पळशीकर : शिक्षक

गुरू शिष्य गुरूगोत प्रभाकर कोलते शंकर पळशीकर

पळशीकर : शिक्षक

लेखक - प्रभाकर कोलते

शिक्षकाचे घर, त्यासी ज्ञानाचा आधार, आनंद आगार, सर्वांसाठी।

सरांचं घर हे आम्हां विद्यार्थ्यांसाठी अशा ज्ञात्याचं घर होतं. त्यात आमचं प्रवेश करणं दबकत होई; परंतु आम्ही त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडत असू तेव्हा आमच्या खांद्यावर सरांचा हात असे आणि त्या स्पर्शात पुन्हा येण्याचं आमंत्रण.

सरांना परंपरेने चालत आलेलं काहीही नको होतं. त्यांच्या अंगी ती मोडण्याचं बळ ठासून भरलं होतं. याचा अर्थ त्यांना धर्म, ज्ञाती, रीतीभाती या विरोधात उठाव करायचा होता असं नव्हे, तर समाजासोबतच्या स्वत:च्या संबंधांमध्ये आणि कलेमध्ये नवे, पूर्वी कोणीही न केलेले किंवा कधीही न झालेले प्रयोग त्यांना अभिप्रेत होते. जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती माणसाला शहाणं करते आणि तेच शहाणपण त्याला नवी दृष्टी देतं, हे त्यांनी अनुभवलं होतं. परिणामी त्यांच्या ठायी अभंग आत्मविश्वास होता आणि त्यांच्या आवडीच्या विषयावर प्रभुत्व असल्यामुळे त्याविषयीच्या सखोल विश्लेषणावरही त्यांची पकड असणं स्वाभाविकच होतं.

सरांनी वाचलेलं एखादं नवीन पुस्तक ते आम्हाला वाचून दाखवत. मग विचारत, "काही कळलं का?" आणि त्यांना हेही माहीत असे, की आम्हाला काहीच कळलं नाही असं नव्हे परंतु आम्हाला पूर्ण कळलंय याची खात्री नाहीय. आणि हे जाणल्यामुळेच ते हातातलं पुस्तक बाजूला ठेवत, आणि एखाद्या कीर्तनकाराप्रमाणे त्या पुस्तकाचं मर्म उलगडून दाखवत. वर "केवळ वाचाळ होऊन उपयोगाचं नाहीये, वाचक व्हा", असा बोचरा सल्ला देत. आमच्यापैकी बरेच जण वाचक झाले ते त्यांच्यामुळेच.

सरांची पिढी 'चित्रकार चित्रं रंगवतो, चित्रावर बोलत नाही' अशा मूलभूत विचाराची जरी असली तरी त्यांच्यातला शिक्षक बोलत असे आणि चित्रकार रंगवत असे. त्यामुळे त्यांचे अनुयायी आणि चाहतेही खूप होते. सर 'आधी अनुभवले मगची सांगितले' अशा आशयघन प्रणालीचा पाठपुरावा करणारे असल्यामुळे, शिवाय कायम सतर्क राहत असल्यामुळे त्यांची व्याख्यानं परिणामकारक होत असत. श्रोत्याला विचार करायला लावण्याची ताकद त्यांच्या बोलण्यात असायची.

कोलते
शंकर पळशीकरांनी काढलेलं प्रभाकर कोलते यांचं व्यक्तिचित्र (१९७४). खाजगी संग्रहातून.

घरी भेटणारे सर आणि आर्ट-स्कूलमध्ये दिसणारे सर यांत जमीन-अस्मानाचा फरक असे. आम्ही मित्र गमतीने म्हणत असू; जुळे भाऊ असावेत, एक घर सांभाळणारे, दुसरे स्कूल चालवणारे. खरं म्हणजे सरच स्कूल चालवत असत, अगदी ते प्राध्यापक होते तेव्हापासून ते डीन ह्या उच्चपदावरून निवृत्त होईपर्यंत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असणारे सारे शिक्षक (प्रा. शिरगावकर आणि प्रा. सुखडवाला हे दोन शिक्षक सोडून) त्यांचे विद्यार्थीच होते आणि त्या सर्वांना सरांचा आवाका आणि नैतिक जरब परिचयाची होती. शिक्षक म्हणून सरांची प्रतिमा इतकी प्रभावी होती, की त्यापुढे त्यांचे विरोधकही नतमस्तक होत असत. पुढे त्यांतलेच काही आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी सरांच्या विरोधात गेलेही, परंतु शेवटी तोंडावर आपटले.

कलेवरची हुकमत, विद्वत्ता आणि स्पष्टवक्तेपणा यांचं प्रभावी उदाहरण म्हणजे पळशीकर सर. त्यांचा पिंड शिक्षकाचा होता हे त्यांना स्वतःला चांगलंच माहीत असणार; तोच त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा जन्मजात पाया होता; ज्यावर त्यांचं आयुष्य, त्यांची कला, त्यांची शैक्षणिक स्वप्नं, त्यांची प्रगल्भ विचारधारा, त्यांचं यश, त्यांची विफलता, सारंसारं उभं होतं. शिक्षक होताच त्यांनी इतर सर्व भरभराटीकडे पाठ फिरवली. आणि शिक्षक होण्यासाठी नव्हे, तर शिक्षक म्हणूनच त्यांनी जन्म घेतला होता हे सिद्ध केलं.

खरं म्हणजे, प्रोग्रेसिवांच्या काळात (प्रोग्रेसिव्ह आर्ट ग्रूप) कलाक्षेत्राचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना सहज मिळावी इतके सारे मानसन्मान (बॉम्बे आर्ट सोसायटी, कोलकाता आर्ट सोसायटी यांची महत्त्वाची सुवर्णपदकं, शिवाय बॉ.आ.सो.ची दोनवेळा रौप्यपदकं) त्यांना प्राप्त झाले होते. तत्पूर्वी केंद्र शासनाची सर्वात पहिली शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली होती. त्याशिवाय भरपूर प्रसिद्धी, नावलौकिक इत्यादी. परंतु ते त्या सन्मानांच्या पलीकडच्या स्वत:लाही नक्कीच जाणत असणार यात शंका नाही. एका जागी भक्कमपणे स्थिर राहणं आणि गर्दीत वाहून जाणं यांतला फरक त्यांनी आजमावला असावा. यशस्वी होऊन थांबणं आणि यश ओलांडून पुढे जाणं यांतला सूक्ष्म फरक त्यांना सजग करून गेला असावा. कलाक्षेत्रात मिळालेलं यश ओलांडून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये स्थिर झाले ते विद्यार्थ्यांसाठी. आपल्याजवळचं कलात्मक सर्वस्व विद्यार्थ्यांना देण्यासाठी.

पळशीकर कलर साउंड
कलर अँड साउंड (१९७४). पळशीकर यांच्या व्यक्तिगत संग्रहातून.

सर दर दिवशी वेळेच्या आधीच वर्गात येऊन बसलेले असत. त्यामुळे उशिरा येणाऱ्यांची पंचाईत होई. ते फक्त पाहत त्या लेट-लतीफांकडे. त्यांच्या नजरेत एक वेगळीच जरब असे, त्यामुळे उशिरा येणारे दुसऱ्या दिवशी वेळेवर हजर असत. न रागावता विद्यार्थ्यांकडून इच्छित काम करू घेणं, हे त्यांच्या सवयीचं झालं होतं.

किंवा कधी कधी एखाद्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करूनही त्याला मार्गावर आणणं त्यांना खूपच चांगलं जमत असे. लाकडी फरसबंदी असलेल्या स्कूल ऑफ आर्टमध्ये सरांच्या बुटांचा होणारा बुलंद आवाज विद्यार्थ्यांवरच्या एका वेगळ्याच वचकाचा भाग होता आणि त्यावर त्यांच्याच चालण्याची मालकी असावी, इतका तो त्यांचाच होता. तो आवाज कानावर पडताच सगळ्यांचे पाय आपापल्या जागेकडे वळत आणि त्यानंतरची मूक, धीरगंभीर शांतता आम्हा सगळ्यांना कामाला लावी. कलाभ्यासात आणि निर्मितीत शांतता, एकाग्रता आणि कृती यांचा परस्परांशी अन्योन्यसाधारण, घनिष्ट संबध आहे याचा आम्हाला उशिरा का होईना, पण त्यांच्याच सानिध्यात साक्षात्कार झाला; आणि हा संबंधच जागतिक कलाक्षेत्रातल्या अनेक नव्या शोधांचा जनक आहे, हे सरांमुळेच आम्हा विद्यार्थ्यांना उमजलं. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा त्यांच्या दूरदृष्टीची आणि त्यांच्यातल्या चित्रकार-शिक्षकाच्या मागे उभ्या असलेल्या त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची आम्हाला खऱ्या अर्थाने ओळख पटली.

प्रोग्रेसिव चित्रकारांना वैचारिक बळ तथा नैतिक पाठिंबा देणारे 'टाईम्स ऑफ इंडिया'चे कला-समीक्षक श्री. रुडी लेडन आपल्या एका लेखात पळशीकर सरांची शिक्षक म्हणून अनुभवलेली महती व्यक्त करतात : "सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रा. शंकर पळशीकर स्कूल अस्तित्वात आहे, ही खरोखरच अद्भुत गोष्ट आहे व ती पळशीकरांचा शिक्षक तथा चित्रकार म्हणून असलेला दबदबा दर्शविते."

माणसांच्या गराड्यात एकटं राहणं पसंत असल्याचं त्यांच्या देहबोलीतूनच व्यक्त होई. त्यांच्या त्या निवडीबद्दल अनेकजण गैरसमज करून घेत. फार थोड्यांनाच त्यांचं ते एकटेपण भावत असे. कोणाला आवडो अथवा न आवडो, सरांच्यात दोन्हींमुळे काहीही फरक पडत नसे.

घर जसं त्यांचं असे तसंच स्कूल ऑफ आर्टही त्यांचंच असे. सर्वत्र त्यांचीच छाप दिसत असे. सरांशिवाय स्कूल ऑफ आर्टची कल्पना करणं त्यांच्या विरोधकांनाही कठीण वाटे. ह्यात काही रहस्य वगैरे नव्हतं, तर एका अस्सल व्यक्तिमत्वासाठी आर्ट स्कूल हे एक चिरंतन चिंतनक्षेत्र होतं. सर स्वतःच म्हणत, "केवळ माझा होणं मला कोणत्याही क्षणी शक्य असतं, कारण मी सर्वकाळ इतरांचाच असतो." सर्वांचं भान ठेऊन केवळ स्वतःचा होणं यालाच जिवंत समाधी म्हणतात, हेच त्यातून त्यांना व्यक्त करायचं असावं. सरांचे उद्गार आणि कृती यांमध्ये भेद नसे, पाण्यात राहून त्यात न मिसळणाऱ्या तेलासारखे ते कसे काय राहू शकतात, याचंच आम्हाला अप्रूप असे.

सर एक प्रतिभाशाली चित्रकार तर होतेच, परंतु एक सव्यसाची शिक्षकही होते. त्यांपैकी त्यांचं कोणतं कार्य उजवं होतं, हे ठरवणं मात्र खरोखरच कठीण गोष्ट ठरेल. मला वाटतं, ही दोन्ही कार्यं एकमेकांना पूरक ठरणारी आहेत हे त्यांनी चांगलंच ओळखलं होतं. शिक्षक म्हणून एकदा नोकरी मिळाली की बहुतेक जण केवळ पाट्या टाकणंच पसंत करतात. सरांनी मात्र आपल्या नोकरीदरम्यान भरभरून ज्ञानाच्या पाट्या आणल्या आणि शब्दांच्या माध्यमातून तसंच प्रभावी प्रात्यक्षिकांतून मुलांच्या डोक्यांत त्या रिकाम्या केल्या. सरांचं व्यक्तिचित्रणातलं प्रात्यक्षिक इतकं भारावून टाकणारं असे की त्यांच्या त्या प्रभावात प्रवेश करण्याआधी दीर्घ पल्ल्याचा अभ्यास करावा लागे. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याहून अधिक आणि वेगळा प्रयास करावा लागे. शिवाय, ते प्रात्यक्षिक कधी देतील ह्याचा नेम नसे, त्यामुळे विद्यार्थी कायम त्याची वाट पाहत सतर्क राहत.

ते नेहमी म्हणत "प्रकाश पाहायला शिका. प्रकाश आणि त्याच्या विविध छटा अनुभवायला शिका. हा प्रकाशच चित्रात महत्त्वाचे कार्य करीत असतो." त्यासाठी ते कलेतिहासातले दाखले देत, तद्वत सौंदर्यशास्त्रातल्या विविध रूपकांचा आधार घेत; परंतु त्याच वेळी ते ह्या दोन विषयांना प्रमाणापेक्षा अधिक डोईजड होऊ न देण्याचा सल्लाही देत.

'चित्र हे प्रत्यक्ष, दृश्य अनुभवाचा विषय असल्यामुळे शक्यता आहे की तो अनुभव आपण कसा पाहतो यापेक्षा तो कसा दिसतो, यावर आपण अधिक भर देतो. मग प्रकाशामुळे त्याच्या दिसण्यामध्ये होणारे बदल आपण निरखत नाही. परिणामी व्यक्तीचित्रणात समोर बसलेल्या माणसाचं ओळखपत्र आपण रंगवतो, परंतु त्या व्यक्तीद्वारे स्वतःचं पाहणं व्यक्त करत नाही. तद्वत रचनाचित्रात विषय आणि त्याच्याशी संबंधित कल्पनेचं बाह्यरूप आपण टिपतो, परंतु त्याद्वारे स्वतःचे तद्संबंधीचे विचार प्रदर्शित करीत नाही', असं त्यांचं मत होतं.

प्रात्यक्षिक डेमो
पळशीकरांची प्रात्यक्षिकं

'चित्र रंगवताना हवी असणारी सहजता आत्मसात करायची असेल तर चित्रकाराला धाडस करायलाच हवं, कारण यशाची वाट अपयशातूनच जात असते', असंही त्यांचं मत होतं. 'अपयशातून आपण अधिक शिकत असतो', असं ते वरचेवर म्हणत. 'एकदा अपयश पचवलं की चित्र हा आनंदाचा परिपाठ नव्हे तर जीववेडा हव्यास होतो, आणि मग पुढे आपण तो व्यासंगापर्यंत नेऊ शकलो तर चित्र म्हणजे आपल्यासाठी अतर्क्य अनुभूती होऊन जाण्याची शक्यता असते. असं जर झालं तर चित्र आपल्या चिरंतन ध्यासाचं अंग होऊन राहतं; आपला एक संवेदनशील अवयव होऊन राहतं. मग संवेदना म्हणजे बीज आणि मग ते बीज नवा अवयव म्हणजे अंकुर होऊन वाढतं. ही वाढच आपल्याला चित्रकार असल्याचा अनुभव देण्याची शक्यता असते', असं ते म्हणत.

आकलन होत नाही तोवर सरांचं सगळंच शिकवणं कठीण वाटत असे, आणि एकदा कळलं की ते अधिक कठीण वाटायचं.

सर व्यक्तीचित्रण झरझर करत, कधी पातळ तर कधी जाड रंग लावत, कधी तर कॅनव्हासच सोडून देत, परंतु प्रकाशाची जाण कायम जागी आणि प्रखर ठेवत. खरं म्हणजे रेखन करतानाच पुढच्या रंग-आलेपनाची कल्पना मूळ धरायला सुरुवात होई. व्यक्तीच्या आंतररचनेसोबत बाह्य प्रकाशाचे बदलणारे रूपाकारही त्यांना महत्त्वाचे वाटत. ते व्यक्ती-प्रकृतीच्या भावस्थितीचे बाह्य नकाशे असतात असं ते म्हणत. एकंदरीत रचना आणि प्रकाश यांचं संतुलित संगीत म्हणजे व्यक्तिचित्रण, असंच त्यांना म्हणायचं असावं असं वाटावं, इतकं ते त्यांचं रंगकाम स्वरमय आणि एकजिनसी करत असत. रंग आणि प्रकाशछटांची त्यांची जाण जेवढी त्यांच्या आतून येत असे, तेवढीच ती समोरच्या व्यक्तीशी त्यांनी साधलेल्या दृश्य संवादातूनही व्यक्त होत असे. हा संवाद ओघवता आणि संतुलित असे. सरांसाठी प्रत्येक प्रात्यक्षिक एक प्रयोग असे आणि तो कधी फसत नसे, हे विशेष. किंबहुना त्यातूनच त्यांना पुढच्या प्रयोगाची आगाऊ कल्पना येत असे. सरांची प्रात्यक्षिकं आणि अ-प्रात्यक्षिकं किंवा व्यावसायिक कामं यांत काडीचाही फरक नसे; त्यामुळेच सरांनी केलेली दोन्ही तऱ्हांची कामं गाजली. सराव आणि काम यात त्यांनी फरक केला नाही; शिकणं आणि शिकवणं यांमध्येही केला नाही; किंवा काल-आज-उद्या-परवामध्ये केला नाही. मनात एक आणि जनात एक असं त्यांनी केलं नाही, तसंच रंग आणि अंग यांमध्ये फरक केला नाही. कधी कधी तर न करणं हीच त्यांची एक कृती असे आणि तीदेखील पूर्वी कधी केलीच नाही अशी कृती असे.

जे. जे.च्या संग्रही असलेलं 'मिस के' नावाचं जे प्रात्यक्षिक आहे, ते जागतिक पातळीचं समजलं जातं. त्याचप्रमाणे 'शर्मा', 'गायकवाड' इत्यादी अनेक प्रात्यक्षिकं अवर्णनीय आहेत आणि त्यांपैकी अनेक जागतिक संग्रहालयांतून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध, आश्चर्यचकित करीत आहेत.

मिस के
मिस के (१९५२). सर जे.जे. कला महाविद्यालयाच्या संग्रहातून.

सरांचं प्रात्यक्षिक ज्यांना ज्यांना पहायला मिळालं त्या सर्वांना व्यक्तिचित्रण विषय म्हणजे कर्मकठीण वाटे आणि ते काठिण्यच त्यांना आव्हान देई आणि त्या विषयात गुंतवे. हा गुंतून पडण्यातला विरोधाभास नवल वाटण्यासारखा होता; किंबहुना, तोच सरांच्या अप्रत्यक्षपणे शिकवण्याचा किंवा शिकण्याचा मार्मिक बंधही होता.

लेखातील सर्व चित्रे स्वामित्वहक्काधीन. लेखातील त्यांचा वापर मजकूर विशद करण्याच्या हेतूने Fair use मूलतत्त्वे अनुसरून.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0