाइटिंग, वगैरे 'लाइव्ह' घडणाऱ्या घटना कॅमेर्‍यातून चित्रित करून, त्या दाखवल्या जात. ह्या सुरूवातीच्या काळातील 'फिल्म्स'ना (अर्थातच) आवाज नसायचा. साधारणतः १९२७ पर्यंत आपण केवळ 'मूकपट' पाहू आणि बनवू शकत होतो. म्हणजे साधारण चार दशकं केवळ मूकपट हेच चित्रपट म्हणून पाहिले जायचे. १९२७ पर्यंत 'फिल्म्स'ना आवाज देण्यासाठी आवाज रेकॉर्ड करून, तो थिएटरमध्ये वाजवला जायचा. ज्यामध्ये संवादांचा समावेश नव्हता. शिवाय, १८९८ पर्यंत फिल्म या 'स्टिल' कॅमेर्‍यातून चित्रित कराव्या लागत. कारण, तोपर्यंत 'रोटेटिंग कॅमेर्‍याचा' शोध लागला नव्हता. त्यामुळे ते शक्य नव्हते. आणि थोडक्यातच, याच सर्व गोष्टींमुळे 'व्हिज्युअल काॅमेडी'चा शोध लागला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मग १९२७ ला 'दि जाझ सिंगर' नावाचा पहिला बोलपट प्रदर्शित करण्यात आला. त्यालाच पहिला 'बोलपट' म्हणून ओळखतात. यानंतरच बोलपटांना, व नंतर चित्रपटगृहांना टाॅकीज' हा शब्द रूढ झाला. (टाॅकीज किंवा बोलपट जरी नंतर प्रसिद्ध झाले तरी व्हिज्युअल काॅमेडीसाठी प्रसिद्ध असलेल्या चार्ली चॅप्लिनने या शोधानंतरही मूकपटांनाच प्राधान्य दिले. त्याचा पहिला बोलपट 'दि ग्रेट डिक्टेटर' १९४० ला प्रदर्शित झाला. म्हणजेच बोलपटांच्या शोधानंतरही दहा बारा वर्षं तो केवळ मूकपटांची निर्मिती करत राहिला.)

हे झालं थोडंफार चित्रपट आणि चित्रपटनिर्मितीच्या वाटचालीविषयी. आता चित्रपट आणि त्यातील घटकांविषयी बोलू. तर आधीही म्हटल्याप्रमाणे चित्रपट हे एक दृश्य माध्यम आहे. म्हणजेच या माध्यमात चित्रपट आणि मग अर्थातच कॅमेरा, कॅमेरा अँगल्स, छायांकन, छायाचित्रण या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
म्हणजे एखादी घटना दाखवण्यासाठी जिथे पुस्तकांची कित्येक पानं जातील, त्या घटना चित्रपटाच्या माध्यमातून, अगदी लागोपाठ चालवलेल्या काही चित्रांमधून लवकर आणि अधिक सोप्या पद्धतीने समोर मांडता येतात.
या दृष्टिकोनातून एखाद्या दृश्याचे लिखाण जरा जास्तच कंटाळवाणे वाटू शकते. तेच दृश्य म्हणून दाखवताना प्रेक्षकाला 'अपील' होऊ शकते, वाटू शकते. आणि हेच इथे महत्त्वाचे आहे. यासाठी आपण एक साधा प्रसंग घेऊ, ज्याचा उल्लेख पुढील लेखांमध्येही असेल. उदाहरणार्थ, एखादे पात्र शिडीवर चढत आहे. मग हे शाॅट्स टाॅप अँगल्स किंवा साइड व्ह्यूमधून दाखवून किंवा ते पॅन शाॅट्समधून चित्रित करणं योग्य होणार नाही. मग ते कसे योग्य वाटेल, हे ते प्रत्यक्ष चित्रण करतानाच कळेल. हे झाले कॅमेरा अँगल्स, छायांकन यांविषयी. तर इथेच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही शिडी कुठे वळाली पाहिजे, किती वेळ हलली पाहिजे, किंवा केव्हा पडली पाहिजे हे लिखाणात लिहिणे किंवा विचार करणेही शक्य नाही. त्यासाठी त्याचे चित्रण करणे आणि त्याचवेळी त्यात बदल करून, प्रेक्षक ते कसं व किती वेळेपर्यंत पाहू शकतील, कुठे त्याचा अतिरेक होईल, इत्यादी गोष्टींचा विचार करून आणि थोडक्यातच इंप्रूव्हायझेशन करूनच शक्य होईल. थोडक्यात, अशा काही दृश्यांचे चित्रण करतानाच ते ठराविक पात्र त्या दाखवल्या जात असलेल्या परिस्थितीमध्ये आणि दृश्यामध्ये कोणती संभाव्य कृती करेल, याची जाणीव होते. म्हणजेच हे त्या दिग्दर्शकाच्या आणि अभिनेत्याच्या निरीक्षणावर अवलंबून आहे.
हे झालं थोडंफार चित्रपटांमधील दृश्यांच्या चित्रणाबद्दल, पण दृश्यासोबतच याला संगीताचीही जोड महत्त्वाची ठरते. मग हे संगीत संवादांच्या दरम्यानचे असो किंवा एखाद्या विशिष्ट दृश्यामागे चालणारे संगीत असो, संगीत हा चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे अगदी मूकपटांसोबतही अगदी रेकॉर्डिंग चालवून का होईना, पण संगीताची जोड होतीच. या संगीताच्या व्हिज्युअल काॅमेडीमधील वापराविषयी पुढे येईलच.

चित्रपटांचा दृश्य माध्यम म्हणून वापर हा “show, don’t tell” या वाक्याचा सार आहे. आजकाल दिसणाऱ्या बहुतांशी चित्रपटांच्या कथा - पटकथा या एक महत्त्वाची गोष्ट विसरत आहेत, ती म्हणजे या कथांमधून काहीतरी भव्य, सुंदर दृश्य समोर उभं करता आलं पाहिजे. याउलट यातील बहुतांशी चित्रपट हे केवळ टाळ्या घेणारे संवाद, हिरोची शरीरयष्टी यांवर तारून नेण्यासाठीच बनवलेत की काय, असे राहून राहून वाटत राहते.

थोडक्यात, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की व्हिज्युअल काॅमेडीमध्ये असो वा इतरही चित्रपट व चित्रपटांमधील दृश्यांत, संगीत, पार्श्वसंगीत, संवाद, हे महत्त्वाचे असले तरी चित्र थोडक्यातच दृश्य हे महत्त्वाचे आहे. याविषयी पुढील लेखात सविस्तर येईलच. पण, तरीही चित्रपट हे एक दृश्य माध्यम आहे, हे विसरून चालणार नाही. आणि तसंही प्रत्येकचवेळी कथा सांगण्याऐवजी, ती मांडणे महत्त्वाचे आहे.


या लेखात उदाहरण म्हणून चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटांचे संदर्भ देण्यात आलेले आहेत. केवळ त्याच्याच चित्रपटांचे संदर्भ देण्यामागचा उद्देश इतकाच की तुलना टाळली जावी. आणि उदाहरणंही लवकर समजावीत अशी व्हावीत. एकाच दिग्दर्शकाचे उदाहरण दिल्याने त्यात तुलना करणे आणि त्याच्याच कलाकृतींमधील आणि दृष्टिकोनातील विविधता समोर येते. बाकी पुढील लेखांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या दिग्दर्शक - लेखकांची उदाहरणे येतील. कारण, या संदर्भित केवळ चॅप्लिननेच सगळं काही केले आहे, असं नाही.

लेख कसा वाटला, ते तुम्ही खाली कळवालच. पण, काही सूचना असतील तर त्याही कराव्यात. बाकी प्रतिसादात बोलू राहूच. पुन्हा पुढील रविवारी या लेखमालिकेतील पुढील लेखामध्ये भेटू.
----------
भाग २
----------
भाग ३

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचतोय!

पुभाप्र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.

माझ्या मते हे व्हिज्युअल काॅमेडीमध्ये मोडत नाही. याला काॅमेडी म्हणता येईल. पण, व्हिज्युअल काॅमेडी नाही. कारण, यात दृश्य माध्यमातून एखादा विनोद सादर केलाय, असं मला वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हिज्युअल काॅमेडी विषयीचा एक व्हिडिओ इथे पहा. कदाचित सुरूवातीला कळणार नाही. किंवा याला मी व्हिज्युअल काॅमेडी का म्हणतोय, ते कळणार नाही.

त्याविषयी -
व्हिडिओमधील साधारण परिस्थिती समोर मांडतो. यात दाखवलेल्या मित्रांना बीयर प्यायची आहे. त्यासाठी ते एका बारमध्ये गेले आहेत. मुख्य पात्राखेरीज सुरूवातीला थोडंफार बोलताना दिसते. त्याविषयीचा संदर्भ पूर्ण चित्रपट पाहिल्यावर कळेल. त्यानंतर दुसरं पात्र ऑर्डर देते. पण, ते पात्र स्वतःसाठी बियरऐवजी एक ग्लास पाणी मागते. त्यानंतरची मुख्य पात्राची रिअॅक्शन पहा आणि ती कशा प्रकारे दाखवली आहे, ते पहा. शिवाय, बियरचे ग्लास भरताना कसे चित्रित केले आहेत, ते पहा. तो शेवटचा काही फ्रेम्स आणि काही सेकंदाचा सीन साध्या पद्धतीने दाखवता आला असता किंवा दाखवला नसताही. पण, तो सीन तसा चित्रित करणं त्यातील विनोद आणि चार बियरच्या ग्लासांनंतर एक पाण्याचा ग्लास भरणे, या साधारण क्रियेतूनही विनोदनिर्मिती करतो.

अवांतर - सदर दृश्य दिग्दर्शक एडगर राइटच्या 'दि वर्ल्डस् एंड' या चित्रपटातील आहे. लिंक वर आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढील लेख वाच‌ण्यास उत्सुक‌ आहे. सुरुवात आव‌ड‌ली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.