अंतहीन काळाकुट्ट बोगदा

डिसक्लेमर - मी डॉक्टर नाही. माझ्या माहीतीप्रमाणे, डिमेन्शिया रिव्हर्स करता येत नाही. त्याच्यावरती रामबाण उपाय अजुन तरी सापडायचा आहे. याचा अर्थ प्रत्येक पेशंट मरावा अशी इच्छा करणे हा मार्ग नाही. सकारात्मक आशावाद ठेऊन, औषध सापडण्याची वाट पहाणे, सुश्रुषा करणे हे मार्गच अवलंबिणे श्रेयस्कर आहे. पण मुद्दा हा आहे की, वृद्ध आणि मनाने खचलेल्या साथीदाराच्या मनात, खालील विचारही येऊ शकतात, त्या विचारांत गैर काहीही नाही.

ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी

.
सुंदर, विलोभनीय, मोहक, कुरूप, कृतज्ञ नाना रंगांच्या तुकड्यात शिवलेली तलम गोधडी , तुझे आणि माझे सहजीवन. तुलाही आठवतात हे तुकडे, आयुष्याचे सार, आयुष्याला अर्थ देणारे दैवीगतीच्या प्रारब्धाच्या रेशमादोर्‍याने शिवलेले हे तुकडे.

पूर्वी ते तुला, सरळ ओळीत मांडलेले , संलग्न, तार्किक, सलग आठवत. आता फरक इतकाच की विखुरलेले, अतार्किक, विस्कळीत, तुटकतुटक आठवतात. कधी तू भावूक होतेस इतकी की तुला अश्रू आवरत नाहीत. घरातील आनंदी वातावरण सुतकी होऊन जाते. कोणालाही हे कळत नाही की तू अचानक इतकी शोकमग्न का झालीस! तर कधी तू कडू होतेस, तासन तास घुमी बसून राहातेस. कधी तुला अमाप गप्पा मारण्याचा उत्साह असतो पण श्रोता काही मिळत नाही तर कधी उदास, विषण्ण खिन्न बसून राहातेस. या सर्वात कसोटी माझी आहे , मला धीर सोडायचा नाही, मला पेशन्स सोडून चालणार नाही. डॉक्टर म्हणतात "नाही पेशंटशी वाद घालायचा नाही. दिवसाला जरा पेशंट रात्र समजत असेल तर ते त्याच्याकरता वास्तव आहे आणि तुम्ही सुज्ञानी वाद घालायचा नाही. हे असेच चालणार."

.
मला तुझ्यापासून ताटातूट नको, दुरावा नको. इतकी वर्षे तू मला साथ दिलीस, मला सावरलेस, माझ्या पाठीशी भरभक्कम उभी राहिलीस, आता माझी पाळी. तुला फिरायला जातेवेळी पत्ता लिहिलेले चिटोरे दिलेले असते, गळ्यात अडकवलेले असते. तुझा ठरलेला एक रस्ता आहे ज्याच्या पलीकडे तू जायचे नाहीस हेही बजावलेले असते आणि तरीही जोपर्यंत वॉकवरून तू परत घरी येत नाहीस तोपर्यंत माझ्या पोटात खडडा पडलेला असतो. मला तुझी ताटातूट नको. आपल्या दोघांच्या आयुष्याचा हा शेवटचा पडाव आहे. हा होइल तितका सरळ, साधा जावा.
.
आयुष्यात, आपल्या सहजीवनात काय नाही पाहिलं आपण, काय नाही भोगलं. जसे आनंदाचे, शुभ, मंगल क्षण अनुभवले तसेच अपत्यवियोगही एकत्रच साहीला. जसा गळ्यात गळा घातला तसे भांडलोही अन्य जीवांप्रमाणेच सुख आणि दु:ख या दोन्ही पात्यांच्या मध्ये आपणही भरडले गेलो. दिलासा एकच होता की एकमेकांना एकमेकांची साथ होती. आपण एकमेकांच्या साथीने परिपक्व होत गेलो. सोळा वर्षांचा मी वाड्यात काही निमित्ताने आलो आणि माझ्यापुढून मैत्रीणीबरोबर हसत बागडत एक चवदा वर्षांची अवखळ किशोरी गेली. दोन वेण्यां वरती लाल रिबिनी बांधून पाठीवर दप्तर घेऊन. तेव्हा तुला तरी आणि मला तरी माहिते होते की बरोबर 9 वर्षांनी आपण विवाहावेदीवर एकमेकांचे साथीदार बनणार आहोत, नंतर 2 वर्षांनी आई-वडिलांची भूमिका निभावणार आहोत.
.

त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी
त्या तिनिसांजा त्या आठवणी त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, जमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी

.
पण थांबा तू मला अशी घाई करून देणार नाहीस तू म्हणशील, सविस्तर सांग. पहिला दृष्टीक्षेप ते आजपर्यंत आपले मुख्य नाते राहिले ते मैत्रीचे. अतिशय आनंददायक, प्रसंगी कठोर मैत्री. आपण काही असू तर ते एकमेकांचे जिवलग मित्र. किती बोलायचीस तू, भरभरून, प्रत्येक विषयावर मत मांडायचीस. उत्कट, भारावलेली, तरुण, अननुभवी, एखादी सरिता दुथडी भरून वाहावी तशी बोलायचीस. सॅलिसबरी पार्क मार्गे, सदाशिव पेठेतील आपल्या महाविद्यालयापासून ते वानवडी पर्यंत आपण सलग बस घेऊन तर कधी चालतही फिरायचो. श्रम, उन्हाचा ताप जाणवायचा नाही कारण बोलणे संपायचे नाही, उत्साहाला खळ नसे. तुझ्यामधील मनस्वी आणि इंटेलेक्च्युअल उत्कटतेला मी प्रतिसाद देऊ शकलो का, न्याय करू शकलो का हे मी जाणत नाही. फक्त कल्पना करू शकतो. तुझ्या पिंग्या डोळ्यात झलक पाहू शकतो. शेवटी माझ्याबद्दलच्या त्यावेळच्या खर्‍याखुर्‍या भावना, उत्कटता हा कप्पा फक्त तुझा.

पण आजकाल प्रत्येक खाजगी कप्प्यातून काही गोष्टी स्पिल होतात, फक्त तुझा हक्क असलेल्या भावना, तुझ्या नकळत मोकळ्या होतात, contorted, ट्विस्टेड ..... डोळ्यातून अश्रूंच्या रूपाने तर कधी शब्दातून. तुझे मूड तुझ्या ताब्यात राहात नाहीत.

.
तू मला आयुष्यात समरसतेने, उत्कटतेने साथ दिलीस. अलोट प्रेम, विश्वास, सेवा, उत्साह, धैर्य सारे काही भरभरून दिलेस. आनंदात जशी साथ दिलीस तशीच दु:खातही दिलीस. माझे विश्व उजळलेस, भरभक्कम, व्यवहारी पाया आपल्या जीवनास दिलास. भावनिक, व्यावहारिक, नैतिक पायाच नाही तर पुण्याई, सकारात्मकता, वेळप्रसंगी कानउघाडणी, कठोरता आणि व्यवहारीपणाची जोड दिलीस.
.

कधि जवळ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा
जल्मासाठी जल्म जल्मलो, जल्मात जमली ना गट्टी

.

डिमेंशिआ व्यक्तीला हळूहळू खातो. अजून तरी हा आजार बारा होत नाही, मॅनेज करावा लागतो. पहिल्यांदा माझ्या लक्षात आले तेव्हा जेव्हा सांगितलेली लहान लहान गोष्ट तू विसरू लागलीस. तुझा विसरभोळेपणा वाढतच गेला, हळूहळू ब्लॅन्क मूड चे ड्युरेशन वाढू लागले. ऐकलेले कळत नाही, कळले तर कृती होत नाही. जाणिवा, भवतालचे ज्ञान, मूड, संवाद, जजमेंट प्रत्येक faculty वरती परिणाम दिसू लागला. डॉक्टरानी दिलेली औषधे चालू होती पण रोग आटोक्यात येत नव्हता, arrest होत नव्हता. inevitable समोर दिसत होते.

पेशंटला त्रास होतच असणार नव्हे होतोच पण त्याच्या नातलगांना दु:सह, दारुण यातना होतात. मुलांना त्यांचे व्याप, त्यांच्या महत्त्वाकांक्षा आपण दोघेच एकमेकांसाठी. मी तुझी काळजी घेतली, घेतो, घेणार हे निश्चित. तुझ्या शुश्रुषेत काहीही कमी पडू देणार नाही, माझा पेशन्स संपणार नाही. पण या अतिकठीण काळात, मी मन मोकळे कुणाकडे करायचे माझी सर्वात जवळची मैत्रीण दुरावते आहे . हे दु:ख तिच्याबरोबर वाटणे शक्य नाही. मी समवयस्क मित्रांमध्ये, पेन्शनर्स च्या ग्रुप मध्ये मन रमवू लागलो आहे पण त्यालाही मर्यादा आहेत.
.
असे ऐकून आहे, वाचून आहे की पुरुष दिसायला खमके, भक्कम असले तरी मुळात वस्तुस्थितीत, स्त्रियाच चिवट असतात. On an average स्त्रिया पुरुषांहून अधिक काळ जगतात. मी मात्र हीच इच्छा करतो की आपल्या बाबतीत उलटे व्हावे. तू आधी जावीस. आता गुंतू नकोस. खूप त्रास भोगलास, आनंदही भोगलास, अनेक अनुभव घेतलेस आता या गुंत्यातून हळूहळू पाय काढता घे. पुढे हो आणि माझ्या स्वागतासाठी आधी जाऊन वाट बघ. परत भेट होईल, परत हाच खेळ आपण मांडू परत जीवलग सवंगडी बनू, पण आता निरोप घे..
.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सहजसुंदर लिखाण झालंय.म्हटलं तर आहे ,म्हटलं तर नाही अशी अवस्था दिसतेय.एकाला सर्व आठवतंय दुसय्राला काहीच नाही.
(खूप प्रोटिनयुक्त आहार करणाय्रा लोकांना हा आजार उतारवयात होतो असं ऐकलंय.भारतात अर्थातच कमी प्रमाणात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

खूप प्रोटिनयुक्त आहार करणाय्रा लोकांना हा आजार उतारवयात होतो असं ऐकलंय.भारतात अर्थातच कमी प्रमाणात.

पहील्या वाक्याच्या पुष्ट्यर्थ बातमी सापडली नाही. दुसरे वाक्य पुरेशा विदावाचून निरर्थक वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. आमच्या नातेवाईकांतल्या निदान तीन केसेस माहित आहेत.
डिमेन्शिया आणि अलझायमर याच्यात नक्की काय फरक आहे ? सातीला रिक्वेस्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला २ केसेस माहीत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी माहितीही ऐकीवच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी अल्झाइमर्स न्युज फॉलो करते, पैकी हे खूपदा वाचले आहे की एक प्रकारचा प्लाक (मळ) तयार होतो ज्याच्यातील एक घटक प्रोटीन असतो. आणि हा मळ साचल्याने पेशी एकमेकींपर्यंत संदेश्वहन करु शकत नाहीत.
https://www.alz.org/braintour/plaques.asp
______
अजुन एक बातमी ही वाचलेली (लिंक शोधून देते) - आय चेक अप मध्ये अल्झैमर्स डिटेक्ट होऊ शकण्याचा रिसर्च चालू आहे. अर्थात हे मी माझ्या आय चेक अप च्या वेळी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट (नेत्रशल्यविशारद?) विचारले होते. पण हे संशोधन अद्याप होते आहे. अजुन अप्लाय झालेले नाहे असे सांगण्यात आले.
http://www.medicaldaily.com/eye-test-early-alzheimers-human-clinical-tri...
______
तीसरी बातमीही काहीतरी ऐकलेली पण आठवत नाही. आठवली की लिहीते.
http://www.livescience.com/53019-epps-chemical-washes-away-alzheimers-pl...
एक विशिष्ठ रसायन उंदरांमध्ये हा प्लाक काढून टाकते असे आढळलेले आहे. पण नंतर या बातमीचा पाठपुरावा करता आलेला नाही.
___
लवकरात लवकर या प्लाकला करोड करणारे, हा प्लाक नाहीसा करणारे रसायन्/औषध वैज्ञानिकांना मिळो. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://aisiakshare.com/node/2901
हा व्यायाम क्वचित करत असते. विशेषतः पडल्यापडल्या मेंदूस "मेमरी रिकल्क्शन" चा चाळा म्हणुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख छान.
माझ्या वडिलांना डिमेन्शिया आहे. २०११ दरम्यान सुरूवात लक्षात आली, त्यानंतरचा स्ट्रोक, आताची वागणूक हे सगळं लिहीते नंतर. पण याबद्द्ल साती वा इतर कोणी वैद्यकशास्त्राशी संबधीत असतील त्यांनी यावर खरोखरच लिहावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिही प्लीज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण कोण हे विसरणं ही अतिशय दुःखद गोष्ट वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वर म्हटल्याप्रमाणे लिहीतेय. मी फक्त अनुभवापुरतं मर्यादित ठेवते कारण वैद्यकिय भागाबद्द्ल इतर कोणी जास्त चांगलं स्पष्टीकरण देऊ शकतील.
साधारण २०१० च्या दरम्यान असेल एका रवीवारी संध्याकाळी आम्ही आई बाबांशी गप्पा मारून घरी आलो (१० मिनीटांवर रहातात) आणि आईचा फोन आला की बाबांना घशात प्लॅस्टीकचा तुकडा अडकल्यासारखं वाटतय. कारण रवीवार संध्याकाळ म्हणून दवाखाने बंद म्ह्णून माझा नवरा त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी "असं काहीही नाही म्हणून परत पाठवलं. पण त्यांचा विश्वास बसला नाही ते पुढले दोन दिवस अधून मधून तसं म्हणतच राहीले.
त्यानंतर ४-५ महिन्यांनी माझ्या बहिणीच्या सासर्‍यांबरोबर त्यांचं परशुराम इथलं घर बघायला आम्ही दोघं आणि बाबा असे गेलो. त्या परिसरात फिरलोही. त्याच भागात म्ह्णजे खेड-चिपळून-रत्नागिरी मध्ये माझी अविवाहीत आत्या फार पूर्वी नोकरी निमित्याने रहात असे. फिरताना कधीकधी बाबा तिचा उल्लेख करून म्हणायचे "आपण तिला निघताना सांगीतलय का?" किंवा "चला घरी जाऊ, ती वाट पहात असेल." असं म्हणायचे मग त्यांच्या लगेच लक्षातही यायचं की आपण काहीतरी विसंगत बोलतोय. गणपतीपुळ्याला दर्शन घेऊन गाडीत बसताना त्यांच्या मित्राचा फोन आला (देवळासमोरच), तेव्हा कुठे आहोत हे सांगताना ते म्हणाले "काही कळत नाही. ही लोकं कुठेतरी घेऊन आली आहेत मला, काही नाही मी जरा गोंधळलोय. आता घरीच जाणार आहे." त्याच ट्रीपमध्ये एकदा पहाटे ते उठून मला म्हणायला लागले की "मला आत्ताच्या आता घरी जायचय" ते दोन दिवस त्यांचं मन तिथे नव्हतंच. त्यांना घरचेच वेध लागलेले. केवळ दोन दिवसंनतरच्या ट्रेनचं रिजर्वेशन आहे म्हणून कसेबसे त्यांनी दोन दिवस काढले.
ती चार दिवसाची भेट आटोपून डोंबिवलीला परतल्यावर मी त्यांना फॅमिली डॉ कडे जायला लावलं. त्यांनी काही टोनिक्स दिली आणि काही विशेष नाही असं सांगीतलं. त्यानंतर आई त्यांना घेऊन त्यांच्याच मित्राचा एक मुलगा वैद्यकक्षेत्रात (युरॉलॉजिस्ट-न्युरॉलॉजिस्ट नाही) आहे त्यांच्याकडे गेली. त्यांनी ही टॉनिक्स दिली, अजून कोणाकडे जायची गरज नाही असं सांगीतलं . पण आमचं शंका समाधान झालं नाही, आईने तिच्या सायकियाट्रेस्ट भाचीला फोन केला. तिनेही हे विशेष काही नसल्याचं सांगीतले. एकदा वेळ काढून घरी येऊन तिने काही टेस्टस सांगीतल्या त्यानंतरही या वयात कधी कधी मेंदूला रक्तपुरवठा होत नसल्यानं असं होतं म्हणून सांगून काही औषध लिहून दिली.
तात्पर्य, काहीतरी गंभीर, वेगळं आहे हे लक्षात येत होतं पण काठा-काठानंच सर्व प्रयत्न सुरू होते. मुळात डॉ. हे पराचा कावळा करून सांगतात यावर बरेचदा विश्वास असल्याने प्रत्येक डॉ "हे नॉर्मल आहे" असं सांगतोय तेव्हा स्वतःहून एमारआय वैगेरे करून घेण्याबद्द्ल विचारावं असं काही कोणाच्या डोक्यात आलं नाही. साधारण दिवाळीच्या सुमारास एकदा संध्याकाळी मी घरी आले तेव्हा फोनवर आईने बाबा झोपल्याचं बोलली. ते गुंगीत असल्यासारखेच होते. थकले असतील म्हणून १० पर्यंत वाट पाहिली आणि मग त्यांना उठवलं तर त्यांच्या डोळ्यावर झोप होतीच. डॉ.नी "मेंदूशी संबधीक काही असू शकेल असं सांगून" त्यांना शक्य तेवढ्या लवकर हॉस्पिटलला अ‍ॅडमिट करायला सांगितलं. पण त्यांनी सांगीतलेलं हॉस्पिटल लांब त्यातून दिवाळीचे आवाज, बाबांचा ठाम नकार या सगळ्यात आम्ही सकाळपर्यंत थांबायचं ठरवल. आईच्या सायकीयाट्रीस्ट भाचीनेही "काही हरकत नाही" असं सांगीतलं. पण रात्री ११ १२ नंतर तोपर्यंत अतिशय मंदपणे हालचाल करणारे बाबा एकदम अ‍ॅक्टीव झाले. ते सारखं उठून बसत होते. दार उघडून घराबाहेर जाऊ बघत होते. मी,आई,माझा नवरा,मुलगी आळीपाळीने त्यांना "आता रात्र आहे. झोपा" असं सांगत होतो. पण त्यांना ते पटत नव्हतं. त्यांना भास व्हायला लागलेले की अंथरुणात झुरळं फिरत आहेत, कोणी बेल वाजवतय वैगेरे. शेवटी पहाटे तीन-चार वाजता आम्ही जवळच्या एका हॉस्पिटलला फोन केला आणि त्यांना तिथेच अ‍ॅडमिट केलं. एमाराय नंतरचं निदान "स्ट्रोक".

व्हॅस्क्युलर डिमेन्स्शिया हे निदान घेऊन दोन दिवसांनी उठलेल्या बाबांना आपण हॉस्पिटलमध्ये का आहोत हे काही आठवत नव्हतं. मेंदूतील काही भागांचा रक्तपुरवठा नीट न होणे हे यासाठीचे कारण. त्यांना हाय-बीपीचा त्रास होता पण त्यांनी दुर्लक्ष केलं, हे एक महत्वाचं कारण असू शकेल असं डॉ म्हणाले. आता यावर उपाय असा काहीही नाही. पण फॅमिली डॉ ना त्यांचा अबोल आणि स्वभाव माहित असल्याने त्यांनी मानसोपचारतजाला भेटायला सांगितलं, त्यामुळे कदाचित ते मोकळे होतीत, मनावर काही ओझ असल्यास ते उतरेल असं त्यांचं म्हणणं होतं. तसंही आईवेडे असल्याने त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर हे खूप खचले होते. त्यानंतर आत्याचा कॅन्सर, उपचार आजारपण, जाणं याही गोष्टींनीही ते अधिकाधिक कोशात जात गेले असावेत.
पण त्या मानसोपचार डॉ. बरोबर बोलताना बाबांना उलट दडपण येऊ लागलं. त्याच्या क्लीनिकमध्ये बाजूलाच काही मनोरुग्ण अ‍ॅडमिट होते ते पाहून त्यांना अधिक त्रास होऊ लागला मग आईने स्वतःहून तिथे जाउया नको असं ठरवलं.
या सगळ्याला आता ५/६ वर्ष होत आली. मध्ये त्यांना होमियोपाथी औषधं सुरू केली. ती अजूनही सुरू आहेत. त्यांचा स्वभाव बदलला आहे. ते आधी कर्तव्यकठोर प्रकारातले होते आता प्रचंड हळवे झालेत. आताच्या त्यांना गोष्टी आठवत नाहीत. पण जुन्या गोष्टी सतत आठवतात. कोणत्याही गोष्तीवरून ते भूतकाळात उतरून त्यावर खूप बोलू लागतात. आम्ही त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिलं नव्हतं. पण आता साध्या साध्या जुन्या गोष्टी सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, आवाज दाटतो. आपण कोणाला आवडत नाही. आपल्याला लोकं टाळतात असं त्यांना सतत वाटत असतं. कोणत्याही गोष्टीचा अती-आग्रह असतो, व्यवस्थितपणाचा आधीचा अतिरेक आता अती-अती अतीरेकात बदलला आहे. मात्र आपण विसरतो ही गोष्ट त्यांना पक्की माहिती आहे, त्यामुळे काही निरोप सांगीतला तर ते "मी सांगतो पण मी विसरतो हल्ली" असं म्हणतात मात्र रस्ते चुकतात पण सकाळी संध्याकाळी ठराविक रस्त्यांनी फिरायला जाऊन येतात. आम्ही मध्येमध्ये त्यांना आवडणारे विषय काढले की खुलतात नाहीतर "कंटाळा आलाय" हे एकच एक पालुपद असतं. नाही म्हणायला बागकाम हे त्यांच्या आवडीचं काम. त्यात त्यांचे सकाळपासून दुपारपर्यंत वेळ जातो, मन रमतं.
निदान झालं तेव्हा आम्ही चरकलो होतो. अल्झायमर बद्द्ल ऐकलेल्या गोष्टी घाबरवून सोडत होत्या. आता थोडं सरावलो. अजून स्वतःची ओळख विसरण्याइतपत वेळ आलेली नाही. पण कधीकधी जेवलो होतो हे विसरतात पण आठवण दिली की "ओहो, मी हल्ली विसरतो ना" अशी आम्हालाच आठ्वण करून देतात. डॉ ने त्यांना छोटी छोटी कोडी सोडवा, चांगलं वाचत रहा वैगेरे सागीतलं पण वाचलेलं लक्षात रहात नाही असं म्हणत ते वाचायचं टाळतात. आईच कोडी सोडवत आणि त्यांना मध्येमध्ये विचारत बसते. कॉम्प्लेक्स गोष्टी समजायला कठीण होतं. एखादं काम करून (उदा. दरवाज्याची दुरुस्ती) घ्यायचं असल्यास त्याच्या तपशीलात त्यांचा गोंधळ होतो आणि तो समोरच्या अनोळखी व्यक्तीलाही तो कळतो. एखाद्या मुद्द्यबद्दल तेच तेच विचारलं-विसरलं, पुन्हा विचारलं जातं.
मला मात्र बाबांशी बोलतोय असं वाटत नाही. ते माझ्याकडे मुलगी म्हणून बघत नाही तर स्वतःपेक्षा जास्त काही माहित असलेली व्यक्ती म्हणून बघतात. थोड्याथोड्या चुकांना "अरे सॉरी मला हे नाही जमत" असं म्हणतात, ओशाळतात. "उगाच तुला त्रास दिला", असं म्हणतात. हे मला नाही सहन होत. त्यांना कितपत अंधार जाणवतो माहीत नाही पण त्यांचा प्रकाशाची तिरीपही नसलेल्या बोगद्यात जिवंतपणी प्रवेश होऊ नये एवढीच इच्छा आहे.

त्यांना स्ट्रोक येण्याच्या दोनएक वर्षे आधीपासून त्यांच्या स्वभावात हळूहळू बदल होत होता. ते अतिशय चिडायचे. साध्यासाध्या गोष्टींवर खूप चिडायचे, बॅन्क, किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी जाणं अक्षरशः टाळायचे. हेकेखोरपणा वाढला होता. घर सोडून कुठेही बाहेर जाणं त्यांना नको वाटायचं. (आताही ते कुठेही गेले की परतायच्या मागे लागतात. आईबरोबर लग्नाला जाऊन अक्षता पडल्या रे पडल्या की "न जेवता घरी जाउ" असं पालुपद लावून ते परतलेले आहेत.) आणि एक दृश्य फरक म्हणजे साधारणे ५/६ महिने आधीपासून ते खूपच बारिक झाले होते, लक्षात येण्याइतपत. स्ट्रोक येण्याच्या दोन दिवस आधीपासून त्यांच्या चालण्यातही थोडा बदल झाला होता. एरवी ते रस्त्यावर भराभर चालत पण तेव्हा ते अडखळल्यासारख आणि हळू चालत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय प्रतिसाद दिलेला आहेस. हॅटस ऑफ टू यु. खूप, अत्यंत उपयोगी माहीती आहे. डोळ्यात खरच पाणी आलं गं. स्वभावातील बदल हे तुझे नीरीक्षण चपखल आहे. हा एक सिम्प्टम असल्याचे मी वाचलेले आहे. मलाही एकदा हा चेकअप करायचा आहे कारण इतकच की घरात हा आजार आहे व जितक्या लवकर निदान होइल तितके उत्तम असते. मे बी आजच डॉक्टरांची अपॉइन्ट्मेन्ट घेइन.
.
मासे, बदाम, ब्लु बेरीज, कॉफी आदि मेंदूस पूरक गोष्टी पूर्वीपासूनच आहारात आहेत. पण मफिन वगैरे जंक फुडही खाल्लेले आहे. व्यायामाची अळंटळं. या काही गोष्टी टाळायला हव्या होत्या/हव्यात असे वाटते.
______

मी आत्ताच डॉक्टरांना इमेल पाठवली की मला चेक अप करुन घ्यायचा आहे. या विषयावर चर्चा नेहमी व्हायला हव्यात. हा विषय प्रकाशझोतामध्ये राहीला पाहीजे. विशेषतः मध्यमवयीन ऐसीकर, सिनीअर ऐसीकर यांना फायदा होऊ शकतो. The sooner it is diagnosed the better. brain MRI मध्ये प्लाक लक्षात येतो.
http://www.berkeley.edu/news/media/releases/2009/07/14_alzheimers.shtml
.
http://www.berkeley.edu/news/media/releases/2009/07/images/alzheimer.jpg
.

"The field, in general, is moving toward ways to select people during earlier stages of Alzheimer's disease, including those who show no outward signs of cognitive impairment," said Dr. William Jagust, a faculty member of UC Berkeley's Helen Wills Neuroscience Institute and principal investigator of the study.

या अशा व अनेक अन्य शास्त्रज्ञांचे अनंत उपकार आहेत मानवजातीवरती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची कंपनी NAMI Walk (National Alliance on Mental Illness) मध्ये भाग घेते. पुढच्या शनिवारी मिनेसोटा मध्ये Minnehaha Park मध्ये आहे. मला जायची इच्छा आहे. जर गेले तर याच धाग्यावरती फोटो टाकेन. जाता येइलच याची गॅरन्टी नाही. ही फक्त जाहीरात आहे ज्यांना जमेल त्यांनी यावे म्हणुन. मी जर गेले आणि कोणी ऐसीकर आले तर भेटायची इच्छा आहे.

http://www.namiwalks.org/index.cfm?fuseaction=donorDrive.event&eventID=571

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिच्यात आणि माझ्यात कविताप्रेम सोडलं तर कोणतीच गोष्टी सामायिक नाही . मूलभूत फरक आमच्या स्वभावात आहे. किंबहुना ती जे जे म्हणून आहे ते ते नाकारूनच माझी घडण झालेली आहे . ती नास्तिक असल्याने मी आस्तिक व ती स्त्रीमुक्तीवादी असल्याने मी पारंपारिकतेला कवटाळणारी असा काहीसा प्रकार आहे. अनेक मुली आईच्या अगदी सावली पाहिलेल्या आहेत याविरुद्ध मी तिला नाकारून घडले आहे. पण असं नाकारता येतं का? असं नाकारून सूड तरी घेता येतो का? आणि सूड तरी कशाचा तर तिच्या पराकोटीच्या माणूसघाण्या स्वभावाचा. वेळोवेळी मला कधी समजावून सांगून तर कधी टाकून बोलून झिडकारल्याचा. ती माणूसघाणी आहे म्हणूनच मी Clingy आहे. एखादी व्यक्ती नाकारण्यातूनही आपले त्या व्यक्तीबद्दलचे ऑब्सेशनच दिसून येते. विपरीत-भक्ती, विपरीत-प्रीती.
दर वेळेला फोन केला की तिच्या अधिकाधिक deteriorate होता हजाणार्या, खंगत जाणार्‍या प्रकृतीबद्दल माहिती कळते.अतिशय वाईट वाटते खिन्न वाटते. शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या वेळेस टिळक स्मारक मंदिरात, मध्यंतरात माझयाकरता डब्यात खाऊ घेऊन आलेली, आई आठवते.
अनेकदा वाटतं तिला मिठी मारून तिच्या डोक्यावरून हात फिरवावा. नवव्या वर्षी तिची आई गेल्यानंतर कोणी तिचे लाड केले असतील? असं एखाद्या व्यक्तीला नाकारून व्यक्तीचा प्रभाव नाकारता येत नसतो, आईचा तर नाहीच. तिची अर्धी गुणसूत्रे माझ्यात आहेत.. तिच्यात आणि माझ्यात एकाच रक्त आहे कदाचित आमची हृदये वेगवेगळ्या तऱ्हांनी धडधडत असतील तिचे कदाचित वाइल्ड मनस्वीपणे तर माझे Tamed रीतीने पण ती जोडलेली आहेत. आणि हा heart -tug विशेषत्वाने आता जाणवू लागलेला आहे. डिमेन्शियाच्या आहारी जाऊन, हळूहळू ती माझ्या पासून दुरावत चालली आहे, पण अजून तरी तिला मी आठवते. अजूनही माझा फोन आला की ती म्हणते "तुझा आवाज ऐकला, आजचा दिवस फार चांगला जाणार" पण ज्या वेगाने तिची प्रकृती खालावत आहे त्या वेगाने बहुतेक काही दिवसातच ती मला ओळखणाराही नाही असे वाटते. तिला यातनामय भास होतात, ती चिडते, अतिशय त्रागा करते. काल्पनिक जगात वावरते, भास होतात, त्या भासांमुळे कधी आनंद तर कधी यातना होतात. काल्पनिक अपमान, दु:ख ती सहन करते.
मला हे सर्व ऐकून डोळ्यात पाणी येते. आणि तरीही एक अलिप्तता जाणवते.ही अलिप्तता खरी आहे. एक प्रकारचा रॅशनल acceptance सहज साध्य होतो.
आयुष्यातील पहिला गुरु आई असते म्हणतात. आईचा चेहरा बाळ पहिल्यांदा पाहते, तिच्या प्रेमात पडते. खूपदा बाळे उगाचच आईकडे टक लावून हसताना पाहिलेली आहेत. केवढां समाधान दिसतं त्या जीवांच्या मुखावर. पहिलं प्रेम ही आईच असते.समोर Essentia हॉस्पिटलमध्ये लवकरच स्वयंसेविका म्हणून जाईन. आईची सेवा करता येत नाही पण अन्य रुगणां ची तर करता येईल. आणि ती सेवा आईपर्यंत पोचेल. सासूला दिलेले प्रेम आईपर्यंत पोचेल. प्रत्येक प्रार्थना तिच्यापर्यंत पोचेल. अशी guarranty तर कोणीच देऊ शकणार नाही. आपण स्वतः: स्वतः:ला द्यायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0